“रस्ता: मानवी जीवनप्रवासाचे प्रतीक” (Roads: The guiding star of the human life)

“रस्ता: मानवी जीवनप्रवासाचे प्रतीक”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

‘Life is a journey’ (आयुष्य हा एक प्रवास आहे) असे म्हटले जाते आणि ते खरेही आहे... पण, प्रवास म्हणजे फक्त एकटा प्रवास नसतो; त्याबरोबर तो पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनेही मग येतात, ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. त्यातील सर्वांत महत्त्वाचे साधन म्हणजे ज्यावरून आपण प्रवास करणार आहोत तो रस्ता! तसे तर प्रवासाला लागणारे रस्ता हेच एकमेव साधन नाही, त्याबरोबर प्रवासासाठी लागणाऱ्या अन्य साधनांपैकी प्रवासासाठीचे वाहनही तसे महत्त्वाचे साधन आहे. परंतु, तरीही ‘रस्ता’ हे मला साध्यापर्यंत पोहोचण्याचे सर्वांत महत्त्वाचे साधन वाटते. रस्ता ही एखाद्याची आवडीची किंवा नावडती गोष्ट असू शकते की नाही याबाबत कदाचित मी आत्मविश्वासाने सांगू शकत नाही; पण खूप प्रवास केल्यामुळे असेल किंवा अन्य काही; मी रस्त्यांच्या खूप प्रेमात पडतो. मला ट्रेकिंगची आवड असल्याने मी गडकिल्ल्यांच्या पायथ्याचे जसे दुर्गमातले दुर्गम रस्ते पाहिलेले आहेत; तसेच ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ आणि ‘बंगळुरू- चेन्नई हायवे’ही पाहिलेले आहेत. एका राजकीय नेत्याने चांगल्या रस्त्यांच्या दर्जाची तुलना एका अभिनेत्रीच्या गालाशी केली होती. कदाचित त्यामुळे कुणाला तसे मोठे रस्ते जास्त आवडू शकतात; पण माझं मात्र तसं काही नाही.

सातारा जिल्ह्यातील भुईंजपासून पुढे काही अंतरावर असणाऱ्या चंदन-वंदन या जुळ्या गडांना एकमेकांशी जोडणारी ही कड्यावरील अतिकठीण अशी ही पायवाट! याच वाटेवर माझी मृत्यूशी होणारी गाठ थोडक्यात राहिली!!! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

मला पालघरमधील ‘टकमक’ गडाकडे पायथ्यापासून वर नेणारी आणि एकदम अस्पष्टशी दिसणारी एखादी ‘अनवट पायवाट’ किंवा चंदन-वंदन या जुळ्या गडांना जोडणारी ‘खडतर पायवाट’ याही वाटा भुरळ पाडतात.

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाकडे असणाऱ्या पारगड, गंधर्वगड, कलानिधीगड आणि महिपाल गडाकडे जाताना कर्नाटकातील बेळगावमार्गे जावे लागते. कोल्हापूर- बंगळुरू महामार्गावरील निपाणीजवळ मी टिपलेला एक क्षण! (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

वाटांचा साहित्यिक संपर्क साधारण आठवी नववीत पहिल्यांदा आला. ज्येष्ठ कवी अनंत फंदी यांच्या कवितेत वाटांचा उल्लेख ‘बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको...
संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको...’ असा आला होता. वाटांबद्दलचा ‘उपमेय अलंकार’ वापरून कवीने संसारावर मार्मिक भाष्य यातून केले आहे. पण, थोडे मोठे झाल्यावर असे लक्षात आले की, धोपट ‘मार्ग सोडल्याशिवाय’ आयुष्यात फार काही वेगळं करता येत नाही. योग्य वेळी योग्य मार्गाची निवड करणे बऱ्याचदा फायद्याचे ठरते. प्रवासाच्या मार्गाचा आणखीन एक  अप्रत्यक्ष; पण महत्त्वपूर्ण उल्लेख ‘ससा आणि कासवा’च्या गोष्टीतून आला होता. एखाद्या स्पर्धेचा अंतिम ध्येयाकडील ‘प्रवास’ हा त्या स्पर्धेसाठी ठरविलेल्या ‘मार्गा’वरूनसुद्धा बदलू शकतो हे या कथेतून सिद्ध होते. असाच एकदा विचार करत असताना माझ्या मनात असे आले की, समजा ससा आणि कासवाची स्पर्धा झाडापर्यंत धावण्याऐवजी पाण्यात पोहत जाण्याची असती, तर आपण निकालाची तरी चिंता केली असती का? खेळाडू तेच, पैज तीच, विजेत्याची व्याख्या तीच; पण स्पर्धेचा ‘मार्ग’ वेगळा... स्पर्धकांपैकी एखाद्या स्पर्धकालाच जास्त फायदेशीर ठरणारा!!! रस्ता वेगळा असला तरी केवळ ती ‘एक वेगळी गोष्ट’ही आजूबाजूचे संपूर्ण चित्रच बदलू शकते हा यातून घ्यायचा धडा!

