२६/११ च्या संदर्भात आबा आमच्या नजरेतून...(Aaba on 26/11 through our view...)

*२६/११ च्या घटनेच्या निमित्ताने आबा त्यांच्या भाच्यांच्या नजरेतून*

(www.dramittukarampatil.blogspot.in)

*लेखक-* © *डॉ.अमित सुमन तुकाराम पाटील व इंजि. उदय सुमन तुकाराम पाटील*.
(प्रस्तुत लेखक हे महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री मान. आर. आर. आबा पाटील यांचे सख्खे भाचे असून दि. २६/११/२००८ पासून ते आबांनी राजीनामा दिलेल्या दिवसापर्यंत ते आबांच्या मुंबईतील 'चित्रकूट' या शासकीय निवासस्थानी वास्तव्यास होते.)
(प्रस्तुत लेखात आबांच्या घरचे म्हणून आम्ही २६/११ च्या संदर्भाने अनुभवलेल्या काही घडामोडींचे वर्णन केले आहे. सर्वच घटना त्यावेळी लिहून ठेवता येणे शक्य नसल्याने काही ठिकाणी थोडासा विस्कळीतपणा असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र या लेखातून शक्य तितक्या आठवणींना उजाळा देण्याचा आम्ही मनःपूर्वक प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी घटनांचा/संदर्भाचा काटेकोर तंतोतंतपणा नसल्यास तो आमच्या स्मरणशक्तीमुळे आला असण्याची शक्यता आहे. आपण सर्व वाचक अशा बाबतीत सांभाळून घ्याल ही अपेक्षा!)
(या लेखाचे सर्व हक्क लेखकांकडे सुरक्षित आहेत. त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही सदर लेख संपूर्णतः किंवा संक्षिप्तपणे कोणत्याही माध्यमाद्वारे प्रकाशित/वितरीत करता येणार नाही.)


वेळ- दि. २० ते २२ डिसेंबर, २००८ या दिवसांदरम्यानच्या एखाद्या सकाळच्या ९.३०-१०.०० च्या सुमाराची...
स्थळ- ब्रेमन मैत्री चौक, पुणे.
प्रसंग- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आमचे मोठे मामा (तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री मान. आर. आर. आबा पाटील साहेब) आपल्या पदाचा राजीनामा देऊन अंजनी या आपल्या गावी आल्यानंतर प्रथमच मुंबईला परतत होते आणि आम्ही दोघे (मी व माझा धाकटा भाऊ उदय) आबांना २ मिनिटे तरी भेटावे म्हणून ब्रेमन चौकात एका दुचाकीवरून पोहोचलो होतो. दहशतवादी हल्ल्यानंतर मामा अतिशय व्यथित तर झाले होतेच, शिवाय त्यानंतर घडवून आणल्या गेलेल्या पक्षांतर्गत व पक्षबाह्य राजकारणानेही आबा खूप नाराज व निराश झाले होते. पवार साहेबांनी आणि पक्षातील जवळच्या काही सहकाऱ्यांनी आबांना विनंती केल्यानंतर आबा मुंबईतील पक्षाच्या बैठकीला जायला तयार झाले होते. (त्यानंतर २३ डिसेंबर, २००८ रोजी आबांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाली; पण काहीशा नाखुशीनेच आबांनी त्यावेळी या पदाचा स्वीकार केला होता.) मामांना आम्ही तिथे आलोय याची काही कल्पना नव्हती. ब्रेमन चौकातल्या सिग्नलला त्यांची गाडी थांबल्यावर आम्ही दोघे आमची गाडी तिथेच बाजूला लावून मामांच्या गाडीकडे झेपावलो. मामा २०-२५ सेकंदच भेटले. त्यांचा चेहरा प्रचंड तणावग्रस्त वाटला. सिग्नल सुटताच आम्हाला सावकाश घरी जायला सांगून आबा मुंबईच्या दिशेने निघाले. आज सगळं चित्र डोळ्यासमोर तसंच तरळतंय...
थोडे मागे जाऊ...

