एका तरसाचा शोध (थरारक जंगलमोहिमेची अधुरी कहानी..!)(The Hyena Fiasco)
एका 'तरसाचा' शोध...
(थरारक जंगलमोहिमेची अधुरी कहानी..!)
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
माणसाला एकदा ट्रेकिंगची सवय लागली की ती सुटता सुटत नाही म्हणतात; मग ते गडकिल्ल्यांचे ट्रेकिंग असो की हिमालयातील ट्रेकिंग असो किंवा मग जंगल ट्रेकिंग असो.
जंगल ट्रेक हा केवळ प्राणिदर्शनासाठी (sighting) मांडलेला सोपा खेळ नसतो. इतर प्रकारच्या ट्रेक्सप्रमाणे यात यशाची निश्चित हमी तर देता येत नाहीच, शिवाय बऱ्याचदा कोणत्याही प्राणिदर्शनाशिवायही हे ट्रेक संपवावे लागतात. केवळ ४-५ वेळा त्याच जंगलात गेलात म्हणून तुमचा नंतरचा ट्रेक यशस्वी होईलच याची कोणतीही शाश्वती देता येत नाही. कधीकधी आपण जंगलात जातो एखादा विशिष्ट प्राणी बघण्यासाठी, पण अचानकपणे समोर येतो वेगळाच एखादा प्राणी. कधीकधी दोन-चार नवीन कीटक किंवा एखादा पक्षी किंवा कधीकधी तर फक्त एखादे माकड दिसले यावरसुद्धा समाधान मानून परतावे लागते.
एकूणच काय, तर जंगल ट्रेक्स म्हणजे केवळ अनिश्चिततांचा पाठलाग! पण, हा पाठलागसुद्धा कोण कोणाचा करतंय हेही कधीकधी उमजत नाही. अनुभवी जंगल ट्रेकर्सना माहिती असते की, जंगलात गेल्यावर केवळ आपणच एखाद्या प्राण्याचा पाठलाग करत असतो असे नाही, तर बऱ्याचदा एखादा प्राणीही आपला माग काढत-काढत आपल्यापर्यंत पोहोचलेला असू शकतो. नवख्या ट्रेकर्सची यात फसगत होण्याची शक्यता अधिक. जंगलात केवळ आपणच प्राण्यांकडे पाहत असतो हा आपला गैरसमज! बहुतेक प्राणी माणसापासून दूर पळत असल्यामुळे त्यांना माणसाचा वावर थोडा जरी जाणवला तरी ते अचानक आक्रमक होण्याची शक्यता असते. एकूणच जंगल ट्रेक करणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे!
आता नमनाला घडाभर तेल घातलेच आहे, तर जरा पुढे सरकू. गोष्ट एप्रिल २०२२ मधली आहे; म्हणजे तशी परवाचीच! मी ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे कार्यरत होतो. माझे पोस्टिंग कुठेही असले की पहिले काम मी काय करत असेन, तर ते म्हणजे, त्या भागातील डोंगर, नद्या, जंगले, निसर्गरम्य ठिकाणे आणि व्यायामासाठी एखादे मैदान शोधणे हे. गारगोटीमधील नदीघाटापासून ते जवळच्या भुतोबाच्या डोंगरापर्यंतची बरीच ठिकाणे मी माझ्यापुरती शोधून काढली. तिथे अधूनमधून फेऱ्या व्हायच्या. प्राणी पाहण्यासाठी ‘जंगल का चप्पा-चप्पा छान मारना’ हा तर माझा सर्वांत आवडता छंद!
