कोविडायन: एका डॉक्टरच्या अस्वस्थ मनाची डायरी (COVID experiences of a doctor)
कोविड अनुभव कथन: भाग १
“कोविडायन: एका डॉक्टरच्या अस्वस्थ मनाची डायरी”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(या लेखातील मते आणि अनुभव हे पूर्णतः वैयक्तिक स्वरुपाचे आहेत; मात्र ते केवळ एकट्या-दुकट्याचेच अनुभव नसून जमिनीस्तरावर काम करणाऱ्या अनेक योद्ध्यांना आलेल्या अनुभवांचे सार आहे.)
(लेख पूर्णतः कॉपीराइट केलेला असून लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(लेखात उल्लेख केलेली रुग्णांची, डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची नावे काल्पनिक आहेत.)
(सदर लेख पूर्णतः वैयक्तिक स्वरूपाचा असून राज्य किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नियम, तत्त्वे, मार्गदर्शक सूचना अथवा निर्णय यांच्याशी संबंधित नाही. एक डॉक्टर म्हणून दोन्ही सरकारांच्या सर्व नियमांचे पालन प्रस्तुत लेखक काटेकोरपणे करतात.)
प्रसंग १-
“सर, ‘रिमेनिंग* ५८ आहे... पाच पेशंट एकदम ‘बॅड’ आहेत; नाईटला दोन ‘डी. सी.’ झाले. सर, तो बापूराव डी. सी. झाला... एन. आय. व्ही. पर भी मेंटेन नहीं कर रहा था... Tried a lot for ventilator and ICU care, but... नहीं मिला, सर... बहोत बुरा लगा, सर,” माझा ज्यूनिअर मला मॉर्निंगची ‘ओव्हर’ देत होता...
(*कठीण शब्दार्थ लेखाच्या शेवटी दिले आहेत.)
“ओह्, बहोत बुरा हुआ रे, सौरभ... लेकिन हमने कोशिश तो की... Unfortunately this has become routine since last one month... आपण प्रयत्न करत रहायचे... आजारच तसा आहे... तिकडे कॅज्युल्टीला* अजून १२ पेशंट वेटिंग आहेत म्हणे... मेडिसीन सीआर भेटला होता कॅन्टीनमध्ये... Exhaust झालेत सगळेच... पण, ड्यूटी तर करावीच लागेल,” मी उसासा टाकत म्हणालो.
“तेरा ही evening हैं ना आज... जा तू... मैं देखता हूँ अभी... जा, आराम कर थोड़ा... फिर आना है ना तुझे..,” मी पुढे म्हणालो.
सौरभ रूमवर गेला... आणि, बापूराव अनंताच्या प्रवासाला निघून गेले...
मी आणि माझा ‘को-रेसिडेंट’ थोडे स्थिरावलो. आम्ही फाईल्स चेक करत होतो... मनातून मात्र बापूरावांचा विषय जात नव्हता...
बापूराव... ६२ वर्षे वयाचे अस्सल ग्रामीण प्रामाणिक व्यक्तिमत्त्व... माळकरी माणूस... पाच दिवसांपूर्वीच ताप आला म्हणून शेतातून थेट गावातल्या सरकारी दवाखान्यात गेले होते... डॉक्टरांनी प्रोटोकॉलप्रमाणे लगेच RAT केली... पॉझिटिव्ह आली... आणखीन तीन रुग्णांबरोबर बापूरावांना थेट तालुक्याच्या ‘सीसीसी’ला पाठविण्यात आले...
जाताना बापूरावांनी मुलग्याला फोन केला... “तुमी फुडं जावा बापू, मी येतो सांच्याला,” मुलगा म्हणाला असेल.
बापू एक दिवस ‘सीसीसी’ला राहिले... मुलगा काही आलाच नाही... इकडे बापूंना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला... डॉक्टरांनी ऑक्सिजन लावला... पण, त्रास कमी होईना... ऑक्सिजन खाली येऊ लागला...
“ऑक्सिजन!” एरव्ही विज्ञान शाखेचे विद्यार्थी सोडले तर फारसा कोणाला माहिती नसणारा शब्द... आजकाल, म्हणजे कोविड आल्यापासून अगदी परवलीचा झालाय...
बापूंची तब्येत ढासळली. त्यांना जिल्ह्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी पाठविणे गरजेचे झाले. बरोबरच्या इतर ८-१० रुग्णांबरोबर बापूंना पुढे ‘रेफर’ करण्यात आले. घरी कळविण्यात आले तर मुलगा म्हणाला, ‘पाठवा त्यांना, मी जातो थोड्या वेळात...’ तब्येत गंभीर बनू लागल्यामुळे बापूंना वर लगेचच पाठवावे लागले.
