सतीप्रथा: इतिहास, संस्कृती आणि सुधारणा/ Custom of Sati: The history, culture and reforms

दुर्गभ्रमंतीदरम्यान आढळलेल्या सतीशिळा आणि तद्नुषंगाने सतीप्रथेचा इतिहास आणि राजा राममोहन रॉय यांचे कार्य!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

दुर्गभ्रमंतीला तंतोतंत इंग्रजी शब्द अस्तित्वात नाही. ट्रेकिंग (trekking) किंवा हायकिंग (hiking) म्हणजे पर्वतारोहण...अर्थात वेगवेगळ्या डोंगर-पर्वतांवरची चढाई! पण, प्रत्येक डोंगर म्हणजे गडकिल्ला नव्हे!! छत्रपतींच्या स्वराज्यात जन्मलेले मावळे फक्त पर्वतारोहणच करत नाहीत तर छत्रपतींच्या आचारविचार- आणि पद-स्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर भ्रमंती (अर्थातच दुर्गभ्रमंती) करण्याचे पुण्यही ते पदरात पाडून घेऊ शकतात.

आपल्याकडे दुर्गभ्रमंती बरेच लोक करत असतात; मात्र त्यातही प्रत्येकाचे हेतू आणि आवडी वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतात. उदाहरणच घ्यायचे तर, काहीजण शिवकालीन व तत्पूर्वीच्या इतिहासाचा चांगला अभ्यास करण्यासाठी गडांवर जातात; काहीजण छायाचित्रणासाठी वेगवेगळ्या जागा शोधायच्या निमित्ताने जातात; काहीजण आरोग्यदायी राहण्याच्या हेतूने गडांवर जातात; तर अन्य काही लोक केवळ गड चढून वर काहीही न अभ्यासता परत येतात (भेट दिलेल्या गडांची संख्या वाढविणे इतका एक हेतू त्यामागे असतो). मला मात्र प्रत्येक गडावर जाताना त्या गडाचा इतिहास, गडाचे भौगोलिकदृष्ट्या असलेले स्थानमहात्म्य, गडावरील ऐतिहासिक वास्तू, वैशिष्ट्यपूर्ण सोयी (उदा. भूदरगड, रांगणा, मनोहरगडाच्या तटबंदीमध्ये अजूनही पूर्ण शाबूत असलेले शौचकूप किंवा शिवगडावरील धबधब्यात असणारे वैशिष्ट्यपूर्ण असे पाणी साठविण्याचे कुंड किंवा सामानगडावरील मोठमोठ्या बावड्या), गडपरिसरातील लोकवस्ती, गडावरील प्राणी आणि वनस्पतीसृष्टी, रानफुले अशा सर्व गोष्टींच्या अभ्यासात कमालीचा रस आहे. त्यामुळे कोणत्याही दुर्गभ्रमंती मोहिमेवर निघताना अशा सगळ्या गोष्टींचा पूर्वाभ्यास केल्याशिवाय आणि दुर्गभ्रमंतीदरम्यान पुस्तक जवळ असल्याशिवाय मी बाहेर पडत नाही.

सुमारे चाळीसभर गडकोट फिरल्यावर मी असे निरीक्षण नोंदवू शकतो की, जवळपास सर्व गडांवर काही गोष्टी सामान्यतः अस्तित्वात असतात; जसे की, शिवपिंड/महादेव मंदिर किंवा एखाद्या गडदेवीचे मंदिर किंवा पाण्याचे कुंड किंवा ‘वीरगळ’ (युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या शूरांची दगडी स्मारके) इ.

