अमिताभ बच्चन: ‘बोल’पटांमधील ‘मौना’चा नायक (Amitabh Bachchan: Mastering Silence in the Talkies)
अमिताभ बच्चन: ‘बोल’पटांमधील ‘मौना’चा नायक
(© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील)
(© लेखाचे सर्व हक्क लेखकाधीन)
ज्वालामुखी फुटण्यापूर्वीची शांतता-
गेल्या वर्षी बच्चन साहेबांच्या वाढदिवसाला मी ‘अँग्री यंग मॅन’च्या ‘अँग्री’पणावर (रागीटपणा) आणि त्यामुळे त्याच्या समाजमनावर झालेल्या नकारात्मक परिणामांबद्दल लेख लिहिला होता. लेख प्रसिद्ध झाल्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. कुणी सहमत झाले, कुणी थोडे नाराजही झाले; पण मला स्वतःलाच एक प्रश्न त्यानंतर कित्येक दिवस छळत राहिला. अमिताभचा ‘अँगर (राग)’ (‘अँग्री यंग मॅन’) इतका गाजला, इतका ऐकला गेला, त्यावर इतके लिहिले-बोलले गेले, की त्या रागाच्या आधीच्या अर्थपूर्ण ‘मौना’चा मात्र सर्वांनाच विसर पडला.
(त्या लेखाची लिंक-https://dramittukarampatil.blogspot.com/2025/10/amitabh-bachchans-angry-young-man-and.html)
ज्वालामुखी फुटण्यापूर्वी डोंगर कसा असतो... शांत... गंभीर... स्थितप्रज्ञ..! जणू ‘आतमध्ये’ काहीच घडत नाहीये असा. आणि तरीही, त्या ‘शांतते’च्या पोटात खाली खोलवर काहीतरी उकळत असते, वायू आणि मॅग्माचा प्रचंड दाब निर्माण होत असतो... काहीतरी मोठी ‘सिस्मिक अॅक्टिव्हिटी’ घडत असते, जी डोळ्यांना दिसत नाही. तेच हे ज्वालामुखीपूर्वीचे प्रचंड दाब पोटात दाबून ठेऊन घेतलेले ‘घनगर्भ मौन’!
अमिताभच्या पडद्यावरच्या प्रत्येक स्फोटापूर्वी असेच काहीतरी असायचे. तो आधी गप्प बसायचा, कधीकधी फक्त शांत बसायचा, गूढ हसायचा; त्याचे डोळे बोलायचे, जबड्याची विचित्र हालचाल व्हायची, हाताची मूठ हळूहळू आवळली जायची. मनाच्या आत खोल गाभाऱ्यात ‘सिस्मिक अॅक्टिव्हिटी’ने त्यावेळी प्रचंड दाब निर्माण केलेला असायचा. आणि मग, एखाद्या क्षणी, एकच शब्द- एकच वाक्य यायचे... बस्स..! त्या एका वाक्याने थिएटर दणाणून जायचे. टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट व्हायचा. प्रेक्षकांच्या डोळ्यांत अंगार साठायचा आणि समोर घडणाऱ्या प्रसंग किंवा घटनांशी काहीही थेट संबंध नसतानाही त्यांच्या मुठी आवळल्या जायच्या.
पण; जरा खोलवर विचार करा. खरी ताकद अमिताभने बोललेल्या त्या वाक्यात नसायची; ती त्याआधीच्या ‘मौना’त असायची... ‘पॉज’मध्ये असायची... आतल्या आत ज्वालामुखी उसळण्याच्या आधीची ती ‘स्टेज’ असायची... आमच्या डॉक्टरांच्या भाषेत हृदयाच्या संदर्भात सांगायचे तर, ‘ventricular repolarization’ ची ही अवस्था... एकदा का हे ventricles रक्ताने पूर्ण भरले की मग cardiac output जोरदारच निर्माण होणार यात शंका नसते..! असो...
