फिफा वर्ल्ड कप २०२६: एक अविस्मरणीय महाकाव्य (Fifa World Cup 2026)

फिफा वर्ल्ड कप २०२६: एक अविस्मरणीय महाकाव्य

(फुटबॉल: जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान)

(लेखक: © डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)




फिफा वर्ल्ड कप: जागतिक फुटबॉलचा एक उत्सव

काही महोत्सव असे असतात, जे नुसते डोळ्यांनी पाहायचे नसतात- ते फक्त हृदयाने अनुभवायचे असतात! फिफा वर्ल्ड कप २०२६ हा असाच एक महोत्सव!

अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या भूमीवर पाच आठवडे चाललेले हे एक जिवंत महाकाव्य होते — अठ्ठेचाळीस संघांच्या स्वप्नांनी सुरू झालेले, आणि शेवटी एकाच संघाचे स्वप्न सत्यात उतरविणारे..!

२०२६ चा विश्वचषक कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिकेत भरविण्याचे निश्चित झाले तो क्षण!


‘एक विश्व, एक खेळ, एक विजेता’ या घोषवाक्याने सुरू झालेला आणि ४८ संघांचा समावेश असलेल्या ‘फिफा वर्ल्ड कप २०२६’ मधील १०४ सामन्यांचे यजमानपद १६ शहरांनी भूषविले.


लिव्हरपूलचे दिग्गज व्यवस्थापक बिल शँकली एकदा म्हणाले होते — "Some people think football is a matter of life and death. I can assure you it is much, much more important than that!" (काही लोकांना असे वाटते की फुटबॉल हा जीवन-मरणाचा प्रश्न आहे. मी तुम्हाला खात्री देतो की, तो यापेक्षाही खूप, खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे!) हे वाक्य वाचताना हसू येऊ शकते; पण चालू वर्ल्ड कपने ते किती खरे आहे हे दाखवून दिले आहे. फुटबॉल हा शेवटी एक आरसा असतो — तो आपल्याला माणसाचे खरे रूप दाखवतो. कधी कधी यश किती क्षणभंगुर असते आणि अपयश किती चिरकाल टिकू शकते हे या वर्ल्ड कपने पुन्हा एकदा दाखवले. एका बाजूला एक चाळिशीच्या उंबरठ्यावरचा दिग्गज डोळ्यांत अश्रू घेऊन मैदान सोडत होता, तर दुसऱ्या बाजूला एक अठरा वर्षांचा पोरसवदा मुलगा इतिहासाची पाने नव्याने लिहीत होता. एका बाजूला एक चाळीस वर्षांचा गोलरक्षक आपल्या आईला पहिल्यांदाच स्वतःला खेळताना पाहण्याचे स्वप्न पूर्ण करत होता; तर दुसऱ्या बाजूला पाच वेळच्या जगज्जेत्या संघाचे साम्राज्य एका निवांत संध्याकाळी हतबलपणे धुळीस मिसळत होते. आणि, हा विरोधाभासच फुटबॉलला एकाच वेळी इतके सुंदर आणि इतके क्रूर बनवतो.

डच तत्त्वज्ञ-फुटबॉलपटू योहान क्रॉयफ म्हणायचा — "Playing simple football is the hardest thing there is." (साधा फुटबॉल खेळणे ही सर्वांत कठीण गोष्ट असते.) आणि हा चालू वर्ल्ड कप याच तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण ठरला आहे — जिथे सर्वांत साधे, सर्वांत संयमी संघ अखेर सर्वांत दूरवर पोहोचले; आणि जिथे, प्रत्येक मोठ्या चमत्काराचा जन्म एका लहानशा आणि नम्र सुरुवातीतून झाला.

चला, मग या भव्य प्रवासाचे थोडे अवलोकन करुया — पहिला सामना सुरू झाल्याच्या पहिल्या शिट्टीपासून ते अंतिम सामन्याच्या अंतिम शिट्टीपर्यंत.


एक भव्य मंच : तीन यजमान देश आणि अठ्ठेचाळीस स्वप्नं..!

वर्ल्ड कप स्पर्धेचा बृहद् आराखडा

प्रथमच ४८ देशांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सहभागी देशांची १२ गटांत विभागणी करण्यात आली होती.

या वर्ल्ड कपचा आकारच इतका प्रचंड होता, की त्याची तुलना याआधीच्या कोणत्याही आवृत्तीशी करता येणार नाही. सोळा शहरं, तीन देश आणि एकशे चार सामने — लॉस एंजेलिस ते न्यूयॉर्क, मेक्सिको सिटी ते टोरँटो, या सगळ्या भूभागावर केवळ फुटबॉलज्वर पसरला होता. (अमेरिकेतल्या बार आणि रेस्टॉरंट्समध्ये या स्पर्धेच्या पहिल्या चार आठवड्यांतच बीअरच्या विक्रीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. फुटबॉल हा खेळ या अमेरिकन भूमीवरही किती खोलवर रुजतो आहे, याचे हे एक गमतीशीर पण बोलके उदाहरण आहे.) स्टेडियमबाहेर वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे रंग, वेगवेगळे झेंडे एकत्र फडकताना दिसत होते — कोलंबियाचा पिवळा-निळा-लाल, मोरोक्कोचा लाल-हिरवा, नॉर्वेचा भडक लाल आणि या सगळ्यांच्या मध्ये उभा असलेला ब्राझील, जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन आणि फ्रान्सचा विशाल चाहतावर्ग! हा नुसता खेळ नसतो, तर ती असते एक जागतिक यात्रा किंवा फुटबॉलचा महाकुंभ! इथे प्रत्येक राष्ट्राने आपली संस्कृती, आपला अभिमान आणि आपली आशा सोबत घेऊन या भूमीवर पाऊल ठेवले होते...

देशांनुसार फुटबॉल फॅन्स


साखळी फेरी (Round of 48): स्वप्नांची पहाट आणि अंडरडॉग्जची शौर्यगाथा-

अठ्ठेचाळीस संघांचा हा पहिलाच वर्ल्ड कप — फुटबॉलच्या इतिहासातला सर्वांत मोठा उत्सव. बारा गटांमध्ये विभागलेल्या या संघांनी सुरुवातीपासूनच एक गोष्ट स्पष्ट केली होती — यंदा कोणीही कुठल्याही संघाला गृहीत धरण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. मोठ्या संघांच्या सावलीत लपलेल्या छोट्या छोट्या देशांनी आपल्या हृदयातली जिद्दीची आग मैदानावर उतरवली आणि जगाला दाखवून दिले की, फुटबॉल हा फक्त संसाधनांच्या उपलब्धतेचा खेळ नसतो तर तो असतो विश्वासाचा, जिद्दीचा आणि सामूहिक स्वप्नांचा खेळ! जिवंतपणी दंतकथा बनलेला ब्राझीलचा पेले म्हणायचा- “Success is no accident!” (यश हा अपघात नसतो!) — आणि या साखळी फेरीत अनेक लहान राष्ट्रांनी हेच सिद्ध केले; आपल्या कष्टातून, चिकाटीतून आणि सामूहिक विश्वासातून.

शकिराने आफ्रिकेतल्या फुटबॉल वर्ल्ड कपच्या आधी प्रसृत केलेल्या गाण्यांतील वाक्ये याच काय, पण प्रत्येक स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूला लागू पडते...

You’re a good soldier,

Choosing your battles;

Pick yourself up and dust yourself off;

Get back in the saddle,

You're on the frontline,

Everyone's watching;

You know it's serious..!

अठ्ठेचाळीस संघांच्या या पहिल्याच फेरीत भरपूर नाट्य भरले होते. जॉर्डनने लीबियाविरुद्धच्या एका थरारक क्वालिफायरमध्ये शेवटच्या क्षणी ऑफसाईडमुळे गोल गमावला होता — पण नंतर मुख्य स्पर्धेत उतरून त्यांनी दाखवून दिलं की ते गृहीत धरण्यासारखे नाहीत. फिलिपाईन्स, हैती आणि इतर अनेक पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये उतरलेल्या संघांनी आपापल्या परीने या फेरीला संस्मरणीय बनविले- प्रत्येक गोल, प्रत्येक बरोबरी आणि प्रत्येक विजय ही त्या त्या देशांसाठी इतिहासाची पाने होती.

आशिया खंडाच्या गटातून जॉर्डन पहिल्यांदाच फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरले.

केप व्हर्दे — पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरचे दहा बेटांचे हे छोटेसे राष्ट्र. आफ्रिकेतल्या आपल्या गटात कॅमेरूनसारख्या बलाढ्य संघाला मागे टाकत त्यांनी पहिल्यांदाच वर्ल्ड कपचे तिकीट मिळविले होते — आणि तेही निर्णायक पात्रता सामन्यात ऐन मोक्याच्या क्षणी लिबियाविरुद्ध एका वादग्रस्त ऑफसाईडचा निर्णय झेलून; आणि नंतर, एस्वातिनीविरुद्ध दुसऱ्या हाफमध्ये दोन गोल झळकावून. पण, एकदा मुख्य स्पर्धेत मैदानावर उतरल्यावर मात्र त्यांनी भीमपराक्रम केला. साखळी फेरीत अतिबलाढ्य स्पेनविरुद्ध गोलशून्य बरोबरी (हा तर अतिभीमपराक्रम मानला पाहिजे!), बलाढ्य उरुग्वेविरुद्ध २-२ बरोबरी (वर्ल्ड कप इतिहासातले त्यांचे पहिलेवहिले दोन गोल!), आणि सौदी अरेबियाविरुद्ध पुन्हा गोलशून्य बरोबरी साधत, एकही सामना न गमावता, त्यांनी थेट बाद (नॉक-आउट) फेरी गाठली -- वर्ल्ड कपच्या इतिहासातला सर्वांत छोटा देश जो नॉक-आउट फेरीपर्यंत पोहोचला; तेही आपल्या पहिल्याच वर्ल्ड कप पदार्पणात! त्यांचे प्रशिक्षक बुबिस्ताच्या मार्गदर्शनाखाली पात्रता फेरीत एकही सामना न गमावणाऱ्या या संघाने जगातल्या करोडो प्रेक्षकांची मने जिंकली. रस्त्यावर, गल्लीबोळात, समुद्रकिनाऱ्यांवर हजारो केप व्हर्दियन आपल्या राष्ट्रध्वजाला घेऊन नाचत होते; जी दृश्ये या वर्ल्ड कपमधली सर्वांत हृदयविहंगम दृश्ये ठरली.

फुटबॉल वर्ल्ड कपच्या आधी या देशाचे नाव कुणी कधी ऐकलेही नसेल!

डोंगराएवढी कामगिरी करणारा ठिपक्याएवढा देश!

कुरासाओ — दीड लाख लोकसंख्येचे हे इवलेसे कॅरिबियन बेट! वर्ल्ड कप इतिहासातील हे सर्वांत लहान राष्ट्र ठरले, जे या स्पर्धेत खेळले. जमैकाविरुद्धच्या गोलशून्य बरोबरीने त्यांनी पात्रता मिळवली, तेव्हा संपूर्ण बेटावर जल्लोष झाला होता. तब्बल अष्ट्याहत्तर वर्षांचे डिक अ‍ॅडव्होकाट — वर्ल्ड कप इतिहासातले सर्वांत वयस्कर प्रशिक्षक — त्यांना इथवर घेऊन आले होते. पण, स्पर्धेआधीच त्यांच्या मुलीच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला आणि फ्रेड रुटेन यांनी सूत्रं हाती घेतली. त्यांनीही डिक यांची बचावात्मक ४-२-३-१ हीच रचना कायम राखली. एका वृद्ध माणसाचा कौटुंबिक त्याग आणि एका इवल्याशा बेटाचे स्वप्न हीसुद्धा या वर्ल्ड कपची एक न विसरता येणारी उपकथा ठरली.

कोल्हापूर जिल्ह्यातील एखाद्या तालुक्याच्या ठिकाणापेक्षाही कमी लोकसंख्या असणारा कॅरिबियन समूहातील ‘कुरासाओ’ नावाचा देश!

जॉर्डन आणि उझबेकिस्तान — हे दोन्ही आशियाई देशही आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये खेळत होते. उझबेकिस्तानचे नेतृत्व करत होते इटलीचे माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार आणि बॅलन डी'ओर विजेते फॅबिओ कान्नाव्हारो! या महान बचावपटूने आता आशियातल्या एका नवोदित संघाला थेट जागतिक मंचावर आणले होते. ओस्टोन उरुनोव्हसारख्या चपळ ड्रिबलरने आणि अब्बोस फायझुल्लायेवसारख्या युवा स्टाईलने आपल्या खेळीने अनेकांना आश्चर्यचकित केले. डीआर काँगोविरुद्धच्या सामन्यात मागे पडूनही उझबेकिस्तानने चिवट झुंज दिली, पण अखेर काँगोने दमदार पुनरागमन करत ३-१ असा विजय मिळवत नॉक-आउट फेरी गाठली. बावन्न वर्षांनंतर काँगोचा हा पहिलाच वर्ल्ड कप होता आणि त्यांनी तो अविस्मरणीय बनवला. जॉर्डन साखळी फेरीत चौथ्या स्थानावर राहून बाद झाला, पण त्यांनी अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाला अखेरपर्यंत झुंजवत ठेवले. अखेरीस मेस्सी बदली खेळाडू म्हणून उतरल्यानंतरच अर्जेंटिनाला ३-१ असा विजय मिळवता आला.

