वो आसमाँ था, लेकिन सर झुका के चलता था! (मा. आर. आर. आबा पाटील)
“वो आसमाँ था, लेकिन सर झुका के चलता था!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
आबांचे सख्खे ज्येष्ठ भाचे)
(एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)
(केवळ वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)
बघता-बघता आबांना जाऊन सहा वर्षे झाली. खरेतर, 'बघता-बघता' हा फक्त वापरायचा म्हणून वापरायचा शब्द! आबांच्या भौतिक अस्तित्वाशिवाय एक-एक दिवस आपण सर्वांनी कसा काढला आहे हे आपले आपल्यालाच माहिती.
माझा जन्म आजोळचा, म्हणजे अंजनीचा! हो, आबांची म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेली अंजनी. त्या अंजनीपोटी रामाचा उत्कृष्ट कार्यकर्ता हनुमान जन्मला; तर या अंजनी गावी लोकांसाठी अहोरात्र राबणारा सच्चा 'लोक-कार्यकर्ता' जन्मला. माझा जन्म झाला त्यावेळी आबा आमदार किंवा मंत्री नव्हते. तेव्हा ते केवळ जिल्हा परिषद सदस्य होते. घरातले पहिलेच मूल असल्यामुळे माझा मामांच्याकडून भरपूर लाड झाला; अर्थात तो बेताच्या आर्थिक परिस्थितीला साजेसाच होता, त्यात कोणताही बडेजाव कधीच नसायचा. लहानपणी आबांच्या अक्षरशः अंगाखांद्यावर खेळायचा 'बहुमान' कुणाला लाभला असेल तर तो नशीबवान मीच आहे. असो...
आबा गेल्यापासून त्यांच्या प्रत्येक स्मृतिदिनी मी त्यांच्याबद्दल काही ना काही लिहितोच. आज मी काही उदाहरणांद्वारे आबांच्या विचारांच्या व्यापकतेबद्दल थोडं लिहिणार आहे.
मामा १९९० ला आमदार झाले तेव्हा आम्ही सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथे वास्तव्यास होतो. माझे पप्पा तिथे कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत होते. पप्पांची परिस्थितीही बेताचीच होती. तरीही टोकाची धडपड करून पप्पा आधी बी. एस. सी. (केमिस्ट्री) आणि नंतर मुंबईतून चांगल्या गुणवत्ता क्रमांकाने एल. एल. बी. झाले होते. त्यानंतर एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन स्वकष्टाने अधिकारी पदावर पोहोचले होते. पप्पांचे हे स्वकर्तृत्व आणि त्यांचा स्वभाव यांमुळे आबांना पहिल्यापासून पप्पांबद्दल नेहमीच जास्त आपुलकी आणि आस्था होती. आम्ही प्राथमिक शिक्षण घेत असताना माझ्या आईने ४०-५० किमीवरील मिरजेला येऊन जाऊन प्रवास करत बी. एड. केले होते. तेव्हा डबल ग्रॅज्युएट असलेल्या माझ्या आईला उत्तमोत्तम ठिकाणांहून नोकरीच्या संधी चालून येत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आईने नोकरी करावी अशी घरी सर्वांची धारणा होती; केवळ तीन लोक वगळून- आई स्वतः, पप्पा आणि मोठे मामा (आबा). या तिघांसमोर एकच प्रश्न होता- आईने नोकरी केली तर पैसे तर मिळतील, पण मग आम्हा दोघा मुलांवरील संस्काराचे आणि शिक्षणाचे काय हा. त्यावेळी आबांनी 'तू मुलांना चांगले शिकव, तीही एक मोठी उपलब्धी (achievement) ठरेल' अशा स्वरुपाचा सल्ला दिल्याचे आई-पप्पा बऱ्याचदा सांगतात. पैशाला महत्त्व द्यायचे की शिक्षण-संस्कारांना असा प्रश्न या आमच्या वंदनीय तीनही ज्येष्ठांना (आई, पप्पा आणि मोठे मामा) यांना कधीच पडला नाही, कारण याबाबतीतील त्यांचे उत्तर अगदी सुस्पष्ट होते!