गारगोटीच्या आसपासचा भाग निमशहरी असल्यामुळे तिथे तसा एखादा प्राणी दिसणे अवघडच होते; पण माझा शोध जारी होता. माझ्या स्टाफमधले काही लोक रात्री-अपरात्री आजूबाजूच्या घाटांत किंवा आसपास हरणे, भेकरे किंवा गवे दिसल्याच्या बातम्या सांगत; पण मला मात्र एखादा प्राणी दिसायचा योग येत नव्हता. अखेरीस एके दिवशी माझे मित्र प्रदीप परीट यांनी गारगोटीपासून ४ किमी अंतरावर असणाऱ्या मडिलगे गावच्या फाट्यावर रात्री ११ वाजता एक तरस बिनधास्त फिरत असल्याचा व्हिडिओ शूट करून मला पोस्ट केला. झाले; मला आता रात्री फिरायला चांगलेच निमित्त सापडले. आमचे सुरक्षारक्षक संजय कुराडे हे या भागातले चांगले जाणकार असल्याने त्यांना साथीला घेतले. कुराडे मामांना मी डॉक्टर असूनसुद्धा रात्री-अपरात्री स्वसंरक्षणाची कोणतीही साधने न घेता जंगलात उत्सुकतेने फिरतो याचे आश्र्चर्यमिश्रित कौतुक वाटत असे. त्यामुळे तेही एका हाकेला मला 'ओ' देत असत आणि माझ्याबरोबर फिरायला येत. मडिलगे भागातील तरसाचा शोध घेण्याच्या माझ्या धाडसी ‘मिशन’बद्दल मी एखाद्या आर्मी ऑफिसरच्या थाटात त्यांना माहिती दिली आणि त्यानंतर लगेचच (रात्री १० वाजता) आम्ही मडिलगे ‘बॉर्डर’कडे कूच केले. ज्या परिसरात तो तरस दिसला होता तिथे भागातील चिकनविक्रेते त्यांचा शिल्लक कचरा टाकत असत; शिवाय तिथल्या एका कोरड्या खळग्यात शेतकरी त्यांच्या मेलेल्या जनावरांची प्रेते विल्हेवाटीसाठी आणून टाकत. तरसासाठी हे आयते खाणे असल्यामुळे तो तिथे वारंवार येत असण्याची शक्यता होती.
त्या रात्री आम्ही रात्री १०.३० वाजता तिथे पोहोचलो. तिथला आजूबाजूचा सर्व परिसर आम्ही पिंजून काढला. शिवाय दाट झाडींनी वेढलेल्या, डोंगररांगेतून जाणाऱ्या आणि घोट्यापर्यंत पाय बुडणाऱ्या पांढऱ्या मातीच्या थराचे आच्छादन असलेल्या रस्त्यावरूनही जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर आम्ही चढाई केली. मात्र दोन तास फिरूनही आम्हाला काही तरस दिसला नाही. पण, त्या परिसरात तीस-चाळीस वेगवेगळ्या प्रकारची गावठी कुत्री असल्याचे आमच्या लक्षात आले. आम्ही रात्री १ वाजता परतलो ते ‘काहीही करून त्या तरसाला पहायचेच’ हा पण करूनच!
