"उत्तिष्ठतं जाग्रत प्राप्य वरान्निबोधत" (विवेकानंद)

  ("उठा,जागे व्हा,व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका")


                                     बऱ्याच वर्षांपूर्वी स्वामींनी दिलेला हा मंत्र आत्मसात करण्याची हीच वेळ जास्त योग्य आहे,असे आता वाटू लागले आहे.फक्त आपला भारत देशच नव्हे तर संपूर्ण जगच ज्या परिवर्तनाच्या अवस्थेतून सध्या जात  आहे,ते पाहता किमान भारतीयांना तरी असे वाटणे अत्यंत स्वाभाविकच आहे.पण सध्याची भारतीयांची मनोवृत्ती पाहता असे 'वाटायला लागणे' हीच मुळी एक आश्चर्याची गोष्ट वाटू लागली आहे,कारण विवेकानंदांनी तत्कालीन  भारतीयांना दिलेला पुढील सल्ला आजही तंतोतंत लागू पडतो.ते तेव्हा म्हणाले होते की-"प्रत्येक गोष्टीचा उपहास करणे व कशाविषयीच गांभीर्य न वाटणे हा जो भयंकर रोग आपल्या राष्ट्राच्या रक्तात भिनू पाहत आहे,तो दूर करा,संपूर्णपणे नाहीसा करा.बलवान व्हा व आत्मबलाची श्रद्धा बाळगा आणि मग सर्वकाही आपोआप घडून येईल." दुर्दैवाने आपल्या देशाला आणि त्याच्या नागरिकांना या रोगाची लागण झाली आहे,नव्हे तो रोग आता आपल्या नसानसांत पूर्णतः भिनला आहे आणि आपण श्रद्धाहीन व तत्त्वहीन झालो आहोत.आपल्याला कशाचेच काहीही वाटेनासे झाले आहे.

                          भारताने जगाचे  नेतृत्व  करावे  असे  केवळ भारतीयांनाच नव्हे तर साऱ्या जगाला वाटू लागले आहे.पण,जगाला सुधारण्या-आधी आपण स्वतःच्या काही समस्या सोडविल्या पाहिजेत.त्यातल्याच काही समस्या मी इथे मांडत आहे-

                                     [१] भ्रष्टाचार-हा आता केवळ मूळ अवयवाचा कर्करोग न राहता तो सर्वदूर पसरला आहे.(याला वैद्यकीय भाषेत 'metastasis'  म्हणतात.) सरकारी,खासगी,सामाजिक,सांस्कृतिक,वैचारिक इ.सर्व प्रांत याने पादाक्रांत केले आहेत आणि अजूनही भस्मासुरासारखा तो आ वासून सगळेच गिळंकृत करायच्या अवस्थेत उभा आहे.अर्थात आपणच याला खत -पाणी घालून मोठा केला आहे.
                                     दिलेल्या/अपेक्षित मार्गापासून ढळणारे सर्व वर्तन ही याची खरी व्याख्या आहे,म्हणूनच त्याला भ्रष्टाचार म्हणतात 'पैशाचार' नाही,हे आपण कधी लक्षात घेणार?साहेबाने कामासाठी मागितलेले लाख रुपये हा जसा भ्रष्टाचार होतो,तसाच शिपायाने साहेबापर्यंत सोडायला घेतलेले रु.१०० हासुद्धा भ्रष्टाचारच होतो;पण दुर्दैवाने आपण पहिल्या प्रकाराला जेवढ्या गांभीर्याने घेतो,तितक्याच सहजतेने दुसरा प्रकार 'चहापाण्याचे' पैसे दिले एवढ्या सोप्या पद्धतीने घेतो.ज्याप्रमाणे कंडक्टर तिकिटाचे राहिलेले पैसे स्वतःहून परत करत नाही (काही सन्माननीय अपवाद वगळून) त्याचप्रमाणे आपणही 'जावू दे,चालायचेच' असे म्हणून त्याला जाब विचारत नाही,हाही वैचारिक भ्रष्टाचार का मनाला जावू नये? बाजारातून १,२,५ इतकेच काय २५ पैशांची नाणी हद्दपार होवून सुद्धा चप्पल आणि बुटांच्या किंमती रु.३९९.९९,रु.९९९.९९,रु.३४९९.९५ अशा अपूर्णांकात  केवळ कर-चोरीसाठी  छापतात हे आपल्या का लक्षात येत नाही? अगदी तसेच पेट्रोलचा दर अपूर्णांकात का असतो हे जाब आपण कधी विचारणार?
                                कामासाठी  पैसे  घेणे  हा  जसा  भ्रष्टाचार  तशाच पद्धतीने नेमून दिलेले काम न करणे हादेखील भ्रष्टाचारच! म्हणजे एखाद्याला दिवसात २५ फाइल्स क्लिअर करायच्या असतील आणि तो २०च करत असेल तर तोही भ्रष्टाचारच आहे.तशाच पद्धतीने ९.०० ते १.०० वाजेपर्यंत ओ.पी.डी.त रुग्ण तपासायचे असतील आणि डॉक्टर जर १२.०० लाच निघून जात असतील तर तोही भ्रष्टाचार नाही का?
                                   The  mind  demands  justice when the opposition is at fault,but it seeks compromise when it is at fault हे याचे कारण आहे.

