आबा आणि पतंगराव: निखळ मैत्रीचा स्निग्ध धागा (Sad demise of Patangrao Kadam (A warm bond of friendship between Aaba and Patangrao)


महालक्ष्मी एक्सप्रेसचा एक-एक ‘व्ही.आय.पी.’ डबा मागे पडताना..!
(मा. आबासाहेब आणि पतंगराव कदम यांच्या मृत्यूच्या संदर्भाने)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(प्रस्तुत लेखक मान. आर. आर. (आबा) पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)

आपापसात भांडणे होऊन स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यानंतर १९९९ साली अखेरीस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी निकालोत्तर आघाडी करण्याचे ठरवले. दोन्ही काँग्रेसचे आघाडी सरकार एकत्रितपणे सत्तेत आले.

१९९९ साली आबा (मा. आर. आर. पाटील साहेब) सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. आबांच्या तासगाव विधानसभा मतदारसंघाला लागूनच मा. पतंगराव कदम साहेबांचा (तत्कालीन) भिलवडी-वांगी मतदारसंघ होता आणि कदम साहेबसुद्धा तिथून तिसऱ्यांदा निवडून आले होते. (राजकीय दबदबा असूनही कदम साहेबांचा १९९५ साली पराभव झाला होता. त्यांचा पहिला पराभव १९८० साली झाला होता; आबा मात्र नव्वद साली पहिल्यांदा निवडून आले आणि त्यानंतर सलगपणे २०१४ पर्यंत निवडून येत राहिले.) आबांच्यापेक्षा ज्येष्ठ असल्याने आघाडी सरकारमध्ये कदम साहेबांना मंत्रीपद मिळणे जवळपास निश्चित होते; किंबहुना मुख्यमंत्री पदाचे ते त्याहीवेळी प्रबळ दावेदार होते. पण, साहेब उद्योगमंत्री झाले. आबांची बढती अगदी अनपेक्षितपणे, पण त्यांच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर थेट कॅबिनेट मंत्रिपदावर झाली. आबांना “ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता” असे ज्येष्ठांसाठी अनाकर्षक असणारे, तर पतंगरावांना “उद्योग आणि संसदीय कार्य” असे महत्त्वाचे खाते मिळाले. त्यावेळी जयंत पाटील साहेबांकडे अतिशय महत्त्वाचे “अर्थ”खाते आले होते.

आघाडी सरकारचा संसार मान. विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे चालू होता. आबा जात्याच कुशाग्र बुद्धिमत्तेचे आणि प्रचंड कष्टाळू! ग्रामविकास विभागातील त्यांच्या कामाची थेट युनेस्कोपर्यंत दखल घेतली गेली. पुढे जेव्हा काही कारणांमुळे तत्कालीन गृहमंत्री व उपमुख्यमंत्री मान. छगन भुजबळ साहेबांना डिसेंबर २००३ मध्ये पदत्याग करावा लागला, तेव्हा मान. शरद पवार साहेबांनी आबांना मंत्रिमंडळातील थेट दुसऱ्या क्रमांकाच्या महत्त्वपूर्ण अशा “गृह”खात्याची जबाबदारी दिली. पुढे २००४ साली आबा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री (शिवाय त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही) झाले. २००४ ते २००८ हा मामांच्या (आबा) करिअरमधील सर्वोच्च यशाचा काळ ठरला. २००४ साली पतंगरावांना “सहकार” हे काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांपैकी “महसूल”च्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर असणारे खाते मिळाले.

