बापमाणूस! (The Godfather)

 “बापमाणूस!” (The Godfather)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

“तू जास्त टेन्शन घेऊ नको. एम. सी. एस. आर.ची* पुस्तके घेऊ आपण; त्यात आहेत सेवाशर्ती आणि नियम. तू आधी वाच नीट, नंतर पाहू काय करायचं ते. असा कसा पगार होत नाही? गेली कित्येक वर्षे जिल्हा लेव्हलची अकाउंट्स सांभाळली आहेत मी. नाहीतर मी येतो सरळ तुझ्या वरिष्ठांना भेटायला,” पप्पा मला सांगत होते.(एम. सी. एस. आर.= MCSR, Maharashtra Civil Services Rules)


                              आदरणीय पप्पा

मी गट- अ वैद्यकीय अधिकारी पदावर ‘जॉईन’ झालो होतो. आणि नंतर, चार महिने झाल्यानंतरही पगार होत नसल्यामुळे निराश झालो होतो. त्यात अध्येमध्ये काही ना काही कारणाने वरिष्ठांशी तात्त्विक मतभेद होऊन छोटे-मोठे खटके उडायचे.

मग रीतसर तक्रार नोंदवावी की अजून थोडे दिवस वाट पहावी या संभ्रमात मी होतो. निराशा तर होतीच. 

पप्पांच्याच सल्ल्याने मग मी आणखीन थोडा वेळ धीर धरायचे ठरवले. 

पण, त्यानंतर तीन आठवडे उलटून गेले तरी पुढे फार काही होईना. मला खूप राग यायला लागला- वरिष्ठांचा, सिस्टीमचा आणि नंतर (सरकारी नोकरीत आलो म्हणून) स्वतःचाही!

अखेरीस मी वरिष्ठांविरूद्ध तक्रार केली, म्हणजे मला तसे करणे भाग पडले. वरिष्ठांचा ‘इगो’ दुखावला गेला, म्हणजे ते स्वाभाविकच होते म्हणा! त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या लहान-सहान त्रास द्यायला सुरू केले. आणि मग, एके दिवशी जे व्हायचे होते ते झाले. आमचा मोठा वाद झाला. माझाही ‘इगो हर्ट’ झाला.

पण, कनिष्ठ असल्यामुळे मी दबावाखाली राहणे साहजिक होते. ते पप्पा पाहत होते. न राहवून पप्पांनी मला कारण विचारले, तर मी म्हणालो, “पप्पा मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय. पेशंट्स बघण्यात कमी वेळ आणि हे ऑफिसचं निस्तरण्यात जास्त वेळ जातोय.”

यानंतर जे झालं तेव्हा मला कळालं ‘माझे वडील फक्त वडील नाहीत तर ‘बापमाणूस’ आहेत ते!’

पप्पांनी माझ्या हातात सरळ २१००० रुपये दिले; त्यावेळची ‘बेसिक पे अधिक ग्रेड पे’ची एकूण रक्कम. सरकारी नोकरी अचानक सोडता येत नाही. एक तर आधी एक महिन्याची नोटीस द्यावी लागते किंवा अचानक सोडायची असेल तर मग ‘बेसिक पे अधिक ग्रेड पे’ची रक्कम एकदम भरावी लागते. तेवढी ही रक्कम. आणि, खिशात एक राजीनामा-पत्र, बिनतारखेचं, लिहून ठेवायला सांगितलं.

पैसे देऊन पप्पा मला म्हणाले, “तू रीतसर अपॉइंटमेंट घेऊन काम केलं आहेस तर तो पगार काहीही झालं तरी तुला मिळणारच आहे; ते महत्त्वाचं नाही. पण, उद्यापासून सर (माझे वरिष्ठ) जर तुला विनाकारण तुझी चूक नसताना काही बोलले किंवा त्रास देऊ लागले तर ही ‘बेसिक पे’ची रक्कम आणि हे राजीनामा-पत्र तारीख टाकून, सही करून ऑफिसमध्ये देऊन टाक आणि तडक घरी निघून ये. पुढे मी बघतो काय करायचं ते!” 

