सर्पकावू: भारताच्या पश्चिम घाटातील एक जिवंत परिसंस्था, श्रद्धा आणि विज्ञान (‘Sarpakavu’: A Living Ecosystem of India’s Western Ghats — Faith and Science)

‘सर्पकावू’: भारताच्या पश्चिम घाटातील एक जिवंत परिसंस्था, श्रद्धा आणि विज्ञान

(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)


सर्पकावूमधील नागप्रतिमा



केरळच्या नागवनांचा सखोल सांस्कृतिक, विधीशास्त्रीय आणि पर्यावरणीय अभ्यास-

कल्पना करा; एखाद्या घराच्या आवारात, माणसाने कधीही न तोडलेली, न छाटलेली, शतकानुशतके जशीच्या तशी राहिलेली एक घनदाट झाडी आहे. त्यात आत शिरायचे धाडस फार कमी लोक करतात; कारण आत सर्प वास करतात (राहतात) अशी जनश्रद्धा आहे. ही जागा ना शेतीसाठी वापरली जाते, ना बांधकामासाठी. फक्त वर्षातून एकदा एका विशिष्ट नक्षत्राच्या तिथीवर इथे दिवा लावला जातो, दूध घातले जाते आणि समारंभपूर्वक गाणी गायली जातात. थांबा; हे चित्र काल्पनिक नाही. हे केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवरील हजारो घरांतील वास्तव आहे; आणि, या जागेचे नाव आहे ‘सर्पकावू’- अर्थात पवित्र ‘नागवन’!

घराच्या प्रशस्त आवारातील सर्पकावू

मानवी संस्कृतीच्या इतिहासात काही अशा परंपरा आढळतात, ज्या केवळ धार्मिक कर्मकांडापुरत्या मर्यादित नसून त्यांनी निसर्गाच्या संतुलनात आणि दुर्मीळ प्रजातींच्या संरक्षणात अमूल्य योगदान दिलेले आहे. दक्षिण भारतामध्ये, विशेषतः केरळमधील मलबार किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेली 'सर्पकावू' (Sarpa Kavu- Serpent Grove) ही संकल्पना या देवरायांच्या श्रेणीत सर्वोच्च स्थानी विराजमान आहे.

वेगवेगळ्या राज्यात असणाऱ्या देवराया... सर्पकावू या अशाच देवरायांचे एक भाग असतात.

पर्यावरणशास्त्रज्ञ (environmentalist) आणि सर्पतज्ज्ञांच्या (herpetologists) दृष्टिकोनातून पाहिले तर सर्पकावू ही जगातील काही मोजक्या ‘श्रद्धा-आधारित संरक्षण-संवर्धन प्रणालीं’पैकी (faith-based conservation systems) एक अद्वितीय आणि वैज्ञानिकदृष्ट्या दस्तावेजीकरण झालेली परंपरा आहे. या लेखात आपण केवळ पौराणिक कथा किंवा विधींबद्दलच जाणून घेणार नाही, तर या परंपरेमागील समाजशास्त्र व संबंधित आकडेवारी, जैवविविधता, विज्ञान आणि मानव-सर्प संबंधांवरील अद्ययावत संशोधन यांचाही ऊहापोह करणार आहोत.


भाग १: ‘सर्पकावू’ म्हणजे नेमके काय?
मल्याळम भाषेत ‘कावू’ या शब्दाचा अर्थ वन किंवा बाग असा होतो. ‘सर्पकावू’ म्हणजे शब्दशः ‘सर्पांचे वन/ बाग’; ज्याचा भावार्थ आहे सर्पदेवतांना समर्पित केलेले पवित्र वनक्षेत्र. केरळ आणि कर्नाटकच्या तुळुनाडू भागातील पारंपरिक घरांच्या (विशेषतः तरवाडू एकत्रित कुटुंबाचे मूळ निवासस्थान) आवारात असे एक राखीव क्षेत्र असते, जिथे मानवी हस्तक्षेप जवळजवळ शून्य असतो.





या वनाच्या मध्यभागी 'चित्रकूडूकल्लू' नावाचा एक खास आकाराचा दगड असतो, जो नागराजाचे (सर्पांचा राजा) प्रतीक मानला जातो. या दगडावर कोरीव नागाकृती असतात किंवा कधी हा दगड केवळ गोलाकार, अमूर्त स्वरूपाचाही असतो. वैज्ञानिक सर्वेक्षणांनुसार, सर्पकावूमध्ये अशा नागदेवतेची उपस्थिती नेहमी स्पष्ट दिसतेच असे नाही; म्हणूनच संशोधकांना अभ्यासादरम्यान प्रत्येक सर्पकावूतील नागदेवतेच्या अस्तित्वाची खातरजमा तेथील वडीलधाऱ्या व्यक्तींकडून किंवा पुजाऱ्यांकडून करून घ्यावी लागते.

चित्रकूडूकल्लू

───

भाग २ : पौराणिक व ऐतिहासिक उगम-

सर्पकावूच्या उगमामागे परशुराम-कथा सर्वाधिक प्रचलित आहे.
भारतात नागपूजेची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. केरळच्या लोककथांनुसार आणि ‘केरलउत्पत्ती’ या ग्रंथातील उल्लेखांनुसार जेव्हा भगवान परशुरामाने समुद्रातून केरळची भूमी निर्माण केली, तेव्हा ती भूमी अत्यंत क्षारयुक्त (लवणयुक्त) आणि मानवी वस्तीस अयोग्य होती. या भूमीचे शुद्धीकरण करण्यासाठी परशुरामाने नागदेवतांची प्रार्थना केली. नागदेवतांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्या विषमुक्तीमुळे तिथली भूमी सुपीक झाली. यानंतर परशुरामांनी ब्राह्मण समुदायाच्या साहाय्याने तांत्रिक विधी करून नागराज आणि नागयक्षी यांची प्राणप्रतिष्ठा केली. या उपकाराची परतफेड म्हणून प्रत्येक पारंपारिक कौटुंबिक घरांच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा आवारात सापांसाठी ‘सर्पकावू’ राखून ठेवण्याची परंपरा सुरू झाली.

