आपला 'लक्ष्या': मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक 'हसरे' स्वप्न'

*आपला 'लक्ष्या': मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले एक 'हसरे स्वप्न'*
(लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे: मराठीतील पहिला सुपरस्टार)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(पाच्छापूर, ता. जत, जि. सांगली)
(प्रस्तुत लेखक हे मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)

१६ डिसेंबर, २००४
वेळ: दुपार संपून संध्याकाळ सुरू होण्याची.
मी त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होतो.
लंच ब्रेकनंतरचे एक लेक्चर संपवून प्रॅक्टिकलसाठी निघत होतो.
तेवढ्यात अतुल अरोटे हा मित्र म्हणाला, "अरे, लक्ष्या गेला."
क्षणभर काही कळण्याचेच बंद झाले.
तसे आम्ही सगळे लक्ष्याचे डायहार्ड फॅन...त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता.
आपल्या जवळचाच कुणीतरी एखादा चांगला माणूस गेल्यावर जशी होईल तशी आमच्या सर्वांची अवस्था झाली होती.
कॉलेजमध्ये उभे असल्याने रडू शकत नव्हतो, इतकंच!
पण, त्याक्षणी मला एक प्रश्न पडला की, कोण कुठला एक मोठा अॅक्टर, ना ओळखीचा, ना पाळखीचा; त्याच्या जाण्याचा आपल्याला इतका त्रास का व्हावा?
उत्तर अगदी स्पष्ट होतं, त्रास झाला कारण, लहानपणी लक्ष्याला पहिल्यांदा जेव्हा टी. व्ही. वर किंवा चित्रपटात पाहिले, तेव्हापासून तो कधीच परका वाटला नाही. तो तेव्हापासून घरचाच वाटत आलाय, अगदी आजही तो आपल्यात नसताना!
पन्नास हे तसे काही त्याने आपल्याला सोडून जाण्याचे वय नव्हते; पण नियतीला मान्य असणाऱ्या गोष्टीच ती घडवून आणत असते.
आणि, लक्ष्या आपल्याला हसवत असला तरीही मूत्रपिंडाच्या (किडनी) आजाराने तो त्याआधी बऱ्याच वर्षांपासून त्रस्त होता.
चार्ली चॅप्लिन या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याने म्हटल्याप्रमाणे, 'त्याला बरीच दुःखं होती, दुखणी होती; पण ती त्याच्या ओठांना कधी समजायची नाहीत. ओठांना कळायचं ते फक्त हसणं आणि हसणंच!'
स्वतःसाठी हसू न शकणारे आणि दुसऱ्यावरही कधी न हसणारे हे दोन विनोदवीर (चार्ली आणि लक्ष्या) दुसऱ्यांना मात्र सातत्याने हसवत राहिले!!!
आपल्याला कितीही मानसिक ताण (टेन्शन) आलेला असू दे किंवा आपला मूड कितीही वाईट असू दे, लक्ष्याचा (किंवा चार्ली) चित्रपट लावला की, आपण तात्पुरते का होईना पण ते दुखणं विसरून पोट धरून हसणार हे नक्की!

संक्षिप्तात लक्ष्या:
लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे यांचा जन्म ०३ नोव्हेंबर, १९५४ रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यामुळे कोकणस्थ बेरकीपणा जन्मजातच होता.
खेरवाडीच्या शाळेत शिकल्यानंतर मुंबईच्या भवन्स कॉलेजमधून त्याने बी. ए. पूर्ण केले.
पण, त्याचा मूळ कौल अभिनयाकडेच होता. मुंबईतील गणेशोत्सवाचे कार्यक्रम हे त्याच्यासाठी 'लाँचिंग पॅड' ठरले. या कार्यक्रमांतून तो त्याच्या अभिनयाची हौस भागवू लागला.
कोकणस्थ वैश्य समाज, गिरगाव या संस्थेमार्फत होणाऱ्या काही लहानमोठ्या कार्यक्रमात तो अभिनय करीत असे, ज्यामुळे पैशाचा प्रश्न मिटत नसला तरी अभिनयाची भूक थोड्याफार प्रमाणात तरी भागत असे.
आर्थिक चणचण तर पाचवीलाच पुजलेली होती, त्यामुळे मिळेल ते काम स्वीकारण्यावाचून त्याच्याकडे पर्याय नव्हता.
