मावळतीच्या सूर्याचा निरोप घेताना...
मावळतीच्या सूर्याचा निरोप घेताना...
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
मागील आठवड्यात मी गारगोटीत ड्यूटीला होतो.
संध्याकाळचा चहा घेऊन मी माझ्या ग्रामीण रुग्णालयाकडे बुलेटवरून रमतगमत निघालो होतो.
प्रवास पश्चिमेच्या दिशेने चालू होता.
आणि, जाताना ‘तो’ नजरेस पडला.
नुसता नजरेसच पडला नाही तर ‘त्या’ तेजःपुंज गोळ्याने मला अक्षरशः नजरबंदच करून टाकले.
‘केशरी’ रंगाच्या ‘त्या’ उठावदार ठिपक्याला ‘डार्क-पिंकपासून बेबी-पिंक’पर्यंतच्या गुलाबी रंगांच्या जवळपास सगळ्याच छटांनी निळ्याशार आभाळाच्या पार्श्वभूमीवर मनमोहक आरास केली होती.
पाहताक्षणीच प्रेमात पडावे असा तो नजारा...
बाल-हनुमंताला एकदा कसे सूर्याच्या लालबुंद गोळ्याला जाऊन थेट पकडावे असे वाटले होते तसेच मलाही त्यावेळी चटकन वाटून गेले.
आणि तसे वाटल्याक्षणीच बाल-हनुमान जसे त्या सूर्याकडे झेपावले होते, तसाच मीही तिकडे जायला झेपावलो.
पण, तो तर साक्षात सर्वशक्तिमान हनुमान होता; मी पामराने काय करावे? मी कसा पकडणार त्या मोहक लालबुंदाला!
क्षणभर विचार केला; क्षणभरच हं!
आणि मग, मी माझी गाडी क्वार्टर्सच्या दिशेने वळवण्याऐवजी थेट 'भुतोबा'च्या टेकडीकडे न्यायचे ठरविले.
हा ‘दिनकर’ मावळतीला जायच्या आधी टेकडीवर जावे म्हणजे आणखीन थोडा वेळ त्याला मन भरून पाहता येईल असा विचार मनी येऊन गेला.
जायचे तर ठरवले, पण जाताना उगाचच कवयित्री शांताबाई शेळकेंच्या ओळी मनात रुंजी घालू लागल्या...
“सूर्यास कैसे रोखणे; तिमिरास टाळावे कसे?
ज्योती निरर्थक येथल्या तम तेवढाच खरा असे…”
सूर्याला आपण कसे रोखणार ना... अपरिहार्य असणाऱ्या अंताला आपण कसे टाळणार ना..!
गाडीवरून एका स्थिर वेगाने प्रवास करताना आत्तापर्यंत प्रसन्न असणारे माझे मन अचानक थोडे गंभीर झाले... अंताकडचा प्रवास... ज्याचा-त्याचा... आपलाही आणि त्या सूर्याचाही..!
मी गाडी तशीच चालवत राहिलो.
थोड्या वेळाने गाडी, मी आणि माझे मन असे तिघेही अखेरीस त्या भुतोबाच्या माळावर पोहोचलो.
उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे वाळून सोनेरी पिवळे झालेले गवत इतस्ततः पसरलेले दिसत होते.
झाडेही दमल्यासारखी थोडी निराश वाटत होती. पण, ऐन उमेदीत इतक्या अडचणीतसुद्धा त्यांनी धरलेला तग नक्कीच कौतुकास्पद होता... कितीतरी उन्हाळे-पावसाळे त्यांनी त्यांच्या अंगावर लीलया खेळवले होते...
त्यांची ही तीव्र जीवनेच्छा आणि काठिण्यातही तग धरण्याची विजीगिषु वृत्ती अंगात बाणवता येईल कधी! शिकायला हवे त्यांच्याकडून हेही!
मी उभा असलेला काळाशार डांबरी रस्ता पुढे कदाचित ‘दूर कुठेतरी’ जात असावा.
पण, दूर म्हणजे नक्की कुठे? की, कुठल्यातरी अज्ञाताकडे? माहिती नाही.
तरीही तो कसा शांत पहुडल्यासारखा वाटतोय?