याला म्हणतात ‘बाप’! त्या दिवसानंतर आजपर्यंत केलेल्या शासकीय नोकरीत ना मी विनाकारण त्रास सहन केला; ना मला कशाची अकारण भीती वाटली. प्रसंग कितीही कठीण असो, ‘‘पप्पा आहेत ना; बघूया पप्पांना सांगून, ते काहीतरी मार्ग काढतीलच,” असा आत्मविश्वास मनात असतो.

माझे एमबीबीएस झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. म्हणजे ‘कळतेपण (maturity)’ आल्यावरची. लहानपणी तर आपण सगळेच आई-वडिलांवर अवलंबून असतो; पण आज इतक्या वर्षांनतरही माझ्या मनात कधी नैराश्याची भावना आलीच तर त्याबरोबर “आई-पप्पा आहेत ना; बघूया त्यांच्याशी बोलून” या भावना कायम असतात आणि त्यांच्याशी बोलल्यावर नक्कीच मार्ग निघेल हा आत्मविश्वासही!

मुळात मी डॉक्टर झालो तेच पप्पांमुळे! दहावीपर्यंत माझ्याकडे गणितातल्या त्या-त्या इयत्तेतील सर्वोच्च अशा शासकीय प्राविण्य, प्रज्ञा, एमटीएस, एनटीएस परीक्षांची सर्टिफिकेट्स आणि स्कॉलरशिप्स खचाखच जमा झाल्या होत्या; त्यामुळे मी इंजिनीयरच होणार हे जवळपास सगळ्यांनी मनोमन ठरवून टाकले होते- फक्त पप्पा सोडून सर्वांनी! पप्पांचे एमबीबीएसचे अॅडमिशन एका गुणाने हुकले होते आणि त्यामुळे आपला दोन्हीतला एकतरी मुलगा डॉक्टर व्हावा (किंवा डॉक्टर झाला तर बरे) असे त्यांना मनोमन वाटत असे. पण पप्पांनी हे थेट कधी बोलून दाखवले नव्हते. 

बारावीनंतर जेव्हा व्यावसायिक शिक्षणाला प्रवेश घेण्याच्या संभ्रमात आम्ही सगळे होतो आणि घरातील सगळे नातेवाईक मला ‘इंजिनीयरिंग’लाच अॅडमिशन घे असे सांगत होते तेव्हा पप्पांनी मला एक दिवशी बसवले आणि समजावले, “हे बघ, तू बी. ए. केलंस तरी चमकशील याची मला आणि तुझ्या आईला खात्री आहे. तुला इंजिनियरिंग करायचं असेल तर कर; काही हरकत नाही. त्यात कष्ट केलेस तर तिथेही मोठा होशील. पण, हल्लीचा काळ बघता चांगले मार्क पडूनही नोकऱ्यांची आणि मिळालीच नोकरी तर मिळणाऱ्या पगाराच्या रकमेची काही शाश्वती नाही. आयुष्यभर ‘इनसिक्युरिटी’ राहणारच. डॉक्टर झालास तर हे प्रश्न येणार नाहीत. सरकारी नोकरी आणि खाजगी प्रॅक्टिस हे दोन्ही पर्याय आपल्याला मोकळे राहतात आणि पगारही हल्ली चांगले झाले आहेत. ही प्रॅक्टिकल गोष्ट. आणि, पेशंटची सेवा करता येईल, बरेच लोक भेटतील, चांगलं काम केलंस तर कौतुक होईल ही मानसिक समाधानाची गोष्ट; जी तुला बाकी कुठल्या फील्डमध्ये मिळणार नाही. बघ, विचार कर. तू घेशील त्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, पण माझा वैयक्तिक सल्ला विचारशील तर तू डॉक्टर झालेलं मला जास्त आवडेल!” 

यापेक्षा काय हवं असतं १८ वर्षे वयाच्या आपल्याला? तेव्हाच ‘डॉक्टर’ व्हायचं ठरवलं; आणि ‘अनंत अडथळे पार करत’ झालोही! याचे १००% श्रेय पप्पांचेच!