कोलंबिया — स्पर्धेपूर्वी फारशी चर्चा नसलेला हा दक्षिण अमेरिकन संघ ‘डार्क हॉर्स’ ठरला. पोर्तुगालसारख्या बलाढ्य संघाला गोलशून्य बरोबरीत रोखत त्यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावले; तेही रोनाल्डोच्या पोर्तुगालला दुसऱ्या क्रमांकावर ढकलत. लॉस काफेटेरोसच्या या शांत, संयमी खेळाने अनेक तज्ज्ञांना चकित केले. पुढेही स्वित्झर्लंडविरुद्धच्या ‘राऊंड ऑफ १६’च्या थरारक सामन्यातही त्यांनी आपली छाप पाडली.

वर्ल्ड कपमध्ये खळबळ उडवून देण्याची क्षमता असणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी एक देश म्हणजे कोलंबिया!

मोरोक्को — आफ्रिकेचा खराखुरा शिलेदार. २०२२ च्या ऐतिहासिक सेमीफायनल कामगिरीनंतर यंदाही मोरोक्कोने सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली; जो फक्त या देशासाठीच नव्हे, तर संपूर्ण आफ्रिका खंडासाठी एक ऐतिहासिक टप्पा होता. अक्राफ हकिमीच्या नेतृत्वाखालील हा संघ साखळी फेरीत अपराजित राहिला. ‘राऊंड ऑफ ३२’ मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या वाढीव १२० मिनिटांच्या चुरशीच्या झुंजीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये मोरोक्को पराभूत झाला. पण, त्यांनी दाखवलेली जिद्द आफ्रिकन फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देणारी होती. २०३० च्या वर्ल्ड कपचे यजमानपद भूषविणाऱ्या मोरोक्कोसाठी हा प्रवास पुढच्या मोठ्या स्वप्नाची नांदी ठरेल यात काहीच शंका नाही.

आफ्रिका खंडाला वर्ल्ड कप आपल्या खंडात आणू शकेल असा विश्वास वाटणारा देश म्हणजे मोरोक्को! इतकेच काय, पण २०३० च्या आगामी वर्ल्ड कप स्पर्धेचे सह-यजमानपदही मोरोक्कोकडे असणार आहे!

नॉर्वे- याच साखळी फेरीत आणखी एक गोष्ट घडली, जी नंतर या वर्ल्ड कपची दिशा ठरवणार होती. फ्रान्सविरुद्धच्या तिसऱ्या साखळी सामन्यात, पात्रता आधीच निश्चित झाल्याने, प्रशिक्षक स्टाले सोलबाकेन यांनी अर्लिंग हालँडला विश्रांती देत थेट बाकावर बसविले होते. त्या सामन्यात फ्रान्सच्या ओस्मान डेम्बेलेने हॅट्रिक झळकावली आणि नॉर्वेला ३-० असा दारुण पराभव पत्करावा लागला (एकूण गोलफरक १-४). त्या क्षणी कोणालाही वाटले नव्हते की हाच निर्णय पुढे नॉक-आउट फेरीत नॉर्वेसाठी वरदान ठरेल.

स्टाले सोलबाकेन: नॉर्वेचे मुख्य प्रशिक्षक 

यजमान राष्ट्रांपैकी अमेरिकेनेही आपल्या घरच्या मैदानावर चांगली सुरुवात केली — पॅराग्वेविरुद्धच्या सामन्यात फोलारिन बालोगुन आणि जिओव्हानी रेना यांनी गोल झळकावत यजमान संघाला आत्मविश्वास दिला. या साखळी फेरीत जर्मनी आणि नेदरलँड्ससारखे पारंपरिक बलाढ्य संघही अनपेक्षित अडचणींना सामोरे गेले. जर्मनीला पुढे पेनल्टीत पॅराग्वेकडून धक्का बसला, तर नेदरलँड्सने मोरोक्कोच्या हातून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव पत्करला. या दोन घटनांनी दाखवून दिलं की या वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही संघाचा गड अभेद्य नव्हता. प्रत्येक सामना हा स्वतःमध्येच एक लढाई होता आणि पूर्वेतिहास किंवा पूर्वप्रतिष्ठा कोणालाही आपोआप पुढच्या फेरीत घेऊन जाण्याच्या कामी येत नव्हती.

दुसरीकडे, स्पेनच्या छावणीत मात्र एक वेगळाच चमत्कार घडत होता. सौदी अरेबियाविरुद्धच्या सामन्यात अवघ्या अकराव्या मिनिटाला एका अठरा वर्षांच्या पोरसवदा मुलग्याने जाळ्यात चेंडू धाडला आणि इतिहास लिहिला— हाच तो लामिन यामाल. अठरा वर्षे आणि तीनशे त्रेचाळीस दिवसांचा हा मुलगा गावीच्या पाठोपाठ स्पेनचा दुसरा सर्वांत युवा वर्ल्ड कप गोलस्कोअरर ठरला आणि त्याने थेट पेलेच्या विक्रमाशी नाते जोडले. 

केवळ १८ वर्षांच्या लामीन यामालने सौदीविरुद्धच्या सामन्यात ११ व्या मिनिटाला गोल करून एक ऐतिहासिक क्षण स्वतःच्या नावावर करून टाकला!

त्या सामन्यात स्पेनने सहा गोल करत आपल्या दाव्याची दमदार सुरुवात केली आणि मिकेल ओयारझाबालने पहिल्या पंचवीस मिनिटांत तीन गोल-योगदान देत गेल्या साठ वर्षांतला एक दुर्मीळ विक्रम आपल्या नावावर केला.

अर्जेंटिनाची सुरुवात मात्र या साखळी फेरीत एका वेगळ्याच इतिहासाची साक्षीदार ठरली; कारण याच फेरीत लिओनेल मेस्सीने अशी काही करामत घडवून आणली, जे फुटबॉल इतिहासात याआधी कधीच घडले नव्हते.

लिओनेल मेस्सी: आकड्यांच्या पलीकडचा जादूगार-

अर्जेंटिनाच्या सलामीच्याच सामन्यात अल्जेरियाविरुद्ध मेस्सीने हॅट्ट्रिक झळकावली- त्याच्या वर्ल्ड कप कारकिर्दीतली पहिलीच हॅट्ट्रिक; आणि तीही अडतीस वर्षे व तीनशे सत्तावन्न दिवसांचे वय असताना... वर्ल्ड कप इतिहासातला सर्वांत वयस्कर हॅट्ट्रिक स्कोअरर ठरत मेस्सीने रोनाल्डोने २०१८ मध्ये स्पेनविरुद्ध केलेला विक्रम मागे टाकला. गंमत म्हणजे, याच सामन्यात त्याने एक पेनल्टीही हुकवली. पण त्या एका चुकीने त्याचा आत्मविश्वास तसूभरही कमी झाला नाही; अर्थात मेस्सीपूजकांसाठी तोही एक धक्काच! या हॅट्ट्रिकसह त्याने जर्मनीच्या मिरोस्लाव क्लोसेच्या सोळा गोलच्या विक्रमाशी बरोबरी साधली. मग ऑस्ट्रियाविरुद्ध त्याने आणखी दोन गोल झळकावले — एक पहिल्या हाफमध्ये आणि एक स्टॉपेज टाइममध्ये आणि क्लोसेचा विक्रम मागे टाकत तो ‘त्यावेळी’ वर्ल्ड कप इतिहासातला सर्वकालीन सर्वोच्च गोलस्कोअरर ठरला. तसेच ब्राझीलच्या मार्टाच्या (महिला वर्ल्ड कपमधल्या) सतरा गोलच्या विक्रमालाही मागे टाकत तो पुरुष आणि महिला दोन्ही वर्ल्ड कपमधला सर्वकालीन सर्वोच्च गोलस्कोअरर ठरला.


या क्षणी क्लोसेने स्वतः मेस्सीबद्दल एक साधं पण बोलकं वाक्य उच्चारलं होतं — “Messi is simply Messi!” (“मेस्सी म्हणजे मेस्सीच!”) एका महान गोलस्कोअररने दुसऱ्या महान गोलस्कोअररला दिलेली ही खरीखुरी दाद होती. आणि पुढे जॉर्डनविरुद्ध आणखी एक गोल करत मेस्सीने आपली गोलसंख्या एकोणीसपर्यंत नेली. त्याचा सहकारी अलेक्सिस मॅक अलिस्टर एकदा म्हणाला होता, “Leo is the most important of them all.”(“लिओ या सगळ्यांत सर्वात महत्त्वाचा आहे.”) त्याचे हे वाक्य संपूर्ण संघाची मेस्सीप्रतीची भावना व्यक्त करणारे होते.

स्पर्धा जसजशी पुढे सरकत गेली, तसतसा मेस्सी एकेक विक्रम मोडत गेला. सेमीफायनलपर्यंत त्याच्या नावावर एकवीस वर्ल्ड कप गोल आणि दहा असिस्ट जमा झाले होते, जो एक निर्विवाद, अभेद्य विक्रम आहे. त्याने वर्ल्ड कप इतिहासातल्या सर्वाधिक सामन्यांचा (तीस) विक्रमही आपल्या नावावर केला, आणि रोनाल्डोसोबत सहा वर्ल्ड कप खेळण्याचा दुर्मीळ विक्रमही वाटून घेतला. सलग आठ सामन्यांत गोल करण्याचा विक्रम, दोन वेगवेगळ्या वर्ल्ड कपमध्ये (२०२२ आणि २०२६) सात किंवा त्याहून अधिक गोल करणारा एकमेव खेळाडू ठरण्याचा मान, पाच वेगवेगळ्या वर्ल्ड कपमध्ये गोल-सहाय्य (असिस्ट) देणारा एकमेव खेळाडू, आणि दोन वेळा गोल्डन बॉल (२०१४ आणि २०२२) पटकावणारा एकमेव खेळाडू हे त्याचे मला आठवणारे काही विक्रम. मेस्सीच्या विक्रमांची ही यादी जणू न संपणारी आहे. एकाच वर्ल्ड कपमध्ये (२०२२) साखळी फेरी, राऊंड ऑफ सोळा, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरी या सर्व टप्प्यांत गोल करणाराही तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.

लिओनेल मेस्सीला म्हणूनच सार्वकालीन सर्वांत महान खेळाडू म्हटले जाते.

हा जगातील एकमेव असा खेळाडू असेल ज्याच्या रेकॉर्डसमध्ये वाढत्या वयागणिक केवळ भरच पडत गेली आहे!

आणि तरीही मेस्सी स्वतः याबद्दल किती नम्रपणे बोलतो, हे पाहून थक्क व्हायला होते. एकदा तो म्हणाला होता, “I prefer to win titles with the team...” (“वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघासोबत विजेतेपद जिंकणं मला जास्त प्रिय आहे...”) आणि हेच त्याच्या महानतेचं खरे गमक आहे- आकडे कितीही मोठे झाले, तरी त्याचे पाय कायम जमिनीवरच राहिले.


राऊंड ऑफ ३२: पहिला ‘नॉक आऊट’ राऊंड

केप व्हर्देचा व्होझिन्या- एका गोलरक्षकाची कहाणी!

‘नॉक-आऊट’ फेरीची पहिली पायरी- राऊंड ऑफ ३२- आणि इथेच घडली या वर्ल्ड कपमधली सर्वांत हृदयस्पर्शी गोष्ट. केप व्हर्दे आणि गतविजेता अर्जेंटिना आमनेसामने आले. अर्जेंटिनाचा हल्ला रोखण्यासाठी तटबंदी म्हणून मैदानाच्या दुसऱ्या बाजूला उभा होता, चाळीस वर्षांचा एक गोलरक्षक- व्होझिन्या.

त्याचे खरे नाव जोसिमार डायस. त्याच्या वडिलांना त्याचे नाव अर्जेंटिनाचा दिग्गज स्ट्रायकर होर्खे व्हाल्दानोच्या नावावरून ‘व्हाल्दानो’ ठेवायचं होतं, पण अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली- आणि, त्याऐवजी त्याला ‘व्होझिन्या’ (म्हणजे ‘छोटी आजी’) हे टोपणनाव मिळालं. मिंडेलो या केवळ सत्तर हजार लोकवस्तीच्या छोट्या गावात जन्मलेला हा मुलगा स्ट्रायकर बनण्याचं स्वप्न घेऊन मोठा झाला, पण नियतीने त्याला गोलरक्षक बनवलं- पाहिलेल्या स्वप्नाच्या एकदम विरुद्ध भूमिका. वयाच्या पंचविसाव्या वर्षी- म्हणजे इतरांची कारकीर्द बहरात असण्याच्या वयात असताना तो व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण करता झाला, तेही बातुके या एका अनोळखी स्थानिक क्लबकडून. योगायोग असा, की हे साल होते २००७, तेच साल, ज्या वर्षी स्पेनचा स्टार लामिन यामाल जन्माला आला.

