“स्पर्श”- हरवत चाललेली एक ‘अनुभूती’ (The touch: An experience on the verge of being lost!)

“स्पर्श”- हरवत चाललेली एक ‘अनुभूती’
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(कनिष्ठ निवासी १- बालरोग चिकित्साशास्त्र,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद)

माणसाच्या पाच मुख्य ज्ञानेंद्रियांपैकी एक महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे आपली त्वचा! त्वचा हा शरीरातील सर्वांत मोठा अवयव असला तरी पंचेंद्रियांतील नेत्र (डोळे), कर्ण (कान), जिव्हा (जीभ), नासिका (नाक) यांना जेवढे महत्त्व आपण देतो तितकेसे ते आपल्याकडून त्वचेला दिले जात नाही. मी या लेखाद्वारे त्वचा ज्या ज्ञानाची जाणिव आपल्याला करून देते, त्या स्पर्शाबद्दल मला काही बोलायचंय.



स्पर्शाच्या जाणिवेची सुरुवात आपल्या जन्मापासून होते. बाळाला झालेला आईचा पहिला स्पर्श! आई आणि मुलाचं कायमस्वरुपी नातं बांधून ठेवण्याचं काम हा स्पर्श करत असतो. जॉन कीट्सने म्हटल्याप्रमाणे, ‘स्पर्शाला स्मरणशक्ती असते!’ (Touch has memory). आईच्या स्पर्शाचे हे स्मरण आपली आयुष्यभर साथ देते. आमच्या वैद्यकशास्त्राने तर याचा वापर उपचारातही करून घेतला आहे. कमी वजनाची जी बालके जन्माला येतात त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान कमी होण्याचा (hypothermia) आणि त्यामुळे जीविताला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. अशा बाळांना काचेच्या पेटीत (incubator) ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण, या पेट्या सर्वत्र उपलब्ध नसतात किंवा आपल्या देशात त्यांची संख्या लोकसंख्येच्या मानाने कमी आहे म्हणा; ज्यामुळे शास्त्रज्ञांनी एक सोपी पण प्रभावी युक्ती शोधून काढली आहे, ज्या पद्धतीला ‘कांगारू माता काळजी’ (Kangaroo Mother Care) असेही म्हणतात. यामध्ये तापमान कमी होण्याचा धोका असलेल्या बाळाला आईच्या त्वचेच्या थेट संपर्कात ठेवले जाते. आईच्या मायेच्या उबदार स्पर्शाने बाळ सुदृढ राहते आणि धोक्यातून बाहेर पडते. आईचा स्पर्श असतोच असा...



आईनंतर मुलांना लाभतो तो वडिलांचा स्पर्श...जितका मऊ, हळवा, सुरक्षित (protective); तितकाच राकट, कणखर आणि आश्वासक! आईच्या स्पर्शात ‘माये’चा जितका ओलावा असतो, तितकाच ‘कर्तव्या’चा स्पर्श वडिलांचा असतो. जीवन जगताना मायेच्या उबेबरोबरच कठोर हृदयाचीही तितकीच आवश्यकता असते. वडिलांचा स्पर्श त्याची जाणीव करून देतो. आईचा स्पर्श हृदयाचा वापर करायला शिकवतो, तर वडिलांचा हात थेट मेंदूला कामाला लावू इच्छितो. जीवन जगताना या दोहोंचे योग्य संतुलन राखण्याची कसरत करावी लागते. आपली चूक झाल्यानंतर आईच्या पदराआड लपताना आईच्या पदराचा झालेला ‘सुरक्षित’ स्पर्श, चुकीची शिक्षा देण्यासाठी वडिलांनी मारलेले फटके खाताना वडिलांच्या हाताचा झालेला ‘शिस्तीचा’ स्पर्श, ती चूक मात्र खाताना कबूल केल्यानंतर थोड्या वेळाने वडिलांनी परत जवळ घेताना त्यांचा आपल्याला झालेला ‘आश्वासक’ स्पर्श... आणि, सरतेशेवटी चुकीबद्दल माफी मागत  आईच्या कुशीत शिरताना आईचा झालेला ‘विश्वासाचा’ स्पर्श- हे सगळे स्पर्श एका घराचने- एका कुटुंबाने आपल्या पुढच्या पिढीवर केलेले ‘सुसंस्काराचे’ स्पर्श असतात.