लहानपणी चौथ्या किंवा पाचव्या वर्षी गावाकडच्या विहिरीत पप्पांनी मला पोहायला शिकवलेलं आठवतंय. माझी पाण्याची भीती जावी म्हणून पप्पांनी पहिल्या दिवशी मला त्यांच्या पाठीवर घेऊन अर्धा तास विहिरीतील पाण्यात फेऱ्या मारल्या होत्या. तेव्हापासून पाण्याची भीती निघून गेली ती कायमचीच! स्वीमिंग टँकमधला ‘प्रोफेशनल ट्रेनर’ आणि स्वतःच्या पाठीवरून फेरी मारून आपली भीती घालवणारे आपले वडील यांच्यात ‘हा’ फरक असतो. वडिलांनी दिलेला आत्मविश्वास संपूर्ण जन्मभर आपल्याबरोबर राहत असतो.

हे तर ‘नॉर्मल’ असतं. माझे पप्पा बाकीच्यांच्या वडिलांपेक्षा चार पावले पुढे होते. आपल्या सगळ्यांच्या मनात सापांची भीती असते. माझ्याही मनात लहानपणी असावी. पप्पांना ती घालवायची होती. त्यासाठी पप्पांनी काय करावे! मी तिसरीत असताना नागपंचमीच्या सणादिवशी पप्पांनी मला शाळेच्या रस्त्यावरील एका स्टुडिओत नेले. (तेव्हा आम्ही कवठेमहांकाळ, जि. सांगली येथे रहायचो.) त्या स्टुडिओत एका माणसाने फोटो काढण्यासाठी एक साप आणला होता; चांगला आठ-दहा फुटांचा! पप्पांनी त्यांना विनंती केली आणि तो साप चक्क माझ्या गळ्यात घालून चांगले पंधरा-वीस मिनिटे माझे (आणि सापाचेही) ‘फोटोसेशन’ करून घेतले. त्यानंतर आजपर्यंत अगदी ट्रेकिंग करतानाही सापांमुळे जीवघेणे प्रसंग आले तरी सापांची भीती कधी वाटली नाही. याला म्हणतात ‘बाप’!



माझा तिसरीतला फोटो


आज मी एमबीबीएस-एमडी करतानाही माझ्या मराठी आणि इंग्रजी अक्षराचे सर्वजण कौतुक करतात तेव्हा बरं वाटतं; पण ते काही आत्ता झालेलं नाही. मला नीट आठवतं (आणि आई-पप्पाही हे सांगतात). मी पहिलीत असतानाही पप्पा अक्षर सुधारण्यासाठी मला किमान दोन तास तरी ‘प्रॅक्टिस’ करण्यासाठी बसवायचे. गोड बोलून ते हे करायचे; रागवायचे अजिबात नाहीत; पण त्या ‘प्रॅक्टिस’मधून सुटका नव्हती. 

पुढे चौथी स्कॉलरशिप परीक्षेत मी ग्रामीण भागात संपूर्ण महाराष्ट्रात दुसरा आलो होतो. माझ्या तालुक्यात त्यावेळी या परीक्षेबद्दल शिक्षकांनाही धड माहिती नसायची. त्यावेळी तिसरीपासून पप्पांनी माझा स्कॉलरशिपचा अभ्यास घ्यायला चालू केले होते. मी चौथीत गेलो तेव्हा माझा या परीक्षेचा जवळपास सगळा अभ्यास पूर्ण झाला होता. त्यावेळी ‘बुद्धिमत्ता चाचणी’ हा एक विषय त्या परीक्षेला असायचा; म्हणजे आजचा यूपीएससीचा ‘सी-सॅट (CSAT)’ हा विषय! त्याचा जो अभ्यास पप्पांनी चौथी आणि सातवी स्कॉलरशिप परीक्षेच्या वेळी करून घेतला होता तो मला यूपीएससीच्या ‘सी-सॅट’पर्यंत कामी आला. (यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत सीसॅटला काहीही अभ्यास न‌ करता मला १५० पैकी १४४ गुण मिळाले होते. असो!)  मला सातवीनंतर त्या विषयाचा अभ्यास परत कधीच करावा लागला नाही.

