पितळखोरा लेणी: शांततेचे समृद्ध लघुप्रतीक (Pitalkhora Caves: The Smaller Monument of Peace)
पितळखोरा लेणी: शांततेचे समृद्ध लघुप्रतीक
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© लेखाधिकार लेखकाकडे सुरक्षित)
![]() |
पितळखोरा लेणी: भारताचा समृद्ध वारसा |
--- औरंगाबाद: पर्यटन राजधानी:-
मे २०१८ मध्ये मला जेव्हा एम. डी. च्या अभ्यासक्रमासाठी औरंगाबाद स्थित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला तेव्हा तिथे ‘जॉईन’ होण्यापूर्वीच दोन बाबींचा मी विचार केला होता. एक म्हणजे, मी माझ्या मोबाईलमध्ये औरंगाबादच्या जवळील किल्ल्यांची माहिती ‘सर्च’ करून ठेवली होती आणि दुसरे म्हणजे, औरंगाबादला पर्यटनाची राजधानी का म्हणतात याचा जवळून अभ्यास केला होता. अर्थात, निवासी डॉक्टर असताना फार काही फिरता येत नाही; पण परीक्षेनंतर अगदी ठरवून मी आसपासचे शक्य तितके भाग/ प्रदेश पाहण्याचा प्रयत्न केला.
भारतातील सर्व राज्ये वेगवेगळ्या गोष्टींमुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांची पर्यटनाच्या दृष्टीने आपापली वेगळी ओळख आहे. काही जिल्हे/ शहरे/ गावे त्यांच्यातील निसर्गसंपन्नतेमुळे प्रसिद्ध आहेत. तर काही जिल्हे/ शहरे/ गावे ऐतिहासिक वारशामुळे; तर काही सांस्कृतिक वारशामुळे प्रसिद्ध आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचे इतर जिल्ह्यांहून वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, हा जिल्हा उपरोल्लेखित कोणत्याही एका वैशिष्ट्याने नव्हे तर ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक अशा बहुवैशिष्ट्यांनी एकत्रितपणे नटलेला जिल्हा आहे.
--- भारत: लेणीशिल्पकलेचे जागतिक केंद्र आणि शिल्पकलेचे प्रकार:-
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये समावेश झाल्याने औरंगाबादमधील ‘अजिंठा आणि वेरूळ’ या लेण्या जास्त प्रसिद्ध असल्या तरी इथला संपन्न स्थानमहिमा तेवढ्यापुरता मर्यादित खचितच नाही. दगड कापून केलेल्या शिल्पकलेचे किंवा लेणीकलेचे (rock-cut architecture) जागतिक केंद्र म्हणून आपला भारत देश जगभर प्रसिद्ध आहे. विषय लेण्यांचा आहे म्हणून ‘शिल्पकले’बद्दल थोडंसं सांगतो. नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेले दगड किंवा दगडांचे थर खोदून (excavation) जी ‘मानवनिर्मित’ शिल्पे किंवा इमारती किंवा थडगी उभारली जातात त्या प्रक्रियेला rock-cut architecture असे म्हणतात. भारतात ढोबळमानाने त्यांना ‘लेण्या’ (caves) म्हणतात. शिल्पनिर्मितीची ही प्रक्रिया अतिशय कष्टप्रद असली तरीही मोठाले दगड दूरवर वाहून नेण्यापेक्षा ती थोडी सोयीस्कर असल्यामुळे या प्रकारच्या कलेचा उगम झाला असावा असा प्रवाद आहे. या प्रक्रियेत दगड हे छताच्या बाजूने कापायला/ कोरायला सुरूवात करून मग पायापर्यंत हळूहळू काम केले जात असे. यामुळे वरून अंगावर दगड पडून शिल्पकारांना होणाऱ्या इजा किंवा त्यांचे मृत्यू टाळता येत असत. लेणीकलेचे व्याख्या करायची झाली तर ती मानवनिर्मित असणे हे अत्यावश्यक आहे. एखाद्या नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या लेणीसदृश वास्तूमध्ये कितीही मोठ्या प्रमाणात बदल केले तरी त्याला ‘लेणीकला’ (rock-cut architecture) म्हणता येत नाही. या लेणीकलेतून मुख्यत्वे तीन प्रकारच्या वास्तू बनविल्या गेल्या आहेत: (१) मंदिरे (temples) (२) थडगी (tombs) (३) गुहेतील घरे (cave dwellings).
