“तू स्वतःला काय बच्चन समजतोस का..!” (How did Bachchan come to my life..!)
“तू स्वतःला काय ‘बच्चन’ समजतोस का..!”
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
आज अमिताभचा वाढदिवस..!
तसा तो दरवर्षीच येतो आणि हजारो लोक त्याच्याबद्दल लिहीत असतात; मग मी काय नवीन लिहिणार, नाही का?
हं, एका अर्थानं खरंय ते...
पण, तरीही, लिहितोय...
तर, अमिताभ बच्चन!
माझ्या आयुष्यात अमिताभ माझ्या बारशादिवशीच आला.
माझं नाव 'अमित' ठेवण्यात आलं तेच मुळी अमिताभच्या नावावरून...
अं... हं... मित्रांनो, इतकं सोप्पं नाहीये ते...
घरात बाळाचा जन्म झाला की झाडून सगळ्या नातेवाईकांचा पहिला कार्यक्रम काय सुरू होत असेल तर तो 'बाळाचं नाव काय ठेवायचं?' याबद्दलची चर्चा हां!
हां... तर, माझ्या जन्मानंतर आमच्याही घरी अशा चर्चा सुरू झाल्या होत्या (अर्थात, असं माझे आई-पप्पा सांगतात!)...
चर्चेला बरीच नावं होती... मी घरातला (पाटील 'खानदाना'तला म्हणा ना!) पहिला (अर्थात, मोठा!) मुलगा; आणि म्हणूनच लाडाचाही!!! तर, झालं असं की, तत्कालीन (म्हणजे आजही चांगले गुण आहेत म्हणा माझ्यात!) इतक्या सर्वगुणसंपन्न (!) बाळाचं नाव ठेवायचं म्हणजे काही खायचं काम नव्हतं नक्कीच...
त्यात, म्हणतात ना, 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात!' माझे तर पायही दिसले होते आणि पायाची 'सहा' बोटंही... 'सहा बोटं आन् नशीब मोठ्ठं' म्हणतात गावाकडे... मग, नाव जरा बऱ्यापैकी हवं ना... तशी आई-पप्पांची काही अट नव्हती; एक सोडून... ती इतकीच की, 'नाव सोप्पं हवं... आणि, अर्थपूर्णही..!'
आजोळी मोठ्या मामांचा (आर. आर. आबा) प्रभाव खूप होता (आणि, आज त्यांच्या मृत्यूनंतरही सबंध महाराष्ट्रात आहेच!) आणि त्यांचा शब्द शक्यतो अंतिम असायचा... मामांनी थेट नावच सुचवलं... ‘विजयसिंह’! त्यावेळच्या एका अत्यंत प्रभावी राजकारण्याचं ते नाव... ९६ कुळी मराठ्यांचे नावलक्षण म्हणजे, नावापुढे 'सिंह', 'साहेब', 'राव' वगैरे विशेषणे लावणे इ... पुढे 'सिंह' कर्तृत्ववान निघो अथवा नको, पण नावात रुबाब हवाच, नाही का!
नाव भारदस्तही होते आणि 'कुलरत्ना'ला (अर्थात, मला!!!) शोभणारेही होते... आई-पप्पांना नाव थोडंसं सोप्पं हवं होतं, म्हणून मग 'विजयसिंह'चं 'विजय' झालं..! पण, आईचं काही समाधान झालं नव्हतं... शेवटी जे व्हायचं तेच झालं... अमिताभचं पडद्यावरचं प्रसिद्ध नाव 'विजय'; ते गळून पडलं आणि माझं नाव झालं 'अमित'!
लहानपणी कोणीतरी मला हे सांगितलं आणि मी बच्चनचा एखादा 'शॉट' तेव्हाच बघितला असावा... मी स्वतः 'बच्चन'च व्हायचं ठरवलं... आता हे काही शक्य नसतं (आजही नाही) हे आपल्याला त्यावेळी माहिती नसते... मनात एकदा आलं की आलं... (खरं सांगायचं तर मी माझ्या कळत्या वयापासून एकच अपवाद वगळता कोणत्याही नटाची किंवा त्यांच्यासंबंधी असणाऱ्या कोणत्याही गोष्टीची कधीच 'कॉपी' केलेली नाही... तो एकमेव अपवाद म्हणजे, अजय देवगण कंटाळा घालविण्यासाठी घेत असलेली 'ब्लॅक कॉफी'... बऱ्याचदा अभ्यासाला बसताना मी ती घेतो..!)...
मग 'सोप्या पद्धतीने बच्चन कसं व्हायचं' असा 'अभ्यास' (मनातल्या मनात) चालू झाला... जात्याच थोडा 'लाजाळू' स्वभाव असल्यामुळे (आणि लागणारे कोणतेही कलागुण अंगात नसल्यामुळे) अमिताभची 'मिमिक्री' वगैरे तर शक्य नव्हती... एखाद्या नटासारखी (मग तो बच्चन का असेना) हेअरस्टाईल करायला घरातून पाठिंबा मिळण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त नसल्याने (आणि, केसही तसेच पाहिजेत ना!) ती शक्यताही नव्हती... मग, बरेच दिवस मनातला बच्चन मनातच राहिला... हिरमुसून...
