एक दिवस शेतातला, ग्रामजीवनाचा... (One day in farm; Glimpse of the rural life)

 एक दिवस शेतातला, ग्रामजीवनाचा...

(बैल, पक्षी, आधुनिक शेती आणि परिसंस्था!)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)





घाबरू नका, हा काही शाळेतला निबंध नाही. म्हणजे, हल्ली ‘या’ ज्वलंत विषयावर निबंध लिहायला सांगण्याचे धाडस कोणतेही परीक्षा मंडळ करेल असे मला वाटत नाही. आमच्या लहानपणी चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील ‘भाषा’ या विषयात अगदी पहिलाच दहा गुणांचा प्रश्न हा चित्रावर्णनावर येत असे. यात एक चित्र दिलेले असून त्यावर १० वाक्यांत माहिती लिहायला सांगितली जात असे. त्यामध्ये शेतीसंबंधीची बरीच चित्रे हमखास अभ्यासायला लागत असत; ज्यामध्ये नांगरणी, मळणी, पेरणी करतानाची दृश्ये असत. आत्ताच्या शिष्यवृत्ती परीक्षेसारखे ३०० पैकी ३०० ‘पाठांतरा’चे गुण त्यावेळी पडत नसत आणि प्रश्नही बुद्धीचा कस लागणारेच असत. तो आता भूतकाळ झाला. आता शिष्यवृत्ती परीक्षाही शेकड्यांनी झाल्या आहेत आणि त्या मिळविणारे विद्यार्थीही हजारोंत आहेत. दहावीलाच जिथे १००% पेक्षा कमी पडलेले गुण ‘कमी’ वाटू लागले आहेत तिथे शिष्यवृत्तीचे काय घेऊन बसायचे, नाही का! असो...


खूप महिन्यांनंतर मागच्या आठवड्यात मूळगावी गेलो; मोजायचंच झालं तर तब्बल ३० महिन्यांनी... रेसिडेन्सी करत असताना शक्यतो सुट्ट्या मिळत नाहीत; त्यामुळे फारसं इकडेतिकडे जाणं-फिरणं होत नाही...


मी जेव्हा कधी गावाकडे जातो तेव्हा बैलांसोबत एखादा तरी फोटो काढण्याकडे माझा कटाक्ष असतो. (© डॉ. अमित) तशी माझ्या घरात बैलजौडी कधीपासूनचीच नाहीये; म्हणजे पूर्वी होती, पण कालौघात नाहीशी झाली आणि आता तर दारात ट्रॅक्टर उभा असल्यामुळे बैलजोडी दारात परत उभी राहणे जवळपास अशक्य आहे. 


गावाकडे बैलपोळा कितीही उत्साहात साजरा होत असला आणि आपण दूरचित्रवाणीवर काही ठिकाणच्या बैलपोळ्यांचे व्हिडिओ आणि बातम्या पाहत असलो तरी हल्ली बैलजोड्या विरळ झाल्या आहेत.


आम्ही मूळचे सांगली जिल्ह्यातील; परंतु गेल्या २५ वर्षांपासून पहिल्यांदा पप्पांच्या शासकीय नोकरीच्या निमित्ताने आणि नंतर आमच्या शिक्षणाच्या निमित्ताने आमचे वास्तव्य कोल्हापूर शहरात-जिल्ह्यात असते. यामुळे ग्रामीण भागाचा आमचा (माझा आणि भावाचा) संपर्क तसा कमीच येतो! असे असले तरी ग्रामजीवनाशी पिढ्यान्-पिढ्या चालत आलेली नाळ कधीच तुटू शकत नाही किंवा खरंतर असं म्हणता येईल की जसजसं शहरीकरण ‘अंगात’ भिनत जाईल तसतशी ग्रामजीवनाची ‘मनातली’ खोली वाढतच जाते (निदान आमच्या तरी). शहरी materialistic जीवनात ग्रामीण (rustic) spirituality ची गरज उत्तरोत्तर जाणवत राहते. ‘शहरी’ चकचकीत आणि झगमगाटी जीवनाच्या उच्छृंखल लाटांना ‘ग्रामजीवना’चा सहजसुंदर किनाराच थोपवत आणि मायेने थोपटत ‘नागर’ (civil) ‘टच’ देत असतो!