परशुराम चित्रकथा

मात्र वैज्ञानिक व पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून पाहता, नागपूजेची मुळे यापेक्षाही खूप प्राचीन आहेत असा अंदाज आहे. सर्पचित्रणाचे सर्वांत जुने पुरावे हडप्पा, मोहेंजोदडो आणि लोथल येथील चित्रांमध्ये सापडतात, जे इसवीसनपूर्व सुमारे २००० वर्षांपूर्वीचे आहेत; म्हणजे जवळपास भारतीय उपखंडात आर्य संस्कृतीच्या आगमनापूर्वीचे. नागांच्या रुपातील देवतांच्या सर्वांत जुन्या प्रतिमा हडप्पा काळानंतर, इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकाच्या अखेरीस दिसू लागतात. यावरून असे दिसते की नागपूजा ही मूलतः वैदिकपूर्व, द्रविड जनजातीय परंपरांतून उगम पावलेली प्रथा असून, कालांतराने तिला वैदिक नागाराधनेची जोड मिळाली; अगदी त्याच पद्धतीने ज्याप्रमाणे केरळमधील इतर स्थानिक लोकदेवतांनाही व्यापक हिंदू परंपरांतर्गत आत्मसात केले गेले.

एकोणिसाव्या शतकातील पुरातत्त्वशास्त्रज्ञ जेम्स फर्ग्युसन यांनी नागपूजेकडे भीतीपेक्षा प्रेम आणि आदराचा अविष्कार म्हणून पाहिले होते. ‘समान कारणांमुळे जगभर समान परिणाम घडतात,’ असे भाकीत मांडत त्यांनी सर्पपूजेचे मूळ हे केवळ विषारी सापांच्या भीतीत नसून त्यांच्याविषयीच्या कौतुकातही आहे, असे नमूद केले होते. आधुनिक संशोधनही या मताला दुजोरा देते.

जेम्स फर्ग्युसन; पुरातत्त्वशास्त्रज्ञ

───

भाग ३: केरळातील प्रमुख सर्पकावू व नागमंदिरे-

केरळात अनेक प्रसिद्ध नागमंदिरे आहेत, ज्यांच्याभोवती सर्पकावूची परंपरा विणलेली आहे:

मन्नारशाला श्री नागराज मंदिर (हरिपाड, अलेप्पी जिल्हा)– 
सर्पकावू परंपरेचे सर्वांत भव्य उदाहरण. समुद्रसपाटीपेक्षा खालच्या पातळीवर वसलेल्या या घनदाट वनक्षेत्रात तब्बल तीस हजारांहून अधिक सर्पप्रतिमा असल्याचे सांगितले जाते. निपुत्रिक दांपत्यांसाठी हे विशेष श्रद्धास्थान आहे.

मन्नारशाला श्री नागराज मंदीर; केरळमधील सर्पकावूसंदर्भातील सर्वांत प्रसिद्ध मंदीर

मन्नारशाला मंदिरातील एक आखीवरेखीव नागराज प्रतिमा

नागराज

मन्नारशाला मंदिरात अशा तीस हजारांहून अधिक नागराज प्रतिमा आहेत असे मानले जाते. त्यांपैकी काही...

आदिमूलम् वेट्टिकोड श्री नागराजस्वामी मंदिर (आलाप्पुळा जिल्हा)–
कायमकुलमजवळील हे मंदिरही पौराणिकदृष्ट्या परशुरामांनीच प्रतिष्ठापित केल्याचे मानले जाते. सहा एकर भूमीवर पसरलेल्या या मंदिराच्या सर्पकावूत नागराज आणि नागयक्षी या प्रमुख देवता आहेत. मेप्पळ्ळिल इल्लम या पारंपरिक ब्राह्मण कुटुंबाकडे या मंदिराचे पौरोहित्य पिढ्यानपिढ्या चालत आले आहे.

आदिमूलम वेट्टिकोड श्री नागराजस्वामी मंदीर

नागराज प्रतिमा

नागराज व नागयक्षी

इतर प्रमुख मंदिरे-
पंबुमेक्काट्टु मन, पुलिक्कल शंकरमादम, पंबडी नागराज मंदिर, कुमारनल्लूर नागराज मंदिर आणि अलानाडू येथील मादनमारुकावू नागराज मंदिर ही केरळातील इतर महत्त्वाची नागाराधना केंद्रे आहेत. या मंदिरांची संख्या आणि तेथे येणाऱ्या भाविकांची गर्दी यावरूनच केरळी समाजात नागपूजेची मुळे किती खोलवर रुजली आहेत, याची कल्पना येते.

───

भाग ४: नागाराधनेतील विधी: एक सखोल आढावा-

सर्पकावूभोवती विणलेल्या विधींचे जाळे अत्यंत गुंतागुंतीचे आणि बहुस्तरीय आहे. या सर्व विधींच्या केंद्रस्थानी ‘नाग दोष’ ही संकल्पना आहे.

नाग दोष : संकल्पना आणि परिणाम-
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास नाग दोष म्हणजे सर्पदेवतेचा कोप होय. एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून किंवा नकळत सर्पाला इजा केली, किंवा सर्पांचे वास्तव्य असलेली जागा उद्ध्वस्त केली, तर हा दोष लागतो असे मानले जाते. पारंपरिक समजुतीनुसार नाग दोषामुळे त्वचेवर पांढरे डाग (कोड), विवाहात विलंब, गर्भधारणेतील अडचणी, डोळ्यांचे विकार, अपंगत्वासह जन्मलेली मुले, कौटुंबिक कलह आणि इतर असाध्य आजार उद्भवतात, अशी श्रद्धा आहे. हा दोष दूर करण्यासाठीच पुढील विधी केले जातात. (अर्थात, आधुनिक वैद्यकशास्त्र किंवा समाजशास्त्र यांचे समर्थन करत नाही.)

सर्पबली-
अश्लेषा नक्षत्रावर (आयिल्यम) साजरा होणारा हा विधी अष्टनागांना (आठ प्रमुख सर्पदेवता- अनंत, गुलिक, वासुकी, शंखपाल, तक्षक, महापद्म, पद्म आणि कर्कोटक) प्रसन्न करण्यासाठी केला जातो. जमिनीवर रंगीबेरंगी पद्म (कमळ) आकाराचे चित्र रेखाटले जाते, ज्याच्या मध्यभागी अष्टदल (आठ पाकळ्या) असतात. या अष्टदलातील वर व खाली निर्देशित करणारे त्रिकोण अनुक्रमे निसर्ग (प्रकृती) आणि मानव (पुरुष) यांच्यातील घनिष्ठ नात्याचे प्रतीक मानले जातात. पुजारी या चित्राभोवती मंत्रोच्चार करत आहुती देतात.

अष्टनाग

अष्टनाग पूजा आणि नूरुम् पालुम्-
आठही प्रमुख नागदेवतांना ‘नूरुम् पालुम्’ अर्थात कोवळे नारळ पाणी, गायीचे ताजे दूध, गुलाबजल, हळद आणि नारळाच्या कोंबाचा रस एकत्र करून तयार केलेला विशेष प्रसाद- ‘तेलिचुकुडा’ या विधीद्वारे अर्पण केला जातो.

