अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ आणि भारतीय समाजमनावरील परिणाम (Amitabh Bachchan’s “Angry Young Man” and Its Impact on the Indian Social Psyche)

अमिताभचा ‘अँग्री यंग मॅन’ आणि भारतीय समाजमनावरील परिणाम

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)



* सिनेमाचा समाजमनावरील परिणाम-

‘आपली मुले आपले (म्हणजे, मोठ्यांचे) अनुकरण करतात’ हे बालमानसशास्त्रज्ञांनी सांगून सांगून झिजलेले वाक्य आहे. माझा मुलगा अद्विक हा आत्ता साडेचार-पावणेपाच वर्षांचा असल्यामुळे या वाक्याचा मला वारंवार अनुभव येत असतो. दोन-तीन आठवड्यांपूर्वी सहज एक पाच-दहा मिनिटे दूरचित्रवाणीवर एक कार्यक्रम पाहत मी बसलो होतो. शेजारी अद्विकही बसला होता. नेमका अमिताभ बच्चन यांच्या ‘दीवार’ चित्रपटातील ‘पीटर... तुम मुझे उधर ढूँढ रहे हो और मैं तुम्हारा यहाँ इंतज़ार कर रहा हूँ...’ वाला सीन चालू होता. (अद्विक ओळखू लागलेला पहिला सेलिब्रिटी आणि अभिनेता अमिताभ बच्चनच आहे हे विशेष!) सीन झाला. मध्ये काही दिवस गेले. एका रविवारी अद्विकबरोबर खेळत असताना अचानक अद्विक म्हणाला, “बाबा, चला आपण अमित बच्चन (अद्विकचा उच्चार) खेळूया. मी अमित बच्चन आणि तुम्ही ते गुंड. तुम्ही आधी मला मारा, मग मी नंतर तुम्हाला मारतो.” मला थोडासा धक्का बसला. 

इतक्या कमी वयातल्या मुलांवर सिनेमाचा किंवा त्यातील एखाद्या व्यक्तिरेखेचा इतका जास्त प्रभाव पडत असेल असे मला वाटत नव्हते.  





* विषयाची व्याप्ती-
‘कीर्तनाने महाराष्ट्र सुधारला नाही आणि लावणीने तो बिघडला नाही’ हे कळत्या वयापासून ऐकलेले वाक्य! हे खरे आहे की खोटे याची मला कल्पना नाही; पण सिनेमा आणि समाजावरील त्यांचे परिणाम यांबद्दल मात्र बऱ्याच मोठ्या प्रभृतींनी जे उद्गार काढले आहेत, त्यांपैकी काही इथे उद्धृत करतो.

‘चित्रपट हा समाजाचा आरसा आहे.’

‘एखाद्या देशाला जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशात बनणारे चित्रपट पहा.’

‘चित्रपट ही अशी भाषा आहे, जिच्यात आपण आपल्या वास्तवाला आणि स्वप्नांना एकत्रितपणे व्यक्त करतो.’ (फेडरिको फेलिनी)

‘चित्रपट हे सत्याची २४ फ्रेम्स प्रति सेकंद मोजमाप आहे.’ (जीन ल्यूक गॉदार्ड)

‘चित्रपट म्हणजे फ्रेममधील गोष्टी आणि फ्रेमबाहेरच्या गोष्टींची निवड.’ अर्थात, चित्रपटात काय दाखवायचे नाही, आणि काय दाखवायचे हे तिथल्या सामाजिक वातावरणानुसार ठरते. (मार्टिन स्कॉर्सेसी)

त्यामुळे सिनेमाच्या जनमाणसावरील परिणामांबद्दल थोरामोठ्यांचे विचारही एकसारखे नाहीत; उलट काही विचार तर एकदम परस्परविरोधीही आहेत.

शिवाय, सिनेमांचा समाजमनावर प्रभाव पडतो की, समाजाचा आणि त्यातील लोक व विचारधारांचा सिनेमांवर प्रभाव पडतो हाही थोडा वादाचा मुद्दा ठरू शकतो. तरीही समाजमनाला विशिष्ट चेहरा नसतो आणि अमिताभसारख्या महान अभिनेत्याच्या ‘सेलेब्रिटी’ स्टेटसमुळे त्याचा समाजावर होणारा परिणाम जास्त जाणवण्यायोग्य ठरतो, हेही तितकेच खरे!


* अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे निमित्त-
दरवर्षी ११ ऑक्टोबर रोजी ‘बिग बीं’चा वाढदिवस असतो आणि त्यादिवशी मी त्यांच्यावर एखादा छोटेखानी का असेना, पण लेख लिहीत असतो. त्यांपैकी बरेच लेख व्हायरल झाल्यामुळे त्यावर वाचकांच्या विविध प्रतिक्रिया येतात. गेल्या वर्षीच्या लेखानंतर माझ्या एका मित्राने मला अशी प्रतिक्रिया दिली की, ”तू नेहमी बच्चन साहेबांबद्दल छान-छानच लिहितोस. एक फॅन म्हणून ते योग्य असेलही; पण तू एकदा त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे समाजावर झालेल्या नकारात्मक परिणामांबद्दल एखादा लेख का लिहीत नाहीस? जोपर्यंत तुम्ही ही दुसरी बाजू समाजासमोर उलगडून दाखवत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या भूमिकांतील व्यक्तिमत्त्वाला पूर्ण न्याय दिला आहे असे मानता येणार नाही.”

मित्राचा घाव मला वर्मी लागला. मी कधी या दुसऱ्या बाजूचा विचारच केला नव्हता. पण, मी ज्याक्षणी त्याचे म्हणणे ऐकले, त्याच क्षणी मी पुढच्या वर्षी या बाजूबद्दल लिहायचे हे ठरवून टाकले.


* अमिताभच्या अभिनयाची दुसरी बाजू-
यावर्षीचा लेखप्रपंच त्या ‘दुसऱ्या बाजू’च्या अनुषंगाने...

अमिताभ बच्चन यांचा उदय होण्याआधी बॉलीवूडवर राज्य करणारे प्रमुख ‘नायक (हिरो)’ आणि त्यांच्या भूमिकांची वैशिष्ट्ये-

अमिताभ बच्चनच्या उदयाआधी (७० च्या दशकापूर्वी) हिंदी चित्रपटसृष्टीतील नायक म्हणजे भारतीय समाजाच्या आशा, मूल्ये आणि स्वप्नांचे प्रतिबिंब होते. त्या काळातील ‘हिरो’ हे प्रामुख्याने आदर्शवादी, प्रेमळ, त्यागी आणि नैतिकतेचा पुरस्कार करणारे होते. थोडक्यात पाहूया –

१. राज कपूर–
‘सामान्य माणूस’ (common man) मानला गेलेला नायक.

सर्वसामान्य माणसाच्या मनातील स्वप्नाळू नायक; ज्यांनी निरागस, गरीब पण अंत:करणाने प्रामाणिक अशा सामान्य माणसाच्या भूमिका चित्रपटांतून साकारल्या.

आशा, प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारा कलाकार अशी त्यांची चित्रपटीय प्रतिमा होती. (आवारा, श्री ४२० इत्यादी)

२. दिलीप कुमार–
शोकात्म नायक (tragic hero) अशी ओळख.

त्यांनी केलेल्या भूमिका या संवेदनशील, अंतर्मुख आणि विरहाने विदीर्ण झालेल्या सोशिक माणसाच्या किंवा प्रियकराच्या आहेत. (देवदास, मधुमती इत्यादी).

त्यांच्या भूमिकांनी अभिनयाला भावनिक आणि मानसशास्त्रीय खोली दिली; शिवाय समाजातील वेदना आणि नैतिक संघर्षांचे प्रतीक अशीही आहे.


३. देव आनंद–
आधुनिक, बंडखोर आणि रोमँटिक नायकाची प्रतिमा.

त्यांनी साकारलेल्या भूमिका या आत्मविश्वासू, आकर्षक व्यक्तिमत्त्वाच्या आणि शहरी युवकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. (गाईड, ज्वेल थीफ इत्यादी).

नव्या भारतातील स्वातंत्र्यप्रेमी आणि आशावादी युवकांचे प्रतीक या स्वरुपांत या भूमिका पाहता येतील.


४. मनोज कुमार / राजेंद्र कुमार / भारत भूषण–
देशभक्त आणि त्यागी नायक अशा प्रतिमा.
कुटुंब, देश आणि धर्म यांसाठी सर्वस्व अर्पण करणारी पात्रे त्यांनी त्यांच्या भूमिकांमधून साकारली आहेत. (उपकार, पूरब और पश्चिम इत्यादी).

