आपले आबा (अर्थात 'आपला माणूस) गेले!!!... Sad demise of deeply respected and honourable R. R. (Aaba) Patil..!
'आपला माणूस' (अर्थात 'आबा') गेला!
(© डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.)
(© या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय या लेखाचे कोणत्याही माध्यमाद्वारे पुनःप्रसरण किंवा पुनर्मुद्रण करता येणार नाही. असे करणे हा दंडनीय अपराध ठरतो.)
(प्रस्तुत लेखक हे मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
(मान. आबासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत प्रस्तुत लेखक त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष उपस्थित होते. लेखातील सर्व घटनांचे लेखक प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.)
(केवळ वॉट्सअॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)
दि. १६ फेब्रुवारी, २०१५ रोजी माझ्या सख्ख्या मोठ्या मामांनी (आबांनी) देहत्याग केला आणि त्यांचा आत्मा पंचत्वात विलीन झाला. त्याला आज बरोबर २ वर्षे झाली.
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी संध्याकाळी ४ वा. २० मिनिटांनी आबांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांच्या आय. सी. यू. मधल्या बेडजवळ घरातील मी (डॉ. अमित) आणि माझे मधले मामा म्हणजे राजूमामा (तात्या) (डी. वाय. एस. पी.) हजर होतो; तर पवार साहेबांच्या सुकन्या सुप्रिया ताई (मान. खास. श्रीम. सुप्रिया सुळे ताई) याही आय. सी. यू. मध्ये हजर होत्या..!
माझ्या मामांच्या-आई (आजी), मोठ्या मामी (मान. आम. श्रीम. सुमन ताई), स्मिता (आबांची कन्या) या ११ व्या मजल्यावरील आबा आधी जेथे अॅडमिट होते त्या 'स्पेशल रुम' मध्ये होत्या तर मावशीचे यजमान श्री. एम. डी. देशमुख, तात्यांचे बोरगावचे मेहुणे श्री. जितेंद्र पाटील, रोहित सोनी मामा, पी. आय. खोत मामा, चिवटे मामा, आबांच्या कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी आणि इतर काही जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि काही कार्यकर्ते मुंबईतील बांद्रा परिसरातील लीलावती रुग्णालयाच्या आवारात गर्दी करून उभे होते.
आबांनी इहलोकीची यात्रा संपविण्याच्या ३-४ तास आधीच काही मराठी वृत्तवाहिन्यांनी 'आबा गेल्याची' बातमी प्रसृत करून मुंबईपासून लांब असणाऱ्या आबांच्या चाहत्यांमध्ये गोंधळ माजवून दिला होता.
उपरोल्लेखित आम्ही आबांचे सर्व घरचे लोक आबांच्या जवळ आहेत हे माहिती असल्याने आमचे फोन सतत खणखणत होते.
तशा त्या वातावरणामुळे अतीव दुःख, भीती, तणाव, खिन्नता, हतबलता, नैराश्य अशा सर्व नकारार्थी भावनांचा कल्लोळ आमच्या सर्वांच्या मनात माजला होता.
तिकडे अंजनीतल्या आमच्या घरी असणाऱ्या सर्व नातेवाईकांची अवस्था तर याहूनही बिकट होती; कारण ते आबांपासून खूप लांब होते.
आणि, ठिकठिकाणांहून चित्र-विचित्र बातम्या व दूरध्वनी येत असल्याने ते आणखीन जास्त गोंधळले असावेत.
१६ फेब्रुवारीचा माझा दिवस-
मी पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट 'अ' या पदावर २०१४ पासून कार्यरत आहे. त्यामुळे आबा अॅडमिट झाल्यापासून मी बऱ्याचदा लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊन असायचो. माझ्या सुट्टीच्या दिवशी आणि इतर दिवशी वेळ मिळेल तसा मी विरारहून बांद्र्याला लोकलने जायचो आणि आबांना पाहून व घरच्यांना भेटून यायचो. शक्य होईल तेव्हा आणि जास्तीत जास्त वेळा मी तिकडे मुक्काम करीत असे.
दुसऱ्या दिवशी माझी महत्त्वाची मीटिंग व अंगणवाडीतील कुपोषित मुलांची तातडीची तपासणी असल्याने मी १५ फेब्रुवारी, २०१५ रोजी रात्री १० वाजता लीलावती रुग्णालयातून निघून माझ्या कामाच्या ठिकाणी आलो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत काम आटोपून पुन्हा रुग्णालयात पोहोचण्याचा माझा विचार होता. सकाळी मीटिंग संपवून मी सकवार गावातील अंगणवाडीत ११ वाजण्याच्या सुमारास पोहोचलो होतो. निम्म्या-अर्ध्या मुलांची तपासणी झाली असेल, नसेल तोपर्यंत माझ्या एका नातेवाईकांचा (फत्तेसिंह व स्नेहल आर. पाटील) माझ्या मोबाईलवर फोन आला. कॅन्सरवरच्या नॅचरोपॅथी औषधांचा त्यांनी कुठूनतरी शोध घेतला होता. त्यावेळी लांबचे-जवळचे असे सर्वच नातेवाईक आबांसाठी औषध शोधत होते. मी त्यांना आवश्यक ती माहिती दिली.
नंतरच्या १५-२० मिनिटांत बहुधा एका 'नीट बघण्याचा' आग्रह करणाऱ्या दूरचित्रवाहिनीवर आबांच्या निधनाची बातमी झळकली होती. घाईगडबडीत दिलेली ती बातमी चुकीची होती; मात्र त्यामुळे गावाकडून फोनवर फोन येऊ लागले. मी माझ्या दवाखान्यात गेल्यावर तेथे उपस्थित असणाऱ्या फार्मसी ऑफिसर श्रीम. उन्नती मॅडम यांनी माझ्या चेहऱ्यावरील तणाव पाहून मला विचारले, "काय झाले सर? आबांची तब्येत बरी आहे ना?" मी गडबडीत त्यांना म्हणालो, "तसे वाटत नाही मला. आज काहीतरी विपरीत घडेल असं मला राहून राहून वाटतंय." तशाच गडबडीत मी माझ्या क्वार्टरवर येऊन मिळेल त्या वस्तू भरून बॅग भरली. तोपर्यंत एका कर्मचाऱ्याने (श्री. सातपुते) मला विरार स्टेशनपर्यंत सोडण्याची तयारी केली. त्यांनीच मग ई-वॉलेटमधून मला बांद्रा लोकलचे तिकीट काढून दिले.
मी लगेचच्या एका लोकलमध्ये बसलो.
माझ्या पी. एच. सी. पासून विरार स्टेशनला पोहोचेपर्यंत मला आईचे आणि पप्पांचे २-३ फोन येऊन गेले. आईच्या आवाजावरून तिच्या मनातल्या भीतीचा आणि गोंधळलेपणाचा अंदाज बांधता येत होता; पण माझी अवस्था त्याहूनही खूप बिकट होती.
लोकल नेमकी 'स्लो' मिळाली; मात्र वाट बघत बसण्यात काही अर्थ नव्हता. शक्य तितक्या लवकर प्रवास सुरू करणे गरजेचे होते.
त्यावेळच्या माझ्या मनातील भावना नेमक्या शब्दांत पकडणे मला आत्ता शक्य वाटत नाही. जगातील जेवढ्या काही नकारात्मक भावना असतील त्या सगळ्या मनात दाटून आल्या होत्या. मनावर एक मळभ दाटून आले होते. प्राप्त परिस्थितीतून आबांची सुटका (चांगल्या अर्थाने) होईल की नाही याबद्दल डॉक्टर म्हणून मनात खूप शंका होत्या, हतबलता होती.
मनातील विचारांचे चक्र थांबविणे कोणत्याच प्रकारे शक्य होत नव्हते.
लाल दिव्याच्या गाडीत बसून लोकांना नमस्कार करणारे आबा आणि आता रुग्णालयातील एका बेडवर गेले एक-दीड महिना गंभीर अवस्थेत असणारे आबा असे दोन्ही चेहरे सतत नजरेसमोर येत होते.
माझा मामेभाऊ राहूल (तात्यांचा मुलगा) याच्या फोनमुळे माझ्या विचारांची तंद्री भंगली होती. त्याने मोठ्या मामांच्या (आबांच्या) तब्येतीबद्दल मला बरेच प्रश्न विचारले होते आणि मी उसने अवसान आणून त्याला शक्य तितकी सकारात्मक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता.
माझ्या मूळ गावाकडूनही (पाच्छापूर, ता. जत, जि. सांगली) बरेच फोन त्यावेळेत आले होते आणि "आबा बरे आहेत" असे मी सर्वांना सांगितले होते.