दि. २२/११/२००८, शनिवार.
दि. २३ च्या रविवारी उदयची एक परीक्षा व माझे एक छोटे काम असल्यामुळे २२ च्या रात्री आम्ही पुण्याहून मुंबईला गेलो होतो. त्या रविवारी मामा बहुधा बाहेर दौऱ्यावर होते. रात्री आमची त्यांच्याशी भेट झाली. तेव्हा का कोणास ठाऊक, पण मामा आम्हाला “२-३ दिवस रहा आणि मग परत जावा” असे म्हणाले. आम्हालाही पुढे जास्त गडबड नसल्यामुळे आम्ही आबांच्या 'चित्रकूट' या शासकीय निवासस्थानी राहिलो. २-३ दिवस झाल्यावर गुरुवार दि. २७ रोजी आम्ही पुण्याला परत फिरण्याचा निर्णय घेतला होता...मात्र, ते होणे नव्हते. त्याआधीच बुधवारी २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला आणि काही क्षणांतच परिस्थिती पूर्ण पालटून गेली.

आमचा २६/११ चा दिवस संध्याकाळपर्यंत व्यवस्थित गेला. त्यादिवशी भारत-इंग्लंड क्रिकेटची मॅच होती. आम्ही टी. व्ही. वर तो सामना बघत जेवत होतो. आबा नुकतेच करकरे साहेबांबरोबरची बैठक संपवून जेवण करून त्यांच्या बेडरुममध्ये गेले होते. आमच्याबरोबर आबांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक श्री. सूर्यकांत पाटील होते. आम्ही गप्पा मारत जेवत असतानाच आबा जिन्यावरून झपाझप पावले टाकत पूर्ण कपडे आवरूनच खाली आम्ही बसलो होतो तेथे आले. आबांना काहीतरी गंभीर बातमी कळाली आहे असे त्यांच्या  चेहऱ्यावरून लगेच जाणवले. आबांनी अगदी गडबडीने त्यांच्या पी. ए. ना “मुंबईत कुठेतरी मोठे गँगवार चालू आहे, मला निरोप मिळाला आहे...पटकन जबाबदार अधिकाऱ्रयांना फोन लावून माहिती घ्या आणि मला लगेच कळवा. माझ्या गाड्या तयार ठेवा, मी लगेच निघणार आहे,” असा आदेश दिला. आम्ही सगळेच पटकन ताटावरून उठलो. पी. ए. त्यांच्या कामाला लागले. गाड्या लागल्या.

घटनेची छोटीशी टिप मिळूनसुद्धा त्यानंतर केवळ १५ मिनिटांत राज्याचे गृहमंत्री घटनास्थळी जायला निघाल होतेे. वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणे याहीवेळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही आबांनी बुलेटप्रूफ गाडी न घेता नेहमीच्याच अँबॅसॅडरने प्रवास केला. मामा त्यावेळी एक वाक्य म्हणाले होते, “इकडे कित्येक लोक गोळीबारात आपला जीव गमावत आहेत...मी सुरक्षा रक्षक घेऊन काय करू? माझ्या सामान्य जनतेचे काय?” वरिष्ठ पोलिस अधिकारीही आबांच्या या वाक्यावर निःशब्द झाले. क्षणार्धातच आमच्या आसपासचे वातावरण पूर्णतः बदलून गेले होते. चित्रकूटवरील फोनच्या चारही लाईन व्यस्त झाल्या होत्या...वायरलेस सेटवर एकापाठोपाठ एक संदेश यायला सुरुवात झाली होती. (त्यावेळी संतोष कांबळे व बहुधा रमेश तळेकर टेलिफोन ऑपरेटर म्हणून कामावर होते.)

मामा घरातून बाहेर पडल्यावर काही मिनिटांतच दहशतवादी (तोवर हे गँगवार नाही इतपत अंदाज पोलिसांतील वरिष्ठांना आणि काही नेत्यांना आला होता.)  मरीन लाईन्सच्या दिशेने येत असल्याचे संदेश वायरलेसवर येऊ लागले होते. (बंगल्यांप्रमाणेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या म्हणजेच व्ही.आय.पीं.च्या गाडीतही वायरलेस संच असतो.) मामाही नेमक्या त्याच दिशेने निघून जवळपास गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचले होते. मात्र, तिथून मामांना परत फिरावे लागले. त्यावेळच्या आबांच्या ड्रायव्हरच्या (काही कारणास्तव त्यांचे नाव देणे टाळतोय.) म्हणण्यानुसार आबांच्या मोबाईलवर बहुधा मोठ्या साहेबांचा (पवार साहेब) फोन आला होता आणि मुंबईतील वातावरण बाहेर फिरण्यायोग्य नसल्यामुळे आबांना असतील तिथून परत चित्रकूटवर जाण्याबाबत त्यांनी सल्ला दिला होता. (ही माहिती आबांच्या ड्रायव्हरनी तोंडी दिली होती आणि आम्हाला त्याची खात्री करणे त्यावेळी शक्य झाले नाही; मात्र) त्यानंतर मामा पुढच्या १५-२० मिनिटांत निवासस्थानी परत पोहोचले होते. खरेतर, बऱ्याच जणांना याची कल्पना नसेल, पण यावेळी केवळ काही मिनिटांच्या अंतरातच आबांचा जीव वाचला होता. कारण, आबांची लाल दिव्याची गाडी आणि कसाबची गाडी यांची केवळ एखाद-दुसऱ्या मिनिटात चुकामूक झाली होती आणि कोणतीही लाल दिव्याची गाडी दिसली की, कसाब आणि त्याचा साथीदार त्या गाडीवर अंदाधुंदपणे गोळ्यांची बरसात करत सुटले होते.

घरातून निघाल्यापासून मामा जवळपास अऱ्ध्या तासात चित्रकूटवर परत पोहोचले होते. दरम्यानच्या काळात वायरलेस सेटवरून येणाऱ्या संदेशांबरोबरच पाठीमागे बंदुकीच्या गोळ्यांचे आणि बॉम्ब फुटल्याचे कर्णकर्कश आवाज येत असत. दोन-तीन वेळा तर अगदी प्रत्यक्षच बॉम्बस्फोटांचे आवाज कानावर पडत होते. गिरगाव चौपाटी ते चित्रकूट बंगल्याचे हवाई अंतर बरेच कमी असल्याने तेथील आवाज आमच्यापर्यंत पोहचत असे. एकूणच या साऱ्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे आणि दहशतवादी मलबार हिलच्या दिशेने येत असल्याचे पोलिस संदेश एकामागून एक कानावर पडत असल्याने आम्ही बंगल्यावरील सगळेच लोक अतिशय भयभीत झालो होतो. काही काळासाठी आम्ही दोघेही बंगल्यातील एकदम आतल्या शयनगृहात जाऊन बसलो होतो. मामा घराबाहेर आणि नेमके अतिरेकी असलेल्या परिसरातच गेलेले असल्याने आम्ही आणखीनच चिंतातुर झालो होतो. अखेरीस मामा घरी आल्यावर आमचा जीव थोडा भांड्यात पडला, पण एकूणच संपूर्ण वातावरणात भीतीचेच साम्राज्य होते.

मामा घरी आल्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने माहिती मिळविण्याचे काम चालू ठेवले. त्यानंतर काही वेळाने मंत्री मान. छगन भुजबळ साहेब चित्रकूटवर आले. बहुधा विजयसिंह मोहिते-पाटील साहेबही आले असावेत. (त्यांचा बंगला मामांच्या बंगल्याच्या अगदीच शेजारी होता.) सर्वांची आबांच्या निवासस्थानातील कार्यालयात सुमारे एक तासभर आढावा चर्चा झाली...त्याचदरम्यान एकापाठोपाठ एक अशा मन सुन्न करणाऱ्या बातम्या आबांपर्यंत पोहोचू लागल्या. घटनेच्या अवघी काही मिनिटेच आधी मामांना भेटून गेलेले राज्य पोलिस दलातील जाँबाज अधिकारी करकरे साहेब, अशोक कामटे साहेब आणि साळसकर साहेब हे तिघेही अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्याची काळजाचा थरकाप उडवणारी बातमी येऊन थडकली होती. आबांच्या डोळ्यांत अतीव दुःखाने अश्रू तरळत होते. सगळे वातावरणच थबकून गेले होते. सध्या पोलिस दलात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले दोन अधिकारीही शहीद झाल्याची अफवा त्यारात्री सगळीकडे पसरली होती. आणि, कोणी खात्री करावी असे वातावरणही नव्हते...सगळीकडून उलटसुलट बातम्या कानावर पडत होत्या. आम्ही दोघेही खरंच खूप गोंधळलो होतो.