एकोणीस वर्षांच्या संघर्षानंतर, दोनशेहून अधिक सामने खेळल्यानंतर, व्होझिन्या अखेर वर्ल्ड कपच्या मैदानावर उभा होता. साखळी फेरीत स्पेनविरुद्ध त्याने सात अप्रतिम बचाव करत गोलशून्य बरोबरी साधली आणि जगातल्या सर्वोत्तम आक्रमक फळीला एकहाती रोखण्याचा अचाट पराक्रम त्याने केला. मग आला ‘राऊंड ऑफ ३२’चा तो सामना अर्जेंटिनाविरुद्धचा. या सामन्यात स्वतः मेस्सीने एक गोल केला आणि अतिरिक्त वेळेच्या मध्यावधीच्या वेळेला एका कॉर्नर-किकमधून दुसरा गोल घडवून आणला... आणि तरीही केप व्हर्देने ३-२ अशा पराभवापूर्वी अर्जेंटिनाला अक्षरशः घाम फोडला! सामना ३-२ असा अर्जेंटिनाच्या बाजूने संपला, पण शेवटच्या क्षणी अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझला एक अफलातून बचाव करावा लागला, तेव्हाच कुठे केप व्हर्देचा ३-३ चा स्वप्नवत बरोबरीचा प्रयत्न तिथे थांबला. 

सामन्यानंतर व्होझिन्या भावनांनी अक्षरशः ओथंबून गेला. त्याचे प्रशिक्षक बुबिस्ता म्हणाले, “तो भावनांनी उचंबळून आला होता. या क्षणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याने वर्षानुवर्षे संघर्ष केला आहे. हा त्याच्या चिकाटीचा हुंकार आहे.” व्होझिन्याने स्वतः एक इच्छा व्यक्त केली होती की, या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या आईने त्याला मैदानावर खेळताना पहावं’. व्हिसा मिळण्यातील अडचणी आणि पैशांच्या अभावी पूर्ण होण्याची शक्यता नसलेले त्याच्या आईचे ते स्वप्न अखेरीस पूर्ण झाले. त्याला सोशल मीडियावर लाखो नवे चाहते मिळाले आणि केप व्हर्दे तीन माजी वर्ल्ड कप विजेत्यांविरुद्ध (स्पेन, उरुग्वे आणि अर्जेंटिना) एकही सामना निर्धारित नव्वद मिनिटांत न गमावता स्पर्धेतून बाहेर पडला. (खरेतर हा सामना निश्चित झाला तेव्हा माझ्यासारख्या अर्जेंटिनाच्या चाहत्याच्याही मनात खळबळ माजली होती. एका बाजूला मेस्सीसाठी अर्जेंटिना जिंकावी असे वाटत होते; तर त्याचवेळी दुसऱ्या बाजूला केप व्हर्देने पराभूत होऊ नये असेही आम्हाला वाटत होते; पण ‘बाद फेरी’त हे घडणे अशक्य असते. अखेरीस अर्जेंटिना जिंकली, पण केप व्हर्देच्या खेळाने मनात दीर्घकाळ हुरहूर माजवली हे कधीच विसरता येणार नाही.)

व्होझिन्याचा त्याच्या आईबरोबरचा भावूक क्षण!

केप व्हर्देच्या या यशामागे आणखी एक गोष्ट होती, ती म्हणजे त्यांनी घेतलेला प्रतिभेचा शोध. २०१८ मध्ये केप व्हर्दे फुटबॉल महासंघाने डब्लिनमध्ये बँकेत नोकरी करणाऱ्या रॉबर्टो लोपेस या अर्धवेळ बचावपटूला लिंक्डइनवर संदेश पाठवला होता. तो सुरुवातीला त्याकडे स्पॅम मेसेज समजून दुर्लक्ष करत होता; पण नंतर त्याचा विचार बदलला. २०२६ मध्ये हाच रॉबर्टो लोपेस केप व्हर्देच्या बचावाचा कणा बनला आणि स्पेनसारख्या संघाला गोलशून्य रोखण्यात त्याचा मोठा वाटा होता. लपलेल्या प्रतिभेचा शोध घेण्याची त्यांची चिकाटी हीच केप व्हर्देच्या यशाची खरी गुरुकिल्ली ठरली आहे.

कधी कधी एखाद्या कोळशाच्या खाणीतही एखादा ‘हिरा’ अलगदपणे गवसतो!

राऊंड ऑफ १६ : दिग्गजांचा निरोप आणि हुकलेल्या संधींचे दुःख

‘नॉक-आऊट’ फेरी जसजशी पुढे सरकत गेली, तसतशी वर्ल्ड कपने भल्याभल्यांचे बुरखे फाडायला सुरुवात केली. इथे कोणतीही चूक क्षम्य नव्हती- अगदी ती कितीही क्षुल्लक असली तरी! इथे प्रत्येक क्षण अंतिम क्षण ठरत होता आणि प्रत्येक हुकलेली संधी एका आयुष्यभराच्या हुरहुरीत बदलणार होती.

आधी थोडेसे मागे जाऊया.

‘राऊंड ऑफ ३२’मध्ये नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात मोरोक्कोचा आक्रिम हकिमी एक्कावन्नाव्या मिनिटाला एका अवघड पण स्वच्छ (clean) फटक्यासह चेंडू जाळ्यात ढकलणारच होता; पण तो क्रॉसबारला लागून बाहेर आला. उत्तरार्धाच्या भरपाई वेळेत त्याने पुन्हा एक अप्रतिम फ्री-किक गोलजवळ वळवली, पण इस्माईल साईबरीला समोर मोकळी गोलपोस्ट असतानाही चेंडू जाळ्यात ढकलता आला नाही. या दोन क्षणांनी मोरोक्कोच्या नशिबाला कलाटणी दिली आणि सामना अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सने जिंकला. एका सेंटीमीटरने, एका क्षणाच्या चुकीने आफ्रिकेचे आणखी एक स्वप्न विरून गेले.

यश मिळण्यासाठी कष्टाच्या प्रत्येक क्षणाला नशिबाचीही पूरेपूर साथ लागते हेच असे काही काठावर हुकलेले क्षण सांगत असतात!

आणि मग आला ६ जुलैचा ‘तो’ दिवस- जो फुटबॉलच्या इतिहासात कायमचा कोरला गेला. डल्लास स्टेडियमवर स्पेन आणि पोर्तुगाल आमनेसामने उभे ठाकले- इबेरियन डर्बी आणि क्रिस्तियानो रोनाल्डोचा, त्याच्याच शब्दांत, “शेवटचा वर्ल्ड कप”. एक्केचाळीस वर्षांचा हा दिग्गज मैदानावर तितक्याच जिद्दीने लढत होता. पहिल्या हाफमध्येच पोर्तुगालच्या नुनो मेंडिसने एक जबरदस्त फटका मारला- चेंडू स्पेनच्या गोलरक्षक उनाई सिमोनला पूर्णपणे चकवून क्रॉसबारवर आदळला आणि बाहेर गेला. मध्यंतरापूर्वी सिमोनने रोनाल्डोचा एक फटका पुन्हा एकदा रोखला. आणि सामन्याच्या अखेरच्या क्षणांत बर्नार्डो सिल्वाचा एक हेडर सिमोनला चकवून गेला; पण तोही चेंडू क्रॉसबारवरून बाहेर गेला- पोर्तुगालसाठी बरोबरी साधण्याची ती शेवटची सर्वांत मोठी संधी होती आणि तीही हुकली. सामना जवळपास अनिर्णित अवस्थेत नव्वदाव्या मिनिटापर्यंत पोहोचला; आणि मग, स्पेनच्या बदली खेळाडूंनी बाजी पलटवली. फेरान टोरेसचा पास, मिकेल मेरिनोने एकाण्णाव्या मिनिटाला थंड डोक्याने केलेले अप्रतिम फिनिशिंग आणि पोर्तुगालही वर्ल्ड कपमधून फिनिश- रोनाल्डोसह!

पुरुष फुटबॉलच्या मैदानावर जितके रडत असतील, तेवढे ‘सार्वजनिकरीत्या’ अन्यत्र कुठेही रडत नसतील!

रोनाल्डो मैदानावर अश्रू पुसत फिरत होता, चाहत्यांना अभिवादन करत होता. सामन्यानंतर तो म्हणाला, “हे दुःखद आहे, पण साहजिक आहे. पोर्तुगाल फुटबॉलसाठी मी माझे सर्वस्व दिले आहे आणि आता मी शुद्ध अंतःकरणाने निघतो आहे.” सहा वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासह अन्य अगणित विक्रम नावावर केलेल्या रोनाल्डोपासून जगज्जेतेपदाचा चषक कायमच हातभर लांब राहिला. फुटबॉल इतिहासातल्या सर्वांत दिग्गज गोलस्कोअरर्सपैकी एक असणाऱ्या या खेळाडूचे हे सर्वात मोठे अपुरेपण कायम राहिले. फ्रेंच तत्त्वज्ञ अल्बेर काम्यूने एकदा लिहिले होते, “Everything I know... I owe it to football.” (“माझी नैतिकतेबद्दलची सर्व जाणीव ही फुटबॉलमुळेच आहे.”). आणि रोनाल्डोच्या या निरोपातही तेच तत्त्वज्ञान दिसते- जिंकणे आणि हरणे हे दोन्ही त्याच खेळाचा भाग आहेत; आणि दोन्हीतूनही माणूस काहीतरी शिकत असतो.

आणि... त्याच दिवशी, दुसऱ्या एका मैदानावर आणखी एक बलाढ्य साम्राज्य कोसळत होते. ब्राझील- पाच वेळचा जगज्जेता- नॉर्वेसमोर उभा होता. आणि, नॉर्वेने तो हालँड- ज्याला साखळी फेरीत बाकावर बसविले होते- त्या अस्त्राला आता पूर्ण ताकदीनिशी ब्राझीलवर सोडले होते. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला नॉर्वेच्या पॅट्रिक बर्गने चेंडू जाळ्यात रोवला, पण ऑफसाईडमुळे तो गोल रद्द झाला. एक थरारक सुरुवात, जी क्षणार्धात विरून गेली. मग ब्राझीलला पेनल्टी मिळाली, आणि ब्रुनो गिमाराएसने फटका मारला, पण नॉर्वेच्या पस्तीस वर्षांच्या गोलरक्षक ओर्यान न्यलँडने अफलातून झेप घेत ती रोखली- जणू काही संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य त्याच्या हातात असल्यासारखी! न्यलँडच्या या भिंतीसारख्या बचावानंतर हालँडने बॉक्सच्या वरच्या टोकातून एक जबरदस्त फटका मारत नॉर्वेला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्राझीलला उशिरा पेनल्टी मिळाली, आणि नेयमार, जो बाकावर (बेंचवर) होता, त्याने मध्यंतरानंतर मैदानात उतरून स्टॉपेज टाइममध्ये तो पेनल्टी गोल केला — कदाचित त्याचा शेवटचा वर्ल्ड कप गोल — पण तोपर्यंत ‘बराच’ उशीर झाला होता. १९९० नंतरची ही ब्राझीलची सर्वांत लवकर झालेली वर्ल्ड कप एक्झिट होती आणि नॉर्वेसाठी १९९८ नंतरची सर्वात मोठी कामगिरी!

सांघिक प्रयत्नांपेक्षा नेयमार आणि व्हिनिशियस ज्युनिअर अशा वैयक्तिक करिश्मा असणाऱ्या खेळाडूंवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे सर्वाधिक पाच वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलची दिवसेंदिवस अधोगती होत गेली आहे असा निष्कर्ष फुटबॉल तज्ज्ञांनी मांडला आहे.

सामन्यानंतर नेयमारच्या डोळ्यांत जे दुःख दिसलं, ते शब्दांत मांडणे कठीण आहे. मैदानावर एका पिवळ्या कार्डसाठी ओडेगार्डला अडवताना दिसलेली त्याची हताश चीडचीड, आणि नंतरचे ते स्तब्ध मौन — जणू त्याला स्वतःलाच कळत नव्हते की आता पुढे काय! “मी पुन्हा कधी ब्राझीलसाठी खेळेन की नाही, मला माहीत नाही,” असे त्याने सांगितले आणि फुटबॉल जगत एका क्षणासाठी स्तब्ध झाले. त्याची पत्नी ब्रुना बियांकार्डी त्याच्या शेजारी उभी राहून त्याला सावरत होती — एका महान खेळाडूच्या हरण्यातले एकटेपण आणि त्यात एका जोडीदाराचा आधार- खरोखरच एक भावूक क्षण!

नेयमारच्या नावावर असणाऱ्या अनेक रेकॉर्ड्सपैकी हा एक!

दोन महान खेळाडूंचे दोन वेगवेगळे शेवट झाले- एक अश्रूंसह शांतपणे, प्रतिष्ठेने आणि दुसरा अनिश्चिततेच्या धुक्यात; पण दोन्हीही अपुरेपणाच्या अलग-अलग वेदनांसह..!

या दोन मोठ्या धक्क्यांव्यतिरिक्त फ्रान्सने आपला दबदबा कायम राखला. किलियन एम्बाप्पेच्या नेतृत्वाखाली फ्रान्स हा एकमेव संघ ठरला, ज्याने अतिरिक्त वेळेची गरज न पडता निर्धारित वेळेत आपले सर्व पाचही सामने जिंकले.

