अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ आणि भारतीय समाजमनावरील परिणाम (Amitabh Bachchan’s “Angry Young Man” and Its Impact on the Indian Social Psyche)
अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ आणि भारतीय समाजमनावरील परिणाम (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील) * सिनेमाचा समाजमनावरील परिणाम- ‘आपली मुले आपले (म्हणजे, मोठ्यांचे) अनुकरण करतात’ हे बालमानसशास्त्रज्ञांनी सांगून सांगून झिजलेले वाक्य आहे. माझा मुलगा अद्विक हा आत्ता साडेचार-पावणेपाच वर्षांचा असल्यामुळे या वाक्याचा मला वारंवार अनुभव येत असतो. दोन-तीन आठवड्यांपूर्वी सहज एक पाच-दहा मिनिटे दूरचित्रवाणीवर एक कार्यक्रम पाहत मी बसलो होतो. शेजारी अद्विकही बसला होता. नेमका अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील ‘पीटर... तुम मुझे उधर ढूँढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ...’ वाला सीन चालू होता. (अद्विक ओळखू लागलेला पहिला सेलिब्रिटी आणि अभिनेता अमिताभ बच्चनच आहे हे विशेष!) सीन झाला. मध्ये काही दिवस गेले. एका रविवारी अद्विकबरोबर खेळत असताना अचानक अद्विक म्हणाला, “बाबा, चला आपण अमित बच्चन (अद्विकचा उच्चार) खेळूया. मी अमित बच्चन आणि तुम्ही ते गुंड. तुम्ही आधी मला मारा, मग मी नंतर तुम्हाला मारतो.” मला थोडासा धक्का बसला. इतक्या कमी वयातल्या मुलांवर सिनेमाचा किंवा त्यातील एखाद्या व्यक्तिरेखेचा ...

