अनपेक्षितपणे गवसलेले ताणतणाव व्यवस्थापनाचे सोपे तत्त्वज्ञान... (Simple way to stress management)
अनपेक्षितपणे गवसलेले ताणतणाव व्यवस्थापनाचे सोपे तत्त्वज्ञान...
(© लेखक- डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
गेल्या काही दिवसांत माझ्या आयुष्यात तीन वेगवेगळ्या गोष्टी घडल्या; एक ऐकलेली, एक पाहिलेली आणि एक अनुभवलेली!
आपल्या आयुष्यातला प्रत्येक दिवस नवीन असतो; नवनवीन अनुभवांनी भरलेला आणि भारलेला असतो. आपल्याला रोज काही ना काहीतरी शिकायला मिळत असते. मागच्या रविवारी तसंच काहीसं घडलं. कधीकधी लौकिकार्थाने छोटी असलेली माणसं किंवा लहानसे प्रसंगही आपल्यासारख्या संवेदनशील माणसांना बऱ्याच मोठ्या गोष्टी शिकवून जातात. पहा, कसं ते.
गोष्ट पहिली- ऐकलेली...
मागच्या शनिवारी दुपारी माझ्या एका वरिष्ठ सहकाऱ्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, आणि रात्री उशिरा थेट त्यांच्या निधनाचीच बातमी कळाली. ते सहकारी माझ्या काही खास परिचयाचे नव्हते; पण माझ्याच विभागातील ते एक अधिकारी असल्याने मला धक्का तर नक्कीच बसला. बराच वेळ हळहळलोही.
बरीच माणसं अशी अचानक काहीही न ठरवता, कोणत्याही नियोजनाशिवाय जग सोडून जातात. अर्थात, ‘आपल्याला कशाला काय होतंय’ हा अतिआत्मविश्वासही त्यापाठीमागे असतो. (माणसाला त्याची जग सोडून जाण्याची वेळ ठरवता न येणे हे माणसापेक्षा निसर्ग कायम दोन-चार अंगुळे वरचढ असल्याचेच निदर्शक आहे, नाही का!)
आमच्या ग्रुपवर सर ‘गेल्याचा’ वॉट्सॲप संदेश आला, आणि तेवढ्या उशिरा रात्री अक्षरशः पावणेबारा वाजता माझे जवळचे मित्र डॉ. सुदर्शन खराटे सरांचा मला फोन आला.
“सर, मेसेज वाचला का? सर गेले. माझ्या ओळखीचे होते. मधली काही वर्षे ते मराठवाड्यात होते. अगदी आत्ता आत्ताच सर आपल्या जिल्ह्यात आले होते. चांगले होते,” खराटे सर म्हणाले.
“होय काय, सर? ते काही माझ्या ओळखीचे नव्हते; पण वाईट झाले,” मी म्हणालो, “कुणाची कसलीही गॅरंटी नाही, सर. कुणीही केव्हाही हे जग सोडून जाऊ शकतो. आपण उगीचच आयुष्यभर ‘मी हे करेन, ते करेन. माझं असं, माझं तसं,’ वगैरे करत राहतो.”
“हो ना. पण, काय कारण असेल? हल्ली आपल्याला पण खूप ‘स्ट्रेस’ असतो, सर. तसा सागळ्यांनाच आजकाल स्ट्रेस असतो; पण डॉक्टरांना जरा जास्तच!” सर म्हणाले.
मी लगेचच म्हणालो, “खरंय, सर. पण, त्यातही खरी अडचण म्हणजे, आपण स्वतः डॉक्टर असल्यामुळे आपल्याला ‘स्ट्रेस, टेन्शन’ वगैरेंचे दुष्परिणाम माहिती असूनही आपण परिस्थितीपुढे हतबल होतो. तरी मी बराच ‘रिलॅक्स’ रहायचा प्रयत्न करतो, तर त्यालाही काही लोक नावे ठेवतात.”