अर्जेंटिना विरुद्ध इजिप्तचा सामना तर या संपूर्ण वर्ल्ड कपमधल्या सर्वाधिक रोमहर्षक लढतींपैकी एक ठरला. 

मेस्सीने एका अप्रतिम डाव्या पायाच्या व्हॉलीने त्र्याऐंशीव्या मिनिटाला बरोबरी साधली. सामना २-२ असा बरोबरीत असताना क्रिस्तियान रोमेरोने मेस्सीच्या क्रॉसवरून हेडर मारला, जो इजिप्तच्या गोलरक्षकाच्या हातावर आदळून जाळ्यात गेला, आणि अर्जेंटिनाने ३-२ असा थरारक विजय मिळवला. या सामन्यातल्या पंचांच्या काही निर्णयांवरून बरीच चर्चाही रंगली, पण अर्जेंटिनाने हा कठीण अडथळा पार केला. (सोशल मीडियाच्या काळात अशा चर्चा होत राहणार. प्रेक्षकांनी हे समजून घेणे गरजेचे आहे की, फुटबॉल हा क्रिकेटसारखा संथगतीने खेळला जाणारा खेळ नसून तो अतिवेगवान खेळांपैकी एक खेळ आहे. त्यामुळे अशा खेळात पंचांकडून एखाद-दुसरी चूक किंवा एखाद-दुसऱ्या चुकीकडे दुर्लक्ष होणे यांपैकी काहीही घडू शकते. अर्थाय VAR सारखे प्रगत तंत्रज्ञान अशा वेळी कामाला येते; पण मानवी चुका पूर्णतः टाळणे शक्य नसते!)


कोलंबियाने आपला ‘डार्क हॉर्स’ दर्जा सिद्ध करत घानाविरुद्ध झुंज दिली आणि स्वित्झर्लंडविरुद्धच्या ‘राऊंड ऑफ १६’च्या सामन्यात १२० मिनिटांच्या बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होण्याआधी कोलंबियाच्या जॉन लुकुमीचा एक शक्तिशाली हेडर क्रॉसबारवर आदळून परतला — बरोबरीची शेवटची संधी हुकली. इंग्लंडने डीआर काँगोविरुद्ध एका दमदार पुनरागमनासह विजय मिळवला, तर बेल्जियमने अमेरिकेला नमवत उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट कापले — यजमान संघाचा प्रवास इथेच थांबला, पण त्यांनी दाखवलेल्या आक्रमक खेळाने अमेरिकन फुटबॉलच्या भविष्याविषयी आशा निर्माण केली. (मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलागनला रेफरींनी दिलेल्या ‘रेड कार्ड’च्या निमित्ताने फिफा या सार्वभौम फुटबॉल संस्थेच्या कारभारात केलेल्या हस्तक्षेपाने आणि फिफा चक्क त्यापुढे नमल्याने फिफाच्या निःपक्षपातीपणावर उघड उघड बालंट आले. फिफामध्ये एखाद्या राजकारण्याने सरळ सरळ केलेल्या हस्तक्षेपाचे हेही एक दुर्मीळच उदाहरण!)

नॉर्वे: एका हृदयविदारक झटक्यातून जन्मलेली ही परीकथा आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही! आतापर्यंत आपण नॉर्वेच्या यशाबद्दल थोडक्यात बोललो; पण त्यांची ही कहाणी इतकी विलक्षण आहे, की तिला स्वतंत्र न्याय द्यायलाच हवा.

१९९८ नंतर — म्हणजे तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर — नॉर्वे प्रथमच वर्ल्ड कपमध्ये पोहोचला होता. आणि हे साध्य करणारा माणूस होता प्रशिक्षक स्टाले सोलबाकेन; ज्यांची स्वतःचीच जीवनकहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी आहे. २००१ साली आपल्या क्रिडा कारकिर्दीच्या ऐन बहरात असतानाच सोलबाकेनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, ज्यामुळे तब्बल सात मिनिटे त्यांचे हृदय बंद पडले होते. डॉक्टरांनी त्यांना जीवदान दिले, पण त्यांची खेळाडू म्हणून कारकीर्द तिथेच संपली. मृत्यूच्या दारातून परत आलेला हा माणूस मग प्रशिक्षक बनला. त्याने मग एफ.सी. कोपनहेगनला दोन वेळा डॅनिश विजेतेपद मिळवून दिले, वुल्व्हरहॅम्प्टन आणि कोलनसारख्या क्लब्जचे नेतृत्व केले आणि अखेरीस २०२० मध्ये नॉर्वेची सूत्रे हातात घेतली.

सुरुवात मात्र अजिबात सुकर नव्हती. युरो २०२४ च्या पात्रता फेरीत नॉर्वे स्कॉटलंडपेक्षा सहा गुणांनी मागे राहून तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आणि एका मोठ्या स्पर्धेत पोहोचण्यात अपयशी ठरल्यानंतर सोलबाकेन यांच्यावर राजीनाम्याचा दबाव आला. पण मग वर्ल्ड कप पात्रता फेरी सुरू झाली आणि सगळंच बदललं. नॉर्वेने आपल्या गटात आठपैकी आठ सामने जिंकत परिपूर्ण विक्रम नोंदवला. त्यावेळी नॉर्वेने मोल्दोव्हाला ११-१ असं चिरडलं, इस्रायलला ५-० आणि ४-१ असं हरवलं, आणि इटलीसारख्या बलाढ्य संघालाही ३-० आणि ४-१ असं नमवलं. युरोपातल्या फक्त नऊ संघांनाच आजपावेतो हा परिपूर्ण पात्रता विक्रम साध्य करता आला आहे आणि नॉर्वे त्यापैकी एक ठरला आहे.


मुख्य स्पर्धेत नॉर्वेचा प्रवास असा राहिला- इराकविरुद्ध ४-१, सेनेगलविरुद्ध ३-२ असे विजय; आणि फ्रान्सविरुद्ध (हालँडला विश्रांती देऊन) १-४ असा पराभव, तरीही त्यांनी गटात दुसरे स्थान प्राप्त केले. मग ‘राऊंड ऑफ ३२’मध्ये आयव्हरी कोस्टविरुद्ध २-१ असा विजय, ‘राऊंड ऑफ १६’मध्ये ब्राझीलसारख्या पाच वेळच्या जगज्जेत्याला २-१ असं नमवत नॉर्वेच्या इतिहासातली सर्वोत्तम कामगिरी आणि अखेर उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडकडून अतिरिक्त वेळेत १-२ असा पराभव! पण; तोपर्यंत नॉर्वेने आपले नाव इतिहासात कोरले होते.

कर्णधार मार्टिन ओडेगार्ड, जो वयाच्या पंधराव्या वर्षीच नॉर्वेच्या राष्ट्रीय संघाकडून पदार्पण करता झाला होता, त्याने मधल्या फळीतून संघाला दिशा दिली; तर पस्तीस वर्षांचा अनुभवी गोलरक्षक ओर्यान न्यलँड आणि सँडर बर्गसारखा मधल्या फळीतल्या खेळाडूंनी भक्कम कामगिरी केली. अँटोनियो नुसासारख्या एकवीस वर्षांच्या युवा स्टारनेही ‘नॉक-आऊट’ फेरीत गोल झळकावत आपली छाप सोडली. ब्राझीलविरुद्धच्या ऐतिहासिक विजयानंतर सोलबाकेन म्हणाले होते, ‘हा एक अप्रतिम संघ आहे!’ ओस्लोपासून ते नॉर्वेच्या लहान-लहान गावांपर्यंत, संपूर्ण देशाने एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. मृत्यूच्या दारातून परतलेल्या एका माणसाने आपल्या देशाला अठ्ठावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा वर्ल्ड कपच्या नकाशावर ठळकपणे आणले होते.

नॉर्वेचा संघ २८ वर्षांपूर्वी जेव्हा वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला होता, तेव्हा सध्याच्या नॉर्वेच्या संघातील बऱ्याच खेळाडूंचा जन्मही झाला नव्हता!

उपांत्यपूर्व फेरी : हृदयाचा ठोका चुकविणारे सामने

आठ संघांतील चार सामने आणि प्रत्येक सामन्याबरोबर स्वतःची एक स्वतंत्र कथा घेऊन आलेली ही फेरी.

पहिला सामना होता फ्रान्स विरुद्ध मोरोक्को. २०२२ च्या सेमीफायनलचा वचपा घेण्याची संधी फ्रान्ससमोर होती. आफ्रिकेच्या स्वप्नांना विराम देण्याची भूमिका फ्रान्सच्याच वाट्याला आली. पहिल्या हाफमध्ये किलियन एम्बाप्पेची पेनल्टी हुकली; पण त्याने हार मानली नाही. साठाव्या मिनिटाला बॉक्सच्या कडेकडून एक अप्रतिम वळणदार फटका मारत त्याने आपला या वर्ल्ड कपमधला विक्रमी आठवा गोल नोंदवला. हा त्याचा वर्ल्ड कप कारकिर्दीतला विसावा गोल, जेव्हा तो मेस्सीच्या फक्त एक गोल मागे होता. सहा मिनिटांनी त्याने ओस्मान डेम्बेलेला अप्रतिम पास दिला आणि डेम्बेलेने मोरोक्कोचा गोलरक्षक यासिन बुनूला चकवत चेंडू जाळ्यात मारला. फ्रान्सने २-० असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली, पण मोरोक्कोसाठी हाही एक अभिमानास्पद प्रवास होता. त्यांनी ब्राझीलला बरोबरीत रोखले होते, नेदरलँड्सला पेनल्टीत नमवले होते, आणि पुन्हा एकदा उपांत्यपूर्व फेरी गाठत आफ्रिकन फुटबॉलचा झेंडा उंचावत ठेवला होता.

बोस्टन येथे ९ जुलै, २०२६ रोजी झालेल्या उपउपांत्य फेरीतील पराभवानंतर मोरोक्कोच्या अक्राफ हकिमीचे सांत्वन करताना फ्रान्सचा डिसायर ड्यू...

त्याच दिवशी दुसरीकडे स्पेन आणि बेल्जियम आमनेसामने आले आणि हा सामना स्पेनसाठी अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक कठीण ठरला. तिसाव्या मिनिटाला फेबियन रुइझने स्पेनला आघाडी दिली, पण एकेचाळिसाव्या मिनिटाला बेल्जियमच्या शार्ल्स डी केटेलेरेने बरोबरी साधली. केटेलेरेने अभूतपूर्व कामगिरी करत स्पेनचा विश्वविक्रमवीर गोलकीपर उनाई सिमोन याचा सलग ६४९ मिनिटे गोलहीन राहण्याचा विक्रमही संपुष्टात आणला. सामना बरोबरीतच संपण्याच्या मार्गावर असतानाच अठ्ठ्याऐंशीव्या मिनिटाला पुन्हा एकदा मिकेल मेरिनो- जो आधीच्या फेरीत पोर्तुगालविरुद्धही निर्णायक ठरला होता- त्याने एक रिबाउंड चेंडू जाळ्यात ढकलत स्पेनला २-१ असा विजय मिळवून दिला. स्पेनचा संपूर्ण स्पर्धेतला गोलशून्य बचावाचा विक्रम याच सामन्यात मोडला; पण तरीही ते जिंकले.

चार्ल्स केटेलेरे हा पहिल्यांदा उत्कृष्ट टेनिसपटू म्हणून उदयाला आला होता; पण बेल्जियम फुटबॉलचे नशीब चांगले, की तो नंतर फुटबॉल खेळू लागला!

पण खरी नाट्यमयता तर अनुभवायला मिळणार होती, ती तर ११ जुलैसाठीच्या इंग्लंड विरुद्ध नॉर्वे सामन्यात! या सामन्यात प्रथमच गोल्डन बूटचे दोन प्रमुख दावेदार असलेले हॅरी केन आणि एर्लिंग हालँड एकाच मैदानावर आमनेसामने आले होते. सामन्याआधी पत्रकारांनी केनला हालँडशी तुलना करण्यास सांगितलं, तेव्हा त्याने अतिशय नम्रपणे उत्तर दिलं होतं, “आम्ही दोघेही स्ट्रायकर आहोत, पण आमची खेळण्याची पद्धत मात्र वेगळी आहे.” मैदानावर मात्र वेगळेच नाट्य घडले. नॉर्वेच्या आंद्रियास श्येल्डेरुपने पहिल्या हाफमध्ये अफलातून गोल करत नॉर्वेला आघाडी दिली, पण ज्यूड बेलिंगहॅमने मध्यंतराआधी बरोबरी साधली आणि नंतर अतिरिक्त वेळेत आणखी एक गोल करत इंग्लंडला २-१ असा विजय मिळवून दिला. बेलिंगहॅमची ही जोडगोल कामगिरी या वर्ल्ड कपमधल्या सर्वोत्तम व्यक्तिगत कामगिरींपैकी एक ठरली आणि इंग्लंडने १९६६ नंतरच्या पहिल्या विजेतेपदाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले.

बेलिंगहॅमने नॉर्वेविरुद्ध केलेले दोन्ही गोल अप्रतिम होते.

