“रॅट रेस: कोणाची; कोणाबरोबर आणि कशासाठी?” (आनंदी जीवन‘प्रवासा’साठी...)(The way to Happy Life Journey)
“रॅट रेस: कोणाची; कोणाबरोबर आणि कशासाठी?”
(आनंदी जीवन‘प्रवासा’साठी...)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
![]() |
Photo Credit: © Dr. Amit S. T. Patil |
घटना कालची... किंवा, परवाचीच... नव्हे, नव्हे; रोजचीच म्हणा ना!
आपल्या सर्वांचा रस्त्यावरील प्रवास अगदी नित्याचा असतो..!
मी कोल्हापूरवरून औरंगाबादसाठी कारने निघालो होतो.
कार मीच चालवत होतो आणि गाडीमध्ये मी एकटाच होतो.
इतरांप्रमाणे मला एकट्याला प्रवास करताना ‘बोअर’ वगैरे होत नाही.
प्रवासाची वेळ संध्याकाळची असेल आणि अधूनमधून बाहेर पावसाच्या सरी कोसळत असतील तर आणखीन उत्तम!
असा प्रवास मला आवडतो.
त्यात पुढे पोहोचण्याच्या वेळेचे काही बंधन नसेल आणि पोहोचल्यावर थेट हॉस्पिटलमध्ये न जाता मध्ये एखादी छानशी झोप मिळणार असेल तर मग ‘दुधात साखरच’!
या आठवड्यातील सलग दोन प्रवास असे ‘मुक्त’पणे झाले; कोणत्याही बंधनांशिवाय... अगदी अनिर्बंध नाही म्हणता येणार; पण बंधमुक्त नक्कीच..!
तुम्हाला काय वाटतंय, मी काही प्रवासवर्णन वगैरे करणार आहे का?
तर, नाही; मी आज प्रवासवर्णन करण्यासाठी माझी लेखणी झिजवणार नाही.
माझ्या मनात दुसरेच काही विचार थैमान घालत आहेत.
काल-परवाचा माझा प्रवास संपतासंपता माझा ‘सूर’ जरा वेगळाच लागला होता.
वाचा तर मग पुढे...
मी दुपारी प्रवास चालू केला; खरेतर इथे माझी वेळ चुकली म्हणता येईल का?
उन्हाळ्यात शक्यतो दुपारी प्रवास करू नये हे आपणाला माहिती आहे. असा काही कुठे नियम नसला तरी उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून दुपारचा प्रवास टाळणे उत्तम; अगदी गाडीत वातानुकूलित यंत्रणा (ए. सी.) असली तरी...
मी माध्यान्हानंतरच्या प्रहरी प्रवास सुरू केला होता.
टाकीतील पेट्रोल जवळपास संपत आल्यामुळे ते भरणे गरजेचे होते; आणि, हे मला आधीच माहिती होते.
कोल्हापूरमधील एस. एस. सी. बोर्डाकडून शिवाजी विद्यापीठासमोरून गेले की राजाराम तलावाच्या शेजारून थेट ‘एन. एच. फोर’ (पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४) गाठता येतो.
तिथून एकदा डावे वळण घेतले की मग पुण्यापर्यंत कुठेही न वळता आपण सरळ जाऊ शकतो.
खरेतर गाडीत बसण्याआधीपासूनच गाडीत पेट्रोल भरावे लागणार आहे याची मला कल्पना होती.
महामार्गाकडे जाताना जो सायबर चौक लागतो तिथे डावीकडे एक पेट्रोल पंप आहे; जिथे पेट्रोल भरण्याचा निर्णय मी आधी घेतला होता.
मी तसा विचार करून डावीकडे वळलोही; पण रस्ता छोटा आणि वाहनांची गर्दी जास्त असल्यामुळे मी थोडे अंतर गेल्यावर कंटाळून ‘यू टर्न’ घेतला आणि महामार्गाच्या दिशेने माझा प्रवास सुरू केला.
गाडीतील पिवळ्या रंगाचा ‘फ्युएल इंडिकेटर’ मात्र पेट्रोल कमी झाल्याचे सतत चमकून सांगत होता.
मी ‘हायवे’ला लागलो आणि माझा ‘खरा’ प्रवास सुरू झाला.
गाडी एखाद-दोन किलोमीटर पुढे गेली असेल आणि ‘फ्युएल इंडिकेरचा’ शेवटचा ‘मार्क’ही दिसायचा बंद झाला.