ठरल्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या दिवशी रात्री १० च्या आसपास त्याठिकाणी परत गेलो. आज आम्ही इकडेतिकडे न फिरता पहिल्यांदा थेट त्या मातीने भरलेल्या रस्त्यावर गेलो. सभोवतालची पाच-पन्नास कुत्री हुसकावून लावून आम्ही जेमतेम २००-२५० मीटरचा प्रवास केला असेल नसेल तोच अचानक त्या वाटेच्या डाव्या बाजूच्या झाडीतून सळसळ ऐकू आली. बरीच जंगले पालथी घालण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तिथून कुठलातरी प्राणी खाली रस्त्यावर उतरतोय हे समजायला मला एका क्षणाचाही वेळ लागला नाही. एखादे कुत्रेही तिथून येण्याची शक्यताही होतीच. परंतु, आमचे नशीब जोरावर होते. आमच्यापासून केवळ ५० मीटर अंतरावर 'तो' प्रतीक्षित तरस रस्त्यावर येऊन उजव्या बाजूच्या दरीतल्या झाडीत उतरण्याच्या प्रयत्नात होता. रात्रीच्या इतक्या अंधारात केवळ चंद्रप्रकाश असल्यामुळेच आम्हाला तो स्पष्टपणे दिसला होता. तशी आमच्याकडे एक साधी बऱ्यापैकी उजेड पडणारी बॅटरी होती; पण तिची ‘रेंज’ कमी होती. अर्थात झाडीत लपलेल्या एखाद्या प्राण्याचे डोळे दीपवून चमकवण्याची क्षमता तिच्या प्रकाशात नक्कीच होती. रात्रीच्या वेळी जंगलात प्राणी शोधण्याचा हा (संभाव्य प्राण्याचे डोळे चमकवणे) प्रभावी मार्ग आहे. कारण बॅटरी कितीही प्रभावी असली तर आजूबाजूला असणाऱ्या दाट अंधारात संपूर्ण प्राणी दिसणे- आणि, तेही झाडीत व्यवस्थित लपलेला- जवळपास अशक्य असते. फार दिवस वाट न बघता आम्हाला लगेचच दिसलेला हा एकमेव प्राणी! तरसही आम्हाला अचानक पाहून गोंधळला आणि रस्त्यात मध्यभागी उभा राहून आमच्याकडे पाहू लागला. आम्ही दोघे असल्यामुळे आमच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. मी प्रसंगावधान राखून पटकन मोबाईलचा कॅमेरा 'ओपन' केला आणि त्या तरसावर रोखला. जवळपास ४०-४५ सेकंद तो आमच्यासमोर उभा होता. (ज्यांनी अभयारण्याच्या बाहेर, मोकळ्या जागी एखाद्या प्राण्याला अचानक पाहिले आहे त्यांना १०-१५ सेकंदांचा वेळही अशावेळी किती मोठा असतो हे सहज लक्षात येईल. Theory of relativity चे हे उत्तम उदाहरण आहे.) थोड्या वेळाने तो निघून गेला. आम्ही खूप excite झालो होतो. मी परतताना कॅमेरा चेक करायचे ठरवले. बघतो तर काय, कॅमेरात काहीच रेकॉर्डिंग झाले नव्हते. (याचाही अनुभव सच्च्या प्राणिप्रेमींना नक्कीच आला असेल.) माझ्या लक्षात आले, 'मी फक्त कॅमेरा 'ऑन' केला होता; पण गडबडीत रेकॉर्डिंग सुरूच केले नव्हते किंवा सुरू आहे की नाही हे मी चेकच केले नव्हते. क्षणभर निराश झालो; पण अशा बाबींची आता सवय झाल्यामुळे काही वेळातच माझी निराशा दूर पळाली.
झालं. तरसाची एक झलक आमच्या ग्रुपसाठी पुरे होती. मी रात्री १२-१२.३० वाजताच सर्वांना मेसेज करून तरसाच्या दर्शनाची साग्रसंगीत माहिती दिली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत माझे सर्वांशी बोलणे झाले. नेहमीप्रमाणे सर्वांनी 'लवकरच तुमच्या भागात दौरा करूया' असे कळविले. नंतरचे १-२ आठवडे आमच्या ग्रुपमधल्या कोणाचेही येणे झाले नाही. मात्र तरस दिसलेल्या बातम्या कोणा ना कोणाकडून समजत होत्या; म्हणजे तरस त्याच भागात अजूनही फिरत होता.