काही महिन्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या गावी गेल्यावर मला 'बच्चन' भेटला... मामांच्या द्राक्षबागेत काम करणाऱ्या एका कामगाराच्या धाकट्या मुलाला सगळेजण 'बच्च्या, बच्च्या' म्हणून हाक मारायचे... मी त्या कामगार मामांना जाऊन विचारले, "तुम्ही याला बच्च्या का म्हणता? त्यांचे खरे नाव काय आहे?"... ते म्हणाले, "काय न्हाय रे, अमित; त्येला कितींदा सांगितलं असला अवतार करत जाऊ नगं म्हणून; पण त्यो काय ऐकत न्हाय... जाऊंदे, तू नको लक्ष दिऊ... काय बच्चन बिच्चन नाव न्हाय त्येचं... त्या बच्चनचा एकतरी गुण हाय का ह्यच्यात? त्यो कुटं ह्यो कुटं... नसती थेरं..."
पण, मला काही फार फरक पडला नव्हता... आपला बच्चन आपल्याला सापडला होता.
त्याच संध्याकाळी तो मला भेटला. तसं ते काही फार मोठं वगैरे नक्कीच नव्हतं, पण उगाच आपला मोठेपणा! आमचा बच्चन चांगल्या सात-आठ फूट उंचीच्या कडब्याच्या गंजीवर बसला होता; तोंडात तिथलीच एक काडी 'बच्चन स्टाईल' घालून... जसं काही, '... तुम मुझे उधर ढूँढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ' स्टाईल! आत्ता त्या सगळ्या गोष्टींचं हसू येतं, पण तेव्हा ते खूप भारी वाटलं होतं..! (अर्थात त्याने असा काही 'डायलॉग' त्यावेळी फेकला नव्हता; या माझ्या त्यावेळच्या प्रसंगासाठीच्या आजच्या भावना आहेत.)
मी थेट विषयाला हात घातला. म्हटलं, "तू कसा बच्चन झालास रे?". "तुम पहले इस पेपर पे साईन कर लो" अर्थाचा पॉज घेत (याही माझ्या आत्ताच्याच भावना बरं का!) मला तो म्हणाला, "काय नाय रे, आपल्याला बच्चन लई आवडतो... भारीय तो एकदम... नो वादविवाद; एकदम जागंवर न्याय... 'अँग्री यंग मॅन' उगंच न्हाय म्हणत त्येला... नुसती फायटिंग; एकटा वाघ सगळ्यास्नी अंगावर घेतो... कितीबी असूंदेत... असा अंगात दम पायजे माणसाच्या..."
"हं, हं...", मी म्हणालो, "पण तुला का सगळे बच्चन म्हणतात?"
"आपली श्टाईल असत्या तशी... मीबी बच्चनसारकाच हाय... कुटंबी फायटिंग सुरू... दोन-चार जणांना सहज लोळवतो आपण... पण, तेवड्यानं होत नसतंय... माजी श्टाईल बग की तू... बच्चनसारखं एकावर एक दोन शर्ट (ते ब्लेझर असते हे मला खूप उशिरा कळाले!)... ते बी कॉलर उगडी आणि मागं गेलेली... वरचं पयलं बटन लावून चालत नसतंय बग... आणि, हेरश्टाईल जरा कमी त्यज्यासारखीच किल्या मी... हां, ते 'टॉक टॉक' वाजणारं बूट न्हाईत माज्याकडं... न्हायतर शाळंत बी 'एंट्री' तशीच मारली असती... बापू काय बूट घिऊन दिनात म्हणून... मोट्टा झाल्यावर 'तसल्या' बुटांची रास लावतो का न्हाय बग..."
मी बराच 'इम्प्रेस' झालो होतो... मी पण ठरवलं, 'आपण पण आता दोन शर्ट वापरायचे... आपल्याला पण लोकांनी 'अमिताभ' म्हणायला पाहिजे...' झालं तर मग... उन्हाळ्याच्या सुट्टीवरून परत घरी जाईपर्यंत मनातला 'अमिताभ' अधूनमधून वर येत राहिला...