आता मात्र माझ्या छातीची धडधड फ्युएल इंडिकेटरच्या ‘ब्लिंकिंग लाईट’पेक्षाही जोराने वाढली.
मनात आता दोनच प्रश्न होते; एक, ‘राजारामपुरीतला तो पहिला पेट्रोल पंप मी का सोडला’ हा, आणि दुसरा म्हणजे, ‘आता दहा-बारा किलोमीटरमध्ये पेट्रोल पंप नसेलच तर काय’ हा!
पुढे अजून पाचशे-साडेपाचशे किलोमीटरचा प्रवास आणि सुरूवातच अशी अडखळत झाली तर कसं होणार ना?
आणि, गाडी मध्येच बंद पडली तर?
दुचाकी असेल तर निदान ढकलत नेता येते; कार बंद पडली तर काय होईल!
पण, चार-पाच किलोमीटरवर एक पंप दिसला.
मग, टाकी ‘फुल्ल’ केली आणि परत प्रवासाला लागलो.
रस्त्यात मला माझे चांगले मित्र डॉ. खराटे सर यांना भेटायचे होते.
तसा आमचा फोनही झाला होता.
मी कोल्हापूरमध्ये आलो आहे आणि सरांना भेटलो नाही असे कधी होत नाही.
सर कोडोलीला असतात, मग आम्ही कधी कोल्हापूरमध्ये, कधी पन्हाळ्यात, कधी कोडोलीत, आणि, अगदीच जमले नाही तर वाठारच्या पुलाजवळ भेटतो; पण सरांना न भेटता मी जात नाही हे नक्की!
गेल्या तीन दिवसांत कोल्हापूरमध्ये असलो तरी या ना त्या गोष्टीत व्यस्त राहिल्यामुळे सरांची भेट झाली नाही.
त्यामुळे जाताना वाठारच्या एस. टी. स्टँडवर भेटायचे आम्ही ठरवले होते.
सर माझ्याआधी अर्धा तास तिथे पोहोचले होतेही; सरांचा तसा मला फोन येऊन गेला होता.
पण, मी आधी पेट्रोल भरण्याच्या दबावात आणि नंतर ते भरल्यामुळे एकदम ‘रिलॅक्स’ झाल्यामुळे सरांना भेटायचे विसरून गेलो.
नंतर, किणी टोलनाका क्रॉस झाल्यावर काही वेळाने मला परत सरांचाच ‘कुठपर्यंत पोहोचलाय’ हे विचारायला फोन आला आणि मी भानावर आलो.
यावेळी माझी आणि सरांची भेट व्हायची राहून गेली.
मनाला ती चुटपूट लागून राहिली आणि मग मी स्वतःचीच समजूत काढत ‘आजची आमची भेट नशीबातच नव्हती’ अशी (कोणत्याही प्रसंगी एकदम ‘फिट' बसणारी) पळवाट शोधून काढली.
प्रवास करत-करत मी पुण्यात पोहोचलो.
शहरात काही महत्त्वाचे काम नसेल तर शक्यतो पुण्यात न शिरता बाहेरच्या बाहेर पडण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो.
माझ्याही डोक्यात तेच होते.
मला पुणे शहरातील भाग आणि शहरातले रस्ते कधीच लक्षात राहत नाहीत (तसा मी काही पुण्यात फारसा राहून फिरलेलो नाही; तरीही...).
म्हणून मी ‘गुगल मॅप’चा ‘शॉर्टकट’ वापरायचे ठरविले.
मी ट्रेकिंगच्या निमित्ताने (एकटा) बराच फिरलो आहे, त्यामुळे ‘गुगल मॅप’वर फारसे विसंबून राहू नये हे मला माहिती आहे.
गुगल मॅप मदतीसाठी चांगला आहे, पण त्याच्यावर पूर्णतः विसंबून राहण्याचा निदान माझातरी अनुभव चांगला नाही. (आणि, हे सगळं मला माहिती आहे.)
हा मॅप शक्यतो ‘फास्टेस्ट रूट’ शोधतो, त्यामुळे पुण्यातील गल्लीबोळांचे (अकारण) दर्शन मला यापूर्वीही झाले आहे.