आबा आमच्या लहानपणी आम्हाला भेटायला वरचेवर त्यांच्या एक-दोन मित्रांसोबत त्यांच्या नेहमीच्या लाडक्या अँबॅसॅडर कारमधून येत असत. घरी आमच्याबरोबर गप्पा मारताना आमच्या शैक्षणिक प्रगतीबद्दलचे प्रश्न खूप गांभीर्याने आणि सतर्कतेने आबा आम्हाला विचारत असत. आमच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका ते चाळत असत. इथेपर्यंत ठीक आहे, मात्र मामांचे वैशिष्ट्य असे की, पुढच्यावेळी जेव्हा ते घरी येत असत तेव्हा पुढच्या परीक्षेतील गुण बघताना त्या विषयातील आमच्या दोघांचे मागील परीक्षेचे गुण त्यांच्या लक्षात असतं आणि त्या-त्या वेळी ते या गोष्टी आमच्या लक्षात आणून देत असत. आम्ही दोघेही भाऊ अभ्यासात चांगली प्रगती करतोय याबद्दल त्यांना खूप अभिमान असायचा. माझा दहावीचा निकाल लागला आणि मी बोर्डात आल्याचे जेव्हा मामांना समजले तेव्हा त्याकाळी मामांनी मला एका विदेशी कंपनीचे उत्तम घड्याळ भेट दिले होते आणि त्यानंतरही जेव्हा जेव्हा आम्ही दोघेही गुणवत्ता यादीत आलो त्या-त्या वेळी त्यांनी आम्हाला घड्याळेच भेट म्हणून दिली. कदाचित आम्ही सतत वेळेच्या सदुपयोगाबद्दल जागरूक रहावे असाच अप्रत्यक्ष संदेश आम्हाला त्यांना द्यायचा असावा!
मला बारावीला उत्तम गुण मिळूनही एमबीबीएसला पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नव्हता. पुढच्या फेऱ्यांची वाट बघताना वेळ वाया जाऊ नये म्हणून मी तात्पुरता इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीला प्रवेश घेतला होता. हे सर्व निर्णय मी आई-पप्पांच्या मार्गदर्शनाखालीच घेतले होते; पण मामांना याबद्दल थोडे वाईट वाटायचे किंवा अपराधीपणाची भावना त्यांच्या मनात असावी असे वाटते. मामा तेव्हा ग्रामविकासमंत्री होते आणि त्यांच्या एका शब्दावर कोणत्याही खासगी वैद्यकीय महाविद्यालयात मला प्रवेश मिळवून देणे त्यांच्यासाठी काहीच अशक्य नव्हते. त्यानुसार मामांनी प्रयत्नही केले होते. महाराष्ट्रातील एका खासगी महाविद्यालयाचे मालक त्यावेळी केंद्रात मंत्री होते. आबांनी आम्हाला न सांगताच त्यांना माझ्या प्रवेशाबद्दल शब्द टाकला. अर्थातच पहिल्या फोनमध्येच माझा प्रवेश निश्चित झाला होता, पण दोन गोष्टी घडल्या. एक म्हणजे, मला एमबीबीएस शासकीय कोट्यातूनच करायचे होते आणि दोन म्हणजे, 'त्या' मंत्र्यांनी आबांचा भाचा म्हणून आमच्याकडून कसलीच फी घ्यायला नकार दिला होता. ही गोष्ट आबांना मान्य नव्हती. फी जराही कमी न करता त्यांनी माझ्या नावावर शैक्षणिक कर्ज काढून द्यावे अशी अट आबांनीच त्या मंत्रिमहोदयांना घातली; अर्थातच माझा प्रवेश झाला नाही. पुढच्या प्रवेश फेरीत मला शासकीय कोट्यातून स्वतःच्या गुणवत्तेवर प्रवेश झाला. या गोष्टीचा आबांना कायमच अभिमान होता. आबांची विचारसरणी कोणत्या दर्जाची होती याचा हा दाखला.