तीन आठवड्यांनी अचानक तो योग येणार होता. मी ड्यूटी आटोपून बुधवारी संध्याकाळी घरी पोहोचलो होतो. आमच्या 'भ्रमंती' ग्रुपमधील सर्वांना त्याच रात्री जेवणानंतर भेटायचे नियोजन होते. मात्र आम्ही भेटताच आमचे स्नेही श्री. अमर पाटोळे साहेब यांनी थेट 'तरस बघायला' जाण्याचा प्लॅनच सांगायला, तोही लगेच, त्याच वेळी. झाले. आम्हाला सर्वांना गाडीत बसून जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. मी, अमर पाटोळे साहेब, अंशुमन भोसले साहेब आणि प्रदीप लांभोर या 'तरस सर्च ऑपरेशन'वर निघालो. गाडीत छान गप्पा सुरू होत्या. प्रत्येकजण आपापले प्राणिदर्शनाचे अनुभव शेअर करत होता. काळ्याकुट्ट अंधारात गाडी रस्ता कापत असतानाच इस्पुर्लीच्या पुढे गेल्यावर रस्त्याच्या कडेला उसाच्या शेताजवळ एक प्राणी उभा असलेला आम्हाला दिसला. तो कोल्हा असल्याचे माझ्या लगेच लक्षात आले. शिवाय, प्रदीपनेही मला दुजोरा दिला. पण, तो नक्की कोल्हा आहे की कुत्रा या गोंधळामध्ये अमर साहेबांनी गाडी तशीच पुढे नेली. मात्र गाडीतील सर्वांनीच 'कोल्हा बघण्याचा' हट्ट केल्यामुळे अखेरीस अमर साहेबांना गाडी मागे घ्यावी लागली. आमचे नशीब चांगले होते. आम्ही परतेपर्यंत कोल्हा परत रस्त्याकडेला आला होता. पण, तो बराच अशक्त वाटत होता. खूप वेळ गाडी थांबवूनही तो फार लांब पळू शकला नाही. एकदोन फोटो आणि एक छोटासा व्हिडिओ काढला असेल नसेल तोच बाजूने एक कार अगदी वेगाने निघून गेली. त्या आवाजाने मात्र तो उसाच्या शेतात घुसला. प्राणिदर्शनादरम्यान येणारा हा आणखीन एक अनुभव... आपण शोधायला निघतो एक प्राणी, तर दिसताना अनपेक्षितपणे दुसराच कुठलातरी जीव दिसतो! आम्ही सगळे खूश झालो. आमच्या मोहिमेसाठी हा एक शुभसंकेत आहे असे आम्हाला वाटले आणि उत्साहाने आम्ही पुढचा प्रवास सुरू केला.
रात्री १० च्या सुमारास आम्ही अखेरीस मडिलगे फाट्याजवळ वर आधीच वर्णन केलेल्या पोहोचलो. मित्राला पहिल्यांदा जिथे तरस दिसला होता तिथल्या परिसरात थोडी शोधाशोध करून आम्ही आम्हाला जिथे पहिल्यांदा तरस दिसला होता त्या ठिकाणी बॅटऱ्यांचा उजेड चमकावत आणि कानोसा घेत पोहोचलो. सुदैवाने (!) तिथल्या खड्ड्यात एका म्हशीचे आणि एका नवीनच मृत झालेल्या रेडकाचे अशी दोन शवे टाकलेली दिसत होती. (सुदैवाने यासाठी म्हटले की तरसांना शक्यतो मेलेली जनावरे खाण्याची सवय असते आणि तिथे शवे असल्यामुळे तरस ते खायला येण्याची शक्यता होती.) आसपास नेहमीप्रमाणे बरीच कुत्री भुंकत होती. बऱ्याचदा बॅटरी टाकल्यावर त्या कुत्र्यांचेच डोळे चमकत असत. केवळ अनुभवाने तयार झालेली 'नजर' असल्यामुळेच ते डोळे तरसाचे नसून कुत्र्यांचे आहेत हे आमच्या लक्षात येत असे. शेवटी आम्ही मातीने भरलेल्या आणि वर टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने शोधाशोध करायचा निर्णय घेतला. केवळ शंभरेक मीटर अंतर आम्ही चाललो असू-नसू, तितक्यात रस्त्याला उजव्या बाजूला आम्हाला त्या पांढऱ्या मातीत उमटलेले एका प्राण्याचे ठसे दिसले. ते श्वानवंशीय एखाद्या प्राण्याचे आहेत हे तत्काळ आमच्या ध्यानात आले; पण ते तरसाचे आहेत की कुत्र्याचे हे समजायला थोडा वेळ गेला. ते तरसाच्या पायाचे ठसे आहेत हे आमच्या लक्षात आले. आमच्या उत्साहाला भरते आले. आता थोड्याच वेळात तरस दिसणार अशी आशा आमच्या मनात जागृत झाली... आणि...
