माणूस जातो तो कायमचाच..!

माणूस जातो तो कायमचाच..!

(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)



माणूस गेल्याची बातमी येते... आधी लोक ‘एक्साईट’ होतात... मग लोकांना वाईट वाटते... लोक बातमी ‘व्हायरल’ करतात...


लोक येतात... रडतात... अश्रू ढाळतात... गळे काढतात...


लोक श्रद्धांजली वाहतात... स्टेटस ठेवतात... व्हिडिओ बनवितात... शेअर करतात...


लोक भाषणे करतात... ‘गेलेल्याची पोकळी भरून निघणार नाही’ म्हणतात... ‘असा माणूस पुन्हा होणे नाही’ म्हणतात...


लोक कालपर्यंत ज्याला पाण्यात पाहत होते, त्याचेच त्याच्या मृत्यूनंतर कौतुक करतात... कोणी मनःपूर्वक, तर कोणी ‘मरणान्तानि वैराणि’ म्हणून कौतुक करतात...


अनुयायी ‘आमचे दादा, मामा, काका, आबा, आण्णा, आप्पा, वहिनी, ताई, दीदी, काकी आणि कोण-कोण गेले’ म्हणत राहतात... काहीजण ‘तुमच्यामुळेच आम्ही होतो’ म्हणतात... काहीजण ‘तुमच्यानंतर आमचे कसे होणार?’ म्हणतात...


सहकारी त्यांच्याबरोबरच्या कामाचा अनुभव सांगतात... विरोधकही वेगळ्या चष्म्यातून (विरोधकाच्या भूमिकेतून) तेच सांगतात... समर्थक कौतुकाचा वर्षाव करतात... काही मूठभर द्वेष करणारे अप्रत्यक्षपणे ‘बरे झाले, गेले एकदाचे’ म्हणत तीच द्वेषमूलक भूमिका टोकाला घेऊन जातात... इकडेही नसणारे आणि तिकडेही नसणारे आणि मध्येच लोंबकळणारे भूमिकाहीन लोक एखादी मॅच किंवा सिनेमा पाहत राहतात...


आयुष्यभर शत्रुत्व निभावणारे लोकही गेलेल्या माणसाला मृत्यूपश्चात(च) ‘अजातशत्रू’ म्हणतात... कोणी ‘दिलदार शत्रू’ म्हणतात... कोणी आणखी काहीबाही म्हणतात... गेलेल्या माणसाने केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून फुलाची एखादी पाकळी सोडा, पण साधी शब्दसुमनेही न वाहणारे लोक तीच व्यक्ती कायमची गेल्यावर मात्र प्रचंड मोठ्या आकाराची पुष्पचक्रे आणून त्यांच्या चरणी अर्पण करतात... एखाद्याच्या जिवंतपणी दाखविलेल्या दुटप्पीपणाचे लोक त्याच्या मृत्यूनंतरही प्रदर्शन मांडत राहतात...


कोणी म्हणतात, ‘नियतीने डाव साधला’... अन्य कोणी म्हणतात, “काळ आला; पण अगदीच अकाली आला’... आणखीन काहीजण म्हणतात, ‘वेळेचा फेरा वाईट’... उरलेले म्हणतात, ‘‘त्या’च्यापुढे कधी कुठे कुणाचे चालते का! वरून आदेश आला की निघावेच लागते’... वगैरे वगैरे...


गेलेला माणूस मात्र कायमचा शांत होतो... कायमचा निघून जातो... कायमचा निःशब्द होतो... कायमचा निश्चल होतो... सगळं काही इथंच टाकून त्याला सर्व काही मागे सोडून जावे लागते... पुढच्या कशाचीही व्यवस्था लावायलासुद्धा कधी-कधी वेळ मिळत नाही... क्षणापूर्वीचे चैतन्यमयी शरीर अचानक अचेतन होऊन जाते...


जाणारा शांतपणे निघून जातो... त्याच्या थांबण्याच्या किंवा अन्य कुणाच्याही थांबविण्याच्या इच्छेने नियतीला काहीही फरक पडत नाही... यमराजांचा रेडा ताकदवान असतो; त्याला कोणीही अडवू शकत नाही...


लोक ‘अमर रहे, अमर रहे’च्या घोषणा देत राहतात... ‘तुम्ही कायम आमच्यामध्येच असाल... रहाल’ म्हणत राहतात.‌.. ‘परत या, परत या’चीही आर्जवे केली जातात...


पण, जाणारा कधीचाच गेलेला असतो... ते (तो किंवा ती) अखेरचे डोळे मिटून घेतात, अखेरचा श्वास बाहेर सोडतात किंवा त्यांच्या जन्मापासून सातत्याने धडधडत असणाऱ्या हृदयाचा शेवटचा ठोका पडतो, तेव्हाच त्यांनी त्यांच्या शरीराचा आणि त्याद्वारे जीवनाचा त्याग केलेला असतो...


देह एकदा चितेवर ठेऊन त्याला भडाग्नी दिला की तोही जळून नष्ट होतो... हाडाकाडांची राख होते... रक्त आटून जाते... मातीतून आलेल्या देहाला अखेरीस मातीच सामावून घेते... एकदा रक्षाविसर्जन झाले की मृत होऊन जळालेल्या त्या देहाचे अस्तित्व सर्वार्थाने नष्ट होते... माणसाचा प्रवास ‘आहे’कडून ‘होता’कडे अगदी क्षणार्धात होतो... तो थांबत नाही; थांबवता तर मुळीच येत नाही...


‘तुम्ही जिथे असाल तिथे सुखात रहा’... ‘असाल तिथून आमच्यावर आशीर्वादरुपी कृपा ठेवा’... ‘तुम्ही फक्त शरीराने गेले आहात, मनाने कायम आमच्याजवळच रहाल’... या साऱ्या शुद्ध सांत्वनपर आणि बोला-चालायच्या गोष्टी... त्यातले काही कधी खरेच खरे असते का, खरे होते का!


प्रत्यक्षात तसे काही होत नसते... एकवेळ ‘आत्मा अमर असतो’ वगैरे गोष्टी तात्विकतेसाठी जरी मान्य केल्या, तरी ‘शारीररुपी अस्तित्वामुळेच आपला आत्म्याशी संवाद असतो’ हे मान्य करावेच लागते... त्यामुळे मर्त्य म्हणा किंवा अन्य काही, शरीराची गरज असतेच असते...



जाणारा निघून जात असतो तो कायमचाच... कधीही न परतण्यासाठी... आप्तेष्टांना त्याच्या स्पर्शाची ती ऊब परत कधीही मिळत नाही... त्याच्याशी समोरासमोरचा संवाद साधणे परत कधीही शक्य होत नाही... त्याच्या मेंदूतील विचार परत कधीही थेटपणे आपल्याला भिडू शकत नाहीत... त्याच्या भावभावना परत कधीही आपल्या हृदयाला प्रत्यक्ष साद घालू शकत नाहीत... ना आपण त्याचे बोलणे ऐकू शकतो; ना तो आपले... त्याचे हृदय परत कधीही धडधडत नाही आणि श्वासोच्छवासाने त्याची छाती परत कधीही हलत नाही...


या धरेवरून त्याचे अस्तित्व नष्ट होते ते कायमचेच... तो राव असो वा रंक, त्याच्या अस्तित्वाची पोकळी कधीही भरून निघू शकत नाही... कुटुंबातील त्याचे स्थान अन्य कोणीही घेऊ शकत नाही... त्याने निभावलेली नात्यातली कोणतीही भूमिका अन्य कोणीही धारण करू शकत नाही... त्याच्या व्यक्तिमत्वाच्या अस्तित्वाला दुसरे कोणीही न्याय देऊ शकत नाही...


कोणत्याही वस्तुनिष्ठ पुराव्यांअभावी पुनर्जन्म वगैरे तर शुद्ध भाकडकथा वाटव्यात अशी असणारी इथली व्यावहारिक परिस्थिती...


एखादा माणूस जातो तो कायमचाच... परत कधीही न भेटण्यासाठी अन् कधीही न परतण्यासाठी...


या ‘पार्थिवा’चा त्या ‘पार्थीवा’कडचा प्रवास असतो अगदी अपरतनीय..!


(डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,

एम.बी.बी.एस.,एम.डी.)

(वॉट्सअॅप संपर्क- 8329381615)

(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)

(याच लेखकाचा दुसरा ब्लॉग-

www.dramit100wordstories.blogspot.com)

Comments

  1. शब्दांकन खूप छान दादा..!!!
    वाचताना सगळ काही डोळ्यासमोर घडत आहे असं वाटतं..
    जिवंतपणी "वैर"आणि गेल्यानंतर "धुरंधर" मध्येच आयुष्य संपवलं जातं.
    नियती नियतीचा खेळ खेळते आणि माणूस माणसांचा खेळ खेळतो..!!

    ReplyDelete
    Replies
    1. आपले म्हणणे बरोबर आहे.

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  2. हे थोडं जास्तच खरं झालं.

    ReplyDelete
    Replies
    1. हो... तेच अंतिम सत्य आहे.

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  3. मृत्यू अटळ आहे. अत्यंत समर्पक आणि वास्तव मांडले आहे. आपण मात्र यथाशक्ती आनंदात जगावे आणि इतरांनाही जगू द्यावे म्हणजे ह्या जन्माचे सार्थक होईल.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे.
      प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!

      Delete
  4. जन्म आणी मृत्यू हेच सत्य - बाकी जुमला 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. १००% सत्य.

      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  5. वास्तवतेची जाणीव करून दिलीत ..! प्रत्येकाला कळतयं पण वळत नाही कसं व्यक्त व्हावं ते ..!

    ReplyDelete
    Replies
    1. हो...

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.

      Delete
  6. Mrutyu ek vidarak satya. 🙏🏼

    ReplyDelete
    Replies
    1. होय!

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!

      Delete
  7. हा लेख वाचताना मन नकळत थांबतं… शब्द संपतात, पण भावना संपत नाहीत.
    “माणूस जातो तो कायमचाच” हे वाक्य फक्त सत्य सांगत नाही, तर जिवंतपणी माणसाला समजून न घेणाऱ्या समाजाच्या संवेदनशीलतेवर आरसा धरतं.माणूस जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाची किंमत न कळणं आणि गेल्यानंतर त्याच अस्तित्वावर भाषणं करणं—ही आपली सामूहिक शोकांतिका आहे.हा लेख केवळ मृत्यूबद्दल नाही, तर जिवंतपणाच्या मूल्याबद्दल आहे.
    आपल्या आसपासच्या माणसांना वेळेत शब्द, स्पर्श, आधार आणि मान देण्याची जाणीव करून देणारा हा लेख मनाला चटका लावतो.
    हा लेख वाचल्यानंतर एकच विचार मनात राहतो
    माणूस गेल्यावर नाही, तर जिवंत असतानाच आपल्याला ‘माणूस’ व्हायला हवं.
    खरोखरच, हा लेख अंतर्मुख करतो… आणि दीर्घकाळ मनात घर करून राहतो.

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर आणि विस्तृत प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

      Delete
  8. Ye to sahi hai ki janewala kabhi wapas to nhi ayega ,uski acchi buri baatein good work bad work log yaad karenge ,ya Dua karenge ya to baddua Denge ye to Current condition hai.

    ReplyDelete
    Replies
    1. सही बात है!

      आप का आभार!

      Delete
  9. माणसाचा मृत्यू झाल्यानंतर काही सेकंदातच त्याचं नाव पुसलं जातं, साधं त्याच्या डेड बॉडीलाही आपण नावाने हाक मारत नाही, आणि आपण मात्र आयुष्यभर याच अहंकारात वावरत असतो की माझं नाव फारच मोठा आहे...... डॉक्टर साहेब वास्तववादी लेख लिहिला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. कटू सत्य आहे हे... कळतंय पण वळत नाही!

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  10. मृत्यू chya पलीकडं ky दडलं य kunas ठाऊक

    ReplyDelete
    Replies
    1. गूढ...

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  11. "शब्द न् शब्द न् शब्द मनाला भिडणारा."

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार!

      Delete
  12. माणसाचा प्रवास ‘आहे’कडून ‘होता’कडे अगदी क्षणार्धात होतो... तो थांबत नाही; थांबवता तर मुळीच येत नाही...
    👍

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार!

      Delete
  13. डॉक्टर, एक जळजळीत सत्य आहे हे. मृत्यू अटल आहे. पण त्यानंतर दिसणाऱ्या लोकांच्या भावना या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या सामाजिक स्तरावर अवलंबून असतात.अर्थात मृत व्यक्तीच सामाजिक कार्य जेवढं मोठं तेवढ्या भावना तीव्र असतात. म्हणूनच स्व. विलासराव देशमुख असोत किंवा स्व. आर. आर. आबा असोत किंवा स्व. अजित दादा यांच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी जमलेला जनसागर याचीच साक्ष देतो.
    पण शेवटी तुमच्या भाषेत पार्थिवाकडून
    पार्थीवाकडे असा प्रवास घडतो हेच वास्तव आहे.
    मग स्वर्गीय अजित दादा असोत किंवा त्यांच्या सोबत त्याच विमानातून प्रवास करणारे इतर लोक असोत.
    आपल शब्दांकन आणि विचार खरंच खूपच छकन. 👌👌👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. एक सुधारणा आहे. जनभावना या सर्वस्वी मृत व्यक्तीच्या सामाजिक किंवा आर्थिक स्तरावर अवलंबून नसतात. त्या मृत व्यक्तीने गाठलेल्या उंचीवर आणि त्याच्या कर्तृत्वावर जास्त अवलंबून असतात.

      Delete
    2. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!

      Delete
  14. खुप छान आणि परखड विचार मांडले आहेस अमित. आपण मृत्यूला घाबरतो. जन्मा नंतर एकमेव सत्य म्हणजे मृत्यू. परंतु आपण हे स्वीकारत नाही.
    तुझ्या लेखातील प्रत्येक मुद्दा हा निश्चितच माणसाच्या मृत्यूवर उत्तम मार्गदर्शन करणारा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपले म्हणणे बरोबर आहे.

      खूप खूप धन्यवाद!

      Delete
  15. सर तुमचा लेख वाचून असे वाटले की मृत्यू तर अटळ आहे मग आपण माणसे का एवढे एकमेकांचा वैर करतो. कश्यासाठी जाताना काही सोबत जात नाही. फक्त आपण केलेल्या चांगल्या गोष्टीच लोकांच्या लक्षात राहतात. म्हणून कधी कोणाला दुखवू नका. सगळ्यांशी प्रेमाने वागा.
    तुमचा लेख वास्तवाला धरून आहे. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. हो, माणसांना कळते पण वळत नाही; आणि वळले तरी तसे वागायला जमत नाही हेच खरे.

      आपल्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे!

      Delete
    2. खूपच सुंदर विचार मांडले आहेत.
      जिवंत असतो तोपर्यंत जगायचं कळत नाही. येतानाही काही घेऊन येत नाही आणि जातानाही काही घेऊन जात नाही. फक्त आपलं कर्तुत्व, आपलं कर्म, आपण जोडलेली माणसं ,आपण लोकांवरती केलेलं प्रेम हेच आपण गेल्यानंतर जिवंत राहतं.. माणूस फक्त निरर्थक गोष्टी मिळवण्याच्या आणि नंतर साठवण्याच्या मागे लागतो. पैसा, घर,जमीन,कपडे ह्यातून आनंद मिळवण्याचा हट्टाहास करतो..मृत्यू हे एक अटळ सत्य आहे आणि जीवनाचे महत्त्व वेळ निघून गेल्यानंतरच कळतं.

      Delete
    3. आपले म्हणणे एकदम बरोबर आहे.

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      Delete
  16. अत्यंत परखड आणि वास्तववादी लेख, माणूस आहे ते होता या प्रवासादरम्यान त्याने जे काही केलं आहे त्यावरून ठरतं की त्या व्यक्तीला किती काळ आणि कशासाठी लक्षात ठेवलं जाईल. होता नंतरचा प्रवास हा फक्त कल्पनेत असतो आणि त्यामुळे आहे दरम्यानच माणसाने असण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण करून घ्यावेत.

    ReplyDelete
    Replies
    1. हो, खरंय एकदम. बऱ्याचजणांना आयुष्यभर हे समजत नाही, हे दुर्दैव.

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार, सर.

      Delete
  17. खूपच सुंदर विचार मांडले आहेत अत्यंत परखड आणि वास्तववादी लेख माणूस आहे ते होता या या प्रवासादरम्यान त्याने जे काही केलं आहे ते लक्षात ठेवले जाईल येताना काही घेऊन यायचं नाही जाताना काही घेऊन जायचं नाही केलेली कर्म त्याने जोडलेली माणसं लोकांवर केलेलं प्रेम हेच तो मनुष्य गेल्यावर जिवंत राहतं मृत्यू हे एक अटळ सत्य आहे हे माणसाचा प्रवास क्षणार्धात आहे ते होता अगदी क्षणार्धात होतो हेच अंतिम सत्य आहे

    ReplyDelete
  18. हे लेखन माणसाच्या मृत्यूभोवती असलेल्या भ्रम, शब्दांचे ढोंग आणि सामाजिक औपचारिकतेचा पडदा दूर करते. शरीर नश्वर आहे, आत्म्याच्या अमरत्वाबाबत केवळ सांत्वनाच्या गोष्टी केल्या जातात; प्रत्यक्षात माणसाचे अस्तित्व कर्मांवरच टिकते—आठवणींमध्ये, परिणामांमध्ये आणि लोकांच्या अनुभवांत. मृत्यू सर्वांना समान आहे, पण आयुष्याचा अर्थ आपण जगताना दिलेल्या मूल्यांमध्ये आहे. शांतता, निःशब्दता आणि निष्प्रभता ही शेवटची सत्ये असली, तरी माणूस जिवंत असताना ‘कसा जगला’ हाच खरा निष्कर्ष ठरतो.

    ReplyDelete

Post a Comment