ऑपरेशन तारा: सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय
ऑपरेशन तारा: सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय (‘जागतिक व्याघ्र दिन’ विशेष) (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) महाराष्ट्रातला पहिलाच व्याघ्र स्थानांतरण प्रकल्प, जो सह्याद्रीच्या जंगलांच्या कुशीत राबविला जात आहे. ‘तारा’ या पहिल्या वाघिणीला ‘एन्क्लोजर’मधून सोडले तो क्षण! प्रस्तावना- जंगलात वाघाची डरकाळी घुमली की संपूर्ण परिसंस्था सावध होते. पानांची सळसळ थांबते, पक्ष्यांचे अलार्म कॉल्स (Alarm Calls) घुमू लागतात, वानर-माकडे मोठमोठ्याने दंगा करू लागतात आणि क्षणभर संपूर्ण अरण्य एका अनामिक दराऱ्याने थिजून जाते. हा अनुभव केवळ रोमांचकच नाही, तर तो एका खोल पर्यावरणीय सत्याची जाणीव करून देणारा आहे- इथे वाघ आहे! वाघ हा केवळ एक देखणा आणि राजस प्राणी नाही, तर तो संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याचा बायो-इंडिकेटर (Bio-indicator) आहे. दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day)’ हा याच जाणीवेचा जागतिक जाहीरनामा आहे. यंदाच्या व्याघ्र दिनाला महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पश्चिम घाटासाठी (Western Ghats) अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या...
