‘गोरखगड, मलंगगड, गंभीरगड’: विस्मयकारक आणि जीवघेण्या अनुभवांनी भरलेले तीन ट्रेक्स! ( 'Coming across astonishingly unbelievable and life threatening treks to Gorakhgad, Malanggad and Gambhirgad!’)


‘गोरखगड, मलंगगड, गंभीरगड’: विस्मयकारक आणि जीवघेण्या अनुभवांनी भरलेले तीन ट्रेक्स! ( 'Coming across astonishingly unbelievable and life threatening treks to Gorakhgad, Malanggad and Gambhirgad!’)


जाॅन मुइरने (John Muir) एके ठिकाणी असे म्हटले आहे की, "One day's exposure to mountains is better than a cartload of books. (एखाद्या पर्वताला एके दिवशी अनुभवणे हे गाडीभर पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ ठरते.)"  मुइरचे हे वाक्य मी गेली एक-दीड वर्षे अनुभवतोय. त्यापूर्वीही मी तुरळक प्रमाणात दुर्गभ्रमंती केली होती; पण गेल्या ४ महिन्यांत मात्र माझ्यात अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. जानेवारीपासून मे महिन्याच्या एकदम सुरुवातीच्या दोन दिवसांपर्यंत मी एकूण १५ ट्रेक्स करून १८ गड-किल्ले 'अनुभवले' आहेत. महाराष्ट्र हा गड-किल्ल्यांचा आणि कणखर दगड-धोंड्यांचा प्रदेश आहे. तसे तर किल्ले राजस्थानमध्ये आणि अन्यत्रही आहेत; पण महाराष्ट्रात युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले हे आपले आणि महाराष्ट्राचे भाग्यच! महाराजांच्या मृत्यूसमयी स्वराज्यात ४३२ किल्ले असल्याची नोंद मराठीत छत्रपतींचे पहिले चरित्र लिहिणाऱ्या कृ. अ. केळुस्कर यांनी करून ठेवली आहे. इ. स. च्या १७ व्या शतकात 'शिवाजी नामक एका महान राज्यकर्त्याने' या महाराष्ट्राला एवढे समृद्ध करून ठेवले होते ही खचितच अभिमानाची गोष्ट आहे. त्याच राज्याचा वारसा सांभाळत आजही 'महाराजांचे गडरूपी शिलेदार' ताठ मानेने उभे आहेत. आपल्याला महाराजांना प्रत्यक्ष जरी पाहता आले नसले तरी त्यांच्या पदस्पर्शाने किंवा विचारस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गांची भ्रमंती करून आपण महाराजांचे दर्शन घेऊ शकतो अशी माझी स्वतःची भावना आहे. महाराजांचे गड-किल्ले फिरताना आपल्यात जे स्फुरण चढते, ते केवळ अतुलनीय असेच आहे!

दुर्गभ्रमंती (trekking) हा केवळ छंद नाही; यशस्वी, तणावमुक्त आणि अभिमानयुक्त जीवन जगण्याची ती एक कला आहे! ती एकाच वेळी कलाही आहे आणि ते शास्त्रही आहे!! जे दुर्गभ्रमंती करतात ते याचे महत्त्व जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. 'Mountains are calling and I must go (पर्वत खुणावत आहेत आणि मला गेलेच पाहिजे)' असा विचार करून मी दुर्गभ्रमंतीसाठी निघतो. पालघर जिल्ह्यातील कोहोज किल्ल्यावर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहिल्यांदा गेल्यापासून पालघर, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील बरेच गडकिल्ले मी पालथे घातले आहेत. या दुर्गभ्रमंतीसाठी गडकिल्ल्यांची निवड करताना मी शक्यतो अशी ठिकाणे निवडतो, ज्या ठिकाणी खूप कमी लोक जातात किंवा जी ठिकाणे जास्त प्रसिद्ध नाहीत. त्यामुळे होते काय की, अशा ठिकाणी ट्रेकर्सची गर्दी कमी असते आणि अवघड प्रसंगी मदत मिळण्याची शक्यता कमीत कमी असते!
माझ्या या ब्लॉगमधून मी अशा तीन घटना सांगणार आहे, ज्या गेल्या तीन ट्रेकमध्ये माझ्यासोबत घडल्या आहेत; ज्या अत्यंत अनपेक्षित होत्या आणि जीवावर बेतणाऱ्या ठरल्या आहेत. या तिन्ही प्रसंगी,तिन्ही गडांवर “Fill your life with experiences, not with things. Have stories to tell, not stuff to show. (तुमचे आयुष्य ऐहिक सुखे देणाऱ्या गोष्टींनी नव्हे तर अनुभवांनी भरून जाऊ द्या. तुमच्याकडे इतरांना दाखवायला वस्तू नव्हे तर, सांगता येणाऱ्या सत्यकथा असू द्यात.)”, हे तत्त्व मी (आणि माझा साथीदार) अक्षरशः जगलो आहे. तीनही प्रसंग जीवावर बेतले असले आणि त्या-त्या क्षणी थोड्या वेळासाठी का होईना आम्ही घाबरलो किंवा गोंधळलो असलो तरी, आम्ही दुर्गभ्रमंती करणे त्यागणार नाही...उलट, या प्रत्येक प्रसंगानंतर नवनवीन आणि कमी माहिती असलेल्या गडकिल्ल्यांवर ट्रेकिंग करण्याचा आमचा निश्चय आणखीनच दृढ झालाय.

I have an insane calling to be where I'm not. (ज्याठिकाणी मी अद्यापि गेलो नाही, त्याठिकाणी जाण्याचा वेडसरपणा मला खुणावत आहे.)... चला तर मग, शब्दानुभवूया ते कठीण प्रसंग..!