सर्वशक्तिमान मौन-
आज, अमिताभच्या ८४ व्या वाढदिवसाच्या उंबरठ्यावर, मला त्याच ‘मौना’बद्दल लिहावेसे वाटते आहे. विरोधाभास असा की ज्या आवाजाला आपण ‘खर्ज्यातला आवाज’ म्हणून ओळखतो, ज्याच्या आवाजाने कित्येक पिढ्या मंत्रमुग्ध झाल्या आहेत; त्या माणसाची सर्वांत मोठी कला ही त्याच्या न बोलण्यात आहे, ‘मौना’त आहे असे माझे मत आहे. शब्दांपेक्षा शब्दां‘मधल्या जागा’ त्याला जास्त चांगल्या कळतात. संगीतात जसे दोन स्वरांमधले अंतर स्वरांइतकेच महत्त्वाचे असते, तसेच अमिताभच्या अभिनयात दोन वाक्यांमधले ‘मोकळे अबोल’ अंतर हे त्या वाक्यांइतकेच बोलके असते.
यात एक गंमत अशी झाली आहे की, माझ्या ब्लॉगचे ब्रीदवाक्यच शब्दांचा जयजयकार करणारे आहे- ‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने…’ (तुकोबारायांच्या अभंगातली ओळ). आणि, आज त्याच ब्लॉगवर एक ‘शब्दांचा पुजारी’ असलेला मी चक्क ‘मौना’वर लिहिता झालो आहे!
चला तर मग; या वाढदिवसाला आपण बच्चनचे संवाद नव्हे, त्याचे काही प्रसिद्ध (आणि मला आठवणारे) विराम ऐकूया.
मी या लेखात ‘मौना’बद्दल लिहिले आहे. ‘मौन’ म्हणजे बोलताना थांबणे; अर्थपूर्ण थांबणे किंवा अर्थपूर्ण ‘पॉज’ घेणे.
‘मौन’ म्हणजे बोलण्याचा अभाव नव्हे-
पॉज/ मौन म्हणजे आवाजाचा अभाव असे आपण सहज मानतो. पण; कलेत ते अभावाचे नव्हे तर ‘उपस्थिती’चे द्योतक आहे. ‘मौनं सर्वार्थसाधनम्’ असे सुभाषितकारांनी म्हटले; आणि कवितेत शोधले तर तिची खरी अर्थपूर्ण जागा दोन ओळींच्या ‘मध्ये’ (between the lines) असते. संगीतात दोन स्वरांमधले अंतर स्वरांइतकेच महत्त्वाचे असते किंवा गाण्यांतील दोन कडव्यांत असणाऱ्या बोलहीन पार्श्वसंगीतालाही तितकेच महत्त्वाचे असते. (गाण्याच्या बोलक्या भागाला संगीत देणाऱ्याला संगीतकार किंवा musician म्हणतात; तर गाण्याची दोन कडवी जोडणाऱ्या मधल्या फक्त बोलहीन भागाला संगीत देणाऱ्याला arranger म्हणतात, हे अनेकांना माहितीही नसते!).
जपानी सौंदर्यशास्त्रात ‘मा’ (間) नावाची संकल्पना आहे- ती म्हणजे, दोन गोष्टींमधली रिकामी जागा, जिच्याशिवाय अन्य गोष्टींना अर्थपूर्ण आकारच मिळत नाही.
१९५२ साली जॉन केजने ‘४′३३″’ नावाची रचना सादर केली. पियानोवादक पियानोसमोर बसला आणि चार मिनिटे तेहतीस सेकंद एकही सूर न वाजवता बसून राहिला. सुरुवातीला प्रेक्षकांना हा चेष्टेचा प्रकार वाटला; पण हळूहळू त्यांना सभागृहातले ‘खरे’ आवाज ऐकू येऊ लागले.
नाटककार हॅरोल्ड पिंटरने आपल्या नाटकांतल्या विरामांना इतके वजन दिले की ‘पिंटर पॉज’ हा शब्दच रूढ झाला. म्हणजे पॉज/ मौन ही रिकामी जागा नसून भरलेली जागा आहे, आणि ज्याला ‘ते’ वाचता-समजून घेत येते तोच खरा कलाकार. अमिताभ हा त्यातलाच एक!