पण, परिस्थिती अशी होती की, आबांना दुःख व्यक्त करण्याचीही फुरसत न मिळावी! एव्हाना हा मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले होते. मुंबईत एकमेकांच्या जवळ नसणाऱ्या कित्येक ठिकाणी कारमध्ये स्फोट झाले होते. पोलिस यंत्रणेला बुचकळ्यात टाकण्यासाठी अतिरेक्यांनी ही रणनीती अवलंबली होती. तशातच आपण घरी न बसून राहता पोलिसांचे नेतृत्व केले पाहिजे असा विचार करून मोठ्या मामांनी राज्य पोलिस मुख्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. रात्री ११.०० च्या सुमारास डी.जी.कार्यालयात गेलेले आबा अखेरीस २७/११ च्या सकाळी ७.३० च्या सुमारास चित्रकूटवर परत आले...बरोबर अऱ्ध्या तासात फ्रेश होऊन मामा परत डी.जी.ऑफिसला गेले ते सरळ २८/११ च्या पहाटे २ वाजण्याच्या सुमारास बंगल्यावर परत आले. आत्यंतिक श्रम, सततचे जागरण आणि सलगपणे उपाशी राहिल्यामुळे मामा अक्षरशः गलितगात्र झाले होते. आम्हालाही दिवस-रात्र कशाचेच भान राहिले नव्हते. घरी आल्यानंतरही मामांचे फोन सतत चालूच होते.
२७ तारखेला सकाळी मामा जेव्हा घरी आले तेव्हा आम्ही त्यांना विचारले की, “मामा, आता सगळं नियंत्रणात आहे तर थोडी विश्रांती घ्या.” आबा आम्हा घरच्यांशी शक्यतो राजकारण किंवा शासकीय गोष्टींबाबत कधीच बोलत नसत...त्यांचे नेहमी वरिष्ठ अधिकारी/राजकारण्यांशी फोन चालू असत; पण घरच्या कुणाशीही मामा असल्या विषयांवर चर्चा करत नसत.

त्यादिवशी मात्र मामा आमच्याशी बोलले...फार नाही; पण जे थोडंफार बोलले ते नेमकं बोलले. मामा म्हणाले, “कालची रात्र जागून काढली, कारण सगळाच गोंधळ होता. हा अतिरेकी हल्ला आहे याचा अंदाज पोलिसांनाही लवकर आला नाही. बघू, आम्ही मध्यरात्री दिल्लीच्या एन.एस.जी. कमांडोंची मागणी केली आहे, पण ते आज सकाळपर्यंत तरी पोहोचले नाहीत.” एवढं बोलून मामा लगेच पुढच्या कामासाठी निघून गेले. मात्र, जाताना आम्हाला एक गोष्ट बोलले की, “तुम्ही आवरा...मी बहुतेक आज (२७/११) राजीनामा देईन.” त्यानंतर भरपूर वेळ आम्हाला काही समजायचेच बंद झाले होते. बंगल्यावर आबांचे खासगी सचिव श्री. जगताप साहेब, श्री. म्हसे साहेब यांच्याबरोबरच विशेष कार्य अधिकारी श्री. मंगेश शिंदे, श्री. महाजन, श्री. तारवी, जनसंपर्क अधिकारी श्री. किशोर गांगुर्डे असे सगळे जमा झाले होते, त्यांच्यात चर्चा आणि विचारविनिमय चालू होते. पण, त्यामुळे एकूणच वातावरण आणखीन गंभीर झाले होते.