... आणि, आम्ही लगेच 'सर्च ऑपरेशन' पुढे युद्धस्तरावर नेण्याचे ठरविले. पहिल्यांदा आमचे तीन गट केले. मी आणि अमर साहेब एका गटात मातीच्या रस्त्याकडेला असणाऱ्या झाडीत, अंशुमन साहेब आणि प्रवीण गुरव मडिलगे फाट्याच्या रस्त्याच्या सुरवातीच्या टोकाला आणि प्रदीप आणखीन एकजण कोल्हापूर-गारगोटी रस्त्यावरील मडिलगे फाट्याच्या पुढे (गारगोटीच्या दिशेने) काहीशे मीटर अंतरावर अशी पटकन विभागणी केली गेली. आज आमच्याकडे दोन टॉर्च होते; पण दोन्हीही साधेच. त्यांच्या उजेडात फार काही स्पष्टपणे दिसण्याची शक्यता नव्हती. पण, आमचा उत्साह त्या उजेडाची उणीव भरून काढत होता. मी आणि अमर साहेबांनी जिथे तरस दिसण्याची जास्त शक्यता होती त्या झाडीत धाव घेतली. माझ्या उत्साहाला तर वेगळेच भरते आले होते. मी अमर साहेबांचा सल्ला धुडकावून त्या अंधारात दाट झाडीत जोरदारपणे घुसलो. अमर साहेब टॉर्चचा लाईट सर्वत्र टाकून तरसाचा मागोवा घेत होते. आणि अचानक त्यांनी टाकलेल्या प्रकाशात पट्टेरी किंवा ठिपकेदार काहीतरी दिसले. दाट अंधार आणि कमी उजेडाची टॉर्च असल्यामुळे ठिपके की पट्टे आणि प्राणी नक्की केवढ्या आकाराचा आहे याचा काही अंदाज येईना. मोठ्या आवाजाने प्राणी शक्यतो बुजत असल्यामुळे आम्हाला एकमेकांशी धड बोलताही येईना. आम्ही सगळेच अंधारात चाचपडत होतो. तरस हा शक्यतो फारसा घाबरणारा प्राणी नसून, थोडासा जरी irritate झाला तरी लगेचच आक्रमक अवतार धारण करू शकतो. (अस्वल आणि हत्ती हे आणखीन दोन असे जंगली प्राणी आहेत, जे आक्रमक व्हायला फारसा वेळ लागत नाहीत. त्यामुळे जंगल भ्रमंतीदरम्यान या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे कधीही श्रेयस्कर असते.) मी 'त्या' उजेडात दिसलेल्या प्राण्याचा माग काढत असतानाच एका झाडाची पडलेली मोठी फांदी आडवी आली आणि मी धडपडलो. नेमक्या त्याच वेळी डांबरी रस्त्याकडेला अंशुमन साहेब आणि प्रदीप यांना 'तो' प्राणी दिसला. त्याच्या तोंडात एखादा मोठा मांसाचा (किंवा आतड्याचा) तुकडा असल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जराही वेळ न दवडता अंधारात चाचपडतच 'त्या' प्राण्याला वरच्या बाजूला (म्हणजे आमच्याकडे) हुसकावले. आणि, मी जिथे धडपडलो होतो नेमका तिथेच 'तो' हुसकावलेला प्राणी पळत आला आणि माझ्यापासून फक्त ४-५ फुटांवर उभा ठाकला. अगदी त्याच क्षणी अमर साहेबांनी टाकलेला टॉर्चचा फोकस 'त्या' प्राण्याच्या अंगावर पडला. मी त्या प्राण्याच्या इतक्या जवळ उभा आहे हे लक्षात येताच अमर साहेब मोठ्याने ओरडले, "डॉक्टर, मागे या; मागे या... इतकी रिस्क घेऊ नका... तरस लगेच हल्ला करू शकतो... मागे व्हा." पण, मला कसलीच भीती वाटली नाही. 'त्या' प्राण्याने आम्हाला आधीच खूप दमवले होते. आता त्याला पहायचेच (आणि, जमले तर फोटोही काढायचे) हे मी मनोमन ठरवून टाकले होते.