कलमेळुत्तु (रांगोळी-चित्रकला)-
नैसर्गिक रंगीत भुकटीपासून बनवलेल्या पाच रंगांचा वापर करून जमिनीवर नागदेवतेची तपशीलवार आकृती रेखाटली जाते. यात पांढरा (तांदळाचे पीठ), लाल (केशराची भुकटी), पिवळा (हळद), हिरवा (पानांची भुकटी) आणि काळा (जळलेल्या तांदळाच्या भुशाची राख) रंग वापरले जातात. हातांनीच ही कला साकारली जाते आणि सावली-प्रकाशाच्या तंत्राने त्रिमितीचा आभास निर्माण केला जातो. अष्टनाग पूजेसाठी नागराज, नागयक्षी, अंजनमणी नागम्, मणी नागम्, परा नागम् आणि करी नागम् यांच्या स्वतंत्र आकृत्या रेखाटल्या जातात.

कलमेळुत्तु

पुल्लुवन पाट्टु आणि सर्पम् थुल्लल (नाग-नृत्य)-
कलम पूर्ण झाल्यावर पुल्लुवन समुदायाचे गायक पुल्लुवन वीणा (एकतारी सारंगीसदृश वाद्य), पुल्लुवन कुडम् (धाग्याने बांधलेला मातीचा घडा), मिळावू आणि झांजा या वाद्यांच्या साथीने नागदेवतांना आवाहन करणारी गीते गातात. या गाण्यांतून अनंत, मणिमुगदरन, आदिशेष आणि महापद्मन् यांसारख्या पवित्र सर्पांचे गुणगान केले जाते.


पुल्लुवन गायिका (‘पुल्लुवन कुडम्’सह गायन करताना)

पुल्लुवन‌ वीणा

पुल्लुवन कुडम्

यानंतर एक कुमारिका मुलगी हातात नारळाचा कोंब (पूकुळ) घेऊन उभी राहते. काही काळाने तिच्यात नागदेवतेचा संचार होतो असे मानले जाते आणि ती तंद्रीसदृश अवस्थेत नृत्य करू लागते; याच नृत्याला ‘सर्पम् थुल्लल’ म्हणतात. या अवस्थेत ती भक्तांना आशीर्वाद देते आणि त्यांना नाग दोषातून मुक्त करते असे मानले जाते.

सर्पम् थुल्लल

सर्पम् थुल्लल व रांगोळी

शेवटी ‘कलम मायिक्कल’- म्हणजे रेखाटलेले चित्र पुसून टाकण्याची क्रिया- या विधीने समारोप केला जातो.

रांगोळी पुसण्याची कलम मायिक्कल प्रथा

दारा (अभिषेक जल)-
नागराज आणि नागयक्षी यांच्यावर कोवळे नारळ पाणी, दूध आणि शुद्ध पाणी यांच्या मिश्रणाचा अभिषेक केला जातो.

उरुळी कमळत्तल-
निपुत्रिक दांपत्ये हा विधी करतात. प्रथम मंदिराभोवती प्रदक्षिणा आणि पंचवाद्यमेळमच्या (पाच पारंपरिक वाद्यांचा समूह) साथीने नामजप केला जातो. यानंतर दांपत्य लाल रेशमी वस्त्राने झाकलेला एक धातूचे पातेले (उरुळी) नागयक्षीसमोर घेऊन येते आणि नागराजासमोर ते उपडा ठेवले जाते. संतती प्राप्त झाल्यानंतर हेच दांपत्य पुन्हा मंदिरात येऊन ‘उरुळी निवर्त्तु’- म्हणजे ते पातेले सुलटे करण्याचा विधी पार पाडते. (आपल्याकडे नवस फेडला जातो त्याप्रमाणे हा विधी वाटतो.)

आडिय एण्णा (तिळाच्या तेलाचा अभिषेक)-
त्वचारोगाने ग्रस्त भाविक ब्राह्ममुहूर्तावर (पहाटेची शुभ वेळ) नागराजाला तिळाच्या तेलाने स्नान घालतात, जेणेकरून सर्पकोपामुळे झालेला त्वचारोग बरा होईल अशी त्यांची श्रद्धा असते.

राहू दशा शांती-
ज्योतिषशास्त्रानुसार राहू दशेमध्ये (अशुभ काळ) सर्पांच्या उपस्थितीमुळे उद्भवणाऱ्या व्याधी दूर करण्यासाठी हा विधी केला जातो.

आयिल्यम महोत्सव-
वार्षिक स्वरूपाचा हा सर्वांत मोठा उत्सव मल्याळम कॅलेंडरमधील कन्नी महिन्यातील आयिल्यम नक्षत्रावर साजरा होतो. उत्सवाची सुरुवात आयिल्यम दिनाच्या सात दिवस आधीपासून होते. कोंबू आणि कुळल् (सुषिर वाद्ये) तसेच मद्दळम्, चेंडा, एडक्का आणि तकिल यांसारख्या नादस्वर वाद्यांच्या गजरात नादब्रह्म साजरा केला जातो, त्यानंतर सर्पबली आणि एळुन्नळत्तु (मिरवणूक) काढली जाते. ही मिरवणूक मंदिरापासून मेप्पळ्ळिल इल्लमपर्यंत जाऊन परत मंदिरात येते, जेणेकरून वाटेत हजारो भाविकांना आशीर्वाद मिळावा.

आयिल्यम महोत्सवादरम्यानची पूजा

मन्नारशाला आयिल्यम महोत्सव २०२५ मधील एक दृश्य 
───

भाग ५: पुल्लुवन समुदाय: नागाराधनेचे संरक्षक-

पुल्लुवन ही केरळातील एक पारंपरिक समुदाय-जमात असून, नागाराधनेच्या संपूर्ण विधीव्यवस्थेचे ते मुख्य वाहक आहेत. ते कन्नी आणि मकरम् या मल्याळम महिन्यांत घरोघरी जाऊन नाग दोष निवारणासाठी गीत गातात. त्यांचे संगीत पुल्लुवन वीणा (एकतारी वाद्य), पुल्लुवन कुडम् (मातीचा घडा), पुल्लुवन मिळावू आणि झांजा या वाद्यांवर आधारित असते. या समुदायाची पारंपरिक श्रद्धा अशी आहे की त्यांचे गायन थेट नागलोकापर्यंत पोहोचते.