या rock-cut architecture प्रमाणेच दुसरा शिल्पकलेचा प्रकार म्हणजे monolithic architecture अर्थात स्मारकीय शिल्पकला. या मोनोलिथिक शिल्पकलेमध्ये आणि लेणी शिल्पकलेमध्ये असणारा महत्त्वाचा फरक म्हणजे मोनोलिथिक शिल्पकलेमध्ये ज्या दगडांना कापले जाते त्यांना चारही बाजूंनी कसलाही आधार नसतो, अर्थात ते एखाद्या खांबाच्या रचनेप्रमाणे स्वतंत्र असतात.
![]() |
पितळखोरा येथील दगड कापून केलेली लेणी |
--- पितळखोरा लेणी: स्थानमहात्म्य:-
पितळखोरे गाव हे चाळीसगाव व कन्नड तालुक्यांच्या मधील औट्रम घाटातील एक लेण्यांचे गाव आहे. शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेला हा लेणीसमूह औरंगाबाद जिल्ह्यात कन्नडजवळ आहे आणि वेरूळपासून त्या ४० किमी अंतरावर आहेत. पितळखोरा लेणी या भारतातील सर्वांत जुन्या लेणी असल्याचे मानले जाते. ही लेणी इ. स. पूर्व दुसऱ्या शतकातील म्हणजे अजिंठा-वेरूळ येथील लेण्यांपेक्षाही प्राचीन असल्याचे मानले जाते.
पितळखोरा येथे एकूण ज्या १४ लेण्या आहेत त्यातील बऱ्याचशा आता उद्ध्वस्त झाल्या आहेत. या चौदांपैकी चार चैत्यगृहे असून उर्वरित दहा विहार आहेत. या सर्व लेण्या ‘हिनायान’ काळातील असल्या तरी ज्या लेण्यांमधील भित्तीचित्रे सध्या बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत त्या ‘महायान’ काळातील आहेत. या लेण्यांमधील शिलालेख हे इ. स. पूर्व तिसऱ्या ते चौथ्या शतकातील आहेत. टॉलेमीच्या ‘पेट्रीगाला’ आणि बुद्द्धिस्ट ग्रंथ ‘महामयुरी’मधील ‘पित्यांगाळा’ हे उल्लेख पितळखोरा लेण्यांशी संबंधित असावेत असा कयास आहे.
याठिकाणच्या सर्वांत मोठ्या लेणीसमोर सात हत्ती एका रांगेत एकमेकाच्या बाजूला उभे असून लेणीच्या खालील दरवाजाच्या दारात खऱ्या माणसाच्या आकाराचे दोन द्वारपाल (ज्यापैकी एक शिल्प खराब झाले आहे), एक मोडकळीस आलेल्या गजलक्ष्मीचा पुतळा हे तर आहेच, शिवाय पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करण्याची प्राचीन व्यवस्थाही इथे दिसते. यांतील हत्तींची शिल्पे मोठी असली तरी आजकाल बव्हंशी शिल्पांची डोकी पडून गेली असून ती याच लेणीच्या आवारात इतस्ततः विखुरलेली दिसतात. इतक्या महत्त्वाच्या वास्तूंचे आणि संपन्न वारशाचे जतन आणि डागडुजीही आपल्याला नीटपणे करता येऊ नये हे दुर्दैव!