'तो' प्राणी केवळ जवळ असल्यामुळे त्या अंधुक प्रकाशात मला त्याच्या आकाराचा थोडा अंदाज आला आणि मी पाहिलेल्या तरसापेक्षा हा प्राणी थोड्या कमी आकाराचा असल्याचे जाणवले. माझे मन साशंक झाले आणि मनात असंख्य विचारांनी फेर धरला, "हा नक्की तरसच आहे की जंगली कुत्रा आहे? तरस असेल तर हा 'तो' नव्हे जो आम्ही पहिल्यांदा तिथे पाहिला होता. मग, एकाच 'एरिया'त दोन तरस कसे? का, इथे त्यांची जोडी आहे? जंगली कुत्रा तर इथे दिसण्याची शक्यता नाही; एक तर जंगली कुत्रे एकेकटे फिरत नाहीत, त्यांची टोळी असते; शिवाय इथे गवताळ प्रदेश नाही. मग आम्हाला चकवा देणारा 'हा' प्राणी नक्की कोण? या भागात लांडगाही दिसत नाही आणि एकटा कोल्हा काही इतका वेळ इथे थांबणार नाही. तो भिऊन कधीच पळून गेला असता." एकाच वेळी मनात कितीतरी विचार येत होते. एकतर 'तो' प्राणी काही केल्या दिसता दिसत नव्हता. दिसला तरी नीटसा कळून येत नव्हता. सर्वांची चांगलीच दमछाक झाली होती. मी विचाराच्या तंद्रीत असतानाच प्रदीपचा आवाज आला, 'इकडे आलाय, इकडे आलाय.' पण, त्यांच्याकडे टॉर्च नव्हता. परंतु, एक नक्की होते की 'तो' तिथेच घुटमळत होता. आता 'त्या' प्राण्याला ट्रॅप (व्हिज्युअल ट्रॅप) करणे गरजेचे होते. आम्ही एकमेकांना काही सांगितले नाही; पण अशा ट्रेक्समध्ये सर्वांमध्ये एक 'कॉमन लँग्वेज' आणि 'अंडरस्टँडिंग' असते. ते नेमकेपणाने जमून आले आणि आम्ही आमचा फास आवळायला सुरू केले. 'त्या' प्राण्याला हुसकावून रस्त्यावर आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू झाले. तसा आम्हाला फार वेळ लागला नाही. वरची बाजू मी आणि अमर साहेबांनी लावून धरली होती; उजवीकडची बाजू प्रदीप आणि डावीकडची बाजू अंशुमन साहेबांनी लावून धरली. फक्त १० मिनिटांतच 'तो' प्राणी अक्षरशः रस्त्यावर आला. 'तो'ही पळूनपळून चांगलाच दमला असावा. रस्त्यावरून प्रवीणने आम्हाला हाक दिली, 'आलाय, आलाय. थांबलाय इथे.' आम्ही प्राणपणाने रस्त्याच्या दिशेने पळत सुटलो.