शाळा चालू झाली होती... बच्चन तर व्हायचंच होतं... दोन शर्ट एकावर एक घालायचा मुहूर्त मी ठरवला होता... कॉलर कशी ठेवायची याचाही एकट्यानेच आरशासमोर प्रयोग करून झाला होता... बूट बच्चनसारखा नव्हता, पण आहे तोच रंगीबेरंगी बूट घालून 'टॉक टॉक' आवाज करत चालायचं 'फिक्स' केलं होतं... रविवारचा मुहूर्त साधला आणि दोन शर्ट एकावर एक घालून 'अमिताभ' व्हायचा प्रवास मी सुरू केला होता... अर्थात, पप्पा रविवारमुळे घरीच होते आणि आईच्या सूक्ष्म नजरेतून माझा 'अमिताभ प्रयोग' सुटला नसावा... शर्ट घालून वरचे बटन उघडून कॉलर मागे करून मी आरशासमोर उभा राहताच मागून पप्पांचा जोरदार आवाज आला, "काय चाललंय रे... असा बच्चन होतो का? त्याच्यासाठी दिवसरात्र कष्ट करावे लागतात... आधी अभ्यास कर चांगला; बघू मोठा झाल्यावर करू तुला बच्चन... काढ ते सगळं आणि नीट घडी घालून ठेव..."
माझ्या 'अमिताभ' होण्याच्या स्वप्नांचा पहिल्याच रविवारी अंत झाला..!
.
.
.
.
.
अमिताभचे गारूड आमच्या संपूर्ण घराण्यावर आहे. घरातील जवळपास प्रत्येकाला तो आवडतो. पण, खरं सांगू का, आम्हा सगळ्यांना 'तरूण अमिताभ' भावतो... शक्यतो, ९५च्या आधीचा... शोले तर सदाबहार... 'ए दोस्ती हम नहीं छोडे़ंगे' म्हणत अमजद खानला शिक्षेपर्यंत पोहचवणारा आणि अंगी समयसूचकता ठासून भरलेला 'जय' जेव्हा दुसऱ्या एखाद्या सिनेमात 'मैं आज भी फैके हुए पैसे नहीं उठाता' म्हणत समोर पडद्यावर येतो तेव्हा तो स्वाभिमानाने जगण्याचे बळ अंगात काठोकाठ भिनवून जातो. मुकद्दर का सिकंदरमध्ये मरीन ड्राईव्हवरील रस्त्यावरून बेधडकपणे गाडी चालवत जाताना तर तो 'रोते हुए आते हैं सब, हसता हुआ जो जाएगा' म्हणत जीवनामृत पाजतो. शराबीमधील त्याचा अभिनय अभिनयाची सर्वदूर उंची गाठत जातो, तर नमक हराममध्ये तो गुंडांना चांगलेच बोधामृत पाजतो.
त्याच्या वैयक्तिक आयुष्यात आजवर आलेली वादळे आपण ऐकली-पाहिली आहेत; पण त्याहूनही मोठे आहे ते त्या वादळांना पुरून उरत परत एकदा उंच भरारी घेण्याची त्याची 'शहनशाही' प्रवृत्ती... 'अंधेरी रातों में, सुनसान राहों पर'ही त्याने यशाचे लखलखीत इमलेच बांधले...
त्याच्या सिनेमांवर आणि त्यातील डायलॉग्जवर लिहायला हजारो पाने कमी पडतील, तरीही या 'स्टार ऑफ दि मिलेनियम'चा दरारा कधीच कमी व्हायचा नाही.
स्वतःला 'बच्चन' समजायचे म्हणजेच आपापल्या क्षेत्रातील 'डॉन' व्हायचे हे आता लक्षात येतंय... कारण तितक्या उंचीवर गेल्यावरच 'डॉन को पकड़ना मुश्कीलही नहीं, नामुमकीन हैं' असे म्हणण्याचा आत्मविश्वास अंगी येतो!!!
(तळटीप: अमित म्हणजे असंख्य, मोजता न येण्याजोगे... श्रीगणेशाचेही हे दुसरे नाव आहे.)
अमिताभचे कर्तृत्वही असेच आहे- न मोजता येण्याजोगे आणि ते तसेच रहावे!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, 'बिगेस्ट बी'!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एमबीबीएस, एमडी (बालरोग चिकित्साशास्त्र))
(© हा लेख कॉपीराईटेड असून लेखाचे सर्वाधिकार प्रस्तुत लेखकाकडे सुरक्षित.)
(www.dramittukarampatil.blogspot.com,
www.dramit100wordstories.blogspot.com)
खरंय सर, अमिताभ म्हणजे सिनेमा सृष्टीतील झंझावात म्हणावा लागेल कारण शोले, दिवार सारखे अजरामर चित्रपट देऊन त्यांनी इतिहास रचला आहे. कौन बनेगा करोडपती मधून त्यांनी पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेतली ते ही उतार वयात. त्यांचा हजरजबाबीपणा त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीचे द्योतकच आहे. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अमिताभ बच्चन यांच्या प्रती लेखामधून सुंदर भावना व्यक्त केलात. तुमच्या नावाशी साधर्म्य म्हणजे दुधात साखर.. अमिताभ प्रेम सुरेख उतरलंय लेखातून !👌👌👍
ReplyDeleteखूपच छान लेख..... 👌👌 आपण आपापल्या क्षेत्रात अमिताभ सारखे झालो म्हणजे...don ko pakdna namumkin ....होईल 😊
ReplyDelete