त्याच दिवशी संध्याकाळी अर्जेंटिनाला स्वित्झर्लंडविरुद्ध विजयासाठी पुन्हा एकदा झुंजावे लागले. अलेक्सिस मॅक अलिस्टरच्या सुरुवातीच्या गोलनंतर स्वित्झर्लंडने सदुसष्टाव्या मिनिटाला डॅन नदोयेकरवी बरोबरी साधली आणि सामना अतिरिक्त वेळेत गेला. स्वित्झर्लंडचा ब्रील एम्बोलो दुसऱ्या पिवळ्या कार्डावर बाद झाल्यानंतर ज्युलियन अल्वारेझने एका अप्रतिम वळणदार फटक्याने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली आणि लॉटारो मार्टिनेझने अखेरचा गोल करत ३-१ असा विजय निश्चित केला. अल्वारेझ आणि मार्टिनेझ या दोघांनी मारलेले गोल्स अप्रतिम होते. सोशल मीडियावर वादग्रस्त म्हणून चर्चा झालेले एम्बोलोचे ‘रेड कार्ड’ योग्य नियमांनुसारच दिले गेले होते हे VAR प्रणालीवर अगदी स्पष्टपणे दिसून आले होते. (इच्छुकांनी व्हिडिओ पहावा.)

एम्बोलोला ‘रेड कार्ड’ मिळणार हे त्याचा खेळ पाहता सामन्याच्या सुरुवातीपासूनच कोणीही सांगू शकले असते.


यशस्वी संघांचे शिल्पकार : प्रशिक्षक

प्रत्येक संघाच्या यशामागे नेहमीच एक शांत, पडद्यामागचा शिल्पकार असतो आणि यंदाच्या वर्ल्ड कपनेही असे काही विलक्षण प्रशिक्षक जगासमोर आणले.

लुइस दे ला फुएंते- स्पेनचा हा प्रशिक्षक स्पर्धेपूर्वीच म्हणाला होता, “आम्हाला जिंकावेच लागेल, जिंकावेच लागेल, जिंकावेच लागेल.” त्याने आपले शब्द खरे करून दाखवले. युरो २०२४ चे विजेतेपद आधीच खिशात घातलेल्या या प्रशिक्षकाने स्पेनला एक असा संघ बनविले- जो आक्रमणात चमकदार आणि बचावात अभेद्य आहे- आणि हेच संयोजन त्यांना अंतिम फेरीपर्यंत घेऊन आले आहे.

लिओनेल स्कालोनी- अर्जेंटिनाचा हा प्रशिक्षक २०१८ पासून संघाची धुरा सांभाळतो आहे. २०२१ चा कोपा अमेरिका आणि २०२२ चा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने आपला करार वाढवला आणि आताही तो संघाला त्याच शांत, संयमी नेतृत्वाने घडवतो आहे. मेस्सीभोवती संघबांधणी करणे ही सोपी गोष्ट नाही; पण स्कॅलोनीने ते इतक्या सहजतेने साधले आहे की, आज अर्जेंटिना नुसता मेस्सीवर अवलंबून असलेला संघ राहिलेला नाही, तर एक संपूर्ण, संतुलित संघ बनला आहे.

दिदिए देशाँ- फ्रान्सचा हा अनुभवी प्रशिक्षक गेली चौदा वर्षं संघाची धुरा सांभाळतो आहे. त्याच्या नावावर आहे २०१८ चे विजेतेपद, २०२२ ची अंतिम फेरी, आणि आता २०२६ ची उपांत्य फेरी. पण या वर्ल्ड कपदरम्यानच त्याच्या आयुष्यात एक वैयक्तिक दुःखही आलं; साखळी फेरी सुरू असतानाच त्याने आपली आई गमावली. तरीही त्याने संघाला सावरून धरलं, आणि हा वर्ल्ड कप त्याच्या फ्रान्स प्रशिक्षकपदाचा शेवटचा अध्याय ठरला आहे.‌

थॉमस टुखेल- इंग्लंडचा हा जर्मन प्रशिक्षक आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला. अर्जेंटिनाविरुद्धच्या उपांत्य फेरीतल्या पराभवानंतर त्याच्या काही डावपेचांवर टीका झाली, पण १९६६ नंतरचे पहिले विजेतेपद मिळवण्याच्या इंग्लंडच्या दीर्घ प्रतीक्षेत त्याने महत्त्वाची प्रगती नक्कीच केली. अखेरीस इंग्लंडने फ्रान्सला नमवत या वर्ल्ड कप स्पर्धेत तिसरे स्थान पटकावून १९६६ नंतरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.


स्टाले सोलबाकेन- नॉर्वेच्या या प्रशिक्षकाची कहाणी आपण आधीच पाहिली आहे. मृत्यूच्या दारातून परतलेला हा माणूस आज आपल्या देशाला वर्ल्ड कप इतिहासातल्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत घेऊन गेला आहे.


उपांत्य फेरी : अंतिम चौघांतील चढाओढ 

१९९२ मध्ये फिफाने जागतिक मानांकने (वर्ल्ड रँकिंग्ज) द्यायला सुरू केल्यापासून पहिल्यांदाच मानांकनातील सर्वोच्च चार संघच उपांत्य फेरीत पोहोचण्याची ऐतिहासिक घटना यावर्षीच्या वर्ल्ड कपमध्ये घडली.

१४ जुलैला डल्लास स्टेडियमवर स्पेन आणि फ्रान्स हे दोन्ही युरोपियन देश आमनेसामने आले; तेही एकमेकांविरुद्ध केवळ एक बरोबरी आणि एकही पराभव नसलेला इतिहास घेऊनच! बाविसाव्या मिनिटाला यामालने चेंडू खेळताना फ्रान्सच्या लुकास दीनकडून पेनल्टी मिळवली. काहीजण याचे विश्लेषण यामालचा उच्च फुटबॉल बुद्ध्यांक (IQ) म्हणून करतात. गंमत म्हणजे, ही घटना त्याचा एकोणिसावा वाढदिवस साजरा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी घडली. ओयारझाबालने पेनल्टीतून स्पेनला आघाडी दिली, आणि नंतर अठ्ठावन्नाव्या मिनिटाला पेद्रो पोर्रोने दुसरा गोल करत सामना २-० असा संपवला. फ्रान्सने सामना संपण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न केला. एका फ्री-किकवर किलियन एम्बाप्पेने फटका मारला, पण चेंडू क्रॉसबारवरून खूप उंचावरून बाहेर गेला, आणि त्याच्या चेहऱ्यावरचे निराशेचे भाव सगळं काही सांगून गेले. स्पेनने या संपूर्ण स्पर्धेत फक्त एकच गोल स्वीकारला — बेल्जियमविरुद्ध — बाकी प्रत्येक संघाला त्यांनी गोलशून्य ठेवलं, अगदी फ्रान्ससारख्या तगड्या आक्रमणालाही...

लामीन यामालने ‘मिळवून दिले’ल्या पेनल्टीवर अखेरीस ओयार्झाबालने सुंदर गोल केला.

दुसऱ्या दिवशी, अटलांटामध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंड आमनेसामने आले. हे तर फुटबॉलमधले एक जुने, तिखट प्रतिस्पर्धित्व. इंग्लंडने अँथनी गॉर्डनच्या गोलसह आघाडी घेतली, पण नंतर बचावात्मक पवित्रा घेतल्याने त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागली. मेस्सीने दोन्ही गोलसाठी अप्रतिम पासेस दिले आणि अर्जेंटिनाने उशिरा दोन गोल करत २-१ असा विजय मिळवला. इंग्लंडचे स्वप्न भंगले आणि मेस्सी आणि पर्यायाने अर्जेंटिना पुन्हा एकदा- सलग दुसऱ्यांदा- वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचली.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दोन्ही गोल लिओनेल मेस्सीने दिलेल्या पासवरच करण्यात आले.

सातत्याची कहाणी : सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले संघ

स्पेनची कामगिरी या वर्ल्ड कपमधली सर्वांत सुसंगत आणि प्रभावी कामगिरी ठरली. लुइस दे ला फुएंतेच्या मार्गदर्शनाखाली या संघाने आक्रमण आणि बचाव यांचा एक अप्रतिम समतोल दाखवला. साखळी फेरीपासूनच त्यांनी आपला दबदबा दाखवला. सौदी अरेबियाविरुद्ध सहा गोलचा विजय, आणि नंतर केप व्हर्देसारख्या चिवट बचावाला भेदण्यासाठी संयमाने केलेला खेळ हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘नॉक-आऊट’ फेरीत पोर्तुगाल, बेल्जियम, फ्रान्स या एकाहून एक बलाढ्य संघांना नमवत ते अंतिम फेरीपर्यंत पोहोचले. त्यांनी यातल्या प्रत्येक सामन्यात त्यांच्या संघाचे वेगळे रूप दाखवले; पोर्तुगालविरुद्ध चिवट बचाव, बेल्जियमविरुद्ध चिकाटी, फ्रान्सविरुद्ध निर्विवाद वर्चस्व. यामालसारखा तरुण प्रतिभावंत, पेद्री-गावीसारखी मधली फळी, आणि ओयारझाबाल-फेरान टोरेससारखे धारदार आक्रमक हे सगळे एकत्र येऊन एक अशी टीम तयार झाली, जिने संपूर्ण स्पर्धेत आपला तोल कधीच ढळू दिला नाही. त्यांची सदतीस सामन्यांची अपराजित झेप हा त्यांच्या या सातत्याचा सर्वांत मोठा पुरावा होता. ही गेल्या जवळपास दोन दशकांतली त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. 

अर्जेंटिनासाठी मात्र ही स्पर्धा तितकीशी सोपी ठरली नाही. अर्थात, केप व्हर्दे, जॉर्डन, इजिप्त, स्वित्झर्लंड आणि इंग्लंडविरुद्धचे नाट्यमय आणि अंतिम क्षणांतले विजय हे दाखवतात की या संघात दडपणाखाली सामने जिंकण्याची एक वेगळीच जिगर आहे. साखळी फेरीत जरी त्यांचा खेळ थोडा अस्थिर वाटला, तरी ‘नॉक-आऊट’ फेरीत प्रत्येक अडथळा त्यांनी शेवटच्या क्षणी, कधी अतिरिक्त वेळेत, कधी स्टॉपेज टाइममध्ये पार केला. मेस्सीचे नेतृत्व, अल्वारेझ-मार्टिनेझची आक्रमक जोडी आणि संघाचा अनुभव यांनी अर्जेंटिनाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचवले.

इंग्लंड आणि फ्रान्स या दोन्ही संघांनी सेमीफायनलपर्यंत दमदार प्रवास केला, पण अंतिम टप्प्यात त्यांचा प्रवास एक पाऊल आधीच थांबला. बेलिंगहॅमच्या नेतृत्वाखालील इंग्लंड अर्जेंटिनाच्या अनुभवासमोर कमी पडले. फ्रान्सने संपूर्ण स्पर्धेत अत्यंत सफाईदार खेळ केला- एकही सामना अतिरिक्त वेळेपर्यंत न नेता जिंकणारा एकमेव संघ- पण, स्पेनच्या तेजासमोर तेही निष्प्रभ ठरले.

तिसऱ्या क्रमांकाची लढत: दहा-गोलचा नाट्यमय आणि अनपेक्षित थरार

१८ जुलैला मियामी स्टेडियमवर फ्रान्स आणि इंग्लंड तिसऱ्या क्रमांकासाठी आमनेसामने आले. दोन्ही संघांना अंतिम फेरीत जायचे होते आणि दोघांनाही हा सामना खेळण्याची इच्छा नव्हती. टुखेल स्वतः म्हणाले होते, “कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही इंग्लिश खेळाडूला हा सामना खेळायचा नाहीये. त्यांना अंतिम फेरी खेळायची होती.” पण या सामन्याला एक खास वेगळेपण होते. हा देशाँ यांचा फ्रान्स प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता आणि एम्बाप्पेकडे मेस्सीला मागे टाकत गोल्डन बूट पटकावण्याची शेवटची संधी होती.

आणि मग जे घडले, त्याने साऱ्या जगाला थक्क केले. दोन्ही संघांनी बचावाकडे जवळपास पूर्णपणे दुर्लक्ष करत एक बेफाम, रोमांचक सामना खेळला; आणि, अखेर इंग्लंडने ६-४ असा दहा-गोलचा थरार जिंकला. दोन्ही संघांनी आपले फिरते (rotated)/ दुय्यम संघ मैदानात उतरवले होते आणि जणू ट्रॉफीचं दडपण संपल्यावर दोन्ही बाजूंनी शुद्ध, निर्भेळ आक्रमक फुटबॉल खेळण्याचा निर्धार केला होता. देशाँने आपल्या चौदा वर्षांच्या फ्रान्स प्रशिक्षकपदाचा निरोप एका पराभवाने घेतला; पण त्यांचा वारसा- २०१८ चे विजेतेपद, २०२२ ची अंतिम फेरी, आणि वर्ल्ड कपच्या सलग तीन सेमीफायनल गाठण्याचा विक्रम हे इतिहासात कायम राहील. सामन्यानंतर हे स्पष्ट झाले की, गोल्डन बूटची अंतिम शर्यत आता मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यातच अंतिम सामन्याच्या निकालावर अवलंबून राहणार होती.