त्यामुळे डॉक्टर झालो असलो तरी गावाची ओढ कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. ‘ग्रामजीवन’ ही एक वेगळी आणि संपूर्ण संस्कृती असते. गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या घोषणेमागे ग्रामीण जीवन हे मागास जीवन नसून ती एक समांतर, स्वयंस्फूर्त आणि स्वयंपूर्ण संस्कृती असते अशी धारणा होती. आधुनिक काळात भारतीय खेड्यांचे बाह्यरूप बदलले असले तरी त्यांचे ‘अंतःस्वरूप’ आणि ‘प्रारूप’ पूर्वीप्रमाणेच राहिलेले आहे, शिवाय जीवन जगण्याच्या ‘प्रेरणा’ही स्थूलपणाने त्याच आहेत. दुर्दैवाने, ग्रामीण जगण्याच्या मूळ समस्याही तशाच जुन्या आहेत.


अरे बापरे! प्रॅक्टिकल काहीतरी लिहिता-लिहिता हे अचानक काहीतरी तात्विक लिहून गेलो. माझं हल्ली वारंवार असं होतं असतं. ते बरोबरही आहे म्हणा. आपल्या रोजच्या जगण्यातच इतके विरोधाभास हल्ली दिसत असतात की ते आपोआप लिहिण्यात उतरत जातं. मी एवढ्यात जो गावाकडे गेलो होतो त्यातले काही अनुभव खरंतर माझ्या लिहिण्यातून मला मांडायचे आहेत, त्यासाठीच आजच्या लेखाचा हा प्रपंच आहे.


मी कोणत्याही ऋतूत गावाकडे गेलो तरी मला त्या प्रत्येक वेळी काहीतरी चैतन्यमयी गवसल्याचे ‘फीलिंग’ येते. गावाकडे जाऊनही मला उदास-भकास वाटण्याचे प्रसंग तसे विरळाच! अगदी उन्हाळ्यातही गावच्या वातावरणात औदासिन्य जाणवत नाही. आत्ता तर मी भर पावसाळ्यात गावी जाऊन आलो. ‘पावसाळ्यातला एक दिवस’ असं शीर्षक या लेखाला देण्याचा माझा तसा पहिला विचार होता; पण एवढ्या तीन शब्दांत ते सामावणे शक्य नाही, म्हणून थोडं वेगळं शीर्षक दिलंय मी.


पण, गावाकडचा ‘तो’ दिवस खरंच एकदम ‘भारी’ गेला; अगदी नेहमीप्रमाणे!



नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० लाच जाग आली आणि फक्त पंधरा मिनिटांत फ्रेश झालो. आदल्या रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता ‘आरळ्या’च्या शेतातल्या ऊसाच्या फडाजवळ कोल्हे बघायला जायचा प्लॅन आम्ही चुलत भावंडांनी केला होता; पण काका आणि पप्पांच्या मते कोल्हे ऊसाकडे फिरकायला अजून २-३ आठवडे लागणार होते. माझ्या गावाकडे कोल्हे खूप आहेत; आणि लांडगेही! पण, गावाकडचे बरेच लोक कोल्हा आणि लांडग्यात फरक करताना गफलत करतात. माहितीसाठी म्हणून सांगतो; कोल्हा हा आकाराने कुत्र्यापेक्षा लहान असतो आणि तांबूस रंगाचा असतो तर लांडगे हे आकाराने कुत्र्यापेक्षा मोठे असून करड्या रंगाचे असतात. आणि हो, कोल्हे बऱ्यापैकी भित्र्या स्वभावाचे असतात, तर लांडगे आक्रमक असतात. (अर्थात कोणताही प्राणी कारणाशिवाय माणसावर हल्ला करत नाही आणि शक्यतो मनुष्यसहवास टाळण्याकडे त्यांचा कल असतो.) (© डॉ. अमित) तरस हा श्वानकुळातील आणखीन एक प्राणी आहे. आपल्याकडे शक्यतो पट्टेरी तरस आढळतात, ते आक्रमक आणि ताकदवान असतात आणि सडलेली प्रेतं आपल्या ताकदवान जबड्यांनी फाडून खातात. (तरसाचा जबडा हा प्राणिकुळातला सर्वांत ताकदवान जबडा मानला जातो.) आमच्या गावाकडे पूर्वी तरसांचा मुक्त संचार असे, असे आम्ही आमच्या आजोबा-वडिलांकडून ऐकले आहे. ‘तरस पुरलेली प्रेतं वगैरे उकरून खातात’ अशा चर्चाही मग सोबतच येत असत. त्यामुळे तरस हा काहीसा गूढ प्राणी असावा असे लहानपणी वाटत असे. असो. हे थोडं विषयांतर झालं.