![]() |
पितळखोरा येथील लेणी क्र. ३ च्या पायथ्याशी असणारी खऱ्या माणसाच्या आकाराच्या द्वारपालाचे आणि सात हत्तींची शिल्पे (सध्या त्यांची अशी दुरावस्था झालेली आहे.) |
![]() |
सात हत्तींपैकी एकाही हत्तीचे शीर सध्या धडावर नसून (ही सगळी शीरे अशी विखरून पडली आहेत) आपल्या समृद्ध वारशाची ही अशी अवस्था झालेली पहावयास मिळते! |
--- पितळखोरा येथील लेणी क्र. ३ मधील चैत्यगृहाचे व्युत्पत्पत्तिक्रमातील महत्त्व:-
पितळखोरा येथील लेणी क्र. ३ मधील चैत्यसभागृह ही पश्चिम भारतातील चैत्यगृह रचनेच्या व्युत्पत्तिक्रमातील एक महत्त्वाची लेणी आहे. पश्चिम भारतातील या चैत्यगृहांचा व्युत्पत्तिक्रम हा ढोबळमानाने पुढीलप्रमाणे मानला जातो. सर्वांत प्राचीन म्हणजे, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात निर्मिलेल्या कोंडिविते येथील लेणी क्र. ९; त्यानंतर भाजा येथील लेणी क्र. १२. या दोन्ही लेण्यांची निर्मिती ही अजिंठा येथील १० व्या क्रमांकाच्या लेणीच्या आधी झाली होती असे मानले जाते. अजिंठ्यातील या लेणी क्र. १० नंतर पुढे उल्लेख केल्याप्रमाणे लेण्यांची निर्मिती झाली असावी असे मानले जाते- पितळखोरा येथील लेणी क्र. ३; कोंडाणा येथील लेणी क्र. १; नंतर अजिंठा येथील लेणी क्र. ९. अजिंठा येथील ही ९ व्या क्रमांकाची लेणी ही सुशोभित नक्षीकामात बरीच पुढारलेली मानली जाते. त्यानंतर क्रम लागतो तो नाशिक येथील लेणी क्र. १८ चा; त्यानंतर बेडसे येथील लेणी क्र. ७ आणि सर्वांत शेवटी ‘अंतिम पूर्णत्वा’चा (final perfection) कळस गाठला तो कार्ला येथील महाचैत्यगृहाच्या (Great Chaitya) रचनेने!
![]() |
पितळखोरा लेणी क्र. ३ आणि ४ या भव्यदिव्य आहेत |
--- पितळखोरा लेण्या आणि परिसराबद्दल थोडेसे:-
या लेण्या औरंगाबाद जिल्ह्यात स्थित असून त्या पाहण्याचा सर्वोत्तम काळ निदान माझ्यासाठी तरी पावसाळ्यातील दिवस हा आहे. कदाचित काहीजण किंवा काही वेबसाइट्स ‘ऑक्टोबर ते फेब्रुवारी’ हा काळ भेटीसाठी चांगला आहे असे म्हणत असतील, तर ती त्यांची ‘ऐकीव’ माहिती असू शकेल. माझ्या सल्ल्याचे मुख्य कारण म्हणजे येथे पावसाळ्यात वाहणारा सुंदर धबधबा आणि आजूबाजूला खुललेल्या हिरव्यागार टेकड्यांचे सौंदर्य.
![]() |
येथील एका निरीक्षण मनोऱ्यावरून दिसणारे मोहक दृश्य |
आम्ही यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यात पितळखोरा परिसराला भेट दिली होती. प्रत्यक्ष लेण्यांचे ठिकाण हे मूळ रस्त्यावरून आतल्या बाजूला, आडवळणाला आणि थोडेसे दुर्गम असल्यामुळे स्वतःच्या गाडीने तिथे पोहोचणे कधीही चांगले. जातानाचा परिसरही निसर्गरम्य तर आहेच, शिवाय ग्रामीण जीवनाच्या खाणाखुणा, प्रचंड मेहनतीने शेतकऱ्यांनी फुलविलेले विविध पिकांचे मळे आणि जित्रापे यांचेही पूरेपूर दर्शन घडते.
पितळखोरा लेण्यांचा परिसर गावाच्या अंतिम टोकाला आहे. येथून आत जाण्यासाठी भलेमोठे गेट असून ही जागा ‘पुरातत्व खात्या’च्या अधिपत्याखाली येते. त्यामुळे लेणी आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसराच्या संरक्षण-देखभालीसाठी पुरातत्व खात्याने नियुक्त केलेले सुरक्षारक्षक पूर्णवेळ या परिसरात गस्त घालत असतात. आत प्रवेशासाठी ‘प्रवेश फी’ दिल्यानंतर एक पास दिला जातो जो आत फिरण्यासाठी आवश्यक आहे. या लेण्या जर व्यवस्थित आणि संपूर्णपणे पहायच्या असतील तर येथे शक्यतो सकाळी लवकर पोहचा. भूगोल, इतिहास, संस्कृती, निसर्ग आणि गौतम बुद्धांवरील अभ्यासात रस असणाऱ्या ‘विद्यार्थ्यां’नी शक्य तितका जास्त वेळ येथे व्यतीत करावा.