हे तिन्ही प्रसंग यावर्षीच्या, म्हणजे २०१७ सालच्या भर उन्हाळ्यात दि. १४/०४/२०१७ ते ०१/०५/२०१७ च्या दरम्यान केलेल्या सलग तीन दुर्गभ्रमंतीदरम्यान घडले आहेत. या ट्रेकदरम्यान माझ्या खांद्यावरील पिशवीत (sack) ६ लीटर पाणी, औषधे, मोबाईल, त्यांचे चार्जर्स, पॉवरबँक, कॅमेरा आणि त्याचा चार्जर, एक जादाचा टी-शर्ट, एक नॅपकिन, एक टॉवेल, ओडोमॉस, विजेरी (torch), खायचे पदार्थ, टँग (energy drink), ओआरएस (ORS), आगपेटी, मेणबत्त्या, डासांची अगरबत्ती इतके किमान साहित्य होते (नेहमीच असते); ज्याचे एकत्रित वजन सुमारे १० ते १२ किलोग्रॅमपर्यंत असते!


पहिला जीवघेणा प्रसंग-

दि. २६/०३/२०१७ रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाडजवळील 'सिद्धगडा'ची भ्रमंती करतानाच त्या गडाच्या ईशान्येला दिमाखात उभा असलेला 'गोरखगड' लक्ष वेधून घेत होता. त्यामुळे पुढची दुर्गभ्रमंती गोरखगडावरच करायची हे जवळपास निश्चित झाले होते.

अखेरीस, दि. १४/०४/२०१७ या दिवशी मी आणि माझ्या साथीदाराने गोरखगडाकडे (छायाचित्र १.१) कूच केले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी ६ वाजता ट्रेक सुरू करण्याकडे आमचा कल असतो. (ट्रेकिंगला बऱ्याचदा मी एकटा किंवा जास्तीत जास्त दोघे असतो. काही दुर्गभ्रमंतीमध्ये मला माझे सहकारी श्री. हरिश्चंद्र कृष्णा हरड, आरोग्य सेवक यांची इतकी मोलाची साथ लाभली आहे की मला त्या भावना शब्दांत व्यक्त करता येणे शक्य नाही.) काही कारणामुळे आम्ही त्यादिवशी थोडे उशिरा म्हणजे सकाळी ८.३० वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. या गडाच्या चढाईचे दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा मध्यम दर्जाच्या काठिण्यपातळीचा (Grade- Medium) तर, दुसरा टप्पा अवघड (Grade- Difficult) आहे. पहिला टप्पा म्हणजे, जेथे श्री गोरक्षनाथांचे बसण्याचे पाट ठेवण्यात आले आहेत, तो (छायाचित्र १.२). येथपर्यंतचा मार्ग उंचसखल कमीजास्त चढ-उतारांनी भरलेला आणि दाट जंगलातून जाणारा आहे. त्यानंतर कठीण असा दुसरा टप्पा सुरू होतो. हा बव्हंशी खूप मोठ्या शिळांनी भरलेला ७०° ते ९०° कोनात सरळ उभा असणारा मार्ग आहे. नवीनच दुर्गभ्रमंती चालू केलेल्या किंवा हौशी ट्रेकर्सनी पहिल्या ८-१० ट्रेक्ससाठी हा किल्ला (दुसरा टप्पा) निवडू नये (छायाचित्र १.३ व १.७ आणि पूर्ण आवाका समजण्यासाठी पहा छायाचित्र १.४).

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आम्ही दुसऱ्या टप्प्यावर गडाच्या एका बाजूला, मार्गाच्या पाठीमागील भागात असणाऱ्या श्री गोरखनाथांच्या गुहेजवळ पोहोचलो. थोडा नाष्टा करून आणि १० मिनिटे विश्रांती घेऊन आम्ही परत एकदम शेवटच्या टप्प्याच्या चढाईला सुरूवात केली.

हा अतिअंतिम टप्पा अतिशय धोकादायक, भीतिदायक आणि अतीव अवघड आहे. सुमारे ९०° च्या कोनात सरळसोट उभ्या पायऱ्या आहेत (छायाचित्र १.८). येथून खाली सुमारे २५०० फूट खोल दरी आहे.

त्यावेळी ट्रेकच्या शेवटच्या टप्प्याची वाट लवकर सापडत नव्हती. त्यात आम्ही अशा ठिकाणी उभे होतो की ती वाट केवळ १.५ फूट रूंद; आमच्या डाव्या बाजूला ३००-४०० फूट सरळसोट कडा आणि उजव्या बाजूला २२०० फूट सरळ खोल दरी आणि त्यात ऊन तर एकदम कडक! एकूणच परिस्थिती अशी की, एक क्षणभर तुमचे लक्ष विचलित व्हायचा अवकाश, की तुम्ही (म्हणजे आम्ही!!!) खाली थेट दरीत आणि मग सरळ 'वर'! (छायाचित्र १.४; लिहिलेले)

अशा ठिकाणी मी दूरदूरपर्यंत कल्पना शक्ती ताणूनही जिची कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली. The reality is more unpredictable than the imagination.

दगडात लपून राहिलेली ती वाट नक्की कुठून सुरू होते, ते मी शोधत होतो. आमची गडाला जवळपास अर्धी प्रदक्षिणा पूर्ण झाली होती आणि तरीही ती वाट सापडत नव्हती. गडाच्या तेवढ्या उंचीवर मागील बाजूला दोन मोठ्या गुहा आहेत अशी माहिती मी आधीच काढली होती. (खरेतर प्रत्येक ट्रेकरला आपण जात असलेल्या गडाची जुजबी तरी माहिती असणे आवश्यक असते.) ऊन कडक तर होतेच; शिवाय ते सरळ त्या दगडी कड्यावर पडत असल्यामुळे तो कातळ (बेसॉल्टचा काळा दगड) -ज्यामध्ये तयार झालेल्या नैसर्गिक खाचांमुळे गडावर चढता येते- कडक तापला होता. तो इतका तापला होता की, चढाई करताना त्याचा आधार घेणे अशक्य बनले होते.