”हम्म्म्... पण, आजकाल का इतका स्ट्रेस वाढला असेल? पूर्वीचे लोक पण अवघड परिस्थितीत, टोकाच्या गरिबीत, पुरेशा संसाधनांशिवाय, पूर्ण शिक्षण-नोकरीशिवाय जगायचेच की! उलट ‘क्वालिटी’ आयुष्य जगायचे. आता काय झालं असेल... काय वाटतं तुम्हाला?”
“स्वतःकडून अति-अपेक्षा; पूर्णत्वाला पोहोचू न शकणारी ध्येये; आर्थिक सुबत्तेचा हव्यास, त्यासाठीची फरपट, २४ तास फक्त पैसा आणि पैशांचाच विचार... ‘हे पाहिजे, ते पाहिजे, अजून एक घर पाहिजे, अजून मोठी गाडी पाहिजे’, आत्ता जे यश मिळालं आहे त्यापेक्षाही मोठे यश मिळाले पाहिजे यासाठीची ओढाताण.. सतत असमाधान... सतत काहीतरी ‘मिळवायची’ हाव... आणि हो, पुढ्यात आलेला क्षण आनंदात न जगता सतत उद्याचा, परवाचा, तेरवाचा, भविष्याचा विचार... बाकी काही नाही..,” मी त्वेषात बोललो.
“हो, ते तर आहेच. पण मग यावर उपाय काय? का असंच आयुष्य घालवायचं आपण?” सर म्हणाले.
गोष्ट दुसरी- पाहिलेली...
मी, माझी पत्नी, मुलगा आणि माझे आई-वडील अंजनीहून कोल्हापूरला येत होतो. गाडीत गाणी ऐकण्याचा कंटाळा आला होता, म्हणून ‘वेगळं काहीतरी’ ऐकण्याचा विचार केला.
हल्ली यूट्यूबवर बरेच ‘टॉक शो’ ऐकायला-पहायला मिळतात; आणि त्यातले बव्हंशी तद्दन फालतू असतात. पण, वाळवंटात कधीकधी एखादे ‘ओॲसिस’ दिसते. सौमित्र पोटे यांच्या मराठीतील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात ‘ऑफिसमधल्या तणावाचं करायचं काय?’ या विषयावर बोलण्यासाठी या विषयातील तज्ज्ञ म्हणून नावाजलेले आनंद कुलकर्णी एकदा आले होते. Stress management वर बोलताना त्यांनी बरेच मुद्दे मांडले होते.
चर्चेत बोलता बोलता ‘कितीतरी Ambitious आणि so called successful लोकांच्या personal life ची लक्तरे होताना मी पाहिली आहेत,’ हे वाक्य कुलकर्णींनी ‘शो’च्या ट्रेलरमध्येच सांगितले होते. शिवाय, ‘corporate trend’च्या नावाखाली नको त्या गोष्टी नको त्या प्रमाणात करण्याचे, सतत ऑनलाईन राहण्याचे जे फॅड आले आहे त्यावरही त्यांनी कोरडे ओढले आहेत. विशेष म्हणजे, हल्लीच्या लोकांना ‘ताण (stress) म्हणजे नक्की काय?’ किंवा ‘आपण स्वतः ताणग्रस्त आयुष्य (stressful life) जगत आहोत का?’ या अगदी मूलभूत (basics) प्रश्नांचीही जाण नसते असेही त्यांचे निरीक्षण आहे. यामुळे ‘ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे?’ इथपर्यंत लोक पोहोचतच नाहीत आणि ते frustration किंवा depression (विमनस्कता)ला बळी पडतात. लोक रोज या शब्दांचा सर्रास वापर करतात; पण त्यांचं नक्की करायचं काय किंवा मुळात ‘आयुष्यात ताणतणाव का येतो?’ या प्रश्नांना मग ते भिडतच नाहीत असेही आनंद कुलकर्णी यांनी यात पुढे सांगितले आहे.