आई-वडिलांनंतर आपल्याला जाणवतो तो आजी-आजोबांचा स्पर्श; त्यातही विशेषतः आजीचा स्पर्श विशेष असतो ! माया, जिव्हाळा, कोमलता, मऊपणा, सुरक्षितता, उबदारपणा, आश्वासकता, सुसंस्कारितता असे सगळे गुण सामावलेला व्यक्तीच्या आयुष्यात येणारा एकमेव स्पर्श म्हणजे आजीचा स्पर्श! आजीने ‘यशवंत हो’ असे म्हणताना तिने आपल्या डोक्यावर ठेवलेल्या हाताचा स्पर्श आणि आजी-आजोबांच्या (आई-वडील आणि सगळ्याच वडिलधाऱ्यांच्या) पायाला होणारा आपल्या हाताचा किंवा पायावर माथा ठेवताना माथ्याचा होणारा स्पर्श... तो केवळ अनुभवावा- तो अनुभव शब्दांत मांडणे केवळ अशक्य!



शाळेत गेल्यावर आपल्या स्पर्शाचे अनुभव आणखीन वाढतात. त्यातले बरेच असतात ते शिक्षकांचे आपल्याला होणारे स्पर्श! शाळेच्या पहिल्या काही दिवसांत आपल्या बाईंनी आपण रडत असताना आपल्याला उचलून घेतल्यावर त्यांचा होणारा ‘कुतुहूलमिश्रित माया आणि विश्वासा’चा स्पर्श! वय वाढेल आणि शिक्षा मिळत जाईल तसा तो स्पर्श ‘दरारायुक्त’ भीतीचा होतो आणि जेव्हा आपली त्यांच्याकडून कोणत्याही कारणासाठी स्तुती केली जाते, तेव्हा त्यांची शाबासकीची थाप आपल्या पाठीवर पडताना होणारा त्यांचा ‘प्रेरणादायी’ स्पर्श!

आपल्या भावंडांच्या आपल्याला होणाऱ्या स्पर्शाची विविधता तर काय वर्णावी! लहान भावंड एकदम छोटं असताना त्याला आईच्या हातात अर्धे ठेऊन आपल्या लहान आणि वजन न पेलणाऱ्या हातात घेतानाची धडपड करताना त्याच्या लहानशा शरीराचा आपल्या ओंजळीला होणारा ‘इवलासा’ स्पर्श; लहानग्या भावंडाला आपल्या बोटाला धरून चालवून आणताना त्याच्या/तिच्या कोमल बोटांचा आपल्या हाताला होणारा ‘चिमुकला’ स्पर्श; कोणत्याही कमी-महत्त्वाच्या गोष्टीवरून किंवा कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय भावाशी/बहिणीशी भांडताना, त्याला/तिला मारताना होणारा स्पर्श; आपल्या चिमुकल्या हातांनी भावाला राखी बांधताना तिचा त्याच्या उजव्या हाताला होणारा ‘विश्वासा’चा आणि ‘प्रेमाचा’ स्पर्श; ते बहीण-भाऊ मोठे होताना राखी बांधून झाल्यावर ‘गिफ्ट’ हक्काने मागण्यासाठी भावाचे मनगट घट्ट धरून हट्ट करतांना बहिणीचा त्याला झालेला ‘लाडिक पण आग्रही’ स्पर्श; आणि दोघेही मोठे होऊन समजूतदार (mature) झाल्यावर बहिणीने राखी बांधून झाल्यावर भावाला औक्षण करताना ‘सांभाळून रहा, काळजी घे रे स्वतःची’ असे सांगताना झालेला ‘काळजी’चा स्पर्श! भावाभावांतील नात्यात स्पर्शाचे महत्त्व आणखीनच वेगळे असते असे म्हटले तरी चालेल. लहानपणी मोठ्या भावाच्या हाताला धरून चालताना त्यांचा एकमेकांना झालेला स्पर्श, मोठ्या भावाने लहान भावाची खोडी काढताना त्याचा झालेला स्पर्श, मन लावून जोरजोरात भांडताना मारामारी झाल्यावर एकमेकांना झालेला ‘दुखरा’ स्पर्श आणि शिक्षण/नोकरीसाठी घराबाहेर पडताना निरोप घेण्याच्या वेळी मिठी मारल्यावर झालेला एकमेकांचा ‘हळवा’ आणि तरीही ‘आश्वासक’ स्पर्श..! कधीकधी तोच मोठा भाऊ एखाद्या गंभीर आजारामुळे ‘बेडरिडन’ झाल्यावर सुश्रुषा करताना, त्याचा हात हातात घेतल्यावर- कदाचित थोड्याच दिवसांत जन्मानंतरची पहिलीच ताटातूट होण्याच्या शक्यतेच्या अस्वस्थतेपोटी  होणारा ‘आत्यंतिक घालमेली’चा स्पर्श...नकोनकोसा वाटतानाही हवाहवासा वाटणारा ‘हा’ स्पर्श!