आबा अॅडमिट झाल्यापासून बरेचदा आबांच्या मृत्यूसंबंधीच्या बातम्या समाजमाध्यमांमधून फिरायच्या आणि काही तासांनी त्या अफवा असल्याचे लोकांना (आणि आम्हालाही!!!) समजायचे.
आताही तसाच काहीसा प्रकार असेल असे सगळ्यांना वाटत होते... मलाही आबांचा 'भाचा' म्हणून तसेच वाटले; पण माझ्यातला 'डॉक्टर' मात्र ते सहजासहजी मान्य करायला तयार होत नव्हता... त्या सव्वा तासाच्या प्रवासात शंकेची पाल मनात सतत चुकचुकत होती.
अखेरीस, लोकल- सिटी बस असा प्रवास करत मी सुमारे २.३० वाजण्याच्या आसपास लीलावती रुग्णालयात पोहोचलो. माझ्याबरोबर साहित्याची बॅगही होती. ती ११ व्या मजल्यावर ठेऊन लगेच खाली पहिल्या मजल्यावरच्या अतिदक्षता विभागात जाऊन मोठ्या मामांना बघून यावे असा मी विचार केला होता. मात्र, पहिल्या मजल्यावर लिफ्ट थांबली असता माझ्या मावशीचे यजमान देशमुख काका धावतच माझ्याकडे आले. त्यांनी अक्षरशः मला बाहेर ओढले, माझ्या हातातील बॅग घेतली आणि मला म्हणाले, " अमित, सरळ आय. सी. यू. मध्ये जा आणि आबांची तब्येत बघून आम्हाला काय ते सांग."
त्या विभागाच्या बाहेर उपस्थित असलेल्या सर्व आप्तेष्ट- हितचिंतकांच्या चेहऱ्यावरचा तणाव स्पष्ट जाणवत होता.
मला राजू मामा (तात्या) अजून दिसले नव्हते. आत जाताना मामा बरोबर असावेत असे वाटत होते; पण मला जास्त वेळ बाहेर थांबणेही शक्य नव्हते.
दुपारी ३.०० वाजताच्या जवळपास मी आबांच्याजवळ पोहोचलो त्यावेळी व्हेंटिलेटरचा आवाज येत होता आणि डायलिसिस मशीनही चालू होते. मोठ्या मामांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवले होते आणि मॉनिटरवरचे रीडिंग हार्टरेट (HR) ७८ प्रतिमिनिट आणि ब्लड प्रेशर १००/६० दाखवत होते.
तसे पाहता, हे दोन्ही निर्देशक (indicators) आमच्या वैद्यकीय भाषेत बोलायचे तर within normal range (सामान्यपणे असणाऱ्या योग्य श्रेणीत) होते.
इतरांसाठी ही सामान्य गोष्ट असली तरी, गेले ४-५ दिवस आबांचा बीपी (रक्तदाब) खूप कमी व्हायचा आणि बीपी वाढविण्यासाठी दिली जाणारी तिन्ही औषधे सर्वोच्च मात्रेत त्यावेळी आबांना दिली जात होती हे एक डॉक्टर म्हणून मला माहिती होते.
दि. १४ फेब्रुवारी, २०१५
रात्री ११.३० वाजता मामांच्या-आई (आबांच्या आई/ माझ्या आजी), मोठ्या मामी (आबांच्या पत्नी), स्मिता यांना लीलावती रुग्णालयासमोरील महिनाभर भाड्याने घेतलेल्या एका फ्लॅटवर सोडून राजूमामा आणि मी परत 'लीलावती'मध्ये आलो होतो.
मामांना जरा फ्रेश व्हायचे होते म्हणून ते ११ व्या मजल्यावरील 'स्पेशल रुम'मध्ये गेले. "१० मिनिटांत मी खाली आय. सी. यू. मध्ये येतो, तोपर्यंत तू आबांना भेटून ये", असे मला जाताना राजूमामा म्हणाले.
मी आय. सी. यू. मध्ये आबांच्या जवळ गेलो.
व्हेंटिलेटर आणि डायलिसिस मशीन दोन्ही आपापले काम करीत होते. पण, आबा झोपले होते; म्हणजे तसे वाटत होते.
मोठ्या मामांचे डोळे एका सेलोटेपसारख्या पट्टीने मुद्दामच झाकले गेले होते.
मी मामांचा श्वास आणि मॉनिटर यांच्याकडे आलटून पालटून बघत होतो. तसे तर सगळे वरून तरी आलबेल वाटत होते; पण माझी एक मोठी अडचण होती... ती म्हणजे, 'मी एक डॉक्टर होतो!'
आबांचा 'भाचा' म्हणून पाहताना बरी वाटणारी ती गोष्ट माझ्यातल्या 'डॉक्टरला' मात्र योग्य वाटत नव्हती.
काहीतरी 'वेगळी गोष्ट' आहे, हे जाणवत होते.
मनात शंका आणि भीतीचे काहूर माजले होते. तेवढ्यात तिथे आय. सी. यू. मधील इंटेन्सिव्हिस्ट डॉ. राम सर राउंड घेत घेत माझ्यापर्यंत पोहोचले. खरे तर, ते 'काहीतरी' सांगतील असेे मला वाटत होते आणि ते जे काही सांगणार आहेत, ते ऐकण्याची माझी मानसिक तयारी नसल्यामुळे मला त्यावेळी त्यांना भेटू वाटत नव्हते.
पण, ते माझ्यापर्यंत पोहोचले होते.
मला पाहताच ते अशा अर्थाचं काहीतरी म्हणाले, 'Hello, Dr. Amit. Your patient is in very critical condition. The chances of revival from this condition and hence those of survival are almost zero. Take care. You are a doctor, you know everything.' ('अरे, डॉ. अमित. तुमचा पेशंट अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्याची आणि त्यामुळेच जगण्याची शक्यता जवळपास शून्य, म्हणजे नसल्यासारखीच आहे. काळजी घ्या. तुम्ही तर डॉक्टर आहात, तुम्हाला सगळं माहिती आहेच.')
मला नेमकं हेच ऐकायचं नव्हतं पण डॉक्टर आता बोलून गेले होते. माझ्या चेहऱ्यावरचे आधीच निस्तेज झालेले रंग आता पुरते उडून गेले होते. तिथे धड रडताही येत नव्हते.
नंतर दोन निवासी डॉक्टर (resident doctors) तिथे आले. मी त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले, 'आबांचा बीपी सारखा कमी होतोय. त्यासाठी तीनच औषधे असतात, हे तुम्हाला माहिती आहेच. त्यातले पहिले औषध आम्ही आधीच सर्वोच्च मात्रेत (Maximum dose) चालू केलंय. आता पहाटेपर्यंत वाट पाहू.
प्रयत्न करत राहणे एवढंच आपल्या हातात आहे.
सर्वांचे शर्थीचे प्रयत्न चालू होते; पण नियतीपुढे कोणाचे काही चालणार नव्हते.
माझा चेहरा पडला होता.
तेवढ्यात राजूमामा आत आले.
मी माझा चेहरा शक्य तेवढा सामान्य ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मामाही माझ्याकडे बघून बोलताना क्षणभर अडखळले. पोलिस खात्यात असल्यामुळे माझा चेहरा वाचायला ते चुकले नसावेत. तरीही मी डॉ. राम माझ्याशी काय बोलले हे मामांना सांगितले नाही.
आम्ही वर ११ व्या मजल्यावरच्या 'स्पेशल रुम' मध्ये झोपण्यासाठी आलो. आम्ही आपापल्या झोपण्याच्या जागी गेलो.
खरेतर, आम्ही तिघेही जागेच होतो. मला तर झोप येणे शक्य नव्हते. आणि, राजूमामा बाथरुमला गेले तेवढ्या २ मिनिटांच्या वेळेत मी देशमुख काकांना सत्य परिस्थिती प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सांगून दिली होती. त्यामुळे, तेही जागे राहणे साहजिक होते. अर्धा तास पडूनही झोप येत नाही म्हटल्यावर मी आणि काका उठून बाहेर त्या मजल्यावरील लॉबीमध्ये जाऊन बसलो.
मी काकांना सगळं सांगून टाकलं; पण सांगताना त्यातली तीव्रता बरीच कमी केली; कारण मामांच्या जगण्याबद्दलच्या आशा आमच्या सगळ्यांच्या मनात जागृत राहणं गरजेचं होतं.
मला मात्र त्या लॉबीच्या काचांतून बाहेर पाहताना लांबवर दिसणारा समुद्र त्यावेळी एका मोठ्या काळ्या अपशकुनी छायेसारखा वाटत होता.
खाली मोकळं दिसणारं मैदान अंगावर आल्यासारखं भासत होतं.
आम्ही अर्धा-एक तास आबांच्या उपचारांबद्दल काहीबाही बोलत राहिलो. आम्ही दोघेही एकदम रुममधून बाहेर गेल्याची कुणकुण राजूमामांना तोपर्यंत लागली होती.ते बाहेर येऊन आम्हाला शोधत होते.