अखेरीस मुंबई मराठी साहित्य संघात तो प्रथम बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम करू लागला. नाटकाच्या सुरुवातीला तिसरी घंटा झाल्यानंतर पडदा वर घेण्याचे कामही त्याने त्यावेळी आवडीने केले. हे काम करत असतानाच रंगमंचावरील मोठमोठ्या कलाकारांचे अभिनय बघण्याची संधी त्याला लाभली आणि अभिनयाच्या क्षेत्राकडे तो आणखीन तीव्रतेने ओढला गेला.
एकेकाळी या साहित्य संघात तो महिना ४०० रुपये पगारावर कलाकार म्हणून नोकरीस होता. त्यावेळचे आघाडीचे अभिनेते काशीनाथ घाणेकर यांना एका नाइटचे ४०० रुपये मिळायचे. एवढी मोठी तफावत त्यांच्या कमाईत असल्याचे लक्ष्मीकांत बेर्डे यांना वैषम्य वाटायचे.

१९८३ साली आलेले पुरुषोत्तम बेर्डे यांचे 'टूर टूर' हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. या नाटकानंतर लक्ष्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरूवात केली.
सार्वजनिक कार्यक्रमातील त्याचा पहिला कार्यक्रम ठरला तो म्हणजे दूरदर्शनरील 'गजरा' ! यात लक्ष्याने केलेल्या मिमिक्रीने हा कार्यक्रम गाजवला.
'लेक चालली सासरला' हा त्याचा पहिला चित्रपट! तो चित्रपट कदाचित कुणाच्या फार लक्षात राहिला नसेल; पण त्यातल्या लक्ष्याच्या अभिनयाने चित्रपटसृष्टीचे लक्ष वेधून घेतले, हे नक्की!
१९८५ मध्ये आलेल्या 'दे दणादण' आणि 'धूमधडाका' या चित्रपटांनी तर लक्ष्याला प्रसिद्धीच्या यशोशिखरावर नेऊन बसविले. वैशिष्ट्य म्हणजे, यातील 'दे दणादण' या चित्रपटात लक्ष्या मुख्य भूमिकेत नसूनही सर्वांच्याच केवळ चांगला लक्षात राहिला नाही, तर मुख्य कलाकारांएवढाच तो गाजला. त्यानंतरच्या 'धूमधडाका' मध्ये त्याने अशोक सराफ, महेश कोठारे आणि शरद तळवलकर यांच्याबरोबर काम करून प्रसिद्धीचे शिखर रातोरात गाठले. धूमधडाका हा चित्रपट इतका गाजला की, आजही आपण तो पाहिला की, आपली हसूनहसून मुरकुंडी वळते. लक्ष्याने या चित्रपटात दिलेले एकाहून एक सरस विनोदी सीन्स म्हणजे आदर्श विनोदी अभिनयाचा वस्तुपाठच जणू! अशोक सराफांनी यात अफलातून काम केले आहे, पण यात जास्त भाव खाऊन जातात ते लक्ष्या आणि शरद तळवलकर यांच्यातील सीन्स! डायनिंग टेबलवर बसून आपल्या वडिलांना (धनाजी वाकडे) लक्ष्याने भावी चित्रपटाची स्टोरी एेकवताना, त्यांना अशोक सराफांनी तोंडाला लावलेले लोणी असो किंवा लोकेशन हंटिंगबद्दल आपल्या वडिलांना समजावून सांगताना लक्ष्याने त्यांच्यासाठी वापरलेला 'रिपीट अज्ञान' हा शब्द असो.., लक्ष्या संपूर्ण सिनेमा आपल्या अभिनयाने व्यापून टाकतो. गावाकडच्या मुलगीला अभिनय शिकवण्यासाठी त्याने नेमका निवडलेला 'रेप सीन' म्हणजे तर विनोदाचा सर्वोच्च कळसच!

या चित्रपटानंतर मरगळलेल्या मराठी सिनेमात 'अशोक-लक्ष्या' या जोडगोळीचे चैतन्यमयी वारे घोंघावू लागले. संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी या वादळाने हलवून टाकली. भारतीय चित्रपट विश्वाच्या इतिहासातील चित्रपटातील आघाडीच्या जोडीने (लीड पेअर) सर्वाधिक हिट चित्रपट देण्याचा या दोघांचा विक्रम अद्यापहि अबाधित आहे.