१९९९ ला आबा ग्रामविकास, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या तीनही खात्याचे मंत्री झाले. इतर मंत्र्यांप्रमाणेच मामांचा शपथविधी राजभवनावर झाला. आपल्यालाच एक माणूस राज्याचा थेट मंत्री होतोय हे पाहून राज्यभरातून आबांचे शुभेच्छुक राजभवनावर गोळा झाले होते. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनंतर ज्येष्ठता क्रमानुसार मामांचा शपथविधी झाला. कार्यक्रम संपन्न झाल्यावर राज्यपालांकडून नवनियुक्त मंत्र्यांना 'लाल दिव्याची' गाडी दिली जाते. या गाडीतूनच मग मंत्रिमहोदय आपापल्या शासकीय निवासस्थानी निघून जातात. आबांच्या विचारांची पातळी मात्र अलौकिक होती. आबा स्वतः त्या 'लाल दिव्याच्या' गाडीत न बसता मतदारसंघातील ज्येष्ठ तीन-चार कार्यकर्त्यांना त्यांनी गाडीत बसवून आपल्या 'चित्रकूट' या शासकीय निवासस्थानावर नेले. इतक्या मोठ्या प्रेमाच्या, आपुलकीच्या आणि उतराईच्या भावनांचे दर्शन आजकालच्या काळात शक्य तरी वाटते का? पण, अशा गोष्टींमुळे आबा आजही कार्यकर्त्यांच्या स्पष्ट स्मरणात आहेत.
गोष्ट इथेच संपत नाही. आबांना मिळालेला 'चित्रकूट' हा बंगला क्षेत्रफळाच्या दृष्टीने अन्य बंगल्यांपेक्षा मोठा आहे असे म्हणतात. याच बंगल्याच्या पोर्चसमोरील गार्डनमध्ये एक जलतरण तलाव (स्विमिंग टँक) बांधलेला आहे. आबा बंगल्यात रहायला आले तेव्हा हा टँक सुरू होता. आबांनी पहिल्याच दिवशी तो पाहिला आणि ते अस्वस्थ झाले. त्यांच्या अस्वस्थतेचे कारण कोणाच्याच लक्षात येईना. तेव्हा तेथील माळी मामांनी मनाचा हिय्या करून शेवटी विचारूनच टाकले की, “साहेब, काही अडचण आहे का? टँकमधले पाणी परत बदलून घेऊ का? की, आजूबाजूची झाडे कापून टाकू?” पुढे मामांनी दिलेल्या उत्तराने मात्र सगळेजण अक्षरशः अवाक झाले. आबा म्हणाले, “राज्य दुष्काळात असताना आणि शेतकऱ्यांना, माता-भगिनींना पाणी बघायलाही मिळत नसताना पाणीपुरवठा खात्याच्या मंत्र्याच्या बंगल्यात मात्र जलतरण तलाव असणे ही काही चांगली गोष्ट खचितच नाही. माळी मामा, आजच्या आज टँक बंद करून टाका.” १९९९ साली मामांनी बंद करवलेला तो टँक २०१४ साली आबांनी बंगला सोडेपर्यंत बंद ठेवला गेला होता. राज्याच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या किती व्यक्तींच्या मनात सामान्य जनतेच्या अडचणींबद्दल इतकी संवेदनशीलता असते बरे!
आबा मंत्री झाले आणि कोणीतरी ‘आपला माणूस’च मंत्री झालाय अशी जनभावना आबांनी आपल्या जनहिताच्या विचारांनी आणि संवेदनशीलतेने लोकांच्या मनात रुजवली. ते ज्युनिअर आणि त्यामानाने कनिष्ठ खात्याचे मंत्री असतानाही मंत्रालयात आणि त्यांच्या मुंबई-नागपूर येथील शासकीय निवासस्थानी अक्षरशः रोज जत्रा भरलेली दिसत असे. बिनमहत्त्वाच्या ग्रामविकास खात्याला ‘ग्लॅमरस’ करण्यासाठी त्यांनी केलेले कष्ट हे त्यांच्यातला प्रशासक जमिनीवर किती पाय असलेला होता हेच दर्शविते. काम करताना लोकभावना दुखावणार नाहीत, जनहिताचे संरक्षण होईल आणि कोणत्याही नियमांची पायमल्ली होणार नाही याकडे त्यांचा तीव्र कटाक्ष असे. राज्याच्या तिजोरीतील पैशांच्या अभावाचे कारण पुढे करून एखाद्या राजकारण्याने थेट हात वर केले असते, पण आबांनी मात्र याच नव्हे तर सगळ्याच अडचणींमध्ये संधी शोधल्या. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानापासून ते महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना या त्याच्याच निदर्शक आणि अनुकरणीय आहेत.