मामा आमच्यापर्यंत आले. आम्ही असे अचानक बाहेर येऊन का बसलोय असे त्यांनी विचारले.
आम्ही 'काही विशेष नाही' असं त्यांना सांगितलं.
तिघेही मग आत गेलो. तिघांनाही झोप येणार नव्हती. चिंताग्रस्त होऊन आणि हतबलतेच्या भावनेेने आम्ही थोडावेळ आबांबद्दल, त्यांच्या वैद्यकीय अवस्थेबद्दल, उपचारांबद्दल, उद्या काही आणखीन नवी औषधे देता येतील का या शक्यतांबद्दल बोलत राहिलो. शेवटी, 'उद्या उठल्यावर काय ते ठरवू' असा विचार करून तिघेही झोपी गेलो.
अपेक्षेप्रमाणे मला लवकर जाग आली. उठून तरी काय करणार या भावनेने थोडा वेळ तसाच पडून राहिलो. मग, देवाला नमस्कार करू, काही स्तोत्रं म्हणू असं ठरवून पटकन आवरले. गणपतीस्तोत्र, रामरक्षास्तोत्र, शनिमहात्म्यस्तोत्र अशी पाठ होती ती सगळी स्तोत्रं म्हणून देवाला मामांच्या आरोग्याबद्दल मागणं मागितलं. शक्य ते सगळं करत होतो; पण मनात काडीचाही आत्मविश्वास नव्हता. मामा आणि काका नंतर उठले. त्यांनीही आवरलं.
तो रविवारचा दिवस होता. समोर ठेवलेल्या नाष्ट्याकडे पाहवतही नव्हते. आम्ही कुणीच नाष्टा केला नाही.
मामांनी मला आय. सी. यू. ला जाऊन यायला सांगितले. गेली सतत अडीच महिने राजूमामांनी (तात्या) आबांच्याबरोबर राहून दिवसरात्र न थकता त्यांनी आबांची सेवा केली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि थकवा इतका जास्त होता की, त्यांना त्याआधी कधीही न पाहिलेल्या व्यक्तीनेही त्यांचा तो नेहमीचा 'लूक (look)' नव्हता, हे क्षणार्धात ओळखले असते. आबांसाठी अक्षरशः काहीही करायला ते तयार होते.
राजूतात्या म्हणजे आबारुपी रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मणच जणू!!!
तिकडे आबांच्या अनुपस्थितीत अंजनी-तासगाव-कवठे महांकाळ आणि मतदारसंघ सक्षमपणे सांभाळण्याचे काम धाकटेे भाऊ सुरेशमामा (मान. संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक) यशस्वीपणे करीत होते. गेेल्या ३५ वर्षांच्या सार्वजनिक व राजकीय जीवनात आबांची सलग इतक्या दिवसांची अनुपस्थिती यापूर्वी मतदारसंघाने व जिल्ह्याने कधीही अनुभवली नव्हती. आबांच्या चाहत्यांच्या, पाठीराख्यांच्या, सहकाऱ्यांच्या आणि आप्तेष्टांच्या मनात आबांच्या तब्येतीविषयी असणाऱ्या शंका-कुशंकांचे समाधान न थकता सुरेशमामा पार पाडत होते. आणि, मुंबईपासून लांब अंतरावर असल्याने उलट ते जास्त तणावग्रस्त होते. मात्र तरीही, तासगावकडची आघाडी त्यांनी इतके दिवस अविरतपणे लावून धरली होती.
माझी आई सुमनताई, मावशी रंजनाताई, मधल्या लतामामी आणि धाकट्या सुवर्णामामी आप्तेष्ट आणि नातेवाईक महिलांना धीर देण्याचे काम करत होते.
असो.
मी आत गेलो.
आबांच्या तब्येतीत फार काही सुधारणा होणे अपेक्षित नव्हतेच. तरीही, सर्व निर्देशक (vital parameters) व्यवस्थित आहेत याची खात्री केली.
आबांचा श्वास चालू होता; पण तो कृत्रिम श्वासोच्छवास यंत्राच्या जोरावर. दोन्ही किडन्यांनीही जवळपास काम करायचे थांबविले होते. जे काही काम चालू होते, ते डायलिसिस यंत्राच्या माध्यमातूनच. श्वासोच्छवास, हृदयाची गती, रक्तदाब इत्यादी जीवनावश्यक शारीरक्रियांचे नियंत्रण करणारा लहान मेंदूही दुखापतग्रस्त झाल्याची चिन्हे होती. एकाच वेळी बऱ्याच मोठमोठ्या औषधांचा मारा सहन करून यकृतही थकले होते. कोणत्याही कारणाशिवाय आबांच्या मृत्यूच्या बरेच दिवस आधी यकृताचे काम लक्षणीयरीत्या मंदावले होते. त्याच्याभोवती पोटात पाणीही झाले होते आणि त्या पाण्यात (peritoneal fluid) कर्करोगाच्या (cancer) पेशींचा प्रसार झाला होता.
वरील सर्व गोष्टी सरळसरळ धोक्याच्या सूचना देणाऱ्या होत्या.
आबांना Multi-organ Dysfunction (MODY) (शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांनी काम करणे थांबवणे) झाले होते. अशा अवस्थेतून रुग्ण बाहेर पडण्याची शक्यता एक टक्क्याहूनही कमी असते.
आता आम्हाला अपेक्षा होती ती फक्त चमत्काराची!
दुपारी १२.३० च्या आसपास आजी आबांना बघायला आय. सी. यू. मध्ये गेल्या त्यावेळी मी त्यांच्याबरोबर होतो.
आजींचं ज्ञान, उपजत हुशारी, निरीक्षण क्षमता आणि चिकित्सक वृत्ती अत्युच्च दर्जाची आहे हे त्यांनी पतिनिधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आबांसह यशस्वीरीत्या वाढविलेल्या पाच मुलांच्या उदाहरणावरून दिसून येतेच. आत्ता काही क्षणांत मला परत एकदा त्यांच्या या सर्व गुणांचे दर्शन घडणार होते.
आबांना "वरधाप लागली आहे का?" या त्यांच्या प्रश्नाने माझ्या काळजाचा थरकाप उडाला. मृत्यूपंथावर असणाऱ्या व्यक्तीला वरधाप लागते हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच.
त्यांनी विचारलेल्या पहिल्या अवघड प्रश्नाच्या धक्क्यातून सावरायच्या आधीच, "रावसाबच्या डोळ्यांना पट्ट्या लावून ते का बंद केले आहेत?" हा त्यांचा दुसरा प्रश्न समोर आला होता.
त्यांच्या त्या प्रश्नांवर एकतर त्यांचा 'नातू या नात्याने' मला केवळ रडून प्रतिक्रिया देणे शक्य होते; नाहीतर 'डॉक्टर या नात्याने' मला धडधडीतपणे खोटे बोलावे लागणार होते.
मी पहिला पर्याय निवडू शकत नव्हतो. तो निवडला असता तर आबा जाण्यापूर्वी काही तास आधीच सगळे घर कोसळून पडले असते. 'दुसऱ्याला त्रास होईल असे खरे बोलू नये' या वाक्याचा मी आधार घेतला.
मी धडधडीत खोटे सांगितले की, "मोठे मामा बरे आहेत."
माझ्या त्या उत्तराने मी तात्पुरती वेळ मारून नेली होती.
पण, मामांच्या-आईंसारखी उत्कृष्ट निरीक्षणशक्ती असणारी एक माता माझ्या उत्तरांनी खूप काही समाधानी झाली असेल, असे मी ठामपणे आजही सांगू शकत नाही.
येणाऱ्या आप्तेष्टांशी काहीबाही बोलून ती वेळ मारून नेण्याची वाईट वेळ डॉक्टर म्हणून माझ्यावर आली होती. माझा नाइलाज झाला होता.
संध्याकाळी जेव्हा मी माझ्या पी. एच. सी. मध्ये नाइट ड्यूटीला जाण्याचा विचार करत होतो तेव्हा मामांच्या तब्येतीबद्दल घरातल्या कुणाशीतरी शक्य तितक्या स्पष्टपणे बोलणे मला गरजेचे वाटत होते.
त्यामुळे कदाचित उद्याच्या कटू सत्याचा स्वीकार करणे थोडेफार तरी सुसह्य होईल असे मला वाटले.
मी ही गोष्ट आधी राजूमामांना सांगण्याचा प्रयत्न केला.
मामांच्या तब्येतीबद्दल बऱ्यापैकी स्पष्ट कल्पना मामींना आणि मामांच्या-आईंना देणे आवश्यक होते.
संध्याकाळचे ७-७.३० वाजले असावेत.