किती प्रवासी आले असतील आणि त्याच्यावरून गेलेही असतील. परंतु, हा रस्ता आहे तसाच आणि आहे तिथेच आहे... एखाद्या स्थितप्रज्ञासारखा...
ही स्थितप्रज्ञता आपल्या अंगी कधी येईल? यायला तर हवी... नक्कीच..!
हे सगळं दिसत तर होतं, पण, मुळात मी ‘जे’ पहायला आलो होतो ते हे नव्हे!
मी थोडा विचारातून बाहेर आलो आणि उजव्या दिशेने, अर्थात, पश्चिमेकडच्या लालिम्याकडे पाहू लागलो.
गावातून निघून टेकडीवर येईपर्यंत आधीच मावळतीला आलेला सूर्य एव्हाना बराच खाली सरकला होता.
गुडुप व्हायची गडबड त्याला झालीय की काय असं वाटावं!
आपल्यालाही होतं की असं बऱ्याचदा...
नको असलेलं काम करावं लागलं की... नको असलेली माणसं भेटत राहिली की... अडचणींवर अडचणी आणि संकटांमागून संकटं येत गेली की... कधीकधी फक्त ‘एकटं’ रहावं वाटतं म्हणून... मनाचा पडदा सुस्पष्ट व्हावा म्हणून... मळभ दूर व्हावं म्हणून... थोडंसं आत्मचिंतन करायला वाव मिळावा म्हणून... गुडूप होता यायला हवं...
गुडूप व्हायची ही ‘कला’ही सूर्याकडून शिकून घ्यावी जरा...
स्वतःच स्वतःचा पुनर्शोध घेण्यासाठी किंवा स्वतःचीच स्वतःशी पुनर्भेट व्हावी म्हणून..!
कधीकधी उगाचच एखादं विचारचक्र मनाचा ताबा घेते... आत्ताही मला तसंच होतं होतं...
परत मनाला मूळ विषयावर आणलं... मावळतीचा सूर्य बघायला आलो होतो मी... पाहूया त्याच्याकडे जरा...
समोर दिसणाऱ्या डोंगराआड तो बुडत असतानाच मला त्याचे दर्शन झाले आणि भा. रा. तांबेंच्या कवितेतील ओळी मनात उमटल्या...
“मावळत्या दिनकरा, अर्घ्य तुज जोडुनि दोन्ही करा..!”
नकळतपणे त्या ‘मित्रा’ला पाहून माझेही ‘कर’ जोडले गेले!
‘तसे तर सूर्योदय आणि सूर्यास्त रोजच दिसतात; त्यात काय इतकं विशेष?’ असं एखाद्याला वाटू शकेल... शक्यतो घड्याळाच्या ठोक्यावर चालणाऱ्या लोकांना...
घड्याळाच्या दोन काट्यांमध्येच जे संपूर्ण आयुष्य व्यतित करतात त्यांना या ‘रोज’च होणाऱ्या सूर्योदय-सूर्यास्ताचं काय कौतुक असणार म्हणा...
पण जरा थांबा; आणि विचार करा.
या सूर्याकडून काय शिकायचं आपण...
दोन गोष्टी तर आपण शिकायलाच हव्यात...
एक म्हणजे, त्याचा ‘नित्यक्रम’!
ऋतू कोणताही असो आणि परिस्थिती कशीही असो; जगन्नियंता असूनही सूर्यदेव कधी त्यांचा रोज उगवण्याचा नित्यक्रम सोडतात का बघा...
रोजचा दिवस त्याच्याच उगवण्या-मावळण्यामुळे जात असला तरी ‘काही नाही; दिवस ढकलायचं चाललंय’ असं सूर्य कधीच स्वतःहून सांगत बसत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे ‘दिवस मावळायच्या आत घरी परत जाण्याचा’ सूर्याचा गुण!
काळोखात होणारी कितीतरी अनैतिक कृत्ये या एका गोष्टीमुळे टाळता येतात की नाही बघा!
तो भास्कर आता जवळपास पूर्ण बुडला होता... डोंगराआड की क्षितिजाआड... की, आणखी कुठे... कोणालाच तो कळणार नाही!
संपूर्ण चराचरावर त्याच्या जाण्याने अंधःकाराची अवकळा जरी पसरत असली तरी तो असतो तोपर्यंत मात्र त्याच्या अस्तित्वाने सगळा आसमंत उजळून निघतो.