आबा उपमुख्यमंत्री झाल्यावर आपोआपच राजशिष्टाचाराच्या दृष्टीने (प्रोटोकॉल) मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आले. शासकीय कार्यालयांत आणि कामकाजामध्ये सर्वांनी प्रोटोकॉलचे कडक पालन करणे आवश्यक असते. आबा आता पतंगरावांचे वरिष्ठ झाले होते. तरीही, आबांचे पाय कायमच जमिनीवर राहिले. आपल्या एखाद्या कामाचा पाठपुरावा करण्याची पतंगरावांची पद्धत वेगळी होती. ते ज्या मंत्र्यांकडे काम असेल त्यांना थेट त्यांच्या दालनात जाऊन भेटत असत. काहीवेळा त्यांना आबांच्याकडे जावे लागत असे. कदम साहेब आल्यावर आबा आपल्या दालनात त्यांच्या आदराप्रीत्यर्थ उठून उभे राहत; आणि कदम साहेब त्वरीत “अरे आर. आर., तू आता माझा सीनिअर आहेस. तू असा उभारलास तर लोक काय म्हणतील?” असे म्हणत असत. मात्र ऐकतील ते आबा कसले? आबा कदम साहेबांना हाताला धरून थेट स्वतःच्या खुर्चीत बसवत. “साहेब, तुम्ही माझ्यासाठी कायमच ज्येष्ठ राहणार आहात; तो तुमचा मानच आहे,” असे जिव्हाळ्याने म्हणत असत. सांगायचा हेतू हा की, ते एकमेकांना केवळ तोंडदेखले बंधू मानत नसत, तर दोघांचेही मनःपूर्वक वर्तन त्याच स्वरुपाचे असे.

यावरून एक छोटा किस्सा आठवला. दोघांचेही संबंध बंधुत्वाचे असले तरी निवडणुका आणि काही जाहिर सभांच्या वेळी एकमेकांना कोपरखळी मारण्याची एकही संधी दोघेही सोडत नसत. ते दोघे एका स्टेजवर एका कार्यक्रमात असतील तर लोक आबांच्या मिष्कील-मार्मिक आणि पतंगरावांच्या फटकळ-तिरकस टिप्पण्या ऐकण्यासाठी अलोट गर्दी करत. असेच सांगलीतील एका जाहिर सभेत बोलताना कदम साहेबांनी (नेहमीप्रमाणे) आबांचा उल्लेख “माझा धाकटा भाऊ” असा केला. त्याला उत्तर देताना लगेचच आपल्या भाषणात आबा म्हणाले, “साहेब, तुम्ही नुसतं सारखं सारखं मला धाकटा भाऊ वगैरे म्हणता; पण लोकांना काही हे पटत नाही. लोकांची खात्री पटवण्याचा एकच मार्ग आहे- तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीची अर्धी वाटणी करून ती माझ्या नावावर करा. नाहीतर हे प्रेम वरवरचे आहे असेच लोकांना वाटेल.” आबांच्या त्या हजरजबाबीपणावर खुद्द पतंगरावांसकट उपस्थित सर्वांनी खळखळून हसत दाद दिली होती. निखळ मैत्री म्हणतात ती याला! (शरद पवार-बाळासाहेब ठाकरे, विलासराव-गोपीनाथराव, विलासराव-सुशीलकुमार, गोपीनाथराव-प्रमोद महाजन, आबा-पतंगराव या लोकप्रिय-लोकमान्य नेत्यांच्या जोड्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनल्या होत्या. त्या सर्व जोड्या आता क्रूर नियतीने फोडल्या आहेत. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असूनही आणि वेगवेगळ्या पक्षांत प्रभावीपणे कार्यरत असूनही नेत्या-नेत्यांमधील ‘विरोधाचे रुपांतर वैमनस्यात न होण्याचे’ महाराष्ट्राचे इतर राज्यांहून जे वेगळेपण आहे, ती परंपरा दृढ करण्यात निखळ मैत्रीच्या वरील जोड्यांचा सिंहाचा वाटा आहे!)