मामा मला म्हणाले, "तूच मामींना कल्पना दे."
मला खूप टेन्शन आले होते.
मामींशी एवढ्या स्पष्टपणे बोलणे मला शक्यच नव्हते.
शेवटी आम्ही सर्वजण 'त्या' फ्लॅटवर गेलो.
मी, राजू मामा, स्मिता असे सगळे सोफ्यावर बसलो होतो. मामी चहा बनवायला आत स्वयंपाकघरात गेल्या होत्या.
मी सर्वांसमोरच मामांशी बोललो. "मोठ्या मामांची (आबांची) तब्येत बरीच खालावली आहे आणि अशा अवस्थेतून यशस्वीपणे बाहेर पडणे अतिशय अवघड असते", असे मी राजूमामांशी बोललो. "परिस्थिती खूप अवघड आहे", असेही मी बोलल्याचे मला स्मरते.
उपस्थितांना त्या गोष्टीचे गांभीर्य कितपत समजले असेल याबाबत मी साशंक होतो. राजू मामांना मी हे बोलून दाखवले.
राजू मामांनी मला ही गोष्ट सुरेश मामांच्याही एकदा कानावर घाल असे सांगितले. मी फ्लॅटच्या बाहेर येऊन सुरेश मामांना आणि मामींना याची अप्रत्यक्ष कल्पना दिली. नंतर मी घरी कोल्हापूरला फोन करून ही बातमी आई-पप्पांना सांगितली.
खूप स्पष्ट बोलणे माझ्यासाठी अशक्य होते; पण माझ्या बोलण्यातून प्रत्येकापर्यंत योग्य तो संदेश पोहोचला असावा.
घरच्या माणसांच्या कुठल्याच प्रश्नाचे खरे उत्तर देणे माझ्यासाठी अवघड बनले होते.
अखेरीस, मी रात्री १०-१०.३० च्या आसपास बांद्रा स्टेशनवरून विरारकडे जायला लोकलने निघालो.
प्रश्नांचे काहूर मनात माजले होते.
आपण डॉक्टर असल्याचा पश्चात्ताप मला आयुष्यात पहिल्यांदाच होत होता.
मी मामांच्या बद्दल विचार करत होतो.
आत्ताआत्ताच ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर तासगावच्या जनतेचे सहाव्यांदा निवडून दिल्याबद्दल आभार मानताना आबांच्या डोळ्यांत तरळलेले अश्रू आता माझ्या डोळ्यांत तरळत होते.
मन थोडे पाठीमागे सरकले. आबा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्रानंतर अचानक गायब झाले होते.
३ नोव्हेंबर, २०१४ रोजी आबांनी विधानसभेत घणाघाती व हशांनी भरलेले भाषण केले होते. ६ नोव्हेंबरला गावी आल्यानंतर हेलिकॉप्टरमधून स्वतःचे अंजनी गाव दोनदोनदा फिरून त्यांनी पाहिले होते. दोन दिवस मतदारसंघात राहिल्यावर ८ नोव्हेंबर, २०१४ रोजी "मी काही दिवस विश्रांती घेण्यासाठी दिल्लीला जातोय. कदाचित माझा फोन लागणार नाही. तेव्हा काळजी करू नका", असे आईला (मामांच्या-आईंना) सांगून मोठे मामा घराबाहेर पडले होते.
तत्पूर्वी सलग सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अंजनीतील चावडीसमोर सत्कार स्वीकारताना आबा जे भाषणात बोलले होते, त्याचे संदर्भ कदाचित आत्ता लागत असावेत.
मोठे मामा त्यावेळी भाषणात म्हणाले होते, "अजून किती वेळा तुम्ही माझा सत्कार करणार? तुमच्याच पाठबळावर मी आत्तापर्यंत इतक्यांदा निवडून आलो आहे. आता बस झाले हे सत्कार! हा माझा शेवटचा सत्कार ठरावा."
इतक्या वेळा आपला सत्कार केल्यामुळे गावकऱ्यांना आता या माझ्या सत्कारांचे फार काही अप्रूप नसावे, या अर्थाने खरेतर आबा हे वाक्य बोलले होते. परंतु, नियतीने मात्र वाईट अर्थाने आबांचे हे वाक्य खरे ठरवले.
आबांना त्यावेळी आपल्याला कर्करोग झाला आहे, याची कल्पना होती. मग, नियतीनेच त्यांच्या तोंडून हे उद्गार काढून घेतले असावेत का, अशी आता राहून राहून शंका वाटते.
त्यानंतर सुमारे तीन आठवडे आबा कोणाच्याच संपर्कात नव्हते. आम्ही घरच्यांनी एक आठवडा कसाबसा त्यांच्या संपर्काशिवाय काढल्यानंतर आता आमचाही संयम सुटू लागला होता. आबा कोठेही गेले तरी त्यांचा गडबडीत का असेना, पण एकतरी फोन घरी व्हायचाच. त्यामुळे ८-१० दिवस झाल्यावर आम्हाला जरा विचित्र वाटू लागले होते.
मग मात्र सगळ्यांनी आपापल्या मार्गांनी मोठ्या मामांचा (आबांचा) शोध घ्यायला सुरूवात केली.
मी मुंबईजवळ असल्याने आणि मुंबईतील मोठमोठ्या रुग्णालयांतील डॉक्टर तात्यांच्या ओळखीचे असल्याने आम्हा दोघांना आबांच्याबद्दल काहीतरी बातमी लागेल असे घरी सर्वांना वाटत होते.
आजी आणि मोठ्या मामींनी मला दोन- तीन वेळा तसे फोनही केले होते. सगळे प्रयत्न करूनही कुणाच्याच हाती काहीच बातमी लागत नव्हती. आबा दिल्लीपासून चेन्नईपर्यंत आणि चंदीगढपासून बीजिंगपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी असल्याची माहिती वेगवेगळ्या स्त्राेतांकडून कळत होती. मात्र खात्री होण्याजोगी बातमी कुठूनच येत नव्हती.
अखेरीस, आबांच्या जबड्याचे ऑपरेशन झाल्याची बातमी दै. पुण्यनगरीमध्ये एका चौकटीत छापून आली. पण, नेमके रुग्णालय कोणते याबद्दल त्यातून काही बोध होत नव्हता.
मधल्या काळात सावळजचे आबांचे मित्र डॉ. विष्णू साळुंखे मोठ्या मामांच्या बरोबर असल्याचे मला कुठूनतरी समजले. त्यावेळी मी कोल्हापूरात होतो.
मी त्यांना रात्री ८.३० वाजता फोन केला. त्यांना ठिकाण विचारले असता, त्यांनी 'चंदीगढ' असे सांगितले.
मग मी सरळ मूळ प्रश्नाला हात घातला. मी विचारले, " मोठ्या मामांना नक्की काय झाले आहे? त्यांचे नक्की कशासाठी ऑपरेशन झाले आहे?" त्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नव्हती. पण, ते अनपेक्षितपणे म्हणाले, "अमित, आबाची 'कमांडो सर्जरी' झाली आहे. ऑपरेशन १४ तास चालले आणि आता त्याची तब्येत सुधारत आहे. आता तू मला जास्त प्रश्न विचारू नकोस. कमांडो सर्जरी का करतात, हे तुझ्यासारख्या हुशार डॉक्टरला मी सांगायची गरज नाही. हां, एक काम कर...घरी काही बोलू नको याबद्दल. मला प्रॉमिस कर. घरी कळालं तर आबा मला जोड्यानं मारंल."
मी त्यांना शब्द देताच पुढे जास्त काही न बोलता त्यांनी फोन बंद केला. आता माझा पडलेला चेहरा आईने पाहिला होता. पप्पांनी पाहिला होता. त्या दोघांशी खोटे बोलणे किंवा त्यांच्यापासून काही लपवणे मला शक्य नव्हते.
"आबांना काय झालंय रे?" आईने मला विचारले. पप्पांनीही तोच प्रश्न विचारला.
आता माझी पुरती पंचायत झाली होती. खरे बोलावे तर एक अडचण, न बोलावे तर दुसरी. 'इकडे आड, तिकडे विहीर' अशी माझी तंतोतंत अवस्था झाली होती. मी उत्तरलो, "विशेष काही नाही. एक ऑपरेशन झालंय मामांचं."
मग मात्र आईने सरळच विचारले, "खरं सांग; आबांना कॅन्सर झालाय ना?"
आबांना कर्करोग झाल्याच्या अफवा (दुर्दैवाने तेव्हाच्या अफवा नंतर खऱ्या ठरल्या) त्यावेळी सगळीकडून उठत होत्या; त्यामुळे आईने हा प्रश्न सरळ विचारला होता.
"मी काही सांगू शकत नाही; पण एकूणच आजार मोठा काहीतरी आजार असावा", असे बोलून मी वेळ मारून नेली होती.
