ऑपरेशन तारा: सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय

ऑपरेशन तारा: सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय

(‘जागतिक व्याघ्र दिन’ विशेष)

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)

महाराष्ट्रातला पहिलाच व्याघ्र स्थानांतरण प्रकल्प, जो सह्याद्रीच्या जंगलांच्या कुशीत राबविला जात आहे.

‘तारा’ या पहिल्या वाघिणीला ‘एन्क्लोजर’मधून सोडले तो क्षण!

प्रस्तावना-

जंगलात वाघाची डरकाळी घुमली की संपूर्ण परिसंस्था सावध होते. पानांची सळसळ थांबते, पक्ष्यांचे अलार्म कॉल्स (Alarm Calls) घुमू लागतात, वानर-माकडे मोठमोठ्याने दंगा करू लागतात आणि क्षणभर संपूर्ण अरण्य एका अनामिक दराऱ्याने थिजून जाते. हा अनुभव केवळ रोमांचकच नाही, तर तो एका खोल पर्यावरणीय सत्याची जाणीव करून देणारा आहे- इथे वाघ आहे! वाघ हा केवळ एक देखणा आणि राजस प्राणी नाही, तर तो संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्याचा बायो-इंडिकेटर (Bio-indicator) आहे.

दरवर्षी २९ जुलै रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक व्याघ्र दिन (International Tiger Day)’ हा याच जाणीवेचा जागतिक जाहीरनामा आहे. यंदाच्या व्याघ्र दिनाला महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः पश्चिम घाटासाठी (Western Ghats) अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीत अनेक दशकांच्या शांततेनंतर वाघांची नवी कुटुंबे आकार घेत आहेत. ‘ऑपरेशन तारा’ अंतर्गत विदर्भातील समृद्ध जंगलांमधून सह्याद्री-कोयना-चांदोली या पट्ट्यात वाघांचे पुनर्वसन करून पश्चिम घाटाच्या या दुर्लक्षित व्याघ्र भूपट्ट्याला (Tiger Landscape) पुनरुज्जीवित केले जात आहे.

हा लेख जागतिक व्याघ्र दिनाचा इतिहास, भारतीय संदर्भातील त्याचे धोरणात्मक महत्त्व, परिसंस्थाशास्त्रीय (Ecosystem dynamics) दृष्टिकोन, भारतातील व्याघ्र स्थानांतरणाचा (Tiger Translocation) इतिहास आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (STR) ऐतिहासिक स्थानांतरणाचे तांत्रिक व शास्त्रीय विश्लेषण मांडतो.

१. जागतिक व्याघ्र दिनाचा इतिहास आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ-

विसाव्या शतकाच्या प्रारंभी (सन १९००) जगभरातील १३ देशांमधील विविध अधिवासांमध्ये अंदाजे १ लाख वाघ मुक्तपणे वावरत होते. मात्र, अनियंत्रित शिकार, अधिवासाचे तुकडे होणे (Habitat Fragmentation), प्रे-बेस (Prey Base - शिकार प्राण्यांची संख्या) नष्ट होणे आणि मानवी अतिक्रमणामुळे एका शतकात ही संख्या तब्बल ९५ टक्क्यांनी घसरून २०१० पर्यंत ती अवघ्या ३,२०० वर येऊन ठेपली. या कालावधीत वाघांच्या नऊ उपजातींपैकी तीन उपजाती- बाली वाघ (Panthera tigris balica), जावा वाघ (Panthera tigris sondaica) आणि कॅस्पियन वाघ (Panthera tigris virgata) कायमच्या नामशेष झाल्या.

वाघांची जागतिक लोकसंख्या घसरण (१९०० ते २०२०)-

१९०० साली १ लाख असलेली व्याघ्र संख्या ९५% घसरून ती जवळपास ३ हजारपर्यंत कमी आली होती.




वाघांच्या घटत्या संख्येदरम्यान वेगवेगळ्या टप्प्यांवर वाघांच्या तीन प्रजाती लुप्त झाल्या आहेत, जी अतिशय दुर्दैवी बाब आहे.

या अभूतपूर्व संकटाची दखल घेत, वाघांचे अस्तित्व असलेल्या १३ देशांचे (Tiger Range Countries - TRCs) प्रमुख सन २०१० मध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग (St. Petersburg) येथे ऐतिहासिक व्याघ्र शिखर परिषदेसाठी एकत्र आले. या परिषदेत 'सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र' (St. Petersburg Declaration on Tiger Conservation) संमत करण्यात आले.

सेंट पीटर्सबर्ग घोषणापत्र आणि Tx2 उद्दिष्ट-

▪ Tx2 Goal: १२ वर्षांत (म्हणजेच २०२२ च्या पुढील व्याघ्र वर्षापर्यंत) जगातील जंगली वाघांची संख्या दुप्पट करणे (३२०० ते ६४००).

▪ जागतिक व्याघ्र दिन: दरवर्षी २९ जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय.

▪ग्लोबल टायगर रिकव्हरी प्रोग्रॅम (GTRP): १३ देशांनी आपापल्या राष्ट्रीय कृती योजना एका छत्राखाली आणल्या.