![]() |
| पिंटर पॉजचे प्रकार |
आधी आवाज, मौन नंतर-
अमिताभचा पडद्यावरचा प्रवास सुरू झाला तो त्याच्या ‘दिसण्या’ने नव्हे, तर त्याच्या आवाजाने! १९६९ साली मृणाल सेन यांच्या ‘भुवन शोम’मध्ये तो निवेदक म्हणून फक्त ऐकू आला. त्याच वर्षी ‘सात हिंदुस्तानी’मधून त्याने अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्याच सुमारास आकाशवाणीच्या निवेदकाच्या ऑडिशनमध्ये त्याला नाकारले गेले; कारण त्याचा खर्जातला आवाज त्या कामाला अयोग्य मानला गेला असे सांगितले जाते. मग ‘जंजीर’पर्यंत त्याचे सलग बरेच चित्रपट अपयशी ठरले. म्हणजे ज्या आवाजाने देशाला नंतर वेड लावले, त्याला सुरुवातीला कोणी फारसे ऐकलेच नाही. कदाचित त्या अबोल वर्षांनीच त्याला पुढच्या मौनाची तालीम दिली असेल.
![]() |
| तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा: भुवन शोम |
त्या तालमीचा पहिला मोठा निकाल दिसतो तो १९७१ च्या क्लसिक ‘आनंद’मध्ये! ऋषिकेश मुखर्जींच्या या चित्रपटात राजेश खन्ना हा ‘आनंद’ सहगलची भूमिका करत होता- कर्करोगाने मृत्यूच्या दारात उभा; आणि, तरीही बोलणारा, हसणारा, रसरसून जगणारा. आणि, त्याच्या शेजारी अमिताभ होता- डॉ. भास्कर बॅनर्जीच्या भूमिकेत... जगरहाटीमुळे वैतागलेला, चिडखोर, कमी बोलणारा. चित्रपटात बहुतेक वेळा आनंद ‘बोलत’ असतो आणि भास्कर ‘ऐकत’ असतो; पण चित्रपटाचा अर्थ उमटतो तो, भास्करच्या चेहऱ्यावर. अभिनय म्हणजे फक्त बोलणे नव्हे, तर ऐकणेसुद्धा, हा धडा ‘आनंद’ने दिला.
चित्रपटात शेवटी आनंद मरतो. भास्कर काही मिनिटांनंतर परतून येतो, तेव्हा त्याचा मित्र निःस्तब्ध पडलेला असतो. तो आनंदला हाक मारतो, त्याने बोलावे म्हणून गयावया करतो; आणि, अचानक टेपरेकॉर्डरवरून आनंदचा आधी रेकॉर्ड केलेला आवाज ऐकू येतो. आता भास्करसाठी फक्त ‘ऐकणे’च उरले आहे. इथे काहीही ‘न बोलता’ फक्त ऐकण्यावरून अमिताभने जो अभिनय केला आहे, त्याला तोड नाही. मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे या दृश्याचे वजन मला जरा जास्तच जाणवते. ज्याने एखादा रुग्ण, आणि त्याहून जास्त, एखादा रुग्ण‘मित्र’ गमावला आहे, त्यालाच या शांततेचा सर्वांत जास्त अर्थ कळतो.
‘जंजीर’ आणि ‘दीवार’: रागाआधीचे मौन-
जरा गेल्या वर्षीच्या विषयाकडे परत जाऊया. फरक एवढाच की, यावेळी आपण रागाकडे नाही, तर रागाच्या आधीच्या मौनाकडे किंवा अबोल्याकडे पाहणार आहोत.