शिवाय, हल्लीचे जीवन इतके ताणतणावग्रस्त होण्यामागच्या कारणांचीही त्यांनी या ‘शो’मध्ये मीमांसा केली आहे. तज्ज्ञांच्या मते लोकांच्या आयुष्यात आजकाल ताणतणाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या आयुष्याकडून वाढलेल्या अपेक्षा! एक तर ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ हे हक्काने सांगणारे कुणी आजकाल भेटत नाही, किंवा भेटले तरी त्यांचे ऐकण्याचे धैर्य कुणात नाही. अगदीच ‘ठेविले अनंते’ असे म्हणून काहीच हालचाल न करता आयुष्य व्यतित करणे अपेक्षित नसले किंवा वैयक्तिक आणि सामाजिक प्रगतीचा विचार करणे आवश्यक असले तरी ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हे मात्र अपेक्षितच नाही, तर आवश्यक बनले आहे. सतत काही ना काही भौतिक सुखांची प्राप्ती करण्याच्या नादात माणसं स्वतःचं अपरिमित शारीरिक आणि मानसिक नुकसान करून घेतात. जगरहाटीत सर्वांच्या पुढे पळण्याच्या नादात आपल्या हातून एकेक महत्त्वाच्या गोष्टी कशा निसटून जातात हे आपल्या लक्षातही येत नाही. अखंड धावपळीच्या नादात आजकाल आपले छंद जपणे, स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी आणि व्यायामासाठी दिवसातून किमान एक तास देणे, आपल्या कुटुंबाला ‘दररोज’ पुरेसा वेळ देणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दिवसातला किमान थोडा वेळ तरी स्वतःशी हितगुज करण्यासाठी देणे या सर्व गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत राहतो. एका मर्यादेपर्यंत आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी माणूस काही शांत बसत नाही. त्याला सतत आणखीन काहीतरी हवेच असते. टू बीएचकेचा फोर बीएचके, टू व्हीलरची फोर व्हीलर, मुलांना पदवी शिक्षणासाठी परदेशी पाठवणे, मुलांची इच्छा असो वा नसो, पण डोनेशन भरून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविणे, लग्न-रिसेप्शनसाठी भलामोठा खर्च करणे, फिरायला परदेशीच जाणे अशी आशा-आकांक्षाची न संपणारी जंत्रीच हल्ली तयार असते. शिवाय, व्यावसायिक यशाची नवनवीन शिखरे गाठण्याची सुप्त किंवा उघड इच्छा आणि कधीकधी त्याबाबतीत सहकाऱ्यांशी ईर्षाही कायम असते.
कोणत्याही गोष्टींमुळे समाधानी न होता माणूस ‘सुखी माणसाचा सदरा शोधत’ संपूर्ण आयुष्य खर्ची पाडतो; आणि तरीही कधीच सुखी होत नाही- तणावमुक्त होत नाही.
गोष्ट तिसरी- अनुभवलेली...
मागच्या रविवारी मी अगदी ठरवून भुईबावड्यातल्या ‘श्री रवळनाथा’च्या मंदिरात गेलो होतो. एकदाच गेलो असलो तरी माझी काही जागांशी आधीपासूनची कायमची attachment असावी असे मला सतत वाटत राहते; आणि मग त्या ठिकाणांना मी परत परत भेटी देत राहतो. (कदाचित माझ्या तणावाच्या व्यवस्थापनच्या अनेक मार्गांपैकी हा एक मार्ग असावा.) तर, त्यादिवशी मी ‘रवळनाथा’ला गेलो होतो.