अपयशाची शोकांतिका: रोनाल्डो आणि नेमार

फुटबॉल हा खेळच असा आहे, जो महानतम खेळाडूंनाही कधीतरी गुडघे टेकायला लावतो. क्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार- दोघेही आपापल्या पिढीतले सर्वांत तेजस्वी तारे- या वर्ल्ड कपमध्ये आपला प्रवास दुःखद पद्धतीने संपवून गेले.

रोनाल्डोसाठी हा शेवट जवळजवळ काव्यात्म होता- शांत, सन्मानपूर्ण, पण तितकाच वेदनादायक! सहा वर्ल्ड कप खेळूनही, युरोपियन चॅम्पियनशिप जिंकूनही, त्याच्या करिअरमधली सर्वांत मोठी पोकळी- वर्ल्ड कप विजेतेपद- कधीच भरून निघाली नाही. सहा वेगवेगळ्या वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरत त्याने आपल्या शेवटच्या वर्ल्ड कपमध्ये तीन गोल नोंदवले. हा एका महान कारकिर्दीचा एक शांत, पण सन्मानजनक शेवट ठरला.

रेकॉर्डमय करिअर 

नेयमारची कहाणी मात्र अधिक क्लिष्ट आणि वेदनादायक आहे. जखमी असल्यामुळे साखळी फेरीपासूनच तो संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत होता आणि नॉर्वेविरुद्धच्या निर्णायक सामन्यातही त्याला बेंचवरूनच सुरुवात करावी लागली. जेव्हा तो मैदानात उतरला, तेव्हा वेळ आधीच निघून गेली होती. त्याचा स्टॉपेज-टाइम पेनल्टी गोल हा कदाचित त्याचा शेवटचा वर्ल्ड कप गोल असेल. ब्राझीलसाठी १९९० नंतरची ही सर्वांत लवकर झालेली एक्झिट होती. सामन्यानंतर नेयमारच्या पत्नीने त्याला आधार दिला, पण नेयमारने स्वतः भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे करत निवृत्ती जाहीर केली. कदाचित तो पुन्हा कधीच ब्राझीलसाठी खेळणार नाही. एका पिढीतल्या सर्वांत प्रतिभावान खेळाडूचा हा असा दिशाहीन, अपूर्ण शेवट फुटबॉलप्रेमींच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत राहील.

रोनाल्डो आणि नेयमार या दोघांनीही आपापल्या काळात फुटबॉलला जे दिले, ते शब्दांत मोजता येणार नाही. पण नियतीने दोघांनाही एक गोष्ट कधीच दिली नाही; ती म्हणजे, वर्ल्ड कपची ट्रॉफी! विजेतेपदाचा तो सुवर्णक्षण- जो पेले, मॅराडोना आणि आता मेस्सीच्या नशिबी आला- तो या दोघांच्या आयुष्यात कधीच आला नाही. कदाचित हेच फुटबॉलचे सर्वांत मोठी क्रौर्य आहे. इथे फक्त प्रतिभा पुरेशी नसते, इथे नियतीचीही पूरेपूर साथ लागते. अर्थात, त्यांच्या चाहत्यांसाठी, त्यांची महानता या एका ट्रॉफीच्या अनुपस्थितीने कणभरही कमी होत नाही. कदाचित अपूर्णत्वातही एक प्रकारचे सौंदर्य असावे! 


यशोगाथा:

पण या वर्ल्ड कपने आपल्याला फक्त दुःख दिले नाही. या वर्ल्ड कपमध्ये आपल्याला काही अविस्मरणीय यशोगाथाही दिसल्या.

स्पेन आणि लामिने यामाल- या वर्ल्ड कपचे खरे नायक. एकोणीस वर्षांचा हा मुलगा, ज्याला वयाच्या सहाव्या वर्षी ‘शोधले गेले’, बार्सिलोनाच्या ‘ला मासिया’ अकादमीत घडवले गेले, आणि आज तो जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंमध्ये गणला जातो. मातारोच्या रोकाफोंदा या साध्या, कष्टकरी वस्तीत लहानाचा मोठा झालेला हा मुलगा आजही स्वतःच्या याच पार्श्वभूमीचा अभिमानाने उल्लेख करतो. युरो २०२४ मध्ये सर्वात युवा विजेता ठरल्यानंतर, आता तो वर्ल्ड कप फायनल खेळणारा पेले आणि जुसेप्पे बेर्गोमोनंतरचा तिसरा सर्वांत युवा खेळाडू ठरला आहे. जर स्पेनने विजेतेपद पटकावलं, तर यामाल एकाच वेळी युरो आणि वर्ल्ड कप जिंकणारा एक दुर्मीळ खेळाडू ठरेल आणि तेही वयाच्या फक्त एकोणीसाव्या वर्षी!


नॉर्वे आणि एर्लिंग हालँड — नॉर्वेचा हा प्रवास एखाद्या परीकथेसारखा आहे, ज्याबद्दल आपण आधीच सविस्तर पाहिले आहे. हालँडने ब्राझीलसारख्या दिग्गज संघाला नमवताना दोन गोल केले आणि सलग चौदा वर्ल्ड कप सामन्यांत गोल करण्याचा विक्रम कायम राखला; यात त्याने एकूण सात गोल झळकावले. त्याच्या या फॉर्मने त्याला गोल्डन बूटच्या शर्यतीत अग्रस्थानी नेऊन ठेवले आणि सोशल मीडियावर तो एक ‘सेन्सेशन’ बनला.

वयाचा आणि फुटबॉल खेळण्याच्या कालावधीचा विचार करता नॉर्वेचा हालँड हा रेकॉर्ड्सच्या बाबतीत सध्याच्या आघाडीच्या अनेक खेळाडूंपेक्षा खूप पुढे आहे.

लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना — एकोणचाळीस वर्षांचा हा जादूगार पुन्हा एकदा आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन गेला आहे- सलग दुसऱ्यांदा आणि यावेळी वर्ल्ड कप इतिहासातला सर्वकालीन सर्वोच्च गोलस्कोअरर्सपैकी एक म्हणून. (अर्थात ही तत्कालीन माहिती आहे. त्यानंतर एम्बाप्पेने हे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.)

हॅरी केन आणि इंग्लंड- केनने या वर्ल्ड कपमध्येही आपली सातत्यपूर्ण गोलक्षमता दाखवली आणि आपल्या संघाला सेमीफायनलपर्यंत नेले.



केप व्हर्दे आणि व्होझिन्या- आपण आधीच पाहिलेली ही कहाणी, जिथे एका चाळीस वर्षांच्या गोलरक्षकाने आणि एका इवल्याशा बेटवजा देशाने जगातल्या करोडो हृदयांवर अधिराज्य गाजवले. हे या वर्ल्ड कपच्या सर्वांत मोठ्या भावनिक यशांपैकी एक यश म्हटले पाहिजे.

मोरोक्को आणि आफ्रिकेचा उदय- सलग दोन वर्ल्ड कपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणारा मोरोक्को हा आफ्रिकेच्या फुटबॉल इतिहासातला एक नवा मापदंड ठरला आहे.


अविस्मरणीय क्षण: जे कायम स्मरणात राहतील...

प्रत्येक वर्ल्ड कप काही असे क्षण मागे ठेवतो, जे आकडेवारीच्या पलीकडे जाऊन आपल्या हृदयात कोरले जातात. यंदाच्या वर्ल्ड कपनेही असे अनेक क्षण दिले.

यामालचा सौदी अरेबियाविरुद्धचा तो अकराव्या मिनिटाचा गोल म्हणजे एका करिअरची सुरुवात आणि एका दंतकथेचा जन्म एकाच क्षणी होताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. न्यलँडचा तो ‘पेनल्टी-सेव्ह’ जिथे एका गोलरक्षकाने आपल्या ‘सेव्ह’ने संपूर्ण राष्ट्राचे स्वप्न विरण्यापासून वाचविले. व्होझिन्याचे स्पेनविरुद्धचे ते सात बचाव आणि नंतरचे त्याचे अश्रू, जे त्याच्या एकोणीस वर्षांच्या संघर्षाचे द्योतक होते. मेस्सीचा इजिप्तविरुद्धचा तो क्रॉसबारवरून जाळ्यात गेलेला व्हॉली, जेव्हा एका अनुभवी जादूगाराने हार मानण्यास साफ नकार दिला. आणि... रोनाल्डोचे ते अश्रू, जिथे एका महानतम खेळाडूने आपल्या करिअरचा अंत इतक्या प्रतिष्ठेने स्वीकारला, की विरोधी संघाच्या चाहत्यांनीही त्याला उभे राहून मानवंदना दिली.

या सगळ्या क्षणांत एक समान धागा आहे. यातील प्रत्येक क्षण हा माणसाच्या भावनांचे, त्याच्या जिद्दीचे आणि त्याच्या असुरक्षिततेचे एक प्रामाणिक दर्शन घडवून गेला. हेच फुटबॉलला इतर कोणत्याही खेळापेक्षा वेगळे बनवते; इथे जय आणि पराजय दोन्ही तितकेच वेगवान आणि काव्यात्मक असतात.


अंतिम सामन्यात काय झाले?

अखेरीस १९ जुलै रोजी आपण त्या क्षणाजवळ आलो होतो, ज्यासाठी संपूर्ण जग आधीचे पाच आठवडे श्वास रोखून बसले होते. न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियमवर, १९ जुलैला, स्पेन आणि अर्जेंटिना अंतिम सामन्यात आमनेसामने आले.

हा सामना का पहायला हवा होता याची कारणे अगणित आहेत. पहिले म्हणजे, १९३० सालच्या पहिल्या वर्ल्ड कपनंतरचा हा पहिलाच सर्व-स्पॅनिश-भाषिक अंतिम सामना होता. दुसरे म्हणजे, हा विद्यमान वर्ल्ड कप आणि कोपा अमेरिका विजेता विरुद्ध विद्यमान युरोपियन चॅम्पियन असा सामना होता. तिसरे म्हणजे, या सामन्यातच गोल्डन बूट, गोल्डन बॉल आणि सर्वोत्तम युवा खेळाडू यांसारख्या पुरस्कारांचे निकालही निश्चित होणार होते.

पण खरे आकर्षण होते ते दोन पिढ्यांचा संघर्ष हे..! एका बाजूला मेस्सी- फुटबॉलचा सर्वांत मोठा जादूगार- आपल्या कारकिर्दीच्या संधिप्रकाशात वर्ल्ड कप इतिहासातील शेवटचे मोठे विजेतेपद मिळवण्याच्या शोधात होता; तर दुसऱ्या बाजूला यामाल जो उद्याच्या फुटबॉलचे भविष्य आहे (आणि ज्याला लहानपणी खुद्द मेस्सीनेच अंघोळ घातली आहे), तो त्याच मेस्सीविरुद्ध वर्ल्ड कप फायनलमध्ये उभा होता. हा फक्त एक सामना नव्हता, तर हा फुटबॉलच्या एका युगाचा शेवट आणि दुसऱ्या युगाची सुरुवात होता; ज्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्याची प्रत्येक फुटबॉलप्रेमीची इच्छा होती. 

शिवाय, दोन्ही संघांचा या स्पर्धेतला प्रवास पाहता, हा सामना चुरशीचा होईल असा होरा होता. स्पेनचा तांत्रिक कौशल्यावर आधारित संयमी खेळ विरुद्ध अर्जेंटिनाची दडपणाखाली चमकण्याची क्षमता आणि अनुभव ही एक अशी लढाई होती.

स्पेनच्या बाजूने पहायचे झाल्यास त्यांचा बचाव या संपूर्ण स्पर्धेतला सर्वांत भक्कम बचाव राहिला होता. संपूर्ण स्पर्धेत स्वतःवर फक्त एकच गोल स्वीकारलेला हा संघ यामाल-पेद्री-गावीसारख्या चपळ मधल्या फळीच्या जोरावर चेंडूवर आपली पकड कायम ठेवतो आणि प्रतिस्पर्ध्याला श्वास घेण्याची संधीच देत नाही. दुसरीकडे, अर्जेंटिनाचं बलस्थान होते, तो त्यांचा अनुभव आणि मेस्सीभोवती उभी राहिलेली एक घट्ट विणलेली टीम, जिथे अल्वारेझ, मार्टिनेझ आणि मॅक अलिस्टरसारखे खेळाडू योग्य वेळी चमकत होते.

खरेतर, शास्त्रशुद्ध तंत्र आणि शिस्तबद्ध खेळ विरुद्ध उत्स्फूर्तता आणि जिंकण्याची ऊर्मी अशी ही लढत होती.

अखेरीस स्पेनने २०२६ फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये अर्जेंटिनाला १-० असे नमवत २०१०च्या पहिल्या विजेतेपदानंतर आपले दुसरे विजेतेपद पटकावले. फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात १०६ व्या मिनिटाला अवघ्या ३९ सेकंदात निर्णायक गोल केला, तो निको विल्यम्सच्या हेडरनंतर पेद्रो पोर्रोच्या क्रॉसवर.