आपण थोडे इतिहासाकडे वळलो तर अशी एक ऐतिहासिक वाट आहे, जी सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे... महाराष्ट्राचा इतिहास तर त्या वाटेच्या इतिहासाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही... ती म्हणजे, पन्हाळ्यावरील राजदिंडीतून निघून ‘पावनखिंडी’मार्गे विशाळगडाकडे पावन वाट! (फोटो साभार-© प्रीतम कुलकर्णी)

सिद्दी जौहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे पावखिंडीमार्गे निसटून गेले, तेव्हा पन्हाळ्यावरून बाहेर पडताना त्यांनी या मार्गाचा वापर केला होता... तोच हा ‘राजदिंडी’ मार्ग! येथील माती भाळी लावावीच..!

बाजीप्रभूंच्या सांडलेल्या रक्ताने पवित्र झालेली आणि ‘लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ या भावनेने ओतप्रोत भरलेली ही वाट पन्हाळ्यापासून ते विशाळगडापर्यंत पसरलेली आहे. आजही त्या वाटेवरून जायला जवळपास ५५-६० तास लागतात. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनखिंडीच्या या मार्गाने जाताना त्या वाटेवरची धूळ भाळी लावल्याशिवाय कोणताच मराठा सुखावणार नाही! जगातील अन्य कोणत्याही मार्गिकेमधल्या धुळीमध्ये माणसाच्या अंगातील पराक्रम आणि स्फुल्लिंग चेतवण्याची आणि रक्त उसळवण्याची इतकी ताकद नसावी!!! महाराष्ट्राच्या मातीला छत्रपतींनी स्वाभिमानाने ‘जगण्याची दाखविलेली वाट’ आजही दीपस्तंभाप्रमाणे ‘मार्ग’दर्शक ठरत आहे! पावनखिंडीच्या या वाटेप्रमाणेच  स्वराज्यातील सगळ्याच गडकिल्ल्यांकडे जाणाऱ्या वाटाही स्फुल्लिंग चेतवणाऱ्या आणि सळसळत्या तारुण्याला आव्हान देणाऱ्या आहेत. धाडसाचा विषय निघालाच आहे म्हणून माझ्या अनुभवांबद्दल सांगायचं म्हटलं तर, गगनबावड्यातून खाली तळकोकणात उतरणाऱ्या भुईबावडा घाटरस्त्याबद्दल सांगायला मला आवडेल. हा रस्ता नितांतसुंदर आहे. या रस्त्याचे खरेखुरे आणि मनाला वेड लावणारे सौंदर्य पावसाळ्याच्या दिवसांत पहायला मिळते. महाराष्ट्रात इतका जास्त फिरल्यानंतरही पावसाळ्यांत अनुभवायला मिळणारा भुईबावडा ‘घाटरस्ता’ सौंदर्याच्या बाबतीत आजही अगदी अग्रस्थानी ठेवायला मला आवडेल! २०१३ साली गगनबावडा येथे पोस्टिंग असताना तिथले पावसाळ्यातील चार महिने मी अनुभवले आहेत. पाऊस असो वा नसो मी रोज संध्याकाळी घाटात फिरावयास जात असे. त्यातल्या काही संध्याकाळी तर अक्षरशः धो-धो‌ कोसळणाऱ्या पावसात मी घाटात फिरलो आहे. अशाच एके दिवशी मी घाटात फिरताना मला तो रस्ता इतका छान वाटला की, भर रस्त्याच्या मध्यभागी बराच वेळ मी असाच पडून राहिलो होतो... वरून वेड्यासारखा बरसणारा वरूणराजा, अंगावर रेनकोट, एका पारदर्शक प्लॅस्टिक रॅपरमध्ये कॅमेरा; खिशात ‘ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी... आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके...सुख हे नवे सलगी करे... ‘रस्ता’ नवा शोधू जरा... पुसुया जुन्या ‘पाउलखुणा’...’ असा त्याक्षणीच्या माझ्या मनीच्या भावना अगदी तंतोतंतपणे व्यक्त करणारे गाणे वाजविणारा मोबाईल आणि... त्या नितांतसुंदर काळ्या अंगावर तितकेच नितळ पाणी अवखळत वाहू देत, आजूबाजूच्या अतिसुंदर आणि रम्य निसर्गसौंदर्यात स्वतःच्या कृष्णवर्णाची भर घालून बघणाऱ्याच्या डोळ्यांचे आणि मनाचे पारणे फेडणारा तो रस्ता... त्याच्या प्रेमात माझ्यासारखा माणूस न पडता तरच नवल!!!

महाराष्ट्राचे चेरापुंजी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावड्यातून कोकणात उतरणाऱ्या भुईबावडा घाटातील एक दृश्य! “आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके!!!”