पारंपरिक पुल्लुवन समाजातील गायक

आधुनिक काळात या सेवेतून मिळणारे आर्थिक उत्पन्न अत्यंत तुटपुंजे असूनही, हा समुदाय अविरत निष्ठेने ही परंपरा पुढे नेत आहे जे एकाचवेळी सांस्कृतिक संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचेही आणि तितकेच चिंताकारकही आहे. मुळात, पुल्लुवन समुदायाच्या आर्थिक शाश्वततेवरच सर्पकावू परंपरेचे भवितव्य बऱ्याच अंशी अवलंबून आहे, हे या क्षेत्रातील अभ्यासकांनी वारंवार अधोरेखित केले आहे. आर्थिक पाठबळाअभावी ही प्रथा दीर्घकाळ पुढे नेणे हळूहळू जिकिरीचे होऊन जाईल यात शंका नाही.

───

भाग ६: वैज्ञानिक कसोटी: मानव-सर्प संबंधांवरील अद्ययावत संशोधन-

सर्पकावूवरील सर्वांत महत्त्वाचे अलीकडचे वैज्ञानिक संशोधन म्हणजे फेलिक्स लँड्री युआन आणि सहकाऱ्यांनी (हाँगकाँग विद्यापीठ आणि केरळ केंद्रीय विद्यापीठ) २०२० साली ‘पीपल अँड नेचर’ या ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटीच्या नियतकालिकात प्रकाशित केलेला शोधनिबंध- “Sacred groves and serpent-gods moderate human-snake relations”. हा अभ्यास इतका महत्त्वाचा आहे की त्याचा तपशीलवार आढावा घेणे या विषयाला संपूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक आहे.

संशोधन पद्धती-
संशोधकांनी नैऋत्य भारतातील पश्चिम घाटाच्या भागात केरळातील कासारगोड व कन्नूर जिल्हे आणि कर्नाटकातील कोडगू जिल्हा मिळून एकूण ३० सर्पकावूंना भेट दिली. यांपैकी ३० पैकी १८ सर्पकावूंमध्ये सर्पदेवता पूजिल्या जात होत्या, तर उर्वरित १२ मध्ये इतर देवता होत्या. या सर्पकावूंचा आकार ०.१७ एकरांपासून तब्बल १०४ एकरांपर्यंत होता आणि सरासरी आकार ११.०१ एकर इतका होता.

प्रत्येक सर्पकावूजवळ संशोधकांनी सुमारे १० व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या; म्हणजे यात एकूण किमान ३०० लोक सहभागी होते. यांतील ९६% सश्रद्ध भाविक होते, तर उर्वरित अभ्यागत, व्यवस्थापन सदस्य किंवा स्थानिक रहिवासी होते. सशोधनातल्या सहभागींचे वय ११ ते ८७ वर्षांपर्यंत होते; ज्यात ६६% पुरुष आणि ३४% महिला होत्या.

प्रमुख निष्कर्ष: लोकांच्या सर्पकावूच्या आतील आणि बाहेरील वर्तनातील फरक-
या अभ्यासाचा सर्वांत धक्कादायक आणि महत्त्वाचे निष्कर्ष काहीसे असे आहेत. सर्पकावूच्या आत साप आढळल्यास त्याला लोकांनी इजा करण्याचे प्रमाण अवघे १% होते, तर तोच साप सर्पकावूच्या बाहेर आढळल्यास त्याला इजा करण्याचे प्रमाण तब्बल २३% पर्यंत वाढले होते. सर्पकावूच्या आत लोकांच्या सापांशी झालेल्या भेटींमध्ये (encounters) ९६% प्रतिक्रिया या पूर्णतः अहिंसक (pacifistic) होत्या, तर बाहेरील भेटींमध्ये हेच प्रमाण ६०% इतके खाली आले होते. महत्त्वाचे म्हणजे, हा फरक सर्पकावूत सर्पदेवता प्रत्यक्ष पूजिली जाते किंवा नाही यावर अवलंबून नसल्याचे अभ्यासात जाणवले. म्हणजेच, सर्पकावूचे केवळ अस्तित्वच लोकांचे सापांप्रती अहिंसक वर्तन घडवण्यास पुरेसे ठरत होते.

सर्पदेवता पूजा आणि सापांप्रती आदर-
अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी ८४% जणांनी सर्पदेवतेची पूजा केल्याचे सांगितले. महत्त्वाचे म्हणजे, जे लोक सर्पकावूबाहेर सापांना इजा करत नाहीत, त्यांच्यापैकी ८७% जण सर्पदेवतेची पूजा करतात; तर जे इजा करतात त्यांच्यामध्ये हे प्रमाण (पूजा करणाऱ्यांचे) फक्त २५% होते. हा फरक सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय (statistically significant) आढळला. त्याचप्रमाणे, ६९% सहभागींनी प्रत्यक्ष जिवंत सापांनाही (सर्पदेवतांप्रमाणेच) पवित्र मानले. यातही, जे साप हिंसा करत नाहीत त्यांच्यात ही श्रद्धा तुलनेने अधिक (७३%) आढळली.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, सहभागींनी सर्पदेवता-पूजा आणि प्रत्यक्ष सापांचे पावित्र्य या दोन वेगवेगळ्या संकल्पना असल्याचे स्पष्टपणे मान्य केले. सर्पदेवता या भौतिक जगाच्या पलीकडील अशारीर सत्ता मानल्या जातात, तर प्रत्यक्ष साप हे याच जगात वावरणारे सजीव प्राणी. मात्र या दोन्ही श्रद्धा परस्परांना बळ देतात, कारण ज्या सर्पकावूंमध्ये सर्पदेवता होत्या, तिथे सर्पदेवता-पूजेचे तसेच सापांच्या पावित्र्याचे प्रमाणही अधिक आढळले.

लिंगभेद आणि सामाजिक घटक-
संशोधकांनी एक सांख्यिकीय प्रतिमान (generalized linear model) तयार करून सर्पकावूबाहेर सापांना इजा करण्यामागील सामाजिक निर्धारके तपासली. यात लिंगभेद हा सर्वांत ठळक घटक ठरला. पुरुषांमध्ये सापांना इजा करण्याचे प्रमाण ३१% होते, तर महिलांमध्ये ते अवघे ७% होते. हा फरक सांख्यिकीयदृष्ट्या अत्यंत लक्षणीय (p<0.001) आढळला. गंमत म्हणजे, प्रत्यक्ष सापांना पवित्र मानण्याच्या बाबतीत पुरुष आणि महिलांमध्ये फारसा फरक नव्हता; म्हणजेच श्रद्धा समान असूनही कृतीत मात्र स्पष्ट लिंगभेद दिसून आला. तमिळनाडूतील एका अभ्यासकाने केलेल्या निरीक्षणाशीही हा निष्कर्ष सुसंगत आहे. पुरुषांमध्ये सापांना देव मानण्याची क्षमता कमी असते आणि त्यामुळे ते त्यांना इजा करण्याची शक्यता अधिक असते असे या अभ्यासकाने नमूद केले होते.