मी थोडा पुढे झुकून वर जाण्याच्या वाटेचा आढावा घेत असतानाच कड्यावरून काहीतरी खाली पडतंय अशी जाणीव मला झाली. खडा किंवा झाडाचे वाळलेले पान किंवा काटकी खाली पडत असावी इथपर्यंतच माझी कल्पनाशक्ती मी ताणू शकलो होतो. वरून आलेली 'ती' वस्तू आधी माझ्या टोपीच्या फ्लॅपवर पडली आणि तशीच ती डाव्या पायावर घरंगळत आली. मी निमिषार्धात खाली पाहिले असता मला माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये फणा काढलेला दोन-सव्वादोन फूट लांबीचा एक चाॅकलेटी रंगाचा नाग मला दिसला. मी कसलाही विचार न करता क्षणार्धात (reflexively) पुढे उडी मारली. एवढे होऊनही मी पुढच्याच क्षणाला मागे वळून त्या नागाचा फोटो घ्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तोही पळून जायच्या प्रयत्नात असल्यामुळे मला त्याचा व्यवस्थित फोटो काढता आला नाही. जो काढला तो अस्पष्ट आला आहे. (Feeling bad!) त्यानंतर, मी १५ मिनिटं विश्रांती घेतली आणि गडाचा सर्वांत अवघड (सिद्धगडापेक्षाही कैकपटीने अवघड) टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.

'काळ आला होता; पण वेळ आली नव्हती' असा मनात विचार करत करत नंतर मी उतरलो. मध्ये गोरक्षनाथांचा मठ दिसला, तिथे त्यांची आत्ता जे गादी/पीठ चालवतात, त्या महाराजांना भेटलो. बोलत बोलत त्यांना मी घडलेली ही घटना सांगितली असता, ते म्हणाले, "हा शुभसंकेत आहे! कारण, गोरक्षनाथ हे खुद्द भगवान श्री शंकराचे अवतार आहेत. एक प्रकारे गोरक्षनाथांनी तुमची परीक्षा पाहिली. एवढा भयानक प्रसंग घडूनही तुम्ही अर्ध्यातून माघारी न फिरता श्री गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण झाला. हा एक शुभसंकेत समजा!!! गोरक्षनाथांनी तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत. निर्धास्त रहा."

शुभसंकेत वगैरे माहिती नाही. अशा गोष्टींवर मी सहसा डोळे झाकून विश्वास ठेवत नाही. असेल शुभसंकेत तर बरेच झाले; पण खाली उतरताना मात्र त्या नागाचा एक छानसा फोटो मला मिळाला नाही, याचेच शल्य वाटत होते (आणि, आत्ता घरी आल्यावर तरी ते जास्तच खुपतंय)!

आता कल्पना केली की (afterthought), मनात काही विचार येतात. उदा. तो नाग मला तिथे चावला असता तर..? तेथून वैद्यकीय सेवा मिळायला मला किमान ५-६ तास लागले असते. मुळात अशा स्थितीत गडावरून खाली उतरणे हेच मोठ्या जिकीरीचे आणि अशक्यप्राय ठरले असते. किंवा, तो साप खाली न पडता एखाद्या कपारीत बसून असता आणि आम्ही वर चढताना त्या कपारीचा आधार घ्यावा म्हणून तिथे हात ठेवला असता, आणि मग तो चावला असता तर..? किंवा, अतिअंतिम टप्प्यात, जेथे दगडी चढण सुमारे ९०° किंवा जास्तीची आहे, जिथे १-१ पायरी चढणे हेच एकेका दिव्यासारखे असते, अशा ठिकाणी वरच्या पायरीवर पाय ठेवताच तो नाग फणा काढून उभा ठाकला असता, तर..? अशा वेळी मला ना वर चढता आले असते ना खाली उतरता आले असते; त्यावेळच्या मानसिक स्थितीचे काय? तेव्हा मला काही उपाय करणे शक्य झाले असते का? किंवा, या सर्व गोष्टी माझ्याऐवजी माझ्या साथीदाराबरोबर घडल्या असत्या तर मी (आम्ही) काय करणार होतो..? असे एक ना अनेक प्रश्न त्या रात्री मनात थैमान घालत होते.

आपण म्हणतो तसे आणि तेवढे आपल्या हाती काहीच नसते हेच खरे. कर्ता-करविता 'तो'च असतो!












त्यानंतर मी एकट्याने मनोर-पालघर रस्त्यावरील 'कळदुर्ग'गडाची दुर्गभ्रमंती केली. हा गड छोटेखानी असल्याने (किंवा इतर अनेक मोठे गड मी आधी केल्यामुळे हा गड मला थोडा छोटा वाटत असेल) नवीन किंवा हौशी ट्रेकर्सना सुरूवातीच्या दुर्गभ्रमंतीसाठी हा गड चांगला आहे. या रस्त्यावरील वाघोबा खिंडीच्या पाठीमागे हा गड आहे. पालघरकडून मनोरकडे जाताना हा 'कळदुर्ग' गड जास्त चांगला (good view) दिसतो. असो.


यानंतर, दि. ३०/०४/२०१७ रोजी आम्ही मलंगगडाची (छायाचित्र २.१) दुर्गभ्रमंती निश्चित केली. सकाळी ८ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. जाताना, रस्त्यावरून बरेच डोंगर दिसत असले तरी बरेच ट्रेक केल्यामुळे आता प्रस्तावित गड ओळखणे खूप अवघड जात नाही. पाहताक्षणीच गडाच्या प्रतिमेच्या प्रेमात मी पडलो. एखाद्या भरभक्कम आणि अजस्त्र भिंतीसारखा तो अस्ताव्यस्त पण एका सौम्य वक्राकार आकारात तो पसरलेला आहे.