कोल्हापूरमध्ये राहत असूनही मी इतकी वर्षे गोव्याला कधी गेलो नव्हतो. यावर्षीच्या मार्च महिन्यात तो योग आला. गोवा हा कोकणाचाच पुढचा भूभाग असल्याने तो तसा भौगोलिकदृष्ट्या कोकणासारखाच आहे; मात्र गोव्याचे स्वतःचे काही विशेषगुण आहेत. एकतर तो कोकणापेक्षा थोडा जास्त पुढारलेला आहे; दुसरे म्हणजे तिथली स्वच्छता आपल्यापेक्षा चांगली आहे आणि तिसरे म्हणजे तिथली पोर्तुगीज संस्कृती. उत्तर गोव्यात फिरताना गोव्याची ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवतात; त्यातल्या त्यात त्या भागावरील पाश्र्चात्य संस्कृतीचा प्रभाव लगेचच कळून येतो. माझ्यावर मात्र दक्षिण गोव्याने जास्त भुरळ पाडली. मी दोन दिवस कोलव्याला (Colva) मुक्काम केला. तिथून बाहेर पडणाऱ्या दोन रस्त्यांच्या प्रेमात मी पडलो. एक म्हणजे, कोलव्यातून पहिल्यांदा मंगेशी आणि नंतर शांतादुर्गा मंदिराकडे जाणारा रस्ता. एकतर, मी अगदी सकाळी-सकाळीच या रस्त्यावरून प्रवास केल्याने मला तो बराच ‘फ्रेश’ वाटला होता. आणि, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या रस्त्यावरून जाताना ग्रामीण गोव्याचे होणारे रम्य दर्शन! शांत गोवा ज्याला अनुभवायचा असेल त्याने दक्षिण गोव्याला एकदा तरी भेट द्यावीच. गोव्याच्या अंतर्गत ग्रामीण भागातील रस्ते एकदम शांत, एकदम कमी रहदारी असणारे, रस्त्याकडेला तुरळकच असणारी घरे, दुतर्फा असणारी वनराई, मध्येच लागणारी एखादी नदी किंवा ओढा, आजूबाजूला छोटी छोटी असणारी देवळे आणि काही ठिकाणी अगदी अलीकडेच डागडुजी केलेली मोठी देवस्थाने, वळणावळणाचे आणि मध्येच छोटे छोटे असणारे घाट आणि अर्थातच प्रचंड निसर्गरम्य अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.


निसर्गरम्य दक्षिण गोव्यातील कोलवा ते वास्को रस्त्यावरील सायंकाळचे एक दृश्य (© डॉ. सुप्रिया अमित पाटील)


गोव्यातील दुसरा इति खूप जास्त आवडलेला रस्ता म्हणजे, कोलवा ते वास्को-द-गामा हा समुद्रकिनाऱ्याला समांतर आणि घासून जाणारा रस्ता! एकतर हा रस्ता केवळ दुपदरी किंवा काही ठिकाणी तर एकपदरीच आहे. बेटालबाटिम, माजोर्डा, उतोर्डा, अरोसिम, वेल्साव या सर्व बीचेसना लागून जाणारा, रस्त्याच्या दुतर्फा नारळी-पोफळीच्या रांगा असणारा, बहुतांश वेळा दोन्ही बाजूंना छोटी छोटी घरे असणारा (शक्यतो पांढरट रंगाची घरे, घराच्या समोरच्या भागातील ओवरी किंवा देवळीत असणारी क्रूसावर चढविलेल्या येशूची छोटीशी मूर्ती आणि मूर्तीसमोर सौम्यपणे तेवत असणारी मेणबत्ती... असा संधीकाळाच्या वेळी दिसणारा मन शांत करणारा नजारा), अधूनमधून दिसणारी आपली मान उंचावून सभोवताली मेहेरनजर ठेवणारी मध्यम आकाराची आणि पांढरट, चुन्यासारख्या रंग ल्यालेली चर्चेस असणारा, थोड्या-थोड्या अंतरावर घरगुती पद्धतीने बनवलेले मासे विकणाऱ्या खानावळी असलेला, भाज्यांनी भरलेल्या पिशव्या नेणाऱ्या भारतीय नागरिक असलेल्या- पण पोर्तुगीज वंशीय- असलेल्या आणि अन्य परदेशी नागरिकांचे पायी चालणारे किंवा सायकलवरचे गट... आणि, उपरोल्लेखित नावांचे शांत, निसर्गरम्य- ज्यांना इंग्रजीतील pristine हे विशेषण एक चपखलपणे लागू होईल अशा बीचेसचे गाडीतून न उतरताही दर्शन घडविणारा तो ‘रस्ता’!

कोलवा ते वास्को रस्त्याशेजारील कासावली या अतिरम्य किनाऱ्यावरील (बीच) एक संध्याकाळ

(खरेतर हा लेख रस्त्यांसंदर्भात असल्याने माजोर्डा, अरोसिम किंवा वेल्साव बीचेसचे वर्णन या लेखात करणे हे विषयांतर ठरेल; तरीही तो धोका पत्करून मी इतकेच सांगेन की, ज्याला स्वतःच्या मनाचा तळ गाठता येईल अशी शांतता अनुभवायची आहे, खराखुरा निसर्ग पहायचा आहे, समुद्राची विशालता आणि ‘गहराई’ अनुभवायची आहे, ज्याला शांतपणे किनाऱ्यावरील सोनेरी मऊ वाळूला उघड्या पायाने स्पर्श करायचा आहे, आणि, हे सगळं करताना कुणाचा डिस्टर्बही नको आहे त्यांनी थेट दक्षिण गोवा गाठावा आणि तेथील बीचेसचा आनंद घ्यावा!)