परवा दिवशी ‘मॉर्निंग’ होती माझी. तेव्हा बापूरावांची ‘ओव्हर’ मला मिळाली ती ‘बॅड’ पेशंट म्हणूनच... तरी ते फेसमास्क १० लीटरवर होते म्हणून एवढं सगळं बोलले तरी... त्यांनीच सांगितलेली ही ‘स्टोरी’...
मॉर्निंगला आमचे बरेच राऊंड्स असतात, त्यामुळे ‘व्हायटल्स’ घेता घेता इतकंच बोलणं झालं... दुसऱ्या दिवशी ‘नाईट’ला मी पीपीई घालून आत गेलो तेव्हा मात्र बापूरावांच्या भावनांचा बांध फुटला. खरं सांगायचं तर आम्ही पीपीई किट घातलेले असल्यामुळे रुग्ण आम्हाला सहजासहजी परत ओळखू शकत नाहीत; पण काही रुग्ण खूप हुशार असतात; त्यांचे निरीक्षण बरेच चांगले असते. ते त्यांना हवा असलेला ‘डॉक्टर’ आवाज, उंची, बोलण्याची ढब यांवरून अगदी व्यवस्थित लक्षात ठेवतात आणि पुढच्या वेळी गेल्यावर बरोबर ओळखतात.
त्या ‘नाईट’ला बापूराव माझा हात हातात घेऊन ढसाढसा रडले. आजारापेक्षा घरच्यांनी विशेषतः स्वतःच्या मुलग्याने अव्हेरल्याचे दुःख त्यांच्या मनात जास्त होते. मुलगा आता त्यांचा फोनही उचलत नव्हता. मीही असहाय्य होतो. एरव्ही प्रत्येक रुग्णाबरोबर ‘भावनिक’ होणे आम्हा डॉक्टरांना शक्य होत नाही; पण एकदम त्रयस्थही राहता येत नाही. थोडीतरी ‘अटॅचमेंट’ तयार होतेच. मी बापूरावांना केवळ ‘शांत व्हा; काळजी करू नका, होईल सगळं नीट,’ इतकंच बोललो.
नंतर मात्र ‘माळकरी’ बापूराव जे बोलले त्याने माझ्या काळजाला अक्षरशः घरे पाडले. विमनस्क होऊन ते म्हणाले, “मनुष्य जन्माचे भोग, दुसरं काय डॉक्टर? तळहातावरच्या फोडासारखं जपलं पोराला, तर त्यानेच ‘अंतर’ दिले... कोरोनाला कशाला नावं ठेवायची, डॉक्टर..! तो तर एक जंतू... इथं माणूसच माणसाला ओळखंना झालाय, एकमेकांच्या जिवावर उठलाय; बरं झालं कोरोना झाला, आसपासची दोन-चार माणसं तरी कळाली... भावकीतल्या एकानं मला फोन केला. मला वाटलं तब्येत-पाणी विचारायला केला असेल, तर तो म्हणाला, ‘कोरोना झाला का बापूराव? चांगला नाय म्हणत्यात त्यो आजार... लई माणसं मरायला लागल्यात... तवा म्हटलं जिल्ल्याला भरती व्हायला चाललाय खरं आमचं ते धा हजार उसनं घेतलं हुतं तेवडं पोराला सांगून जावा... नायतर उद्या तुमचं काही बरंवाईट झालं तर तुमचा पोरगा म्हणायचा ‘मला काय बापूंनी तुमच्या पैशाचं सांगितलं नव्हतं..’”
मी निःशब्द झालो... कोविड आल्यापासून अशी वेळ आमच्यावर बऱ्याचदा येऊ लागली आहे... चीड आली... सकाळी ८ वाजता ड्यूटी संपवून जाताना बापूरावांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी त्यांच्या घरी फोन लावला (कोविड रुग्णांच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी आणि अनावश्यक संपर्क टाळण्यासाठी हल्ली ही पद्धत सर्वत्र वापरली जाते). मुलग्याशी बोललो. तो म्हणाला, “ठीकाय डॉक्टर. आम्हाला माहिती आहे. बगा तुमच्यानं जमतंय तेवढं. मला तर काय यायला जमणार न्हायी. उगीच रोजगार बुडतो एक दिसाचा. तसंपण बापूंचं आयुष्य लिहिलंय केवडं? कदीतरी जायचंच असतंय जल्माला येणाऱ्या समद्यांना. आई गेल्यापसनं बापू उगीच येड्यागतंच करत्यात आधनंमधनं... परत फोन करू नका मला... बरं झालं तर येतील घरी त्यंचं ते; बरंवाईट झालं तर सरकारी पद्धतीनं उरकून टाका... उगीच आमाला त्यो कोरोना व्हायला नको...”