माझी बदली मागील वर्षी पालघर जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात झाल्यामुळे यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील १३ गडकोटांवर भ्रमंती करण्याचा मी पण केला होता. त्या नियोजनानुसार मी जिल्ह्यातील १३ गड व्यावसायिकरीत्या (professionally) फिरलो. कोल्हापूर जिल्ह्यातील गडांवर एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. ती म्हणजे, यांतील बऱ्याच गडांवर असणाऱ्या ‘सतीशिळा’ किंवा ‘सती गेलेल्या स्त्रियांची स्मारके’! ह्या शिळा किंवा स्मारके आज एक इतिहास बनून गडकोटांवर उभी असली तरी एकेकाळी कठोर वर्तमानातून जाऊन वेदनादायक मृत्यू स्वीकारलेल्या तत्कालीन स्त्रियांची ती आजही आठवण करून देतात. चंदगड तालुक्यातील ‘पारगडा’वर मी माळवे या महिलेचे बांधीव सतिस्मारक पाहिले, ते पहिलेच. त्यानंतर ‘शिवगड’, ‘विशाळगड’ या गडांवरही मला सुस्थितीतील सतीशिळा/सतिस्मारके आढळली. आत्ता अगदी मागील रविवारी (दि. ९ एप्रिल, २०१८) मी जेव्हा विशाळगड दुर्गभ्रमंती केली तेव्हा तिथे चक्क ५१ स्त्रिया सती गेल्या तेव्हाचे स्मारक पाहता आले. एक ऐतिहासिक वारसा म्हणून या स्मारकांकडे आपण पाहू शकतो, पण गडकोटांवर ती आढळल्याने माझ्या मनात सतीप्रथेबद्दल कुतूहल जागृत झाले आणि मी माहिती मिळवू लागलो. त्यातूनच आकाराला आलेला हा एक लघुलेख.

सती: आत्मक्लेश, आत्मसमर्पण, आत्मत्याग

आज २१ व्या शतकात आपण स्त्री-पुरूष समानतेच्या विचारांचा जागर करत असूनही याबाबतीत अजूनही म्हणावी तितकी प्रगती आपल्याला साधता आलेली नाही. आत्ताची तरुण पिढी याच विचारांसोबत जन्माला आल्यामुळे कदाचित सती जाण्याच्या प्रथेकडे आपण पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे काहीजण याबाबतीतील हिंदू संस्कृतीच्या म्हणण्याबद्दलही अनभिज्ञ असतील. त्यामुळे हा विषय माझ्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.

या लेखाची मी दोन मुख्य भागांत विभागणी केली आहे. पहिला भाग हा सतीप्रथेचा इतिहास आणि ही प्रथा वेगवेगळ्या स्वरुपात कशी चालू राहिली याबद्दल माहिती दिली आहे, तर दुसऱ्या भागात मी आज काही गडांवर अस्तित्वात असलेल्या सतीशिळांबद्दल सचित्र माहिती देणार आहे. चला तर मग...

(अ) (१) सतीप्रथा: इतिहास आणि हिंदू संस्कृती-
सती हे ‘सत्’ या संस्कृत शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. ‘सती जाणे’ याचा अर्थ एखाद्या विवाहित स्त्रीने (अर्थातच पतिनिधनानंतर ती विधवा झालेली असते) आपल्या मृत पतीच्या धगधगत्या चितेवर स्वतःला झोकून देऊन आत्मदहन करून घेणे.

सती गेल्याची पहिली नोंद ही इ. स. ५१० साली एरण येथील अभिलेखांमध्ये सापडते. एरण हे मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील विदिशाजवळील बेतवा नदीजवळील विंध्याचल पर्वतरांगांमधील उत्तरेकडील पठारांतील एक वैष्णव तीर्थक्षेत्र आहे, जिथे मंदिरांची एक मोठी श्रृंखला अस्तित्वात आहे. एरणचे महाराज भानूगुप्त युद्धावर जाताना त्यांच्याबरोबर गोपराज होते ज्यांना युद्धात वीरगती प्राप्त झाली. त्यांची पत्नी सती गेली. आणि, याच घटनेचा उल्लेख एरणच्या त्या अभिलेखात करण्यात आलेला आहे.

अभिलेखात सतीची नोंद इ. स. ५१० मध्ये झालेली असली तरी हिंदू पुराणांमध्येसुद्धा सतीचा उल्लेख होता. सती (दक्षायणी हे तिचे दुसरे नाव) ही भगवान शिवाची पहिली पत्नी होती. सतीचे पिता राजा दक्ष यांनी सतीचे पती असलेल्या (म्हणजे दक्षाचे जावई) शिवाचा केलेला अपमान सतीला सहन न झाल्यामुळे तिने यज्ञातील अग्नीत स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. अर्थात यावेळी तिचे पती शिव हे जिवंत होते. त्यांच्या मृत्यूपूर्वीच सतीने यज्ञाग्नीमध्ये स्वप्राणार्पण केले. पुराणात एकूण तीन सती प्रसिद्ध आहेत - सती अनुसया, सती अहिल्या आणि सती सीता! या तीन सतींचे वैशिष्ट्य म्हणजे या तिघीही पती जिवंत असताना सती गेल्या होत्या. तसेच या तिघींवर सती जाण्याची कसलीही सक्ती कुणीही केली नव्हती. त्यामुळे ‛सती जाण्याच्या’ पद्धतीला हिंदू धर्माची मान्यता होती असा दावा सहजासहजी करता येणार नाही.