आई म्हणाली, "आत्ताच्या आत्ता आवर आणि ऑफिसमध्ये राजू असेल, त्याला जाऊन सगळं सांग."
माझे धाडस होत नव्हते, पण आबांबद्दल घरी कळणे गरजेचे वाटत होते. मी रात्री ९.३० वाजता राजूमामांच्या सिटी ट्रॅफिक ऑफिसला पोहोचलो. मामा पोलिसांची हजेरी घेत होते. तोवर मी थांबलो. मग मामा आत येऊन त्यांच्या खुर्चीवर बसले. दोन कप चहा मागवला. दोन-तीन पोलिसांच्या रजा अर्जावर त्यांनी सही केली असेल.
तेवढे झाल्यावर माझ्याकडे बघितले आणि नेहमीप्रमाणे म्हणाले, "काय काय विशेष, अमित? आबांची काही बातमी?"
मी, "मामा, तुमच्याशी मोठ्या मामांच्याबद्दल महत्त्वाचे बोलायचे आहे."
तिथले काही पोलिस बाहेर गेल्यावर मला म्हणाले, "हं, बोल आता." मी म्हणालो, "माझा डॉ. साळुंखे मामांबरोबर फोन झाला आहे. मोठ्या मामांचे खूप मोठे ऑपरेशन झाले आहे. ऑपरेशनचे नाव मला माहिती आहे. ते ऑपरेशन जीभेच्या किंवा गालाच्या कॅन्सरवरचा उपचार म्हणून करतात. माझे ज्ञान एवढेच आहे. कॅन्सर सोडता अन्य कोणत्या आजारात हे ऑपरेशन करतात असे माझ्या तरी वाचनात कोठेही आलेले नाही. त्यामुळे कॅन्सर असण्याचीच दाट शक्यता आहे."
एका दमात मन मोकळे केले.
दोघांचेही डोळे क्षणार्धात पाणावले.
"बघूया", असे मामांनी म्हटल्यावर आम्ही दोघे रात्री ११ वाजता आपापल्या घरी गेलो.
मी, आई आणि पप्पा रात्रभर झोपू शकलो नाही. मामाही झोपू शकले नसतील.
त्यानंतर रजा काढून राजूमामा तातडीने मुंबईला रवाना झाले. ओळखीच्या लीलावती आणि बॉम्बे हॉस्पिटलमधील मजलेच्या मजले त्यांनी धुंडाळले; पण आबा काही सापडत नव्हते.
शेवटी, कोणत्यातरी स्त्रोताकडून मोठे मामा (आबा) ब्रीच कँडी रुग्णालयात अॅडमिट असल्याचे त्यांना समजल्यावर ते तडक तिकडे पोहोचले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आबा त्या रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर स्पेशल रुममध्ये असल्याचे कळाले.
अशा प्रकारे आबांना राजूमामा पहिल्यांदा जाऊन भेटले त्यावेळी आबा थोडे-थोडे बरे होत होते. कर्करोगतज्ज्ञ डॉ. विक्रम संघवी सरांनी उत्तम ऑपरेशन केले होते. १४ तासांचे एवढे मोठे ऑपरेशन आबांनी हसत-हसत सहन केले होते.
मी ५ डिसेंबर, २०१४ रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये रात्री ११.३० वाजता मोठ्या मामांना भेटलो. मला किंवा घरच्या कुणालाच भेटायला मोठे मामा त्यावेळी तयार नव्हते.
मी 'बरा झाल्यावरच घरच्यांना भेटेन' असं त्यांचं आग्रही म्हणणं होतं. त्यांना तशा अवस्थेत त्यावेळी घरच्या कुणालाही भेटणे योग्य वाटत नव्हते.
"आईला हे काहीही सांगू नका; तिला धक्का बसेल. ती हे सगळं सहन करू शकणार नाही. मी बरा झाल्यावर तिला भेटतो." असे त्यांनी आम्हा दोघांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या इतरांनाही कळकळीने सांगितले होते.
त्यानंतर हळूहळू घरच्या सर्वांना आबांची बातमी कळाली. सगळ्यांनी मुंबईला गेले तरी राहण्याची व्यवस्था होण्याची शक्यता नसल्याने पहिल्यादा फक्त आजी, मोठ्या मामी आणि स्मिता यांनी आबांना भेटायला जायचे ठरले.
ऑपरेशननंतर काही दिवसांनी मोठ्या मामांना रेडिएशन थेरपी आणि इंटरमिटन्ट केमोथेरपी चालू केली होती.
ऑपरेशनची जागा चांगली भरून निघाल्यावर मामांना वसंत डावखरे यांच्या शासकीय निवासस्थानी नेले होते. नानावटी रुग्णालयात आबांना जे रेडिएशन उपचार चालू केले होते, ते ठिकाण डावखरे साहेबांच्या बंगल्यापासून जवळ असल्याने आबांना तिकडे 'शिफ्ट' केले होते.
रेडिएशन उपचार कधीकधी अतिशय भयानक ठरू शकतात. मात्र आबा सगळं शांतपणे सहन करीत होते.
कर्करोगाचे दुखणे प्रचंड मोठे असले तरी आबांचा चेहरा सतत हसतमुख असायचा.
पण, १६ डिसेंबरला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडू नये अशी एक अनपेक्षित घटना घडली.
मला मुंबईवरून डॉ. आनंद पाटील सरांच्या पत्नी सौ. वैशाली पाटील यांचा अचानक फोन आला, "आबांचे हृदय अचानक बंद पडले आहे आणि त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांची तातडीची अँजिओग्राफी करण्यात आली असून पुढील उपचार सुरू आहेत, अशी 'द टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर बातमी आली आहे. हे खरे आहे का?"
मी त्यावेळी कोल्हापूरातील बेलबागेमधील आधार हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये गेलो होतो. हा फोन ठेवताच मी डॉ. साळुंखेंना लगेच फोन लावला असता, "आबांना Cardiac Arrest झाला होता; पण सुदैवाने मी व डॉ. सुनील पाटील (कॅन्सरतज्ज्ञ, सांगली) तिथे हजर असल्याने आम्ही आबांना CPR (Cardio-pulmonary Resuscitation) दिले. आबांच्याबरोबर डॉक्टर असल्याने त्यांचा जीव वाचला होता.
पूर्ण तपासणीअंती आबांच्या हृदयात कोणताही दोष नसल्याचे बॉम्बे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. बी. के. गोयल सर यांनी सांगितले. याचा परिणाम असा झाला की, मोठ्या मामांना (आबांना) येथून पुढे घरी न ठेवता एखाद्या रुग्णालयात ठेवावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
खूप विचार केल्यानंतर आबांनी लीलावतीत रहायचा निर्णय घेतला.
मामा तेथून रोज रेडिएशन घेण्यासाठी नानावटी रुग्णालयात जात असत.
रेडिएशन थेरपीच्या शेवटच्या दिवशी मी, राजूमामा, (आबांचे मामेभाऊ) सचिन पाटील आणि डॉ. साळुंखे आबांच्याबरोबर होतो. त्यादिवशी मला आबांची फाईल बघता आली.
आबांना कॅन्सर आहे, हे मला समजले होते; पण त्यांच्या आजाराची स्टेज तोपर्यंत कळाली नव्हती. एकदा स्टेज कळाली की, कर्करुग्णाचे prognosis (रोगाच्या भविष्यातील वाढीबद्दल) कळणे शक्य होते. मी त्यादिवशी पहिल्यांदा आबांच्या उपचाराची फाईल पाहिली.
वरती Diagnosis लिहिले होते, T4b N2c M1. ही सरळसरळ स्टेज IV B किंवा C होती. यात रुग्ण जास्तीत जास्त ५-६ महिने जगू शकतो, हे मला माहिती होते.
एवढा मोठा धक्का मला यापूर्वी कधीच बसला नव्हता. आबा आता जास्त काळ आपल्यात राहणार नाहीत, या शक्यतेनेच अंगातले सगळे बळ गळून पडले.
मी प्रचंड निराश झालो होतो. नैराश्य येईल इतका तणाव वाढला होता. काही बोलावे किंवा करावे वाटत नव्हते... आता, केवळ चमत्कारच आबांना वाचवू शकणार होता. प्रयत्न करण्यापलीकडे फार काही डॉक्टरांच्याही हातात राहिले नव्हते.
मध्ये दोन- तीन दिवस गेले.
दरम्यानच्या काळात मी शल्यचिकित्सा (Surgery) शास्त्राची काही वरच्या दर्जाची (higher level) पुस्तके वाचली होती.
त्यात अशा शेवटच्या स्टेजच्या कर्करोगात ५ वर्षांनंतरही रुग्ण जिवंत राहण्याचे प्रमाण (5 year survival rate) केवळ १५-२०% असल्याचे वाचनात आले.