नागराजांविषयीचा विशेष आदर-
अभ्यासात सापांना पवित्र मानणाऱ्यांपैकी जवळजवळ निम्म्या (४२%) सहभागींनी नागाचे (कोब्रा) वर्णन केले, जो भारतातील सर्वाधिक ओळखल्या जाणाऱ्या विषारी सापांपैकी हा एक आहे. यामागील कारण कदाचित हिंदू कलेतील सर्पदेवतांचे चित्रण असू शकते जसे की, भगवान शंकराच्या गळ्याभोवती वेटोळे घातलेला नाग, किंवा विष्णूची शय्या बनलेला बहुमस्तकी (फणा असलेला) अनंत नाग. मात्र या कलाकृतींमध्ये प्रत्यक्ष सापांपेक्षा वेगळे, दैवी वैशिष्ट्यही (जसे की अनेक फणा) दाखवले जातात.

संशोधकांचा निष्कर्ष व मर्यादा-
संशोधकांनी स्पष्टपणे नमूद केले की हा थेट कार्यकारणभाव (cause-and-effect) दाखवणारा अभ्यास नाही; कारण अनेक सामाजिक स्तर या वर्तनावर परिणाम करतात. तसेच, सहभागींनी दिलेली उत्तरे प्रत्यक्ष कृतीशी तंतोतंत जुळतीलच असे गृहीत धरणेही योग्य नाही. तरीही, या अभ्यासाने पहिल्यांदाच परिमाणात्मक (quantitative) पद्धतीने हे सिद्ध केले की सर्पकावूंमधील सामाजिक निषिद्धता (taboo) सापांना इजा न करण्यासाठी प्रभावीपणे प्रोत्साहन देते आणि हे संवर्धनशास्त्रासाठी (conservation biology) एक मौल्यवान साधन ठरू शकते.

───

भाग ७: जैवविविधता विज्ञान: सर्पकावूंचे पारिसंस्थीय मूल्य-
सर्पकावू ही केवळ धार्मिक परंपरा नसून, प्रत्यक्षात एक अत्यंत घनदाट असे जैवविविधता-केंद्र (biodiversity hotspot) आहे. शतकानुशतके मानवी हस्तक्षेपापासून दूर राहिल्यामुळे या इवल्याशा वनतुकड्यांनी जवळपास सर्वोत्तम हवामानीय वनांचे (climax) स्वरूप धारण केले आहे.

धक्कादायक आकडेवारी-
एका शास्त्रीय अभ्यासानुसार, केरळातील ९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या सायलेंट व्हॅली जंगलात ७२२ प्रजातींच्या सपुष्प वनस्पती नोंदवल्या गेल्या, तर याच्या तुलनेत अवघ्या १.४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या केरळातील एकत्रित सर्पकावूंमध्येही तितक्याच म्हणजे ७२२ प्रजाती आढळल्या. म्हणजेच, क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्पकावूंची जैविक घनता सायलेंट व्हॅलीपेक्षा तब्बल ६४ पट अधिक आहे.

अलाप्पुळा जिल्ह्यातील एका व्यापक सर्वेक्षणानुसार तेथे तब्बल २,२४२ पवित्र वने (sacred groves) नोंदवली गेली, जी एकत्रितपणे सुमारे ४५२ एकर क्षेत्र व्यापतात. कण्णूर जिल्ह्यातील श्री ओरपळाची कावू या एका सर्पकावूत ७५ वंशांतील ८६ प्रकारच्या सपुष्प वनस्पती आढळल्या, तर कासारगोड जिल्ह्यातील एडायिलक्काड सर्पकावूच्या तुलनात्मक अभ्यासात ९१ द्विदलवर्गीय आणि ५ पर्णांगवर्गीय अशा एकूण ९६ संवहनी वनस्पती नोंदवल्या गेल्या. त्रिसूर जिल्ह्यातील एका सर्पकावूत झालेल्या फुलपाखरांच्या सर्वेक्षणात ५ कुळांतील ४० प्रजातींची फुलपाखरे आढळली, जी या परिसंस्थेतील कीटक-वैविध्याचीही साक्ष देतात.

औषधी व दुर्मीळ वनस्पती-
अलाप्पुळा जिल्ह्यातील सर्पकावूंमध्ये मोरिंडा उम्बेलाटा, पोथोस स्कँडेन्स, सलासिया फ्रुटिकोसा आणि सलासिया चायनेन्सिस यांसारख्या औषधीदृष्ट्या महत्त्वाच्या वेली आढळून आल्या आहेत. या सर्पकावूंमध्ये अनेक दुर्मीळ, संकटग्रस्त आणि स्थानिक (endemic) वनस्पती-प्राणी प्रजातीही आश्रय घेतात, ज्या आसपासच्या सर्वसाधारण, मानवी हस्तक्षेप झालेल्या जंगलांत सापडणे कठीण झाले आहे.

पर्यावरणीय प्रक्रिया-
केवळ काही सर्प, वनस्पती-वेली अशा ठराविक प्रजातींची संख्या टिकवून ठेवणे आणि त्यांचे संख्यात्मक संवर्धन करणे इतकेच सर्पकावूंचे मूल्य नाही. ही वने मातीतील ओलावा टिकवून ठेवतात, जमिनीची धूप रोखतात आणि भूजल पातळी राखण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतात असे स्थानिक पुजाऱ्यांचे निरीक्षण आहे; जे शास्त्रीय अभ्यासांशीही सुसंगत आहे. धार्मिक निषिद्धतेने अनावधानाने, अजाणतेपणी किंवा अप्रत्यक्षरीत्या या वनांना पर्यावरणीय संतुलन राखणारे ‘नैसर्गिक साठे’ बनविले आहे.