                             [२]राष्ट्रीय एकात्मता -मराठी माणसाने आय.टी.त (आणि इतर क्षेत्रातही) जॉब आणि पैसे आहेत म्हणून बेंगळूरू,चेन्नई,हैदराबाद,इंग्लंड,अमेरिकेला गेले तर चालते;पण तेच जर बिहार,यू .पी.चे लोक इथे आले तर आम्हाला चालत नाही.ज्यांचे भाऊ-बंध परमुलुखात 'सेटल' झालेले असतात,तेसुद्धा अशा वादात मागे नसतात.मुळात पार-प्रांतीय लोक इथे येवून (म्हणजे केवळ महाराष्ट्रात नव्हे,तर त्या त्या प्रांतात) व्यवसाय किंवा नोकरी करतात याचाच अर्थ त्या-त्या जागा आपल्याच नाकर्त्या स्वभावामुळे रिकाम्या राहिल्या होत्या (आणि अजूनही आहेत) असा विचार आपण का करत नाही? मराठी माणसाने रिक्षा-टैक्सी किंवा वडा-पावची गाडी चालवली असती तर उत्तर भारतीयांनी येथे येण्याची किंवा आय.टी.त पुरेसे मनुष्यबळ तयार झाले असते तर बेंगळूरूमध्ये 'मद्रासी' लोकांनी येण्याची गरजच उरली नसती.
                                 भारतीयांना नेपाळला जातानाही पासपोर्ट लागत नाही;पण म्हणून आपण नेपाळला आपल्या देशाचा भाग मानतो का?आपली ओळख महाराष्ट्रीयन,गुजराथी,मद्रासी,उत्तर भारतीय अशी न सांगता 'भारतीय' अशी आपण कधी अभिमानाने सांगणार?

                        [३]स्वातंत्र्य की स्वैराचार - घटनेने  दिलेल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण इतरांना आणि आपल्या देशाला त्रास होईल असे वर्तन तर करत नाही न याचा आपण कधी विचार करणार?पोलीसांनी कायद्यासाठी उचललेली काठी आपल्याला चालत नाही,तसेच सर्वोच्च न्यायालयाने (किंवा मार्कंडेय काटजू यांनी) पत्रकारांना दिलेली मार्गदर्शक तत्त्वे नको वाटतात,डॉक्टरांना आरोग्य मंत्रालयाने केलेले कायदे नको वाटतात,कंपन्यांना सरकारने दिलेले निर्णय अयोग्य वाटतात.कोणताही निर्णय योग्य चर्चेतून'च' झाला पाहिजे हे जसे योग्य,तसेच सर्वांनीच स्वतःवर सामाजिक भानातून काही बंधने घालून घेतली पाहिजेत हा विचार अयोग्य आहे का? तसे असेल तर मग आम्हा मोठ्यांना 'चिल्लर-पार्टी'वर किंवा रेव-पार्टी वर बोलणे शोभेल का?

                         [४] सांस्कृतिक  भान - विविध सन  आणि 'डे 'ज साजरे करताना आपण उथळपणे,उत्श्रुंखलपणे वागतोय याची आपल्याला भान का राहत नाही? अगदी साधे उदाहरण म्हणजे तरुणाई मोहर्रम या अतीव दुःखाच्या क्षणीही मिरवणुकीत डॉल्बी लावून नाचत असते,अगदी स्मशानभूमीत सुद्धा आपले मोबाईल वाजत असतात (चित्र-विचित्र रिंग टोनचे),किंवा गणपतीसमोर घाणेरडे अंग विक्षेप सुरू असतात.या सर्वांचे भान आपल्याला येणार की नाही? आपण सांस्कृतिक दृष्ट्या प्रगल्भ व्हायला नको का?

                       [५]विवेकाचा  आण  स्व-जबाबदारीचा  अभाव-वेगवेगळ्या योजनांना बळी पडून पैसे वाया घालविणे किंवा काही नेत्यांकडून स्वार्थासाठी तरुणाईचा अयोग्य वापर करून घेतला जाणे,असे प्रकार आपण रोजच बघत असतो.आपल्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर न केल्यामुळेच असे प्रकार घडत असतात.'देशातल्या तरुणांच्या मुखी कोणते गीत आहे त्यावर मी त्या देशाचे चारित्र्य आणि नीतिमत्ता ठरवतो' असे एका महान नेत्याने म्हटले आहे.आपल्या देशातले तरुण कोणाचा आदर्श घेतात? अभिनेते आणि खेळाडू यांचा आदर्श ठेवून आपण कोणत्या प्रकारचे वैचारिक अधिष्ठान डोळ्यासमोर ठेवतो? त्यांची नक्कल करून काय मिळवतो? ज्यांचा मी आदर्श ठेवू इच्छितो त्यांचा देशाच्या जडण-घडणीत नक्की कोणता 'रोल' असतो?
                                    भारतातल्याच नव्हे तर जगातल्या तरुणाईत स्वतंत्र वाचनाचा,चिंतनाचा आणि मानानाचा प्रकर्षाने अभाव जाणवू लागला आहे,त्यामुळे त्यांच्यावर कोणाचे आणि नक्की कोणते संस्कार होतात याची भीती वाटू लागली आहे.समाजात आज आत्मिक आणि आंतरिक सौंदर्यापेक्षा बाह्य सौंदर्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