कधीकधी गल्लीबोळांतून निघणाऱ्या ‘फास्टेस्ट रूट’पेक्षा मोठे सरळ मार्ग आणि रात्रीच्या वेळी ‘सेफेस्ट (सुरक्षित) रूट’ जास्त परवडतात किंवा व्यावहारिक असतात.
त्यात नेमकी अशी समस्या उद्भवली की, मॅप पंधरा-वीस सेकंद ’एन्लार्ज्ड’ दिसला की नंतर अचानकच ‘स्क्रीन’ ‘ब्लँक’ व्हायची.
दरवेळी गाडी चालवता चालवता तो मॅप सतत ‘एन्लार्ज’ करायला लागत असल्यामुळे मी अक्षरशः ‘फ्रस्ट्रेट' होऊन गेलो.
(पुणे शहरात ज्यांनी ज्यांनी गाडी चालवली आहे त्यांना माझे ‘फ्रस्ट्रेशन’ नक्कीच समजू शकते!)
आणि हे सर्व मला माहिती असूनही उगाचच गल्लीबोळातून भटकत भटकत मी ‘केविलवाणा’ होऊन पुणे-नगर रोड तासभर शोधत राहिलो.
एवढ्या सगळ्यांत एक गोष्ट चांगली होती, ती म्हणजे वातावरण छान (cool and pleasant with clear sky) होते.
मी पुढचा प्रवास चालू केला.
पुण्याच्या उपनगरांमधील गर्दीने गच्च भरलेल्या रस्त्यावरून वाकडीतिकडी वाट काढत मी ‘पुण्यनगरी’तून कसाबसा बाहेर पडलो.
प्रवासात मी कधी काही बाहेरचे खात नाही, पण दोनतीनदा चहा मात्र पितो.
सातारा क्रॉस केल्यावरच मी कुठेतरी चहा प्यायचे ठरविले होते.
मात्र, लॉकडाऊनमुळे सगळ्या टपऱ्या आणि हॉटेले बंद होती.
पुढे पुण्याच्या अलीकडे पंधरा-वीस किलोमीटरवर एका टोलनाक्यापुढे दोन-तीन ‘स्पेशल चहा’च्या टपऱ्या दिसल्या.
पण, मी त्यावेळी ‘थांबण्या’च्या ‘मूड’मध्ये नव्हतो आणि नंतर पुणे शहरात थांबून गडबडीत चहा पिण्याची माझी इच्छा नव्हती.
नगर रोडवर मात्र मला चहा पिण्याची तीव्रेच्छा झाली, तर आता टपरी दिसायला तयार नव्हती.
(दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत!)
त्यादरम्यानच एक गोष्ट घडली.
पुण्यातल्या गर्दीत बऱ्याचदा गाडी सरळ न चालवता थोडी वाकडीतिकडी चालवावी लागते (हे recommendation नसून स्वानुभव आहे, हे कृपया लक्षात घ्या), म्हणजे सगळेच चालवतात.
पोलिस तरी कुणाकुणाला अडवणार नाही का!
असो.
मी गाडी चालवत असताना आणि बऱ्याच गाड्या ‘ओव्हरटेक’ करत असताना एका लाल रंगाच्या i10 लाही ओव्हरटेक केले होते.
अर्थात, आपण कधी हे सगळं लक्षात ठेवत नसतो.
पण, कदाचित त्यामुळे त्या चालकाचा ‘इगो’ मी नकळत दुखावला असावा.
नंतर ती एम. एच. २० (औरंगाबाद) पासिंग असणारी ती गाडी मला हॉर्न वाजवत डावीकडून ‘ओव्हरटेक’ करून पुढे गेली.
झालं... आता माझाही ‘इगो’ दुखावला गेला.
मी काहीही करून त्याच्यापुढे गाडी काढण्यासाठी प्रयत्न करू लागलो.
आणि, थोड्याच वेळात मी त्यात यशस्वी (!) झालोही.
ती लाल गाडी ‘ओव्हरटेक’ केल्यावर मग मी माझी ‘पांढऱ्याशुभ्र’ रंगाची ‘अमेझ’ इतक्या जोराने चालवली की काहीवेळाने ती लाल कार मला ‘रिअर मिरर’मध्ये दिसायची बंद झाली.
आता मी गाडीचा वेग थोडा कमी केला असला तरी साधारणपणे नेहमीपेक्षा जास्तच ठेवला.
अधूनमधून मी आरशात ‘ती’ कार दिसते का हे पाहत रहायचो.