हा गड ट्रेकिंगसाठी खूपच आव्हानात्मक असला आणि व्यावसायिक ट्रेकर्सना भुरळ घालणारा असला तरी, 'हाजी मलंग साहेबां'च्या दर्ग्यांच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येथे येतात. गडावर वेगवेगळ्या उंचीवर एकूण पाच दर्गे असून त्यातील सर्वांत मोठा असणाऱ्या दुसऱ्या दर्ग्याच्या अंदाजे ५० फूट अलीकडून उजवीकडे जाणाऱ्या एका छोट्या रस्त्यावरून गडावर 'ट्रेकिंगला' जाता येते. 'येथून वर जाणे धोकादायक आहे', असा एक फलक त्या मार्गावर असणाऱ्या ट्रस्टच्या छोटेखानी कार्यालयावर लावलेला दिसतो. गडचढाई सुरू करून अंदाजे अर्धा तास थोडीशी अवघड चढण चढल्यावर (छायाचित्र २.२) उजवीकडे जो सरळ रस्ता जातो, तो हाजी मलंग साहेबांच्या कबरीकडे जातो. (ही ट्रेकिंगची वाट नाही.) पहिल्या अर्ध्या तासाच्या चढाईदरम्यान त्रासदायक ठरणारी गोष्ट म्हणजे, येथे मोठ्या प्रमाणावर असणारी माकडे (वानर नव्हे, माकड). ही माकडे इतकी धाडसी आणि बेडर बनली आहेत की, वर जाणाऱ्या आणि खाली येणाऱ्या प्रत्येक वाटसरूचा खिसा ते खायच्या पदार्थांसाठी स्वतः तपासतात. खायचे काही सापडले की सरळ काढून घेतात. आणि, खांद्यावर बॅग असणाऱ्यांची तर त्यांना बॅगेतले पदार्थ काढून खायला देण्याशिवायच्या अन्य कोणत्याही मार्गाने सुटका होत नाही. आमच्या खांद्यांवर तर भल्यामोठ्या सॅक होत्या. माकडांनी अक्षरशः आमची वाट अडवून धरली होती. हातातल्या काठीचा काहीएक उपयोग झाला नाही, होत नाही. शेवटी पूर्ण सॅक त्यांच्यासमोर रिकामी करून आमच्याकडील होतं-नव्हतं ते सगळं त्यांना खायला घातल्यावर त्यांनी आमची पाठ सोडली. मात्र, खाली उतरणाऱ्या एका ट्रेकरने माकडे वरपर्यंत आहेत असे सांगितल्यावर खाली परत उतरेपर्यंत त्यांची दहशत मनावर कायम होती.
उपरोल्लेखित उजवीकडे (हाजी मलंग साहेबांच्या कबरीकडे) जाणारा रस्ता जेथे सुरू होतो, त्याच ठिकाणी डाव्या हाताला उभ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. हा दुर्गभ्रमंतीचा योग्य रस्ता (proper route) आहे. या पायऱ्या ७०°-८०° च्या कोनात आहेत. आम्ही तेथून वर गेलो असता, वर थोडे भग्नावस्थेतील बांधकाम दिसले. तेथून लगेचच डावीकडे एक माची (सोनेमाची) दिसते आणि उजवीकडे भिंतीसारख्या उभ्या असलेल्या गडाचे शिखर दिसते. इतर वर्णन करण्याचा या लेखाचा हेतू नाही; पण माचीवर जुने बांधकाम आणि तटबंदी व्यवस्थित दिसते. ते पाहिल्यानंतर  आम्ही अंतिम टप्प्यातील अतिशय अवघड चढाईला सुरुवात केली; मात्र तेथे थांबलेल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला वर सोडायला स्पष्ट शब्दांत नकार दिला (छायाचित्र २.३). आजकाल गडाच्या दगडी चढाई मार्गावर बरीच पडझड झाल्यामुळे वर जाणे धोकादायक बनले आहे; त्यामुळे कोणालाच शिखराकडे जाण्याची परवानगी नाही. या गोष्टींमुळे आम्हाला शिखरावर जाण्याचा मनोदय सोडून द्यावा लागला.