शासकीय नियमांच्या विरुद्ध जाऊन ना आबांनी स्वतः काही काम केले ना इतरांनी केलेले त्यांनी खपवून घेतले. मला नीट आठवतात
ते दोन प्रसंग. म्हणजे, तसे खूप प्रसंग आहेत, पण दोन विशेषत्वाने सांगतो. एक आहे, २००९ चा. राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर होत्या आणि आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने सरकारदरबारी बरीच गडबड चालू होती. सरकारने राबविलेल्या योजनांचा जनमाणसांत प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळावर आणि त्यातही आबांसारख्या स्वच्छ चारित्र्याच्या मंत्र्यावर प्रामुख्याने होती. आबा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर पुण्यात होते. अचानक संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाने निवडणुकांची आणि तात्काळ लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेची घोषणा केली. मामा विश्रामगृहात अधिकाऱ्यांची मीटिंग घेत होते. आबांच्या लाल दिव्याच्या गाडीच्या ताफ्यासह 'झेड' सिक्युरिटीचा लवाजमा विश्रामगृहाच्या परिसरात उभा होता. मीटिंगमध्ये असतानाच आबांना आचारसंहिता लागू झाल्याची बातमी समजली. क्षणाचाही विलंब न करता आबांनी मीटिंग संपवली आणि ते तडक बाहेर पडले. आबा अचानक बाहेर येताच एकच लगबग उडाली. आबांचा चालक लाल दिव्याची गाडी घेऊन पोर्चमध्ये दाखल झालाही. सिक्युरिटी गार्डनी गाडीचे दार उघडले आणि तो आबा गाडीत बसण्याची वाट पाहू लागला. आबा मात्र गाडीकडे येईनात आणि त्यांची काहीतरी फोनाफोनी सुरू झाली. पंधरा मिनिटांतच एक साधीशी गाडी विश्रामगृहात दाखल झाली. आबांनी गाडीचालकाला इशारा करताच ती गाडी समोर आली. आबा तडक त्या गाडीकडे जायला निघाले आणि जाता-जाता स्वतःच्या सचिवाला म्हणाले, “अरे, *** आचारसंहिता लागू झाली ना... आता मी सरकारी गाडी कशी वापरेन? बसा या गाडीत, माझ्या मित्राचीच आहे... जाऊ या गाडीनेच अंजनीला...” आबांच्या या कृतीची नंतर एका वृत्तवाहिनीने ठळक बातमी केल्याचे मला आजही स्मरते. दुसरी घटना आहे ती आबांनी २६/११ नंतर दिलेल्या राजीनाम्यावेळची. मी आणि माझा भाऊ उदय त्यावेळी 'चित्रकूट'वरच होतो. घडलेल्या घटनेनंतर पक्षांतर्गत आणि पक्षबाह्य राजकारणाचे वारे तेव्हा जोराने वाहू लागले होते. पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडवून आणल्या जात होत्या. प्रत्यक्ष घटनेबाबत काहीही चूक नसताना राजकीय दबावापोटी आबांना राजीनामा द्यावा लागला. त्या रात्री मामा रात्रभर जागे होते आणि त्यांनी रात्रीत किमान दहावेळा चहा प्यायला असावा. आबांनी पहाटे साडेपाचला आम्हाला टी. व्ही. हॉलमध्ये बोलावून घेतले आणि स्वतःच्या राजीनाम्याबाबत सांगितले. त्यात आमच्यासाठी असा निरोप होता की, “मी लगेच अंजनीला जायला निघतोय, तुम्ही बंगल्यातले सारे साहित्य (म्हणजे, पुस्तके आणि तीन ट्रक भरून मिळालेले पुरस्कार) गाड्यांत भरून गाड्यांबरोबर घरी या.” राजीनाम्यानंतर किंवा सरकारे बदलल्यानंतर आधीच्या मंत्र्यांनी घर सोडावे म्हणून कोर्टाने नोटिसा देण्याच्या जमान्यात एका ताकदवान राज्याचा नंबर एकचा मंत्री राजीनाम्यानंतर केवळ तीन तासांत शासकीय निवासस्थान रिकामे करतो ही घटनाच किती विरळा!