नंतर बरेच अंतर गेल्यावरही ती कार दिसत नव्हती.
(ठरवून लावलेली स्पर्धा नसतानाही) माझ्या मनामध्ये उगाचच ‘काहीतरी जिंकल्याची’ भावना आता निर्माण झाली होती.
मला चहा प्यायचा आहे हेही मी विसरून गेलो होतो.
आता माझ्या डोक्यात परत चहाचे विचार येत होते आणि भूकही लागली होती.
मी घरून जेवण आणि काही ‘स्नॅक्स’ आणले होते.
कुठेतरी थांबून ते खायचा माझा विचार होता; पण ‘ती’ लाल कार आपल्याला क्रॉस करून पुढे जाईल की काय अशी अनामिक भीती सतत माझ्या मनात येत होती.
मी गाडी चालवत-चालवतच ‘स्नॅक्स’ खाल्ले आणि तसाच पाणीही प्यायलो.
चहा मात्र मला कुठेतरी थांबूनच प्यावा लागणार होता. सतत गाडी चालवत असल्यामुळे मला पायही मोकळे करायचे होते.
पण... पण, ‘ती’ कार काही केल्या डोक्यातून जात नव्हती.
मी गाडी तशीच चालवत राहिलो आणि तरीही जे घडू नये असे वाटत होते तेच झाले.
थोड्याच वेळाने माझ्या ‘रिअर मिरर’मध्ये ‘ती’ कार दिसू लागली होती.
‘तो’ लाल कारवाला आता माझ्या पुढे निघून जातो की काय या भीतीपोटी माझ्या गाडीचा वेग नकळतपणे बराच वाढला होता... आणि, त्याबरोबरच माझ्या छातीचे ठोकेही..!
थोडावेळ मी पुढे राहिलो, पण माझे लक्ष समोरच्या रस्त्यापेक्षा मागून येणाऱ्या कारकडेच जास्त होते.
त्या नादात माझे समोरच्या ‘ट्रक’कडे दुर्लक्ष झाले आणि अचानकपणे तो समोर आल्यामुळे माझा वेग मला बराच कमी करावा लागला.
... त्या ‘लाल कार’ने नेमकी तीच संधी शोधली आणि डाव्या बाजूने (wrong side) मला ओलांडून ती पुढे निघून गेली.
(आता मला बरोबर wrong side ची आठवण झाली होती; मी ओव्हरटेक करताना मात्र याचा विचार माझ्या डोक्यात आला नव्हता!)
मी खूपच अस्वस्थ झालो आणि काहीही करून माझी गाडी पुढे काढायचा मी चंगच बांधला.
पुढे पाच-सात किलोमीटर गाडी अक्षरशः ‘दामटवत’ नेऊन मी त्याच्यापुढे गेलोच.
तिथून पुढे मात्र मी स्वतःच (ती कार आरशात दिसत नसूनही) सतत दबावाखाली आणि गोंधळलेल्या अवस्थेत (anxious) कार चालवत राहिलो.
गाडी चालत राहिली; पण, आता ‘काहीतरी जिंकल्याची’ भावना जाऊन ‘काहीतरी गमावल्याची’ भावना माझ्या मनात येऊन कसलातरी void निर्माण झाल्यासारखे वाटत होते.
काही वेळाने नगरजवळच्या एका छोट्याश्या घाटात माझी गाडी शिरली.
त्याठिकाणी महामार्गाच्या उजवीकडे छोट्या-मोठ्या टेकड्यांना अंगाखांद्यावर खेळवत असलेले विस्तीर्ण पठार आणि डाव्या बाजूला मावळतीकडे जाणारा सूर्य आणि त्याची प्रभा यांनी केलेली केशरी-जांभळ्या रंगांची उधळण दिसत होती.
मी लगेच भानावर आलो.
आणि, गाडीच्या चाकाबरोबर माझ्या डोक्यातील ‘विचारचक्र’ जोरजोरात फिरू लागले.
‘माझा चहा राहिला की,’ माझ्या पटकन लक्षात आलं.
‘हक्काचं आणि माझ्या पूर्ण हातातील’ असूनही काहीतरी ‘राहून गेल्याची’ ही पहिली जाणीव!
मग मला एकेक गोष्टी आठवत राहिल्या.
