तो ‘एक क्षण’! (Life is full of moments!)

 ‘तो एक क्षण..!’

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)


(मागील आठवड्यात कराडमधील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर औंधकर सर यांचे एस.टी.ची धडक बसून अपघाती निधन झाले. एका ‘क्षणा’त होत्याचे नव्हते झाले. सरांच्या अपघाताचे सी.सी.टी.व्ही. फुटेजही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ते २-३ वेळा पाहिल्यानंतर जे विचार माझ्या मनात आले ते थोडेसे ललित लेखाच्या स्वरुपात शब्दबद्ध करण्याचा हा मी छोटासा प्रयत्न केला आहे. लेख ललित प्रकारचा असल्यामुळे तो बराचसा कल्पनाशक्तीवर आधारित आहे; कृपया समजून घ्यावे.)



*सर*

(अपघातानंतर २-३ दिवस सर कोम्यात होते. त्यावेळी त्यांच्या अवचेतन मनात (subconscious mind) असे विचार तर आले नसतील ना!)

माझ्या अपघाताचा तो ‘एक क्षण’...

बसने धडक दिली तो ‘एक क्षण’...

मी चौकात पोहोचताच लाल सिग्नल हिरवा होण्याआधी केसरी (ऑरेंज) झाल्यामुळे “थांबू की जाऊ?” असा गोंधळ उडाला, तो ‘एक क्षण’...

मी माझ्या हॉस्पिटलमध्ये असताना दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये एक नवजात शिशू ‘गंभीर’ अवस्थेत असल्यामुळे मला तिकडे बोलावण्यासाठी आलेल्या त्या ‘कॉल’चा ‘एक क्षण’...

आज घरून बाहेर पडल्यावर लगेचच ‘आपण रोज वापरतो ते हेल्मेट’ विसरल्याची आठवण झालेला तो ‘एक क्षण’..!

आजच सकाळी मी कित्येक वर्षे नियमित व्यायाम करून माझी प्रकृती उत्तम ठेवल्याबद्दल पत्नीने केलेल्या कौतुकाचा ‘एक क्षण’...

एम.बी.बी.एस.ला असताना पुढे सहचारिणी बनलेली, पण तेव्हा ऐन विशीत असणारी ‘ही’ मुलगी पहिल्यांदाच ‘दिसली’ होती, तो ‘एक क्षण’...

आणि, लग्नाच्या वेळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना “पुढील सातही जन्म हिला साथ देईन” हे अग्नीच्या साक्षीने स्वतःलाच वचन दिले होते, तो ‘एक क्षण’...

पत्नीला पहिल्यांदाच प्रेमभराने कवेत घेतले तो ‘एक क्षण’...

आणि, आमच्या अखंड प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या आमच्या बाळाचा जन्म झाल्यावर त्याच्या नाजूक गालांवर माझे ओठ टेकवून त्याचा गोड पापा घेतला, तो ‘एक क्षण’...

एम.डी.ला प्रवेश मिळाल्यानंतर जेव्हा एका गंभीर बालकाला एकट्यानेच स्वतंत्रपणे ‘intubate’ करून व्हेंटिलेटरवर घेतले होते, तो ‘एक क्षण’...

आणि, ते बाळ पूर्ण बरे होऊन वर्षभराने परत भेटताना माझ्या डोळ्यांतून पहिल्यांदाच ‘आनंदाश्रू’ ओघळले होते, तो ‘एक क्षण’...

आई-वडिलांच्या आणि उत्तम गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे त्यावेळी प्रवेश मिळविण्यास कठीण असणाऱ्या एम.बी.बी.एस.च्या कोर्सला अॅडमिशन मिळाले होते, तो ‘एक क्षण’...

दहावीला सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे गुण मिळवून ‘बोर्डा’च्या यादीत आल्याचे मुख्याध्यापकांनी जाहीर केले होते, तो ‘एक क्षण’...

पहिल्या दिवशी शाळेत जाताना आईकडे मागे बघून रडलो तो ‘एक क्षण’...

पहिल्यांदा माझा मी न धरता चाललो तो ‘एक क्षण’...

आणि, पहिल्यांदाच मी ‘बाबा’ म्हणालो तो ‘एक क्षण’...

जन्माच्या वेळी पहिल्यांदाच रडलो तो ‘एक क्षण’...

चौऱ्याऐंशी लक्ष योनींतून फिरून अखेरीस मनुष्यकुळात जन्म घेतला, तो ‘एक क्षण’...

आणि, आत्ता अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असताना माझ्या झाकलेल्या डोळ्यांमागील विस्फारलेल्या बुब्बुळांतूनही अटळ असलेला ‘मृत्यू’ स्पष्टपणे दिसत असलेला हा ‘एक क्षण’!!!


