केवळ तेच डॉक्टर होतात...
केवळ तेच डॉक्टर होतात...
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)
महाविद्यालयाच्या पहिल्याच दिवशी एका सन्माननीय मृत व्यक्तीच्या शवाचे विच्छेदन करावयाचे काळीज असणारे,
मृत शरीराचा अभ्यास करून झाल्यावर हाताला दिवसभर येणाऱ्या उग्र फॉर्मॅलिनचा वास सहन करत त्याच हाताने आमटी-भात कालवून खाणारे;
मेंदू अक्षरशः कुरतडवून टाकेल अशी ‘अॅनाटॉमी’ची पुस्तके वाचून ते तोंडपाठ करणारे;
केमिस्ट्रीचा बापच नाही, तर आजोबा-पणजोबा ठरू शकेल इतक्या गुंतागुंतीच्या रिअॅक्शन्स असणाऱ्या ‘बायोकेमिस्ट्री’ची पारायणे करणारे;
त्यातल्या त्यात सोपा विषय म्हणून हौसेने वाचायला घेतल्यावर त्या समजाची जोरदार चिरफाड करणारी ‘फिजिओलॉजी’ वाचणारे;
औषधे शरीरात कशी कमी करतात आणि डॉक्टर काका ती कशी लक्षात ठेवतात या लहानपणीच्या कौतुकाचा विषय असणारी आणि हातात पुस्तक घेतल्यावर गरगरायला लावेल असा विषय असणाऱ्या ‘फार्मॅकोलॉजी’चे कडू औषध रिचवणारे;
शरीरातील ऊती-अन्-पेशींचा कण-न-कण वेगवेगळ्या स्टेन्सनी रंगवून आजारांचे निदान करण्याच्या मुळाशी असणारी ‘पॅथॉलॉजी’ घोकून घोकून स्वतःची बुद्धी बेरंग होईपर्यंत घासणारे;
भल्याभल्यांचा ‘मी’पणा भल्याभल्यांना घालवता येत नसला तरी माणसाला आजारी पाडून अक्षरशः जेरीस आणून गुडघे टेकायला लावणाऱ्या जिवाणू-विषाणू-परजीवी-कवकांचा अभ्यास शिकविणारी ‘मायक्रोबायॉलॉजी’ आपल्या ‘मॅक्रो’भिंगाने वाचणारे;
तुम्ही गुन्हे करून खोटे बोलून न्यायव्यवस्थेला चकमा देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी मृत शरीरातूनही पुरावे गोळा करायला शिकविणारे ‘फॉरेन्सिक मेडिसीन’ मृत शरीराबरोबर बसून अभ्यासणारे;
स्वतः कुणाच्या ‘आँखियों की गोली’ से घायाळ होत असतील-नसतील; मात्र भिंग हातात घेऊन दुसऱ्यांच्या डोळ्यांच्या पडद्याच्याही पलीकडेपर्यंत (थेट ‘ऐलतीर ते पैलतीर’च की!) पोहोचायला शिकविणारी ‘ऑप्थॅल्मॉलॉजी’ डोळ्यांखालून घालणारे;
स्वतःहून रुग्णाबाबतची एखादी ‘बात’ही कधी ‘या कानापासून त्या कानापर्यंत जाऊ न देणारे’; परंतु ‘ईएनटी (ईअर-नोज-थ्रोट)’च्या रुपाने रुग्णांच्या कान-नाक-घशातून स्वैर संचार करून येणारे;
डॉक्टर म्हणून आपण समाजाचे कायम काहीतरी देणे लागतो असा आयुष्यभर विचार करणारे आणि ‘उपायांपेक्षा प्रतिबंध चांगला’ हे लोकांना शिकविण्यासाठी त्याचा पाया असणारे ‘प्रिवेंटिव्ह अॅन्ड सोशल मेडिसीन’ वाचून यामुळे स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारून घ्यायला तयार असणारे;
तुटलेल्या नात्यांइतकीच तुटलेली हाडेही वेळेत जोडली नाहीत तर ती नीट सांधता येत नाहीत हे ‘हॅमर’ डोक्यात मारमारून शिकविणारे ‘ऑर्थोपेडिक्स’ अभ्यासणारे;
लहान मुलांइतके निष्पाप, सरळमार्गी आणि सत्यवचनी झाल्यावर सगळे जगच सुंदर वाटायला लावणाऱ्या ‘पेडियाट्रिक्स’च्या कडू औषधाचा घोट अलगदपणे खाली उतरवून सृजनाला स्वच्छंद बनविणारे;
विश्वाच्या उत्पत्तीचे कोडे सुटेल तेव्हा सुटेल; पण मानवी उत्पत्तीचे कोडे थोड्याफार प्रमाणात का होईना सोडविणारे आणि सृजनाबरोबर येणाऱ्या सुखाची किंवा सृजनाअभावीच्या दुःखाची जाणीव करून देणाऱ्या ‘ऑबस्टेट्रिक्स अँड गायनेकॉलॉजी’ला आपल्या कुशीत खेळवणारे;
उसवलेली-फाटलेली नाती जखमांवरच्या टाक्यांप्रमाणे शिवता येतात; आणि अगदीच शिवण्याच्या पात्रतेची ती राहिली नसतील, तर एखादी छोटी-मोठी शस्त्रक्रिया करून ‘नको असलेले’ थेट काढायला शिकविणारी ‘सर्जरी’ करणारे;
फारशी चिरफाड न करताही शांतपणे एखाद्याला ‘नीट’पणे बरे करता येते हे शिकविणारे ‘मेडिसीन’ अंगात भिनवणारे;
आजार शरीराचे असतात, त्याचप्रमाणे मनाचेही असतात हे ठामपणे सांगणारी आणि लोक ‘वेड्यांचे डॉक्टर’ म्हणत असूनही मनोभावे ‘सायकियाट्रि’ची पारायणे करणारे;
माणूस वरून कितीही गोड वागणारा असू दे, कितीही ठणठणीत असू दे; मात्र त्याला अगदी न टोचताही त्याचे अंतर्बाह्य ‘रूप’ वाचायला शिकविणारी ‘रेडिओलॉजी’ची किरणे अंगावर घेणारेच...
