माझे पप्पा ,माझे हिरो...My Father,My Hero...
©Dr. Amit Tukaram Patil:
माझे पप्पा - माझे हिरो !
(डॉ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे, जि.पालघर.)
सामान्य' माणूस असणारा पिता मुलांच्या आपल्यावरील व आपल्या मुलांवरील प्रेमामुळे 'हिरो' बनतो अशा अर्थाचा एक सुविचार पॅम ब्राउनने लिहून ठेवला आहे, जो एकदम बरोबर आहे.
अगदी परवाच म्हणजे १४ जूनला मी मुंबईहून पुण्याला येताना एक प्रसंग पाहिला. प्रसंग तसा विशेष नव्हता;पण एका पित्याचे हृदय पण किती संवेदनशील असते याची जाणिव करून देणारा होता.
नवी मुंबईतील एका टोल नाक्यावर एक मध्यमवयीन मनुष्य व एक १६-१७ वर्षांचा मुलगा असे दोघेजण उभे होते. बस आल्यावर बोर्ड वाचून त्या व्यक्तीने त्याच्याबरोबरच्या मुलग्याला गाडीत चढविले आणि पुढे त्याच्या गावाजवळच्या टोलनाक्यावर माझ्या मुलग्याला उतरवा असे कंडक्टरला सांगितले. त्याचे तिकीट काढून दिले. मुलाला जे न्यायला येणार होते त्यांना लगेचच फोन करून गाडीचा नंबर आणि कंडक्टरचा नंबर (त्याची परवानगी घेऊन) दिला, त्याला २-४ सूचना दिल्या. कंडक्टर आणि ड्रायव्हरला ४-५ वेळा त्याच्या मुलग्याला कुठे उतरावयाचे याबाबत विनंती केली. पोहोचलास की लगेच फोन कर असे मुलाला सांगितले. गाडी सुटेपर्यंत तिथेच उभा राहिला. मला वाटले, मुलगा बहुतेक पुण्यापर्यंत जाणार असेल. पण, पुढे ५०-६० किमीवर तो मुलगा उतरला. प्रवास जास्तीत जास्त एक-दीड तासाचाच पण; वडिलांची काळजी किती? एक बापच हे करू जाणे! कोण म्हणतं की बाप कठोर मनाचाच असतो म्हणून !! इथे तर मला मेणाहून मऊ हृदयाचा पिता दिसला !!!
माझे लहानपण कवठेमहांकाळ सारख्या खेडेगावात (त्यावेळच्या) गेले. ४-५ वर्षांचा असताना एकदा खेळताना आमचा चेंडू एका पडक्या घरात गेला. तो घेताना तिथे एक बाई दिसली. ती अतिशय विद्रूप आणि भयानक दिसत होती. (नंतर कळाले की ती भाजली होती , म्हणून शेजाऱ्यांनी तिला तिथे ठेवली होती.) मी इतका घाबरलो होतो की पुढचे आठ दिवस मी पप्पांच्या पोटावरच झोपत होतो. कुठल्याही संकटापासून वाचवून पप्पाच मला सुरक्षित ठेवू शकतात एवढा विश्वास काहीही जग न पाहिलेल्या मला तेव्हा वाटत होता आणि जगातील बरेच बरे-वाईट अनुभव घेतलेल्या मला आजही वाटतो आणि आयुष्यभर वाटत राहील.
जगप्रसिद्ध मानसोपचार शास्त्रज्ञ व मानसोपचार तज्ज्ञ सिग्मंड फ्रिउड (Sigmund Freud) म्हणतात की, I cannot think of any need in the childhood as strong as the need for a father's protection. (बालपणात मुलाला वडिलांच्या संरक्षणाची जेवढी गरज वाटते तेवढी इतर कशाचीच वाटत नाही.)
फ्रिउडच्या या वाक्याचा अनुभव आपण सर्वच जण आयुष्यभर घेत असतो.
आज मी आदिवासी भागात काम करतो,त्यामुळे माझ्या दवाखान्याच्या परिसरात भरपूर साप निघतात,अगदी ओपीडी मध्येही निघतात. पण मी इथे जॉईन झाल्यापासून एखाद-दुसराच साप मारला गेला आहे अन्यथा मी ते (शक्य असल्यास) पकडून एखाद्या पिशवीत भरून लांब सोडून येतो. स्टाफसह सर्वांना कौतुकमिश्रित आश्चर्य व भीती वाटते.