आबा आणि पतंगराव या दोघांचीही प्रशासनावर जबरदस्त पकड आणि अधिकाऱ्यांवर वचक असला तरी दोघांची कार्यशैली अत्यंत भिन्न होती. आबांची स्मरणशक्ती प्रखर होती, कामासंदर्भातली आकडेवारी त्यांना तोंडपाठ असे. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांच्यासमोर जाताना नीट अभ्यास करूनच जावे लागे. एखादा जरी संदर्भ/आकडेवारी चुकली तरी ते आबांच्या पटकन लक्षात येत असे. अर्थातच त्यामुळे अधिकारीवर्ग आबांना वचकून असे आणि त्यांचे कोणतेही काम विनाकारण अडकून राहणार नाही याची ते काळजी घेत. कदम साहेबांची पद्धत थोडीशी वेगळी आणि रांगडी होती. अधिकारी किती बडा आहे यामुळे त्यांना काहीही फरक पडत नसे. बऱ्याच आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांशी ते अरे-तुरेत बोलत आणि कोणताही मुलाहिजा न ठेवता थेट काम करण्याचे ते आदेश देत. साहेबांच्या या स्पष्टवक्तेपणामुळे कधीकधी काहींचा गैरसमजही होत असे, पण कामेही पटपट होत असत. दोघेही कार्यक्षम मंत्री होते यात वाद नाही.

राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे सतत प्राबल्य राहिले आहे, आणि त्यातही सांगलीचे विशेषच! सांगलीशेजारचा कोल्हापूर जिल्हाही ‘पॉलिटिकली हेवीवेट’ लोकांचा जिल्हा आहे, मात्र राज्य आणि देशपातळीवर सांगली जिल्ह्यातील नेते जेवढे यशस्वी  होतात तेवढे ते कोल्हापूर जिल्ह्यातील होताना दिसत नाहीत. याचे एक कारण आहे...सांगलीचे नेते जिल्ह्यात/स्थानिक पातळीवर जोरदार भांडतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात; पण मुंबई-दिल्लीला गेले की ते फक्त सांगलीसाठी-तिच्या विकासासाठी लढतात. कोल्हापूरचे नेते मात्र गल्लीतही भांडतात आणि दिल्लीतही! (हे माझे निरीक्षण आहे जे चुकीचेही असू शकेल. कृपया चू. भू. दे. घे.) सांगलीला वसंतदादांच्या रुपाने चार वेळा मुख्यमंत्रिपद, तर आबांच्या रुपात उपमुख्यमंत्रिपद लाभले. राजकारणात दादा-बापू (राजारामबापू) असे गट पडले आणि दुर्दैवाने पुढच्या पिढीतील नेत्यांचेही याच धर्तीवर गट पडले; पण जिल्ह्याच्या विकासाच्या आड हे राजकारण कोणीच येऊ दिले नाही.

पतंगरावांची रास मला माहिती नाही, पण कदाचित ती ‘मकर’ असावी- कितीही कष्ट केले तरी या राशीच्या लोकांना त्या कष्टाच्या प्रमाणात यश मिळत नाही. पतंगरावांनी राजकारणात लवकर पाऊल टाकूनही त्यांना काँग्रेसचे तिकीट लगेच मिळाले नाही. त्यासाठी त्यांना १० वर्षे वाट पहावी लागली. इतक्या वजनदार नेत्यावर २००९ सालच्या मंत्रिमंडळात “वन”खात्यासारखे दुय्यम दर्जाचे खात्याचा कार्यभार सांभाळण्याची वेळ आली. (त्यावेळचे नाट्य मी अनुभवले आहे. कदम साहेबांना मंत्रिपद मिळविण्यासाठी तेव्हा खूप प्रयत्न करावे लागले असावेत असे माझे त्यावेळचे निरीक्षण आहे. काही गोष्टी थेटपणे न सांगणेच इष्ट! असो.) त्यांची पात्रता, कुवत आणि तयारी असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाने सतत हुलकावणीच दिली. तरीही ते काँग्रेस पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहिले.