आम्ही परत फिरून माचीच्या दिशेने आलो. तेथे माचीच्या अगदी सुरुवातीच्या भागातच अंदाजे १५-२० फूट खोलीचे एक भुयार आहे. प्रत्येकी १.५-२ फूट उंचीच्या पायऱ्या असलेले 'दगडी गोलाकार जिना' म्हणता येईल असे ते भुयार आहे (छायाचित्र २.५). तिथे जाताना एक माकड बॅगा बघून आमच्याकडे झेपावले होते; मात्र मला ती शंका वाटत असल्याने मी आधीच काही दगड जवळच्या एका कागदात भरून ठेवले होते. ते मी जोरजोरात भिरकवायला सुरू केल्यावर ते लांब पळून गेले. माझ्या साथीदाराच्या मते आता जवळपास कुठेही माकडे दिसत नसल्याने ती आम्हाला परत त्रास द्यायला येणार नव्हती. मी मात्र साशंक होतो. तरीही, एकदा गडावर गेल्यावर परत कितीही अडचणी आल्या तरी मी पूर्ण गड पाहिल्याशिवाय मागे फिरत नाही. त्यामुळे भुयारातून खाली उतरण्याचा मी निर्णय घेतला. मी माझी बॅग -ज्यात एक स्मार्टफोन, पॉवरबँक आणि चार्जर्स होते- तिसऱ्या पायरीवर ठेवली. अतिआत्मविश्वासाच्या प्रभावाखाली “काही होत नाही, सर...एवढं घाबरायची गरज नाही”, असे माझे साथीदार मला म्हणाले आणि त्यांनी स्वतःची सॅक पहिल्याच पायरीवर ठेवली. (ते साथीदार ८०% कर्णबधीर आहेत; मात्र त्यांना अस्पष्ट बोलता येते. ही जमेची बाजू आहे की प्रतिकूल ते प्रसंगानुरूप बदलत राहते.) मग, आम्ही खाली उतरलो. तिथून भुयाराच्या अंताला पुढे केवळ एक फुटाचा दगड आहे... त्यानंतर खाली २००० फूट खोल दरी! एक इंच इकडेतिकडे व्हायचा अवकाश की, आम्ही सरळ खाली आणि मग स्वर्गस्थ!!!
आम्ही तेथून फोटो काढत असताना (छायाचित्र २.६) मला बुटांचा आवाज आला. दुसरे कोणी ट्रेकर वरती आले नव्हते, हे मला माहिती होते; पण एक शक्यता म्हणून मी तसा अंदाज बांधला. परत फोटो काढण्याच्या पाठीमागे आम्ही लागलो तोच मला मोठा आवाज ऐकू आला. साथीदाराला ऐकू येत नसल्याने तो फोटो काढण्यात मग्न होता. पण, मी आवाज येताक्षणीच वर पाहिले; तर काय! साथीदाराची बॅग ओझ्यामुळे उचलता न आल्याने माकडांनी ती खाली ढकलून दिली होती. पायऱ्या अरुंद असल्यामुळे ती बॅग सरळ आमच्या दिशेने खाली येऊ लागली होती. केवळ तिखट कान, तीक्ष्ण नजर आणि अत्यंत सावध मन असल्यामुळेच मी क्षणार्धात आमच्यापर्यंत कोसळत आलेली ती बॅग महत्प्रयासाने अडवू शकलो होतो. मी ती बॅग अडवली नसती, तर माझ्या पायावर ती जोरदारपणे आदळून मी बाहेरच्या दिशेने तोल जाऊन पडलो असतो आणि पडताना मला लागूनच उभ्या असलेल्या साथीदाराच्या अंगावर पडल्यामुळे आम्ही त्या बॅगेसह दरीत पडून आमचा अंत झाला असता. मेंदू पूर्ण जागृत असल्याने तो धोका मी टाळला होता; पण एवढ्याने सगळे प्रश्न सुटले नव्हते. वर किमान चार माकडे बसलेली दिसत होती. तिसऱ्या पायरीवरील माझी बॅग उचकटण्यासाठी ती खाली उतरण्याची शक्यता होती. आमच्या हाती स्वसंरक्षणासाठी किंवा माकडांना हुसकावण्यासाठी काहीही नव्हते. मग, मला 'डिस्कव्हरी' वाहिनीवर 'बेअर ग्रिल्स' (Bear Grylls)ने एकदा अशा वेळी अनुसरायला सांगितलेला एक मार्ग आठवला. मी जीव तोडून जोरजोरात ओरडू लागलो. त्या प्रचंड मोठ्या आवाजाने घाबरून ती माकडे पळून गेली आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. (मी माझ्या आयुष्यात कधीही कोणत्याच कारणासाठी एवढ्या मोठ्याने ओरडल्याचे मला स्मरत नाही.)

त्या रात्रीही झोपताना मनात बरेच विचार आले. उदा. फोटोऐवजी आम्ही दरीकडे पाठ करून 'सेल्फी' काढत असतो तर..? (सुदैवाने आम्हा दोघांनाही 'सेल्फी' काढण्याचे वेड नाही.) माकडांनी काहीच आवाज न करता रागाने बॅग ढकलण्याऐवजी सरळ माझ्या अंगावर फेकली असती तर..? माझे कान उघडे आणि मन जागृत नसते तर..? माकडे आवाज न करता उड्या मारत आमच्यापर्यंत पोहोचली असती तर दरीत उडी मारण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय आमच्यासमोर होता का..?








तिसरा जीवघेणा प्रसंग-
वरील दोन्ही प्रसंग जंगली प्राण्यांकडून अचानकपणे झालेल्या हल्ल्यांमुळे आमच्यावर ओढवले गेले. हा तिसरा प्रसंग मात्र आम्ही स्वतःहून ओढवून घेतला. मागील दोन्ही अवघड प्रसंगांपेक्षा हा तिसरा प्रसंग जास्त भीतिदायक, त्रासदायक आणि प्रदीर्घकाळ आम्हाला झुंजवणारा होता. आमच्या हातापायांचीच नव्हे, तर मनाची ताकद; अंदाज बांधण्याची क्षमता; टिकून राहण्याचे कौशल्य; वेगवेगळे मार्ग/पर्याय धुंडाळण्याचे धैर्य आणि सहजासहजी हार न मारण्याची जिद्द- नव्हे हट्टच- या सर्वांची अवघड परीक्षा घेणारा हा प्रसंग ठरला!!!