सर्पप्रजातींचे संवर्धन मूल्य-
हे संवर्धन विशेषतः त्या सर्पप्रजातींसाठी महत्त्वाचे आहे, ज्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी थेट पकडल्या जाण्याच्या किंवा तस्करीच्या धोक्यात आहेत. उदाहरणार्थ, किंग कोब्रा IUCN रेड लिस्टनुसार ‘असुरक्षित/ धोकादायक’ (vulnerable) श्रेणीत असून त्यांची संख्या घटत आहे. हा साप, तसेच भारतीय नाग, भारतीय उंदीरखाऊ साप (rat snake), रसेल्स व्हायपर आणि पाणदिवड साप (checkered keelback) हे सर्व CITES परिशिष्ट-II मध्ये समाविष्ट आहेत, तर भारतीय अजगर (Indian rock python) CITES परिशिष्ट-I मध्ये आहे. म्हणजेच, या प्रजातींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कडक निर्बंध आहेत. अशा संकटग्रस्त प्रजातींसाठी सर्पकावूंसारखी सामाजिक निषिद्धता-आधारित संरक्षण व्यवस्था अत्यंत मोलाची ठरते.

───

भाग ८: आव्हाने आणि वास्तव- आदर्शीकरणापलीकडचे सत्य-

सर्पकावूंचे गुणगान करताना एक वस्तुनिष्ठ इशाराही देणे आवश्यक आहे. संशोधकांनी हे स्पष्टपणे नमूद केले आहे की, पूर्वीप्रमाणे आता सर्पकावू अस्पर्शित, आदिम वने राहिली नाहीत. अनेक सर्पकावू झपाट्याने ऱ्हास पावत असून, अनेक ठिकाणी केवळ मध्यवर्ती देवस्थान तेवढेच शिल्लक उरले असून बाकीचे वनक्षेत्र नाहीसे झाले आहे.

एका पुजाऱ्याने संशोधकांना सांगितलेला एक धक्कादायक तपशील सांगितला, तो असा. काही जमीनमालक तांत्रिक आणि पुजाऱ्यांना बोलावून एक विधी करतात, ज्याद्वारे स्थानिक सर्पदेवतेला मूळ ठिकाणावरून ‘हलवून’ दुसरीकडे स्थलांतरित केले जाते आणि यानंतर मूळ सर्पकावूच्या जागी शेती केली जाते किंवा इतर विकासकामे उभारली जातात. म्हणजेच, धार्मिक चौकटीचाच वापर करून विकासाच्या नावाखाली या पवित्र वनांचा ऱ्हास केला जातो.

रस्ते, रेल्वेमार्ग आणि बंदरांच्या जलद उभारणीमुळे या पवित्र वनांवरील दबाव सातत्याने वाढतो आहे. शेतीत मोठ्या प्रमाणात  वापरली जाणारी कीटकनाशके आणि रसायनेही या नाजूक परिसंस्थांना हानी पोहोचवत आहेत. काही अभ्यासकांनी असाही युक्तिवाद केला आहे की, आधुनिक पर्यावरणवाद्यांच्या संकल्पना आणि सर्पकावू राखण्यामागील स्थानिक लोकांची प्रत्यक्ष कारणे यांच्यात फारसा संबंध नाही- म्हणजेच निसर्गसंवर्धन हे या परंपरेचे केवळ एक उपोत्पादन (byproduct) आहे, तिचा मूळ हेतू नाही. “धार्मिक प्रथांनी पवित्र वने अभंग राखली आहेत” या समजुतीमुळे लोक त्यांच्या प्रत्यक्ष ऱ्हासाकडे दुर्लक्ष करतात, असा इशाराही एका अभ्यासकाने दिला आहे.

त्याचबरोबर, या परंपरांचे आधुनिक संवर्धनशास्त्रासाठी अतिरेकी उदात्तीकरण करणेही टाळायला हवे, आणि त्याचबरोबर स्थानिक समुदायांच्या पर्यावरणीय जाणिवेला अवाजवी कमी लेखणेही चुकीचे ठरेल. कासारगोड जिल्ह्यातील एका सर्पकावूजवळील रहिवाशांनी स्थानिक प्रशासनाला वनक्षेत्राभोवती असा कुंपणाचा आराखडा बांधण्यास भाग पाडले, ज्यामुळे प्राण्यांना आत-बाहेर मुक्तपणे ये-जा करता यावी. हे स्थानिक समुदायाच्या सजग पर्यावरणीय भानाचे उत्तम उदाहरण आहे.

───

भाग ९ : सामाजिक व संवर्धनविषयक प्रस्तुतता-

आजच्या काळात, जेव्हा जैवविविधतेचा ऱ्हास आणि मानव-वन्यजीव संघर्ष या जागतिक समस्या बनल्या आहेत, तेव्हा सर्पकावूंसारख्या परंपरांचा अभ्यास संवर्धनशास्त्रासाठी अत्यंत मोलाचा ठरतो. भारतात दरवर्षी अंदाजे पन्नास हजार लोकांचा मृत्यू सर्पदंशामुळे होतो. विषारी सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्युंपैकी जगातील सर्वाधिक मृत्यूदर असणाऱ्या देशांपैकी भारत हा एक अग्रक्रमावरील देश आहे. अशा परिस्थितीतही, सर्पकावूंसारख्या परंपरांमधून सापांप्रती विकसित झालेली सहनशीलता आणि आदराची भावना ही मानव-सर्प सहजीवनाचे एक व्यावहार्य प्रारूप देऊ शकते.

जगभरातील इतर उदाहरणेही या तत्त्वाला दुजोरा देतात. नायजेरियातील स्क्लेटर माकडाचे (Sclater's monkey) सामाजिक निषिद्धतेद्वारे झालेले संरक्षण, हिमाचल प्रदेशातील रीसस माकडांचे धार्मिक संरक्षण आणि चीनमधील तिबेटी बौद्ध मठांनी हिम बिबट्याच्या (snow leopard) संवर्धनात बजावलेली भूमिका; ही सर्व उदाहरणे दर्शवतात की परंपरागत निषिद्धता ही आधुनिक संवर्धन-रणनीतीत प्रभावीपणे समाविष्ट करता येऊ शकते.

मात्र हे करताना एक समतोल राखणे आवश्यक आहे. पाश्चात्त्य संवर्धन-प्रारूपांच्या ‘निर्मनुष्य निसर्ग विरुद्ध शहरी समाज’ या द्वैतवादी चौकटीतून स्थानिक परंपरांकडे वसाहतवादी, वरून-खाली (top-down) दृष्टिकोनातून पाहणे टाळायला हवे. त्याऐवजी स्थानिक समुदायांच्या श्रद्धा, दृष्टिकोन आणि सुरक्षिततेचा आदर राखत जैवविविधता संवर्धनाचे उद्दिष्ट साधणे, हाच अधिक शाश्वत मार्ग आहे.