आबा आणि पतंगराव दोघेही आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ अशा मराठा समाजातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातले! दोघांनाही पूर्वाश्रमीचा राजकीय वारसा नव्हता. दोघांनीही टोकाची गरिबी अनुभवली. दोघांनीही ७-८ किमी चालत जाऊन, शिळ्या भाकरी अन् कोरड्याचं खाऊन दिवस काढले. आबा मॅट्रिकच्या परीक्षेत केंद्रात पहिले आले होते, तर पतंगराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणारे गावातले पहिलेच विद्यार्थी! दोघांनाही राजकारणाची भरपूर आवड- खरंतर राजकारण नव्हे, तर माणसांत मिसळण्याची आवड! पैशाचा हट्ट दोघांनीही कधी धरला नाही. दोघांचे मार्ग मात्र भिन्न. एकाने (पतंगराव) सहकाराची/शिक्षण क्षेत्राची कास धरली, तर दुसऱ्याने (आबा) केवळ सार्वजनिक (शासकीय) कामाची! दोघेही एकाच कालखंडात आमदार झाले. पतंगराव थोडेसे आधी मंत्री झाले, पण दोघेही एकाचवेळी म्हणजे अॉक्टोबर १९९९ मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. २००८-०९ चालू मुंबई हल्ल्यानंतरचा आबांचा अपवाद वगळता दोघेही २०१४ पर्यंत सातत्याने मंत्रिपदी राहिले. अधिकाऱ्यांकडून कामे करून घेण्याच्या दोघांच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीही दोघांचा प्रशासनावर जबरदस्त वचक होता हे मान्यच करावे लागेल. दोघांनाही शुभ्र पांढऱ्या कपड्यांची आवड होती, त्यातही पांढरी सफारी प्रिय! आपल्या शिक्षणक्षेत्रातील कामाने पतंगराव “शिक्षणमहर्षी” बनले, तर आर. आर. आबा “आधुनिक संत गाडगेबाबा” झाले. दोघांनीही शून्यातून विश्व निर्माण करण्याचा भीमपराक्रम केला. दोघेही लोकनेते ठरले. फरक इतकाच की, आबांनी स्वतःचा मतदारसंघ वगळता सांगली जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात फारसे लक्ष न घालता केवळ राज्यपातळीवरच ते केंद्रित केले. पतंगरावांनी स्वतःच्या आईच्या नावाने चालू केलेला ‘आदर्श माता’ पुरस्कार एके वर्षी आबांच्या आईंना प्रदान केला गेला आहे...त्याअर्थाने दोघांची मातृभक्ती केवळ वादातीत! दोघांनीही आपल्या भावंडांना शेवटपर्यंत आधार दिला. दोघांच्याही भावंडांनी आपापल्या भावाची अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत मनःपूर्वक काळजी घेतली. त्याअर्थाने दोघेही कुटुंबवत्सल होते!

जाता जाता आणखी एक आठवण सांगायचा मोह आवरत नाही. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना राज्यात ‘जम्बो कॅबिनेट (मंत्रिमंडळ)’ कार्यरत होते. तेव्हाच्या कॅबिनेटमधील काही मंत्री शुक्रवारी रात्री मुंबईतून कोल्हापूरला येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने आपापल्या गावी जात असत. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री या रेल्वेने प्रवास करत. शुक्रवारी रात्री मुंबईतून निघून ते दोन दिवस मतदारसंघातील कामे करत असत आणि रविवारी रात्री परत त्याच एक्स्प्रेसने मुंबईला जायला निघत. या दोन्ही दिवशी महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन जास्तीचे डबे जोडले जायचे. याला एक कारण होते. प्रत्येक मंत्र्याला एक्स्प्रेसच्या सर्वोच्च दर्जाच्या वातानुकूलित द्वितीय श्रेणी (सध्या या गाडीला वातानुकूलित प्रथम श्रेणी कंपार्टमेंटची जी सोय आहे, ती तेव्हा नव्हती.) बोगीमध्ये प्रत्येकी चार टायर्स (four seats of two tier AC compartment) मिळत. पुण्यापासून पुढे जाणारे सुमारे १२-१३ मंत्री प्रवासात असत, पैकी ६ मंत्री एकट्या सांगली जिल्ह्यातील असत. जिल्ह्याकडे मंत्रिपदे तर कोणती असावीत? आबा गृहमंत्री-उपमुख्यमंत्री, जयंतराव अर्थमंत्री, पतंगराव सहकारमंत्री आणि आणखी तीन मंत्री; म्हणजे सांगली जिल्ह्यातील एकूण आठ मतदारसंघांतून निवडून आलेल्या आमदारांपैकी सहाजण राज्य मंत्रिमंडळात मंत्री-राज्यमंत्री होते. एकूणच मुख्यमंत्री जरी जिल्ह्यातील नसले तरी जवळपास सगळी ‛पॉवरफुल’ खाती सांगली जिल्ह्याच्या खिशात होती...तशा अर्थाने सांगली हा १९९९-२०१४ या काळात राज्यातील सर्वशक्तिमान जिल्हा होता. आता आबा-पतंगराव (आणि काँग्रेसचे दुसरे एक महत्त्वाचे नेते मदनभाऊ पाटील) यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणाच्या नकाशात सांगलीचं स्थान पुसट होणार हे निश्चित! महालक्ष्मी एक्स्प्रेसचे ते दोन डबे ‛व्ही.आय.पी.’ डबे बनत असत. आत एक मिनी मंत्रालयच बसत असे. मंत्री, त्यांचे खाजगी सचिव आणि सुरक्षारक्षक असा तो लवाजमा असे. मलाही एक-दोन वेळा मामांच्याबरोबर (आबा) हा प्रवास करण्याचा योग आला होता. पहिल्यांदा जेव्हा मी ‛त्या’ डब्यात बसलो होतो तेव्हा मान. पतंगराव आणि मान. हसन मुश्रीफ साहेब (तेव्हा ते राज्यमंत्री होते) यांच्याशी मामांनी माझी ओळख करून दिली होती. ओळख सांगितल्यावर दोघांनीही (पतंगराव आणि मुश्रीफ साहेब) मला त्यांच्यासोबत बसवून घेतले, माझी विचारपूस केली; शिवाय मी ‛नको नको’ म्हणत असतानाही मला त्यांच्यासोबत जेवायला लावले होते. नंतर आबाही आम्हाला ‛जॉईन’ झाले. एकूणच त्या डब्यातून प्रवास करणे हे माझ्यासाठी एखाद्या सोहळ्यापेक्षा काही कमी नव्हते. मंत्रालयात न जाताही अर्धे मंत्रिमंडळ मला भेटले होते; आम्ही सगळे एकत्र जेवलो होतो. राजकीय भूमिका काहीही असल्या तरी त्या विसरून खेळीमेळीत राहण्याचे कसब त्या सर्वांच्या अंगी बाणले होते. हल्लीहल्ली नेत्यांच्या वैयक्तिक संबंधातील हा मोकळेपणा आणि जिव्हाळा कमी होतोय की काय अशी शंका वाटू लागली आहे. मुंबईतल्या मलबार हिल भागात स्थित दोघांचीही तत्कालीन शासकीय निवासस्थाने एकमेकांपासून काही फार लांब अंतरावर नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात दोघांचे एकमेकांकडे येणेजाणे व्हायचे.

आबांच्या निधनाचा कदम साहेबांना जबर धक्का बसला होता. आबा गेल्यानंतर आम्हा सर्वांना प्रचंड मानसिक धक्का बसला होताच, त्यातही आबांच्या आई बसलेल्या धक्क्यातून कुणीच समजावून सांगून सावरण्याच्या मनःस्थितीत नव्हत्या. आबांचा अंत्यविधी झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा पतंगराव साहेब घरी आले, तेव्हा माझ्या आजी (आबांच्या आई), “तुमच्यासारकाच माझा वाघासारका रावसाब बी पांढऱ्या कपड्यात फिरायचा, लोकास्नी भेटायचा,” असे म्हणून बराच वेळ रडत राहिल्या. सगळ्यांसोबत बसले असताना, “आर. आर. माझा भाऊ होता, त्यामुळे घरात कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, गरज पडली तर सरळ मला फोन करा. आबा मला धाकट्या भावासारखाच होता,” असेही सांगायला कदम साहेब विसरले नाहीत. दोघांचा स्नेह असा होता. आबा आणि पतंगराव दोघेही अकाली गेले. आबा त्यांच्यापेक्षा वयाने बरेच लहान होते. आता मात्र दोघेही या मर्त्य विश्वाच्या “पल्याड” कुठेतरी एकमेकांना भेटतील, बोलतील, आपले जुने दिवस आठवतील.

दोघांची मैत्री इतकी दाट की, दोघांचा मृत्यूही एकाच आजाराने आणि अगदी अनपेक्षितपणे झाला...भावांच्या या जोडीमधला धाकटा भाऊ आधी निघून गेला आणि नंतर आता मोठा भाऊ! आधी भेटले, मग आबांच्या निधनानंतर ते एकमेकांना दुरावले आणि आता वर कुठेतरी ते परत भेटतील!!! “आर. आर., तू गेल्यावरही लोकांच्या मनावर तुझंच राज्य आहे. केवळ तुझ्या मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आजही तुझ्या आठवणीत रमते, तुला आदर्श मानते,” असे कदाचित कदम साहेबांनी आपल्या धाकट्या भावाला एव्हाना सांगितलंही असेल. ब्रह्मदेवाने संधी दिली तर दोघेही ‘आपल्याला आमच्याआमच्या मतदारसंघातच पुनर्जन्म मिळावा आणि तेथील जनतेची सेवा करण्याची संधी परत मिळावी’ अशी त्याला विनंती करतील याची मला तरी खात्री वाटते.

राम-लक्ष्मणाची ही जोडी आता आपल्याला परत कधीही बघायला मिळणार नाही, ही खंत आपणा सर्वांच्या मनात कायमच राहील. राजकारणाच्या सर्वोच्च क्षितिजावर एकेकाळी आपल्या प्रखर तेजाने तळपणारी सांगली आता पुढील काही काळासाठी तरी काळवंडलेलीच राहील.

राम-लक्ष्मण (दोघेही आलटून पालटून रामाच्या आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत राहिले आहेत!) त्यांच्या जनतारुपी लेकरांना सोडून आता कायमचे वनवासात गेले आहेत..! एका मोठ्या पर्वाला आता कायमचा पूर्णविराम मिळाला आहे.!! महालक्ष्मी एक्सप्रेसचा तो ‘व्ही.आय.पी.’ डबा आता काळाच्या इंजिनाच्या मागे पडत चालला आहे!!!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

Comments

  1. राज्याच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राचे सतत प्राबल्य राहिले आहे, आणि त्यातही सांगलीचे विशेषच! सांगलीशेजारचा कोल्हापूर जिल्हाही ‘पॉलिटिकली हेवीवेट’ लोकांचा जिल्हा आहे, मात्र राज्य आणि देशपातळीवर सांगली जिल्ह्यातील नेते जेवढे यशस्वी होतात तेवढे ते कोल्हापूर जिल्ह्यातील होताना दिसत नाहीत. याचे एक कारण आहे...सांगलीचे नेते जिल्ह्यात/स्थानिक पातळीवर जोरदार भांडतात, एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात; पण मुंबई-दिल्लीला गेले की ते फक्त सांगलीसाठी-तिच्या विकासासाठी लढतात.
    Ata aaplya sangliche kas honar yachi kalaji vatate. Ya ram lakshamanachya jodila devane parat sanglichya matitach navin inning suru karayla pathavave hich devakde prarthana......
    Vachta vachta kadi dole ole zale nahi samjal..........

    ReplyDelete
  2. छान निरिक्षण, असे नेते होणे नाही 🙏

    ReplyDelete
  3. Kay pratikriya dyavi hech kalat nahi...nishabd

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच संतोष... जे झालंय ते अतिशय वाईट झालंय.
      खरंच निःशब्द!

      Delete
  4. अमित, काय बोलू आता.कालच आपला या विषयावर बोलणं झालेलं. पण वाचताना खूपच भावुक व्हायला झालं. लिहिण्याची शैली इतकी ओघवती की वाचताना आपण सर्व समोरच बसलो की काय असं वाटत होतं.
    आबा आणि साहेब दोघेही ग्रेट. सलाम त्यांच्या जिद्दीला, व्यक्तिमत्वाला, त्यांच्या माणुसकीला..

    ReplyDelete
    Replies
    1. होय अमित.
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
      दोघेही प्रचंड कार्य करून निघून गेले; पण अगदी अचानक!
      श्रद्धांजली!!!

      Delete

Post a Comment