सापांची भीती मनातून जावी म्हणून पप्पांनी मी तिसरीत असताना नागपंचमीच्या दिवशी चांगला दहा-बारा फुटांचा साप माझ्या गळ्यात घालून माझा फोटो काढला आहे. आजही तो आमच्याकडे आहे. नंतर तासभर मी त्या सापाशी खेळत होतो ! तेव्हा जी भीती गेली ती अगदी कायमचीच!
One father is more than a hundred schoolmasters असे जे जॉर्ज हर्बर्ट म्हणतो त्याची प्रचितीच अशा प्रसंगांतून येते.
मागे 'आई'वर लिहिलेल्या लेखात मी प्रसूतीच्या वेळी आईला होणाऱ्या वेदनांचे वर्णन एका डॉक्टरच्या दृष्टीकोनातून केले होते. बऱ्याच वाचकांना ते भावल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
पण, बाळाच्या जन्मावेळी होणारी वडिलांच्या मनाची तगमग आणि अस्वस्थतासुद्धा एक डॉक्टर म्हणून पहायला मिळते. होणाऱ्या घटना डोळ्यांमागे घडत असल्याने 'सहनही करता येत नाही आणि सांगताही येत नाही' अशी त्याची विचित्र मन:स्थिती असते. जशा आईच्या प्रसूतीवेळच्या वेदनांची सह-अनुभूती (empathy) एखाद्या पुरुषाला घेता येणार नाही,अगदी तशाच प्रकारे बाळाच्या जन्मावेळच्या वडिलांच्या मनाच्या स्थितीची सह-अनुभूतीही एखाद्या स्त्रीला घेता येणे कठीण आहे. पत्नी आणि होणारे बाळ या दोघांचीही चिंता त्याच्या मनी दाटलेली असते. प्रसूतिकक्षाच्या बाहेर येताच त्याचा पहिला प्रश्न असतो,"डॉक्टर,सगळं व्यवस्थित आहे ना?" मुलगा झाला की मुलगी असले प्रश्न झालेल्या मुलाच्या आजीला पडलेले असतात, वडिलांना ते नंतर पडतात.
आपल्या मुलाने (मुलगा किंवा मुलगी) या जगात यशस्वीरीत्या जगायचे असेल तर लहानपणापासूनच त्याची तयारी करून घेतली पाहिजे याची पूरेपूर जाणिव वडिलांना असते. जग कठोर असते म्हणूनच कदाचित ते कठोरपणे वागत असतात. मुलाने चुका कराव्यात आणि आईने त्याच्या चुका पदराआड कराव्यात हे कविमनाला कितीही आवडत असले तरी,त्या गोष्टींची वडिलांनी दिलेली शिक्षाच जगण्याच्या कटू सत्याची जाणिव करून देते,कारण जगाला तुमच्या चुका मान्य नसतात. हल्लीचे वडीलही मुलांच्या संगोपनात आपला वाटा उचलताना दिसतात,हा खूपच सुखावह बदल आहे.
आई छान छान स्वयंपाक करून आपल्याला स्वतःच्या हाताने (अगदी मोठे झाल्यावर पण कधी-कधी) भरवते म्हणून आई आपल्याला 'एकदम भारी' वाटते,पण आपल्या वडिलांनी दिवसरात्र केलेल्या कष्टांमुळेच (काही अपवाद वगळून) ती भाकरी आपल्या ताटात येते याचीही जाणिव ठेवायला हवी.