पारंपरिक मूल्ये, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा जपणाऱ्या नायकांची प्रतिमा त्यांनी निर्माण केली.

५. राजेश खन्ना–
भारताचा पहिला सुपरस्टार.

प्रेमळ, रोमँटिक आणि भावनाप्रधान नायकांच्या भूमिका त्यांनी साकारल्या. (आनंद, आराधना, अमर प्रेम इत्यादी).

त्याने प्रेम आणि भावना यांना त्याच्या चित्रपटीय भूमिकांमधून एका वेगळ्याच उंचीवर नेले आणि अमिताभच्या आगमनापूर्वी तोच भारतीय स्वप्नांचा चेहरा होता.

यापेक्षाही अन्यही बरेच कलाकार बॉलीवूडमध्ये होऊन गेले आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी भारतीय जनमानसावर बरेवाईट परिणाम केले.


*अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध चित्रपट आणि त्यात त्यांनी साकारलेल्या ‘अँग्री यंग मॅन’ छापाच्या भूमिका-

अमिताभ बच्चन यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या भूमिका आणि त्यांनी समाजमनावर सोडलेली छाप यांचा थोडक्यात अभ्यास केला असता, मला खालीलप्रमाणे निरीक्षणे सापडली.

१. जंजीर: कायदेशीर चौकटींमुळे येणाऱ्या जबाबदारीच्या विरुद्ध बंड...



‘जंजीर’मधील विजय हा नायक जरी पोलिस असला, तरी त्याची भूमिका अनेकदा कायद्याच्या चौकटीपलीकडे जाते. (न्याय मिळविण्यासाठी किंवा देण्यासाठी ही कृती योग्य ठरवली जावी की अयोग्य हा नंतरचा प्रश्न आहे. खरेतर, खऱ्या आयुष्याचा विचार करता ती अयोग्यच!)
चित्रपटातील एका दृश्यात तो गुन्हेगाराला थेट गोळी घालतो आणि नंतर शांतपणे सिगारेट शिलगावतो.
हे दृश्य (scene) तत्कालीन भारतीय युवकांसाठी प्रतीक (iconic) बनलाही असेल; पण त्याचे दूरगामी परिणाम मात्र वेगळे झाले असणार.
‘संयम हा कमकुवतपणा आहे, आक्रमकता म्हणजेच पुरुषत्व’ अशी छाप ही भूमिका सोडते. त्यामुळे, युवकांना चिडणे, रागावणे, नियम तोडणे या गोष्टी (हल्लीच्या भाषेत बोलायचे तर) ‘कूल’ वाटू लागल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रागाचा हा आविष्कार इतका प्रभावी ठरत गेला की, ‘शब्दाऐवजी आवाजा’चे महत्त्व वाढू लागले.

२. दीवार: गुन्हेगारीचे नैतिकीकरण...




‘दीवार’मध्ये विजय आपल्या आईवर प्रेम करतो, पण त्या नादात तो आई आणि समाज या दोन्हींवरील विश्वास गमावतो. विजयचे गुन्हेगारीत जगतात जाणे हे जरी अन्यायाच्या प्रतिसादातून होत असले तरी, प्रेक्षकांनी त्याला ‘’येनकेण प्रकारेण’ न्याय मिळविण्याचे साधन’ (justice by hook or by crook) मानले.

हा दृष्टिकोन अत्यंत धोकादायक होता; कारण ‘आपण चुकीच्या मार्गानेही बरोबर ठरू शकतो’ असा विचार तो बिंबवत होता.
१९७५ नंतर भारतात राजकीय पातळीवर भ्रष्टाचार विषय गाजला असताना भारतीय समाजाने मात्र अपवाद वगळता त्याकडे तितक्याशा कठोरपणाने पाहिले नाही.
त्याच काळात पडद्यावरचा विजय हा गुन्हेगार असूनही नायक म्हणून गौरवला गेला. भारतीय समाजमनावरील ‘नैतिकतेचा ऱ्हासा’चे हे प्रतिबिंब असावे का अशी शंका तत्कालीन काही घटनांमधून दिसून येते.


३. डॉन: आकर्षक गुन्हेगारीचा मोह आणि गुन्हेगारीचे ग्लॅमरायझेशन...