‘जंजीर’मधल्या विजय खन्नाच्या आयुष्याची सुरुवात एका आघाताने होते. लहानपणी त्याने आपल्या आईवडिलांचा खून डोळ्यांनी पाहिलेला असतो. त्या खुन्याच्या मनगटावरच्या कड्यावर असतो एक पांढरा घोडा. पुढे त्या घोड्याची भयस्वप्ने त्याला सिनेमाभर वर्षानुवर्षे छळत राहतात. चित्रपटाच्या कथेनुसार तो लहानपणीच इतर मुलांपासून अलिप्त राहणारा असतो. म्हणजे, त्याचा राग हा त्याच्या न सांगितलेल्या गोष्टींचा साठा असतो. पोलीस ठाण्यातल्या एका प्रसिद्ध दृश्यात तो ‘ये पुलिस स्टेशन है…’ म्हणतो आणि थिएटर दणाणते; पण माझ्या मते त्या संवादाला वजन येते ते त्यामागच्या दाबून ठेवलेल्या तणावामुळे... भावनांमुळे...
‘दीवार’मध्ये हीच ‘कला’ आणखीन खोल उतरते. चित्रपटाच्या सुरुवातीला लहानग्या विजयच्या डाव्या हातावर काही जण गोंदवतात, ‘मेरा बाप चोर है’. पुढे प्रौढ विजयला जेव्हा कोणी ते गोंदण काढून टाकायला सांगते, तेव्हा तो म्हणतो की, ते शब्द फक्त हातावर नाहीत तर ते मनावर कोरलेले आहेत. म्हणजे मनावरची ती जखम त्याने बोलून उघडून दाखवली नाही; ती तशीच जपून ठेवली. आणि तो देवळातही जात नाही. आई त्याला देवळात नेते, तेव्हाही तो बाहेरच थांबतो. पुढे आई आजारी पडते, तेव्हाच तो पहिल्यांदा देवळात शिरतो आणि देवासमोर आपली तक्रार मांडतो. शेवटी जखमी विजय देवळात आईकडे पोचतो आणि तिच्या मांडीवर प्राण सोडतो. वर्षानुवर्षे साचलेले मौन एका क्षणात संपते.
म्हणूनच ‘अँग्री यंग मॅन’ला केवळ ‘रागीट’ म्हणणे हे अर्धसत्य आहे. तो आधी अबोल/ मौनी होता, आणि त्याचा राग हा त्याच्या मौनाचा स्फोट होता- आधी मौन, मग स्फोट, मग पुन्हा मौन. अमिताभने ही त्रिसूत्री इतकी खोलवर समजून घेतली होती की, रागाच्या स्फोटाच्या आधीची ‘शांतता’ तो प्रेक्षकांना इतका वेळ बहाल करायचा की, प्रेक्षक स्वतःच श्वास रोखून ते अनुभवायचे.
‘शोले’: माऊथ ऑर्गनची प्रेमळ भाषा-
‘शोले’मधले माझे आवडते दृश्य संवादाचे नाही; ते अबोल आहे. संध्याकाळ होतेय; जय (अमिताभ) माऊथ ऑर्गन वाजवतोय आणि राधा (जया भादुरी) हवेलीतले दिवे एकेक करून विझवत जातेय. दोघांमध्ये एकही शब्द नाही. फक्त सूर, विझणाऱ्या ज्योती आणि नजरेची सूक्ष्म देवाणघेवाण. संवादांनी ओतप्रोत भरलेल्या त्या चित्रपटातले हे सर्वांत ‘बोलके’ दृश्य आहे.
राधा ही ठाकुरांची विधवा सून आहे. गब्बरने तिचे कुटुंब संपवले आहे, आणि ती समाजाच्या चौकटीत बांधली गेलेली ‘स्त्री’ आहे. त्यामुळे तिचे आणि जयचे प्रेम बोलण्यातून व्यक्त केले जाऊ शकत नाही; तर ते सुरांतून आणि विझणाऱ्या दिव्यांतून दर्शविले जाते. आपण मराठीत ज्याला ‘अबोल प्रीत’ म्हणतो, त्याचे हे सिनेमातले सर्वोत्तम उदाहरण.