झाले...मनाने परत उभारी घेतली. ५% शक्यता असली तरी आपण मरणाऱ्या ९५% रुग्णांत की जगणाऱ्या ५% रुग्णांत हे डॉक्टरी प्रयत्नांबरोबरच नशीबावरही अवलंबून असू शकते, असे वाटू लागले. परत, नवीन जोमाने आपण सगळे उभारू शकू असा विश्वास निर्माण झाला.
पण, या विश्वासाला वारंवार तडे जात होते. रेडिएशन थेरपी संपल्यानंतर पसरणारा कर्करोग ताब्यात ठेवता येईल या अपेक्षेवर मोठ्या मामांना रेडिएशन थेरपीचे शक्य तितके जास्तीत जास्त डोस देण्यात आले होते. हा डोस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पेट स्कॅन (PET Scan) करून आजार पसरला आहे का याची तपासणी केली जाणार होती.
ही तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अहवाल (Medical Report) चांगला येण्याची अपेक्षा होती. परंतु, हा अहवाल अत्यंत नकारात्मक व निराश करणारा आला. रेडिएशनचा सर्वोच्च डोस देऊनही कर्करोग पसरला होता. मानेतील दोन्ही बाजूंच्या लसिकाग्रंथींना (Lymph nodes) कर्करोगाची लागण झाली होती. इतक्या निराशा करणाऱ्या गोष्टी एकामागून एक उसंत न घेता घडत असल्याने आता तर धक्काही बसत नव्हता.
तरीही त्यानंतरचे काही दिवस आबा धरून थोडेफार चालायचे तरी. नंतर मात्र काही दिवसांनी आबांच्या फुप्फुसाला जंतुसंसर्ग झाला. मोठ्या मामांच्या श्वासाच्या गतीत फरक पडला आहे, हे मामांच्या-आईंनी (आजी) केवळ निरीक्षणाने डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले होते.
मामांना अतिदक्षता विभागात ठेवण्याचा निर्णय तज्ज्ञांनी घेतला. नंतरच्या सी. टी. स्कॅनमध्ये फार चांगले रिपोर्ट्स आले नाहीत. कर्करोगाचा संसर्ग मणक्याच्या हाडांपर्यंत झाला होता. आजार हळूहळू बळावत चालला होता.
फुप्फुसात कफ तयार झाला होता आणि त्याचा आबांना खूप जास्त त्रास व्हायचा. त्यावेळी दर एक-दीड तासांनी राजूमामा स्वतः अतिदक्षता विभागात जाऊन आबांचा कफ काढायचे. दोन्हीही मामा रात्रभर जागे असायचे.
कार्यकर्त्यांचेही प्रेम अलोट होते. काशीतील गंगेच्या पाण्यापासून ते मक्केतील झमझम आणायलाही हितचिंतक मागेपुढे पहायचे नाहीत. गावीच नव्हे तर महाराष्ट्रभर आबांसाठी होमहवन, यज्ञयाग आणि मृत्यूंजय मंत्राचे पठण चालू असायचे. आमचे मनोबल वाढविणाऱ्या या गोष्टी असायच्या. अध्येमध्ये फेसबुक, वॉट्सअॅपवर आबा गेल्याच्या बातम्याही यायच्या. खचून जायला व्हायचे.
एकमेकांना सुविचार आणि प्रोत्साहनपर वचने पाठवून आम्ही मनोबल वाढविण्याचा अटोकाट प्रयत्न करायचो. रात्री कधीतरी मनी नैराश्य यायचे.
पण, शेवटपर्यंत लढायचा निर्णय आबांनी आणि आम्ही जवळच्या सर्व नातेवाईकांनी घेतला होता...Fight unto last...
हतबलपणे उपचार न करता किंवा ते टाळून मृत्यूची वाट बघण्यापेक्षा जास्तीत जास्त उपचार करूनसुद्धा जर मृत्यू आला तर तो स्वीकारावा अशी आमची भावना झाली होती. पळून जाऊन मरण्यापेक्षा लढून आलेला मृत्यू कधीही चांगला अशी मनाला समजच दिली होती.
ठिकठिकाणांहून होमियोपॅथीपासून ते आयुर्वेदिक उपचार करण्याची आमची तयारी होती. डॉक्टर परवानगी देतील असे सर्व प्रकारचे उपचार आम्ही करत होतो.
हे सगळे करत असताना मोठ्या मामांना full-fledged (पूर्ण स्वरुपाची) केमोथेरपी द्यावी की नको असा यक्षप्रश्न डॉक्टरांनी आमच्यासमोर उभा केला. आबांना हे उपचार सहन होतील की नाही, याबद्दल डॉक्टर साशंक होते. त्यांच्या मते फार काही फायदा होणे शक्य नव्हते.
आम्ही परत लढायचा निर्णय घेतला. भारतातील केमोथेरपीचे जनक मानले जाणारे परंतु वैद्यकीय क्षेत्रातून निवृत्त झालेले डॉ. अडवाणी सर यांना आम्ही आबांचे उपचार करण्याची विनंती केली. निवृत्त झाल्यानंतर डॉ. अडवाणी कोणावरही उपचार करावयास येत नाहीत, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. पण, 'लढायचे तर सर्वोत्कृष्ट शस्त्रांनिशीच' असे आम्हीही ठरवले होते.
केवळ आणि केवळ आबांच्यावरील प्रेमापोटी डॉ. अडवाणी सर आबांवर उपचार करायला तयार झाले होते.
आणखी एक खबरदारी म्हणून अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील Memorial Sloan Kettering Cancer Centre च्या डॉ. अशोक शहा आणि तेथील कर्करोगतज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला. त्यांनी पाठविलेल्या एका इ-मेलमध्ये Mr. Patil's condition is bleak (श्रीयुत पाटील यांची तब्येत अत्यंत नाजूक अाहे) असे स्पष्टपणे लिहिले होते. आबांसाठी त्यात काही औषधांचा सल्लाही देण्यात आला होता. तसेच, फेब्रुवारी २०१५ च्या अखेरपर्यंत आबा व्यवस्थित राहिले तर, त्यांच्यावर अमेरिकेला आणून प्रायोगिक स्तरावरील सर्वोच्च उपचार करता येतील असे एक आशावादी विधानही केले होते. तो एकच धागा माझ्या मनाने पकडला होता.
आबांच्यावर केमोथेरपी करून त्यांना वाचविण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न काहीही झाले तरी करायचे असे ठरविले गेले. पहिली केमोथेरपी पार पडली होती. केमोचा सर्वांत वाईट परिणाम म्हणजे शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या धोकादायक पातळीपर्यंत खाली येणे (Neutropenia). केमो सुरू केल्यानंतर आबांच्या रक्तातील पेशींची (cell count/ haemogram), यकृत आणि किडनीला होणाऱ्या दुखापतीसाठींच्या संप्रेरकांची (liver and renal enzymes) तपासणी रोज करणे गरजेचे होते. त्याच दरम्यान एका सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञांनी पांढऱ्या पेशींच्या वाढीसाठीची आयुर्वेदिक औषधे आबांना द्यायला सुरू केले होते.
मोठ्या मामांच्या तब्येतीनेही चांगली साथ दिली होती. पहिला वैद्यकीय अहवाल चांगला आला होता. आमचे मानसिक बळ वाढले होते. केमोची प्रत्येक सायकल झाल्यावर येणाऱ्या रिपोर्टनुसार उपचार चालू ठेवायचे की नाही याची दिशा डॉक्टरांना मिळणार होती. आबांचे वैद्यकीय अहवाल अपेक्षेइतके खराब येत नसल्याने केमोथेरपीची एक-एक सायकल दिली जात होती. आमचा उत्साह कमालीचा वाढला होता. मोठ्या मामांसाठी एकूण १२ सायकल्स प्रस्तावित केल्या गेल्या होत्या. पहिल्या ३ सायकल कोणत्याही दुष्परिणामाशिवाय यशस्वीपणे पार पडल्याने संयम ठेवला आणि आबांच्या प्रकृतीने अशीच साथ दिली तर केमोच्या १२ सायकल्सही हळूहळू पूर्ण करून आबांना बरे करता येईल अशी आशा वाटू लागली होती.
याच अवस्थेत मामांना केमोची चौथी सायकल देण्यात आली. तो दिवस व्यवस्थित गेला. मागच्याप्रमाणेच याही वेळी चांगले रिपोर्ट्स येतील असा विश्वास वाटत होता. पण... हा 'पण'च बऱ्याचदा घोळ घालतो.