‘डॉन’मध्ये अमिताभ बच्चनने खलनायकाचे पात्र साकारलेले असूनही प्रेक्षकांच्या नजरेत तो नायक बनतो.
त्याचं स्टाइलिश कपडे, चालण्या-बोलण्यातील आत्मविश्वास, थंड नजर, चतुराई, समयसूचकता या बाबींनी गुन्हेगारीला ‘ग्लॅमर’ दिले हे आपण नाकारू शकत नाही. (अगदी आजच्या काळातल्या तरूण गुन्हेगारांसमोरही अशा भूमिका ‘आदर्श’ ठरताना दिसतात.)

चित्रपटातील ‘डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’ हा संवाद एक प्रकारे समाजाच्या सामूहिक मानसिकतेचे प्रतीक बनला. लोकांनी नियम पाळणाऱ्या नायकापेक्षा नियम मोडणाऱ्या डॉनच्या भूमिकेवर जास्त प्रेम केले.

१९८० च्या दशकात तरुण वर्गाला ‘शॉर्टकट यश’ आकर्षक वाटू लागले; कारण पडद्यावर ‘ते’च यशस्वी ठरताना दिसत होते. यामुळे, राग आणि गुन्हा या दोन्हीही गोष्टी ‘न्यायाचा नवा चेहरा’ म्हणून प्रस्थापित होऊ लागल्या.

४. मुकद्दर का सिकंदर: भावनिक असंतुलनाचे गौरवगान...



‘मुकद्दर का सिकंदर’मधील सिकंदर हा प्रेमात अपयशी ठरलेला आणि समाजाकडून तिरस्कृत झालेला माणूस.
त्याची आक्रमक भावनिकता आणि नशेतून झगडणारी अवस्था याने भारतीय तरुणांमध्ये एक वेगळं मानसिक मूल्य रुजवले; ते म्हणजे, ‘दुःख म्हणजे गौरव’. याच भावनेला पुढे ‘ट्रॅजेडी रोमॅंटिसिझम’ म्हणून लोकप्रियता मिळाली आणि अनेक तरुणांनी आत्मसंयमाऐवजी ‘अतिउत्साही भावनिकता’ स्वीकारण्याचा प्रयत्न केला.
पडद्यावरील ‘रिश्तों में दर्द ही सच्चाई है’ अशा संवादांनी
या भावनांना अतिनाटकी स्वरूप दिले.

५. काला पथ्थर: अपराधगंडातून रागाकडे प्रवास...



‘काला पथ्थर’मध्ये अमिताभने साकारलेला नायक एका भयंकर चुकीनंतर स्वतःला दोष देत जगत राहतो. तो समाजापासून वेगळा होऊन कोळशाच्या खाणीत काम करतो आणि शेवटी रागाच्या भरात स्वतःच प्रायश्चित्त घेतो.

पश्चात्तापाचे उत्तर संयमाने नव्हे, तर आक्रमक लढ्याने द्यावे अशी भावना यामुळे रुजली आणि आत्मशुद्धीची संकल्पना हरवून, तिची जागा ‘आक्रमक प्रायश्चित्त’ या नव्या संकल्पनेने घेतली.

६. शोले: शौर्यातून जन्मलेला विक्षिप्त बंडखोरपणा...



१९७५ च्या ‘शोले’ मध्ये अमिताभचा जय हा गंभीर, मितभाषी, पण अंतर्मुख नायक आहे. जय आणि वीरू हे दोघे समाजासाठी लढतात, पण त्यांच्या संवादात, त्यांच्या जीवनदृष्टीत एक प्रकारचा उपरोध, अधैर्य आणि अनास्थेचा सूर दिसतो.

‘मरायचं असेल तरी हसत हसत मरा’ हा संदेश जरी वीरतेचा वाटला, तरी त्याने तरुणांमध्ये ‘संवेदनाहीन बंडखोरी’ची बीजे पेरली नसतीलच असे वाटत नाही.


७. कुली: स्वार्थ आणि बंडखोरीचे प्रतीक...


‘कुली’मध्ये अमिताभने एक असा युवक साकारला, जो व्यक्तिगत स्वार्थासाठी नियम मोडतो, अत्याचार करतो, आणि समाजाशी द्वंद्व करतो.