आणखीन एक असा रस्ता जो प्रकर्षाने माझ्या लक्षात राहिला आहे, तो म्हणजे राजूरकडून पाचनईमार्गे हरिश्चंद्र गडाकडे जाणारा रस्ता! हरिश्चंद्रगड हा ट्रेकिंगसाठीचा महाराष्ट्रातील क्रमांक एकचा गड मानला जातो. म्हणूनच या गडाकडे जाणारा रस्ता चांगला; निदान बरा तरी असेल अशी माझी अपेक्षा होती. गडाच्या ८ किमी आधीपर्यंतचा रस्ता तसा ठीक होता. मी आणि माझ्या सहकाऱ्याने मार्च महिन्यातल्या एका भल्या सकाळी ६ वाजता माझ्या बुलेटवरून हरिश्चंद्रगडाकडे जाण्यासाठीचा प्रवास चालू केला होता. छोट्याशा घाटातून जाणाऱ्या त्या सडकेच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब डोंगररांगा आहेत. त्यातीलच दोन डोंगरांच्या मधून थोड्या वेळाने हळूच डोकावणार असणाऱ्या ‘तांबूस गोंडस बालसूर्याची’ चाहूल सुदूर पसरलेल्या नारंगी लालसर प्रभेने आधीच लागली होती. त्यावेळी काढलेल्या फोटोचे वर्णन (caption) मी ‘स्वराज्यावर फाकलेल्या शिवसूर्याची प्रभा’ असे काहीसे केले होते. असो... तर रस्त्याचा पहिला थोडा भाग बरा होता.

राजूरकडून हरिश्चंद्र गडाकडे जाताना जो छोटा घाट लागतो तिथला उन्हाळ्यातील एका सकाळचा फोटो. छत्रपतींचा शिवसूर्य स्वराज्यावर आपली प्रभा फाकवताना!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

नाशिक जिल्ह्यातील ‘हरिश्चंद्र गडाकडे’ जाणारा ८ किमीचा कच्चा रस्ता इथून पुढे थोड्या अंतरावरून चालू होतो.
शेवटचा ८ किमीचा भाग मात्र अतिशय कठीण होता. एकतर तो रस्ता (कच्ची वाट) इतका निर्मनुष्य होता की, दूरदूरपर्यंत कुठेही एखादा सजीवही दिसत नव्हता. मध्येच काही अंतर गेल्यावर आमचा रस्ता तर चुकला नाही ना अशी आम्हाला शंका आली; पण आम्ही निघतानाच गडाची दिशा दाखवणारा बोर्ड पाहून आलो होतो. त्यामुळे आम्ही चुकले असण्याची शक्यता फारच कमी होती. संपूर्ण रस्ता कच्चा होता आणि त्याच्यावर खडीऐवजी ओबडधोबड दगडगोटे पसरून टाकले होते. केवळ ‘बुलेट’ होती म्हणून आम्ही कसाबसा तो रस्ता पार करू शकलो; अन्यथा त्याच रस्त्यावर दोन ४ × ४ चारचाकी (एस. यू. व्ही.) बंद पडलेल्या आम्हाला दिसल्या. त्यावरून
वाचकांना रस्त्याच्या स्थितीची कल्पना येईलच. अशा रस्त्यावरून प्रवास करताना गाडीची अवस्था तर वाईट होतेच; पण प्रवास करणाऱ्यांची हाडेही खिळखिळी होऊन जातात. इतका महत्त्वाचा असलेला हा रस्ता इतक्या दुरावस्थेत असेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. (कदाचित आणखीन एक विषयांतर होईल, तरीही सांगतो. या गावात पोहोचल्यावर मी जेव्हा एका स्थानिक गावकऱ्याच्या घरासमोर गाडी लावली तेव्हा सहज त्याच्याशी १०-१५ मिनिटे गप्पा मारल्या. तेव्हा त्याच्या बोलण्यातून मला असे समजले की, कोणतीच सरकारी माणसे त्या गावाकडे फारशी फिरकत नाहीत. त्यांच्यासाठी सरकारने चालवलेल्या बऱ्याच स्कीम्सची त्यांना धड माहितीही नव्हती. डिजिटल इंडियाच्या जमान्यातही त्यांच्या गावात मोबाईलच्या कोणत्याच कंपनीची रेंज नव्हती. त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे, गडावर आलेल्या थकल्याभागल्या ट्रेकर्सना नाष्टापाणी-जेवणाला जे काही पदार्थ ते स्थानिकांना जवळांत जवळ म्हणजे राजूरवरून, त्यातही बऱ्याचदा सायकलवरून आणावे लागतात आणि मग ते ओझे पाठीवर टाकून पुढे न्यावे इतक्या उंच गडावर न्यावे लागते. ज्यांनी स्वतः कधी हरिश्चंद्रगड पाहिला आहे, त्यांना या श्रमाची पटकन जाणिव होईल. तात्पर्य इतकेच की, गडावर काही खाल्ले-पिल्यावर ५-१० रुपयांसाठी तेथील लोकांशी वाद घालून त्यांच्या कष्टाची चेष्टा नये.)