ही घटना घडली महाराष्ट्र दिनी, म्हणजे ०१/०५/२०१७ या दिवशी. आदल्याच दिवशी मलंगगड करून आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी ट्रेक निश्चित केला, सायवनजवळील (कासा, जि. पालघर) 'गंभीरगडा'चा! अतिशय कमी लोकांना माहित असलेला आणि अगदीच आडवळणी असलेला हा गड!
१ मे ते झेंडावंदन करून आणि काही रुग्ण तपासून सकाळी १०.१५ वाजता माझ्या ठिकाणापासून ८२ किमी अंतरावर असलेल्या या गडाकडे जायला आम्ही निघालो. सध्याचा उन्हाळा अनुभवत असताना यावेळी ट्रेकिंगला बाहेर पडणे किती अवघड आणि त्रासदायक ठरू शकते याचा वाचक थोडाफार का होईना; पण अंदाज बांधू शकतील. मात्र, आमचा निश्चय ठाम होता आणि एकदा गाडीवर बसल्यावर मी माझा निर्णय पाठीमागे घेणे शक्य नव्हते! दुपारी बरोबर १२ वाजता आम्ही गडाच्या पायथ्याला पोहोचलो. त्यादिवशी आमच्याकडे दोन गडांचे पर्याय होते. एक म्हणजे, ठाणे जिल्ह्यातील 'ताहुलीगड' आणि दुसरा 'गंभीरगड'! पण, आम्ही उन्हात बाहेर पडल्यामुळे दोहोंपैकी कमी उंचीचा ट्रेक करावा असे ठरले. म्हणून, मग 'गंभीरगड' निवडला. गाडी एका ढाब्यावर (खरेतर ते ताडीचे दुकान होते! अंदर की बात..!) लावून आम्ही दुर्गचढाई सुरू केली. सुरूवात अतिशय वेगात झाली. वैशिष्ट्य म्हणजे, आसपास चिटपाखरूही दिसत नव्हते. पहिला टप्पा पूर्ण केल्यावर विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसून थोडी बिस्किटे खात आम्ही वर जाण्याच्या मार्गाबाबत विचार करायला सुरू केले. एक वाट गडाच्या डाव्या बाजूने तर दुसरी वाट गडाच्या दिशेने सरळ वर जाताना दिसत होती (छायाचित्र ३.२). साहजिकच आम्ही डाव्या वाटेऐवजी सरळ जाणारा मार्ग निवडला. मी एका गोष्टीचे निरीक्षण केले होते की, सरळ जाणारा मार्ग बऱ्यापैकी व्यवस्थित आणि रुळलेला वाटत असला तरी, अर्ध्या उंचीवर दगडांच्या एका समूहाजवळ तो थांबत होता आणि तिथून पुढे मात्र तो स्पष्ट दिसत नव्हता (छायाचित्र ३.१). मी साथीदाराला तसे बोललोही; पण "सर, तिथे गेल्यावर वाट सापडेल...आधी तिथपर्यंत जाऊ तरी", असे ते मला म्हणाले.