लहानपणी मैत्रिणीबरोबर ( खरेतर, सवंगडी हा शब्द जास्त योग्य आहे!) खेळताना निर्मळ भावनेतून तिला होणारा ‘खोडकर’ स्पर्श...आणि, आपण महाविद्यालयात गेल्यावर आपल्या दुचाकीच्या मागे एखाद्या मैत्रिणीला पहिल्यांदाच बसवून नेताना तिचा होणारा ‘खट्याळ’ स्पर्श... आणि, कदाचित तीच मैत्रीण प्रेयसी बनली तर तिला प्रेमाने जवळ घेताना तिचा होणारा ‘अंग अंग मोहरणारा’ स्पर्श... विवाहसमयी संपन्न होत असणाऱ्या ‘दोघांनी करायच्या’ वेगवेगळ्या पूजा-विधींच्या वेळी वधूवरांचा एकमेकांना होणारा ‘हवाहवासा, पण चोरटा’ स्पर्श; विधिवत विवाह संपन्न झाल्यावर पती-पत्नीचा एकमेकांना होणारा ‘मांगल्याचा आणि विश्वासाचा’ स्पर्श; जोडप्याने थोरामोठ्यांच्या आशीर्वाद घेताना ज्येष्ठांचा होणारा ‘शुभाशीर्वाद आणि शुभेच्छां’चा स्पर्श; मुलगी लग्नाघरी जायला निघाल्यावर तिने आई-बाबांचा निरोप घेताना तिला त्यांचा होणारा ‘ताटातूट आणि विरहा’चा स्पर्श... लग्नानंतर पहिल्यांदाच जोडीदाराच्या जवळ गेल्यावर त्याचा/तिचा होणारा ‘उत्साहमिश्रित आतुरते’चा स्पर्श...काही कारणांमुळे पती-पत्नीमधल्या खूप काळाच्या विरहानंतर त्याला/तिला जवळ घेताना होणारा ‘व्याकुळते’चा स्पर्श! मुलाच्या जन्मानंतर बाळाला पहिल्यांदा जवळ घेताना आईचा त्याला होणारा ‘ममतेचा सौम्य’चा स्पर्श, आजीचा होणारा ‘वात्सल्या’चा स्पर्श, वडिलांचा होणारा ‘हळुवार’ स्पर्श आणि भावंडाने त्याला केलेला ‘अलगद, पण नाजूक’ स्पर्श!