मी गावी जायच्या आधी काही दिवस उदय (भाऊ) असाच कोल्ह्यांच्या शोधात बाहेर पडला होता, मात्र त्याला काही ते दिसले नव्हते. काकांच्या म्हणण्यानुसार कोल्हे जेव्हा शेताभोवती गर्दी करू लागतात तेव्हा पहाटे पहाटे कोल्हेकुई घरापर्यंत ऐकू येते. तशी कोल्हेकुई आम्हाला काही आत्ता तरी ऐकू येत नव्हती; म्हणजे कोल्हे अजून तरी शेतात आले नसावेत (हा मी काढलेला सोयीस्कर अर्थ होता!). सांगायचा हेतू हा की, अखेरीस आम्ही (मी आणि चुलतभाऊ अविनाश) सकाळ-सकाळी लवकर उठून शेतात जायचा प्लॅन रद्द केला आणि भारत-इंग्लंड टेस्ट मॅचचा स्कोअर बघून झोपी गेलो. सुट्टी असल्यामुळे आम्ही लवकर उठलो नाही.


सकाळी आठ-साडेआठपर्यंत आमचा नाष्टा-चहा वगैरे आवरलं. मग अर्धा-पाऊण तास घराजवळचे पेशंट रिपोर्ट दाखवायला, सल्ला विचारायला किंवा औषधं लिहून घ्यायला येऊन गेले. आपल्या जवळच्या लोकांना आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला की डॉक्टर होऊन जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटतं. हे समाधान वेगळंच असतं. असो. तर आम्ही दहा वाजण्याच्या आसपास आमच्या माळातल्या शेतात ट्रॅक्टर घेऊन गेलो. पूर्वी आम्ही कोणाच्यातरी बैलगाडीतून किंवा पायी शेतात जात असू. आत्ता आम्ही ज्या शेतात गेलो होतो तेथे पूर्वी आमची डाळिंबाची बाग होती. गावात एकेकाळी बऱ्याच जणांच्या डाळिंबाच्या बागा होत्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडी आणि जत तालुके उच्च दर्जाच्या डाळिंबाच्या फळांसाठी प्रसिद्ध होते. आमच्या गावातील डाळिंबे एकतर बेंगळुरूला जात असे किंवा मग विदेशात तरी निर्यात (एक्स्पोर्ट) होत असत. पण, कालौघात बऱ्याच कारणांमुळे आणि मुख्यत्वे तुरीसारखी अन्य नगदी पिके कमी कष्टांत आणि सहजपणे घेता येऊ लागल्यामुळे डाळिंबाची शेती मागे पडली आहे.