अशोक-लक्ष्या जोडगोळीने एकूण ६० चित्रपट गाजवले. मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ म्हणून या दोघांचा काळ मानला जातो.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे अर्थातच 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाची तर अन्य कोणत्याही चित्रपटाशी होणे केवळ अशक्य! हल्ली सगळ्या विनोदी कार्यक्रमांत एखाद्या पुरुष पात्राने स्त्रीचे कपडे घालून काहीतरी अंगविक्षेप करून पांचट विनोद करण्याचा प्रवाद आला आहे. अतिशय खालच्या दर्जाचे विनोद करून आणि स्त्रियांचे वैगुण्य दाखवून आपण कशातरी टाळ्या मिळवायच्या एवढा विचार करूनच यांतील बव्हंशी भूमिका केल्या जातात. बालगंधर्वांनी रंगविलेली स्त्रीपात्रे हा उत्कृष्ट अभिनयाचा व पुरुषांनी स्त्रीभूमिका करताना पाळावयाच्या अदबीचा एक आदर्श नमुना होता. मात्र, लक्ष्मीकांत बेर्डेंनी 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात साकारलेली स्त्रीभूमिका या दोहोंहूनही वेगळी होती. विनोदी स्त्रीभूमिका करताना एक पुरूष ही भूमिका साकारतोय हे प्रेक्षकांना दाखविण्याइतपत पौरुषत्व त्यात त्यांनी सांभाळून ठेवले होते आणि त्याचवेळी घरातील मावशीला (मालकीण) मात्र आपण स्त्रीच आहोत याबद्दल शंका येणार नाही एवढे स्त्रीत्वही त्यात जपून ठेवले गेले होते. या दोहोंमधील 'बॅलन्स' सांभाळण्याचे कठीण काम लक्ष्याने लीलया केले होते, याबद्दल त्याचे करावे तितके काैतुक कमीच आहे!
घरच्या मालकाने (सुधीर जोशी) त्याने भाड्याने दिलेल्या खोलीत केवळ अशोक सराफला रहायला परवानगी दिलेली असताना एकूण चारजण तिथे राहत असताना त्यांनी केलेली धमाल या सिनेमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. मला आवडलेला सर्वोत्कृष्ट विनोदी प्रसंग म्हणजे सुधीर जोशींनी अचानक रुमची झडती घेताना लक्ष्याने 'दाखवलेली' एन्ट्री! लक्ष्याच्या विनोदाचे 'टायमिंग' किती 'परफेक्ट' होते याचा याहून सुंदर व सरस नमुना सापडणे कठीणच!

*अचूक टायमिंग हेच लक्ष्याचे मर्मस्थान!*
प्रथमतः आत्यंतिक आर्थिक चणचण असतानाच्या कठीण काळात व नंतर प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदवीराने कधीही कंबरेखालचे विनोद केले नाहीत, ही त्यांच्या मोठेपणामागील सकारात्मक गोष्ट मानता येईल.
खालच्या पातळीचे, स्त्रीत्वाचा अपमान करणारे किंवा स्त्रियांच्या लकबी साकारून पांचटपणा करणारे कोणतेही विनोद त्यांनी साकारले नाहीत, हा त्यांच्या भूमिकांचा प्लस पॉइंट मानता येईल.
डोळ्याच्या बाहुल्यांच्या जलदगतीने होणाऱ्या हालचालींवर आधारित व स्वतःशीच विचार करत तिऱ्हाइतासारख्या केल्या जाणाऱ्या शाब्दिक कोट्या व हालचाली ही त्यांची 'ट्रेडमार्क' लकब बनली होती. वैशिष्ट्य म्हणजे आजकाल काही तथाकथित विनोदवीर साकारतात त्याप्रमाणे कंबरेचे व कंबरेखालील अंगविक्षेप यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्वतःच्या विनोदी शैलीत कधीच थारा दिला नाही.
आपल्यावर केवळ विनोदी अभिनेत्याचाच शिक्का बसू नये व आपण गंभीर भूमिकाही तेवढ्याच ताकदीने निभावू शकतो हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आग्रहाने 'एक होता विदूषक' या गंभीर चित्रपटात अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारून आपण अशा भूमिकांतही तसूभरही मागे पडत नाही, हे त्यांनी दाखवून दिले होते. मात्र तो चित्रपट अपेक्षेएवढा चालू शकला नाही याची सल त्यांना आयुष्यभर लागून राहिली होती.
त्यावेळचे मराठी चित्रपट हे दिग्दर्शक किंवा पटकथेचे सामर्थ्य यांच्याएेवजी निर्मात्यांच्या मर्जीने जास्त चालत असल्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंसारख्या अष्टपैलू कलाकाराला विनोदी भूमिकांच्या साच्यातच जखडून रहावे लागले हा त्यांचा वैयक्तिक पराभव नसून तत्कालीन मराठी चित्रपटसृष्टीचा तो पराभव ठरला. प्रेक्षक जे म्हणतात की, लक्ष्याच्या भूमिकांत नंतर नंतर तोचतोचपणा येत गेला त्यामागची ही काळी बाजू समजून घेणे गरजेचे आहे.