आत्ताचे मामांचे रिपोर्ट्स चांगले म्हणावे असे काही अाले नव्हते. खूप वाईटही नव्हते; पण काळजी वाढविणारे नक्की होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे रिपोर्ट्स आणखीन खराब आले. आमचा उत्साह मावळला. काळ्याकुट्ट ढगांच्या आड दिसणारी सोनेरी किनार हळूहळू अदृश्य होऊ लागल्याचे जाणवत होते. परत एकदा आम्ही हतबल झालो.
आबांच्या यकृताभोवतीच्या पाण्यातही (peritoneal fluid) कर्करोग पसरला होता.
ऑपरेशननंतर आणि आय. सी. यू. मध्येही मोठ्या मामांना नळीद्वारे (Nasogastric tube) अन्न आणि औषधे दिली जात होती. आता तर आबांना पाणीही देता येत नव्हते.
मधल्या काळात फुप्फुसांना संसर्ग झाल्याने आणि श्वासनलिका रेडिएशनमुळे अत्यंत कठीण (stone hard) झाल्यामुळे आबांच्या श्वासनलिकेला ऑपरेशन करून छिद्र (tracheostomy) पाडले गेले होते. व्हेंटिलेटरची नळी आता त्याच मार्गाने घातली गेली होती. घसा, रक्तवाहिन्या, मूत्रनलिका अशा सर्व ठिकाणी कृत्रिम मार्गांचा वापर केला गेला होता.
अशा अवस्थेत मामांना बघणे कठीणतम झाले होते. त्यातच त्यांच्या उजव्या हातालाही सूज (Lymphatic stasis) आली होती. दुसऱ्या हातात I. V. Line (सलाइन) असल्याने दोन्ही हात हलवता येत नव्हते. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, मोठ्या मामांचा घसा कोरडा पडल्यावर त्यांना पाणी हवे असेल तर ते डोळ्याकडे बोट करायचे. आधी एक दिवस आम्हाला याचा अर्थ लागला नाही. मात्र, नंतर राजूमामांच्या लक्षात आले की, आबा डोळ्यांतील पाणी दाखवून प्यायला पाणी मागायचे. ज्यांच्या एका इशाऱ्यावर अवघ्या काही आठवड्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्र हलायचा, त्यांची क्रूर देवाने ही अवस्था केली होती. गोरगरीब आणि पददलितांसाठी आबांनी केलेल्या कामाची पुण्याई काही केल्या त्यांच्या पदरात पडत नव्हती. शेवटच्या आठवड्यात तर किडनीनेही धीर सोडला. तिचे काम कमालीचे मंदावले. आबांना डायलिसिसची गरज पडली. केमोथेरपी आणि कॅन्सर हे शब्द आता मागे पडून पांढऱ्या पेशींची संख्या, प्लेटलेट्स, संप्रेरके, आयुर्वेदिक-होमियोपॅथी उपचार, इन्फेक्शन, न्यूमोनिया, डायलिसिस, व्हेंटिलेटर हे शब्द साथीला आले होते. आबा सुमारे दीड महिना लीलावती रुग्णालयात अॅडमिट होते. आय. सी. यू. मध्ये दीर्घकाळ राहिलेल्या रुग्णाला काळ-वेळ आणि दिवस समजणे शक्य नसते. पण, आबांसारखी तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीच्या लक्षात तारखा व्यवस्थित राहिलेल्या असायच्या. आमच्याकडून अधूनमधून ते तारखांबाबत खात्री करून घ्यायचे.
तो दिवस मला अजूनही नीट आठवतो... दि. १० फेब्रुवारी, २०१५. मी आणि राजूमामा सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोठ्या मामांच्या बेडजवळ जाऊन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारत होतो. त्यादरम्यान, आम्ही त्यादिवशी लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निकालाबाबत आबांना माहिती दिली. 'आप'ने ७० पैकी ६६ जागा जिंकल्या असून केवळ ३ जागा पदरात पडलेल्या भाजपची पुरती दाणादाण उडाली आहे, हे एेकताच आबांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरले. आबांनी ऐकलेली आणि प्रतिक्रिया दिलेली ही शेवटची राजकीय बातमी ठरली.
आठवणींचा हा मोठा पट माझ्या डोळ्यांसमोरून झऱकन सरकत होता.
पण, आता या क्षणी मनी केवळ आणि केवळ निराशाच होती. अशा टोकाच्या निराशेच्या वातावरणात मी रात्री ११.३०-१२.०० च्या सुमारास महत्त्वाच्या कामासाठी पी. एच. सी.त पोहोचलो होतो. वर अगदी सुरुवातील वर्णन केल्याप्रमाणे मी दुपारी २.३० वाजता लीलावती रुग्णालयात पोहोचून आबांच्या जवळ गेलो होतो. त्यानंतर दुपारी ३.०० वाजेपर्यंत मोठ्या मामांचे Vitals स्थिर (stable) होते. नंतरच्या अर्ध्या तासात मात्र मॉनिटरचा सिग्नल वाजायला सुरू झाले होते. हृदयाची गती ७८ वरून ५२ वर आणि रक्तदाब १००/६० वरून ८५/५० पर्यंत खाली आला होता. ही घसरण तशीच चालू राहिली. बरोबर ४.०० वाजता रक्तदाब ६०/४० पर्यंत तर नाडीचा वेग ४० पर्यंत घसरला होता. ही सरळसरळ Shock ची अवस्था होती.
पावणे चार वाजता राजूमामाही आत आले होते. हळूहळू एक-एक पी. ए. आत आले. राजूमामांना आबांची ती अवस्था बघवत नसल्याने अतिदक्षता विभागातील एका विशेष खोलीत त्यांना आणि सर्व पी. ए.ना डॉ. वास सर (अतिदक्षता विभागाचे इन-चार्ज डॉक्टर) यांनी बसवले. मी आणि सुप्रिया ताई (सुळे) आबांच्या बेडजवळ उभे होतो.
हृदयाची गती कमालीची मंदावल्याने दोन रेसिडेंट डॉक्टरांनी डॉ. वास सरांच्या देखरेखीखाली आबांना CPR द्यायला सुरू केले. ते पाहणे राजूमामांना सहन झाले नाही.
"माझ्या आबांच्या फासळ्यांना दुखापत होईल हो", असे मामा अक्षरशः रडत म्हणाले. डॉक्टरांनी त्यांना परत आत बसविले.
एवढे प्रयत्न करूनही आबांच्या हृदयाची गती आणि रक्तदाब काही सुधारत नव्हता.
बरोबर संध्याकाळी ४ वा. १० मि.नी डॉ. वास सर राजूमामांच्या खांद्यांवर हात ठेवून त्यांना म्हणाले, "तात्या, अब दस मिनट में सब खतम हो जाएगा!"
राजूमामांनी अत्यंत कळकळीने त्यांना विचारले, "डॉक्टर, आता माझ्या आबांना कशानेच वाचवता येणार नाही का? काहीही करा, पण त्यांना वाचवा."
माझ्याकडे फिरून रडत मला म्हणाले, "अमित, तू तरी सांग रे. आता काहीच करू शकत नाही का आपण?"
माझे उत्तर अर्थातच नकारार्थी होते.
मी परत बाहेर आलो.
CPR देणे आता डॉक्टरांनी बंद केले होते. आबांची प्राणज्योत मालवली होती. आणि तेवढ्यात...सुप्रियाताई हळू आवाजात ओरडल्या, "Look Doctor...He's breathing...He's breathing..!" ते आता शक्य नव्हते हे त्याही जाणून होत्या; पण व्हेंटिलेटरमुळे आबांची छाती थोडी हलली होती आणि ताईंनी नेमक्या त्याच क्षणी तिकडे पाहिले होते. "It's due to ventilation, Madam.." डॉक्टर म्हणाले..!
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी बरोबर ४ वा. २० मि.नी मॉनिटरने माझ्या मोठ्या मामांचा रक्तदाब १०/०० आणि हृदयगती ० दाखवली...
