पश्चिम घाटातील सापांची घटती संख्या पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक! (The dwindling population of snakes in the Western Ghats is alarming from an environmental perspective!)

अमर्याद जंगलतोड, अनियंत्रित मॉन्सून आणि बेशिस्त रस्ते वाहतूक सापांच्या मुळावर!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)


विषय ओळख-
जीवसृष्टीतील अन्नसाखळ्या अबाधित राहणे ही निसर्गसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यावश्यक अशी बाब आहे. सध्या सर्वच सजीव सृष्टीवर, विशेषतः प्राणी जगतावर अन्नसाखळ्या बाधित झाल्यामुळे मोठे संकट ओढावत चालले आहे.

रस्ते, मोठमोठ्या फॅक्टऱ्या, कॉर्पोरेट कार्यालयांच्या इमारती या स्वरुपात पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या नादात प्राण्यांचे अधिवास धोक्यात येऊ लागले आहेत. पोटापाण्यासाठी माणसे जंगलात आणि जंगली प्राणी रहिवासी क्षेत्रात अतिक्रमण करत आहेत.




जागतिक दर्जाचे आघाडीचे दैनिक ‘द गार्डियन’ने सापांच्या घटत्या संख्येबद्दल सुमारे १५ वर्षांपूर्वीच एक मोठा अग्रलेख लिहून जगाला या संभाव्य संकटाची जाणीव करून दिली होती!


माझे निरीक्षण-
मी जवळपास २०१३-१४ पासून सापांचा अभ्यास करीत आहे. पश्चिम घाटांच्या मध्यभागाचा एक भाग असणाऱ्या राधानगरी-दाजीपूर-गगनबावडा या जंगलपट्ट्यातील सापांचा अभ्यास करून त्यांच्या प्रजातींच्या नोंदी ठेवण्याचा वैयक्तिक प्रयत्न मी करत असतो. सापांची संख्या मोजणे हे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि कठीण काम आहे. त्यांच्या वावराचे थेट निरीक्षण करणे कठीण असल्याने वैज्ञानिक अनेक विशेष पद्धती वापरतात. मार्क-रिकॅप्चर पद्धत, दृश्य निरीक्षण पद्धत, रेडिओ ट्रॅकिंग, ड्रिफ्ट फेन्स आणि ट्रॅप्स, पर्यावरणीय डी.एन.ए. मॅपिंग आणि कॅमेरा ट्रॅप्स या सापांची संख्या मोजण्याच्या मुख्य शास्त्रीय पद्धती आहेत. पण, साप हे लपून राहणारे, बहुधा रात्री सक्रिय राहणारे, दाट जंगलात अवघड ठिकाणी राहणारे आणि बऱ्याचदा त्यांच्या विषामुळे धोकादायक असणारे जीव असल्यामुळे त्यांची संख्या इतर प्राण्यांप्रमाणे व्यवस्थितपणे मोजता येत नाही. शिवाय, यातील बऱ्याच पद्धती या महागड्या किंवा सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या किंवा सहजासहजी वापरता न येण्याजोग्या आहेत. मी सापांच्या संख्येची नोंद ठेवत नसून साप समृद्ध भागात पूर्वी दिसणारी सापांची संख्या व आता फिरताना दिसणारी सापांची संख्या यांवर माझे निरीक्षण ढोबळमानाने बेतलेले आहे.

मी वैद्यकीय क्षेत्रातला डॉक्टर असून पारंपरिक प्राणिशास्त्राचा विद्यार्थी नाही, हे सुरुवातीलाच नमूद करतो. निसर्गाची आवड आणि त्यातल्या त्यात सापांबद्दलचे आकर्षण असल्यामुळे मी त्यांचे वर उल्लेख केलेल्या जंगलपट्ट्यात निरीक्षण करत आलो आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या हे लक्षात आले आहे की, हळूहळू हे सर्वच साप दिसण्याचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यातही, काही ठराविक साप, जे काही विशिष्ट प्रदेशांत वारंवार आढळत असतात, ते गेल्या काही वर्षांत खूप कमी प्रमाणात आढळताना दिसत आहेत. माझे अभ्यासाचे भौगोलिक क्षेत्र त्यामानाने खूप कमी आहे; पण प्राणिशास्त्राच्या काही संशोधनपर लिखाणातही मला सापांची कमी होणारी संख्या यावर काही लेख लिहिले गेलेले दिसून आले. त्यासंदर्भाने हा विषय गंभीर आहे असे मला वाटते.

सापांचे महत्त्व-
सापांना शेतकऱ्यांचे मित्र मानले जाते. वस्तुतः साप हे फक्त शेतकऱ्यांचेच नाही, तर अखंड मानवजातीचेच मित्र आहेत असे म्हणायला हरकत नाही. तिसऱ्या जगातल्या (अविकसित आणि विकसनशील) देशांत तर सापांचे महत्त्व केवळ वादातीत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे या देशांत केवळ एका जेवणावर दिवस काढणारे करोडो लोक आहेत. यांतील बरेचसे देश हे अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाहीत. त्यामुळे जे काही धान्य पिकवले जाते त्याची नासाडी टाळणे गरजेचे बनते. भारतीय कृषी संशोधन संस्था आणि फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या अंदाजानुसार मूषकवर्गीय प्राणी एकट्या भारतात दरवर्षी सुमारे २.५-३.५ कोटी टन धान्य फस्त करतात. याचे रुपांतर पैशांत केले तर हे नुकसान दरवर्षी अंदाजे ४५००० ते ६५००० कोटी रुपयांच्या घरात जाते. आपल्या देशातल्या काही राज्यांचे वार्षिक अर्थसंकल्पही इतक्या प्रचंड रकमेचे नाहीत. आणि, याच्या मुळाशी असणाऱ्या उंदीर या प्राण्याचे प्रभावी नियंत्रण करण्याचे काम फक्त सापच करू शकतात. आपल्याला परिचित असणाऱ्या ‘धामण’ जातीच्या सापाला तर इंग्रजीत थेट Rat snake असेच म्हणतात. सापांचे आपल्या लेखी इतके महत्त्व आहे.

माझ्या नोंदी-
गगनबावडा परिसरात मी जवळपास २७-२८ प्रकारच्या सापांच्या प्रजातींची नोंद केली आहे. त्यातील किमान ३ ते ४ प्रजातींच्या सापांची संख्या लक्षात येण्याइतपत कमी झाल्याचे मला प्रथमदर्शनी जाणवत आहे. (माझा हा अभ्यास पूर्णतः शास्त्रीय पद्धतीचा नसून तो‌ निव्वळ निरीक्षणात्मक आहे याची कृपया नोंद घ्यावी.) या प्रजाती म्हणजे, हिरवा हरणटोळ (Green Vine Snake), खापरखवल्या (Shieldtail), पश्चिम घाटांची शान असणारा मलबार चापडा (Malabar Pit Viper) आणि हिरवी घोणस (Bamboo Pit Viper) या होय! यातील मलबार चापडा व हिरवी घोणस हे साप मुख्यत्वे गगनबावडा जंगल पट्ट्यातील काही विशिष्ट भागात आणि शक्यतो पावसाळ्यात आढळतात, तर इतर दोन प्रजाती कमी-जास्त प्रमाणात विस्तृत भूभागावर दिसून येतात. जगभरातही सापांचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. आता यावर संशोधकांनी अभ्यास करायला सुरू केले आहे. त्यातून पुढे आलेल्या काही कारणांचा ऊहापोह आपण करूया.

मलबार पिट वायपर (विषारी)- पश्चिम घाटाची शान

हिरवा घोणस/ बांबू पिट वायपर (विषारी)

हिरवा हरणटोळ 

खापरखवल्या


सापांची संख्या मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती-
सापांची संख्या मोजण्याच्या शास्त्रीय पद्धती- या विषयात बरेच संशोधन झाले आहे, मात्र अजूनही ही प्रक्रिया कठीण असून या अभ्यासाला खूप मर्यादा असतात. पहिल्यांदा आपण त्या पद्धती व नंतर त्यातील अडचणी तपशीलात पाहूया.

(१) चिन्हांकित-पुनःपकड पद्धत (Mark-Recapture Method):

या पद्धतीमध्ये पहिल्यांदा साप पकडले जातात आणि त्यांना सुरक्षित चिन्ह (mark) दिले जाते; जसे की scale clipping, रंग, RFID tag वगैरे). आणि त्यांना परत अधिवासात सोडले जाते. काही दिवसांनी त्या अधिवासात पुन्हा साप पकडले जातात आणि पूर्वी चिन्हांकित केलेल्या सापांची संख्या मोजली जाते. त्यावरून खाली दिलेल्या सूत्रानुसार सापांच्या एकूण लोकसंख्येचा अंदाज घेतला जातो.

लिंकन-पीटरसन सूत्र (Lincoln-Petersen Estimate):

N= (M×C)÷R

(N = लोकसंख्येचा अंदाज
M = प्रथमच पकडलेले व चिन्हांकित साप
C = दुसऱ्यांदा पकडलेले साप
R = त्यातले चिन्हांकित साप)




(२) दृश्यमूल्यांकन सर्वेक्षण पद्धत (Visual Encounter Surveys (V.E.S.)):

या पद्धतीत संशोधक जंगलात पायी फिरतात आणि दिसलेल्या सापांच्या नोंदी ठेवतात. ठराविक वेळी किंवा ठराविक क्षेत्रात दिसलेले साप संख्येच्या तुलनेत मोजले जातात. माझ्यासारख्या अभ्यासकांसाठी ही पद्धत तुलनेने सोपी वाटते.




(३) सापळे आणि अडथळे पद्धत (Pitfall Traps with Drift Fences):

यामध्ये जमिनीवर सापळे (pit traps) व बाजूला लांब प्लास्टिकचे किंवा लोखंडी अडथळे (drift fences) लावले जातात. साप अडथळ्यांना लागून सापळ्यात पडतात. अशा रीतीने सापडलेल्या सापांची संख्या मोजली जाते.




(४) रेडिओ टेलिमेट्री पद्धत (Radio Telemetry):

यात सापांच्या शरीरावर रेडिओ ट्रान्समीटर्स बसवले जातात. आणि रिसीव्हरच्या साह्याने त्यांच्या हालचाली ट्रॅक करून त्यांचा मूळ अधिवास व संख्येची घनता यांचा अंदाज लावला जातो.





(५) पर्यावरणीय जनुकीय पद्धत (Environmental DNA (eDNA) Method):

पाण्यातील किंवा मातीतील DNA वापरून सापाच्या उपस्थितीचा शोध घेऊन विशिष्ट प्रजातीच्या अस्तित्व पुरावा शोधला जातो. अर्थात, यामध्येही सापांची अचूक संख्या मिळत नाही.




सापांची अचूक संख्या मोजण्यातील मुख्य अडचणी:

(१) सापांची छुपी जीवनशैली (cryptic behavior)-
साप झाडांखाली, झाडांच्या पोकळ खोडांमध्ये, खोल बिळांत किंवा दगडांखाली लपलेले असतात, त्यामुळे ते सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत.

(२) सापांचा रात्रीचा वावरण्याचा आणि हालचाली करण्याचा स्वभाव (nocturnal activity)- संरक्षणाच्या दृष्टीने किंवा शिकारीच्या वाढीव शक्यतांच्या दृष्टीने अनेक साप संधिकाळानंतर व रात्री सक्रिय असतात; त्यामुळे त्यांना पाहणे व त्यांचे सर्वेक्षण करणे जिकिरीचे बनते.

(३) दाट जंगले, डोंगराळ कडेकपारी आणि वाहत्या पाण्याच्या भागात सापांचा जास्त वावर असतो. पण, अशा भागात पायवाटा नसतात, त्यामुळे अशा अडचणींच्या भागात प्रत्यक्ष जाणे, उपकरणे पोहचवणे व सर्वेक्षण करणे कठीण असते.

(४) मानवी धोका व लोकांच्या मनात सापांबद्दल भीती असल्यामुळे स्थानिकांकडून सापांच्या अभ्यासात सहकार्य मिळणे दुरापास्त होते.

(५) साप हे मूलतःच कमी नजरेस पडणारे असल्यामुळे, शिवाय त्यांच्या वेगवान हालचालींमुळे ते दिसताक्षणीच त्यांच्या प्रजातीची अचूक ओळख करणे अवघड असते. शिवाय, बरेच साप वरवर पाहता एकसारखे दिसतात, त्यामुळे चुकीची नोंद होण्याची शक्यता वाढते.

(६) सापांच्या काही प्रजाती विषारी असून त्यांचा दंश झाल्यास माणसाचा मृत्यू ओढावण्याची भीती असते. त्यामुळे, त्यांना अभ्यासासाठी, सूक्ष्म निरीक्षणासाठी व प्रजाती वर्गीकरणासाठी पकडणे धोकादायक बनते.

(७) हंगामी हालचाली (seasonal variation)- साप उन्हाळ्यात व पावसाळ्यात त्यांच्या शारीरिक गरजांनुसार वेगवेगळ्या भागात जातात; त्यामुळे एकच साप जास्त वेळा मोजला जाण्याची शक्यता वाढते.


सापांची संख्या कमी होण्याची कारणे-

(१) पहिले कारण म्हणजे, सातत्याने होणारा सापांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास (Habitat Loss). बेसुमार जंगलतोड, शेतीसाठी जमीन साफ करणे, शेतीचे यांत्रिकीकरण, शहरे आणि रस्ते बांधणी, जंगलतोडीची भरपाई म्हणून एकाच प्रकारच्या वृक्षांची बनविली जाणारी कृत्रिम वने यांमुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. यामुळे सापांना राहण्यासाठी, शिकारीसाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी योग्य जागा मिळत नाहीत.

याशिवाय, हल्ली दिसणारा आणखीन एक प्रकार म्हणजे, जंगलतोड झाल्याची नुकसानभरपाई म्हणून करण्यात येणारी कृत्रिम जंगलांची निर्मिती किंवा वृक्षारोपण. यामध्ये शक्यतो जंगलातील वृक्षांची गुणात्मक लागवड करण्याऐवजी केवळ संख्यात्मक भरपाई केली जाणे. साप हे शीत रक्ताचे सजीव आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःच्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करता येत नाही. यामुळे थंड वातावरणात किंवा रात्रीच्या वेळी साप थांबण्यासाठी शक्यतो गरम जागांची निवड करतात. नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे असल्यामुळे काही ठिकाणी जमिनीवर थेट सूर्यप्रकाश पोहोचतो, तर काही ठिकाणी वृक्षाच्छादनामुळे जमीन थंड राहते. या दोन्हींचा सापाला फायदा होतो; मात्र एकाच प्रकारच्या झाडांची जंगले असतील तर याचा तोटा होऊन सापांच्या अधिवासांचा संकोच होतो. कमी जागेत जास्त सापांना रहावे लागल्यामुळे व त्यामुळे उद्भवलेल्या भक्ष्यांच्या दुर्भिक्षामुळे सापांची संख्या कमी कमी होत चालली आहे.

(२) दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, हवामान बदल (Climate Change)- अनियमित पाऊस, तापमान वाढ, दुष्काळ किंवा अतिवृष्टी यांमुळे सापांच्या नैसर्गिक जीवनचक्रात अडथळे येतात. सापांची प्रजोत्पत्ती, अन्न साखळी आणि अधिवास यांवर या सर्वांचा विपरीत परिणाम होतो. मान्सूनच्या पावसाची अनियमितता, पाऊस पडायला होणारा विलंब किंवा अचानक पडणारा तीव्र पाऊस यांमुळे पावसाच्या पाण्यावर जीवनचक्र अवलंबून असणाऱ्या ‘मलबार पिट वायपर’ या सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटत चालल्याचे लक्षात येत आहे. पावसाच्याच प्रदेशात वास्तव्य असणाऱ्या ‘बांबू पिट वायपर’ किंवा हिरवी घोणस या सापांची संख्याही घटताना दिसत आहे. जितक्या प्रमाणात पावसाळी प्रदेशात हे साप आधी दिसून येत, त्यात लक्षणीय घट होत असल्याचे माझे निरीक्षण आहे.

(३) पुढचे आणि तिसरे कारण म्हणजे, रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणावर सापांचे मृत्यू होणे हे होय! नोव्हेंबर २०२४ मध्ये धनंजय कुमार आणि दत्ताप्पा गायकवाड यांनी प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात मध्य पश्चिम घाट परिसरातील सापांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे अधोरेखित केले आहे. वर उल्लेख केलेल्या तीन सापांपैकी हरणटोळ आणि खापरखवल्या या दोन्ही प्रजातींतील साप रस्त्यावर मंद हालचाली करतात व वाहनांचा धोका दिसताच पटकन पळून जाण्याऐवजी तिथल्या तिथेच थिजून जातात (freeze rather than flee), ज्यामुळे गाड्यांच्या चाकांखाली येऊन ते मरतात. साप शक्यतो तापमान नियंत्रणासाठी किंवा भक्ष्याचा पाठलाग करत असताना रस्ते ओलांडतात. शिवाय, बरेच लांबीला जास्त वाढणाऱ्या सापांची लैंगिक परिपक्वता तुलनेने उशिरा येते. त्यामुळे, यातील मध्यम वयाचे साप, जे अजून लैंगिक अपरिपक्व आहेत, ते रस्त्यांवर मरतात, जेणेकरून प्रजननजन्य सापांची संख्या कमी होऊन आपसूकच त्या प्रजातीतील सापांची संख्या रोडावते.

(४) लक्षात घेण्याजोगे चौथे कारण म्हणजे, हल्ली शेतीमध्ये वाढलेला रासायनिक खते व कीटकनाशकांचा बेसुमार वापर. कीटकनाशकांचा अंश असणारी धान्ये उंदीर खातात आणि त्या उंदरांना सापांनी खाल्ल्यामुळे साप मरतात. शिवाय, काही कीटकनाशकांमुळे सापांच्या जनुकीय रचनेत काही बदल होतात का याचाही अभ्यास करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

(५) पाचवे कारण उन्हाळ्याच्या दिवसांत जंगलात पेटणारे वणवे हे आहे. हे वणवे मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असू शकतात. पण, आपल्याकडे लागणारे वणवे हे बऱ्याचदा मानवनिर्मित असल्याचे माझे निरीक्षण आहे. जंगलात मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या वणव्यांच्या वेळी आगीपासून वेगाने दूर पळता न आल्यामुळे सर्वच सरीसृपांचा (आणि पक्ष्यांच्या पिलांचा) जळून मृत्यू होतो.

(६) याशिवाय, आणखीन एक सर्वसामान्य कारण म्हणजे, मानवी भीतीमुळे सापांना मारले जाणे हे होय. बिनविषारी सापांना विषारी समजून मारले जाणे, साप डूख धरतो असे समजून समोर दिसणाऱ्या सापाला मारणे असे प्रकार तर रोजचेच आहेत.

(७) तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर सापांची त्वचा (शोभेच्या वस्तू किंवा बॅगा बनविण्यासाठी) आणि काही पारंपारिक औषधांत होणारा सापांचा (विष व हाडे) वापर यासाठी होणारी तस्करी हेही चिंतेचे कारण आहे. शिवाय, काही सर्पमित्र विषारी सापांना मौल्यवान विषासाठी पकडून त्यांची तस्करी करतात अशा बातम्याही अधूनमधून वाचायला मिळतात.


दक्षिण पश्चिम घाटातील विशेष उल्लेखनीय अशा पवित्र देवरायांचे महत्त्व-

पश्चिम भारतातील हरवत चाललेल्या देवरायांत सांस्कृतिक श्रद्धांमुळे सर्पांचे संरक्षण होत असे. पश्चिम घाटातील पवित्र देवरायांमध्ये पूर्वी सर्प व इतर प्राण्यांचे संरक्षण सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांमुळे होत होते. मात्र, आज या श्रद्धा कमी होत असून बांधकाम, व्यापारीकरण आणि आर्थिक दबावामुळे देवरायांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

भारतामध्ये हजारो वर्षांपासून स्थानिक समुदायांनी देवरायांची जपणूक केली आहे. पश्चिम घाटातील या देवराया दाट सदाहरित जंगलांचे तुकडे असून, अनेक दुर्मिळ व स्थानिक जीवजंतू आणि वनस्पती यांचे अधिवास आहेत.

केरळमध्ये विशेषतः सर्पदेवतेचे (नागांचे) पूजन असलेल्या ‘सर्पकावू’ या देवरायांचा उल्लेख आहे. येथे विशिष्ट धार्मिक विधी पार पाडले जातात आणि सर्पदेवतांचे पूजन होते.

पश्चिम घाटातील ही देवरायांची समृद्ध परंपरा आणि जैविक संपत्ती पुढील पिढ्यांसाठी जपण्यासाठी तत्काळ आणि प्रभावी पावले उचलणे अत्यावश्यक आहे.

मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात, संशोधकांनी केरळमधील कन्नूर व कासरगोड आणि कर्नाटकमधील कोडगु जिल्ह्यांतील ३० देवरायांना भेट देणाऱ्यांचे सर्वेक्षण केले. त्यांना आढळले की, लोकांनी देवरायांच्या आत सापांना हानी पोहोचवण्याची शक्यता बरीच कमी होती. तसेच, बाहेरही सापांना इजा न करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांची सर्पदेवतेवर श्रद्धा होती.

‘सर्पकावू’मध्ये लोक सहसा सापांशी सुसंवादाने वागतात. केरळमधील सर्पकावूंना लहानपणापासून भेट देणारे दिलीपकुमार सांगतात की, साप दिसले तरी कोणी त्यांना इजा करत नाही, ते देवरायांत मोकळेपणे वावरू देतात.


उपाय काय?-
समस्यांची इतकी चर्चा झाल्यावर आता यावर काय उपाय आहेत याचा थोडक्यात ऊहापोह करूया. उपरोल्लेखित कारणांच्या उपायांची विभागणी आपण ढोबळमानाने दोन प्रकारांत करू शकतो. एक म्हणजे, विस्तृत शासकीय व पर्यावरणीय स्तरावर करावयाचे उपाय आणि दुसरे म्हणजे, वैयक्तिक व सामाजिक स्तरावर करावयाचे उपाय.

(१) शासकीय व पर्यावरणीय स्तरावर करावयाचे उपाय हे मुख्यत्वे सापांचा अधिवास शाबूत राखणे व अधिवासांचे संरक्षण-संवर्धन करणे या प्रकारचे आहे. यासाठी पर्यावरणप्रेमींचे अभ्यास व दबावगट निर्माण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय व्याघ्र कार्यक्रमांप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर ‘पर्यावरण व वने’विभागाच्या नेतृत्वाखाली  ‘राष्ट्रीय सर्प संरक्षण व संवर्धन धोरण’ बनविणे गरजेचे झाले आहे. पश्चिम व पूर्व घाटात मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या खनिकर्मामुळे तिथे होणारी अमर्याद जंगलतोड नियंत्रित करणे गरजेचे आहे. बरीच जंगलक्षेत्रे, गवताळ कुरणे, पाणथळ जागा हे अधिवास संरक्षित क्षेत्रे म्हणून घोषित करणे तातडीचे बनले आहे. सर्पोद्यानांपेक्षा साप, त्यांचे भक्ष्य आणि अधिवास यांच्या संरक्षणासाठी विशेष सर्प-अभयारण्ये स्थापन करणे शक्य आहे का याची चाचपणी करून अशा प्रकल्पांची आर्थिक व पर्यावरणीय व्यावहार्यता पडताळून पाहिली पाहिजे. ‘जागतिक तापमानवाढ’ (global warming) व ‘कर्बोत्सर्जना’चे (carbon emission) वाढलेले प्रमाण ही आता कोणत्याही एका देशाची समस्या राहिली नसल्यामुळे त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होणे गरजेचे आहे. वृक्षाच्छादनाचे प्रमाण वाढविणे, प्रदूषणावर नियंत्रण आणणे या गोष्टी देशपातळीवर प्रभावीपणे राबविणे शक्य आहे.

(२) रस्ते व अन्य सार्वजनिक प्रकल्पांसाठी कराव्या लागणाऱ्या अमर्याद जंगलतोडीची भरपाई म्हणून केली जाणारी एकाच प्रकारच्या वनस्पतींच्या जंगलांची निर्मिती हीही अधिवासाच्या दृष्टीने सापांना घातक ठरत आहे. स्थानिक जंगलांच्या संरचनेनुसार विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करून हे नुकसान टाळता येईल. शिवाय, सापांच्या विस्कळीत अधिवासांना जोडण्यासाठी ‘अधिवास मार्गिका’ निर्माण करता येणे शक्य आहे.

(३) मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून मानव–साप संघर्ष कमी करणे, प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घेऊन २४×७ कार्यरत असणारी सुसंघटित साप-बचाव (snake rescue) व पुनर्वसन केंद्रांची जिल्हानिहाय स्थापना करणे, सर्पदूतांना संरक्षणासाठी व साप हाताळण्यासाठी सामग्री पुरविणे अशा गोष्टी करणे शक्य आहे.

(४) सर्पदंशावर योग्यवेळी उपचार झाल्यास बऱ्याच प्रमाणात मानवी मृत्यू टाळता येतात हेही जनमनावर बिंबविणे गरजेचे आहे.‌ सर्पविष प्रतिजैवकांची मुबलक निर्मिती व साठा करणे, सर्पदंशावर उपचारासाठी उपलब्ध मनुष्यबळातून डॉक्टर व‌ स्टाफला प्रशिक्षित करणे, सर्पदंशावरील उपचारांसाठी विशेष रुग्णालयांची स्थापना करणे या गोष्टींनीही सापांना विनाकारण मारले जाण्याचे प्रमाण कमी होणे शक्य आहे.

(५) रस्त्यांवर होणारे सापांचे मृत्यू ही चिंतेची बाब असून त्यासाठी साप-समृद्ध अधिवासातून जाणाऱ्या रस्त्यांवर अंडरपास किंवा लहान बोगदे उभारणे, खबरदारीचे व वेगमर्यादेचे फलक लावणे, पावसाळ्यात व विशेषतः रात्रीच्या वेळी वाहने सावकाश चालविण्याचे निर्देश देणे आणि गरज पडल्यास अधिवासीय क्षेत्रांत गतिरोधक बसविणे या गोष्टींनी सापांचे होणारे मृत्यू कमी करता येतील.

(६) राष्ट्रीय कृषी धोरणात सेंद्रिय शेती व जैविक कीड नियंत्रणास प्रोत्साहन देऊन रासायनिक खते व कीटकनाशकांचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचा मार्ग अवलंबता येईल. याच धोरणाचा एक भाग म्हणून सापांच्या अधिवास व जंगलालगत रसायनमुक्त बफर पट्टे विकसित करता येतील का यावर विचारविनिमय केला जावा.

(७) राष्ट्रीय सर्पसंख्या निर्देशांक निर्माण करून सापांच्या संख्येचा प्रजातीवार ट्रेंड ट्रॅक करणे, कोणत्या भागात कोणत्या प्रजातीच्या सापांची संख्या किती आहे, धोकादायक प्रमाणात लोकसंख्या कमी झालेल्या प्रजाती कोणत्या आहेत याची नोंद घेण्यासाठी हौशी सर्प-अभ्यासकांमार्फत कमीत कमी खर्चात असे प्रकल्प राबविता येणे शक्य आहे. शिवाय, यासाठी विद्यापीठीय स्तरावर प्राणिशास्त्र विभागांचे संशोधनात्मक सहाय्य घेता येईल.

(८) अगुंबेसारख्या (किंग कोब्रा अधिवास) भागांच्या धर्तीवर साप निरीक्षण-आधारित निसर्गपर्यटन विकसित करून त्यात स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीच्या संधींचा शोध घेतला तर हेच लोक सर्पदूत म्हणूनही काम करू शकतील. असे सर्पदूत गावोगावी तयार करून मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय पद्धतीने जनजागृती करता येईल.

(९) दक्षिण पश्चिम घाटांमधील सर्पसंरक्षक पवित्र देवरायांच्या संरक्षणाच्या संदर्भाने काही तज्ज्ञांचा असा प्रस्ताव आहे की, कर्नाटक व केरळ वनविभागाने पश्चिम घाटांतील सर्व देवऱ्यांना जैवविविधता अधिनियम २००२ मधील कलम ३७(१) अंतर्गत वारसा दर्जा द्यावा. अशा प्रकारे या नाजूक परिसंस्थेच्या जपणुकीस गती मिळेल, असे त्यांचे मत आहे.

(१०) पश्चिम घाटातील पवित्र देवरायांमध्ये सर्प व इतर जीवांचे रक्षण पूर्वी अंधश्रद्धा व सांस्कृतिक श्रद्धांमुळे होत होते, पण आता या श्रद्धा कमी होत असून बांधकाम व व्यापारीकरणाचा दबाव वाढत आहे.

युवकांना देवरायांचे पर्यावरणीय महत्त्व व जैवविविधतेचे शिक्षण देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांच्यात देवरायांप्रती जाणीव निर्माण होईल आणि ते भविष्यात संरक्षकांची भूमिका पार पाडू शकतील.

तज्ज्ञांचे मत आहे की, पश्चिम घाटातील पवित्र देवरायांना राज्य सरकारकडून अधिक संरक्षण मिळाले पाहिजे, कारण या देवराया धार्मिक, सांस्कृतिक तसेच पर्यावरणीय व जलसंधारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

अग्रगण्य ‘दै. सामना’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला माझा लेख



संक्षिप्तात-
सर्वच वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत असून ही पृथ्वी फक्त माणसाच्या मालकीची नसून तिच्यावर सर्व सजीवांचा समान‌ हक्क आहे याची जाणीव आपल्याला वारंवार झाली पाहिजे. पर्यावरणाच्या सशक्तीकरणासाठी जैविक अन्नसाखळ्या टिकणे गरजेचे आहे. शिवाय, निसर्गाच्या संरक्षणाशिवाय मानव-वन्यजीव संघर्ष टाळणे यापुढे शक्य होणार नाही हेही आपण लक्षात घ्यायला हवे.


संदर्भ/ References-
(1) Cultural beliefs protect snakes in the dwindling sacred groves of southwestern India by Neha Jain, 26 Oct. 2020.

https://india.mongabay.com/2020/10/cultural-beliefs-protect-snakes-in-the-dwindling-sacred-groves-of-southwestern-india/

(2) The Road “More” Travelled: Assessing Snake Road Kills Across Three Habitat Types in the Central Western Ghats, India by Dhananjay Kumar, Dattappa Gayakawad, Deyatima Ghosh

(3) Declining snake population-why and how: A case study in the Mangrove Swamps of Sundarban, India by Chandan Surabhi Das
[April 2012, European Journal of Wildlife Research 59(2)]


छायाचित्रे/ क्रेडिट्स-
(१) माझे स्वतःचे कॉपीराईटेड फोटो
(२) बांबू पिट वायपर छायाचित्र- विजय पाटील (आमच्या गगनबावडा नाईट जंगल ट्रेकच्या वेळी घेतलेले फोटो)
(३) अन्य छायाचित्रे- गुगलवरून साभार. (क्रेडिट मूळ छायाचित्रकाराचे)
(४) ‘दै. सामना’मधील माझ्या लेखाची डिजिटल प्रत



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस., एम.डी.,
वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’,
ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा व
सर्प अभ्यासक व निरीक्षक)




Comments

  1. अभ्यासपूर्ण मांडणी आणि माहिती पूर्ण लेख लिहिल्याबद्दल हार्दिक आभार.आणि शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूप सखोल व वातावरणात निसर्गामध्ये जाऊन सापांवर केलेला खोलवर अभ्यास वाखाण्याजोगा आहे डॉक्टर तुमच्या या हटके कार्याला मानाचा मुजरा....

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर आणि विचार पूर्वक मुदे आणि त्या बदलाची माहिती विस्तृत रित्या मांडणी.. क्वचितच असे ब्लॉग्स वाचायला भेटतात.... असे अजून विस्तृत माहितीचे लेख वाचायला आवडतील सर..

    ReplyDelete
  4. एक नंबर माहिती, अतिशय खोल वर अभ्यास, ते ही एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून, OPD सांभाळून. Hats off.. 🫡

    ReplyDelete
  5. सापांबद्दल खूप छान माहिती मिळाली आहे तुमच्यामुळे सर

    ReplyDelete
  6. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाही वेळात वेळ काढून निसर्ग, व निसर्ग सहवासात राहून अतिशय अवघड, किचकट, धोकादायक विषयावर अभ्यास करून आपण सापाबद्दल अतिशय उपयुक्त माहिती, उत्कृष्ट भाषा शैली, लेखन द्वारे, दृशमान पद्धतीने सादर केली आहे. खरंच अतिशय उत्तम लेख व तुमच्या कडे असलेल्या उत्तम अभ्यासू वृत्तीला खरंच दाद द्यावी लागेल.

    ReplyDelete
  7. गंभीर विषय अभ्यास पूर्वक हाताळला आहे.सर्पमित्र....

    ReplyDelete
  8. सापांच्या मृत्यूची कारणे माझ्यासाठी धक्कादायक होती, ज्ञानात भर पाडल्याबद्दल आभार

    ReplyDelete
  9. खूप छान माहिती सापा विषयी, सुंदर लेख, वाचनीय, 🙏

    ReplyDelete
  10. सर तुमचे लेख खुप छान असतात. तसाच हा लेख वाचल्यावर मला कळले की सापांची लाईफ सायकल कशी असते, त्यांना वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजे व पर्यावरणाचा दृष्टिकोनातून पृथ्वीवर सापांचे असणे किती महत्त्वाचे आहे व ते छोटे जिवांना जसे की उंदीर, चिचुंद्री, बेडूक व कीटक यांची संख्या नियंत्रणात कसे ठेवतात हे कळाले.

    ReplyDelete
  11. सखोल आणि अभ्यासपूर्ण लेख.. माणूस स्वार्थापायी पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे पर्यायाने अन्नसाखळीत व्यत्यय आणत आहे.. सापांसारख्या निसर्गातल्या महत्वपूर्ण घटकांविषयी सुंदर उहापोह !

    ReplyDelete
  12. प्रिय मित्र / सर्पमित्र डॉ अमित

    एखाद्या विषयाचा अभ्यास करताना तो परिपूर्ण सखोल आणि अचूक असावयाला हवा हा स्वभाव विशेष असल्यामुळे या विषयाकडे वळल्यानंतर आपण याचं सखोल अभ्यास केला असणार यात काही नवल नाही. चपळ हालचाली आणि विषारी असल्यामुळे पूर्वापार माणसात असलेली त्याची भीती, अंधश्रद्धा आणि समजूती यामुळे प्राणीमित्रांमध्ये सर्पमित्रांची संख्या मात्र कमीच आहे. मात्र या विषयाचा काही संबंध नसताना, आणि आपल्या व्यावसायिक व्यस्ततेतून केवळ निसर्गप्रेमापोटी सुरू झालेली ही चळवळ सापांच्या वळवळीपर्यंत पोचली हे खरेच कौतुकास्पद आहे. त्यातही फक्त साप पाहणे किंवा पकडणे इथपर्यंतच न थांबता त्याचा सखोल अभ्यास करून निसर्ग संवर्धन व सापांची प्रजाती वाचवण्यापर्यंत आपण कार्य करत आहात हे खरंच अभिनंदनीय आहे. आपल्यामुळे आपल्या मित्र परिवारात आणि जवळच्या लोकात सापांविषयी आकर्षण, कुतूहल आणि अभ्यासपूर्ण विवेचन करण्याची सवय जडली . त्यामुळे एका दिव्याने दिवा पेटत जाऊन असंख्य दिव्यांची जशी आरास निर्माण होते, तशी वरील उल्लेखित व्यक्तींमुळे सापांची होणारी हानी टाळण्यास नक्की मदत होईल आणि आपल्या अभ्यासाचा आणि या लेखाचा हेतू नक्की साध्य होण्यास आपला खारीचा वाटा तुम्ही उचलू शकाल. सर्पदर्शना वेळी आपण केलेले लाईव्ह व्हिडिओ आपल्या सखोल अभ्यासाची प्रचिती आणि आम्हा वाचकांसाठी एक पर्वणीच असते. आपल्या अभ्यासासाठी आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा.
    सापांच्या अभ्यासासाठी आणि संवर्धनासाठी सर्प मित्रांची भूमिका खूप महत्त्वाचे आहे. शासकीय स्तरावर सर्पमित्रांची एखादी संघटना, ज्यामध्ये परंपरेने आलेले सर्पमित्र ( उदाहरणार्थ देवराया आणि बत्तीस शिराळ्या सारखे गावातील व्यक्ती ) आणि इतर अभ्यास करणारे व निसर्गप्रेमी सर्पमित्र या सर्वांनी एकत्र आल्यास आपले इपसिताकडे आपण वाटचाल करू शकू. यामध्ये सर्पमित्रांना आवश्यक साधने, सुयोग्य अभ्यासाचे नियोजन, वैद्यकीय आणि इतर सुरक्षितता आणि विमा संरक्षण मिळावे याकडे कटाक्षाने लक्ष ठेवले पाहिजे. तसेच ज्या वेळेस सर्प मिळाल्यास त्याची नोंद व गुगल लोकेशन असलेले फोटोग्राफ एखाद्या वेबसाईटवर किंवा ॲपवर टाकूनच नैसर्गिक अधिवासात सोडण्यास चालू केल्यास त्यांचा अधिवास संख्या कळण्यास मोलाची माहिती मिळेल असे वाटते. कदाचित याबाबत सध्या काही कार्य चालू असेल.
    असेच कार्य करत राहावा व आम्हाला अधिकाधिक सापांची माहिती मिळत राहो.

    धन्यवाद
    डॉ रविंद्र सदानंद काळे
    स्त्रीरोगतज्ञ तासगाव

    ReplyDelete
  13. प्रिय डॉ. अमितजी,

    सापांच्या घटत्या संखेबद्धलचा आपला अत्यंत अभासपूर्ण समग्र लेख वाचला. आपले सर्पप्रेम नक्कीच कौतुकास्पद आहे. समाजात सर्पमित्र खूप आहेत पण...इतक्या डोळसपणे सर्पांबद्धल जाणीवपूर्वक सर्वार्थाने अभ्यास करणारे किती..? हा मात्र संशोधनाचा विषय होईल.
    व्यक्तिगत मला सापाची खूपच भीती वाटते. साप किती उपयुक्त आहे हे खऱ्या अर्थाने आपला सविस्तर लेख वाचल्यावर समजले हे प्रांजळपणे कबूल करतो. हे कळल्यानेच आपोआपच त्यांच्याबद्दल सहानुभूती व नकळत प्रेम निर्माण झाले. तुमचा सहवास लाभला तर थोडीफार असणारी भीती सुद्धा निघून जाईल याची खात्री वाटते. असो.

    सूपरस्टार अमिताभजींच्या भेटीचा सविस्तर दीर्घ लेख तितक्याच तन्मयतेने वाचला. सारे वाचताना एका वेगळ्या भावविश्वात काही वेळ रमून/रंगून गेलो. किती सुंदर वर्णन ! आम्हीही आपल्या सोबत असल्याच्या जाणिवेतून गेल्याचा अनुभव आला, इतकं आपल्या लेखात सामर्थ्य कि विलक्षण गुंफण म्हणू हे मलाच समजेनासे झाले आहे.
    एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास, चिंतन व झोकून देऊन प्रामाणिक हेतूने कार्यरत रहाण्याच्या आपल्या विशेष व दुर्मिळ गुणांचे या निमित्ताने दर्शन झाले. तुमच्या सवडीने भेटू प्रत्यक्षात...खूप बोलू. बघू केव्हा वेळ देता ते..? आम्ही प्रतीक्षेत असू. आपल्या माणसाने सुंदर म्हणजे एखाद्या प्रतिभावंताला लाजवेल असे सालंकृत लिहिलेले वाचून अवघ्या आनंदाने भारावून गेलो.

    आपल्या अंगीकृत कार्यास अनकोत्तम हृदयस्थ शुभेच्छा. 💐

    ReplyDelete
  14. अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न लेखन.
    “आवड असली की सवड मिळते”, आणि “आवडीच्या गोष्टी केल्यावर आनंद मिळतो”.
    अमित तुला खूप वर्षापासून पाहतो.
    तू आधीपासूनच विलक्षण आहेस. काहीतरी वेगळे विचार करणारा आणि कृतीत उतरवणारा आहेस.
    सापांबद्दल माणसाला फक्त भीतीच असते. त्यामुळे “दिसला साप की मार त्याला”, यापेक्षा वेगळी प्रतिक्रिया फार विरळच. सर्पमित्र केवळ छंद आणि वेगळी प्रसिद्धी म्हणूनच काम करतात. तो एक व्यवसाय व्ह्यायला हवा. यात वेटरनरी डॉक्टर आणि त्यांचे सहायक यांचा सहभाग हवा. सर्पदंशासाठी माणसाला उपचार करणारा तुझ्यासारखा डॉक्टर, त्या निसर्गातील सर्परूपी निष्पाप जिवालाही न्याय देऊ पाहतोय , हे वर उल्लेख केल्याप्रमाणे विलक्षण आणि स्पृहणीय कार्य आहे.
    तुझ्याबरोबर गगनबावड्याला एक शनिवारची संध्याकाळ आणि रात्र भटकंतीत घालवायची आहे.
    तुझ्या कार्यास अनेक शुभेच्छा.
    डॉ. शिवप्रसाद हिरुगडे.

    ReplyDelete
  15. सापांविषयी अतिशय महत्वपूर्ण व मुद्देसुद माहिती, तसेच साप कमी होण्याची कारणे, त्याविषयीच्या उपाययोजना याबद्दल अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. आपल्या इतर लेखांप्रमाणेच अप्रतिम लेख.

    ReplyDelete

Post a Comment