*एस.टी. ड्रायव्हर*

इतकी वर्षे ड्रायव्हर म्हणून काम करूनही आयुष्यातला केवळ पहिलाच अपघात होण्याचा तो ‘एक क्षण’...

एका अपघातामुळे पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच जावे लागल्यावर, माझ्याकडे एखाद्या गुन्हेगारासारखे सर्वजण पाहत होते, तो ‘एक क्षण’...

आज सकाळी ड्यूटीवर आल्यावर सही करून ड्यूटी चार्ट घेऊन एस.टी. चालू केली तो ‘एक क्षण’...

आजच्या अपघातानंतर तर नव्हतीच; पण एस.टी.च्या संपात राजकारण्यांचा समावेश होताच जनतेची सहानुभूती जेव्हा आटून गेली, तो ‘एक क्षण’...

आज घरातून निघताना माझ्या छोट्या मुलीने माझ्या पायाला मारलेली मिठी मी सोडवली, तो ‘एक क्षण’...

“गाडी हळू चालवत जा रे; उगीच धांदरटपणा करत जाऊ नको,” असे माझी माय घरातून बाहेर पडताना नेहमी म्हणते, तो ‘एक क्षण’...

खूप दिवस बेरोजगारी आणि गरिबीचे चटके सोसून शेवटी एकदाची ‘मंडळा’त ड्रायव्हर म्हणून नोकरी लागली, तो ‘एक क्षण’...

दहावी काठावर पास झालो म्हणून वडिलांनी निकालाच्या दिवशी मला धो धो धुतला होता, तो ‘एक क्षण’...

शाळेची फी भरायला पैसे नव्हते; पण त्यामुळे शिक्षणच बंद पडू नये म्हणून मास्तरांनीच माझ्या परीक्षेची फी भरली होती, तो ‘एक क्षण’...

“शेतीत काय आलंय, नीट शाळा शिक आणि सरकारी नोकरीचं बघ,” असं आज्जा पोटतिडकीनं दरडावला होता, तो ‘एक क्षण’...

सहा पोरींच्या पाठीवर कुळाचा दिवा जन्माला आला म्हणून ‘दीपक’ हे नाव ठेवले, त्या बारशाचा तो ‘एक क्षण’...

आणि, आता अपघातानंतर एक निष्णात डॉक्टर आपल्या गाडीखाली चिरडला गेला म्हणून माझं संपूर्ण आयुष्यच पश्चात्तापाने अंधारून जात आहे, तो ‘एक क्षण’...


*‘क्षण’*

होत्याचे नव्हते करणारा; आणि नव्हत्याचे होते करणारा तो ‘एक क्षण’...

क्षणाक्षणांनी नटलेले आणि क्षणाक्षणांनी प्रभावित झालेले हे आयुष्य! कधीकधी एखाद्या क्षणाचे महत्त्व त्यावेळी लक्षात येतही नाही; पण नंतर त्याचे महत्त्व उमजते. 

मोठ्या सुखाच्या शोधात चाचपडत आयुष्य कंठण्यापेक्षा आयुष्यातल्या या छोट्या छोट्या क्षणांनी काहीवेळा होणारे दुःख आणि काहीवेळा मिळणारा आनंद हे दोन्हीही उपभोगायला आपण शिकायला हवे; कारण आपले आयुष्य हे अशाच अनंत कटुगोड क्षणांची एक अखंडित मालिकाच आहे!!!

बऱ्याचदा क्षणिक (सिद्ध झालेलं हे) आयुष्य व्यतित करण्याच्या नादात आपलं छोट्या छोट्या क्षणांतलं ‘समृद्ध’ ‘जगणं’च कोठेतरी राहून जातं..!



(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,

एम.बी.बी.एस., एम.डी. (बालरोग चिकित्साशास्त्र)

मोबा. 8329381615,

www.dramittukarampatil.blogspot.com)

(टीप: लेखात घेतलेल्या सर्व इमेजेस या इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या आहेत. त्यांचे श्रेय संबंधित कलाकारांचे आहे.)

Comments

  1. लेख जरी ललित प्रकारचा असला तरी खूप अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे.. त्या दोन्ही पात्रांचा डॉक्टर आणि ड्रायवर संपूर्ण आयुष्यातील घटनाक्रम व्यक्त केल्यासारखं वाटतं... माणसाच्या आयुष्यातील कोणता क्षण अखेरचा असेल हे सांगणं खूप कठीण आहे...

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच हृदयस्पर्शी आहे.सहृदयी आणि ईतरांचं मन, दुःख जाणणाराच असं लिहू शकतो.असच लेखन सुरु असू द्या डाॕ.अमीत.

      Delete

Post a Comment