आपल्याला श्रीकृष्ण म्हटले की लगेचच देवकी आणि यशोदा आठवतात,पण त्याच बाळकृष्णाला यमुनेच्या पुरातून स्वतःच्या प्राणाची बाजी लावून घेऊन जाणारा वसुदेव तितक्या सहजतेने आठवत नाही!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला जोडून आपण जिजाऊंचे नाव घेतो पण महाराजांच्या जन्माआधीपासूनच व ते लहान असतानाच शहाजीराजे आदिलशाही आणि निजामशाहीत मोठे नाव कमवून व बंगळुरुसारखी मोठी जहागिरी स्वकर्तृत्वावर मिळवून होते,याचेही स्मरण अवश्य व्हावे. काळाच्या प्रतिकूलतेमुळे तीव्र इच्छा असूनही स्वराज्याचे जे स्वप्न त्यांना पूर्ण करता आले नाही,ते त्यांनी आपल्या तितक्याच कर्तृत्ववान पुत्राकडून त्याच्या शिक्षणाची सोय करून व त्याला पूर्ण साह्य करून पूर्ण करवून घेतले हे विसरून कसे चालेल?
बराक ओबामांसारखा जागतिक नेता आपल्या आत्मचरित्राचे नावच मुळी Dreams from my father ठेवतो,हे प्रथमदर्शनी आश्चर्यकारक वाटेल,कारण त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईबरोबर फार काळ संसार केला नव्हता आणि छोट्या बराकचे पालनपोषण आईने व तिच्या आई-वडिलांनी केले होते. पण,कृष्णवर्णीय असूनही आपण उत्तमोत्तम पाश्चात्त्य विद्यापीठांत शिकून आपल्या समाजाचा उद्धार करू शकतो हे स्वतःच्या कृतींतून त्यांच्या वडिलांनी केवळ बराकलाच नव्हे तर साऱ्या जगाला दाखवून दिले आणि तोच संस्कार घेऊन पुढे बराक ओबामांनी घडविलेला इतिहास आपल्याला ज्ञात आहेच.
आपली आई ही त्यागमूर्ती असते यात शंका नाहीच,पण वडीलही आपल्यासाठी तितकाच त्याग करीत असतात हे आपल्या गावीच नसते.
स्वतः फाटकी कपडे घालून,पायात फाटक्या चपला घालून मुलांना मात्र सर्व काही चांगलंचुंगलं कसं देता येईल याचा अक्षरशः ध्यासच लागल्यासारखे प्रत्येकाचेच वडील (काही अपवाद वगळून) वागत असतात.
मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ असूनही आपल्या मुलांना शिक्षण अर्धवट सोडून घरी येण्याची सक्ती करणारे वडील माझ्या तरी पाहण्यात वा ऐकिवात नाहीत.
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून,स्वतः एकवेळ उपाशी राहून,घरी लग्नाची मुलगी असूनही आपल्या मुलांना 'चांगलं शिकून,मोठा हूनच आता गावाकडं ये' असे बायकोचा (मुलांच्या/मुलीच्या आईचा) रोष पत्करून म्हणणारे वडीलच बहुसंख्येने आजच्या हलाखीच्या परिस्थितीतही दिसतील.
त्यांना,त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या स्वतःच्या पोटच्या गोळ्यावर असणाऱ्या विश्वासाला सलाम!
मी लहानपणापासून माझ्या वडिलांच्या केवळ एकाच मार्कात हुकलेल्या एम.बी.बी.एस. प्रवेशाबद्दल बऱ्याचदा ऐकले होते. दोन्ही मुलांपैकी एकाने तरी एम.बी.बी.एस. डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती,पण त्यांनी ती कधी बोलून दाखविली नाही. मला रक्त बघताच चक्कर यायची आणि पप्पांना ते माहिती होते. माझी रक्ताची भीती घालविण्यासाठी ते मला सतत दूरदर्शनवर लागणारे यू .जी.सी.चे वैद्यकीय कार्यक्रम दाखवायचे, ज्यात बऱ्याचदा छोटी-मोठी ऑपरेशन्स पण दाखविली जायची. मी चक्कर येऊन पडायचो. मला पप्पा हे का करताहेत असं वाटायचं.