आमची दुर्गचढाई पुन:श्च सुरू झाली. पहिल्या ५०-६० फुटांपर्यंत वाट अवघड असली (आता याची सवय झाली आहे) तरी ती स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे वरपर्यंत असाच रस्ता असेल असा आमचा ग्रह झाला! पुढील एका तासात गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचण्याचा आत्मविश्वास आम्हाला होता. आम्ही मार्गक्रमण सुरू ठेवले. आता हळूहळू कमी होत होत रस्ता दिसायचा पूर्ण बंद झाला. याचीही आम्हाला आता सवय झाली आहे. सुमारे १५ फूट सरळसोट उभे वर (८०°-९०° कोनात) चढल्यावर (छायाचित्र ३.४) मग आम्हाला 'कटू सत्या'ची जाणिव झाली. रस्त्याबद्दलचा आमचा अंदाज साफ चुकला होता. आता आम्ही अशा ठिकाणी अडकलो होतो, जेथून आम्हाला वर चढता येत नव्हते आणि खाली उतरणे सोडूनच द्या; खाली पाहणेही शक्य नव्हते! इतक्या मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. अवघडातल्या अवघड गडावरही सराईतपणे चढणारा माझा साथीदार श्री. हरडसुद्धा गोंधळून आणि घाबरून गेला होता. डोकं सुन्न झालं होतं. जवळच वाटणारी ती तटबंदी खरेतर सुमारे ४५०-५०० फूट लांब होती (छायाचित्र ३.३)...दुर्दैव म्हणजे, या अंतराची जाणिव आम्हाला खूप उशिरा झाली होती. आता पश्चातबुद्धीचा काहीएक उपयोग नव्हता. केवळ उभी चढण हे आमच्या थांबण्याचे कारण नव्हते. हाताला धरायला आधार नाही, पायाखाली मुरमाचे बारीक कण, डोक्यावर कडक ऊन, पाठीवर १५ किलोची बॅग, सरळसोट उभी चढण, खाली खोल दरी आणि आम्ही दोघे साथीदार एकमेकांपासून २०-२५ फुटांवर वेगवेगळ्या मार्गावर अशी ती अवघडलेली परिस्थिती होती! Sky above, gorge below and war within अशी काहीशी आमची अवस्था होती. शेवटी, मी (आणि कदाचित त्यांनीही) असा विचार केला की, ‘अपयशी होऊन खाली उतरताना पाय घसरून दरीत पडून मरण्यापेक्षा दुर्गचढाई करण्याचा प्रयत्न करत मृत्यूला कवटाळणे जास्त चांगले!!!’ आम्ही स्वतःच्या  मनाची समजूत काढून चढाई परत सुरू केली. मी गणपतीची आराधना करायला सुरू केली. मला माझी बॅग घेऊन चढणे अवघड वाटू लागल्याने मी ती साथीदार श्री. हरड यांच्याकडे दिली. स्वतःची एक बॅग सांभाळत माझी बॅग एका हातात घेऊन एवढ्या अवघड आणि अडचणीच्या ठिकाणी ते स्वतःचा तोल सावरत कसे काय चालू शकले हे तेच जाणोत! याबद्दल मी त्यांचे करेन तेवढे कौतुक कमीच ठरेल!! ट्रेकिंगला साथीदार मिळावा तर, श्री. हरड यांच्यासारखा!!! (वैशिष्ट्य म्हणजे आम्ही दोघांनीही ट्रेकिंग किंवा Rock climbing चे अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नाही. जे शिकलोय ते स्वतःच्या चुका आणि अनुभवांतूनच!) आम्हाला ट्रेकिंगऐवजी Rock climbing (खडकावरील चढाई) करणे भाग पडले होते. बाकी अन्य पर्याय नव्हताच. तसेच निम्मे अंतर कापून वर गेल्यावर आम्हाला शेवटी एका मोठ्या कातळाचा आधार मिळाला. ती संधी साधत मी पाणी पिण्यासाठी खाली बसलो. कसाबसा इथपर्यंत चढलो, आता पुढे वर किंवा खाली जाणे मला तरी शक्य नाही असे म्हणून मी "मदतीसाठी पोलिसांना/वन खात्याला फोन करतो", असे श्री. हरड यांना म्हणालो. त्यांनी मला थोडा वेळ वाट पाहण्याचा सल्ला दिला. “आधी जरा वाट सापडते का ते पाहू...नाही सापडली तर मदतीसाठी फोन करुया”, असे ते म्हणाले. मीही थोडा धीर धरला. आम्ही थांबलेल्या ठिकाणाहून डावीकडे एक अतिशय अरुंद खाच होती. थोडासा (नगण्य) आधार होता. श्री. हरड पुढे निघून गेले. माझी वाट पाहत दुसऱ्या बाजूला जाऊन थांबले. माझे मनोबल वाढविण्यासाठी, “सर, आता एवढंच अंतर आहे, मग झालं”, असे म्हणाले. २० फुटांचे ते अंतर मला २० किमी पेक्षा जास्त व अवघड वाटत होते. आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत सोप्या भाषेत समजावून सांगितलेला एके ठिकाणी मी वाचला होता...“आपण प्रेमात पडलो की, एक-एक वर्षाची भेटीची वेळ एका क्षणाची वाटू लागते; तर तेच जर आपल्याला गॅसवर उभे केले तर एक-एक क्षण एका-एका वर्षासारखा वाटू लागतो.” हा सिद्धांत आत्ता अंतराच्या बाबतीत मला आठवत होता. २० फूट की २० किमी?! मन घट्ट करून, जीवन-मरणाच्या मध्ये उभारून मी ते अंतर डोके शांत ठेऊन एकदाचे कापले. पोहोचल्यावर ४ फूट उंचीचा खडक परत चढून पाहतो तर काय! मघाशीची अवस्था खूपच बरी अशी अवस्था होती!!! आता परत धीर सुटला. मी एके ठिकाणी, माझी बॅग उजवीकडे २० फुटांवर, श्री.हरड माझ्यापासून खाली ५-७ फुटांवर आणि त्यांची बॅग माझ्यापासून वर ७-८ फुटांवर अशी सुटसुटीत (!!!) (= अतिविचित्र) स्थिती होती. तटबंदी अजून सुमारे ५० फुटांवर (सापेक्षतावादाच्या भाषेत ५० किमीवर) होती. चढण वाढलीच होती. पर्याय नव्हता. "सर, हातांवर आणि पायांवर शरीराचे वजन टाकून कसलाही विचार न करता सरळ माकडासारख्या उड्या मारत, वरखाली न बघता सरळ पळत सुटा”, हा माझ्याच मनातला विचार श्री. हरड यांनी बोलून दाखवला. "मी तुमची बॅग काहीतरी करून आणतो, माझी बॅग तुम्ही वर घ्या” असे ते म्हणाले. त्यांची बॅग जरा हलकी असल्याने त्यांनी ती खालून वर फेकली होती आणि ती मध्येच अडकली होती. मला वर निवडुंगाचे एक झाड दिसले. आता तेच माझा 'दैव आणि दैवत' होते. मी सरळ हातपाय टेकत वर चढून महत्प्रयासाने निवडुंगापर्यंत पोहोचलो. तेथून तितक्याच प्रयत्नाने तटबंदीच्या एका दगडापर्यंत मी पोहोचलो. मी 'विजयी' झालो होतो. अडचणी संपल्या नसल्या तरी मी बऱ्यापैकी सुरक्षित झालो होतो. मी साथीदाराची बॅग कशीबशी वर खेचली. श्री. हरडही माझ्या पाठोपाठ वर येऊ शकले असते; पण माझी बॅग आणण्यासाठी परत अत्यंत अडचणीच्या ठिकाणी माझ्यावरील प्रेमाखातर ते गेले. माझी बॅग खूपच जड असल्यामुळे ती वर टाकणे जिकीरीचे होते. जास्त जोर लावला असता तर पायांवर दबाव येऊन ते खाली घसरून सरळ दरीत पडणे शक्य होते. मला वरून जास्त झुकता येत नव्हते; अन्यथा मी घसरून दरीत पडलो असतो. नशिबाने बॅग कशात तरी अडकली. होता नव्हता तेवढा जोर लावून मी ती वर खेचली. दोनच मिनिटांत श्री. हरड वर चढले. आम्ही लढाई जिंकली होती.
जेव्हा आम्ही मध्येच बराच वेळ अडकून परत चढाईचा एक-एक टप्पा पार करू लागलो, तेव्हा स्वतःतील सामर्थ्याचीच आम्हाला नव्याने ओळख होऊ लागली होती. “Sometimes, you find yourself in the middle of nowhere... And, sometimes in the middle of nowhere you find yourself”, हे शब्द शब्दशः आमच्या त्यावेळच्या मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याचे वर्णन करतात!

शेवटी सर एडमंड हिलरी यांनी म्हटल्याप्रमाणे, “It's not the mountain that we conquer, it's ourselves. (दुर्गचढाईत आपण पर्वतावर नव्हे तर, स्वतःवर विजय मिळवत असतो.)” याचे मला आत्मज्ञान झाले.