ठाणे-नाशिक जिल्ह्यांच्या हद्दीवर असलेल्या आजोबा पर्वताकडे जाणारा रस्ता पूर्ण मातीचा आहे आणि तेच त्याचे वैशिष्ट्य आहे. राम सीतेची मुले अर्थात लव आणि कुश यांना सीतामाई ज्याठिकाणी पाळण्यात घालून जोजवत असे ती जागा या गडाच्या टोकाशी आहे. तर मी या गडाकडे जाणाऱ्या रस्त्याबद्दल बोलत होतो. या गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा पूर्ण मातीचा आहे. आपण अनवाणी उभारलो तर घोट्याच्या वर जवळपास ५-६ इंचांपर्यंत पाय बुडेल इतका पांढऱ्या मातीचा थर असलेला हा रस्ता. मी ग्रामीण महाराष्ट्रात प्रवास करताना मातीचे बरेच रस्ते पाहिले आहेत; पण इतक्या जास्त प्रमाणात माती असणारा हा रस्ता आगळावेगळा म्हणावा असाच. माझी बुलेट या रस्त्यावरून वर न्यायचे माझे काही धाडस तर झाले नाही, उलट आमच्या बरोबर आलेली एक चारचाकी मात्र अर्ध्यापर्यंत वर चढून पुढे जात असतानाच खाली आली. अशी तऱ्हेने हा रस्ता स्मरणात राहिला आहे.

ठाणे जिल्ह्यातील ‘आजोबा’ पर्वताकडे जाणारा मातीचा रस्ता!
काही रस्ते त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे लक्षात राहतात; काही त्यांच्या अनोख्या बांधणीमुळे लक्षात राहतात; काही त्यांच्या आजूबाजूच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे मन वेधून घेतात; काही त्यांच्या विशिष्ट स्थानांमुळे किंवा भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे लक्ष वेधतात; तर काही त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे आपल्या हृदयात स्थान मिळवतात. काही रस्ते सहजासहजी लक्षातही येणार नाहीत इतके लहान (insignificant) असतात, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासारखे रस्ते काही रस्ते त्यांच्या अवाढव्यतेमुळे स्मरणात राहतात. (मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी मी एका दुर्दैवी घटनेनेही जोडला गेलो आहे, पण त्याबद्दल लिहिलंय या लेखाच्या शेवटी...) काही रस्ते तर अगदी मी शोधताना चुकलोय म्हणूनही लक्षात आहेत. पालघर जिल्ह्यातील भोपटगड शोधताना मी जव्हार-मोखाड्यातील अंतर्गत रस्त्यांवर चुकलो (इथे गुगल मॅपचा काहीच फायदा होत नाही), पण मला त्याचा फायदाच झाला. चुकीच्या रस्त्यावर मी सुमारे ३०-३५ किमी प्रवास केला. त्यामुळे अनपेक्षितपणे मी या आदिवासी तालुक्यांच्या अंतर्गत भागांपर्यंत पोहोचलो आणि आदिवासी संस्कृतीच्या खुणा मला आणखीन जवळून न्याहाळता आल्या. ठाणे-पालघर जिल्ह्यांतील आदिवासी जमातींबद्दल जाणून घेण्याची तीव्रेच्छा त्यामुळे माझ्या मनात उत्पन्न झाली.

साभार: गुगल

“रस्ते: मानवी आयुष्याच्या प्रवासाचे प्रतीक”
मी कधी रस्त्यांवर लेख लिहीन असे मला वाटले नव्हते, पण इतका प्रवास करताना कित्येक रस्त्यांनी मला आकर्षित केले आहे हे नक्की! रस्ते हे मला जिवंतपणाचे प्रतीक वाटतात. संपूर्ण जगाचा भार ते अत्यंत शांतपणे स्वतःवर पेलण्याचा प्रयत्न करतात. स्वतः जखमी होऊनही (रस्त्यावरील खड्डे) ते जनसामान्यांची सेवा करत राहतात. दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून मानवी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान भूषविणारे ते कधीकधी काही लोकांच्या विध्वंसाचे (रस्ता बांधताना केले जाणारे भूसंपादन) कारणही बनतात. अपघातांमध्ये जखमी होणाऱ्या आणि मृत पावणाऱ्या मानवांचे किंवा प्राण्यांचे रक्त-मांसाने जसे ते स्वतःला माखून घेतात, त्याच प्रकारे ‘अडलेल्या’ एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सुद्धा ते आपल्याला मार्गदर्शन करतात. स्वतःशेजारी पडलेल्या एखाद्या ‘बी’च्या अंकुरण्यापासून ते डेरेदार वृक्ष बनण्यापर्यंतच्या प्रवासाचे ते जसे साक्षीदार बनतात, त्याच पद्धतीने ते कित्येक वर्षे त्यांच्यावर सावलीरुपी छत्रछाया धरलेल्या वृक्षांच्या कत्तलीचेही मूक आणि दुर्दैवी साक्षीदार बनतात. काही काही ठिकाणी ते प्रचंड स्टँडर्ड जीवनाचे दर्शन घडवून आणतात (फॉर्म्युला वन स्पर्धेसाठीचे रस्ते) तर काही दुर्गम ठिकाणी माणूस पोहोचण्याच्या प्रवासाचे ते अंतिम वाहक असतात. कधी कधी मानवी जीवन ‘समृद्ध’ करण्यासाठी त्यांची निर्मिती केलेली आढळते, तर काही वेळेला एखाद्याला खाईत लोटणाराही रस्ता तयार केला गेलेला असतो किंवा काही कारणामुळे तसा तो होतो. देशादेशाच्या प्रगतीचे मोजमाप जसे त्या देशातील रस्त्यांच्या जाळ्यांच्या लांबीवरून केले जाते, तसेच एखाद्या प्रदेशाच्या मागासलेपणाचे मोजमापही तेथील रस्त्यांच्या स्थितीवरून केले जाते. एखाद्या डोंगरावर वाढलेल्या वाळलेल्या गवतातून अस्पष्टशी दिसणारी एखादी पायवाट दमलेल्या ट्रेकरसाठी आशेचा किरण ठरते आणि पुढचा प्रवास सुकर करते. म्हणूनच मला अंतिम ठिकाणी पोहोचण्यापेक्षाही तिकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवास जास्त रोमांचक वाटतो.