आणि ‘शोले’चे सर्वांत मोठे रहस्य म्हणजे जयचे नाणे. वीरू आणि जय प्रत्येक निर्णय नाणे उडवून घेत असतात आणि जय नेहमी ‘छापा’ म्हणत असतो. जय मरतो तेव्हा कळते की ते नाणे दोन्ही बाजूंनी ‘छापा’चेच असते. जय नेहमी योग्य निर्णयालाच ‘छापा’ ठरवत असतो, नाणेफेक जिंकत असतो आणि आपली चांगुलपणाची निवड नाण्याच्या नावावर खपवत असतो. त्याने ही गोष्ट वीरूला कधीही सांगितलेली नसते. मित्रासाठी ‘मौना’त कायमचे बंद ठेवलेले हे रहस्य म्हणजे भारतीय सिनेमातले सर्वांत सुंदर मौन आहे.
प्रथितयश कवीचा मुलगा आणि कवितेतले मौन-
अमिताभचे कवितेशी रक्ताचे नाते आहे. त्याचे वडील हरिवंशराय बच्चन हे ‘मधुशाला’ लिहिणारे कवी. त्यांच्याच ‘अग्निपथ’ या कवितेवरून त्याच्या १९९० च्या चित्रपटाचे नाव ठेवले गेले होते असे म्हणतात. अनेक वर्षांपासून तो जाहीर कार्यक्रमांत वडिलांच्या कविता सादर करतो; एका कार्यक्रमात ‘अग्निपथ’ म्हटल्यानंतर त्याने सांगितले होते की मन खचते तेव्हा त्या कवितेतून त्याला प्रेरणा मिळते. कविता सादर करणाऱ्याला शब्दांइतकेच विराम समजावे लागतात; विराम चुकला की कविता मरते.
‘कभी कभी’ (१९७६) मध्ये यश चोप्रांनी हाच कवी पडद्यावर आणला. अमित मल्होत्रा हा तरुण कवी पूजावर प्रेम करतो; पण पूजा मात्र आईवडिलांच्या इच्छेने दुसऱ्याशी लग्न करते. आणि मग... अमितच्या कविता थांबतात. कवीने कविता लिहिणे सोडणे यापेक्षा मोठे ‘मौनाच्या कोषात जाणे’ दुसरे कुठले असेल? पूजा त्याच्याकडून वचन मागते की, ‘तू लग्न करशील आणि कविता लिहिणे चालू ठेवशील’. तो लग्न करतो, पण कविता चालू ठेवू शकत नाही. पुढे पत्नीच्या आणि मुलीच्या एका जुन्या गोष्टीमुळे तो संतापतो, तेव्हा त्यांना तो शब्दांनी नव्हे, तर ‘अबोल्या’ने शिक्षा देतो.
शब्दांच्या पलीकडला नायक: ‘सिलसिला’
सिलसिला (१९८१) मध्येही कवी अमित आपले प्रेम मनात गाडून दुसऱ्या स्त्रीशी संसार करतो; पण भूतकाळ त्याला पुन्हा गाठतो.
याचे कारण असे की, अपूर्ण प्रेमाला ‘मौना’सारखी दुसरी भाषा नाही. पूर्ण झालेले प्रेम गाण्यातून, संवादातून सांगता येते; पण जे अधुरे राहते, ते फक्त डोळ्यांत उतरते. अमिताभने भारतीय सिनेमाला अपूर्ण प्रेमाची ‘मौनाची’ ही भाषा शिकवली.
वनवासातले मौन-
अमिताभच्या आयुष्यात एक काळ असा आला, जेव्हा त्याच्याकडे ना चित्रपट होते, ना पैसा. १९९५ च्या सुमारास त्याने स्वतःची कंपनी (ABCL) सुरू केली आणि १९९९ पर्यंत ती दिवाळखोरीत गेली. पुढे त्याने स्वतः सांगितले त्यानुसार त्यावेळी त्याच्यावर ५५ दावे होते आणि कंपनीवर सुमारे ९० कोटी रुपयांचे कर्ज होते. ज्याला कधीकाळी फ्रेंच दिग्दर्शक फ्रान्स्वा त्रूफोने ‘वन मॅन इंडस्ट्री’ म्हटले होते, त्याची ही अवस्था झाली होती खरी!