मी बाहेर आल्यावर आई-पप्पांना मोठ्या मामांच्या निधनाची बातमी सांगितली. त्यानंतर, मी अमेरिकेत असणाऱ्या उदयला (माझा धाकटा भाऊ) वॉट्सअॅपवरून तशा अर्थाचा एक संदेश पाठवला. 'Mothe Mama is no more. He breathed his last at 4:20 pm today.' माझा मेसेज पोहोचताच उदयचा मला लगेच फोन आला. तो खूप जोरात रडत होता. आम्ही कोणीच एकमेकांना सावरण्याच्या स्थितीत नव्हतो. उदयची त्याच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अमेरिकेला जाण्यासाठी कंपनीकडून निवड झाली आहे, ही बातमी मोठ्या मामांना जेव्हा समजली होती तेव्हा मामांना त्याच्याबद्दल खूप कौतुक आणि अप्रूप वाटले होते. उदय जाण्यापूर्वी त्याची आणि मोठ्या मामांची झालेली शेवटची भेट अल्पकाळाची ठरली होती. तो तिकडे गेल्यानंतर त्याने मामांना पहिल्यांदा फोन केला त्यावेळी "मामा, तुम्ही इकडे थोडे दिवस या", असे तो बोलला. तेव्हा, "अरे, मी कसला तिकडे येतोय?" असे मामा त्याला म्हणाले. मामांचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाल्यावर उदय त्यांच्याशी बोलला होता. "मामा, बरे झाल्यावर तुम्ही इकडे काही दिवस विश्रांतीसाठी या", असे त्यांना सांगितल्यावर आबा फक्त "बघू" एवढंच म्हणाले. उदयचे आणि मोठ्या मामांचे ते शेवटचेच संभाषण ठरले, याची उदयला आजही खंत वाटते. वैशिष्ट्य म्हणजे, मामांचे ऑपरेशन झाल्यानंतर मामा एकदा त्याच्या स्वप्नात आले होते आणि स्वतः बरे असल्याचे ते बोलले होते. मामांना न्यूयॉर्कच्या स्लोअन केटरिंग मेमोरियल हॉस्पिटलला नेता येईल का याची चाचपणी केली असता असता, ते रुग्णालय उदय राहतो त्या ठिकाणापासून (क्लीव्हलँड, ओहायो स्टेट) केवळ ८ तासांच्या 'ड्राइव्ह'वर असल्याची माहिती उदयने दिली होती. दुर्दैवाने मामांच्या अत्यंत नाजूक तब्येतीमुळे त्यांना तिकडे नेता आले नाही. विमानातून येताना उदयला या गोष्टीबाबतही पश्चात्ताप वाटला होता. मोठे मामा वारले नसतीलच असे त्याला राहून राहून वाटत होते. दुर्दैवाने, त्याच्या वाटण्यात आणि सत्यात टोकाचा विरोधाभास होता. आबा इहलोकीचा प्रवास संपवून कधीच दूर निघून गेले होते.
श्वासही धड नीटपणे घेऊ न देण्याइतपत 'गर्दी' करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना अखेरीस त्यांना 'अपेक्षित' अशी एक 'ब्रेकिंग न्यूज' मिळाली होती.
आपला मुलगा (आणि, तोही आबांच्याइतका कर्तृत्ववान) आपल्याला सोडून गेल्याची बातमी "आबाची-आई" १६ फेब्रुवारी, २०१५ पासून आजतागायत पचवू शकली नाही. त्यांना सावरणे हे केवळ आबाच करू जाणे! आता ते गेल्यावर त्या सावरण्याची अपेक्षा करणेही किती निरर्थक!!!
सर्वांचा लाडका 'रावसाब' नसल्याचे दुःख त्या कधीच विसरू शकणार नाहीत. आभाळच फाटल्यावर ढिगळ तरी कुठे लावणार म्हणा!
जगातील सर्वांत चांगले आणि सर्वांत वाईट नशीब देवाने त्यांच्या भाळी लिहून त्यांच्यावर जो अन्याय केलाय, तो साक्षात 'तो'ही निवारू शकत नाही!!!
मामींची अवस्था याहून वेगळी नाही आणि त्यांच्या मुलांचीही. मामी आमदार झाल्या आहेत; पण पतिनिधनाचे दुःख पचवून पुन्हा आपल्या घरासाठी खंबीरपणे उभे राहणे हे केवळ कर्मकठीण काम आहे!
आबांसारखा 'बाप माणूस' आपला 'बाप' होता, या दुःखात मोठ्या मामांच्या मुलांना वाटचाल करून कर्तृत्व गाजवावे लागेल.
आबा गेल्याच्या दुःखातून कोणीच सावरणे शक्य नाही; आम्ही तर घरची माणसं.
राम-लक्ष्मण-भरत या भावंडांतील 'राम'च निघून गेलाय, आता 'रामराज्य' करायचे तरी कुणासाठी आणि कशासाठी?
आबांच्या 'अंगाखांद्यावर अक्षरशः प्रत्यक्ष खेळण्याचे भाग्य लाभलेले' मी आणि माझा भाऊ उदय हे दोघेच.
आमच्या बौद्धिक कर्तृत्वाला त्यांनी नेहमीच खतपाणी घातले. मोठ्या मामांनी आमचे जेवढे लाड केले असतील तेवढे त्यांनी इतर कोणाचेही क्वचितच केले असतील.
स्मिता, सुप्रिया आणि रोहित भविष्यात कदाचित आबांचा वारसा पुढे नेतीलही; पण 'ते आबा' पुन्हा होणे नाही!!!
मीडियाला ब्रेकिंग न्यूज मिळाली होती; मात्र तिकडे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रभावाच्या कवेत घेणारे एक वादळ अगदी शांतपणे विसावले होते.
आपल्या बुद्धी आणि कर्तृत्वाच्या तेजाने लखलखणारा हा आबारुपी सूर्य अस्ताला गेला होता.
मोठे मामा (आबा) इहलोकीचा प्रवास संपवून जाताना घरातील केवळ मी एकटा त्यांच्याजवळ समोर उभा होतो. माझे इतर सर्व नातेवाईक मोठ्या मामांच्यापासून दूर होते.
मामांच्या अंतिम क्षणी मी त्यांच्याजवळ होतो, यामुळे मी 'नशीबवान' ठरतो की एवढ्या 'मोठ्या माणसाचा' मृत्यू होताना ते दृश्य मला हतबलपणे पहावे लागले, म्हणून मी 'बदनशिबी' ठरतो; हे मला माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच ठरविता येणे शक्य होणार नाही.
आर. आर. आबांच्या स्वभावाची व दिलदारपणाची उंची गाठणे आणि संवेदनशील पण कणखर मनाची खोली गाठणे यापुढे कोणालाच शक्य होणार नाही.
राजकारणातला संत आणि संतांमधील राजकारणी अशा दोन्ही बिरुदावल्या मिळविणारा आबांच्यासारखा दुसरा नेता होणे नाही!!!
मोठे मामा,
तुमच्या असीम कर्तृत्वापुढे सदा नतमस्तक...तुमचे लाडके भाचे डॉ. अमित आणि उदय..!
"We will always miss you, Mothe Mama."
(© डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.)
(© या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या लेखी परवानगीशिवाय या लेखाचे कोणत्याही माध्यमाद्वारे पुनःप्रसरण किंवा पुनर्मुदण करता येणार नाही. असे करणे हा दंडनीय अपराध ठरतो.)

(मान. आबासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत लेखक त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष उपस्थित होते. लेखातील सर्व घटनांचे लेखक प्रत्यक्ष साक्षीदार आहेत.)

आबांचि उणीव आज संपूर्ण महाराष्ट्राला जाणवतेय.... विशेषकरुन त्या शेतकरयाला, त्या रंजल्या- गांजलेल्या ला, त्या पददलिताना आणि त्या कष्टकरयाला ज्यांच्या आयुष्यात अबांच्या जाण्याने कधीही न भरून निघनारी पोकळी निर्माण झाली आहे..............
ReplyDeleteज्या 'सर्वानी' 'आपला' माणूस गमवालाय त्यांच्या दुःखाचि खोली जरी कळाली नाही तरी आपल्या लिखाणाने त्यातील दाहकता आमच्या प्रत्ययास आली.....
अबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी झटुयात एवढेच मी या प्रसंगी बोलू शकतो।
(हर्षवर्धन)
होय हर्षवर्धन, तुमचे म्हणणे खरे आहे! आबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र व भारत घडवणे एवढी एक गोष्ट आपण करू शकतो.
ReplyDeleteपाणवलेल्या डोळ्यांन मध्ये तूम्हाला आबा सामावून घ्यायचंय,
ReplyDeleteऐकदाच आबा तूमच्या पायला मिठी मारून मला रडायचय...
त्या गर्दीत,लोकांच्या गराड्यात तूम्हाला लांबूनच पून्हा पहायचंय,
खरच आबा ऐकदा तूमच्या पायाला मिठी मारून मला रडायचंय...
आबा तूमची वाट गोरगरीब जनता कासावीस होऊन आजूनही पहात आहे,
किती ही आडवले सावरले स्वत:ला तरी सर्वांच्या डोळ्यातून आजूनही पाणी वहात आहे...
माझा देव आज ही माझ्या जवळच आहे हे ओरडून सार्या जगाला मला सांगायचंय,
तूम्ही या आबा परत तूमच्या पायाला घट्ट मिठी मारून मला रडायचंय....
अभिजीत माळी नगरसेवक तासगांव
Thank you Abhijeet Saheb
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteहृदय स्पर्शी
ReplyDeleteहो, सर
ReplyDeleteNo Words ....... Heart-Touching ..... we will Miss You AABA .... RIP :-(
ReplyDelete