गेटमधून आत जाण्याचा रस्ता हा एका सुंदर आणि नियमित निगा राखलेल्या आणि विविध फुलांनी बहरलेल्या बागेतून जातो. अर्थात बागेत कितीही झाडे-झुडपे असली तरी जाण्या-येण्याचा मार्ग पेव्हर ब्लॉक्सनी चांगला बांधीव केलेला आहे. इथल्या विविध फुलझाडांच्या सौंदर्याची मेजवानी लुटत आपण थोडे पुढे जात असताना मध्येच पुरातत्व खात्याचे कार्यालय लागते. आम्ही लॉकडाऊनच्या कालावधीत याठिकाणी गेल्यामुळे ते बंद होते. बागेच्या शेवटच्या भागात उजवीकडे पर्यटकांना विश्रांती घेता यावी यासाठी छान ‘ओपन’ चबुतरे बांधलेले आहेत. तेथे आपण येताना ‘क्षणभर विश्रांती’ घेऊ शकतो. यातीलच एका चबुतऱ्याच्या थोड्या उजव्या बाजूला एक मचाण (viewing tower) बांधलेले आहे. या मचाणावरून पितळखोरा भागातील दूरवरच्या उंचसखल भागाकडे नजर तर टाकता येतेच, शिवाय आजूबाजूच्या हिरवाईने नटलेल्या डोंगर-टेकड्यांच्या सौंदर्याचा आस्वादही घेता येतो.
![]() |
लेण्यांकडे जाणारा मार्ग चांगला सुशोभित केलेला आढळतो. |
येथून पुढे डाव्या बाजूने गेल्यावर बऱ्यापैकी रूंद आणि काळ्या पाषाणात कोरलेल्या मजबूत पायऱ्यांचा जिना दिसतो. या जिन्यावरून हळूहळू खाली जातानाही एक प्रकारची मजा येते. आम्ही गेलो तेव्हा तिथे हलकासा पाऊस सुरू होता आणि मागे असलेल्या मावळतीच्या सूर्यामुळे विरुद्ध बाजूच्या डोंगर-टेकड्यांना कवेत घेणारी इंद्रधनुष्याची एक मोठी महिरप आमचे मन आकर्षून घेत होती. आम्ही हळूहळू खाली-खाली जात असतानाच पाण्याच्या खळखळाटाचा मंजुळ आवाज कानांची तृप्ती वाढवत होता. उतरता-उतरताच उजव्या बाजूला खाली पहिल्यांदा त्या मार्गावरून लेण्यांकडे जाणाऱ्या एका छोट्या, पण मजबूत पुलाचे आम्हाला दर्शन होते न होते तोच तेथील अवाढव्य आकाराच्या लेणी क्र. ३ आणि ४ आमच्या नजरेस पडल्या. खरेतर ‘पहिल्या नजरेतील प्रेमात’ पडण्याची माझी ही पहिली वेळ नाही; पण तत्क्षणी माझ्या भावना अगदी तश्शाच होत्या! (मी पाहिलेल्या प्रत्येक गडाच्या, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांच्या मी पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो आहे!)
येथून जाताना मध्ये एक धबधबा लागतो. अतिशय नितळ पाणी आणि खाली काळाशार पण कोणताही चित्रविचित्र आकार धारण केलेला (बेसॉल्ट) पाषाण असल्याने निर्माण होणारे छोटे-मोठे भोवरे आपले मन आकर्षित न करतील तरच नवल! या कारणामुळेच पितळखोरा लेण्या पहायला जाताना शक्यतो पावसाळ्यातच जाण्याचा सल्ला द्यायला मला आवडेल.
![]() |
लेण्यांकडे जाण्याच्या मार्गावर असा मध्यम आकाराचा खळाळता धबधबा आहे. |
धबधब्यातल्या पाण्याच्या नितळपणाचा नेत्रास्वाद घेऊन लेण्यांकडे पुढे जाताना मध्ये एक छोटासा लोखंडी पूल लागतो. या पुलाच्या उजव्या दिशेने खळाळत येणारे धबधब्याचे पाणी याच पुलाखालून पुढे दरीच्या दिशेने जाते. हा पूल ओलांडून आपण लेण्यांच्या मुख्य भागाकडे जातो. इथे पहिल्या दोन क्रमांकाच्या लेण्या खूप वेगळ्या किंवा वाटत नाहीत. मात्र आपल्या नजरेत लगेचच भरतात त्या म्हणजे लेणी क्र. ३ आणि ४. या लेण्यांच्या परिसरात आढळणाऱ्या वास्तूंची आणि शिल्पांची माहिती मी वर थोडक्यात दिली आहेच, शिवाय त्याबद्दल वाचण्यापेक्षा पहायला जास्त मजा येते.