मी ‘स्नॅक्स’ थांबून न खाता गाडीत बसूनच खाल्ले; अगदी पाणी पितानाही मी गाडी थांबवली नाही; मी पाय मोकळे करायला उतरलो नाही; सतत ड्रायव्हिंग केल्याने कंटाळा येऊनसुद्धा फ्रेश व्हायलाही मी थांबलो नाही...
इतकं चांगलं वातावरण असूनसुद्धा गाडीतून उतरून मी एकही फोटो काढला नाही (माझ्या सवयीच्या एकदम विपरीत!)...
निळं आकाश आणि त्यावर रविकिरणांनी केलेला सोनेरी-केशरी रंगाचा साजही मी नीटसा पाहिला नाही...
इतक्या वेगात ड्रायव्हिंग करताना मी घरच्यांचा आणि ते करत असलेल्या काळजीचाही विचार केला नाही...
असंख्य विचारांनी मनात फेर धरला होता.
आता ‘त्या’ लाल रंगाच्या कारचा विचार माझ्या मनाच्या तळाशीही नव्हता.
मला ती लाल कार आणि तिचा ड्रायव्हर यांच्याशी आता काहीच देणेघेणे नव्हते; ती पुढे जावो काय किंवा मागे पडो काय... काहीही होवो...
मी गाडीचा वेग पूर्ण कमी केला.
घाटात उतरलो.
आधी पाणी पिऊन मन आणि आत्मा थोडे शांत केले.
खाली उतरून मस्त एक फेरफटका मारला आणि बराच वेळ मावळतीच्या सूर्याकडे आणि आकाशातील रंगांच्या उधळणीकडे; त्या रंगांच्या ‘बॅकग्राउंड’वर उडणाऱ्या ‘अजूनी अंबरात असणाऱ्या बगळ्यांच्या माळफुलां’कडे; निळ्याशार नभाकडे आणि उन्हामुळे वाळून पिवळ्याशार-सोनेरी रंग धारण केलेल्या गवताने सजवलेल्या त्या विस्तीर्ण पठाराकडे मी पाहत राहिलो.
कुठल्यातरी गोष्टीने आता मन अचानकपणे पावसाने भरून आलेल्या काळ्या मेघांप्रमाणे भरून आले होते.
रितेपणाची जागा आता समृद्धीने घेतली होती.
अर्ध्या तासाने मी माझा राहिलेला प्रवास परत सुरू केला; पण आता मी गाडी ‘क्रुझ कंट्रोल’वर टाकून निवांतपणे राहिलेले अंतर कापत चाललो होतो.
आता माझे ध्येय जरी निश्चित असले तरी तिथपर्यंत पोहोचताना केलेला प्रवास मला जास्त महत्त्वाचा वाटत होता!
आता मी ‘खऱ्या’ अर्थाने विजेता झालो होतो..!
![]() |
Photo Credit: © Dr. Amit S. T. Patil |
आपलं जीवनही असंच असतं ना!
आधी मी प्रवासाची ‘वेळ’ स्वतःहून ‘अयोग्य’ (सकाळऐवजी दुपार) निवडली.
मग मी माहिती असूनही कोणत्यातरी ‘क्षुल्लक गोष्टीचा कंटाळा’ करून पेट्रोल ‘योग्य ठिकाणी’ भरले नाही.
आधी पेट्रोल संपण्याच्या ‘दबावा’त आणि नंतर ते पूरेपूर ‘भरल्याच्या’ आनंदात मी सरांना भेटायला विसरलो; पण ही गोष्ट मी सोयीस्कररीत्या नशिबावर ढकलून स्वतः मात्र नामानिराळा झालो.
पुण्यात आल्यावर मी ‘गुगल मॅप’वर अतिजास्त प्रमाणावर ‘विसंबलो’!
(‘जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभार बुडाला’ म्हणतात ते उगाच नाही!)
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मी माझी स्पर्धा स्वतःशीच आहे आणि माझे ध्येय निश्चित असले तरी ध्येयप्राप्तीपर्यंतचा माझा प्रवास माझाच राहिला पाहिजे आणि त्यातून मी आनंद घेतला पाहिजे या दोन गोष्टी अक्षरशः विसरलो.
‘तो’ कारवाला उभ्या जन्मात मला आधी कधी भेटला नव्हता आणि नंतरही कधी भेटण्याची शक्यता नव्हती, तरीही त्याने काही काळासाठी अप्रत्यक्षपणे का होईना, माझा ताबा मिळवला होता हे सत्य आहे.