इथे त्यांच्या गाजलेल्या मराठी चित्रपटांची किंवा भूमिकांची उहापोह करण्याचा माझा हेतू नाही कारण त्या सर्व गोष्टी सुजाण प्रेक्षकाला ज्ञात आहेतच.
विनोदी भूमिका करताना नाटकांच्या चालू प्रयोगावेळी त्यांनी अचानक केलेल्या अॅडिशन्स या भाव खाऊन जायच्या आणि उत्तरोत्तर त्याच नाटकात विनोदाची श्रीमंती ओतत जायच्या. अशा ऐनवेळच्या अॅडिशन्स हा आणखी एक 'लक्ष्या ट्रेडमार्क' होता.
हे येरागाबाळ्याचे काम नोहे; तेथे जातीचे पाहिजे!!!
आणि, *मी लक्ष्याला याचि देही याची डोळा पाहिले!*
मला तसे चित्रपटांचे काही खूप जास्त आकर्षण नाही आणि त्यातील एखादा कलाकार समोर आला तर आपण त्याची पटकन सही (ऑटोग्राफ) घ्यावी किंवा त्याच्याबरोबर फोटो काढावा असे मला कधी वाटले नाही व सध्याही वाटत नाही.
या नियमाला अपवाद केवळ दोनच- एक म्हणजे लक्ष्या आणि दुसरे म्हणजे अमिताभ बच्चन. हे समोर आले किंवा मला त्यांना भेटायला मिळाले तर मी भरून पावेन.
सुदैवाने मला मी कॉलेजमध्ये शिकत असताना एकूण तीन वेळा लक्ष्मीकांत बेर्डेंना 'याचि देही याचि डोळा' पाहता आले.
कोल्हापूरकरांना चित्रपटातील कलाकार भेटणे याचे फार काही अप्रूप नसते. संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीचा पायाच कोल्हापूरने रचलेला आहे. मराठी चित्रपटांची तर ही पंढरी मानली जाते. लता मंगेशकरांपासून ते आशुतोष गोवारीकरांपर्यंतचे कलाकार कोल्हापूरचेच.
पूर्वीच्या काळी बव्हंशी मराठी चित्रपटांचे शूटिंग जिथे व्हायचे तो जयप्रभा स्टूडिओ आणि भालजी पेंढारकर स्थापित व सध्या शासनाच्या ताब्यात असणारी चित्रनगरी ही दोन्हीही ठिकाणे कोल्हापूरमधीलच.
पण, यातील कोणत्याच ठिकाणी आम्हाला आमचा लाडका लक्ष्या भेटला नाही; ना त्याला भेटायला कुणाचा वशिला लावावा लागला; ना कुणाची ओळख काढावी लागली.
त्याचे झाले असे की, हुशार मुलांचे समजल्या जाणाऱ्या विवेकानंद महाविद्यालयात मी शिकत होतो. मी आणि माझा मित्र प्रसाद कुलकर्णी असे आम्ही दोघे सायकलवरून कॉलेजला ये-जा करत असू.
एके दिवशी संध्याकाळी ०४.३० च्या सुमारास कॉलेज सुटल्यावर आम्ही दोघे सायकलवरून घरी निघालो होतो. ताराबाई पार्क परिसरातून जाताना वाटेत एका बंगल्याच्या आत काहीतरी गडबड चालू असल्याचे जाणवले. गेटजवळ सायकल लावून आत पाहिले तर बंगल्यात एका गाण्याचे शूटिंग चालू होते. गाणे बराच वेळ चालले पण नक्की कोणत्या कलाकारांवर ते चित्रित होतंय ते काही दिसत नव्हते. खूप वेळ आमची उत्सुकता ताणली गेली होती. सुदैवाने शूटिंग चालू असूनही बंगल्याबाहेर खूप जास्त गर्दी नव्हती. बराच वेळ थांबूनही कोणीच दिसत नाही म्हटल्यावर आम्ही दोघेही निघण्यासाठी सायकलच्या दिशेने निघालो. तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी बोलल्याचा आवाज आला आणि क्षणार्धात आम्ही तो आवाज ओळखला. शेवटी, घरच्या माणसाचा आवाज ओळखणारच ना!
आम्ही पाठीमागे फिरलो तर गेटच्या आत 'लक्ष्या' एका आराम खुर्चीवर बसलेला दिसला. गेट बंद असल्यामुळे आम्ही गेटच्या जाळीला धरून आत डोकावू लागलो. आमच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा उत्साह आणि आनंद लक्ष्यासारख्या कसलेल्या अभिनेत्याच्या लक्षात न येता तरच नवल! मग काय! लक्ष्यानेच तिथल्या एकाला गेट उघडून आम्हाला आत घ्यायला त्याने सांगितले. आम्ही घाबरतच आत गेलो; आम्हाला ते ओरडतील अशी मनातून एक भीती वाटत होती.
पण, लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आश्वासक बोलण्याने आमच्या मनातील भीती कुठल्या कुठे पळून गेली. "काय रे पोरांनो, कितवीला आहे तुम्ही?" असे त्यांनी त्यांच्या खर्जाच्या आवाजात विचारले. चांगला अभ्यास करा असे त्यांनी सांगितले. आम्ही म्हणालो, "सर, ऑटोग्राफ पाहिजे." त्यांनी लगेचच पेन मागितले. आम्ही फिजिक्सच्या वह्या काढल्या आणि पटकन त्यांची सही घेतली. पाच-दहा मिनिटे तिथेच रेंगाळत राहिलो. शेवटी ते शूटिंगला निघून गेल्यावर तेथून बाहेर पडलो. इतक्या वर्षांनंतरही तो प्रसंग आणि लक्ष्याचा तो आवाज व चेहरा आहे तसा मनावर कोरला गेलाय. नंतर ३-४ दिवस आम्ही रोजच लक्ष्याला बघायला तिथे जायचो.
नंतर ५-६ महिन्यांनी ताराबाई पार्क परिसरातील 'पाच बंगला' परिसरात त्यांचे दर्शन झाले. तिथेही मी त्यांचा ऑटोग्राफ घेतला.
त्यानंतर आणखी एखाद्या वर्षाच्या कालावधीने कलेक्टर ऑफिसजवळील 'महावीर गार्डन'मध्ये एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान लक्ष्या आणि महेश कोठारे यांची भेट झाली.
तिन्ही भेटी शांतपणे व अचानक झाल्याने आजही त्या व्यवस्थित आठवतात.

*खूप लवकर अंत*
१६ डिसेंबर, २००४ रोजी या मराठी चित्रपटाच्या पहिल्या सुपरस्टारचा किडनीच्या विकारामुळे मृत्यू झाला.
मराठीबरोबरच कित्येक हिंदी चित्रपटांतही त्यांनी कित्येक भूमिका गाजवल्या.
मराठी कलाकारांकडून निर्माते शूटिंग करून घेत; परंतु नंतर मानधन द्यायला जी टाळाटाळ करत त्याविरुद्ध त्यांनी जोरदार आवाज उठवला. कलाकार कलेचे आणि कष्टाचे पैसे घेतो, त्यामुळे ते त्याला चोख आणि वेळेतच मिळाले पाहिजेत याबाबत ते अत्यंत आग्रही होते.
एका चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी त्यांना जेव्हा असे कळाले की, त्यांच्या सिनेमाच्या त्याच दिग्दर्शकाने निळू फुलेंचे मागील पैसे देणे बराच काळ टाळले आहे, तेव्हा त्यांनी स्वतःच्याच भूमिकेच्या डबिंगला कठोरपणे नकार दिला. त्या निर्मात्याने जेव्हा निळू भाऊंचे पैसे चुकते केले त्याचवेळी ते डबिंगसाठी उपस्थित राहिले.
आत्ताचे मराठी कलाकार लग्नात किंवा अन्य कार्यक्रमांत जी 'सुपारी' घेतात, त्याची सर्वप्रथम सुरुवात लक्ष्मीकांत बेर्डेंनीच केली. त्यामुळे कलाकार अर्धपोटी न राहता त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू लागले.
लक्ष्याच्या लोकप्रियतेचा आणि यशस्वितेचा अंदाज यावरून लावता येईल की, ९० च्या दशकात ते एका कार्यक्रमाला एक लाख रुपयांची सुपारी घेत आणि तरीही त्यांना प्रचंड मागणी होती.
असा हा हरहुन्नरी, मनस्वी, कष्टाळू व दैवी प्रतिभा लाभलेला कलाकार वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी आपल्यातून निघून गेला याहून दुर्दैव ते कोणते?
कितीही मानसिक ताण असला तरी लक्ष्याचा पिक्चर लावल्यावर प्रेक्षकांच्या ओठावर हास्य फुलू लागते याहून एखाद्या कलाकारच्या यशस्वितेची वेगळी पावती कोणती असेल!!!
आपल्या लाडक्या लक्ष्याला विनम्र अभिवादन... *लक्ष्या, तू आज हवा होतास!*

Comments