सतीचे पती शिव याचा सतीचे पिता दक्ष यांनी अपमान केल्यामुळे सतीने यज्ञातील अग्नीत आत्मार्पण केले

(२) सतीप्रथेचा आणखी एक प्रवाद-
द्वापारयुगात महाभारत काळात घडलेल्या एका घटनेत मात्र पतिनिधनानंतर पत्नी सती गेल्याचा उल्लेख आहे. पांडवांचे पिता राजा पंडू याला कुंती आणि माद्री नावाच्या दोन पत्नी होत्या. युधिष्ठिर, अर्जुन, भीम ही पंडू राजाला कुंतीपासून झालेली तर नकुल आणि सहदेव ही माद्रीपासून झालेली मुले होती. खरेतर पंडूराजाला एका ऋषींनी असा शाप दिला होता की, जेव्हा कधी तो एखाद्या स्त्रीशी संबंध ठेवेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. त्यामुळे त्याला अपत्यप्राप्ती होणे शक्य नव्हते. मात्र कुंतीला वरदानामुळे मिळालेल्या एका मंत्रामुळे राजा पंडूला तिच्यापासून उपरोल्लेखित मुले झाली आणि तो तिने माद्रीला सांगितल्यामुळे तिलाही दोन मुले झाली. नंतर एकदा पंडू राजाने माद्रीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या गोष्टीला स्वतःला जबाबदार मानून माद्री स्वतःच्या पतीच्या चितेवर सती गेली. पतिनिधनानंतर सती जाणारी माद्री बहुधा पहिलीच!

(३) पतिनिधनानंतर सती जाण्याची पद्धत दृढ होण्याची कारणे-
भारतावर इ. स.च्या ११ व्या शतकापासून परकीय आक्रमणे व्हायला सुरुवात झाली; ज्यातील इस्लामी आक्रमणे आक्रमक आणि सामर्थ्यवान होती. त्यांनी प्रामुख्याने वायव्य भारतावर जोरदार आक्रमणे केली. या प्रांतात मोठ्या प्रमाणात राजपूत राज्यकर्ते राज्य करत असत ज्यांचा इस्लामी आक्रमणापुढे निभाव लागला नाही. इस्लामी राजवटी सामर्थ्यवान असल्या तरी त्या अत्याचारी आणि जुलमी होत्या. युद्धात जिंकलेल्या राजवटींमधील राजस्त्रिया आणि राज्यातील अन्य महिलांवर जेते अत्याचार करून त्यांची अब्रू लुटत. या अत्याचारामुळे मग वीरपत्नींनी स्वपतीच्या चितेसोबतच आत्मत्याग करण्याचा मार्ग अवलंबायला सुरुवात केली. प्रथा सुरू झाली तेव्हा स्त्रिया सरळ चितेवर उड्या मारत नसत. त्या स्वतःच एक खड्डा खणत आणि त्यात अग्नी प्रज्वलित करून त्या खड्ड्यात उडी मारत असत. नंतर नंतर मात्र चितेवर थेट उडी घेऊन आत्मार्पण करण्याची पद्धत रूढ झाली. वायव्येकडे चालू झालेली ही पद्धत हळूहळू केवळ पूर्वच नव्हे तर पश्चिम भारतातही पसरली. सतीप्रथा दृढ होऊ लागली.

यानंतर सतीप्रथा जरी चालू राहिली तरी, तिच्यामागील संदर्भ आणि कारणे मात्र बदलली. अत्याचारापासून सुटका करून घेण्याचे मूळ कारण बदलून मग बऱ्याचदा समाजाने स्वार्थ साधण्यासाठी ही वेदनादायी प्रथा चालू ठेवली. वीरगती प्राप्त झालेल्या व्यक्तीची संपत्ती हस्तगत करण्यासाठी त्याच्या विधवेला जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडण्यात येऊ लागले. काही ठिकाणी तर बंदुकांचा धाक दाखवून सती जाण्यास प्रवृत्त केले जाऊ लागले.

शस्त्रांचा धाक दाखवून विधवेला पतीच्या चितेवर सती जाणे भाग पाडण्यात येऊ लागले; एका प्रथेचा इच्छा ते जबरदस्ती हा प्रवास
या सतीप्रथेवर पुढे धर्माचा रंग चढवला गेला. एखाद्या जिवंत व्यक्तीला जाळणे हे धर्माच्या दृष्टीने पाप मानले जात असूनही तसा विचार करायला कोणीही प्रवृत्त होत नव्हते. जळत असलेल्या व्यक्तीला होणाऱ्या वेदना आणि हाल-अपेष्टांचा विचार होणे ही तर अगदीच अशक्यकोटीतली गोष्ट होती.
(४) सतीप्रथेवर बंदी, विरोध, सुधारणा आणि राजा राममोहन रॉय यांचे महत्कार्य-
इ. स.च्या १५ व्या शतकात काश्मीरचा शासक सिकंदर याने त्याच्या राज्यात या कुप्रथेवर बंदी आणली. भारताचा सम्राट अकबर यानेही या प्रथांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र,  हे प्रयत्न सार्वत्रिक होऊ शकले नाहीत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज मृत्यू पावल्यावर राजमाता जिजाबाई पतीच्या चितेवर सती जाण्यासाठी तयार झाल्या होत्या; नव्हे तसा त्यांचा निग्रहच झाला होता. मात्र, शिवाजी महाराजांनी मोठ्या मिन्नतवारीने त्यांना सती जाण्यापासून रोखले. अर्थात, तरीही ही गोष्ट वैयक्तिक पातळीवरच राहिली; तिचे सामाजिक पातळीवर सार्वत्रिकीकरण त्याहीवेळी झाले नाही.

पुढे इंग्रजांनी भारतावर राजकीय पकड मिळविल्यावर या अनिष्ट प्रथेबद्दल त्यांनी गांभीर्याने विचार करायला सुरू केले. ही प्रथा अनिष्ट तर होतीच, शिवाय क्रूरही होती. इंग्रजांनी भारतात ज्या काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, त्यापैकी या कार्याबद्दल त्यांचे आभार मानायला हरकत नसावी. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या काही अधिकाऱ्यांबरोबरच गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड हेस्टिंग्ज यांनीही ही प्रथा थांबविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सतीबंदीच्या नियमाचे कायद्यात रुपांतर करण्याचे मोलाचे कार्य गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी केले. या त्याच्या कार्यात राजा राममोहन रॉय यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी या प्रश्नावर जनजागृती करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या ‘संवादकौमुदी’ या वर्तमानपत्रातून सतीप्रथेविरोधात बरेच लिखाण केले. त्यांच्या या भूमिकेला तत्कालीन समाजाने बराच विरोध केला. त्यांना धर्मविरोधी मानले गेले. इतकेच नव्हे तर महाराजा बालकृष्ण बहादूर यांनीसुद्धा त्यांच्या सतीप्रथाविरोधी आंदोलनाला कडाडून विरोध केला.

थोर समाजसुधारक: सतीप्रथेला कडाडून विरोध करणारे राजा राममोहन रॉय

पण, राजा राममोहन रॉय केवळ इतक्यावरच थांबले नाहीत. सतीप्रथाविरोधी कायदा भारतात होऊ घातला आहे हे समजताच इंग्लंडच्या ‘प्रायवी कौन्सिल’मध्ये तेथील पारंपारिकतावादी आणि कट्टरतावाद्यांनी हा कायदा होण्याच्या विरोधात अपील दाखल केले. (त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते.) येथे विल्यम बेंटिंग यांचेही प्रयत्न अपुरे पडण्याचे चित्र दिसू लागले. त्यावेळी राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथाबंदी कायद्याच्या समर्थनात प्रायव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केले. रॉय यांच्या प्रयत्नांना यश येऊन कट्टरतावाद्यांचे अपील कौन्सिलकडून अस्वीकृत करण्यात आले. या गोष्टींच्या बळावरच मग नंतर लॉर्ड बेंटिंगने भारतात सतीप्रथाबंदी कायदा लागू केला. यामुळे सतीप्रथाबंदी करण्याच्या कार्यात राजा राममोहन रॉय यांचे नाव अग्रक्रमावर आले.

इ. स. १९२९ मध्ये १७ व्या कायद्यांतर्गत सर्वप्रथम बंगाल प्रांतात सतीप्रथाबंदी कायदा लागू करण्यात आला. नंतर १९३० साली हा कायदा मुंबई आणि मद्रास प्रांतात लागू झाला.

(ब) गडकिल्ले आणि त्यावरील सतीशिळा व सतीस्मारके-
महाराष्ट्रातील बऱ्याच गडकिल्ल्यांवर दुर्गभ्रमंती करताना त्या-त्या ठिकाणी सती गेलेल्या स्त्रियांची स्मारके आढळतात. यात अगदी राजघराण्यातील स्त्रियांपासून ते समाजाच्या कनिष्ठ स्तरांमधील स्त्रियांचा समावेश आहे. मी या लेखात मुख्यत्वेकरून कोल्हापूर आणि सातारा परिसरातील काही गडांवरील सतीस्मारकांबद्दल लिहिले आहे.

महाराष्ट्र-गोवा सीमेवर उभ्या ठाकलेल्या चंदगड तालुक्यातील पारगडावर तुळसाबाई माळवेंची समाधी आहे. इ. स. १६८० मध्ये स्वराज्यासाठी लढताना विठोबा माळवे धारातीर्थी पडले तेव्हा त्यांच्या पत्नी तुळसाबाई सती गेल्या होत्या...त्यांचे हे स्मारक!

किल्ले पारगाव: तुळसाबाई विठोबा माळवे सतीस्मारक


किल्ले भुदरगडावरील पठारावर आणि दूधसागर जलाशयाशेजारीही बऱ्याच समाध्या आढळतात, त्यात काही सतीशिळा असाव्यात असे वाटते (खात्री नाही).

भुदरगडावर अशी बरीच स्मारके आणि समाध्या जागोजागी आढळतात; यातील काही स्मारके सती गेलेल्या स्त्रियांची असावीत असा अंदाज आहे!

राधानगरी तालुक्यातील दाजीपूरजवळील किल्ले शिवगडावर तटबंदी आणि चौथऱ्याचे काही अवशेष सोडल्यास गडावर असणारी सतीशिळाच केवळ सुस्थितीत असल्याचे आढळते. शिवगडाच्या भग्न महादरवाज्यातून आत जाऊन दुहेरी तटबंदी (हे शिवगडाचे वैशिष्ट्य!) ओलांडल्यावर सतीशिळेचा हा सुस्थितीतला दगड आपले लक्ष लगेच वेधून घेतो. सध्या या शिळेची थोडी डागडुजी केल्याचे आढळते.

दुर्गम भागातील दाजीपूर अभयारण्यात वसलेल्या शिवगडावरील ही सतीशिळा ही या गडावरील सर्वाधिक लक्षवेधक रचना आहे!


किल्ले विशाळगडावर तर दोन वैशिष्ट्यपूर्ण सतीस्मारके आढळतात.
त्यातील बऱ्यापैकी सुस्थितीतील आणि महत्त्वाचे स्मारक म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (पहिले) यांच्या पत्नी अहिल्याबाई राणीसाहेब यांचे सतीस्मारक. राजाराम महाराजांचे सिंहगडावर निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी ५ मार्च, १७०० रोजी महाराजांच्या पगडीसोबत विशाळगडावर सती गेल्या. १९४० साली करवीरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी या स्मारकाचा जीर्णोद्धार केला त्यालाही आता सुमारे ८० वर्षे होत आली.

सतीप्रथा ही राजघराण्यातील स्त्रियांपासून ते सामान्य घरातील स्त्रियांपर्यंत सर्व स्तरांतील स्त्रियांकडून पाळली जात असे.



विशाळगडाच्या पश्चिमेकडील भागाकडे जाताना अहिल्याबाई राणीसाहेबांचे हे सतीस्मारक आपले लक्ष वेधून घेते.


विशाळगडावरील दुसरे महत्त्वाचे ठिकाण म्हणजे ५२ स्त्रिया सती गेल्याचे स्मारक. एकत्रित एकाचवेळी इतक्या स्त्रिया सती जाणे हे विशेष!

विशाळगडावर या ठिकाणी ५२ स्त्रिया सती गेल्याची नोंद आहे...त्यामानाने ही गोष्ट वैशिष्ट्यपूर्णच!


विशाळगडावरील सतीशिळेचे काही भग्नावशेष



पन्हाळगडावर सतिस्मारकापेक्षाही एक वेगळे स्मारक आहे. गडावरील अंबारखाना प्रसिद्ध आहे. याच परिसरात अंबारखान्याच्या संरक्षक भिंतीमध्ये स्वप्राणांची आहुती दिलेल्या एका स्त्रीचे स्मारक शिळेच्या स्वरुपात आहे. इ. स. १७७० मध्ये बालेकिल्ल्याची तटबंदी बांधताना जखुबाई तेलीणीने तटाच्या एका बुरुजात स्वतःला जिवंत पुरुन घेतले याचे लेखी दाखले संशोधकांना मिळाले आहेत. स्वराज्यासाठी आत्मत्याग करणाऱ्या अशा शूरवीर स्त्रीचे निदान पन्हाळगड पाहताना तरी जरूर स्मरण व्हावे.

पन्हाळगडावरील बालेकिल्ल्याची तटबंदी बांधताना ती व्यवस्थित उभी राहत नसल्याने तेथील बुरुजात एका स्त्रीने (गरोदर मातेने) स्वतःला जिवंत पुरून घेतल्याच्या नोंदी आहेत.

पन्हाळगडावरील अंबारखान्याच्या तटबंदीतील जखुबाई तेलिणीचे दुर्लक्षित स्मारक

आत्ता इतक्यातच म्हणजे १५ एप्रिलला मी सातारा जिल्ह्यातील वसंतगडावर दुर्गभ्रमंती केली. या भटकंतीत गडावरील कृष्णा तलावाच्या काठावर बऱ्याच समाध्या आणि सतीशिळा आढळून येतात.

सातारा जिल्ह्यातील वसंतगडावरील कृष्णा तलावाच्या काठावरील सतींची अनेक स्मारके



सती या शब्दाला अन्य शब्दांशी जोडून सती म्हणजे पवित्र असा अर्थ जरी सूचित केला जात असला आणि तिला अशा पद्धतीने देवत्व बहाल केले जात असले तरी, इतिहासाने सती जाणाऱ्या स्त्रीच्या मानसिक आणि वेदनादायक शारीरिक पीडेचा कधीच विचार केला नाही. एका अर्थाने ही तत्कालीन स्त्रियांना समाजाकडून मिळालेली हीन दर्जाची वागणूकच!


दुर्गभ्रमंतीला गेल्यानंतर या स्त्रियांचे, त्यावेळी त्यांच्यावर झालेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अन्यायाचे, तत्कालीन स्त्री-पुरुष असमानतेचे, विधवा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे, त्यातून सुटका होण्यासाठी स्त्रियांनी स्वीकारलेल्या वेदनादायी मार्गाचे आणि वाटेत येईल ते भस्म करणाऱ्या अक्राळविक्राळ ज्वाळांना स्वतःभोवती लपेटून घेताना त्यांनी फोडलेल्या काळीज चिरत जाणाऱ्या किंकाळ्यांचे आणि तत्कालीन स्त्रियांनी स्वराज्ययज्ञात केलेल्या आत्मत्यागाचे आपण क्षणभर तरी स्मरण करावे...आणि, हे करतानाच राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या क्रांतिकारी समाजसुधारकाचे दीपस्तंभासारखे कार्य मनी जागवावे, इतकाच हेतू!!!

संदर्भ:
(१) आंतरजालावरील विविध संकेतस्थळे
(२) वीकिपेडिया
(३) दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे: लेखक भगवान चिले

© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील
www.dramittukarampatil.blogspot.in
www.trekdoctoramit.blogspot.com

Comments

  1. Thanks Amit ,Great yar, Britisher gave protective law for Indian women, Till 1917 our society murdered innocent women on the name of religion...how cruel we were? Thanks for British East India Company & Rajaram Mohan Roy.

    ReplyDelete

Post a Comment