पण, स्पर्श काही दोन सजीवांपुरताच मर्यादित नसतो, त्याचे अस्तित्व सर्वत्र असते...
पावसाचा पहिला थेंब उन्हाने रापून गेलेल्या मातीवर पडताना त्या थेंबाचा तिला होणारा ‘ओलाव्या’चा स्पर्श;
तोच थेंब स्वतःला मातीत गाडून घेतलेल्या ‘बी’पर्यंत पोहोचताना त्याचा त्या ‘बी’ला होणारा ‘ममते’चा स्पर्श;
आदिदेव सूर्याचे पहिले किरण क्षितिजावर पोहोचताना त्यांचा क्षितिजाला होणारा ‘तेजोमय’ स्पर्श;
काळ्याकुट्ट ढगांआडून बाहेर पडताना सूर्यकिरणांचा त्या ढगांच्या किनाऱ्याला होणारा ‘सोनेरी आशे’चा स्पर्श;
समुद्राच्या लाटेचा समुद्रकिनाऱ्यावरील वाळूला होणारा ‘रुपेरी’ स्पर्श;
खूप लांबवरून प्रवास करत येऊन अखेरीस सागराला जाऊन मिळणाऱ्या नदीचा ‘अवघा प्रेमरंगी रंगणारा’ स्पर्श;
अतिप्रचंड सामर्थ्य असणाऱ्या आणि प्रदीर्घ साम्राज्य-विस्तार असणाऱ्या महासागराच्या पोटाला हळुवारपणे भेदून जाताना एखाद्या लहानशा होडीच्या वल्ह्याने समुद्राच्या पाण्याला केलेला ‘नम्र, पण विजयी’ स्पर्श;
कोंबातून पहिल्यांदाच बाहेरच्या जगात डोकावू पाहणाऱ्या अंकुराचा मातीच्या सर्वांत वरच्या थराला होणारा ‘नवजीवना’चा स्पर्श;
आभाळातून कोसळत थेट चातक पक्ष्याच्या तोंडात पडताना थेंबाचा त्याच्या चोचीला होणारा ‘आतुरते’चा स्पर्श;
हळुवारपणे पहुडलेल्या गवताला आपल्या लयीवर डोलायला लावताना त्याला झालेला हलक्या झुळुकीचा ‘सौम्य' स्पर्श;


अळूवर पडलेल्या पाण्याच्या थेंबाचा एकत्र राहूनही ‘स्वतःच्या अंगाला काहीही लावून न घेता’ स्व-अस्तित्व जपणारा ‘विरक्ती’चा स्पर्श;
फुलांमधून मकरंद तोषताना भ्रमराचा फुलाला होणारा ‘मादक’ स्पर्श;
स्वतःच्या पिलांना भरवताना पक्ष्याच्या चोचीचा पिलांच्या चोचीला होणारा ‘काळजीयुक्त माये’चा स्पर्श;
गाईने वासराला चाटताना तिचा त्याला होणारा ‘वात्सल्या’चा स्पर्श;
मांजारवर्गातील प्राण्यांनी आपल्या पिलांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना शिकार करणाऱ्या आपल्या त्याच दातांनी पिलांना उचलताना केलेला ‘वात्सल्यपूर्ण काळजी आणि विश्वासाचा’ स्पर्श;
आपल्या समूहातील एखादा सदस्य अडचणीत आल्यावर त्याला मदत करण्यासाठी आपल्या सोंडा सरसावणाऱ्या हत्तींचा त्या सदस्याला होणारा ‘सहकार्या’चा स्पर्श आणि आपल्याच कळपातील एखादा सदस्य मृत पावल्यानंतर त्याच्याभोवती गोळा होऊन अश्रू ढाळत त्याला सहलावणारा त्यांच्या सोंडांचा ‘शोकयुक्त’ स्पर्श;
झाडाचे पान कुडतरताना अळीचा होणारा ‘विध्वंसक’ स्पर्श;
कधीही हातात न येणाऱ्या किंवा आल्यावरही पटकन निसटून जाणाऱ्या पाण्यात राहणाऱ्या माशाचा ‘निसरडा’ स्पर्श;
उंचच उंच वाढलेल्या आणि ढगांनाही भेदून टाकणाऱ्या पर्वत सुळक्यांचा आभाळाला होणारा ‘गगनभेदी’ स्पर्श;
पांढऱ्याशुभ्र धुक्याचा डोंगरमाथ्यांना होणारा ‘थंडगार’ स्पर्श;
अतिउच्च उंची गाठणाऱ्या एव्हरेस्टचा अक्षरशः निर्वाताला होणारा ‘निर्गुणा’चा स्पर्श;


ताकदवान पोकळी भेदून आक्रमक वेगाने प्रवास करणाऱ्या विमानाचा निर्वाताला होणारा ‘आक्रमक उत्थाना’चा स्पर्श;
ज्वालामुखीतून वर्षावून उंच उडून खाली येताना तप्त आणि वितळणाऱ्या लाव्ह्याचा थंड- कायमस्वरुपी स्थिर शिळा होताना जमिनीला होणारा ‘उबदार आणि कठोर, पण अविचल’ स्पर्श;
अतिशीत असल्यामुळे एकच एक आकार घट्ट पकडून ठेवलेल्या बर्फाला हवा तो आकार घेऊन प्रवाही बनणाऱ्या पाण्यात रुपांतर करणाऱ्या उष्णतेचा पाण्याला होणारा ‘घडवणारा’ स्पर्श;
दुधाला उकळी फुटण्याआधी होणारा सायीचा ‘स्नेहमय’ स्पर्श;
वयोवृद्ध होऊन जून झाल्यावर स्वतःच्या फांदीवरून गळून पडून परत मातीत मिसळताना पानाचा मातीला होणारा ‘पिकलेला’ स्पर्श;
शेतकऱ्याने आपल्याबरोबर राबणाऱ्या बैलांना केलेला ‘कृतज्ञते’चा स्पर्श;
निसर्गात स्पर्शाची उदाहरणे केवळ अगणित आहेत!