दरम्यान २७/११ ला सकाळी आम्ही आमच्या घरी कोल्हापूरला आणि आजोळी अंजनीला फोन लावले होते. पण, हल्ला रात्री उशिरा झाल्यामुळे आणि नक्की काय झालंय हे नीटसे समजत नसल्यामुळे गावाकडे याबाबतीत फार गांभीर्याचे वातावरण तोपर्यंत नव्हते. उदयने केलेल्या काही फोनमुळे मात्र सर्वांनी टी.व्ही.चालू केले आणि मग बातम्यांमधून धक्कादायक गोष्टी सर्वांपर्यंत पोहचू लागल्या.

पण, याचा अर्थ स्पष्ट होता...आबा २६/११ च्या अगदी दुसऱ्याच दिवशी राजीनामा द्यायला निघाले होते. मात्र, पवार साहेबांनी आबांना अशा आशयाचा निरोप दिला की, ‛एवढ्या आणीबाणीच्या काळात पोलिस दल नेतृत्वहीन होणे ही चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही लगेच राजीनामा देऊ नका. गृहमंत्री या नात्याने सध्या तुम्ही पोलिस दलाचे नेतृत्व करणे आवश्यक आहे.’

मामांना त्यावेळी ते पटले. मामा आवरून परत डी.जी.ऑफिसला गेले. त्यानंतर ताज हॉटेल हे दहशतवाद्यांचे केंद्रस्थान बनले होते. मुंबईतील इतर ठिकाणचे (छाबड हाऊस वगैरे अपवाद वगळता) दहशतवादी मारले गेले होते आणि कसाब जिवंत सापडला होता. आबांना घटनास्थळी म्हणजेच हॉटेल ताजजवळ जाऊन घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घ्यायचा होता आणि त्यामुळे पोलिसांचे मनोबल उंचावेल अशी त्यांची खात्री होती. बऱ्याच अधिकाऱ्यांचा विरोध पत्करूनही मामा ताज हॉटेलजवळ गेले. हॉटेलमधील ग्राहकांना अतिरेक्यांनी ओलिस धरले होते. काही अतिरेकी सुरक्षा दलांना लांब ठेवण्यासाठी थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने हॉटेलमधून बाहेर ग्रेनेड्स टाकत होते, तर काही मृत शरीरांच्याजवळ त्यांनी बॉम्ब ठेवले होते. आबा उतरून ताजच्या दिशेने जेव्हा थोडेफार चालू लागले नेमका त्याचवेळी आबांपासून केवळ काही फूट अंतरावर एक ग्रेनेड/बॉम्ब फुटला. तरीही आबा मागे यायला तयार होईनात, त्यावेळी आबांचे अंगरक्षक श्री. चौधरी यांनी अक्षरशः आबांच्या हाताला धरून बळजबरीनेच गाडीत परत बसवले. आबा केवळ दोन दिवसांत दोन वेळा जिवघेण्या प्रसंगातून बचावले होते. (ही माहिती आबांचे तत्कालीन अंगरक्षक श्री. चौधरी यांनी त्यावेळी आम्हास दिली होती.)

पोलिस दलातील आपले बहादूर सहकारी आणि सुमारे २०० पेक्षा जास्त निरपराध नागरिक मारले गेल्याने मामा खूप अस्वस्थ झाले होते, हळवे झाले होते. या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहताना आबांच्या डोळ्यांत आलेले अश्रू संपूर्ण जगाने पाहिले आहेत.