या लेणीसमूहातील लेणी क्र. ३ आणि ४ यांच्या दोन वैशिष्ट्यांबद्दल मी इथे थोडक्यात सांगतो. एक म्हणजे, त्यांची भव्यदिव्यता. या दोन्ही लेण्या अतिशय उंच असून विस्तारानेही बऱ्याच मोठ्या आहेत. आणि, दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, इथल्या खांबांवर जी जुनी भित्तीचित्रे आहेत ती अगदी जवळून पाहता तर येतातच, शिवाय त्यांना स्पर्शही करत येतो. मात्र, या चित्रांचे महत्त्व पाहता आपण त्यांना विनाकारण स्पर्श करू नये. या लेण्यांमध्ये असणाऱ्या खांबांपैकी एका खांबावर वरच्या बाजूला ब्राह्मी लिपीत लिहिलेला (किंवा कोरलेला) एक शिलालेख दिसतो. असेच काही शिलालेख लेणी क्र. ४ च्या व्हरांड्यातील एखाद-दुसऱ्या तुळईवर लिहिलेलेही आढळून येतात. विकीपीडियावरील माहितीनुसार हे शिलालेख या लेण्या कोणाच्या काळात बांधल्या गेल्या आणि कोणी यासाठी मदत केली याकडे निर्देश करतात. गंमत म्हणजे जी चित्रे किंवा शिलालेख आपल्याला अजिंठा येथील लेण्यांमध्ये जवळून पाहता येत नाहीत ती पितळखोरा येथील लेण्यांमध्ये मात्र अतिशय जवळून पाहता येतात. या चित्रांत वापरलेली रंगसंगती तर आपल्याला अचंबित करून सोडते. इतक्या वर्षांनंतर आणि ऋतूंचे इतके चढ-उतार सोसल्यानंतरही ही चित्रे इतक्या उत्तम अवस्थेत कशी टिकून राहिली आहेत हे न उलगडणारे कोडे आहे.
![]() |
पितळखोरा लेण्यांमधील भित्तिचित्रे ही अगदी जवळून पाहता येतात हे या लेण्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. |
![]() |
गौतम बुद्धांचे एक प्रसिद्ध भित्तीचित्र |
![]() |
लेणी क्र. ३ मधील एका खांबावर आढळणारा ब्राह्मी लिपीतील शिलालेख |
येथून पुढील काही लेण्यांतील शिल्पकला आणि नक्षीकाम आपली नजर लागेल इतकी सुंदर आहेत. इथेच लेणी क्र. ४ पासून पुढे जाताना एक दगडात खोदलेले पाण्याचे सुंदर टाके दिसते. ेे आणखीन पुढे गेल्यावर पडझड झालेल्या काही लेण्या समोर दिसतात; पण आम्ही तिथे गेलो असताना पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे मग लेण्यांत पाण्याचा बऱ्यापैकी साठा झाला होता. त्यापैकीच एका लेणीच्या दारात आम्हाला ‘निऑन ग्रीन’ रंगाचे चकाकते शैवाल दिसले. इतका मनोवेधक रंग निसर्गात इतक्या सहजपणे दिसून आल्याने मी तरी आश्चर्यचकित झालो होतो.
![]() |
शैवालाचा निऑन ग्रीन रंग |
येथून पुढे थोड्या अंतरावर लेण्यांचा या बाजूचा विस्तार संपतो. या शेवटच्या बिंदूवरून मागे उंचच उंच कडा, डावीकडचा धबधबा, समोर पुढे खळाळत वाहणारा ओढा किंवा झरा, त्यापुढे परत लेण्यांची दुसरी (डावीकडील) बाजू आणि त्यांच्या पृष्ठभागी असणारे परत उंचच उंच कडे असे अतिशय चित्ताकर्षक दृष्य दिसते. इथल्या हिरव्यागार निसर्गदृष्याचा आनंद घेऊन आपण पुलावरून परत मागे येतो आणि डावीकडच्या लेण्यांची मालिका पहायला जातो.