... ... ... ... ...
प्रसंग २-
माझी आज ‘इव्हिनिंग’ ड्यूटी आहे.
सकाळी वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्ण पाहून त्यादिवशी कोणकोणत्या रुग्णांना ‘डिस्चार्ज’ करता येईल याची आम्हाला कल्पना दिलेली असते. ‘मॉर्निंग’ ड्यूटी गडबडीची असते. त्यामुळे शक्यतो सगळे ‘डिस्चार्जेस’ ‘इव्हिनिंग’च्या ड्यूटीत काढले जातात. कोविड रुग्णांबाबतच्या सर्व नोंदी राष्ट्रीय पातळीवर केल्या जात असल्याने आम्हाला रुग्ण डिस्चार्ज करण्यापूर्वी वरिष्ठांना त्याबाबत कल्पना देऊन नंतर त्या रुग्णांची फोटोसहितची यादी वरिष्ठांना सादर करावी लागते. २-३ आठवड्यांपूर्वी घडलेला हा प्रसंग!
जिल्ह्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याचे वयस्कर नातेवाईक पती-पत्नी कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना आमच्या वॉर्डमध्ये अॅडमिट केले होते. पैकी पुरूष रुग्णाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यामुळे ते ‘हाय रिस्क’ पेशंट होते. शिवाय बऱ्याचदा समजावून सांगूनही औषधे घ्यायलाही ते टाळाटाळ करीत असत. त्यांची तब्येत आल्यापासूनच खराब होती. शिवाय एच. आर. सी. टी. स्कोअरही जास्त होता. आल्यापासून त्यांना उच्चदाबाच्या ऑक्सिजनवरच ठेवण्यात आले होते; म्हणजे तशीच गरज होती. एकूणच काही बरी चिन्हे नव्हती. आजी (त्यांची पत्नी) मात्र त्यामानाने ‘स्टेबल’ होत्या. तिसऱ्या दिवशी आजोबांना अतिदक्षता विभागात हलविणे भाग पडले. आजी मात्र हळूहळू बऱ्या होत होत्या. रोज राऊंडला गेल्यावर आजी आधी आजोबांच्या तब्येतीची चौकशी करत असत. बाकी बऱ्याच आजींप्रमाणे “आमचे हे माझं काहीच ऐकत नाहीत” अशी आजींची प्रेमळ तक्रार असे. दोघांच्याही वागण्यावरून त्यांच्यातील एकमेकांवरील मायेच्या ओलाव्याची कल्पना यावी. एकूणातच दोघेही एकमेकांची खूपच काळजी करत असत.
खरं सांगायचं तर आजोबांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती आणि याची कल्पना त्यांच्या दोन्ही मुलांना देण्यात आली होती. मात्र, आजोबांची तब्येत खराब होत चालली आहे याची कल्पना आजींना देऊ नका अशी विनंती त्या आजी-आजोबांच्या नातेवाईकांनी आम्हा डॉक्टरांना केली होती. त्यामुळे आम्ही आजींना ‘आजोबा बरे आहेत’ असेच सांगत असू. ते बरोबरच होते म्हणा. अन्यथा आजीनींही हाय खाल्ली असती आणि त्यांचीही तब्येत बिघडली असती.
अखेरीस आजी बऱ्या झाल्या. त्यांचे परत केलेले ‘कोविड प्रोफाईल’ ‘नॉर्मल’ आले होते. कालच्या राऊंडमध्येच आजींचा स्टेटस ‘प्लॅन्ड डिस्चार्ज टूमॉरो’ (उद्या डिस्चार्ज करता येण्यासारखा रुग्ण) ठेवण्यात आला होता. त्यामुळे आजी तर खूश होत्या.
