आमचंही दुःख जरा ऐका की... (Please listen to our worries too...)

 (© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)



‘गावठी कुत्र्या’वर कोणी का लिहावं नाही का!?

तरीही लिहिलंय मी... म्हणजे, त्यांच्या वेदना मांडण्याचा प्रयत्न करतोय...


जागोजागी, गल्लोगल्ली, खेडोपाडी आणि तुमच्या ‘सुसंस्कृत’ जगात ‘गावठी’, ‘रोगट’ आणि  ठरवली गेलेली कुत्री’ आम्ही...


ज्यांना पाहून तुम्हाला केवळ हाडतूडच करावीशी वाटते


असे दिशाहीन भटकणारे आम्ही...


आणि,


आमची वेदना कधीही जाणून न घेता


आमच्या दिशेने जोरात दगड भिरकावणारी तथाकथित ‘संवेदनशील’ माणसं तुम्ही...


गावातल्या उकिरड्यावर, नाहीतर एखाद्या गटाराशेजारी निपजलेले


आणि,


आमच्या आईशी गावातील नेमक्या कोणत्या ‘कुत्र्या’ने संग केला हे कधीही माहिती न होणारे आम्ही...


घराणी आणि वंशावळ रेकॉर्डला लिहिलेली आणि अल्सेशियन-डाबरमॅनची पंचवीस-तीस हजारांत मिळणारी गुटगुटीत पिल्ले तुमची,


आणि,


जन्मापासूनच लोकांच्या लाथा खात आणि शेजारच्या कुत्र्यांचा त्रास सहन करत कसेबसे ‘जिवंत राहण्यापुरता तग धरणारे’ आम्ही...


जातिवंत आणि उच्चकोटीच्या ‘ब्लडलाईन’च्या काटेकोर नोंदी जपलेली उच्चभ्रू कुत्री तुमची,


आणि,


जातिवंत आणि खानदानी तर सोडाच; साध्या बापाचाही पत्ता नसणारे आम्ही...


जन्मापासून पेडिग्री फूड आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्सवर जगणारी कुत्री तुमची,


आणि,


लहानपणापासूनच विटलेल्या, नासलेल्या आणि कायमच कुणीतरी ‘फेकलेल्या’ तुकड्यांवर जगणारे आम्ही...


औषधं आणि लशी देऊन देऊन रेबीजसारख्या गंभीर आजारांबाबतची रोगप्रतिकारक शक्ती वाढवलेली कुत्री तुमची,


आणि,


खरेच आजार झाल्यामुळे पिसाळलो तरीही कोणत्याही उपचार किंवा सहानुभूतीऐवजी सगळ्या गावाकडून एकत्र येऊन दिवसाढवळ्या ‘खून’ होणारे आम्ही...


परदेशी जातीतल्या कुत्र्यांना इथल्या वातावरणाचा त्रास होऊ नये म्हणून घरात ए.सी. बसवायलाही मागेपुढे न पाहणारे तुम्ही,


आणि,


ऊन, थंडी, वारा, विजांचा कडकडाट आणि न सहन होणाऱ्या पावसात लपायला धड आडोसाही न मिळाल्यामुळे रोजच सर्द होणारे आम्ही...


‘प्युअर ब्रीड’ची पिल्लं हवीत म्हणून केवळ मेटिंगसाठी धष्टपुष्ट केलेली जाणारी कुत्री तुमची,


आणि,


खूप पैदास होऊन ‘तुम्हाला’ त्रास होतो म्हणून ‘निर्बिजीकरणा’साठी महानगरपालिकांनी विशेष केंद्रे उघडलेले आम्ही...


तुमच्या ‘भारीतल्या’ कुत्र्यांना जाता-येता चुकून जरी कुणाचा धक्का लागला तरी त्यांच्यावर केस ठोकणारे तुम्ही,


आणि,


आमच्या वाढ खुंटलेल्या पिल्लांना रस्त्यावर टाकलेलं काही नेताना ते  पाहूनसुद्धा तुम्ही जोरात दगड भिरकावल्यामुळे जखमी होणारे आम्ही...


भारीभारीतल्या गाड्यांमध्ये ‘शुद्ध हवा’ खात पुढच्या सीटवर बसून शाम्पू केलेले केस उडवत जाणारी ‘डॉग्ज’ तुमचे,


आणि,


भरधाव वेगाने जाताना तुमच्या त्याच गाड्यांच्या चाकांखाली तडफडून मरणारे आम्ही...


एखादा गंभीर आजार झाला तरी त्यावर लाखोंचे उपचार किंवा ऑपरेशन्स करून ठणठणीत होणारी ‘डॉग्ज’ तुमची,


आणि,


आमच्यावर भरलेली ‘लूत’ बरी करण्यासाठी केवळ वीस-तीस रुपयांची एखादी ‘आयव्हरमेक्टिन’ची गोळीही कोणी न खायला घालणारे आम्ही...


भव्यदिव्य स्पर्धांत भाग घेऊन गुणवान ठरलेल्या ‘चॅम्पियन ब्लडलाईन’ची सेलेब्रिटी डॉग्ज तुमची,


आणि,


शिकारीसाठी वापर करून झाल्यावर मरायला गावात ‘सोडून दिलेली’ कुत्री आम्ही...


ठरवून चांगल्या घरात जन्माला येऊन आरामात जीवन जगणारी कुत्री तुमची,


आणि,


मातीत जन्माला येऊन किमान ‘शांतपणे’ मरण्यासाठी आयुष्यभर खितपत पडणारे आणि कायमच लोकांनी झिडकारलेले आम्ही...


बरोबर आहे म्हणा...


हे भांडवलशाही आणि खुशामतीचे जग आहे...


आमच्यात समता आणि समानता प्रस्थापित करायला माणसांच्या जगाप्रमाणे ‘महामानव’ कुठून येणार आहेत म्हणा...


गावठी ठरवले गेलेले आम्ही... गावठीच ठेवले जाणार!!!


(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

Comments

  1. खरखुर वास्तव दर्शन. Good job sir

    ReplyDelete
  2. Dr Amit
    Khup kamibshbdat khup kahi mandatory tumhi.
    Mazi sabdrachnechya abhava mule he marm mala manta yenar nahi.
    Pan tumhi khup chan topic nivdlat.
    Agadi mazya manatil.
    Mala hi ya bhatkya kutryanvishavi khup sahanubhuti watate tyachhi ek story aahe.
    Dog lovers madhil mi hi ek
    Khup cha

    ReplyDelete

Post a Comment