हे पात्र स्वार्थी, बंडखोर, आक्रमक वृत्तीचा आदर्श समोर ठेवते. चित्रपटातील संवाद, जसे की, ‘जो भी आएगा, उसे रोकना पड़ेगा’ हे युवकांच्या मनात अतार्किक साहस आणि आक्रमकतेचे मिश्रण तयार करायला कारणीभूत ठरतात.

८. अमर अकबर अँथनी: सामाजिक अन्यायाविरुद्धच्या बंडखोरीचे चित्र...



अमिताभची या चित्रपटातील भूमिका एक प्रकारच्या सांस्कृतिक बंडखोरीचे प्रदर्शन घडवते. हे पात्र सामाजिक विषमता, धार्मिक भेदभाव, आणि भ्रष्ट प्रशासनाविरुद्ध उभे राहते.

या पात्रातील उग्रतेची, आक्रमकतेची, नियम मोडण्याची आणि बंडखोरीची झलक आकर्षक वाटून जाते.

अशी अनेक उदाहरणे देता येतील; मी वानगीदाखल काही उदाहरणे दिली आहेत. (अशी उदाहरणे कित्येक यशस्वी अभिनेत्यांची आणि अनेक चित्रपटांची देता येतील; पण भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अमिताभच्या नावाला वेगळेच वलय असल्यामुळे त्याच्या भूमिकांचा प्रभाव सर्वदूर असण्याची शक्यता आहे.)


* ‘अँग्री यंग मॅन’ भूमिकांचे आकर्षण का?
(Cinematic model of youth revolution)-

मानसशास्त्र असे सांगते की, जेव्हा व्यक्तीला सामाजिक अन्यायाची जाणीव होते; पण त्याला बदलाची साधने मिळत नाहीत, तेव्हा तो ‘अँग्री यंग मॅन’ होतो.

* तत्कालीन सामाजिक परिस्थितीचे अवलोकन-
७० च्या दशकात भारतात असा एक काळ आला, जो राजकीय अस्थिरता, बेरोजगारी, भ्रष्टाचार, आणि तुटलेल्या स्वप्नांचा काळ मानला गेला. आणि, त्या काळाच्या धुरकट पार्श्वभूमीवर अमिताभ बच्चनच्या रुपात एक नायक उगवला; ज्याने पडद्यावरच्या त्याच्या प्रत्येक वाक्याने, प्रत्येक मुठीच्या आवेशाने आणि नजरेतल्या रागाने एक संपूर्ण पिढी हादरवून टाकली.

त्याच्या व्यक्तिरेखा समाजाच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या तर होत्या; पण त्याचवेळी त्या रागाच्या, हिंसेच्या आणि बंडखोरीच्या प्रतीकही बनल्या होत्या. ‘अँग्री यंग मॅन’ ही संज्ञा भारतीय युवकांसाठी प्रेरणादायी होती, पण हळूहळू ती क्रोध, हिंसा आणि अविश्वासाची शिकवणीचीही संज्ञा ठरत गेली.

प्रतिकात्मक अराजकीय छायाचित्र (सौजन्य- गुगल)

१९७० च्या दशकातील भारतीय युवक असंतोषग्रस्त होते, पण दिशाहीनही होते. अमिताभच्या व्यक्तिरेखांनी त्या दिशाहीन रागाला ‘चेहरा’ दिला. राग म्हणजे शक्ती, आणि संयम म्हणजे कमकुवतपणा हा मानसिक समज त्या काळात खोलवर रुजला. त्याने पुढील पिढीतील पुरुषत्व, संबंध आणि सामाजिक संवाद या मूल्यांनाच बदलून टाकले.

समाजशास्त्रज्ञ डॉ. आशुतोष गोखले यांच्या मते ‘‘अमिताभ बच्चन यांच्या व्यक्तिरेखांनी अन्यायाविरुद्ध आवाज दिला, पण त्या आवाजात संयम नव्हता; तो आवाज विवेकाऐवजी क्रोधाचा होता.” हा क्रोधच पुढे ‘सिनेमॅटिक मॉडेल ऑफ युथ रेबेलियन’ म्हणून अभ्यासला गेला.