आता आम्हाला आजोबांच्या तब्येतीची काळजी होती. ते आय. सी. यू. मध्ये होते आणि व्हेंटिलेटरवर असूनही त्यांचा ऑक्सिजन नॉर्मल राहत नव्हता. कोविड रुग्णांमध्ये येऊ नये असा ‘सायटोकाईन स्टॉर्म’ आलेला त्यांचे रिपोर्ट मोठमोठ्याने ओरडून सांगत होते. दोन्ही किडनी आणि नंतर एकामागून एक सगळेच अवयव ‘फेल’ होत गेले होते. अखेर ‘त्या’ पहाटे आजोबा आजीची साथ सोडून ‘अनंतात विलीन झाले’. नातेवाईकांनी आजोबांचा मृत्यू शांतपणे स्वीकारला; मात्र हे सगळे आजींना कसे सांगणार हा खरा प्रश्न होता. वरिष्ठ डॉक्टरांनी याबाबतचे निर्णयस्वातंत्र्य नातेवाईकांकडेच सुपूर्द केले होते. अर्थात इतक्या अडचणीच्या प्रसंगी तेच जास्त संयुक्तिक होते; पण त्याची कल्पना मला नव्हती (मी त्यावेळी ड्यूटीवर नव्हतो).
मी आजींचे ‘डिस्चार्ज कार्ड’ भरले आणि वरिष्ठांना त्याबाबत कल्पना दिली. मात्र, हे कळवताच वरिष्ठ डॉक्टरांचा लगेचच ‘फोन’ आला. ते म्हणाले, ‘आजींना आज डिस्चार्ज करू नका. त्यांच्या नातेवाईकांची अजून मानसिक तयारी झालेली नाही. ते आत्ता याक्षणी आजोबांबाबत आजींना काहीही सांगण्याच्या मनःस्थितीत नाहीत. नातेवाईक ‘होय’ म्हणाले की आपण डिस्चार्ज करू. जास्त वेळ लागणार नाही त्यांना. आजोबांचे अंत्यसंस्कार आटोपले की येतील ते लगेच...”
मी “ठीक आहे, सर,” म्हणालो.
कामाच्या इतक्या गडबडीतही माझ्या डोळ्यांच्या कडा नकळतपणे ओलावल्या... नातेवाईकांच्या, विशेषतः आजी-आजोबाच्या मुलांची मानसिक स्थिती कशी असेल नक्की? इतक्या जीवघेण्या आजारातून आई वाचली म्हणून आनंदी व्हावे तर वडील निवर्तल्यामुळे आलेल्या पोरकेपणाचे काय? आणि, आजींना आजोबा ‘गेल्याचे’ कळाल्यावर काय होईल? केवढा मोठा धक्का बसेल त्यांना? सावरतील त्या त्यातून की वियोगाच्या दुःखाने त्या कोलमडून पडतील? कोविडसारखा पसरणारा आजार असल्यामुळे आजींना आजोबांना ‘शेवटचेही पाहता’ आले नव्हते, ना त्यांच्या मुलांना वडिलांना शेवटचे ‘पाणी पाजता’ आले होते. इतकी जमीन आजोबांच्या नावावर, पण स्वतःच्या गावच्या मातीत अंत्यसंस्काराचे भाग्यही त्यांना लाभले नाही. स्वतःच्या लाघवी स्वभावाने आणि सहकार्याच्या वृत्तीमुळे जमवलेला गोतावळाही ‘कोविड नियमावली’मुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नव्हता. आजोबांचा अनंताचा प्रवासही चार खांद्यांवरून आभाळाकडे बघत न सुरू होता पांढऱ्या प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळून शववाहिकेतून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या साक्षीने सुरू झाला होता..!
कोरोनासारख्या सूक्ष्म जीवजंतूने स्वतःला सर्वांत बुद्धिमान समजणाऱ्या ७०० कोटींपेक्षाही जास्त संख्येने असणाऱ्या मनुष्यप्राण्याचा ‘थेट लढतीत सरळसरळ पराभव’ करण्याचा विडाच उचलला आहे..!
आजोबांबरोबरच आजींचा आणि आमचाही आज पराभव झाला आहे...
... ... ... ... ...
(क्रमशः)
[शब्दार्थ-
रिमेनिंग= वॉर्डमधील शिल्लक रुग्ण;
बॅड पेशंट= तब्येत अतिशय खराब असलेले रुग्ण;
डी. सी.= मृत्यू झाला;
एन. आय. व्ही.= उच्चदाबाने ऑक्सिजन पुरवठा करणारे मशीन;
ओव्हर= ड्यूटी शिफ्ट बदलताना जाणाऱ्या डॉक्टरांनी येणाऱ्या डॉक्टरांना रुग्णांच्या अवस्थेबद्दल दिलेली माहिती;
कॅज्युल्टी- अपघात विभाग; अतिगंभीर रुग्णांना सर्वप्रथम इथे आणले जाते.]
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)
(www.dramittukarampatil.blogspot.com
www.dramit100wordstories.blogspot.com
www.trekdoctoramit.blogspot.com)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)
Comments
Post a Comment