उगवल्यापासून मावळेपर्यंत तो स्वयंप्रकाशाने या विश्वाला उजळून टाकतो; स्वयंभू असल्यामुळे बंधमुक्त असला तरी अनिर्बंध बेबंदशाही मात्र तो कधीच अंगात भिनू देत नाही.
आणि, म्हणूनच त्याचं निरोप घेणंही मनमोहक आणि आनंददायी असतं...
‘जगायचं कसं आणि निरोप घेताना जायचं कसं’ या दोन्ही प्रश्नांची उत्तरे या ‘मित्रा’कडे पाहिल्यावर मिळतात.
दिवस कार्यमग्नतेत घालविल्यामुळे या ‘दिनकरा’चं जाणं ताणविरहित असतं.
सर्वांना समान प्रकाश, ऊर्जा आणि ऊब देणारा हा सूर्य कधीही सान-थोर, गरीब-श्रीमंत, राजा-प्रजा, मानव-अमानवी संजीव असा कुठलाच भेदभाव करत नाही; त्याअर्थाने तो ‘समन्यायी’सुद्धा!
‘मनी न धरले सानथोरपण... समदर्शी तू खरा... मावळत्या दिनकरा!’ असे तांब्यांनी केलेले सूर्याचे वर्णन यथोचितच आहे!
अखेरीस तो अंताला गेला, नेहमीप्रमाणेच!
तो गेल्यावरही त्या ‘रवी’चे किरणरूपी सहस्रकर सबंध आसमंताला आपल्या गुलाबी रंगाने उजळून टाकत राहतात.
पण, तो जातो म्हणजे तरी काय?
स्वतःवरची जबाबदारी काही तो ढकलून देत नाही.
उद्या पुन्हा नवीन आशेचे किरण घेऊन तो उगवतोच... न कंटाळता, न थकता...
आणि, तेवढ्या वेळेसाठीही तो आपली जबाबदारी आपल्या चंद्ररूपी सचिवावर देऊन जातो.
भा. रा. तांबेंनी त्यांच्या ‘मावळत्या दिनकरा’ या कवितेत याचे नितांतसुंदर वर्णन केले आहे.
ते म्हणतात,
‘प्रभु-सचिवा विरही मुखधूसर,
होती दयामृदू नयनिष्ठुर कर...
कारभार टाकुनि चंद्रावर,
चाललास तू खरा... मावळत्या दिनकरा...’
माझ्या डोक्यावरच चंद्राचा तो शीतल तुकडा लकलकत होता.
सूर्यामुळेच प्रकाशमान होत असला तरी स्वतःतील ‘थंडपणा’ तो सोडत नाही.
आजचा माझा दिवसही मला वेगळीच अनुभूती देऊ झाला होता.
‘जो तो वंदन करी उगवत्या; जो तो पाठ फिरवी मावळत्या’ ही जग-रीत असली तरी ‘स्वयंतेजस्वी, लखलखता, स्वकर्तृत्वाने उजळणारा, सत्कर्मी, जीवनचक्र चालविणारा’ सूर्य कधीही मावळत नसतो आणि म्हणून त्याच्याकडे कोणी पाठ फिरवणे शक्य नसते.
अखेरीस “हृदयी मी साठवी तुज तसा, जीवित जो मजला… तिन्हीसांजा…” असे म्हणून त्यादिवशी ‘एखाद्याचं जाणंही किती सुंदर असू शकते’ हे दाखविणाऱ्या ‘मित्रा’चा मी निरोप घेतला..!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)
(© हा लेख कॉपीराईटेड असून लेखाचे सर्वाधिकार प्रस्तुत लेखकाकडे सुरक्षित आहेत.)
(www dramittukarampatil.blogspot.com)
मावळतीच्या रंगछटांची मनःपटलावर होणारी आत्मानुभूती समर्पकरित्या उतरली आहे.नितांत सुंदर वर्णन!
ReplyDeleteमावळत्या सुर्यदेवाचे वर्णन आणि तो क्षण अविस्मरणीय
ReplyDeleteअतिशय मार्मिक लेखन...!!!
ReplyDeleteSir apratim
ReplyDelete