ट्रेकिंग म्हणजे केवळ दगडधोंड्यांत भटकणे नव्हे!
ट्रेकिंग म्हणजे रोमहर्षक क्षण (thrill)!
ट्रेकिंग म्हणजे इतिहासाचा जाज्ज्वल्य अभिमान!
ट्रेकिंग म्हणजे भूगोलाचा अभ्यास!
ट्रेकिंग म्हणजे कला आणि ट्रेकिंग म्हणजे शास्त्र!
ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या शुद्ध आणि मुक्त उधळणीची अनुभूती!
ट्रेकिंग म्हणजे स्वतःच्या शारीरिक सामर्थ्याची जाणिव!
ट्रेकिंग म्हणजे स्वतःच्या मानसिक कणखरपणाची कसोटी!
ट्रेकिंग म्हणजे प्रसंगावधान अन् अखंड सावधानता!
ट्रेकिंग म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचा सर्वोच्च वापर!
ट्रेकिंग म्हणजे परस्परांतील पराकोटीच्या सहकार्याची परीक्षा!
ट्रेकिंग म्हणजे एकमेकांवर डोळे झाकून ठेवलेला विश्वास!
ट्रेकिंग म्हणजे नि:स्वार्थीपणाचा कळस!
ट्रेकिंग म्हणजे यशोशिखरावर पोहोचण्याआधीचा खडतर पण हवाहवासा वाटणारा प्रवास!
ट्रेकिंग म्हणजे खडतर प्रवासानंतर सर्वोच्च ध्येयाचा टप्पा गाठण्याच्या क्षणाचा परमानंद!
ट्रेकिंग म्हणजे निरामय जीवन जगण्याची गुरुकिल्ली!
ट्रेकिंग म्हणजे आत्मविश्वास अन् ट्रेकिंग म्हणजे आत्मज्ञान!
ट्रेकिंग म्हणजे 'शिवछत्रपती' आणि ट्रेकिंग म्हणजे 'छावा संभाजी'!
ट्रेकिंग म्हणजे मला नव्यानेच गवसलेला 'मी'!!!

एवढे जीवघेणे अनुभव येऊनही मी ट्रेकिंग करणे सोडणार नाही; उलट झालेल्या चुका सुधारून मी आणखी जोमाने ते करेन; कारण THE BEST VIEW COMES AFTER THE HARDEST CLIMB!!! (अत्यंत अवघड चढाई पार पाडल्यावर सर्वोच्च ठिकाणी पोहोचल्यावर सर्वोत्तम दृश्य दिसते!!!)

इतक्या जीवघेण्या ट्रेक्सनंतरही मी निश्चिंत आहे; कारण विल्यम वर्ड्सवर्थने म्हटल्याप्रमाणे, Nature never did betray the heart that loved her! (निसर्ग त्याच्यावर प्रेम करणाऱ्या कुणाचाही विश्वासघात करत नाही!)

उपरोल्लेखित तीनही गड बघायला खूप सुंदर आहेत. या गडांवर भग्नावशेषातील बांधकाम आहे, तत्कालीन इमारतींचे अवशेष आहेत, माच्या आहेत, बुरूज आहेत...आणि, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्यातील सगळ्या गडांवर आपले लाडके 'छत्रपती शिवाजी महाराज' आहेत; त्या सिंहाचा 'छावा' आहे; सरसेनापती हंबीरराव मोहिते- प्रतापराव गुर्जर- तानाजी- येसाजी-बाजीप्रभू- फिरंगोजी- शिवा न्हावी- जिवा महाला- मदारी म्हेतर- आणि, छत्रपतींवर जीव ओवाळून टाकणारे हजारो स्वराज्यसैनिक आहेत...या सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि त्यांच्या घाम-रक्ताने भिजलेली ‘माती’ आहे..! ही माती एकदा कपाळाला लागली की, छत्रपतींच्या स्वराज्यात झालेल्या जन्माचे ‘सार्थक होते’..!

माझ्या जन्माचे सार्थक करायचे मी ठरवले आहे (छायाचित्र ३.५)...आणि, छत्रपतींचा आशीर्वाद मला अशा जीवघेण्या प्रसंगांतून वाचवत राहील आणि यापुढेही दुर्गभ्रमंती करायची ऊर्जा मला सातत्याने देत राहील असा मला दृढविश्वास आहे!!!

जय भवानी! जय शिवराय!! जय शंभुराजे!!!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. बी. बी. एस.,
वैद्यकीय अधिकारी गट 'अ')
(केवळ वॉट्सअॅप संपर्कासाठी- ७८८७५६९६९९)

Comments

  1. Simply great अमित.. तुझ्या या वर्णनावरून वाचताना अंगावर शहारे आले..तुम्हा दोघांची दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि एकमेकांवरील विश्वास केवळ वाखाणण्याजोगे.. खूपच छान आणि सुंदर..अगणित कौतुक करण्याएवढे..
    पण जरा जपून रे राजा..काळजी सुद्धा वाटते अमित..पण एकूणच मस्त लिहिलं आहेस सगळं आणि ते सुद्धा फोटोसकट.. proud of both of u..

    ReplyDelete
  2. Thank you very much Amit.
    Your concern and comments are very precious for me.

    ReplyDelete
  3. ohhhh........ hushhhh ...... shhhhhh .......
    apratim Varnan ...... achaaT DhaaDas ....... avismaniy prasang aani prasangaavadhaan ........ saarech kalpanaatich..... proud of U ..... take care..... keep Trekking ..... Best of Luck ... ! (sorry, Marathi font not available)

    ReplyDelete
  4. Thanks Dr. Ravi...your support is much appreciated.
    And yes, I like to live a life full of thoughtful thrills!

    ReplyDelete
  5. 😨😨😨😨😨😨 bap re khupach khatarnak episodes hote 3ni pan.....
    Please thoda japun kara gadsawari....

    ReplyDelete

Post a Comment