आपल्या आयुष्याचेही असेच असते... आयुष्याचे अगदी अंतिम ध्येय काय आहे याची कोणालाच आधी कल्पना नसते. जन्माच्या वेळी आपला प्रवास (आपली इच्छा असो वा नसो) चालू झालेला असतो आणि तोच आपल्या अंताकडे जाणाराही प्रवास असतो.  तो प्रवास आपण ज्या रस्त्याने करू त्यानुसार आपल्या जगण्याची चिकित्सा केली जाते. अशा या जीवनप्रवासात योग्य मार्गावरून मार्गक्रमण करीत राहणे आवश्यक आणि महत्त्वाचे असते, अन्यथा एखाद्या वाम‘मार्गा’ला आपण लागलो तर एकतर संपूर्ण प्रवासच भरकटतो किंवा तो पूर्ण चुकीच्या दिशेने होऊन मिळालेले इतके सुंदर मानवी जीवन व्यर्थ जाऊ शकते. रस्त्यावरील खड्ड्यांप्रमाणे आयुष्यातही बऱ्याच छोट्या-मोठ्या अडचणी येत राहतात... रस्त्यावरील  खड्ड्यांसाठी सरकार-महानगरपालिकेला दोन-चार शिव्या हासडून का असेना, आपण काहीतरी मार्ग काढतो आणि पुढे निघून जातो. चांगल्या दर्जाचे रस्ते बांधणे, बांधलेल्या रस्त्यांवर खड्डे होऊच नयेत याची काळजी घेणे आणि इतके करूनही खड्डे झालेच तर ते बुजवणे या आदर्श गोष्टी आहेत. मात्र, नीट विचार केला तर एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते, आणि ती म्हणजे,  वरीलपैकी कोणत्याच गोष्टी आपल्या हाती नाहीत. उपलब्ध मार्गावरून प्रवास करत पुढे जात राहणे इतकेच आपल्या हातात असते. म्हणून आहे त्या रस्त्यावरून पुढे जाण्याचा मार्ग आपण काढतो. आपल्या जीवनाचेही असेच आहे. आपल्यासमोर पुढे काय वाढून ठेवले जाणार आहे याची आपल्याला कल्पना नसते; त्यात काय काय अडचणी उद्भवणार आहेत याची माहिती नसते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, आलेल्या अडचणी सोडविण्यासाठी अन्य कोणी नाही तर जीवनप्रवास करणाऱ्याला, अर्थात स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. कोणाला शिव्या देऊन, नावे ठेऊन किंवा दूषणे देऊन आपले प्रश्न कधीच सुटत नाहीत. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे वामनराव पैंचं वाक्य जीवनवाक्य बनून जाते. रस्त्यांकडून आणखीन एक खूप जास्त महत्त्वाची गोष्ट शिकता येईल. ती म्हणजे, जीवनात कितीही चांगल्या  किंवा वाईट गोष्टी झाल्या तरी ‘आपल्या पोटातलं कधी ओठांवर येऊ देऊ नये’. इतक्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार असूनही रस्ता मात्र शांत राहतो, ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ हे तत्त्व तंतोतंतपणे पाळतो... कदाचित हेच त्याच्या स्थितप्रज्ञतेचे गमक असेल. रस्त्याचे आणखी एक वैशिष्ट्य अवलंबण्यासारखे आहे- तो कधीही मध्येच साथ सोडत नाही. थकल्या-भागल्यानंतर भलेही एखादा वाटसरू (किंवा प्रवासाला निघालेला प्रवासी) मध्येच थांबेल किंवा कदाचित तो प्रवासच अर्ध्यावर सोडेल; पण रस्ता मात्र तसाच असतो- अंतिम ध्येयापर्यंत तो घेऊन जाणाराच असतो; झालीच अडचण तर ती प्रवाशाच्या धरसोडीमुळे किंवा आळशीपणामुळे होऊ शकते. रस्ता आपल्यात प्रवासाची ऊर्मी जागवतो; मार्गदर्शन करतो. तो एका अर्थाने आपल्यातील प्रवासाची भीतीही घालवतो- कारण त्याने आपल्यासाठी प्रवासाच्या बिंदूपासून दोन्ही बाजूंना जाण्यायेण्याची सोय करून ठेवलेली असते. प्रवास कोणत्या दिशेने करायचा याचा निर्णय तो प्रवाशाला घेऊ देतो. इतकेच नव्हे तर, एखाद्याचा प्रवास चुकीच्या दिशेने झाला तर त्याची परतण्याची सोय त्या रस्त्याने करून ठेवलेली असते. मानवी आयुष्य सहजासहजी उपलब्ध न करून देणारी ही संधी खराखुरा रस्ता मात्र आपल्याला उपलब्ध करून देतो. परिस्थितीनुरूप सारं काही निमूटपणे सहन करण्याची रस्त्याची क्षमता हाही त्याच्याकडून शिकण्याचा एक भाग आहे. ऊन, वारा, पाऊस, ओझे अगदी सगळं सगळं तो धीरोदात्तपणे सहन करतो, पेलतो, न रडता, न कुढता. आणि, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो स्वतःमध्ये बदलासाठी, सुधारणांसाठी नेहमी तयार असतो... आणि, त्याचा हाच गुण त्याच्या चिरस्थायीत्वपणासाठी सर्वांत मोठा गुण (plus point) ठरतो.