मग मी पप्पांनी सक्ती न करता स्वतःच्या गुणवत्तेवर 'मेडिकल'ला (M.B.B.S.) गेलो. मला प्रेतांची पण भीती वाटायची आणि पहिल्या वर्षी रोज तीन तास डिसेक्शन! कॉलेजला जाताना टेन्शनमध्येच जायचो. हळूहळू मला त्या सगळ्या गोष्टींची सवय झाली आणि मग मला माझ्या सरांनी बोलावून सांगितले की, अमित,गेले पंधरा दिवस रोज तुझे पप्पा डिसेक्शन हॉलच्या बाहेर येऊन थांबतात,खिडकीतून अधूनमधून बघतात. तुला त्रास झाला तर आपण समोर थांबून धीर द्यायला जवळ असावे असा विचार ते करायचे! ऑफिसमध्ये वरिष्ठांना सांगून रोजचा लेटमार्क पडू नये म्हणून विनंती करताना त्यांची किती तारांबळ होत असेल ती आत्ता मी स्वतः शासकीय अधिकारी झाल्यावर लक्षात येते!
मुलाच्या काळजीची ही परिसीमा नाही तर दुसरे काय?!
मी तिसरीत असल्यापासूनच त्यांनी माझा स्कॉलरशिपचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली आणि ज्या गावात धड चांगल्या शिक्षणाचीही सोय नाही अशा ठिकाणी राहून माझा राज्यात दुसरा क्रमांक आणून दाखविला. लहानपणीच यशाची चव चाखल्याने अगदी एम.बी.बी.एस.सारख्या अवघड कोर्समध्येही मी गुणवत्ता यादीत राज्यात दुसरा येऊ शकलो.
माझ्या अक्षराचे आज सर्वजण कौतुक करतात,पण पहिलीत असल्यापासून मला पप्पा अक्षर सुधारण्यासाठी रात्री बारा-बारा वाजेपर्यंत बसवायचे हे मला स्पष्ट आठवते.
MBBS चा अभ्यास करतानाही पप्पा माझ्याबरोबर रात्र-रात्रभर बसायचे,मला चहा करून द्यायचे._
आजही कोणत्याही अडचणीत मी पहिला सल्ला त्यांचाच घेतो*,कारण त्यांचाच मला सर्वांत जास्त आधार वाटतो.
पण,सगळीच मुले आपल्या वडिलांबद्दल असा विचार करीत नाही असे वाटते. अन्यथा वृद्धाश्रमांत इतकी गर्दी झाली नसती!
चार्ल्स वार्ड्सवर्थ (Charles Wardsworth) म्हणतो त्याप्रमाणे By the time a man realizes that maybe his father was right,he usually has a son who thinks that he's wrong [स्वतःची मुले स्वतःच्या चुका काढायला लागतात त्यावेळी माणसाला आपले वडील आपल्या लहानपणी (आणि नंतरही) बरोबर बोलत होते याची जाणिव होते]. जाणिव तर होते,पण त्यात स्वतःच्या वयाची २५-३० वर्षे जातात. नंतर झालेल्या पश्चात्तापाचा काहीच फायदा नसतो...'अब पछतावे होत क्या जब चिडियाँ चुग गई खेत?' अशी गत होते.
आज 'फादर्स डे' असल्यामुळे कोणाबद्दल जास्त वाईट बोलायचे नाही असे आधीच ठरवलंय.
प्रत्येकाने आजच्या सुदिनी एवढेच करावे की,लहानपणी आपण कसे वागत होतो आणि आपल्यासाठी आपल्या आई-वडिलांनी किती हाल-अपेष्टा सहन करून आणि त्रास घेऊन आपल्याला वाढविले आहे याचे वारंवार स्मरण करावे.
आज आपण जे काही आहोत ते त्यांच्यामुळे (एवढेच नव्हे तर आपण या भूतली त्यांच्यामुळेच आलो आहोत) हे नाकारता न येणारे सत्य आहे.
आजचा मुहुर्त साधून 'पितृदेवो भव' म्हणावे, वडिलांना नमस्कार करावा आणि त्यांना कृतज्ञतापूर्वक एक कडकडून मिठी मारावी आणि आश्वस्त करावे की, पप्पा (बाबा/आण्णा/तात्या/डॅडी), तुम्ही बिनधास्त राहा, टेन्शन सोडा आणि आता जरा 'रिलॅक्स व्हा'. मैं हूँ ना...आप बस हुकुम कीजिए !
(©डॉ.अमित तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ',
प्रा.आ.केंद्र भाताणे,जि.पालघर.
मूळ गाव-पाच्छापूर, ता.जत,
जि.सांगली)


Comments
Post a Comment