(इथे एक छोटे विषयांतर करतो, जे गरजेचे आहे. बार्सिलोना आणि स्पेनच्या संघात खेळताना फेरान टोरेसला मिळालेल्या संधींचे गोलमध्ये रूपांतर करण्यात तो अनेकदा अपयशी ठरत होता. त्यामुळे तो या सर्वोच्च पातळीवरील खेळासाठी कमी दर्जाचा (Not good enough) असल्याचे बोलले जात होते. या वर्ल्ड कप स्पर्धेतसुद्धा सुरुवातीच्या सामन्यांनंतर त्याला मुख्य संघातून वगळण्यात आले होते. तसेच तो सुरुवातीच्या अनेक संधी गमावत असल्यामुळे चाहते आणि मीडियाकडून त्याच्यावर सडकून टीका झाली होती. वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यातील एकमेव गोल करण्याच्या शानदार कामगिरीनंतर त्याने सांगितले की, “मला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले; परंतु देव त्या लोकांना सुंदर बक्षीस देतो, जे त्यासाठी सर्वात जास्त पात्र असतात.”)

“मला अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले; परंतु देव त्या लोकांना सुंदर बक्षीस देतो, जे त्यासाठी सर्वात जास्त पात्र असतात.” (फेरान टोरेस)

स्पेनच्या विजयामागे संपूर्ण स्पर्धेतील त्यांची शिस्तबद्ध, दबावतंत्रावर आधारित रणनीती होती. संपूर्ण टूर्नामेंटमध्ये स्पेनने अवघा एकच गोल खाल्ला- तोही बेल्जियमविरुद्ध- आणि फायनलपर्यंत पोहोचताना बेल्जियम व फ्रान्ससारख्या बलाढ्य संघांना त्यांनी नमवले. फायनलमध्येही त्यांनी ६५% वेळ चेंडूवर ताबा मिळवत २० शॉट्स ऑन-टारगेट मारले आणि अर्जेंटिनाच्या पेनल्टी बॉक्समध्ये ३१ वेळा प्रवेश केला.

अंतिम सामन्यात स्पेनच्या दमदार खेळापुढे अर्जेंटिनाचा खेळ अगदीच फिका पडला. अर्जेंटिनाच्या रणनीतीचा स्पेनने एकदम चांगला गृहपाठ केल्याचे सामानादरम्यान जाणवत होते!

अर्जेंटिनाचा संघ मात्र सुरुवातीपासूनच दबावाखाला राहिला - पहिल्या हाफमध्ये ते एकही शॉट मारू शकले नाहीत. स्कालोनीने मेस्सीभोवती संघ बांधताना त्याला संधी मिळाव्यात यासाठी बचावात्मक व संकुचित रचना ठेवली होती; पण त्यामुळे आक्रमणातील धार हरवली. एन्झो फर्नांडिसला उशिरा दुसरे पिवळे कार्ड मिळून अर्जेंटिनाला अवघ्या १० खेळाडूंनिशी खेळावे लागले. वर्ल्ड कप फायनलसारख्या सामन्यात एखाद्या टीमला १० खेळाडूंनिशी खेळायला लागणे म्हणजे टी-२० क्रिकेटमधल्या पॉवरप्लेमध्ये गोलंदाजांनी फलंदाजी केल्यासारखेच असते. आणि, हा सामन्यातील निर्णायक ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. स्कालोनींनी बदली खेळाडूही उशिरा आणले; जेसुद्धा प्रभावहीन ठरले. उजव्या विंगेतील बचावात मोलिनाला आणण्याचा तिसरा बदल ६२व्या मिनिटानंतर आला, तोपर्यंत स्पेनने खेळाची गती व नियंत्रण दोन्ही आपल्या हाती घेतले होते. स्पेनने मात्र वेळेत बदल करत ओयार्झाबालसारख्या खेळाडूंना बाहेर काढून ताजी ऊर्जा मैदानात उतरवली आणि त्याचेच फळ त्यांना फेरान टोरेसच्या रूपाने मिळाले. ३९ वर्षांच्या मेस्सीचा हा बहुधा अखेरचा वर्ल्ड कप असावा... अर्थात, ही लढाई खुद्द अर्जेंटिनानेच अर्जेंटिना विरुद्ध स्पेन अशी न करता मेस्सी विरुद्ध स्पेन अशी घडवून आणली आणि त्याचा त्यांना कधीही न विसरता येण्यासारखा तोटा झाला... सामन्याच्या शेवटच्या काही क्षणांत मेस्सीने सहकऱ्यांना २ ते ३ संधी उपलब्ध करून दिल्या; पण त्याचे सहकरी खेळाडू मात्र त्यांचे गोल्समध्ये परिवर्तन करू शकले नाहीत... अखेरीस जेतेपदाच्या उंबरठ्यावरून अर्जेंटिना माघारी फिरली... तेही मेस्सीचे अश्रू अनावर करूनच...

वर्ल्ड कप सामन्यातील पराभवानंतर मी कितीतरी तास रडत होतो असे खुद्द मेस्सीने नंतर सांगितले आहे.

अर्जेंटिनाचा गोलरक्षक एमिलियानो ‘दिबू’ मार्टिनेझ मात्र या पराभवातही उजळून निघाला. फायनलमध्ये त्याने विश्वविक्रमी ११ बचाव केले जे वर्ल्ड कप फायनलच्या इतिहासातील सर्वाधिक बचाव आहेत. स्पेनने २० शॉट्स घेऊनही मार्टिनेझच्या चापल्यामुळेच सामना इतका लांबला, हे त्याच्या दर्जाचे मोठे प्रमाण. मेस्सीच्या प्रभावाखाली गोलरक्षक मार्टिनेझचा भीमपराक्रम झाकोळला जाऊ नये एवढीच एक सच्चा फुटबॉलप्रेमी म्हणून माझी अपेक्षा!





त्याच्या उजव्या हाताचा अंगठा दुखावलेला असताना आणि डॉक्टरांनी त्याला शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेला असतानाही मार्टिनेझने देशाच्या हाकेला प्रथम ओ देण्याचा निर्णय घेतला आणि अंतिम सामन्यात एक दमदार विश्वविक्रम करून दाखवला. अंतिम सामन्यात तो सर्वाधिक ९.६ रेटिंग घेतलेला खेळाडूही ठरला आहे.


अंतिम सामन्यानंतर फिफाने जाहीर केलेले पुरस्कार याप्रमाणे-

गोल्डन बूट:

किलियन एम्बापे (फ्रान्स)- १० गोल, सलग दुसऱ्या वर्ल्ड कपमध्ये हा मान मिळवणारा पहिला खेळाडू. हाही एक विक्रमच!



आपल्या प्रचंड‌ वेगवान खेळाच्या आणि पदलालित्याच्या बळावर संपूर्ण मैदानाचा ताबा घेणारा प्रभावी खेळाडू म्हणजे फ्रान्सचा किल्यन एम्बाप्पे... फिफा विश्वचषक २०२६ मध्ये सर्वाधिक १० गोल आणि ४ असिस्ट केल्यामुळे फ्रान्सच्या किल्यन एमबाप्पेने ‘गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावला. अंतिम सामन्यापूर्वी त्याचे अर्जेंटिनाविरुद्ध ८ गोल होते, पण तिसऱ्या क्रमांकाच्या प्ले-ऑफ सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन गोल करून त्याने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला (८ गोल) मागे टाकले आणि या प्रतिष्ठेच्या किताबावर नाव कोरले.

एमबाप्पेने यापूर्वी २०२२ च्या कतार विश्वचषकातही ८ गोल करून ‘गोल्डन बूट’ पुरस्कार जिंकला होता. सलग दोन विश्वचषक स्पर्धांमध्ये ‘गोल्डन बूट’ मिळवणारा तो फुटबॉलच्या इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच, विश्वचषकातील त्याच्या एकूण २२ गोलांमुळे तो जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक ऑल-टाइम टॉप स्कोरर बनला आहे.

गोल्डन बॉल-

स्पेनच्या रॉद्रीने मधल्या फळीत संरक्षण सांभाळत सर्वोत्तम खेळाडूचा किताब मेस्सीला मागे टाकून पटकावला.

रॉड्रिने स्पेनला २०२६ फिफा विश्वचषक जिंकून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्याला 'गोल्डन बॉल' पुरस्कार मिळाला. त्याने मध्यरक्षकात (midfield) अप्रतिम खेळ करत संघाचे नियंत्रण ठेवले, खेळाचा वेग निश्चित केला आणि आक्रमक व बचावात्मक फळीमध्ये उत्तम समन्वय साधला. त्याच्या अचूक पासेस, उत्कृष्ट टॅकलिंग आणि महत्त्वाच्या क्षणी केलेल्या महत्त्वपूर्ण गोलमुळे स्पेनचा संघ स्पर्धेत अजिंक्य राहिला. त्याच्या याच अष्टपैलू कामगिरीमुळे आणि मैदानातील नेतृत्वगुणामुळे त्याला या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

(इच्छुकांसाठी थोडी अधिकची, पण कामाची माहिती- फिफा विश्वचषक 'गोल्डन बॉल' पुरस्कारासाठी खेळाडूची निवड ही त्याच्या केवळ वैयक्तिक आकडेवारीवर आधारित नसून एका विशिष्ट निकषावर केली जाते. फिफाचा 'तांत्रिक अभ्यास गट' (Technical Study Group) संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामन्याचे विश्लेषण करून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची एक संक्षिप्त यादी (shortlist) तयार करतो. यानंतर, जगभरातील मान्यताप्राप्त क्रीडा पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधी या यादीतील खेळाडूंना मतदान करतात. मतदानामध्ये केवळ गोल किंवा असिस्टची संख्या न पाहता, खेळाडूचा संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण खेळ, त्याचे नेतृत्वगुण, सामन्यावर पाडलेला प्रभाव आणि संघाला विजय मिळवून देण्यात दिलेले महत्त्वपूर्ण योगदान विचारात घेतले जाते; ज्या खेळाडूला सर्वाधिक मते मिळतात तो या पुरस्काराचा मानकरी ठरतो.)

गोल्डन ग्लोव्ह्ज-

स्पेनच्या उनाई सिमॉन याने अवघा एक गोल स्वीकारत, विक्रमी सात क्लीन शीट्स ठेवत आणि अविश्वसनीय असा ६५० मिनिटांचा अभेद्य बचाव करत नवीन विश्वविक्रम नोंदवला.




उनाई सिमोन: अभेद्य भिंत, विश्वविक्रमी बचाव

यंग प्लेयर अवॉर्ड-

पाऊ कुबार्सी (स्पेन)- १९ वर्षीय बचावपटूला सर्वोत्तम युवा खेळाडूचा सन्मान.

वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्पेनच्या या डिफेंडरने आपल्या अप्रतिम खेळाने संपूर्ण जगाला थक्क केले. अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात तो पूर्ण १२० मिनिटे मैदानावर होता.या अत्यंत दबावाच्या सामन्यात त्याने ९६% अचूक पासेस (Passing Accuracy) दिले, जे एका डिफेंडरसाठी कौतुकास्पद आहे. २००६ पासून हा पुरस्कार नेहमी आक्रमक (Attacking) किंवा मध्यफळीतील (Midfield) खेळाडूंनाच मिळाला आहे. त्या सर्व दिग्गजांच्या यादीत समाविष्ट होणारा कुबार्सी हा पहिला आणि एकमेव निखळ डिफेंडर आहे. थोडक्यात सांगायचे तर, जिथे सहसा गोल करणाऱ्यांचे कौतुक होते, तिथे कुबार्सीने आपल्या बचावाच्या भिंतीने आणि अचूक पासेसच्या जोरावर फिफाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार एका डिफेंडरच्या नावावर करण्यास भाग पाडले.


फुटबॉल जगताला गवसलेले आणि नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे दोन अनमोल हिरे- पाऊ कुबार्सी आणि लामीन यामाल


फेअर प्ले ट्रॉफी-

नेदरलँड्स

नेदरलँड्स राष्ट्रीय फुटबॉल संघाने २०२६ च्या फिफा विश्वचषकात (FIFA World Cup) उत्कृष्ट क्रीडापटूवृत्ती आणि शिस्तबद्ध कामगिरीचे प्रदर्शन करत 'फिफा फेअर प्ले पुरस्कार' (FIFA Fair Play Award) पटकावला आहे. फिफाच्या तांत्रिक अभ्यास गटाने (Technical Study Group) निवडलेल्या या संघाने संपूर्ण स्पर्धेत खेळलेल्या ४ सामन्यांमध्ये एकही लाल कार्ड (Red Card) मिळवले नाही आणि त्यांना केवळ ३ पिवळी कार्डे (Yellow Cards) देण्यात आली, ज्यामुळे मैदानातील सर्वोत्तम वर्तनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.


समारोप-

फिफा वर्ल्ड कप २०२६ ही फक्त एक फुटबॉल स्पर्धा नव्हती; तो एक भावनिक प्रवास होता. यात रोनाल्डोसारख्या दिग्गजाचा शांत, सन्मानपूर्ण निरोप होता; नेयमारसारख्या ताऱ्याच्या अस्पष्ट अपूर्ण करिअरचा अकाली अंत होता; नॉर्वे आणि केप व्हर्देसारख्या अंडरडॉग्जचं परीकथेसमान यश होतं; यामालसारख्या तरुण प्रतिभेचा उदय होता; आणि मेस्सीसारख्या जादूगाराने आकड्यांची सगळी बंधने मोडून एक नवा इतिहास लिहिण्याचा सच्चा प्रयत्न केला होता. प्रत्येक हुकलेल्या संधीत, प्रत्येक क्रॉसबारवर आदळून परतलेल्या चेंडूत, एका संघाचे स्वप्न विरून जात होते आणि त्याचवेळी दुसऱ्या संघाच्या आशा पल्लवित होत होत्या!