“मला भावनिक करून माझ्या मनाचा ठाव घेणारे काही रस्ते”
जाता जाता ज्या रस्त्यांबद्दल आवर्जून उल्लेख करावा अशा दोन रस्त्यांबद्दल थोडक्यात...
लेखात मी वर उल्लेख केला आहे, तो म्हणजे, मुंबई-पुणे (किंवा मुंबई- बंगळुरू) द्रुतगती मार्ग. हा महामार्ग माझ्या आयुष्यातील आजवरच्या सर्वांत दुःखद घटनेमुळे माझ्या लक्षात राहिला आहे आणि आयुष्यभर राहील. ती म्हणजे, माझे मामा आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मान. श्री. आर. आर. (आबा) पाटील यांचा मृत्यू!

माझे मामा आणि महाराष्ट्राचे लाडके आबा यांचा या पुण्यमय जीवनाचा अंतिम ‘प्रवास’ सुरू झाला तेव्हाचा (आणि माझ्या आयुष्यातील) सर्वांत दुःखद क्षण!!!
१६ फेब्रुवारी, २०१५ रोजी सायंकाळी अंदाजे साडेचार वाजता आबांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी प्रथमतः लीलावती रुग्णालयात आणि नंतर मुंबईतील राष्ट्रवादी भवनात ठेवण्यात आले होते. हे सर्व झाल्यानंतर मामांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अंजनी या त्यांच्या मूळ गावी न्यायचे होते. तो प्रवास मुंबईतून कराडपर्यंत ज्या महामार्गावरून झाला तो हा द्रुतगती मार्ग! मामांनी आमदार झाल्यापासून अखेरीस मंत्रिपदावर काम करेपर्यंत अक्षरशः हजारो वेळा या रस्त्यावरून प्रवास केला होता; मात्र त्यांचा अंतिम प्रवासही याच रस्त्यावरून होताना पाहणे हे खूप वेदनादायक तर होतेच; शिवाय त्या प्रवासात आबांच्या पार्थिवाचा साक्षीदार होणे हे अत्यंत क्लेशकारी होते. मामांचा अंतिम प्रवास त्या रस्त्यावरून होत होता. या प्रवासात ठिकठिकाणी लोक मामांना नेणारी गाडी थांबवत होते आणि त्यांच्या देहाचे दर्शन घेत होते. मामांचे पार्थिव ठेवलेल्या रुग्णवाहिकेच्या मागे आमची गाडी होती आणि आमच्यामागे मामांवर प्रेम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या गाड्यांची रांग लागली होती. मुंबई -बंगळुरू रस्ताच त्यादिवशी ‘पुण्यवान’ ठरला होता; कारण आबांच्या अंतिम प्रवासाचा तोही साक्षीदार झाला होता.
‘जगातले सगळे रस्ते शेवटी मसणवाटीकडेच जातात’ असे म्हणतात; कदाचित भारताचा बादशहा असणाऱ्या औरंगजेबाला ही गोष्ट माहिती नव्हती.
औरंगजेबाच्या खुल्ताबाद येथील कबरीकडे जाणारा अहमदनगर- खुल्ताबाद रस्ता! आलमगीराच्या बादशाहतीला स्वराज्यातील मावळ्यांनी येथेच धुळीस मिसळले!!!