माणूस समाजमान्य न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून तिच्यावर विसंबून राहू शकत नाही; म्हणून मग तो एकट्याने लढतो, जिंकतो आणि... शेवटी ‘हरतो’ अशी भावनोत्पत्ती मग होऊ लागली. अमिताभच्या चित्रपटीय पात्रांनी तरुणांच्या मनात ‘समाज माझ्याविरुद्ध आहे, म्हणून मला स्वतःच न्याय करावा लागेल’ अशी भावना रुजवली. हळूहळू भारतीय युवकांच्या विचारांमधून ‘संवाद’ हरवत जाऊन त्याची जागा ‘आव्हान’ आणि ‘हिंसा’ यांनी घेतली.

प्रतिकात्मक अराजकीय छायाचित्र (सौजन्य- गुगल)

या काळात मुख्यत्वे अमिताभच्या चित्रपटांनी आणि एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीने पुरुषत्वाची नवीन व्याख्या बनवून टाकली. नायक हा एकाच वेळी रागीट, अबोल, हिंसक; आणि त्याच वेळी आकर्षकही असू शकतो अशी शक्यता चित्रपटांनी निर्माण केली. युवकांना ‘असा’ नायक आवडला, कारण तो त्यांच्या न बोललेल्या भावनांना आवाज देत होता. पण; याचमुळे त्यांच्यात निर्माण झाला एक ‘विषारी आत्मविश्वास’, जो भीतीदायक होता. पुरुषत्व म्हणजे संयम नव्हे, तर ते म्हणजे दडपलेल्या रागाचा उद्रेक अशी भावना बळावत गेली. चित्रपटात नायक जितका हिंसक, तितका प्रेक्षकांना तो ‘मर्द’ वाटू लागला. हीच विचारसरणी पुढे सामाजिक स्तरावर पितृसत्ताक, अहंकारी आणि हिंसक वर्तनाच्या बीजासारखी रुजत गेली.

*अमिताभच्या अभिनयापेक्षा त्यांच्या चित्रपटांतील भूमिका वरचढ-

अमिताभ बच्चन यांचा अभिनय निःसंशय विलक्षण होता. त्यांची संवादफेक, देहबोली, नजरेचा आवेश, आणि तीव्र भावनांचे दर्शन हे सर्व अभिनयाचे धडे ठरले आहेत... पण, त्या अभिनयाची शक्ती इतकी प्रभावी ठरली की, ती सामाजिक जाणिवेपेक्षा मोठी बनत गेली. त्यांच्या चित्रपटीय भूमिका या प्रत्यक्ष जमिनी स्तरावरील नैतिक मूल्यांच्या वरचढ बनल्या. त्यांच्या व्यक्तिरेखांनी समाजातील रागाला दिशा दिली नाही, तर त्याला ‘रूप’ दिले.

१९७० ते १९९० या काळातील युवकांना पडद्यावरचे बंड हेच वास्तव वाटू लागले. (बॉलीवूडमध्ये पुढे आलेले अनेक नायक, जसे की, अजय देवगण, सनी देओल, सलमान खान हे सर्व त्या ‘रागीट नायकाच्या प्रतिमेचे उत्तराधिकारी’ ठरले.)‘जिंकण्यासाठी काहीही केले आणि कोणताही मार्ग अवलंबला तरी चालतो’ अशी धोकादायक भावना अशा भूमिकांनी समाजमनात रुजवली.

अमिताभ बच्चन हे भारतीय सिनेमाचे महान नायक आहेत; पण त्यांच्या ‘अँग्री यंग मॅन’ प्रतिमेने भारतीय युवकांमध्ये रागाचे ‘रोमान्सीकरण’ केले.

त्यांच्या चित्रपटांनी प्रेरणा दिली; पण ती दिशाहीन ठरत गेली.  त्यांच्या व्यक्तिरेखांनी आत्मविश्वास दिला; पण संवाद हिरावून घेतला. त्यांनी युवकाला बळ दिले; पण विवेक पुसून टाकला.

आजच्या भारतात जो आक्रोश, राजकीय ध्रुवीकरण, सोशल मीडियावरील हिंसक भाषा दिसते; त्याचे मूळ त्या काळातील पडद्यावरील रागात आहे. तो राग अजूनही आपल्या समाजात धगधगत आहे- फरक एवढाच की आता तो सिनेमा सोडून वास्तवात आला आहे. आजही सोशल मीडियावर, राजकारणात, समाजमाध्यमांवर दिसणारा आक्रोश यांचे मूळ त्या काळातील पडद्यावरील नायकाच्या डोळ्यांत आहे.