भुईबावड्यातले हे मंदीर गावाच्या अलीकडे गावापासून थोडे अलग स्थित आहे. हे मंदीर छोटेखानी असले तरी टुमदार आणि typically कोकणी पद्धतीचे आहे. मंदिराच्या आवारात खूप वृक्षवेली असून समोरच मोरे राजघराण्याची स्मारके (थडगी) आहेत. आम्ही गेलो तेव्हा मंदीर पूर्ण रिकामे होते. मी आणि माझा मित्र एकनाथ कांबळे असे आम्ही दोघेच तिथे होतो. देवदर्शन झाल्यावर नेहमीप्रमाणे जवळपास जरा काही फुले, पक्षी, साप वगैरे दिसतात का याचा आम्ही धांडोळा घेतला.
जवळच्याच एका उंच झाडाच्या शेंड्याला बसून ‘मोठा धनेश’ (Great hornbill) पक्षी कर्कश्श आवाजात ओरडत होता.
“मोठा गरूड आहे तो,” तिथे म्हशी चरायला आलेले एक आजोबा म्हणाले, “खूप दंगा करतात.”
“गरूड नाही तो, आजोबा; त्याला ‘धनेश पक्षी’ किंवा ‘हॉर्नबिल’ म्हणतात,” मी त्यांच्या ज्ञानात भर घातली.
“असेल, असेल... आम्ही कोकणात त्याला गरूडच म्हणतो,” आजोबा किल्ला लढवत राहिले.
गंमत म्हणजे, ते आजोबा किंवा मी, आम्हा दोघांनाही एकमेकांच्या बोलण्याचा किंवा ठामपणाचा कसलाही राग आला नाही.
“बरं झालं ‘रवळनाथा’च्या दर्शानाला आला. आमचा ‘रवळनाथ’ जागृत देवस्थान आहे. सगळ्यांचं संरक्षण करतो तो,” आजोबा सांगत होते.
“कुठून आला तुम्ही? बोलण्यावरून तरी घाटावरचे वाटता,” आजोबांनी बरोबर अंदाज बांधला.
“आम्ही कोल्हापूरचे, गगनबावड्यात नोकरीला असतो,” एकनाथनी आजोबांना माहिती दिली.
“हो, मला वाटलंच. असू दे, बरं झालं इथं आला ते. ‘रवळनाथा’ची कृपा राहील तुमच्यावर,” ते म्हणाले.
“या म्हशी तुमच्या काय?” एकनाथनी विचारले.
“होय, सगळ्या म्हशी माझ्याच. सहाच्या सहा घरच्याच आहेत, एक पण विकत आणलेली नाही. ४० वर्षे झाली, मी इथे म्हशी चरायला घेऊन येतो. म्हशी चरेपर्यंत मंदिराची स्वच्छता करतो. तेवढंच बरं वाटतं. शिवाय, तुमच्यासारखी बाहेरगावची माणसं पण भेटतात कधी कधी,” आजोबा समाधानाने सांगत होते.
आजोबा पुढे स्वतःच उत्साहाने सांगत राहिले, “मी काही मंदिराचा सेवक वगैरे नाही किंवा मला काही पगार वगैरे मिळत नाही. मीच आपला करतो काम. तेवढीच ‘रवळनाथा’ची सेवा घडते.”
“अरे वा! मस्त वाटलं ऐकून,” मी म्हणालो.
“हो, आमचा ‘रवळनाथ’ आम्हाला काही कमी पडू देत नाही. कृपा आहे त्यांची आमच्यावर,” टिपिकल कोकणी हाप पँट आणि थोडी ठिगळं लावलेला सदरा घातलेले आजोबा म्हणाले.
“हे तर वेगळं रसायन दिसतंय, एकनाथ,” मी उद्गारलो.
“आजोबा, नाव काय तुमचं?” आम्ही विचारले.
“बिले... *** *** बिले माझं नाव. इथंच राहतो मी, त्या रवळनाथाच्या कमानीच्या उजव्या बाजूला,” आजोबा उत्तरले, “खूप अनुभव आहेत माझे इथे. एक- दोन सांगतो.” (आजोबांचे संपूर्ण नाव मुद्दामच दिलेले नाही.)