... डॉक्टर होतात...
रात्रंदिवस जागून अभ्यास करणारे आणि खंडीभर पुस्तके वाचणारे;
सभोवतालचे सगळे लोक सण-वार साजरे करत असताना शिकण्याच्या वेळी डोके पुस्तकात घुसवून बसणारे; आणि डॉक्टर झाल्यावर कर्तव्यावर एका पायावर हजर असणारे;
हातातला घास तोंडात घालतानाही रुग्णाला गरज पडताच तो घास तसाच ताटात मागे ठेवणारे;
रात्र-अपरात्र, रविवार-सुट्टीचा दिवस न पाहता रुग्णाच्या हाकेला ओ देणारे;
समोरचा कितीही निगरगट्ट असला तरी त्याला ‘दादा, काका, मामा, आजोबा, काकी, मावशी, ताई’ म्हणून स्वतःच्या अंगचा अंगभूत नम्रपणा न सोडणारे;
कितीही व्यवस्थित उपचार करूनही रुग्ण बरा झाला नाही किंवा मरण पावला तर ती बातमी कर्तव्यकठोरतेने रुग्णाच्या नातेवाईकांना सांगणारे; पण एकांत मिळताच त्या रुग्णाच्या अवस्थेने अस्वस्थ होणारे;
लहान मुले बरी झाली की त्यांचा वाढदिवस आपल्याच दवाखान्यात साजरा करणारे;
आणि, कुणाला कितीही कडू-गोड वाटो; पण व्यावसायिक आयुष्यात कायम ‘न्यूट्रल’ राहूनच रुग्णाच्या भल्यच्याच गोष्टी करणारे;
खंडीभर शिव्या आणि गाडीभर टोमणे सहन करूनही निरागसतेने प्रेम करणाऱ्या मूठभर रुग्णांचा आदर करणारेच...
... चांगले डॉक्टर होऊ शकतात...
हा... असतीलही आमच्यातही एखादे वाईट किंवा अव्यावसायिक वागणारे डॉक्टर... किंवा, एखादे किडनी रॅकेट चालविणारे डॉक्टरही... पण, प्रत्येक व्यवसायात असे लोक असतातच की... ‘उडदामाजी काळे-गोरे’ असतातच... पण, आम्ही त्यांचे कधीही समर्थन करत नाही... आम्ही बहुसंख्य डॉक्टर्स शिकताना आम्ही घेतलेल्या नैतिकतेच्या आणि रुग्णसेवेच्या शपथांना प्राणपणाने जपतो...
प्रत्येक डॉक्टर मानवी शरीराचा कायम आदरच करतात- मग ते जिवंत असो की मृत..! कारण, रुग्ण हेच आमचे खरे शिक्षक असतात हे आम्ही ज्यादिवशी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करतो त्याच दिवशी आम्हाला शिकवले जाते... आम्ही शवपरीक्षण करतो ते प्रत्येक शरीर आमच्यासाठी एका शाळेसारखे असते; आणि आम्ही ज्यांच्यावर इलाज करतो, त्या प्रत्येक रुग्णाचे शरीर आमच्यासाठी एखाद्या मंदिरासारखे असते...
आम्ही शिकतोही निसर्गाने अप्रतिमपणे बनविलेल्या मानवी शरीराकडून आणि झुकतोही जगन्नियंत्याने जन्माला घातलेल्या मानवी शरीरसमोरच... आमच्यासाठी शाळाही तीच आणि मंदिरही तेच..!
डॉक्टर होणे सोपे नाही... असतात काहीजण सहनशील आणि नम्र... असतात काहीजण परपीडा सहन न होणारे... असतात काहीजण अहर्निश लोकसेवेला वाहून घेणारे... असतात काहीजण ‘रुग्णसेवा हीच ईशसेवा’ मानणारे... असतात काहीजण ठाम आत्मविश्वास असणारे... असतात काहीजण देवाने निवडलेले... असतात काहीजण नशीबवान... जे डॉक्टर होतात...
आशीर्वाद आणि शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाला, डॉक्टरांना आणि घरी एक डॉक्टर बनवायचा आहे म्हणून त्याग करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना ‘डॉक्टर्स डे’च्या हार्दिक शुभेच्छा!
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी. (बालरोग))
(© वॉट्सॲप संपर्क- 8329381615)
(© www.dramittukarampatil.blogspot.com)



Kya baat hai 👌👌
ReplyDelete