आबा उपमुख्यमंत्री असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा नेहमीच अतिरिक्त ताण असायचा; त्यात गृहखातेही त्यांच्याकडेच. यामुळे प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी आबांना बऱ्याचदा शासकीय हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागत असे. इतक्या कार्यबाहुल्यातही स्वतःच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आबा आठवडा-पंधरा दिवसांत शनिवार-रविवारी अंजनीला येत असत. त्यावेळी अंजनीला हेलिपॅड नव्हते, मात्र आबांच्या सातत्याच्या दौऱ्यांमुळे अंजनीतील एका माळरानावर शासनाने हेलिपॅड उभारला होता. आबा यायच्या दोन दिवस आधीपासून गावात सगळीकडे त्याची चर्चा होत असे. त्यामुळे आबांचे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध आबा येण्याच्या वेळी हेलिपॅडकडे धाव घेत असत. असेच एकदा आबा मुंबईहून आल्यावर त्यांना हेलिपॅडजवळ गावातील मागासवर्गीय समाजातील काही मुले उभी असल्याचे दिसले. क्षणाचाही विलंब न करता आबांनी पायलटला बोलावून घेतले आणि त्या सर्व मुलांना हेलिकॉप्टरमधून एक फेरी मारून आणायला लावले. जितका मोठा माणूस तितकेच मोठे विचार! आबांची गाडी चालवणारे चालक असोत की त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असोत की हेलिकॉप्टरचा पायलट असो, त्यांनी जेवण केल्याशिवाय आणि त्यांची पुरेशी विश्रांती झाल्याशिवाय आबा त्यांना सोडत नसत.
माझ्या मामाच्या-आई (आजी) त्यांच्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात भरती असताना असो किंवा त्यि मोतिबिंदूच्या उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात भरती असताना असो, आबा तिथे असणाऱ्या सगळ्या मोठ्या डॉक्टरांकडून वैद्यकीय क्षेत्रात चालू असलेल्या घडामोडी, वैद्यकीय शिक्षणाची देशातील अवस्था, डॉक्टरांच्या आणि खासगी-सरकारी रुग्णालयांना भेडसावणाऱ्या समस्या अशा सर्व गोष्टींची माहिती करून घेत असत. मतदारसंघातील रस्त्यांबद्दल तक्रारी आल्यावर एकदा आबांनी सिव्हील इंजिनीअरला बोलावून रस्ता उकरून प्रत्यक्षात किती थर आहेत आणि किती असायल हवेत याबाबत केलेल्या विचारणेची मतदारसंघातील बव्हंशी लोकांना कल्पना आहे. नोकरी मागायला आलेल्या एका डिप्लोमा सिव्हील इंजिनीअरने आबांना नोकरीची गळ घातली. त्यावर आबांनी तू एमपीएससीची तयारी कर असा सल्ला दिला. मात्र तो इंजिनीअर मात्र ते ऐकायला नव्हता आणि पैसे किंवा वशिल्याशिवाय सरकारी नोकरी लागतच नाही असा आबांशी वाद घालू लागला. त्यावेळी आबांनी त्याला 'एका इंचात किती सेंटीमीटर आणि किती मिलीमीटर असतात' असा प्रश्न विचारला. अर्थातच अचानक आलेल्या प्रश्नाने तो गोंधळला आणि त्याला उत्तर देता आले नाही. आबांनी तो धागा पकडला आणि त्याला चांगलीच समज दिली. ‘पात्रता असेल तर नोकरीत सिलेक्ट होण्यापासून तुला कोणीही रोखू शकत नाही' हे सांगून आबांनी त्याला परत पाठविले.