आता आमची उत्सुकता पण ताणली होती. आम्हीही नकळतपणे त्या प्रसंगात सहभागी होऊन गेलो होतो.
पण, त्यानंतर बिले आजोबांनी जे सांगितले ते ऐकून आम्ही दोघेही सकारात्मकरीत्या अवाक झालो.
आजोबा म्हणाले, “मी त्यांना म्हणालो, ‘‘रवळनाथा’च्या कृपेने चार म्हशी आहेत माझ्याकडे. दोन्ही मुले कामधंद्याला लागली आहेत. इतका श्रीमंत आहे मी, आता तुम्ही मला आणखी काय देणार! भरभरून पुरेल इतकं आहे माझ्याकडे’... आणि महत्त्वाचं म्हणजे, मी पूर्ण समाधानी आहे. आता काहीही नको आहे मला. ‘रवळनाथा’ची सेवा करत रहायचे, आणि त्याचाच सांगावा आला की शांतपणे निघून जायचं.” (त्यांचा एक मुलगा एका खाजगी गाडीवर ड्रायव्हरचे काम करतो, तर दुसऱ्याचे पुढे उंबर्ड्यात कसलेसे छोटे दुकान आहे.)
“... लाखो माणसं रोज जन्माला येतात; लाखो मरतात. एकदा का आपण हे जग सोडले की मग आपला कशाशी कशाचा कसलाही संबंध राहत नाही. मेल्यावर आपले श्राद्ध घातले काय किंवा नाही काय; किंवा आपला फोटो कुणी लावला काय किंवा नाही काय... अशा गोष्टींनी फरक पडण्याच्या पलीकडे आपण पोहोचलेलो असतो, नाही का!” आम्ही शुद्ध हरपून फक्त एकेक शब्द ऐकत होतो.
“चला, येतो. अकरा वाजले. जायला पाहिजे घरी. म्हशींना याच वेळेची सवय आहे. या परत,” आजोबांच्या शब्दांनी मी आणि एकनाथ भानावर आलो.
Stress management ची हजारो पुस्तके वाचून एखाद्याला जे आकळणार नाही, ते या रुढार्थाने अशिक्षित समजल्या जाणाऱ्या आजोबांनी एक-दोन मिनिटांत आम्हाला समजावून सांगितले होते; तेही अखंड कृपेचा स्त्रोत असणाऱ्या त्या ‘श्री रवळनाथा’च्या साक्षीने, त्याच्याच मंदिरात..!
आजोबा म्हणाले होते त्याप्रमाणे खरेच ‘श्री रवळनाथ’ आम्हाला आज पावले होते... की, ‘श्री रवळनाथ’च त्या आजोबांच्या तोंडून आम्हाला समाधानी जीवन जगण्याचे यशस्वी तत्त्वज्ञान सांगते झाले होते, हे ‘श्री रवळनाथ’च जाणो..!
आम्ही मात्र भरून पावलो होतो हे मात्र खरे!!!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस., एम.डी.)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)
(वॉट्सॲप संपर्क- 8329381615)
(www.dramittukarampatil.blogspot.in)
(Disclaimer- वरील लेखातील काही छायाचित्रे ही ‘गुगल’वरून download केलेली आहेत. या फोटो किंवा चित्रांचे क्रेडिट मूळ कलाकारांचे आहे.)
Very nice Sir🙏
ReplyDeleteThank you very much!
DeleteGood evening sir, sir pan tan tanav gharwale pan detat.koni pan asude
ReplyDeleteत्यातून मार्ग काढणे हीसुद्धा एक कला आहे!
DeleteThree stories are touching sir
ReplyDeleteThanks. Hope you liked those.
Deleteवास्तवाशी निगडित आहे. स्पर्धा हा याचा मूळ आहे. बुद्ध विचार याच उपाय आहेत.