अमिताभने रंगविलेला ‘तो’ ‘अँग्री रंग मॅन’ खरा होता की तो आपल्या अंतर्मनातील असंतोषाचे प्रतिबिंब होता हे ठरविणे समाजाच्या हाती आहे.

* अमिताभचे प्रतिमासंक्रमण-
१९९० नंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतःही आपल्या भूमिकांतून प्रतिमेत बदल करत नेला केला आणि ‘अग्निपथ’पासून ‘बागबान’पर्यंत ते शांत, परिपक्व, समजूतदार भूमिकांकडे वळत गेले.



* अमिताभएवढीच सिनेमासृष्टीचीही जबाबदारी-

अमिताभच्या बऱ्याच भूमिकांचे लेखन सलीम-जावेद जोडीने केले आहे.


अमिताभ अभिनेता म्हणून ‘स्टार ऑफ द मिलेनियम’ आहे यात काहीच शंका नाही. तो माझ्यासारखाच अनेक जणांचा आवडता अभिनेता आहे यातही काही शंका नाही. त्याच्या ‘अँग्री यंग मॅन’ बनण्यामागे त्याच्याइतकाच असंख्य दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्याबरोबरच तत्कालीन परिस्थितीचाही तितकाच वाटा आहे हेही मान्यच! पण, त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या भूमिका वरचढ ठरल्या आणि भारतीय समाजमनावर त्यामुळे थोडा तरी विपरीत परिणाम झाला हे सहजासहजी नाकारता येणार नाही; कारण प्रसिद्धीच्या झोतात चमकणारे अभिनेते, सुपरस्टार्स भरपूर असतात; पण अमिताभसारखे थोडेच सुपरस्टार असतात जे समाजमनावर प्रभाव पाडू शकतात. चित्रपटांतील भूमिका निवडताना अमिताभ बच्चन यांनी उत्तरोत्तर जी परिपक्वता दाखवली, त्यामुळेच ते गेली ३-४ पिढ्या सिनेमा प्रेमींसाठी relevant राहिले आहेत. त्यांनी आणखीनही विविधांगी भूमिका स्वीकाराव्यात प्रेक्षकांचे मनोरंजन करत रहावे या सदिच्छा!


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ‘बिग बी’!

(सौजन्य- चित्रा लक्ष्मणन, गुगल)

(लेखातील सर्व छायाचित्रे गुगलवरून घेतली असून त्याचे सौजन्य ज्या-त्या मूळ कलाकाराचे आहे.)

(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस., एम.डी. (बालरोग),
वॉट्स अॅप संपर्क- ८३२९३८१६१५)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित)
(www.dramittukarampatil.blogspot.com)

















Comments

  1. अतिशय सुंदर सर... आम्ही या दृष्टीने कधी विचारच केला नव्हता..... सलाम आपल्या लेखणीला... ❤️❤️👌👌🙏

    ReplyDelete
  2. खूपच सुंदर

    ReplyDelete
  3. अमिताभ बच्चन यांच्या विषयी न माहित असलेली माहिती वाचन करण्यास मिळाली. धन्यवाद डॉक्टर साहेब.

    ReplyDelete
  4. अगदी सुंदर आणी विस्तारित विश्लेषण केलं आहे अमिताभ यांच्या तारुण्यातील भूमिकेच आणी नंतर उतरवयातील

    ReplyDelete
  5. अगदी समर्पक विश्लेषण.
    अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
    उत्तरोत्तरं अशेच लेख वाचायला मिळोत.

    ReplyDelete
  6. चित्रपट सृष्टीत महत्वाचे स्थान पटकावणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्यामुळे समाजावर होणारा परिणाम याचा छान ऊहापोह केला आहे.अभिनयापेक्षा भूमिका वरचढ हे अत्यंत अचूक विश्लेषण आहे कारण या दृष्टीने कोणी विचार केला असेल अस वाटत नाही.चित्रपटात अभिनेत्याला larger than life दाखवतात हे सर्वांना माहीत आहे पण अभिनयाला सुद्धा भूमिकानी लहान किंवा कमी महत्त्वाचे वाटायला लावलं हे निरीक्षण विशेषतः कौतुकास्पद आहे..

    ReplyDelete
  7. गुन्हेगारीचे उदात्तीकरण या चित्रपटांतून झाले होते. सामान्य माणूस तेच अनुकरण करताना दिसत होते.