संभाजी महाराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी तो चक्क स्वतःची राजधानी सोडून पहिल्यांदाच दक्षिणेत आला, दख्खनला पोहोचला. स्वराज्यातील मराठ्यांशी लढताना इतर शत्रूंची जी दुरावस्था झाली, तीच औरंगजेबाचीही झाली. स्वराज्याच्या पहिल्या दोन छत्रपतींच्या मृत्यूनंतर तो स्वराज्यात राहिला होता; आणि दोन कर्तृत्ववान छत्रपतींच्या मृत्यूनंतर तरी किमान आपलं काहीतरी चालेल अशी त्याची अपेक्षा होती. परंतु, त्याचा अंदाज चुकला. १६८९ मध्ये औरंगजेबाने स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली तरीही छत्रपतींच्या मावळ्यांनी त्याला पुढे शांतपणे जगू दिले नाही. छत्रपती संभाजी महाराजांनी आधीच सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाचा मृत्यू दक्षिणेत अहमदनगर येथे ४ मार्च, १७०७ रोजी झाला. स्वराज्यातील फार काही त्याच्या हाती लागले तर नाहीच, शिवाय दिल्लीच्या तख्तावर बसायला तो काही परत जाऊ शकला नाही. परवा मी वेरूळच्या घृष्णेश्वराच्या दर्शनाला गेलो तेव्हा येता येता खुल्ताबादला जाऊन औरंगजेबाची समाधी पाहिली.

खुल्ताबाद येथील औरंगजेबाची त्यामानाने एकदम साधी कबर...

(लेख संपवता संपवता आणखीन एक विषयांतर करायचा मोह मला आवरता येत नाहीये. बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की, औरंगजेब जरी हिंदुस्थानचा बादशहा असला तरी तो अत्यंत साधेपणाने रहायचा, स्वतः बनवलेल्या टोप्या विकून जे उत्पन्न मिळेल त्यातून स्वतःसाठीचा खर्च करायचा. स्वतःच्या मृत्यूसमयीही त्याने स्वतःचे थडगे साधेच असावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याच्या हुकुमानुसार औरंगजेबाचे थडगे पहिल्यांदा साधे बांधले गेले होते, मात्र नंतर लॉर्ड कर्झन या इंग्रज व्हॉइसरॉयने त्या थडग्याशेजारी संगमरवरी चबुतऱ्याचे बांधकाम केले.) छत्रपतींच्या इतक्या मोठ्या शत्रूचा अंतिम प्रवास झाला तोच हा अहमदनगर- खुलताबाद रस्ता!!!

मराठी माणसालाच नव्हे तर स्वाभिमानाने जगू इच्छिणाऱ्या कोणाही माणसाला ताठ मानेने जगण्याची शिकवण देणाराही एक रस्ताच..!

रस्त्यांनी मानवी जीवन अक्षरशः व्यापून टाकले आहे. मध्ययुगीन इतिहासातील ‘सिल्क रोड’ पासून ते आजच्या आधुनिक जगातील सर्वांत लांब (उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील जवळपास सगळे देश जोडणारा) ‘पॅन अमेरिकन’ रस्त्यापर्यंतचे रस्ते हे मानवी प्रगती आणि सांस्कृतिक घडामोडींचे प्रत्यक्ष साक्षीदार आणि द्योतक आहेत. मानवी इतिहासात रस्त्यांचे स्थान महत्त्वाचे आणि अढळ आहे आणि ते तसेच राहील यात शंका नाही!!!



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम. डी. (बालरोग चिकित्साशास्त्र २))
www.dramittukarampatil.blogspot.in
www.trekdoctoramit.blogspot.com

Comments

  1. रस्त्यानंबद्दल इतकं लिहिलं जाऊ शकत हे आज लेख वाचल्यावर लक्षात आलं खूपच सुंदर वर्णन केले आहे तुमचा लेख वाचत होतो पण मी प्रवास केलेले असेच काही रस्ते डोळ्यासमोर फिरत होते गगनबावडा असेल दक्षिण गोवा हरिसचंद्र गड हे सर्व रस्ते भराभर डोळ्यासमोरून गेले आणि माझा कोकणातील 5 वर्षाच्या वास्तव्याच्या आठवणी जाग्या झाल्या मी माझ्या avenger हजारो किलोमीटर चा प्रवास केला अनेक जिल्हे आणि 3-4 राज्य फिरलो त्या सर्व आठवणी यामुळे जाग्या झाल्या संततधार पावसातून जेंव्हा कोकणात फिरायचो तेंव्हा असाच सुंदर अनुभव यायचा. लेख वाचून खरंच खूपच छान वाटलं, ससा आणि कासवाची गोष्ट खूपदा ऐकली आणि ऐकवली पण कासवाच्या बाजूने कधी विचारच केला नाही उगाच कासवाला गौण ठरवलं गेलं आहे स्पर्धाच लावायची असेल तर पाण्यात लावा मग बघा कासव कसा सशा पेक्षा जास्त चपळता दाखवतो ते शेवटी आवण कोणता मार्ग निवडतो ते महत्वाचं आहे. लेखाचं शेवटचा भाग अजून वाचायचा बाकी आहे राहवलं नाही म्हणून आधी प्रतिक्रिया दिली .
    खूप खूप शुभेच्छा ।

    ReplyDelete

Post a Comment