इतके असूनही स्पर्श केवळ चांगलाच असतो असे नाही. मला इथे नकारात्मक उदाहरणे द्यायची नाहीत; पण आपल्या माणुसकीला विचार करायला लागेल अशी बोटावर मोजण्याइतपत काही उदाहरणांचा मी जरूर उल्लेख करू इच्छितो.
वाचा आणि विचार करा...
मुलीचा जीव गर्भातच खुडून टाकणाऱ्या डॉक्टरचा (आणि त्या मुलगीच्या पालकांचा) त्या गर्भाला होणारा ‘क्रूर’ स्पर्श;
स्वतःच्या फायद्यासाठी धष्टपुष्ट जनावरांना कापायला धजावणाऱ्या माणसांचा त्या प्राण्यांना होणारा ‘कसाया’चा स्पर्श;
शेतकऱ्याच्या गळ्याभोवती फास बनून त्याचा गळा आवळणाऱ्या परिस्थितीच्या दोरखंडाचा ‘हतबल’ स्पर्श;


स्त्रीला भोगवस्तू समजून तिचा उपभोग घेणाऱ्या माणसांचा तिला होणारा ‘वासनांध’ स्पर्श;
लोकांना किंवा संस्थांना लुबाडून, धाडून, त्यांची पिळवणूक करून  त्यांच्याकडून जमा झालेल्या पैशांचा भ्रष्टाचारी लोकांच्या खिशाला झालेला ‘काळा आणि भ्रष्ट’ स्पर्श;
स्वतःसह कुटुंबालाही रसातळाला नेणारा तरुणाईला झालेला ‘व्यसनां’चा स्पर्श...
ही ठळक उदाहरणे आहेत. मला नकारात्मक जास्त लिहायचे नसल्यामुळे मी अशी उदाहरणे द्यायचे मुद्दामहून टाळतोय...

पण, स्पर्शाची आणखीही खूप छान छान उदाहरणे आहेत. सगळेच स्पर्श काही भौतिक स्वरुपाचे असायला हवेत असे नाही; क्रांती घडवणारे बरेच स्पर्श हे वैचारिक स्वरुपाचेही असतात! काही मोजके दाखले...

गौतमी ऋषींच्या शापाने शिळारुपी बनलेल्या अहिल्येला माणसात आणणारा रामाचा ‘वरदानरुपी’ स्पर्श;
रावणाने पळवून नेऊनही सीतेला कधीही न केलेला ‘संयमी’ स्पर्श;
वसुदेवाने वासुदेवाला (श्रीकृष्णाला) वाचवण्यासाठी त्याला गळ्यापर्यंत पाणी आलेल्या यमुनेतून नेताना त्या बालकृष्णाच्या चिमुकल्या पायांचा नदीच्या पाण्याला झालेला ‘चमत्कृतीपूर्ण’ आणि पाणी ओसरवणारा झालेला स्पर्श;
युद्धभूमीवर निर्णायक क्षणी रुतलेल्या रथाचे चाक बाजूला काढण्यासाठी त्या चाकाला कर्णाने केलेला ‘जीवघेणा’ स्पर्श;
संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेला केलेला ‘कौतुकाचा ज्ञानमय’ स्पर्श;
तुकाराम महाराजांच्या बुडवलेल्या गाथेने परत वर येताना समाजरुपी  नदीच्या पाण्याला केलेला ‘सोशिकता आणि कर्मकांडांच्या विरोधी केलेला ठामपणाच्या लढाईचा स्पर्श;
संत गाडगेबाबांनी समाजोद्धारासाठी अंधश्रद्धांची झाडाझाडती करताना केलेला ‘आगळ्यावेगळ्या स्वच्छते’चा स्पर्श;
विवेकानंदांनी जागतिक धर्मसभेत उपस्थितांना उद्देशून all my brothers and sisters या संबोधनाने ‘विश्वबंधुत्वा’च्या भावनेला केलेला स्पर्श;
रॉजर फेडरर, विश्वनाथन आनंद, उसेन बोल्टसारख्या उच्चकोटीच्या खेळाडूंनी खेळाला केलेला ‘खिलाडूपणा’चा स्पर्श;
शेक्सपिअर ते रवींद्रनाथ टागोरांसारख्या बड्या साहित्यिकांनी साहित्याला केलेला ‘नाट्यमयता आणि मानवी भावभावनां’चा स्पर्श;
छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी तलवारीला केलेला ‘मुक्ततेचा, न्यायाचा आणि स्वाभिमानयुक्त चैतन्याचा’ स्पर्श;


छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी केलेला ‘टोकाचा स्वाभिमान आणि आत्माहुती’चा स्पर्श;
राजा राममोहन रॉय यांनी स्त्रियांना अन्यायकारक पारंपारिक रुढींच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी केलेला ‘आधुनिकते’चा स्पर्श;
महर्षी धोंडो केशव कर्वेंनी कुटुंबनियोजनाच्या मार्गे देशाला संभाव्य संकटातून वाचविण्यासाठी केलेला ‘खुल्या लैंगिक विचारसरणी’चा केलेला स्पर्श;
महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संग्रामाचे चक्र फिरवण्यासाठी समाजरुपी चरख्याला केलेला ‘सत्य आणि अहिंसे’चा स्पर्श;
बाबासाहेबांनी समाजोद्धारासाठी देशाला केलेला ‘संविधानरुपी’ स्पर्श;
शाहू महाराजांनी आरक्षण व अन्य मार्गांनी समस्त देशाला केलेला ‘सामाजिक समरसते’चा स्पर्श;
अब्राहम लिंकन, मार्टिन ल्युथर किंग आणि गांधीनी समस्त जगाला केलेला ‘मानवते’चा स्पर्श..!

स्पर्श अमूल्य असतो... महत्त्वपूर्ण असतो... वैचारिक स्पर्श तर कालातीत असतो!

हल्ली स्पर्शाची अनुभूती मागे पडत चाललीये. नीटसं धड कुणी कुणाला भेटेनासं झालंय; हल्ली आईच्या कुशीत पोरं शिरेनाशी झालीयेत- त्याऐवजी लहान वयातच त्यांना गर्लफ्रेंड हवीहवीशी वाटू लागलीय; वडिलांना मिठी मारणं तर दूर राहतंय- आता स्पर्श फक्त वडिलांच्या पाकिटातील पैशांना होतोय; भाऊ एकमेकांना मिठी मारण्याऐवजी बांधाबांधावरील वादातून एकमेकांचा खून करण्यासाठी चाकू-कुऱ्हाडीला स्पर्श करतात; भाऊ-बहिणींतील प्रेमाचा स्पर्श आता मामलेदार कचेरीतल्या ‘सोडचिठ्ठीवरील सही’च्या कागदाच्या स्पर्शापुढे फिका पडलाय; मित्र-मित्र आता केवळ फेसबुकवर भेटताहेत... सामाजिक-वैचारिक-राजकीय नेत्यांचा समाजाला अभिसरणरुपी होणारा स्पर्श एव्हाना नाहीसा झालाय!

आता आपल्या स्पर्शाचा अनुभव फक्त ‘टच’फोनच्या स्क्रीनला आपल्या बोटांच्या होणाऱ्या स्पर्शापुरताच मर्यादित झालाय. या समाजमाध्यमांच्या जोखडातून ‘मुक्ततेचा’ आपल्याला लवकरात लवकर स्पर्श व्हावा इतकीच अपेक्षा!!!

Comments

  1. विषय छान निवडला आहेस, नाना पाटेकर यांचा संवाद आठवला "शेवट चा कधी शिवला होतास म्हाताऱ्या ला".

    ReplyDelete
  2. विषय छान निवडला आहेस, नाना पाटेकर यांचा संवाद आठवला "शेवट चा कधी शिवला होतास म्हाताऱ्या ला".

    ReplyDelete

Post a Comment