अशा वातावरणातच मग २८/११ या तारखेला या हल्ल्याची माहिती देण्यासाठी रात्री १० वाजता मामा आणि मान. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. आबा त्यावेळी त्यांच्या कामाच्या धडाक्यामुळे पत्रकारांचे अतिशय लाडके बनले होते. मामांनी कोणतीही आडकाठी न ठेवता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यातीलच एक प्रश्न एका हिंदी बातम्यांच्या पत्रकाराने विचारला होता की, “पाटिल साहब, इतना बड़ा टेररिस्ट अटैक हुआ है इसका मतलब यह आपके पुलिस के इंटिलिजन्स डिपार्टमैंट का फेल्युअर नही है क्या?” खरंतर, आबांना पोलिसांनी दिलेल्या लढ्याचा अभिमान होता. नौदल, तटरक्षक दल इ.चा अडथळा बिनबोभाट पार करून अतिरेकी मुंबईत शिरले आणि तरीही पोलिसांनी चांगली लढत दिली असं आबांना सांगायचं होतं; पण हिंदीत तसे शब्द पटपट न सापडल्यामुळे आबा असे म्हणाले की, “मुंबई जैसे शहर पर एखाद हादसा हो जाता है इसका मतलब पुलिस का पुरा इंटिलिजन्स फेल हुआ हैं ऐसा नहीं हैं। टेररिस्ट पाँच हजार लोगों को मारने की तैयारी करके आए थे लेकिन वे इसमें मुंबई पुलिस की बजह से कामयाब नहीं हो सके।” मात्र, तोपर्यंत आबांच्या या विधानाचा वेगळा अर्थ माध्यमांनी काढला होता...त्यांना ब्रेकिंग न्यूज हवी होती आणि त्यांनी ती मिळवली. 'बड़े बड़े शहरों में...' असं एक चुकीचं आणि आबांनी कधीच न उच्चारलेलं वाक्य माध्यमांनी आबांचं विधान म्हणून दाखवायला चालू केलं. बहुधा झी न्यूजने हे वाक्य पहिल्यांदा वापरलं आणि मग सगळा मीडिया आबांच्यावर तुटून पडला. ही पत्रकार परिषद बहुधा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर (किंवा सह्याद्री अतिथिगृहावर)  चालू होती आणि आम्ही चित्रकूटमधल्या टी.व्ही.हॉलमध्ये ती लाईव्ह पाहत होतो. बातमी अशा चुकीच्या पद्धतीने दाखवली जातेय हे आमच्या लक्षात आल्यावर उदयने ही गोष्ट आबांचे सचिव श्री. जगताप आणि जनसंपर्क अधिकारी श्री. गांगुर्डे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र या दोघांनी खुलासा करूनही माध्यमांनी बातमीत बदल केला नाही. (नंतर ही बातमी लावून धरण्यासाठी कुठून कशी चक्रे फिरली याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, पण ती नावे इथे देणे योग्य नाही; कारण अशा गोष्टींचे ठोस पुरावे मिळत नसतात. मात्र, बहुधा आबांनाही ही नावे माहिती असावीत.) आबांनी यातूनही आत्मपरीक्षण केले आणि त्यानंतर मात्र ते पुन्हा गृहमंत्री झाले तरी माध्यमांपासून चार हात लांब राहण्याचा कटाक्ष त्यांनी शेवटपर्यंत पाळला.

नंतरच्या दिवसांत केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील साहेब हे एका दिवसात तीन वेळा कपडे बदलून माध्यमांना सामोरे गेल्यामुळे आणि मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख साहेब यांनी ताजच्या पाहणीच्या वेळी त्यांचे सुपुत्र आणि सिनेदिग्दर्शक रामगोपाल वर्मा या दोघांना आपल्या गाडीतून बरोबर नेल्याने सरकारवरील त्या दोघांवरील राजीनाम्याचा दबाव वाढतच गेला. आता तिघांच्याही राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला.

खरेतर, हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी आबांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली होती, पण तेव्हा वरिष्ठांच्या सांगण्यावरून त्यांनी संयम दाखवला. पवार साहेबांचा हेतू चांगला होता. (पण त्यावेळी असे ऐकायला मिळायचे की, पक्षातील आबांच्या काही प्रतिस्पर्ध्यांना आबांना त्यावेळी 'हिरो' बनू द्यायचे नव्हते; त्यामुळे आबांनी स्वतःहून राजीनामा देण्यापेक्षा काही कारणांमुळे जनतेचा/माध्यमांचा दबाव येऊन राजीनामा दिला तर आबांची प्रतिमा डागाळेल असा त्यांचा विचार होता.)