───

भाग १०: इतर परंपरांशी नाते- एक तुलनात्मक दृष्टिक्षेप-

नागपूजा ही केवळ केरळपुरती मर्यादित नाही. महाराष्ट्रासह उत्तर व मध्य भारतात श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कर्नाटकच्या तुळुनाडू भागातही ‘नागबन्ना’ या नावाने सर्पकावूचीच एक प्रादेशिक आवृत्ती आढळते. मात्र केरळच्या सर्पकावू परंपरेचे वैशिष्ट्य असे की इथे नागपूजा एका दिवसापुरती मर्यादित न राहता, वर्षभर एका संपूर्ण परिसंस्थेच्या राखणीत रूपांतरित झाली आहे.

जागतिक पातळीवर पाहता, अशा प्रकारच्या श्रद्धा-आधारित निसर्गसंवर्धनाची उदाहरणे इथिओपियातील चर्च-वने, घानातील पवित्र वने, टांझानियातील पारंपरिक वन्यजीव-सहजीवन, आणि आग्नेय चीन व हिमालयीन प्रदेशातील तिबेटी पवित्र स्थळे यांमध्येही आढळतात. या सर्व परंपरांमधील समान धागा असा की, यांत धार्मिक पावित्र्याच्या संकल्पनेने अनवधानाने जैवविविधता संवर्धनाचे काम केले आहे, जे आधुनिक संवर्धनशास्त्रासाठी एक मौल्यवान, सांस्कृतिकदृष्ट्या सखोल रुजलेले साधन (biocultural strategy) ठरू शकते.

समारोप : श्रद्धा आणि विज्ञान यांचा संगम-
सर्पकावू ही परंपरा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. योग्य प्रकारे रुजलेली श्रद्धा ही निसर्गाच्या रक्षणाचे अत्यंत प्रभावी साधन बनू शकते, आणि हे केवळ काव्यात्मक विधान नसून वैज्ञानिक सर्वेक्षणांद्वारे सिद्ध झालेले सत्य आहे. मानवी हव्यासापासून दूर राहिलेल्या या इवल्याशा हिरव्या बेटांनी शेकडो वर्षे दुर्मीळ वनस्पती, कीटक, पक्षी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांना आश्रय दिला आहे, आणि त्याचबरोबर मानव व सर्प यांच्यातील एका असामान्य, अहिंसक सहजीवनाचे प्रारूपही घडवले आहे.

मात्र या परंपरेकडे केवळ अंधश्रद्धा किंवा केवळ आदर्शवत् इतिहास म्हणून पाहणेही चुकीचे ठरेल. सर्पकावूंचा ऱ्हासही होतो आहे आणि त्यांचे शोषणही होते आहे. त्यामुळे, तिच्या रक्षणासाठी स्थानिक समुदायांचे भानही तितकेच महत्त्वाचे आहे, जितके शास्त्रज्ञांचे संशोधन. आज जेव्हा जैवविविधतेचा ऱ्हास आणि मानव-वन्यजीव संघर्ष या जागतिक संकटांना सामोरे जावे लागत आहे, तेव्हा सर्पकावूसारख्या परंपरांमधील पर्यावरणीय शहाणपण समजून घेणे, त्याचा आदर करणे आणि आधुनिक संवर्धन-धोरणांशी त्याची योग्य सांगड घालणे, ही खरोखरच काळाची गरज आहे.


संदर्भ सूची-
1. Landry Yuanyh, F., Ballullaya, U. P., Roshnath, R., Bonebrake, T. C., & Sinu, P. A. (2020). Sacred groves and serpent-gods moderate human–snake relations. People and Nature, 2(1), 111–122. https://doi.org/10.1002/pan3.10059

2. Das, D., & Balasubramanian, A. (2017). The Practice of Traditional Rituals in Naga Aradhana (Snake worship): A Case study on Aadimoolam Vetticode Sree Nagarajaswami Temple in Kerala, India. SHS Web of Conferences, 33, 00025. https://doi.org/10.1051/shsconf/20173300025
विकिपीडिया (इंग्रजी) - "Sarpa Kavu."

3. Kerala Tourism अधिकृत संकेतस्थळ - "Sarpakavu, Groves of Snakes, Kumarakom, Kerala."

4. Centre for Contemporary Folklore - "Sarppakaavu: Kerala's Snake Groves."
Adventure River Cruises - "The Sacred Groves Of Kerala – Sarpa Kavu."

5. Indica Today - "Ecological Significance of Nāga Worship and Sacred Groves in Kerala."
Rupkatha Journal - "The Sacred Groves of the Serpent Gods: 'Sarpakavus' of Kerala as Indigenous Ecology" (संशोधनपत्रिका).

6. Filming Indo - "Inside Kerala's Sacred Snake Festival: Serpent Worship, Rituals & Eco-Spirituality."

7. Sciepub (Applied Ecology and Environmental Sciences) - "Ethnobotanical Survey of the Sacred Grove, Sree Oorpazhachi Kavu, Kannur District, Kerala, India."

8. ResearchGate / IJCRT - "A Comparative Study of RET Plant Diversity in Two Sacred Groves" (Edayilakkad Sarpakavu, Kasaragod).

9. ResearchGate - "A Case Study of Fauna in Sacred Grove, Manthuruthi, Kerala, India."
Grokipedia - "Sarpa Kavu" (केरळ सरकारच्या संवर्धन प्रकल्पांविषयी माहिती).

10. Girish, L. Serpent Grove (Sarpa Kavu): Living Sacred Ecosystems and the Pulluvan Community of Kerala – A Curated Overview. Self-published, Pothi.com.

11. Murugan, K., Ramachandran, V. S., Swarupanandan, K., & Remesh, M. (2008). Socio-cultural perspectives to the sacred groves and serpentine worship in Palakkad district, Kerala. Indian Journal of Traditional Knowledge, 7, 455–462.


Comments

  1. खुप खुप धन्यवाद आणि अभिनंदन सर.
    आपल्यामुळे सर्पकावू हा शब्द परिचित झाला.
    As usual u rocks.
    इतका सखोल आणि विस्तृत लेख आपण लिहिला मला नाही वाटतं की स्थानिक कुणी लिहिला असेल म्हणून.
    तसेच आपल्या दैनिक कामाव्यतिरिक्त आपण नेहमीच आम्हाला सर्वाना नवीन काहीतरी देण्यासाठी प्रयत्न करता.
    परंपरेच्या नावाखाली का होईना रक्षण होतंय ते महत्वाचे.
    आपणास खुप खुप शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद! आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी मौल्यवान आहे.