                      [६]स्वतंत्र  विचारांचा  आणि  वैचारिक स्वातंत्र्याचा अभाव-आपण एखाद्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेताना किंवा एखाद्या गोष्टीविरुद्ध अगर तत्त्वाविरुद्ध आंदोलन (वैचारिक/भौतिक इ.) करताना प्रथम आपण असा निर्णय का घेतोय किंवा आंदोलन कशासाठी करतोय याचा विचार करण्याची नितांत गरज असते.त्यासाठी आपल्या बौद्धिक कुवतीनुसार आपण त्याचा अभ्यास केलाच पाहिजे.अन्यथा असे निर्णय चुकीचे ठरण्याची किंवा असे आंदोलन फसण्याचीच जास्त शक्यता असते.टीम आण्णाच्या समर्थनार्थ काढलेल्या दुचाकी रैलीमध्ये सामील झालेल्या दोन मोटारसायकल स्वारांना पोलीसांनी पकडताच त्यांनी पोलिसांना ऑफर केलेल्या प्रत्येकी रु.१०० च्या नोटा  कोल्हापूरमधल्या भाउसिंगजी रोडवर (दै.पुढारी कार्यालयासमोर) उभारून मी स्वतः पहिल्या आहेत.हे कशाचे निदर्शक आहे? एखाद्या नेत्याला शिव्या देण्यापूर्वी,एखाद्या पुस्तकाच्या हेतूबद्दल शंका घेण्यापूर्वी,एखाद्या चित्रपटावर आक्षेप नोंदविण्यापूर्वी,एखाद्या खेळाडूवर टीका करण्यापूर्वी,एखाद्याला ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाकडे बोट दाखविण्यापूर्वी,एखादी अंधश्रद्धा पाळण्या -आणि पाळायला लावण्यापूर्वी त्या-त्या गोष्टींचा आपण थोडातरी विचार 'स्वतः'हून केला पाहिजे.
                             याच्याही पाठीमागे 'The mind demands justice when the opposition is at fault,but it seeks compromise when it is at fault हेच कारण आहे.

                                   अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात आता तरी आपण सुधारणा केल्या पाहिजेत.तत्त्वज्ञांनी असे म्हटले आहे की-स्वतःला सुधारा म्हणजे जगातील एक वाईट व्यक्ती कमी झाल्याचे समाधान तुम्हाला लाभेल.त्यासाठी प्रथम स्वतःत दोष असू शकतात नव्हे ते असतातच हे मान्य करायला हवे. Everyone believes that he has less money than required and more intelligence than necessary या वाक्याचेच बरेच जण  आयुष्यभर इमाने-इतबारे पालन करत असतात आणि त्यामुळेच आर्थिक आणि बौद्धिक भ्रष्टाचार बोकाळतो.आपल्याकडे बुद्धी आहे,ज्ञान आहे,सज्जन माणसे आहेत,उत्साह आहे.अभाव आहे तो केवळ तो उत्साह योग्य मार्गाने प्रतीत करण्याचा. विवेकानंदांनीच सांगितल्याप्रमाणे-उठ,हृदयातील उत्साह जागवून उठ.आपण गरीब आहोत,आपल्याला मित्र नाहीत असे समजू नका.पैशाने मनुष्य घडविलेला कोणी पहिला आहे काय?मनुष्याच पैसा निर्माण करत असतो.मनुष्याच्या शक्तीने,उत्साहाच्या बलाने व श्रद्धेच्या सामर्थ्याने हे सर्व जग बनले आहे.


                                     आपल्याला आपला देश सुधारायचा आहे,या मातृभूमीचे एक सजग नागरिक म्हणून ते आपले सर्वांचे आद्य कर्तव्यच आहे.अडथळे अनेक आहेत,पण आपण स्वतःच्या संकुचित मनाचा त्याग करून पहिली अडचण दूर केली पाहिजे.St.Francis of Assissi यांनी म्हटले आहे-Start by doing what is necessary,then what is possible,and suddenly you are doing the impossible.

                                       आपल्याला अशक्य अशी कोणतीच गोष्ट करायची नाही-करायचा तो स्वतःत आणि समाजात थोडासा बदल...आणि मग २१ व्या शतकात भारत नक्कीच जगाचे नेतृत्व करेल...

Comments

  1. Truly,an eye-opener.
    It is painful to see in the world around us whatever Vivekanand feared of happening,becoming a reality.

    Regards,
    Vijpatil,
    NY City

    ReplyDelete
  2. A THOUGHTFUL AND INSIGHTFUL ARTICLE.
    CONGRATS.

    Arnav Pandit,
    Mumbai

    ReplyDelete
  3. Chan lihilay,Patil.

    Sandip Ghule,
    Nashik

    ReplyDelete

Post a Comment