चुलतभावाच्या आग्रहामुळे मी थोडावेळ ट्रॅक्टर चालवला. आम्ही माळात पोहोचलो. (© डॉ. अमित) चारही बाजूंच्या शेतकऱ्यांनी बांध दाबल्यामुळे आणि अमर्याद वाळूउपसा केल्यामुळे अतिशय अरुंद झालेल्या ओढ्यातील रस्त्यातून जाताजाताच पहिल्यांदा ‘लालबुड्या बुलबुल’ची (Red-whiskered Bulbul) मधुर शीळ आणि ‘चिमण्यां’चा चिवचिवाट कानी पडले. (थोडासा पाऊस पडून गेल्यानंतर पडणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे चमचमणाऱ्या चंदेरी वाळूची रय आता पार गेलेली पाहून मन थोडे विषण्ण झाले खरे. निसर्गाची अजून किती हानी केल्यावर माणूस शहाणा होणार आहे देव जाणे! खूप मोठ्या स्तरावर घडणाऱ्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची वाळली चिंता करण्यापेक्षा ‘लोकल’ स्तरावर आपल्याला झेपणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी करणे जास्त फायद्याच्या ठरतील असे मला वाटते.)


मध्येमध्येच कमीजास्त उंचीच्या ‘हिरव्यागार’ गवताचे स्वल्पविराम अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या ‘काळसर-चॉकलेटी’ चिखलाला कापत ट्रॅक्टरची चाके आपली ‘छाप’ मागे सोडत होती. थोड्याच वेळात आम्ही अपेक्षित शेतात पोहोचलो. तिथे पोहोचतो न पोहोचतो तोच ‘मातकट’ रंगाच्या ‘पावशा’ पक्ष्याची ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ अशी उच्चरवातली आणि येणाऱ्या पावसाची चाहूल देणारी शीळ आमच्या कानी पडली. (गावाकडे लोक ‘पेरते व्हा’च्या ऐवजी ही शीळ ‘पावशा घुम, पावशा घुम’ अशी शब्दांकित करतात.) (हा पावशा पक्षी म्हणजेच Common Hawk-cuckoo होय. हा पक्षी अगदी ‘शिकरा’ पक्ष्याप्रमाणेच दिसतो आणि हालचालीही तशाच करतो. निसर्गातील अनुकरणाचे हे एक मोठे उदाहरण आहे.) पावशा पक्ष्याची शीळ कितीही वेळा ऐकली तरी त्याचा मला कंटाळा येत नाही; उलट मनात एक वेगळाच उत्साह संचारतो. आमचा ट्रॅक्टर शेतात पोहोचला. तिथे सर्वत्र ‘पोपटी’ रंगाचे आणि ‘पांढरा’ तुरा मिरवणारे ‘काँग्रेस’ गवत फोफावलेले आम्हाला दिसले. (काँग्रेस गवत हे Parthenium या कुळातील असून ते मूळ भारतीय नाही. १९५० साली उत्तर अमेरिकेतून भारतात आयात केलेल्या गव्हाबरोबर ते पहिल्यांदा भारतात आले आहे मानले जाते. ते पहिल्यांदा पुण्यात आढळले असे सांगतात.) ट्रॅक्टरने केलेल्या ‘फणण्या’तून काँग्रेस गवत मुळातून उपटून निघून उन्मळून पडताना दिसत असे, तर काहीवेळा ट्रॅक्टरचे मागचे मोठे चाक त्यांच्या अंगावरून जात असे. एरव्ही त्या भल्यामोठ्या चाकांच्या खाली कोणी येईल तर वाचते ना; पण इथे हे गवत अंगावरून चाक गेल्यानंतरही परत ताठ उभे राही; निदान तसा प्रयत्न तरी करे. ते बघून मला ‘महापुरे वृक्ष जाती, तेथे लव्हाळे वाचती’चा प्रत्यय येत होता.