आणि हेच तर या सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या खेळाचे खरे सौंदर्य आहे; इथे कोणीही कायमचा विजेता नसतो, कोणीही कायमचा पराभूत नसतो. आज जो चषक उंचावतो, तोही उद्या एका क्रॉसबारवर आदळून बाहेर गेलेल्या चेंडूसारखा बाहेर पडू शकतो. आणि, जो आज बाकावर बसून त्याच्याच संघाची मॅच पाहत असतो, तोच उद्या अकराव्या मिनिटालाच इतिहास घडवू शकतो- जसे यामालने केले; किंवा जो चाळीस वर्षांचा असूनही आपल्या पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये जगाला चकित करू शकतो, जसे व्होझिन्याने केले.

फुटबॉल आपल्याला हेच शिकवते... नियती कधीच स्थिर नसते, ती नेहमी एका फ्री-किक, एका पेनल्टी, एका सेंटीमीटरच्या अंतराने जय-पराजयाच्या हिंदोळ्यावर आपल्याला हेलकावत ठेवत असते.

पेले नेहमी म्हणायचे, “The more difficult the victory, the greater the happiness in winning!” (“विजय जितका कठीण, तितकाच तो जिंकल्यानंतरचा आनंद मोठा असतो!”) या वर्ल्ड कपने हे वाक्य प्रत्येक सामन्यात, प्रत्येक गोलमध्ये, प्रत्येक हुकलेल्या पेनल्टीमध्ये, विजयाच्या आनंद-अश्रूत किंवा पराभवाच्या दुःख-अश्रूत, प्रत्येक जल्लोषात, प्रत्येक अपेक्षाभंगात खरे करून दाखवले. रोनाल्डोच्या डोळ्यांतल्या अश्रूंत, नेयमारच्या स्तब्ध मौनात, केप व्हर्देच्या किनाऱ्यावरच्या जल्लोषात, नॉर्वेच्या अठ्ठावीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतरच्या आनंदात, आणि यामालच्या पहिल्या गोलच्या आनंदात, मेस्सीच्या पहिल्याच सामन्यातील हॅट्ट्रिकमध्ये आणि साकाने इंग्लंडसाठी केलेल्या शेवटच्या सामन्यातील हॅट्ट्रिकमध्ये हेच सत्य लपलेले होते.

आणि, आपण प्रेक्षक म्हणून या सर्व ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य पदरी पाडून घेतले आहे. कदाचित पुढच्या काही वर्षांनी आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगू शकू की, “आम्ही ते सामने पाहिले होते, ज्यांनी इतिहास घडवला होता आणि आम्ही त्या खेळाडूंना खेळताना पाहिले होते, ज्यांनी फुटबॉलचा इतिहास कायमचा बदलला होता..!”

लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि नेयमार ज्यु. यांनी आपल्या अप्रतिम खेळाने फुटबॉलच्या खेळालाच एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले; इतक्या की, त्यांनी या विश्वचषकात खेळणे हा खरेतर विश्वचषकाचासुद्धा सन्मान ठरला.

गेले पाच आठवडे सच्चे भारतीय असूनही आमच्यासारखे फुटबॉलवेडे लोक कधी ब्राझीलचे, कधी स्पेनचे, कधी फ्रान्सचे, कधी केप वर्देचे तर कधी अर्जेंटिनाचे ‘दुहेरी नागरिकत्व’ घेऊन जगले... त्यांच्या विजयात आम्ही आरोळ्या ठोकल्या आणि पराभवात मुसमुसून रडलोसुद्धा..!

या तीन महान दिग्गजांशिवाय फुटबॉलच्या जगाला कधीच पूर्वीसारखी सुवर्णझळाळी असणार नाही! आपल्या अप्रतिम पदलालित्याच्या आणि फुटबॉल बुद्ध्यांकाच्या बळावर संपूर्ण जगाला डुलवणाऱ्या या तिघांना जग कधीही विसरणार नाही!

फुटबॉल हा फक्त खेळ नाही; तर ते जगण्याचे, लढण्याचे, लढविण्याचे, पडण्याचे, पडूनसुद्धा परत उठण्याची ऊर्मी देणारे, क्षमता ताणण्याचे, पराकोटीचे कष्ट करायला स्फूर्ती देणारे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पराभव पाठीशी टाकून परिस्थितीशी परत दोन हात करायला शिकविणारे आणि विजयसुद्धा शांतपणानेच पचवावा लागतो हे शिकविणारे तत्त्वज्ञान आहे..!

लामीन यामालचा साडेतीन वर्षांचा धाकटा भाऊ केन हा जगभरातील आघाडीच्या ९९% फुटबॉलपटूंपेक्षाही सध्या जास्त प्रसिद्ध झाला आहे!


ख्रिस्तियानो रोनाल्डोच्याही आधी ही वर्ल्ड कपची ट्रॉफी हाती धरण्याचा मान केन यामालला मिळाला!!!

फुटबॉल म्हणजे जीवन आहे आणि फुटबॉलचे मैदान हे मानवी जीवनाचे लघुरूप आहे... फुटबॉल म्हणजे निखळ भावना आहे... फुटबॉल म्हणजे पहिले नाजूक प्रेम आहे..!

चषक कोणाच्या हाती जावो; एक गोष्ट निश्चित आहे, “हा वर्ल्ड कप आपण सगळेजण आयुष्यभर लक्षात ठेवू. यातील ऐतिहासिक क्षणांच्या सुगंधी अत्तराने भरलेली कुपी मनाच्या गाभाऱ्यात कायमची जपून ठेऊ... अगदी निरंतर..!”

(लेखक- © डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,

एम.बी.बी.एस.,एम.डी.)

(© लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित)

(वॉट्सॲप संपर्क- ८३२९३८१६१५)

(www.dramittukarampatil.blogspot.com)

(© लेखातील सर्व फोटो हे Google आणि अन्य विश्वसनीय वेबसाईट्सवरून घेतले असून त्याचे कॉपीराईट्स असणाऱ्यांचाच त्यावर अंतिम हक्क आहे.)

(यातील सर्व खेळाडू आणि प्रशिक्षकांची नावे ही त्या-त्या संबंधित परकीय भाषांमधील असल्याने मला त्यांचे उच्चार माझ्या आकलनानुसार मी लिहिले आहेत. त्यात काही चूक झाली असल्यास क्षमस्व!)
















Comments

  1. Great article about football which relates with the real life where we have to prove yourself with all your potential.

    ReplyDelete
  2. Final Match scene where Spain’s full attacking lineup charges forward, all players pressing together, while Argentina’s goalkeeper stands alone, defiant and heroic, guarding the net. It’s a clash of collective power versus solitary resilience — a symbolic showdown of teamwork against individual brilliance.

    ReplyDelete
  3. क्रिकेट वेड्या आपल्या देशात फुटबॉल वर्ल्ड कप चे एकाच ब्लॉगमध्ये केलेले सुंदर वर्णन

    ReplyDelete
  4. या लेखातून एक अदभूत अंगभूत गुण , प्रगल्भ आकलनीय विचार शैली, उत्तम शब्द संग्रह, प्रगल्भ गुण ओळखण्याची बुद्धिमत्ता, शब्दांची उत्तम मराठीत मांडणी, सुस्पस्ट भाषा, व्यक्तीगणिक उत्तम गुणवत्तापुर्वक व्यक्तीसापेक्ष भाषा, विविध व्हिडीओ दृष, चित्र यांची योग्य मांडणी आणि एवढा प्रदीर्घ लेख तोही योग्य टप्यात मांडणी करून एक जिवंत खराखुरा लेख सादर केलेला आहे. आपली आकलनशक्ती खरंच अदभूत अशी आहे.
    आपला श्री हरिश्चंद्र कृष्णा हरड आरोग्य सहाय्यक आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे

    ReplyDelete
  5. ​लेखक डॉ. अमित दादा यांचे या अप्रतिम, सखोल आणि माहितीपूर्ण लिखाणाबद्दल मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन! फुटबॉलकडे केवळ खेळ म्हणून न पाहता त्यातील जगण्याचे तत्त्वज्ञान इतक्या सुंदर मराठीत मांडल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. विस्तृत आणि अभ्यासपूर्ण लेख. वाचताना फुटबॉलच्या जगात हरवून जातो. अनेक बारकावे शब्दबद्ध केलेले आहेत. अप्रतिम.. कमाल.. अभिनंदन सर.! असेच लेख वाचायला मिळू देत..

    ReplyDelete
  7. संवेदनशील , सृजनशील ,भावपूर्ण , मुद्देसूद
    माहितीपूर्ण लिखाण.
    ⛳️🥅⚽️

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेखन! 👏⚽

    डॉ. अमित पाटील सरांनी फिफा वर्ल्ड कप २०२६ चा संपूर्ण प्रवास इतक्या जिवंत आणि भावस्पर्शी शब्दांत मांडला आहे की प्रत्येक प्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. हा लेख केवळ फुटबॉलचे विश्लेषण नसून संघर्ष, जिद्द, स्वप्ने आणि मानवी भावनांचा सुंदर उत्सव आहे.
    मनःपूर्वक अभिनंदन सर! अशाच दर्जेदार लेखनाची अपेक्षा कायम राहील. 🌍🏆

    ReplyDelete
  9. मी फुटबॉल चा फॅन नाही. मी मेस्सी रोनाल्डो किंवा एम्बाप्पे देखील फॅन नाही मात्र लेख वाचून तुमचा फॅन नक्की च झालो आहे. अतिशय माहितीपूर्ण लेख ओघवत्या भाषेत लिहिलेला आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा 💐 डॉ. जयंत ठोंबरे

    ReplyDelete
  10. खरोखरच अप्रतिम लेख! वाचताना शेवटपर्यंत उत्सुकता कायम राहिली. विषयाची मांडणी, विश्लेषण आणि लेखनशैली खूपच प्रभावी वाटली. असेच उत्तम लिखाण वाचायला मिळो. 😊⚽

    ReplyDelete
  11. फिफा विश्वचषक २०२६ या महासोहळ्याचा आपण केलेला अभ्यासपूर्ण, संदर्भसमृद्ध आणि रसाळ उहापोह म्हणजे फुटबॉलप्रेमींसाठी ज्ञानाची पर्वणीच ठरली आहे.
    प्रत्येक परिच्छेदातून विषयाची सखोल जाण, अचूक माहिती आणि ओघवती लेखनशैली यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
    केवळ स्पर्धेचा आढावा नव्हे, तर तिचा इतिहास, उत्क्रांती, जागतिक महत्त्व आणि भविष्यातील दिशा यांचेही अत्यंत प्रभावी चित्रण आपण केले आहे.

    आपल्या लेखणीने माहितीला केवळ शब्दरूप दिले नाही, तर तिला उत्साह, रोमांच आणि प्रेरणेची सुवर्णकिनार लाभली आहे. अशा दर्जेदार लेखनामुळे वाचकांच्या ज्ञानात निश्चितच मोलाची भर पडते आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो.
    ! अशाच दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखांचा अखंड प्रवाह असाच सुरू राहो, हीच शुभेच्छा.

    ReplyDelete
  12. फिफा विश्वचषक २०२६ या महासोहळ्याचा आपण केलेला अभ्यासपूर्ण, संदर्भसमृद्ध आणि रसाळ उहापोह म्हणजे फुटबॉलप्रेमींसाठी ज्ञानाची पर्वणीच ठरली आहे
    . प्रत्येक परिच्छेदातून विषयाची सखोल जाण, अचूक माहिती आणि ओघवती लेखनशैली यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
    केवळ स्पर्धेचा आढावा नव्हे, तर तिचा इतिहास, उत्क्रांती, जागतिक महत्त्व आणि भविष्यातील दिशा यांचेही अत्यंत प्रभावी चित्रण आपण केले आहे.

    आपल्या लेखणीने माहितीला केवळ शब्दरूप दिले नाही, तर तिला उत्साह, रोमांच आणि प्रेरणेची सुवर्णकिनार लाभली आहे. अशा दर्जेदार लेखनामुळे वाचकांच्या ज्ञानात निश्चितच मोलाची भर पडते आणि खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक होतो.

    दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखांचा अखंड प्रवाह असाच सुरू राहो, हीच शुभेच्छा.

    ReplyDelete
  13. सर मी असा व्यक्ति आहे फक्त तुमच्या च कॅमेरा मधून पूर्ण वर्ल्डकप पहिला, अणि जे काही थोडा मिस झाला होता तो वाचून पूर्ण झाला .

    ReplyDelete
  14. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे हा फुटबॉल चा महाकुंभ होता. एक डॉक्टर फुटबॉल बद्दल इतकं लिहितो म्हणजे god gift. अक्षरशः माझ्या घरात मुलाची mpsc तयारी चालु असताना सुद्धा पहाटे पाच वाजेपर्यंत टीव्ही वर match आणी आरोळ्या देणे चालु असायचा.
    अगदी पाच आठवड्याच्या सर्व match बघितल्याच समाधान मिळालं.
    Proud of u sir

    ReplyDelete

Post a Comment