ग्रामस्वच्छता अभियानापासून ते तंटामुक्त गाव अभियानापर्यंत; गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकत्व घेण्यापासून ते भ्रष्टाचारमुक्त सर्वोच्च पोलिस भरतीपर्यंत; माताभगिनींचे शोषण होऊ नयेत म्हणून 'डान्सबार बंदी'पासून ते आतंकवादी हल्ल्यातील मुख्य दहशतवादी अजमल कसाबला 'स्वतःच्या कार्यकाळातच' फासावर लटकवेपर्यंतचे आबांचे सर्व निर्णय हे लोकाभिमुखच राहिले आहेत. आबांच्या स्वच्छतेच्या कार्याची दखल जागतिक पातळीवरील युनेस्कोसारख्या संघटनांनीदेखील घेतली आहे.
अजून हजारो घटना मला लिहिता-सांगता येतील. आबांचा प्रत्येक निर्णय हा त्या-त्या पदाची शान वाढविणाराच ठरला आहे.
कोल्हापूरातील आमच्या घरी आबा जेव्हा केव्हा येत असत तेव्हा ते रात्री उशिराची वेळ निवडत. आपला सारा लवाजमा आणि डामडौल विश्रामगृहावरच ठेऊन मोठे मामा आम्हाला भेटायला साध्या रिक्षातून किंवा मित्राच्या साध्या गाडीतून येत असत. स्वतःच्या 'झेड प्लस' सिक्युरिटीचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होऊ नये यासाठीचा हा अट्टहास असे. आमच्या कौलारू घरात खाली साध्या फरशीवर बसून मामा गप्पा मारत बसत. जेवणासाठीचा त्यांचा मेन्यू बऱ्याचदा ठरलेला असे आणि आईला तो माहितीही असे. “सुमन, तुझी भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी आणि दही एकदम आईसारखीच असते बघ. तुझ्या हाताला आईच्या हाताची चव आहे; अमित/ उदय तांब्या भरून पाणी घे रे, मस्त झालंय जेवण,” म्हणत मोठे मामा चवीने ते जेवण घेत.
आबांचे हे शब्द ऐकून जवळपास साडेसहा वर्षे झाली... त्यानंतर काही हे शब्द कानावर पडले नाहीत... आणि, आता पडण्याची शक्यताही नाही..!
मोठे मामा, शतशः नमन..!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(प्रस्तुत लेखक मान. आर. आर. आबा पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सख्खे भाचे आहेत.)
(©लेखाचे सर्वाधिकार सुरक्षित)
(वॉट्सएप संपर्क- 8329381615)
(www.dramittukarampatil.blogspot.com)
Nicely written
ReplyDeleteडॉ , आबांच्या आठवणी खूप छान लिहिल्या आहेत - आबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
ReplyDeleteआबांना विनम्र अभिवादन, अमित खूप छान अनुभव कथन केले आहे
ReplyDeleteखूप सुंदर लिहल आहेस .....2012 ला आपण चित्रकूट वर भेटलो होतो.... त्यांची पुस्तकांची लायब्ररी पाहून मी थक्क झालो होतो
ReplyDeleteChan lihila ahes. Dolyat pani ale re
ReplyDeleteडाॕ. अशोक भांडे. (सेवा निवृत्त वैद्यकीय अधीकारी)
ReplyDeleteडाॕ. अमित पाटील.वैद्यकीय अधीकारी पदावर आसतांना आबांच्या सर्व आठवणी सांगत होते. तेच सर्व वर्णन आज शब्दरूपी वाचायला भेटले. काहीही आतीशयोक्ती नाही..डोळ्यात पाणी येईल अशी वास्तविकता लिहली आहे.
आपण एक डाॕक्टर आहात. वेळ काढणे, शब्दांची मांडनी, क्रम, व्याकरण,आवड, आपल्या लोकसंपर्क सांभाळुन ठेवण्याच्या कलेला मामा नमस्कार.
पुढील वाटचालीला खुप खुप शुभेच्छा.