▪ग्लोबल टायगर फोरम (GTF): आंतर-सरकारी संस्थेच्या माध्यमातून निधी, तांत्रिक सहाय्य आणि सीमेपार संवर्धनाला चालना देणे.


* देश (TRCs), प्रमुख आव्हाने आणि त्यांचे Tx2 मधील योगदान-

१. भारत-

→ मानव-वन्यजीव संघर्ष, रेखीय पायाभूत सुविधा (Linear Infrastructure)

→ उद्दिष्ट वेळेआधी साध्य (२०१८ मध्येच दुप्पट)

२. नेपाळ-

→ तस्करी, सीमेपार अवैध संचार

→ उद्दिष्ट साध्य (२०१० मधील १२१ वरून २०२२ मध्ये ३५५)

३. रशिया-

→ अमूर वाघ (P. t. altaica) - बर्फाच्छादित अधिवास, शिकार

→ संख्या स्थिर आणि वाढीव (४०० ते ७५०+ इतकी वाढ)

४. कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम-

→वाघासाठीचे स्नेअरिंग (फास) आणि अधिवास नष्ट होणे

→ स्थानिक पातळीवर वाघ नामशेष झाला आहे. (Functional Extinction)


२. भारतीय संदर्भातील महत्त्व: धोरणात्मक व वैज्ञानिक प्रवास-

जगातील एकूण जंगली वाघांपैकी सुमारे ७५% ते ८०% वाघ भारतात आढळतात. त्यामुळे जागतिक व्याघ्र संवर्धनाचे भवितव्य पूर्णपणे भारताच्या धोरणात्मक यशावर अवलंबून आहे.


प्रोजेक्ट टायगर (Project Tiger)ची सुरुवात आणि वाटचाल-

भारताने जागतिक व्याघ्र परिषदेच्या खूप आधी, म्हणजे १ एप्रिल, १९७३ रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यकाळात उत्तराखंडातील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून 'प्रोजेक्ट टायगर' ची सुरुवात केली.

• प्रारंभ (१९७३): ९ व्याघ्र प्रकल्प (क्षेत्रफळ- १८२७८ वर्ग किलोमीटर).

• वर्तमान (२०२६): ५८ व्याघ्र प्रकल्प (क्षेत्रफळ- ७५००० वर्ग किलोमीटर), भारताच्या एकूण भूभागाच्या २.५% पेक्षा जास्त क्षेत्र.

प्रोजेक्ट टायगरचा विस्तार (१९७३ - २०२५)-



राष्ट्रीय व्याघ्रगणना आणि M-STrIPES तंत्रज्ञान-

भारत दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संख्या आकलन (National Tiger Estimation) आयोजित करतो. या आकलनात तांत्रिक अचूकतेसाठी M-STrIPES (Monitoring System for Tigers - Intensified Protection and Ecological Status) हे अँड्रॉइड-आधारित अॅप, भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आणि आनुवंशिक नमुना तंत्रज्ञान (Faecal DNA sampling) वापरले जातात.

महत्त्वाचा टप्पा (२०२२-२०२३): प्रोजेक्ट टायगरच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त म्हैसूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ५ व्या व्याघ्रगणनेनुसार देशात ३,६८२ वाघ (किमान नोंदणीकृत) असून, वार्षिक सरासरी ६% वाढ नोंदवली गेली आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याने Tx2 चे उद्दिष्ट मुदतीपूर्वीच साध्य केले.



‘प्रोजेक्ट टायगर’च्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने ५० रुपयांचे विशेष नाणे पाडले होते.

भारतातील व्याघ्रगणनेची आकडेवारी (२००६ - २०२२)-

इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी या सर्व पंतप्रधानांनी ‘प्रोजेक्ट टायगर’कडे विशेष लक्ष दिले आहे.


राज्यनिहाय वाघांची संख्या


३. परिसंस्थेतील वाघाचे स्थान: इकोलॉजिकल रोल्स-

परिसंस्थाशास्त्रानुसार (Ecosystem Ecology) वाघ हा केवळ अन्नसाखळीतील एक प्राणी नसून तो तीन मुख्य शास्त्रीय संकल्पनांचे प्रतिनिधित्व करतो:

१. की-स्टोन प्रजाती (Keystone Species)-

परिसंस्थेच्या रचनेला तोलून धरणारी प्रजाती. वाघ काढून घेतला तर अन्नसाखळीतील Top-Down Control नष्ट होतो.

• ट्रॉफिक्स कॅस्केड (Trophic Cascade): वाघाअभावी चितळ, सांबर, आणि गव्यांसारख्या तृणभक्षी प्राण्यांची (Herbivores) संख्या अनियंत्रित वाढते.

• अति-चरण्यामुळे (Overgrazing) लहान रोपांचा आणि वनस्पतींच्या पुनरुत्पादनाचा (Regeneration) नाश होतो.

• परिणामी, मातीची धूप होते, जंगलाची घनता घटते, आणि कीटक, पक्षी व लहान सस्तन प्राण्यांचे अधिवास नष्ट होतात.