आम्ही पाचजण त्या 'तिट्टया'वर उभे होतो आणि 'तो' प्राणी तोंडात कसलीतरी पिशवीसारखी वस्तू घेऊन दमल्यामुळे शांतपणे तिथे उभा होता. रस्त्यावरील हॅलोजनचा प्रकाश सर्वत्र पसरला होता आणि त्यात 'तो' प्राणी आता नीटपणे दिसत होता. आम्ही एकदा 'त्या' प्राण्याकडे आणि एकदा एकमेकांच्या तोंडाकडे बघत होतो. बराच वेळ हेच चालू होते. 'तो' प्राणीही तेच करत होता. तो प्रत्येकाकडे आळीपाळीने बघत होता. त्याच्या तोंडात एक 'ब्राऊन' (तपकिरी) रंगाची प्लॅस्टिकची पिशवी होती. त्यात चिकन किंवा मटणाचे टाकलेले भाग असावेत. गाठ मारल्यामुळे 'त्या' प्राण्याला ती पिशवी उघडली नसावी आणि आतून मांसाचा वास येत असल्याने ती त्याच्याकडून सुटतही नव्हती. थोडा वेळ असा गेला आणि मी किंवा अमर साहेब म्हणालो असू, "अरे, कुत्रं आहे हे. तेही गावठी." खरेतर ते कुणीच कुणाला सांगायची गरज नव्हती. हॅलोजनच्या पिवळसर लाईटमध्ये गेल्या अडीच-तीन तासांपासून आमच्यासोबत 'ब्लॅक कॉमेडी' झाली होती. भटक्या कुत्र्यांच्या बरेच 'क्रॉस ब्रीड्स' होतात, त्यांपैकीच ही एक! हा ना तरस होता, ना कोल्हा, ना जंगली कुत्रा. दिवसभर इतस्ततः अन्नाच्या शोधात भटकणारे ते एक कुत्रे होते आणि रात्रभर तरसाच्या शोधात भटकणारे आम्ही!
जंगल ट्रेक्सचा अनुभव असल्याने एखादा प्राणी दिसणे, न दिसणे किंवा अचानकपणे समोर येणे आणि तितक्याच वेगाने गायब होणे या गोष्टींची आमच्या ग्रुपला चांगलीच सवय होती. त्यामुळे आम्ही फारसे निराश झालो नाही किंवा त्या शोधयात्रेचा परिणाम आम्ही फारसा गांभीर्याने घेतला नाही. क्षणार्धात आम्ही एकमेकांना टाळ्या देत हास्यविनोदात बुडालो. आम्ही मोहीम न थांबवता वर टेकडीकडे गेलो. रात्रीचे १२.३०-१.०० वाजलेले असतानाही सर्वांकडे आधीचीच उत्सुकता होती. जाताना आम्हाला एक इंडियन रॉबिन आणि दोन रातवा पक्षी जमिनीवर विश्रांती घेताना अगदी जवळून पाहता आले, एक काळा विंचू (black scorpion), चमकणारे कोळी आणि एक मेलेला नाग दिसले. पण, म्हणतात ना, ‘बूँद से गयी वो हौद से नहीं आती!’
अखेरीस पहाटेच्या वेळी आम्ही आपापल्या घरी पोहोचलो, 'आता पुढची मोहीम कधी करायची' याच विचारांत!
[© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी.(पेडियाट्रिक्स).
(© हा लेख कॉपीराईटेड असून लेखाचे सर्वाधिकार प्रस्तुत लेखकाकडे सुरक्षित.)
केवळ वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५
ब्लॉग- www.amittukarampatil.blogspot.com]
वाचलं आता.. खरंच थरारक अनुभव.. तरस दिसला नाही याचं वाईट वाटलं. उत्सुकता शेवटपर्यंत होती. भारी लिहिलयं सर 👌👍
ReplyDeleteखूप छान वर्णन केलंय.. जंगल भ्रमंतीला आपल्या सोबत जाण्याची खूप इच्छा आहे, बघू योग्य येतो का...
ReplyDeleteहाहा... नक्कीच..! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
Deletefelt amazing after reading this ....👌👌
ReplyDeleteWow! Thank you.
Deleteखूप छान
ReplyDeleteSir khup ch chhan lihilay...
ReplyDeleteEkdm mst
खुप छान लिखान , nice live description 👍🏻
ReplyDeleteThank you very much for your comment!
DeleteVery Good Narration…keep posting
ReplyDelete