तीच गोष्ट ‘इंग्रजी’ची. मी मराठी माध्यमात शिकलो. इंग्रजी किंवा सेमी-इंग्रजी या माध्यमांत मला घालायचे नाही हे पप्पांनी आधीच ठरवले होते. पण, त्यामुळे आम्हा दोघा भावंडांची इंग्रजी कच्ची राहू नये म्हणून पाचवीपासून दहावीपर्यंत आई-पप्पांनी आमच्यावर घेतलेल्या कष्टाची तुलनाच होऊ शकत नाही. ज्या आठवी-दहावीच्या काळात अन्य पालक मुलांना अभ्यासाला ‘जुंपतात’ तेव्हा पप्पा आम्हाला रोज ‘Times of India’ किंवा ‘Indian Express’ रोज अर्धा तास वाचायला लावायचे; त्यातले कठीण शब्द वहीत लिहायला लावायचे. (मला बारावीत एकही दिवस इंग्रजीचा वेगळा अभ्यास न करताही १०० पैकी ९३ गुण मिळाले होते, त्याचा पाया तिथे होता.)

मला रक्त बघताच चक्कर यायची आणि पप्पांना ते माहिती होते. माझी रक्ताची भीती घालविण्यासाठी ते मला सतत दूरदर्शनवर लागणारे यू.जी.सी.चे वैद्यकीय कार्यक्रम दाखवायचे, ज्यात बऱ्याचदा छोटी-मोठी ऑपरेशन्स पण दाखविली जायची. मी चक्कर येऊन पडायचो तेव्हा मला पप्पा हे का करताहेत असं वाटायचं.

पुढे मी 'मेडिकल’ला (M.B.B.S.) गेलो. मला प्रेतांची पण भीती वाटायची आणि पहिल्या वर्षी रोज तीन तास डिसेक्शन! कॉलेजला जाताना टेन्शनमध्येच जायचो. हळूहळू मला त्या सगळ्या गोष्टींची सवय झाली आणि मग मला माझ्या सरांनी बोलावून सांगितले, “अमित, गेले आठवडाभर रोज तुझे पप्पा डिसेक्शन हॉलच्या बाहेर येऊन थांबतात, खिडकीतून अधूनमधून तुझ्याकडे बघतात. जाताना मला भेटून जातात.” मला काही त्रास झाला तर ते समोर धीर द्यायला असावेत असा विचार ते करीत असत! ऑफिसमध्ये वरिष्ठांना सांगून रोजचा लेटमार्क पडू नये म्हणून विनंती करताना त्यांची किती तारांबळ होत असेल ती आत्ता मी स्वतः शासकीय अधिकारी झाल्यावर लक्षात येते!

हे सगळं तर आहेच; पण पप्पांकडून तीन खूप महत्त्वाच्या गोष्टी मी शिकलो; अजूनही शिकतोय. 

त्यांपैकी एक गोष्ट म्हणजे ‘स्थितप्रज्ञता’! कितीही म्हणजे कितीही कठीण आणि गुंतागुंतीचा प्रसंग येवो, पण पप्पा विचलित झाल्याचे मी कधीही पाहिलेले नाही; अगदी पप्पांना स्वतःला हृदयविकाराचा धक्का आला आणि हृदयाचे काम २५% पर्यंत खालावून पप्पा ‘सीरियस’ झाले तेव्हाही. इतक्या वैद्यकीय गुंतागुंतीच्या प्रसंगीही पप्पा आमच्या ‘राजदूत’वर मला मागे बसवून ईसीजी (ECG) काढायला आले आणि चालत दवाखान्यात गेले तेव्हा आमच्या कोल्हापूरच्या हृदयविकार तज्ज्ञांनीही अक्षरशः तोंडात बोटे घातली होती. डॉक्टरांनी पप्पांची ‘कंडिशन स्टेबल’ झाल्यावर स्वतःच्या ‘डिस्प्ले बोर्ड’वर पप्पांचा फोटो लावून ठेवला आहे तो आज १५ वर्षे झाली तरी तिथे स्थानापन्न आहे! वेळ माझ्या किंवा भावाच्या अॅडमिशनची असो किंवा घरात कुणाचं दुखणं असो; पप्पा ज्या धीरगंभीरपणे आणि मानसिक स्थैर्य अबाधित राखून निर्णय घेतात त्याचा मला कायमच हेवा वाटत आलाय. पप्पा, मला शिकायचंय हे तुमच्याकडून.

या गोष्टीबरोबरच येणारी दुसरी गोष्ट म्हणजे, ‘निर्णयक्षमता आणि एकदा घेतलेल्या निर्णयावर एकदम ठाम राहण्याचा गुण’! पप्पांचे कोणतेही निर्णय तडकाफडकी नसतात आणि त्यामागे संबंधित गोष्टीचा पूर्ण विचार केलेला असून दूरदृष्टिपणाही असतो हे एव्हाना आम्हाला समजून गेलंय. निर्णय घेणे हा गुण तर आहेच, पण घेतलेल्या निर्णयामुळे होणाऱ्या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घ्यायलाही पप्पांनी शिकवलंय. 

आणि, तिसरी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, साधी राहणी. मागच्याच आठवड्यातील गोष्ट सांगतो. पप्पांना व्यायामासाठी दोन टी-शर्ट घेतले. ऑनलाईन खरेदी केल्यामुळे ‘साईझ’ वगैरे व्यवस्थित होते की नाही हे आधी बघावे म्हणून बाकीचे कपडे एकदम घेतले नाहीत. पप्पांना टी-शर्ट व्यवस्थित बसले म्हणून मी ‘आणखी दोन टी-शर्ट आणि ट्रॅकपँट्स पाठवतो’ म्हणालो तर पप्पांनी मला रागवायलाच चालू केले. मला म्हणाले, ‘गरजेपुरतंच घ्यावं रे काहीही; उगीच कपाटं कशाला भरून ठेवायची?’ पप्पा शासकीय अधिकारी असतानाही एकावेळी चपलांचा एकच जोड आणि फार-फार तर कपड्यांचे तीन किंवा चार सेटच एकावेळी वापरताना आम्ही दोघाही भावंडांनी पाहिलंय.

पप्पांचे चारित्र्य आयुष्यभर त्यांच्या कपड्यांप्रमाणेच स्वच्छ आणि डागविरहित राहिले आहे आणि संपूर्ण आयुष्य आर्थिक गरिबीत काढले असले तरी ‘सचोटीची श्रीमंती’ पप्पांनी ना स्वतः कधी सोडली, ना आम्हाला कधी सोडू दिली. त्याचा आम्हा दोघाही भावंडांना अभिमान आहे.

आम्हाला वाचनाची सवय लागावी म्हणून लहानपणी आणलेल्या ‘चांदोबा’मुळेच आज ‘हॅरिसन, नेल्सन’ या वैद्यकशास्त्रातील जाडजूड पुस्तकांपर्यंतचा वाचनीय प्रवास आम्ही करू शकलो आहोत. आज जे काही आम्ही दोघेही आहोत ते त्यांच्यामुळेच हे वाक्य लिहिणे ही फक्त औपचारिकता ठरेल; कारण आई-पप्पांचे उपकार सात जन्मातही सरणार नाहीत..!

“One father is more than a hundred school-masters” असे जॉर्ज हर्बर्टने जे म्हटलंय ते अंतिम सत्य आहे!

माझे पप्पा माझ्यासाठी एका ‘बापमाणसा‘पेक्षा कमी नाहीत..!

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,

एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))

(केवळ वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)

(© लेख कॉपीराइट केलेला असून लेखाचे संपूर्ण हक्क लेखकाधीन आहेत.)

www.dramittukarampatil.blogspot.com


Comments

  1. खुपच छान.
    Fathers Day -- वडीलांना खरीखुरी मानवंदना.
    भारतीय सस्कृतीला माझा नमस्कार. बाबांना माझा नमस्कार.

    ReplyDelete
  2. खुप छान लेख...👍👍

    ReplyDelete
  3. खुपच छान सर... 👌👍
    आदरणीय बाबांना माझा साष्टांग दंडवत 🙏

    ReplyDelete
  4. खूप सुंदर लेख दादा

    ReplyDelete

Post a Comment