२. छत्र प्रजाती (Umbrella Species)-

एका वाघाला (प्रौढ नर) त्याच्या जगण्यासाठी आणि शिकारीसाठी ८० ते १५० चौरस किलोमीटर चे अखंडित क्षेत्र लागते.

• वाघाच्या संरक्षणासाठी जेव्हा एखादे जंगल 'व्याघ्र प्रकल्प' म्हणून घोषित केले जाते, तेव्हा त्या छत्राखाली हजारो कीटक, पक्षी, उभयचर, आणि दुर्मिळ वनस्पती आपोआप संरक्षित होतात.

३. फ्लॅगशिप आणि इंडिकेटर प्रजाती (Flagship & Indicator Species)-

• Flagship Species: वाघ आपल्या करिष्माई व्यक्तिमत्त्वामुळे (Charismatic Megafauna) संवर्धनासाठी निधी, राजकीय इच्छाशक्ती आणि जनसमर्थन मिळवून देतो.

• Indicator Species: वाघाची उपस्थिती सांगते की जंगलात पाणी, गवत, तृणभक्षी प्राणी आणि मानवी हस्तक्षेपाचा अभाव या सर्व गोष्टी निरोगी स्थितीत आहेत.


४. इतर प्राण्यांशी तुलना: वाघाचे अनन्यसाधारण महत्त्व-

व्याघ्र संवर्धनावर होणाऱ्या मोठ्या खर्चावरून अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो: “हत्ती, सिंह, बिबट्या किंवा अस्वल हेसुद्धा मोठे प्राणी असताना वाघालाच केंद्रस्थानी का ठेवले जाते?” याचे उत्तर त्यांच्या इकोलॉजिकल निश (Ecological Niche) मध्ये आहे.

निकष / प्राणी-

वाघ (Panthera tigris)

आशियाई हत्ती (Elephas maximus)

आशियाई सिंह (Panthera leo persica)

बिबट्या (Panthera pardus)


परिसंस्थेतील भूमिका-

वाघ- Apex Predator (शीर्षस्थ भक्षक)

आशियाई हत्ती- Ecosystem Engineer (परिसंस्था अभियंता)

आशियाई सिंह- Apex Predator (मर्यादित क्षेत्र)

बिबट्या- Mesopredator (मध्यम भक्षक)


अधिवास आवश्यकता-

वाघ- घनदाट, अखंडित, विपुल पाणवठे असलेले जंगल

आशियाई हत्ती- विस्तृत कॉरिडॉर्स, गवताळ आणि दलदलीचा प्रदेश

आशियाई सिंह- खुले गवताळ, शुष्क पानझडी जंगल (उदा. गीर)

बिबट्या- अत्यंत अनुकूलनशील (Adapts to farm edge & urban margins)


सामाजिक रचना-

वाघ- एकाकी (Solitary) व प्रादेशिक (Territorial)

आशियाई हत्ती- कळप (Matriarchal Herd)

आशियाई सिंह- सामाजिक कळप (Prides)

बिबट्या- एकाकी, पण कमी प्रादेशिक कठोरता


संवर्धन संवेदनशीलता-

वाघ- अत्यंत उच्च, मानवी हस्तक्षेप अजिबात सहन होत नाही.

आशियाई हत्ती- मध्यम ते उच्च, पायाभूत मानवी सुविधांचा अडथळा.

आशियाई सिंह- मध्यम, एकाच भौगोलिक क्षेत्रात केंद्रित.

बिबट्या- कमी, मानवी वस्तीजवळही टिकून राहतो.


इकोलॉजिकल इंडिकेटर-

वाघ- संपूर्ण घनदाट अरण्य निरोगी असल्याची खात्री (गॅरंटी कार्ड).

आशियाई हत्ती- वनस्पती आणि पाण्याचे स्त्रोत बदलणारा घटक.

आशियाई सिंह- खुल्या परिसंस्थेचे आरोग्य.

बिबट्या- विशिष्ट आरोग्य दर्शवत नाही.


मुख्य फरक:

▪ हत्ती झाडे पाडून, रस्ते बनवून आणि बियांचा प्रसार करून जंगलांची वाढ घडवून आणतो (Engineer), पण तो शिकारी प्राण्यांना नियंत्रित करू शकत नाही.

▪ बिबट्या (Mesopredator) वाघाच्या अनुपस्थितीत तृणभक्षींची संख्या कमी करतो, पण तो गव्यासारख्या मोठ्या प्राण्यांची शिकार करून त्यांची संख्या नियंत्रित करू शकत नाही. शिवाय, तो केवळ मोठ्या तृणभक्षींची शिकार न करता  छोट्या (उदा. ससा) ते मध्यम आकाराच्या (उदा. सांबर) प्राण्यांचीही शिकार करतो; ज्यांचे परिसंस्थेतील महत्त्व मोठ्या प्राण्यांपेक्षा तुलनेने कमी असते.

▪ सिंह कळपाने राहतो आणि भारतात तो केवळ गीरच्या कोरड्या प्रांतापुरता मर्यादित आहे; त्यामुळे त्यांचे प्रभावक्षेत्र अत्यंत मर्यादित आहे.

▪ वाघ हा एकमेव अशी शिकारी प्रजाती आहे; जी संपूर्ण भारतातील विविध प्रकारच्या जंगलांना (सदाहरित ते शुष्क पानझडी) आक्रमक नियंत्रणात ठेवून परिसंस्थेचा समतोल राखते.


५. भारतातील प्रमुख व्याघ्र स्थानांतरण प्रकल्प: यश आणि अपयशाचा लेखाजोखा-

स्थानांतरण (Translocation) म्हणजे एका समृद्ध अधिवासातून वाघ पकडून तो नामशेष झालेल्या किंवा अत्यल्प संख्या असलेल्या दुसऱ्या अधिवासात सोडणे. भारतातील या प्रयोगांचा संवर्धनशास्त्राच्या (Conservation Biology) दृष्टीने आढावा:

भारतातील प्रमुख व्याघ्र स्थानांतरण प्रकल्प-

(अ) यशस्वी प्रकल्प-

१. पन्ना व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश (Panna Model- 2009)-

• पार्श्वभूमी: शिकार आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे २००९ मध्ये पन्नामधील वाघ शून्य झाले.

• कृती: बांधवगड आणि कान्हा येथून वाघ/वाघिणी स्थानांतरित करण्यात आल्या (उदा. वाघीण T1 व T2).

• यशाची कारणे:

A. सक्षम नेतृत्व आणि राजकीय पाठबळ: क्षेत्र संचालक पी. श्रीनिवास मूर्ती यांचा कठोर प्रशासकीय कटाक्ष.

B. उत्कृष्ट प्रे-बेस: स्थानांतरणापूर्वी सांबर व चितळांची संख्या पुरेशी होती.

C. स्थानिक समुदायाचा सहभाग: पारधी समुदायाचे पुनर्वसन करून त्यांच्यतूनच गुप्तहेर जाळे विणण्यात आले.

D. परिणाम: आज पन्नामध्ये पन्नासहून अधिक वाघ असून ते शेजारच्या जंगलातही विस्तारत आहेत.

२. सारिस्का व्याघ्र प्रकल्प, राजस्थान (Sariska Model- 2008)-

• पार्श्वभूमी: २००४-०५ मध्ये शिकारीमुळे येथील वाघ पूर्ण नष्ट झाले होते.

• कृती: रणथंबोर येथून हेलिकॉप्टरद्वारे वाघ स्थानांतरित केले गेले.

• प्रारंभिक आव्हाने: सुरुवातीला जनुकीय साम्य (Inbreeding) आणि वाघांमधील तणावामुळे प्रजननात विलंब झाला.

• सध्याची स्थिती: सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मानवी वस्त्यांच्या पुनर्वसनानंतर आता सारिस्कात पन्नासहून अधिक वाघांची संख्या स्थिर झाली आहे.


(ब) अयशस्वी व आव्हानात्मक प्रकल्प-

१. सातकोसिया व्याघ्र प्रकल्प, ओडिशा (Satkosia Model- 2018)

• पार्श्वभूमी: हा भारतातील पहिला आंतर-राज्यीय स्थानांतरण प्रकल्प (Inter-state Translocation) होता. मध्य प्रदेशातून (कान्हा व बांधवगड) ‘महावीर’ (नर) आणि ‘सुंदरी’ (मादी) हे वाघ सातकोसियात आणले गेले.

• अपयशाची कारणे:

A. स्थानिक विरोध: गावकऱ्यांना विश्वासात घेतले गेले नाही; शिवाय, अपुऱ्या जनजागृतीमुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

B. अपुरा प्रे-बेस व घनदाट मानवी वस्ती: ‘सुंदरी’ मानवी वस्तीत घुसली आणि दोन माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. गावकऱ्यांनी वनविभागाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली.

C. शिकार: ‘महावीर’चा शिकारीच्या फासात (Snare) अडकून दुर्दैवी मृत्यू झाला.

D. परिणाम: ‘सुंदरी’ला जेरबंद करून मध्य प्रदेशात परत पाठवावे लागले आणि NTCA ने हा प्रकल्प स्थगित केला.

२. राजाजी व्याघ्र प्रकल्प, उत्तराखंड (Rajaji Model- 2022-23)

• पार्श्वभूमी: राजाजीच्या पश्चिम भागात वाघांची संख्या वाढवण्यासाठी जिम कॉर्बेटवरून तेथे वाघ स्थानांतरित केले गेले.

• आव्हाने: राजाजीचा पूर्व आणि पश्चिम भाग हरिद्वार-डेहराडून महामार्ग आणि रेल्वे लाईनमुळे दुभंगला गेला आहे (Corridor Fragmentation). यामुळे स्थानांतरित वाघांच्या अधिवासाचा नैसर्गिक विस्तार होणे कठीण जात आहे.


६. सह्याद्री-कोयना व्याघ्र स्थानांतरण कार्यक्रम: ‘ऑपरेशन तारा’-

पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प (STR) हा महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित राहिलेला व्याघ्र अधिवास आहे

* ऐतिहासिक समस्या: 'फंक्शनल एक्स्टिंक्शन'चा धोका-

गेल्या दोन दशकांत सह्याद्रीत वाघांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर होते. कॅमेरा ट्रॅपमध्ये या भागात अवघे ३ नर वाघ नोंदवले जात होते, परंतु एकही प्रजननक्षम मादी वाघीण (Breeding Female) नव्हती. परिणामी, नैसर्गिक पुनरुत्पादन थांबले होते. या भौगोलिक पट्ट्याला विदर्भातील समृद्ध जंगलांशी (ताडोबा/पेंच) जोडणारा कॉरिडॉर खंडित झाल्यामुळे स्व-पुनरुज्जीवन शक्य नव्हते.

* ‘ऑपरेशन तारा’ची आखणी व टप्पे-

महाराष्ट्र वनविभाग, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) आणि भारतीय वन्यजीव संस्था (WII, Dehradun) यांनी संयुक्तपणे सह्याद्रीत ८ वाघ (३ नर + ५ मादी) टप्प्याटप्प्याने स्थानांतरित करण्याची वैज्ञानिक योजना आखली. या मोहिमेला ‘ऑपरेशन तारा’ नाव देण्यात आले.

‘ऑपरेशन तारा’-

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (STR) 'ऑपरेशन तारा' (Tiger Augmentation and Range Expansion) अंतर्गत पुनर्वसित करून मोकळ्या जंगलात सोडण्यात आलेल्या पहिल्या तीन वाघिणींची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. चंदा (STR-04)– नोव्हेंबर २०२५ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (TATR) सह्याद्रीत आणले गेले. या वाघिणीला नंतर ‘तारा’ हे नाव देण्यात आले.


२. तारा (STR-05)– ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून (TATR) आणून डिसेंबर २०२५ मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले.



३. हिरकणी (STR-06)– पेंच व्याघ्र प्रकल्पातून (PTR-123) आणून फेब्रुवारी २०२६ मध्ये कोयना वन्यजीव अभयारण्यात सोडण्यात आले.


(तारा, चंदा, हिरकणी इत्यादी नावे ही शास्त्रीय नसून ती शक्यतो या वाघांबरोबर काम करणाऱ्या लोकांनी वाघांच्या गुण/स्थान विशेषामुळे दिलेली नावे असतात.)



७. स्थानांतरणाची शास्त्रीय कार्यपद्धती आणि आव्हाने-

स्थानांतरण ही केवळ प्राण्याला एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी सोडण्याची सोपी प्रक्रिया नाही. यात उच्च दर्जाचे संवर्धन जीवशास्त्र (Conservation Biology) समाविष्ट असते.

(अ) सॉफ्ट रिलीज विरुद्ध हार्ड रिलीज (Soft Release vs Hard Release)-

• हार्ड रिलीज (Hard Release):

◦ यामध्ये पद्धतीत वाघाला पकडल्यानंतर थेट अनोळखी/ नवीन जंगलात मोकळे सोडले जाते. यामध्ये वाघ गोंधळून (Disoriented) जुन्या अधिवासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो (Homing Instinct), मानवी वस्तीत घुसतो किंवा प्रादेशिक संघर्षात मारला जातो.

◦ यामध्ये वाघ दिशाहीन होण्याचा मोठा धोका असतो.

◦ शिवाय, या पद्धतीत वाघाच्या मार्गक्रमणाची, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी करता येत नाही.


सॉफ्ट रिलीज (Soft Release) (सह्याद्रीत वापरलेली पद्धत):

◦ यामध्ये वाघाला सर्वप्रथम १ ते २ हेक्टरच्या नैसर्गिक बंदिस्त एन्क्लोजरमध्ये (Enclosure) काही आठवडे ठेवले जाते.

◦ येथे त्याला स्थानिक हवामान, वास आणि पाण्याचे स्त्रोत यांची सवय होते.

◦ त्याचा प्रवासानंतरचा शारीरिक व मानसिक ताण (Travel Stress) कमी होतो.

◦ वैद्यकीय तपासणीनंतर आणि तो पूर्ण तंदुरुस्त असल्याचे सिद्ध झाल्यावरच एन्क्लोजरचा दरवाजा उघडून त्याला मुक्त जंगलात सोडले जाते.

एन्क्लोजरची पूर्वतपासणी

(ब) मुख्य आव्हाने आणि सुरक्षेचे उपाय-

(I) प्रवासातील ताण (Capture & Transport Stress): वाघाला ट्रँक्विलाईझ (Tranquilize) करताना भूलीच्या औषधाचे प्रमाण एकदम अचूक ठेवावे लागते. २५-२७ तासांच्या ताडोबा ते सह्याद्री या प्रवासात ‘तारा’ला एका वातानुकूलित विशेष वाहनातून (Special Crate) आणले गेले, ज्यावेळी तिच्यासोबत संपूर्ण प्रवासात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Surgeons) सतत उपस्थित होते.

या वातानुकूलित वाहनातून ‘तारा’ला आणण्यात आले.


(II) प्रे-बेस सक्षमीकरण (Prey Density Augmentation): वाघ सोडण्यापूर्वी सह्याद्रीत खाद्याची कमतरता भासू नये म्हणून पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालय आणि इतर ठिकाणांवरून शेकडो चितळ व सांबरांचे सह्याद्रीच्या कोअर झोनमध्ये यशस्वी पुनर्वसन करण्यात आले होते.

(III) मानव-वन्यजीव संघर्ष आणि स्थानिक विश्वास: सातकोसियाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सह्याद्रीच्या बफर क्षेत्रातील गावकऱ्यांमध्ये 'व्याघ्र मित्र' उपक्रमाद्वारे तीव्र जनजागृती करण्यात आली. तरीही, दृकश्राव्य माध्यमे व‌र्तमानपत्रातून अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे असे स्थानिकांशी बोलताना जाणवते.


८. स्थानांतरणाची तांत्रिक व आनुवंशिक (Genetic) माहिती-
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील स्थानांतरण हे आधुनिक तंत्रविज्ञान (Technology) व जनुकीय विज्ञानाचा (Genetics) उत्तम मेळ आहे.
तांत्रिक प्रोटोकॉल प्रवाह

  [भूल व आरोग्य तपासणी] ➔ [DNA नमुने व Genetical Profiling] ➔ [GPS सॅटेलाईट कॉलर]
                                                                     │
  [कॅमेरा ट्रॅपिंग नेटवर्क] ◄── [२४x७ रिअल-टाईम मॉनिटरिंग] ◄──────────┘

१. आनुवंशिक विविधता (Genetic Diversity & Inbreeding Prevention)-
सारिस्कामध्ये सुरुवातीला एकाच वंशावळीतील वाघ आणल्याने जनुकीय दोष निर्माण झाले होते. हे टाळण्यासाठी सह्याद्रीत वाघ निवडताना:

• DNA मायक्रोसॅटेलाईट विश्लेषणाद्वारे (Microsatellite DNA Analysis) वाघांची वंशावळ तपासली गेली.

• ताडोबा आणि पेंच या दोन वेगवेगळ्या जनुकीय पूलमधून (Genetic Pools) वाघिणी निवडल्या गेल्या, जेणेकरून सह्याद्रीतील स्थानिक नरांशी त्यांचे मीलन झाल्यावर येणारी नवी पिढी आनुवंशिकदृष्ट्या सशक्त आणि विविध आजार प्रतिकारक असेल.

२. GPS सॅटेलाईट रेडिओ कॉलरिंग (VHF + GPS Telemetry)-
प्रत्येक सोडलेल्या वाघिणीच्या गळ्यात VHF/GPS सॅटेलाईट कॉलर बसवण्यात आली आहे.

• ही कॉलर दर तासाला वाघाचे अचूक अक्षांश-रेखांश (Coordinates) उपग्रहाद्वारे वनविभागाच्या कंट्रोल रूममधील GIS मॉनिटरिंग सिस्टीमला पाठवते.

• जर वाघिणीने जंगलाची सीमा ओलांडून मानवी वस्तीकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर प्रणाली ‘Geo-fencing Alert’द्वारे वनरक्षकांना त्वरित इशारा देते.

३. कॅमेरा ट्रॅपिंग व क्षेत्रीय संरेखण
• सह्याद्रीच्या अत्यंत दुर्गम, तीव्र उताराच्या आणि घनदाट सदाहरित जंगलात ५०० हून अधिक कॅमेरा ट्रॅप्स लावले गेले आहेत.

• वाघिणींचे इतर स्थानिक नरांशी झालेले संपर्क, त्यांच्या शिकारीचा पॅटर्न (Kills) आणि त्यांचे आरोग्य यांवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

९. ‘जागतिक व्याघ्र दिना’चे सद्यपरिस्थितीतील महत्त्व व भवितव्य-
आज आपण जेव्हा जागतिक व्याघ्र दिन साजरा करतो, तेव्हा भारतापुढील आव्हानांचे स्वरूप बदलले आहे. आता वाघांची केवळ संख्या वाढवणे हा मुद्दा उरलेला नाही, तर 'अधिवासांची जोडणी' (Habitat Connectivity) आणि 'धारण क्षमता' (Carrying Capacity) हे मुख्य मुद्दे बनले आहेत.

भविष्यातील व्याघ्र संवर्धनाचे तीन मुख्य स्तंभ-

→ अधिवास जोडणी व कॉरिडॉर (Landscape Corridors)

→ जनुकीय देवाणघेवाण (Genetic Exchange)

→ स्थानिकांचा आर्थिक सहभाग (Eco-tourism)

१. लँडस्केप लेव्हल संवर्धन (Landscape-based Conservation)
राजाजी प्रकल्पाच्या अनुभवाने दाखवून दिले की, जंगलांचे तुकडे झाले की वाघ सुरक्षित राहत नाहीत. सह्याद्रीत पुनर्वसित केलेल्या वाघिणींमुळे भविष्यात 'उत्तर-पश्चिम घाट व्याघ्र कॉरिडॉर' (North-Western Ghats Tiger Corridor) पुन्हा जिवंत होणार आहे.

• हा कॉरिडॉर सह्याद्री (महाराष्ट्र)→तिलारी (महाराष्ट्र)→ म्हादई (गोवा)→ काली व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक) यांना जोडतो.

२. जनुकीय आरोग्य (Genetic Rescue)
अलग पडलेल्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये एकाच कुटुंबातील वाघांमध्ये मीलन होऊन Inbreeding Depression चा धोका असतो. 'ऑपरेशन तारा'सारखे प्रकल्प वेगवेगळ्या जंगलांमधील जनुकीय देवाणघेवाण (Gene Flow) सुरळीत ठेवतात.

३. इको-टुरिझम आणि स्थानिक अर्थव्यवस्था
व्याघ्र संवर्धन यशस्वी होण्यासाठी स्थानिक समुदायाला प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळणे गरजेचे आहे. सह्याद्रीत वाघांचे कुटुंब स्थिर झाल्यावर:

• पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील बफर झोनमध्ये नियंत्रित इको-टुरिझम (Eco-tourism) विकसित होईल.

• होम-स्टे, जिप्सी सफारी, गाइड आणि स्थानिक हस्तकलेला प्रोत्साहन मिळून गावकऱ्यांना शाश्वत रोजगार मिळेल, ज्यामुळे वन्यजीवांप्रती त्यांचा दृष्टिकोन सहकार्याचा बनेल.

१०. समारोप-
वाघ वाचवणे ही केवळ एका वनविभागाची किंवा प्राणिप्रेमींची जबाबदारी नसून ती आपली समग्र पर्यावरणीय आणि सांस्कृतिक बांधिलकी आहे.

सारिस्का आणि पन्नाच्या अभूतपूर्व यशाने आपल्याला आशेचा किरण दाखवला; सातकोसियाच्या चुकांनी आपल्याला संवर्धनशास्त्रातील जनुकीय त्रुटींची जाणीव करून दिली, तर राजाजीच्या प्रयोगाने आपल्याला कॉरिडॉरच्या एकसलगतेचे महत्त्व शिकवले. या सर्व जागतिक व राष्ट्रीय अनुभवांचा अर्क काढून महाराष्ट्राने सह्याद्री-कोयना भूभागात सुरू केलेला 'ऑपरेशन तारा' हा प्रकल्प भारतीय व्याघ्र संवर्धनातील एक नवा सुवर्णअध्याय ठरत आहे.



ताडोबा आणि पेंचच्या घनदाट अरण्यातून निघालेल्या ‘तारा’, ‘चंदा’ आणि ‘हिरकणी’ जेव्हा सह्याद्रीच्या उंच कड्यांवर आणि कोयनेच्या निवांत पाणलोट क्षेत्रात आपली पावले रोवतात, तेव्हा तो केवळ तीन प्राण्यांचा प्रवास राहत नाही. तो असतो—नष्ट झालेल्या परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाचा प्रवास!

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून पुन्हा एकदा घुमणारी वाघाची डरकाळी ही केवळ एका हिंस्त्र प्राण्याचे अस्तित्व दर्शवत नाही, तर ती ग्वाही देते की आमची नद्यांची उगमस्थाने सुरक्षित आहेत, आमची जंगले निरोगी आहेत आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल पुन्हा प्रस्थापित होत आहे.

जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने आपणही निसर्गसंवर्धनाची हीच प्रतिज्ञा करणे गरजेचे आहे; कारण वाघ वाचेल, तरच जंगल वाचेल; आणि जंगल वाचेल, तरच मानवाचे अस्तित्व या वसुंधरेवर सुरक्षित राहील!


• संदर्भ:
१. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA),
२. भारतीय वन्यजीव संस्था (WII, Dehradun),
३. महाराष्ट्र वनविभाग, आणि,
४. जागतिक व्याघ्र अहवाल (GTRP).

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील,
एम.बी.बी.एस.,एम.डी.,
वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’,
ग्रामीण रुग्णालय, गगनबावडा)
(मोबाईल- ८३२९३८१६१५)
(© लेखाचे सर्वाधिकार लेखकाकडे सुरक्षित)

Comments

  1. फोटो आणि माहितीचा मेळ उत्तम जमविला आहे. संवर्धनाचा शेवटी दिलेला संदेश खूप महत्वाचा आहे. वाघा बद्दलची एवढी सविस्तर माहिती एकाच ठिकाणी मिळाली आणि त्यांच्याबद्दलचा आदर तसेच वाघाच्या डोळ्यातली जरब व जंगलातील त्याची शान डोळ्यासमोर उभी राहिली...छान...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you very much. आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी मौल्यवान आणि उत्साहवर्धक आहे.

      Delete
  2. अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लेखासाठीची मेहनत आश्चर्य कारक

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप आभार! आपली प्रतिक्रिया अमूल्य आहे!

      Delete
  3. व्याघ्र संवर्धन आणि त्याची एकूणच जंगल आणि पर्यायाने इको सिस्टम विकास यातील संबध , त्यासाठी शासन व्यवस्थेतील तांत्रिक प्रयत्न याचा माहितीपूर्ण ऊहापोह लेखकाने अगदी उत्तम रित्या केल्याचे जाणवते ….यासंदर्भात नुकतीच आम्ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास भेट देवून चांदोली ते उदगिरी जंगलाची जंगल सफारी केल्याने लेखकाच्या माहितीशी रिलेट होता आले …..सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील विविध एक्टिव्हिटी जवळून अनुभल्या असल्याने लेख खूप इंटरेस्टिंग वाटला ……तसा विषय क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा पण मुद्देसूद ,माहितीपूर्ण विवेचनामुळे वाचनीय झाल्याचे जाणवते …..शेवटी व्याघ्र संवर्धन आणि वसुंधरा विकास याचा नेमका संबंधातून लेखनाचा शेवट करताना लेखकाने जनतेला त्यांची त्यातील भूमिका लक्षात आणून दिली आहे …. एकंदरीत याविषयातील भविष्यातील घडामोडी जाणून घेण्याइतकी उत्सकुता वाचकांच्या मध्ये निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे निर्विवाद जाणवते ……आपणा कडून भविष्यातही अश्याच माहितीपूर्ण लेखनाची अपेक्षा …..!!!!

    ReplyDelete
  4. खरंच आज वाघ असणे ही काळाची गरज आहेच त्यांच बरोबर निसर्ग अतिरेकी मानवी वृत्ती,जीवनाला कळाटणी देणारा हा लेख आहे.

    ReplyDelete
  5. फारच सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेख, डॉ. अमित यांच्या चौफेर व्यक्तिमत्वातील वन्यजीव आणि निसर्ग या अत्यंत संवेदनशील आणि भावनिक बंध असलेला विषय उत्कृष्टपणे मांडला.
    👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  6. Very Informative and nice article Sir 👍

    ReplyDelete
  7. Every article is a mirror of your passion towards wildlife and it’s so illustrative that you take us with you in the uncharted territory we just dream to experience.

    ReplyDelete
  8. "अप्रतिम लेख! 🐅🌿 'ऑपरेशन तारा'मुळे सह्याद्रीत व्याघ्र संवर्धनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी लेखनासाठी प्रथमतः डॉ. अमित (दादा)पाटील यांचे हार्दिक अभिनंदन. 👏"
    अतिशय सुंदर आणि ज्ञानवर्धक लेख. 'ऑपरेशन तारा'ची माहिती, व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व आणि सह्याद्रीतील प्रयत्न तुम्ही प्रभावीपणे मांडलेले आहात. तुमच्या सखोल अभ्यासाचे प्रतिबिंब ह्या लेखात दिसते. अभिनंदन!
    हा लेख केवळ व्याघ्र संवर्धनावरील माहिती देत नाही, तर वाघाचे परिसंस्थेतील अनन्यसाधारण महत्त्वही वैज्ञानिक आधारांसह स्पष्ट करतो. जागतिक व्याघ्र दिनाचा इतिहास, प्रोजेक्ट टायगरची वाटचाल आणि सह्याद्रीतील 'ऑपरेशन तारा'चा आढावा अत्यंत प्रभावी आहे. तथ्यपूर्ण मांडणी, सुबोध भाषा आणि संवर्धनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हा लेख विद्यार्थ्यांपासून पर्यावरणप्रेमींपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त ठरतो.

    तुमचा लेख वाचून सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धन कार्याबद्दल अभिमान वाटला. विषयाची मांडणी अत्यंत सखोल आणि समजण्यास सोपी आहे. पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाबाबत जागरूकता वाढवणारा हा लेख निश्चितच प्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  9. अभ्यास पूर्ण आणि सविस्तरपणे माहिती देणारा महत्त्व पूर्ण लेख.. खूप खूप अभिनंदन dr. अमित.

    ReplyDelete
  10. निसर्ग संवर्धन हीच आपल्या पुढच्या पिढीसाठीची खरी गुंतवणूक. 🌍

    ReplyDelete
  11. Very nice writing,very much informative article ......
    Thanks for sharing......

    ReplyDelete
  12. DR.HARSHANAND KISHANRAO KHILLAREThursday, 30 July 2026 at 11:17:00 GMT+5:30

    खूप सखोल अभ्यास करून अगदी सोप्या पद्धतीने सर्वसामान्य जनमानसांत आत्मसात होण्यासारखे लेखन आहे...Dr.Amit ... मनःपूर्वक शुभेच्छा...!

    ReplyDelete
  13. खूप छान लेख आहे. एखाद्या स्पर्धा परीक्षा च्या अभ्यासकाला देखील उपयुक्त आहे. वाघ आणि पर्यावरण/अधिवास यांचा समतोल कसे गरजेचे आहे याचे विश्लेषण करून विवेचन केले आहे. 👌

    ReplyDelete
  14. वाघ आणि एकूणच जंगल आणि त्याचे आरोग्य व जंगलांचे अस्तित्व याविषयी अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल विश्लेषण. ज्यांना या विषयातील काहीच माहिती नाही त्यांना देखील अत्यंत सोप्या भाषेत समजेल अशी सखोल माहिती एकाघ ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद सर. व्याघ्र संवर्धनाचा संपूर्ण इतिहास टप्पेनिहाय व मुद्देसूद दिल्यामुळे christopher Nolan चा चित्रपट पाहिल्यासारखं वाटत आहे. अप्रतिम मांडणी.

    ReplyDelete

Post a Comment