    ReplyDelete
  8. अप्रतिम.....
    अमिताभजीं बद्दल नसलेली माहिती वाचायला मिळाली तुमच्यामुळे सर..
    असेच नवीन नवीन लेख पुढेही वाचायला मिळतील..

    ReplyDelete
  9. डॉ. माधव ठाकूरSaturday, 11 October 2025 at 04:50:00 GMT+5:30

    समाजाचे प्रतिबिंब सिनेमात उमटते आणि सिनेमा बघून समाजमनावर परिणाम होतो या दोन्ही गोष्टी होत असतात,
    अमिताभ बच्चन यांच्या मर्द को दर्द नहीं होता या वाक्यामुळे देखील पुरुषांच्या भावनिक विश्वावर फार विपरीत परिणाम झाला आहे असे माझे मत आहे, या संवादामुळे पुरुषांनी आपल्याला कोणीही कमजोर समजू नये याकरिता स्वतःच्या भावना लपवून ठेवण्याचा चुकीचा मार्ग निवडला.
    अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाची दुसरी बाजूही अत्यंत प्रभावी व तटस्थपणे मांडली आहे सर तुम्ही.
    नेहमीप्रमाणे आणखीन एक अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  10. My god kiti chan write up deepest study Ani tasech high level word management.
    Jyane he movies banvle ani swata actor sudhaa ,Ani aamhi movies pahnare kunich kadhich evdha vichar hi kela nasava ani kela jari tari saglyansmor achuk mandta yava ase Dr tumhich Vicharshakti affaat aahe Ani tyahun achuk ani complete mandni . Hats off to you.

    ReplyDelete
  11. सुधीर जाधव, पाच्छापूर, जतSaturday, 11 October 2025 at 09:12:00 GMT+5:30

    अमित, परफेक्टच विश्लेषण ! खूप छान लिहिले आहे

    ReplyDelete
  12. अमिताभ बच्चन हा अभिनेता अद्वितीय आहे.. त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत. त्यांचे सिनेमे चित्रपट सृष्टीतील मैलाचे दगड आहेत असे म्हणता येईल ! हा महानायक तत्कालीन युवकांच्या गळ्यातला ताईत होता त्यामुळे त्या भूमिका लोकांच्या मनात खोलवर परिणाम केल्या गेल्या. त्यांची अँग्री यंग मॅन ची छबी अनुकरणीय वाटणे..साहजिक होते.त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची पाठराखण केल्यासारखे होईल.त्यामुळे समाजातील युवकाची विचारशक्ती बदलली जाऊ शकते, चित्रपटातील भूमिका ह्या larger than life असतात. खऱ्या जीवनात ह्या भूमिका तंतोतंत लागू करू शकत नाही.. ह्या लेखाच्या माध्यमातून सर, तुम्ही या महानायकाच्या भूमिकांची दुसरी बाजू (अर्थात खलनायकी ) कशी समाजावर प्रभाव (वाईट )पाडू शकते हे प्रभावीपणे मांडले आहे.. असा विचार अशी चर्चा ही गरजेची आहे. सुंदर लेख आहे सर !!

    ReplyDelete
  13. खुप छान लेख लिहिला आहेत आपण सर
    प्रत्येक जुने कलाकार चे काय रूप मांडलं वाह.
    लेख वाचतांना काही कलाकार अमर झालेत पन
    लेखा मुळे हे कलाकार जगात नसल्याचे जानवत नाही.... खरोखरच हे कलाकारांना रबने स्पेशल च बनवले आहे.. कोणीही ठक्कर देवु शकणार नाही

    ReplyDelete
  14. तुम्ही उल्लेख केलेले अमिताभचे आठ ही सिनेमे पहायची तीव्र इच्छा झाली. तो अविस्मरणीय काळ परत डोळ्यासमरुन गेला.
    "त्यांच्या चित्रपटांनी प्रेरणा दिली; पण ती दिशाहीन ठरत गेली. त्यांच्या व्यक्तिरेखानी आत्मविश्वास दिला; पण संवाद हिरावून घेतला. त्यांनी युवकांना बळ दिले; पण विवेक पुसून टाकला." अमिताभच्या एकुण चित्रपटांचा सारांश या ओळीतून खूप छान मांडला आहे.

    ReplyDelete

Post a Comment