      Delete
  2. साप विषयी प्राचीन ते आधुनिक अशी सविस्तर सखोल माहिती आहे. सर्पकावू या प्राचीन परंपरा आणि श्रद्धा ची निसर्गाशी कसे नाते आहे यांचा छान उलगडा या लेखातून केलेला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सुधीर. आपली प्रतिक्रिया आवडली. (डॉ. अमित)

      Delete
  3. *सर्पकावू* प्रथमच हा शब्द व त्या मागे दडलेली श्रद्धा आणि आजही या digital युगात जपत आलेली केरळ ची परंपरा याचा संपूर्ण उलघडा या लेखातून झाला..

    केरळ पाहिलंय पण हे राहून गेलं पाहायचं.
    खरंच खूप अभ्यासपूर्ण लेख सर्वांनी वाचावा असा आहे👍🙏

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद मॅडम! (डॉ. अमित)

      Delete
  4. साहेब.. आजपर्यंत कधीही न वाचनात आलेला सर्पकावू शब्द व त्याचा अर्थ आपल्यामुळे आम्हाला समजला... अतिशय सुंदर माहिती व लिखाण... केरळला गेलो तर नक्कीच पाहणार... आपले लेख हे नेहमीच नवनवीन माहिती देत असतात... धन्यवाद 🙏👌👌♥️

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर आणि उत्साहवर्धक प्रतिक्रिया! खूप खूप धन्यवाद!

      Delete
  5. नमस्कार डॉक्टर साहेब,
    “सर्पकावू” हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला आणि त्याचा अर्थही आपल्या लेखातून समजला. सापांविषयीची प्राचीन परंपरा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले त्यांचे नाते याबद्दल आपण अतिशय सुंदर आणि सखोल माहिती दिली आहे.
    मी अजून केरळला गेलेलो नाही; पण आपल्या या लेखामुळे त्या ठिकाणाला भेट देण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे. आपण आमचे बालपणीचे मित्र असल्यामुळे आपल्या लेखनातील निसर्गाविषयीची आवड, वाचनाची आवड, वातावरणाचे निरीक्षण आणि फोटो काढण्याची आवड या सर्व गोष्टी प्रकर्षाने जाणवतात.
    आपला अभ्यास खरोखरच खूप खोलवर आहे आणि तो इतक्या सुंदर पद्धतीने वाचकांसमोर मांडण्याची हातोटी अप्रतिम आहे. सापांविषयी एवढी सखोल आणि माहितीपूर्ण मांडणी केल्याबद्दल मनापासून अभिनंदन!
    आपल्या पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 💐🙏

    ReplyDelete
    Replies
    1. आपली प्रतिक्रिया खूपच उत्साहवर्धक आहे. इतक्या विस्तृत प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार!

      Delete
  6. कोकणातील देवराया देखील तशाच आहेत.पण त्याला केरळमध्ये सर्पकावू म्हणतात हे माहीत नव्हते.तसेच देवराई ही संकल्पना पूर्ण पश्चिम घाट परीसरात आहे हेही माहिती नव्हते. सर्प कुलाशी निगडीत असणाऱ्या मानवी श्रद्धा व भारतीय संस्कृती किती पर्यावरण पुरक आहे हेच या लेखातून दिसून येते.
    निश्चितच यामुळे पर्यावरण संवर्धनास मदत होईल अशी अपेक्षा करूया.

    ReplyDelete
    Replies
    1. सर्पकावू म्हणजे तंतोतंत देवराया नव्हेत. सर्पकावू या देवरायांच्या एक छोटा भाग आहेत असे आपण म्हणू शकतो. आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!

      Delete
  7. नागपंचमी निमित्त एका बाजूला श्रद्धेच्या नावाखाली नागांचे होणारे अतोनात हाल पाहताना संवेदनशील मानवी मन हेलावून जाते. अशा परिस्थितीत नागपंचमी साजरी करावी का ? तिच्या पाठीमागे प्राचीन भारतीय संस्कृतीचा परंपरेचा काय हेतू असावा ? या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा मनाला होती .आपल्या लेखातून या सर्व गोष्टींचा खुलासा झाला पण केरळ सारख्या राज्यात सुद्धा नागपंचमी आणि सर्प दोष या अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातूनच साजरा केला जातात ही गोष्ट तितकीच चिंता करण्याची आहे ; पण किमान सर्पकावूच्या रूपाने ती नागभुमी सुरक्षित राहते या गोष्टीच समाधान आहे. सुंदर अशा माहितीबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद .... गगनबावड्यासारख्या समृद्ध अशा निसर्गात आपली सरकारी वैद्यकीय जबाबदारी तितक्याच समर्थपणे पार पडत असताना आपलं वन्यजीवाबद्दलचा प्रेम आपण आपल्या निसर्ग पर्यावरणाच्या अभ्यासातून जपत आहात ही गोष्ट स्वतः या भागात अनुभवली आहे .शाळा मधून ही माहिती मुलांच्या पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे कारण पर्यावरण आणि मानवतेच्या रक्षणासाठी ही शाळांमधील मुलं हीच एक मोठा अशीच किरण आहे पुन्हा एकदा धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. आपली प्रतिक्रिया आणि त्यातील मुद्दे आवडले. खूप खूप धन्यवाद!

      काही मते-
      अंधश्रद्धा कोणासाठी हानिकारक नसतील तर त्यांना विरोध असण्याचे काहीच कारण नाही.
      मुले संस्कारक्षम असल्यामुळे त्यांच्यामध्ये या गोष्टी भिनवता येणे सोपे आणि प्रभावी असते.

      Delete
  8. सन उत्सव यांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते व त्यास असलेली वैज्ञानिक किनार यांचा संबंध अतिशय सुंदर रित्या शब्दबद्ध केला आहे खूपछान वाचनीय लेख आहे- सचिन पाटील शिरढोण

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सचिन भाऊ! आपली प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहे.

      Delete
  9. केरळच्या संस्कृतीचा खूप सुंदर प्रवास संर्पकावूंच्या अभ्यासपूर्ण लेखातून घडवलात सर.. केरळसारख्या घनदाट परिक्षेत्रात राहण्याऱ्या माणसांचे तिथल्या सर्पादी प्राण्यांशी सहजीवन, परंपरेचे जतन या लेखातून उद्धृत झाले आहे. अफाट लेखनशैलीमुळे प्रत्यक्ष अनुभूतीचा भास झाला. आश्लेषा नक्षत्रांत होणाऱ्या पारंपरिक सर्पविधी... खूप सुंदर माहिती !अभिनंदन आणि शुभेच्छा सर !!

    ReplyDelete
  10. खूप खूप आभार, मॅडम... उत्साहवर्धक प्रतिक्रिया...

    ReplyDelete
  11. खूपच सुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts