आण्णा हजारेंनी या गोष्टींचा कधी विचार केला आहे का?

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच [उदा.अमेरिका,रशिया,चीन इ.] भ्रष्टाचार वाढला आहे आणि त्या त्या देशांची सरकारे मात्र काहीच न करता स्वस्थ बसून आहेत अशी भावना सामान्य लोकांच्यात निर्माण झाली आहे.आणि आता आपणच याबाबतीत आवाज उठवला पाहिजे असे त्यांना वाटू लागले आहे,असे नव्हे तर ते  प्रत्यक्ष कृती करत आहेत.
पण कोणतीही मोठी गोष्ट करताना त्यानी काही गोष्टींचे विवेचन त्यानी केले पाहिजे-
१.सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे,खरेच कुणाविरुद्ध आपण काही करताना आपण त्यात आहोत का? दुसऱ्यावर आपण जे आरोप करणार आहोत त्या गोष्टी आपण आपला आयुष्यात कितपत टाळल्या आहेत? म्हणजे तुमच्या बसच्या वाहकाने तुमचे तिकिटाचे उरलेले २/४/१००/१५० रुपये प्रामाणिकपणे परत न करणे हा भ्रष्टाचार नाही का? की हजारात तो व्यवहार आणि लाखो-करोडोत तो भ्रष्टाचार असे तुम्हाला वाटते?

२.तुम्ही ज्या गोष्टीबद्दल / गोष्टीविरुद्ध आंदोलन करताय त्याची व्याख्या तरी तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे आपण त्या गोष्टीला भ्रष्टाचार म्हणतो,पैशाचार नाही.
आणि शुद्ध मराठीत भ्रष्टाचार म्हणजे दिलेल्या मार्गापासून ढळणारे तुमचे सर्व वर्तन. मग दिलेल्या वेळेत तुम्हाला जर ५० फाईल्स निपटायला सांगितल्या असतील आणि तुम्ही जर २० च निपटत असाल किंवा सरकारी दवाखान्यात ठरवून दिलेल्या संख्येएवढे रुग्ण तपासात नसाल [काही अपवाद सोडून] तर तो भ्रष्टाचारच होतो. हे तुम्ही कधी तुमच्या कार्यकर्त्यांना [अति-उत्साही] सांगितले आहे का?

३.ज्या गोष्टीच्या  विरुद्ध आपण आरोप करतोय ते त्या मुद्द्यापुरते मर्यादित ठेवतोय का ? त्यात आपला पूर्वग्रह किती आणि सत्य किती याचे भान आपण ठेवतो का?

४.आपण करत असलेले आरोप खरेच सत्याच्या कसोटीवर खरे उतरतात का ? की घटनेने आपल्याला भाषण-स्वातंत्र्य दिले आहे,या नावाखाली आपण भाषण-स्वैराचार करतोय?

५.आपला आपल्या देशातील कोणत्या तरी [किमान एका तरी] संस्थेवर पूर्ण विश्वास आहे का ? असेल तर त्याबद्दलच्या बोलण्याच्या मर्यादा आपण कधी आणि किती पाळल्या आहेत आणि पळणार आहोत?
         आणि जर तुमचा कुणावरच विश्वास नसेल तर आम्ही तुमच्यावर का विश्वास ठेवावा? 

६.तुम्ही तुमचा प्रामाणिकपणा  कोठे आणि कधी सिद्ध केला आहे? की तुम्हाला देवाने विशेष गुण आपोआप बहाल केले आहेत? ज्या देशात खुद्द सीतेला आपल्या  सत्यवचनी आणि न्यायप्रिय अशा पतीला,म्हणजेच रामाला आपला खरेपणा सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली त्याच देशात [म्हणजे जिथे तुम्हाला 'राम'-राज्य आणायचे आहे] तेथे तुम्ही तुमचा खरेपणा कसा सिद्ध करणार आहात/केला आहे?

७.सामान्य लोकांना तुम्ही मूर्ख समजता का? लक्षात ठेवा की वादळ आणि जनता ह्या अश्या दोन गोष्टी आहेत ज्या कोणालाही आणि कधीही कोठेही भिरकावून देऊ शकतात.
तुम्ही काही वेळ सर्व लोकांना मूर्ख बनवू शकता,तुम्ही सर्व वेळ  काही लोकांना मूर्ख बनवू शकता;पण तुम्ही सर्व लोकांना सर्व वेळ कधीच मूर्ख बनवू शकत नाही.

८.अशा प्रकारची आंदोलने करताना तुम्ही स्वतः कायदेशीर मार्ग निवडता का आणि या देशाच्या कायद्याचा सन्मान करता का? तुम्हाला कोणत्याच कायद्याच्या चौकटीत बसवायचे नाही ही तुमची मागणी अवास्तव नाही का? आणि जर तुम्ही मंत्री आणि आमदार,खासदार यांना मिळणाऱ्या विशेष वागणुकीचा विरोध करता तर मग तोच न्यायाने तुम्हाला का वागवायचे नाही?

९.आपण प्रेसच्या झगमगाटाला बळी पडून विषयाशी असंबद्ध आणि अवास्तव प्रतिकिया देतोय हे योग्य आहे का?

१०.आपण व्यक्ती-सापेक्ष बोलता हे योग्य आहे का? कारण ज्या व्यक्तींविरोधात तुम्ही बोलता त्या काही कालच्या आज मोठ्या झाल्या नाहीत आणि त्या मोठ्या होण्यात तर तुमचा काडीचाही रोल नव्हता. त्यांना निवडून देणाऱ्या जनतेला आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचे तर लोकसेवा आयोगाला तुम्ही मूर्ख समजता का?

११ .सर्वात महत्वाची गोष्ट- आपण इतरांना आत्म-परीक्षण करण्याचा सल्ला देतो,पण आपण स्वतः ही गोष्ट करता का? आणि करत असाल तर ती आत्म-स्तुती करता की आत्मा-परीक्षण हे समजावून सांगणारी आपली वक्तव्ये असतात का?

Comments