फणताना जसजशी जमीन चिरत जाऊन (क्रूर वाटतंय का हे जरा!) सरी पडत आणि मातीची लहानलहान ढेकळे वर येत असत तसतशी त्यातून बाहेर पडलेले अळ्या-किडे टिपण्यासाठी ‘शुभ्र पांढरे’ बगळे (Great/ Common egret) आणि ‘तपकिरी काळसर’ अंगाच्या आणि ‘पिवळ्याजर्द’ चोचीच्या साळुंक्यांची (Common myna) एकच लगबग चालू होत असे. अधूनमधून एखादी जंगली साळुंकीही (Jungle myna) हळूच चटका करून पटकन उडून जात असे. (साळुंकी हा असा पक्षी आहे जो कोणत्याही ठिकाणी आपले अस्तित्व घट्ट टिकवून ठेवतो. कधीकधी यांच्या अतिक्रमणामुळे त्या भागात आधी अस्तित्वात असलेली पक्षिश्रृंखला धोक्यातही येते. याचे एक कारण या पक्ष्यांचा आक्रमक स्वभाव हेही असते.) समोरच उंचच उंच विद्युतवाहक तारांवर बसून आसपास चाललेल्या घडामोडींची शांतपणे नोंद घेणारा ‘राखाडी’ रंगाचा ‘कोतवाल’ पक्षी (Black drongo) आपल्या दुभंगलेल्या लांब शेपटीची लयबद्ध हालचाल करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असे.




गावाकडे शक्यतो दुपार किंवा संध्याकाळच्या (late afternoon and evening) वेळा आपल्या किलकिलाटाने भारून टाकून शिक्षक नसलेल्या वर्गातील गोंधळाची आठवण करून देणारे ‘जंगल सातभाई’ (Large Grey Babbler) सर्वत्र आढळतात. ‘चिमणी’पेक्षा (Common House Sparrow) मोठे पण ‘कावळ्या’पेक्षा (House Crow) आकाराने लहान असणारे हे पक्षी शक्यतो थव्याने राहतात आणि शेतातल्या वातावरणाला ‘पार्श्वसंगीत’ देण्याचे काम करतात. साप किंवा शत्रूपक्षी दिसल्यावर यांनी केलेला दंगा आजूबाजूच्या सर्वांनाच एकदम सावध (alert) करतो. ट्रॅक्टरने आमचे काम चालू असताना बांधाशेजारी वाढलेल्या बोरीच्या झाडाने आमच्या आडवे येऊन आपले काटेरी अस्तित्व तर जाणवून दिलेच, शिवाय ‘आम्हाला तुम्ही ‘डिस्टर्ब’ करू नका, आम्हाला ते आवडत नाही,’ अशी धमकीवजा तक्रारही केली. पण, आम्ही बळाचा वापर करून उलट तिलाच दटावले आणि मागे सरण्याचा इशारा दिला. अखेरीस ती स्वतःहून मागे हटत नाही म्हटल्यावर आम्हीच जबरदस्तीने तिला मागे हटवले आणि शेतातल्या लोकशाहीला ‘आमच्या पद्धतीने’ (दडपशाही करून) विजयी केले. बंधमुक्त वागणाऱ्यांची तुलना या ‘बोरी-बाभळीं’शी का करतात हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल.


बांधाच्या कोपऱ्यावर असणाऱ्या शिंदीच्या झाडावर (Indian date palm) ‘शेवाळी’ रंगाचा एक इवलासा पक्षी उगीचच वर-खाली उड्या मारताना दिसत होता. या छोट्या पक्ष्यांचे नाव आहे ‘शिंपी’ पक्षी. त्याचे इंग्रजी नावही मराठी नावाचे तंतोतंत भाषांतर आहे- Common Tailor-bird! आहे की नाही गंमतीची गोष्ट! त्याच्या सोबतीला त्याच झाडावर आणखीन एक पक्षी उड्या मारत होता, तो म्हणजे चकाकत्या ‘जांभळ्या’ रंगाचा ‘जांभळा सूर्यपक्षी’ अर्थात Purple Sunbird! हा शिंपी पक्ष्यापेक्षा थोडासा मोठा असला तरी तसा लहानच असतो. मकरंद शोषण्यासाठी असलेली लांब, निमुळती चोच हे याचे वैशिष्ट्य. हे दोघेही दोन व्रात्य खोडकर मुलांप्रमाणे शिंदीच्या त्या झाडाभोवती नाचत होते. एव्हाना आमच्या ट्रॅक्टरने एका शेताची फणणी पूर्ण केली होती आणि आम्ही पुढच्या शेताकडे जाणार तेवढ्यातच घरून ‘शेजारच्या शेतात उडदाची मळणी करणारे मशीन आले आहे, लगेच तिकडे जा,’ असा फोन आला. पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही ‘आरळ्या’च्या शेताकडे जायला निघालो.(© डॉ. अमित)