या बाजूकडील लेण्या छोट्या-छोट्या आहेत. यांतील शेवटच्या आधीची लेणी थोडी उंचावर असून ते खरेतर छोटेसे विहार आहे. यांत क्षणभर मी आत जाऊन आलो; पण आत खूप अंधार असतो आणि ये-जा कमी असल्यामुळे पूर्ण काळजी घेऊन (आणि चप्पल बाहेर ठेऊन) मगच आत जावे. बाहेर येऊन काही पायऱ्या उतरून आपला मोर्चा आपण शेवटच्या लेणीकडे वळवताच तिथे एक झिजलेली आणि कालौघात मूर्तीचे काही भाग तुटलेली गौतम बुद्धांची पाषाणात कोरलेली एक मोठी मूर्ती (शिल्प) आढळते. पावसाळी दमट हवामान असल्याने त्या मूर्तीवर तेव्हा थोडे शेवाळ साठलेले दिसले. आपल्या समृद्ध वारशाचे आपण कोणत्या पद्धतीने निगा राखतो याची प्रचिती त्यातून मला येऊन गेली. मन थोडा वेळ खिन्न झाले, पण बुद्धांच्या मूर्तीकडे, विशेषतः त्यांच्या अर्धोन्मिलित डोळ्यांकडे पाहिल्यावर आपल्यातील षड्रिपूंचा जणू काही नाश झाला आहे असे वाटते आणि मन एका वेगळ्या समाधानाने भरून पावते.
![]() |
पितळखोरा येथील शेवटच्या लेण्यांपैकी एक असणाऱ्या लेणीत गौतम बुद्धांचे असे झीज झालेले आणि शेवाळ साठलेले शिल्प आढळते. |
बुद्ध: शांतीचा प्रणेता:-
गौतम बुद्धांसारखे सर्व सुखाचा त्याग करून मानवी जीवनाचा योग्य अन्वयार्थ शोधण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे विरळाच! मानसिक शांतता आणि समाधान याच मानवी आयुष्याची सर्वोच्च श्रीमंती अधोरेखित करणाऱ्या गोष्टी आहेत हा संदेश केवळ बुद्धच देऊ जाणे. सर्व सुखांचा परित्याग केल्यानंतर बुद्ध जेव्हा भिक्षा मागत मागत स्वतःच्याच घरी येतात तेव्हा त्यांची पत्नी आणि पुत्र राहूल हे बुद्ध घरी परततील या आशेने त्यांच्याकडे पाहतात, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेले गौतम बुद्ध अगदी निरपेक्षपणे त्या गोष्टीचा मोह टाळतात. अजिंठा येथील एका लेणीच्या दारात या प्रसंगाचे भलेमोठे शिल्प आहे, शिवाय ते बऱ्याच ठिकाणी चित्रमय स्वरुपातही चितारलेले दिसून येते. या शिल्पांचे/ चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये गौतम बुद्ध खूप मोठे दाखविलेले असून पत्नी आणि पुत्र मात्र छोटे दाखविलेले आहेत. याचा अर्थ असा होतो की, गौतम बुद्धांनी या जगातील सर्व सुखांचा त्याग करून इंद्रियांवर आणि मनावर ताबा मिळविल्यामुळे ते आता साधे मानव न राहता 'महामानव' झाले आहेत. अजिंठा, वेरूळ आणि पितळखोरा लेण्या जर आपण मन लावून पाहिल्या तर मन खरेच एका समाधानाने भरून येते आणि प्रसन्न होते. इथल्या चित्रांच्या प्रत्येक रेषेरेषेत, प्रत्येक छोट्या-मोठ्या शिल्पात, बुद्धांच्या प्रत्येक मुद्रेत गौतम बुद्धांनी अखिल मानवजातीला दिलेला सम्यक संदेश तर आहेच, शिवाय जीवन समृद्धपणे आणि तरीही शांततेत व्यतित करण्याचा मूलमंत्रही सामावला आहे.
पितळखोरा लेण्या खरेच शांततेचे समृद्ध प्रतीक म्हणून मानवजातीला दिशा देत अखंडपणे दीपस्तंभाप्रमाणे कित्येक वर्षांपासून उभ्या आहेत आणि अशाच उभ्या राहतील!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(लेखातील सर्व चित्रे लेखकाच्या नावाने कॉपीराइट केलेली आहेत.)
(© लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय हा लेख संपूर्णपणे किंवा काही भागांत प्रकाशित, मुद्रित किंवा ऑडिओ-व्हिडिओ स्वरुपात प्रसृत करता येणार नाही.)
(केवळ वॉट्सएप संपर्क- ८३२९३८१६१५)
खुपच छान सर 👌👍
ReplyDeleteपितळ खोरा लेणी बद्दल सखोल व ऊपयुक्त माहीती 🙏
Thank you very much.
Delete