ReplyDeleteउपाय
आपले निरीक्षण योग्य आहे. बुद्धविचार हा अनेक प्रश्नांचे उत्तर आहे.
DeleteStress Management.... प्रवासाला असे बिनधास्त निघायचे व अनुभव घ्यायचे हे पण येतेच.... छान मांडणी...
ReplyDeleteधन्यवाद, सर! प्रवास हा ताणतणाव व्यवस्थापनाच्या अशोक यशस्वी मार्गांपैकी एक मार्ग आहे.
Deleteआंनद आणि समाधानी आयुष्य जगावे
ReplyDeleteबरोबर. आपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहे.
DeleteDestressing Story .... Nicely Penned. But implementation is important. Keep Writing...
ReplyDeleteThanks a lot, Dr. Ravi. Hope we will be successful enough to implement this in our life!
Deleteखूपच छान सर माणसानी तणाव मुक्त राहणे हेच खरं औषधं आहे धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻💐
ReplyDeleteहो, पण तणावमुक्त राहणे ही आजकाल मोठी अवघड गोष्ट बनून गेली आहे.
Deleteआपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहे!
Deleteसुरेख, सर खूप शिकण्याजोग्या गोष्टी आजूबाजूला घडत असतात, समजून घेण्याच्या तुमच्या कुवतीला असंख्य प्रणाम 🙏
ReplyDeleteआपल्या इतक्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार, सर!
Deleteसुंदर 👌👌👌
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!
Deleteअनुभव नेहमीच तुम्हाला काही तरी सांगून जातो आणि नेमका तोच तुमचा अनुभव stress kami करायचं गुपित सांगून गेला.डॉ.अमित खूप छान लिहाल आहे त्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं थोडेच आहे
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया खूप उत्साहवर्धक आहे. धन्यवाद!
Deleteसर, ताणतणाव बद्दल सुंदर अनुभव कथन केला. खरं म्हणजे आयुष्यात समाधानी राहणं हेच तणावमुक्त जगण्यासाठी योग्य आहे असं मला वाटते.असेच लेखन करा सर वाचायला आवडेल
ReplyDeleteआपल्या उत्साहवर्धक प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
DeleteKhup sundar lekh.
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेसाठी आभारी आहे!
Deleteअप्रतिम लेख सर
ReplyDeleteखूप खूप आभार!
Deleteछान लेख आहे दादा 👌
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद!
Deleteअप्रतिम जीवनाच वास्तू आपण एका क्षणामध्ये डोळ्यासमोर मांडलं धन्यवाद
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!
DeleteVery nice 👍
ReplyDeleteThank you!
DeleteKhup Must 👍 👍 Dhanyawad 🙏
ReplyDeleteThank you very much!
Deleteखूप सुंदर, वास्तव्यजीवनाला धरून आणि विचार प्रबोधनपर लेख आहे सर . माणसाने आजकाळ स्ट्रेस हा शब्द जरा जपूनच घ्यावं व त्याचे योग्य व्यवस्थापण करणे गरजेचे आहे. अन्यथा हा स्ट्रेस जर out लुक केले नाही तर आहे नाही ते सर्वं जाईल आणि पश्ताताप व काही वेळेस मृत्यू ही गाठील.खूप उत्तम लेख आहे. यातून नक्कीच मार्गदर्शन मिळेल.
ReplyDeleteआपली प्रतिक्रिया खूप सुंदर, वास्तववादी व बोलकी आहे. धन्यवाद!
Deleteखूप सुंदर व वास्तववादी वर्णन...माझा सिंधुदुर्ग मधील रमणीय शासकीय कालावधी आठवला..
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद! कोकण आहेच रमणीय आणि सुंदर!
ReplyDeleteKhuup ch chhan Sir.. mind sorted zalya sarkh feel hot ahe.. hat's off to ur writing skill 👏
ReplyDeleteThan you very much!
Delete