अखेरीस, बऱ्याच घडामोडी घडल्यानंतर १ डिसेंबरच्या सकाळी मामांनी आम्हाला ते त्यादिवशी राजीनामा देणार आहेत असे सांगितले. पुढे आबा हेही म्हणाले की, “तुम्ही बंगल्यातील सगळं साहित्य ट्रकमध्ये भरून मग निघा. मी आत्ता थोड्याच वेळात अंजनीकडे जायला निघतोय.” तोपर्यंत मामांच्या संपूर्ण स्टाफला त्यांच्या राजीनाम्याबद्दल अंदाज आला होता. सगळे व्हिझिटर्स हॉलमध्ये बसून होते. सर्वांचेच चेहरे पडले होते.

अंदाज सकाळीे ९.३० च्या आसपास आबांनी मान. मुख्यमंत्री कार्यालयाला आपल्या राजीनाम्याबद्दल कळविले...ए.एन.आय. या वृत्तसंस्थेलाही आपल्या राजीनाम्याची बातमी दिली. चित्रकूटवरून निघताना सगळ्या स्टाफचे दोन्ही हात जोडून आबांनी जेव्हा आभार मानले त्यावेळी जवळपास सगळेच रडत होते, दुःखी होते...

आपला सर्व लवाजमा आणि सुरक्षा व्यवस्था पाठीमागे ठेऊन आबा कुणालाही बरोबर न घेता, फोन बंद करून, कुणालाही कसलीही कल्पना न देता अंजनीच्या दिशेने रवाना झाले होते. राजीनाम्याच्या नंतर अवघ्या २ तासांत आबांनी आपल्या सगळ्या साहित्यासह आपल्या आठवणींशिवाय काहीही मागे न ठेवता १९९९ पासून ज्या शासकीय निवासस्थानी आबा राहत होते ते 'चित्रकूट' निवासस्थान सोडले होते...

२००९ मध्ये आबा राज्याचे गृहमंत्री म्हणून परत येणार होते ... आणि, आबांच्याच गृहमंत्रीपदाच्या कालावधीत २१ नोव्हेंबर, २०१२ रोजी २६/११ चा एकमेव जिवंत क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवण्याचे कार्य पार पाडून एक मोठे वर्तुळ पूर्ण करणार होते..!


Comments

  1. 26/11 हा इतिहासातील काळा दिवस आहे...
    ​शहिदांना आदरांजली​....
    Pan aabana swapakshiy netyanmadun avdha virod(tokachi tiraskarachi bhavana asne he unbelievable ani khupach durdaivi....kadachit khupach Kami lokana mahit asel yabaddal.malatari aajach mahit zal. Maharashtrala abanchi nehmich univ bhasel.
    media baddal n bolalelach bar...Lokshahicha 4tha sthamb bikau aahe he parat ekda janavla.
    Vachtana dolyansamor shortfilm pahilyasarkh vatal.chan mandlay purn prasang...
    Thanks dada abanbaddal chya kahi navin goshti lihilyabaddal....

    ReplyDelete
  2. धन्यवाद किरणजी. पण, आणखीनही बऱ्याच राजकीय गोष्टी माहिती असूनही त्या स्पष्टपणे मांडता येणे शक्य नसते...त्यामुळे सध्याच्या राजकारणात खळबळ माजण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
    पण, त्यापेक्षाही आबा कोणत्या परिस्थितीतून गेले हे सर्वसामान्य लोकांना माहिती व्हावे म्हणून हा संक्षिप्त लेख लिहिलाय. आबा तेव्हाही स्वतःचा जीव धोक्यात घालून सामान्य जनतेप्रती असणारे आपले कर्तव्य निभावत राहिले हे विशेष!
    आबांना आम्ही कायमच 'मिस' करू...

    ReplyDelete
  3. राजकीय वर्तुळात महाराष्ट्र ची ढाल बनून संपूर्ण भारत मातेचं रक्षणकारनाऱ्या आबांची उणीव प्रखरशाने जाणवते ..... miss you आबा

    ReplyDelete

Post a Comment