त्याच्या कारचा ‘लाल’ रंग मला आता मला रागाचा आणि ‘cut-throat competition’चा (जीवघेणी स्पर्धा) निदर्शक वाटत होता; तर माझ्या कारचा ‘पांढरा’ रंग शांततेचे प्रतिनिधित्व करतोय असे मला वाटत होते.
माझी त्याच्याशी कसलीही स्पर्धा नाही हे माझ्या खूप उशिरा लक्षात आले. तसेच मी त्याच्या दबावाखाली येण्याचीही कसलीच गरज नव्हती याचीही मला जाणीव झाली.
जीवनही असंच असतं, मित्रांनो...
आपल्या जगण्यातील अनावश्यक गोष्टींना महत्त्व देण्याच्या आणि अकारण ईर्श्या करण्याच्या नादात आपण आपलं ‘जगणं’ गमावतो आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य हरपून बसतो.
आणि, परत आपण आपल्याला जडावलेल्या बी. पी. (उच्च रक्तदाब), शुगर (मधुमेह), कर्करोग या आजारांचे मूळ शोधत राहतो.
जीवन जगताना घेतलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबावामुळेच बऱ्याचदा शरीराला हे त्रास होत राहतात.
यातून मी बरंच काही शिकलो, बराच विचार केला.
माझे पप्पा नेहमी म्हणतात, “इतकी काय गडबड असते तुला गाडी पळवायची? कुठं काय रेस लावली आहे का आणि त्यात काय बक्षीस देणार आहेत का? गाडी हळू चालवत जा जरा; अॅक्सिलरेटरपेक्षा ब्रेकवर चांगला ‘कंट्रोल’ असला पाहिजे. गाडी काय कुणीही पळवते; त्यात काय इतकं विशेष!”
म्हणजे, गाडी पळविण्यात काहीच ‘विशेष’ वाटत नव्हतं पप्पांना; त्यांच्यासाठी विशेष होतं ते गाडी ‘नीट’ चालवणं... आणि, ते एकदम खरंय!
मी तर या प्रवासातून हा धडा ‘शिकलो’ बाबा; तुम्ही बघा काय करायचं ते!
“जीवनाची गाडी सरळ ‘क्रुझ कंट्रोल’वर टाकून द्यावी, ब्रेकरूपी (चारित्र्य आणि सचोटीने) नियंत्रण आपल्या हाती राहू द्यावे... आणि अंतिम ध्येयप्राप्तीकडे नेणारा ‘प्रवास’ ‘आनंदा’ने ‘अनुभवावा’!!!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)
(लेखाचे सर्व हक्क कॉपीराइट केलेले असून ते लेखकाधीन आहेत.)
(लेखकाच्या नावासह हा लेख शेअर करण्यास हरकत नाही.)
मस्त लिहिलंय अमित. मला पण शिकव ना कार
ReplyDeleteधन्यवाद, शिकवतो ना!
Delete👍👍
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteHmmm khar ahe....
ReplyDeleteMlapn ase anubhav alet.
Yes, thanks!
Deleteदादा खूप मस्त लेख
ReplyDeleteThank you!
DeletePurn Pravas ghadavla tumhi MH12 to MH20 cha
ReplyDeleteAs usual Apratim Lekhni….
(Petrol n bharlyane honar regret cha kissa majyasobat nehmi hoto India made hoto teva bike ani ikade Bahamas made car.. :))
Thanks a lot, Kiran!
DeletePurn Pravas ghadavla tumhi MH12 to MH20 cha
ReplyDeleteAs usual Apratim Lekhni….
(Petrol n bharlyane honar regret cha kissa majyasobat nehmi hoto India made hoto teva bike ani ikade Bahamas made car.. :))
Very Nicely Narrated Sir...✍️
ReplyDeleteवास्तववादी लेखन शैली प्राप्त आहे आपल्याला डॉक्टर. वाचताना असे वाटते तो सर्व प्रसंग आपल्या समोर घडतोय.
ReplyDeleteधन्यवाद धन्यवाद!
Deleteश्री रेंदाळे गणेश ९९७०९८५०५१
ReplyDeleteआभारी आहे, गणेश!
DeleteNice blog sir ....
ReplyDeleteThank you!
DeleteKhup chan...👍
ReplyDeleteThanks a ton!
DeleteKhup chan👌
ReplyDelete