रस्त्यातल्या कोणत्याही अडथळ्यांना न जुमानता आमचा ट्रॅक्टर वेगाने अंतर कापत होता. जाताजाता आम्हाला आणखीन एका प्रकारच्या बगळ्यांचा थवा (Little Egret) दिसला. अखेरीस आम्ही त्या शेतात पोहोचलो. थोड्या वेळातच उडदाची मळणी चालू झाली, पण अचानक खडक ऊन पडले आणि चटके बसू लागले. ‘दादा, तू थोडावेळ बांधावरच्या लिंबाच्या झाडाखाली जाऊन बस,’ असे अविनाश म्हणाला. मलाही खरेतर त्याची गरज होतीच. मी निघालो असतानाच बाजूला अतिशय सुंदर आणि ‘पांढऱ्या-काळ्या’ रंगानेही रंगतदार दिसणाऱ्या ‘दयाळ’ पक्ष्यांची (Oriental Magpie-Robin) जोडी लगबगीने किडे टिपताना दिसली. यांचेच नामसाधर्म्य असणारे पण यांच्यापेक्षा आकाराने लहान असणारे ‘भुरकट’ आणि ‘काळसर’ रंगांचे ‘चिरक’ पक्षीही (Indian Robin) बऱ्याचदा इकडून तिकडून उड्या मारताना दिसत होते. (यांच्यात नर-माद्यांच्या रंगांत फरक असतो.) मी बांधाजवळ गेलो. तिथे बरीच खुरटी झालेली झुडपे आणि काही ठिकाणी उंच वाढलेले हत्ती-गवत दिसत होते. मी अजाणतेपणी जवळ जाताच त्या खुरट्या झुडपांच्या पसाऱ्यात वास्तव्य केलेल्या ‘चितर’ पक्ष्यांचा समूह ‘फडफड’ आवाज करत प्रचंड वेगाने पळत सुटला आणि क्षणार्धात नजरेआडही झाला. या पक्ष्यांचे खरे नाव ‘तीतर’ पक्षी (Partridge/ Francolin) असे असून यांतील करड्या रंगाचा कोंबडीपेक्षा थोडासा लहान आकार असलेला तीतर आपल्याकडे सामान्यतः आढळतो. गावाकडे खाण्यासाठी या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होते. (पण, या पक्ष्यांची शिकार करणे बेकायदेशीर आहे.) नेहमीप्रमाणे मला मी असा धसमुसळेपणा केल्याचा मला पश्चात्ताप झाला. थोडा थकलो असल्याने आणि उन्हाचा तडाखा खूप असल्याने मी तिथेच लिंबाखाली पहुडलो. लिंबाच्या हिरव्याकंच कोवळ्या पानांतून दूरवर अथांग पसरलेले ‘निळसर’ (sky blue तो हाच रंग!) आभाळ मनाला भुरळ तर पाडत होतेच, शिवाय या महाप्रचंड पसारा असणाऱ्या विश्वातील आपल्या क्षुद्रपणाचीही जाणीव करून देत होते. दूर उंच आभाळात निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन काळे ठिपके घिरट्या घालताना दिसत होते. माणसाला हेवा वाटावा इतक्या उंचीवर मुक्तपणे त्या ‘घारीं’चा (Black Kite) विहार सुरू होता. पक्ष्यांच्या अन्नसाखळीत सर्वोच्च स्थान पटकावणारी ही घार उडतानाही आपले सर्वश्रेष्ठत्व अबाधित राखून ठेवते.


कामे आटपता आटपता सूर्य कधी मावळतीकडे कलू लागला तेही आमच्या लक्षात आले नाही. सूर्याची तीन वैशिष्ट्ये मला खूप आवडतात. एक म्हणजे, सकाळी उगवल्यापासून संध्याकाळी मावळेपर्यंत त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या रंगछटा. हलक्या तांबूस रंगापासून सुरुवात करून ते गडद नारिंगी रंगात जाऊन साऱ्या विश्वाचा पसारा चालता ठेवणारा हा मित्र! दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा नियमितपणा. न चुकता तो रोज उगवणार म्हणजे उगवणारच; आणि ज्या दिवशी तो यात आळशीपणा करेल तो विश्वाचा अंत निश्चित! सूर्याचे मला आवडणारे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे, ‘रोज दिवस मावळायच्या आत घरी जाण्याची त्याची सवय!’ घरी लवकर पोहोचणे म्हणजे रात्रीच्या अंधारात कराव्या लागणाऱ्या कामांपासून सुटका करून घेणे. असो.(© डॉ. अमित)


जायच्या आधी शेतातली १०-१२ कोवळी लुसलुशीत; पण तयार झालेली मक्याची कणसे भाजून आम्ही मस्तपैकी पार्टी केली आणि परतीच्या वाटेवर लागलो. दिवसभर चारा-पाणी खाऊन पेटपूजा केल्यावर घरी जाण्याआधी थोडीशी विश्रांती घ्यावी आणि आलेच सहजासहजी चोचीत तर करावा वाट भरकटलेल्या ‘पतंगां’चा नाष्टा म्हणून शाळेच्या प्रार्थनेसाठी एका रांगेत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे तयारीत बसलेल्या ‘आंधळ्या राघूं’नी (Green Bee-Eater) आमचे मन प्रसन्न केले. त्यांची शिस्त पाहून आपण माणसांनी शिकण्यासारखे बरेच काही आहे असे मला वाटते. ट्रॅक्टर सोडून दुसऱ्या एका चुलतभावाबरोबर मी वस्तीतल्या आमच्या घरी आलो. घराच्या शेजारीच ‘कवठा’चे एक खूप जुने झाड आहे. झाडावर पोपटांच्या बऱ्याच ढोली आहेत. रात्री आपापल्या घरात परतणाऱ्या लाल चोचीच्या पोपटी (!) ‘पोपटां’चा (Rose-ringed Parakeet) मोठमोठ्या आवाजात संवाद चालू होता. त्यांना तसे पाहणे हे खूप विलोभनीय दृश्य असते. (माझ्या आढळातले कवठाचे हे एकमेव झाड! गेली तीन वर्षे औरंगाबादमध्ये असताना तेथील आमखास मैदानाच्या जवळ असणाऱ्या शासकीय कर्करोग रुग्णालयासमोरील कवठांची बाग मी पाहिली आहे. कवठाला पोषणमूल्यांच्या बाबतीत सफरचंदांइतके महत्त्व आहे.)


तो दिवस सरत चालला होता. संध्याकाळी रिमझिम चालू झाल्यामुळे आणि बाहेर खूप चिखल झाल्यामुळे आम्हाला फारसे घराबाहेर पडता आले नाही. दिवस चांगला गेला; पण एक खंत तशीच मनात राहून गेली, नेहमीप्रमाणे... ती म्हणजे, शेतकऱ्याचे घर असूनही दारात उभी नसणारी बैलं... बैलांना मी खूप मिस करतो आणि आता डॉक्टर असलो तरी मूळ शेतकरीच असल्यामुळे ते साहजिकही आहे म्हणा...


मी वर सतत ट्रॅक्टरचा उल्लेख केला आहे. हल्ली आमच्या गावाकडील जवळपास सगळी मोठी कामं वेगवेगळ्या मशिन्सनी होतात. शक्यतो पंजाब-हरियाणामधून ती येतात. अगदी कोळपणी-नांगरणीपासून पिके काढण्यापर्यंत आणि मळणीपर्यंतचीही कामे ही मशिन्स अगदी कमी वेळेत आणि सफाईदारपणे करतात. हल्ली रोजंदारीवरच्या शेतमजुरांवर होणारा खर्चही वाढल्यामुळे शेतकरी आधुनिक शेतीत मशिन्सना प्राधान्य देतात. ते कदाचित योग्यही असेल. मी कृषितज्ज्ञ नसल्यामुळे माझा तेवढा अभ्यास नाही. पण, त्यामुळे बैलांचा कृषिजीवनातील वावर आणि अस्तित्व आता कमी झाले आहेत.


त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्यात आजही सांगली जिल्ह्यापेक्षा बैलांचे अस्तित्व जास्त जाणवते. (मला नक्की आकडेवारी माहिती नाही.) याचे एक कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात डोंगराळ भाग जास्त असल्याने इथली शेती मशिन्सच्या वापरावर मर्यादा आणते. याउलट आमच्या सांगली जिल्ह्यात शेती बरीच जास्त असून ती शक्यतो सखल भागात आहे; ज्यामुळे मशिन वापरणे तुलनेने सोपे ठरते. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील संपन्न भागात शर्यतीसाठी बैल पाळण्याचे प्रमाण जास्त आहे.



कारणं काहीही असोत, बैल शेतकऱ्याला आणि शेतीला शोभा आणतात हे नक्की! पूर्वी तर भूत-पिशाच्चांची बाधा होऊ नये म्हणून माझे आजोबा आमच्या दोन बैलांच्या मध्ये पोतं टाकून निवांत झोपत असत असे मी ऐकले आहे. बैलांमुळे आपल्याला कसलाही त्रास होईल असे शेतकऱ्याला वाटत नाही. वर्षभर शांतपणे आणि कोणतीही कुरकुर न करता बैल अफाट श्रम करीत असतात. घोड्यांप्रमाणे बेलगाम होण्याचा त्यांचा स्वभाव नाही आणि खायला चणेच पाहिजेत हा हट्टही! शिवाय लक्ष इकडेतिकडे जाण्याची शक्यता नसल्यामुळे त्यांना घोड्यांप्रमाणे झापडेही लावावी लागत नाहीत. खरेतर ट्रॅक्टरची किंवा अन्य मशिन्सची ताकद ‘अश्व’शक्तीत मोजण्यापेक्षा ‘वृषभ’शक्तीच्या परिमाणात मोजणे जास्त संयुक्तिक ठरले असते. पण, बैलांच्या नशिबी तेही नसावे हे दुर्दैव! (© डॉ. अमित)


बैलांना आपण जपले पाहिजे, जोपासले पाहिजे. शेतीही टिकली पाहिजे, वाढवली पाहिजे. शेती कितीही आधुनिक झाली तरी तिचा पारंपारिक गाभा टिकून राहिला पाहिजे. शेतीवर अवलंबून असलेल्या एका मोठ्या परिसंस्थेचा मी या लेखात थोडाफार उल्लेख केला आहे. शेती टिकली तर ही परिसंस्थाही चांगल्या प्रकारे टिकून राहील आणि फोफावेलही. प्राणी-पक्षी-शेती हे सर्व एकमेकांवर अवलंबून राहणारे घटक आहेत. शेती टिकली तर हे सर्व टिकून राहतील; आणि माझे लाडके बैलही!!!


राम-राम!!!



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,

एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))

(© लेखाचे सर्वाधिकार लेखकाधीन आहेत.)

(केवळ वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)

(www.dramittukarampatil.blogspot.com

www.dramit100wordstories.blogspot.com

www.trekdoctoramit.blogspot.com)


Comments

Post a Comment