हा सगळा इतिहास सर्वांना तोंडपाठ आहे; परंतु मला मात्र यातही एक वेगळीच गोष्ट आकर्षित करते. ती म्हणजे, या काळातही तो अपयशाबद्दल रडत फिरला नाही, कुणाला दोष देत फिरला नाही. त्याने फक्त काम मागितले. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर; तो यश चोप्रांच्या घरी गेला आणि म्हणाला की, मी सध्या बिनकामाचा आहे. मला काम हवे आहे. आणि, त्यातून त्याला मिळाला ‘मोहब्बते’ (२०००).
सार्वजनिक आयुष्यात संकटाच्या काळात लोकांना उत्तर देत बसण्याऐवजी कामाला लागणे हे धैर्याचे सर्वांत कठीण रुप आहे. लोकांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर द्यावेसे वाटते, स्वतःची बाजू मांडावीशी वाटते; आजच्या समाजमाध्यमांच्या काळात तर ही इच्छा अधिकच तीव्र असते. अशा वेळी जो ‘शब्दांऐवजी’ कृतीतून बोलतो, त्याच्या ‘मौना’ची ताकद मला फार मोठी वाटते.
‘कौन बनेगा करोडपती’: ‘ऐकणाऱ्या’ होस्टची कला-
३ जुलै २००० च्या एका पावसाळी रात्री ‘स्टार प्लस’वर एक नवा कार्यक्रम सुरू झाला; ‘कौन बनेगा करोडपती’. सूत्रसंचालक होता अमिताभ बच्चन. ‘कंप्यूटरजी’ आणि ‘लॉक किया जाए?’ ही त्याची वाक्ये घराघरांत पोचली. पण मला तिथेही दिसते, ते त्याच्या मौनाचे सर्वांत लोकप्रिय रूप... हॉट सीटवरचा स्पर्धक गडबडलेला आहे... समोर प्रश्न आहे... चार पर्याय आहेत... आणि, अमिताभ? तो बोलत नाही; तो थांबतो. त्याच्या त्या ‘थांबण्या’च्या (पॉजच्या) सन्नाट्यावर संपूर्ण कार्यक्रमाचा डोलारा उभा आहे. ‘लॉक किया जाए?’ विचारल्यानंतरचा तो वि...रा...म... तर आता लोककथेचा भाग झाला आहे.
आणखीन महत्त्वाचे म्हणजे त्याचे ऐकणे. स्पर्धक आपली कहाणी सांगतो आणि तो मध्ये बोलत नाही, घाई करत नाही, त्यांना बोलू देतो. ‘मला कोणीतरी ऐकून घ्यावे’ ही प्रत्येकाची गरज असते, आणि अमिताभच्या ऐकण्याने ती पडद्यावर पूर्ण होते. ‘आनंद’मधल्या भास्कर बॅनर्जीने जे ऐकण्याचे तंत्र शिकले, ते एकोणतीस वर्षांनी KBC च्या सेटवर कोट्यवधी लोकांसमोर पुन्हा प्रकटले.
आणखी काही अबोल क्षण-
आतापर्यंत आपण अमिताभच्या ज्या चित्रपटांतली मौनाची उदाहरणे पाहिली, ती अधिक प्रसिद्ध आहेत. पण त्याच्या कारकिर्दीत आणखीही अनेक चित्रपट आहेत, जिथे तो न बोलता खूप काही सांगून जातो.
संसारातले मौन: ‘अभिमान’ आणि ‘मिली’-
‘अभिमान’ (१९७३) हा ऋषिकेश मुखर्जींचा चित्रपट ‘मौना’मुळे तुटणाऱ्या संसाराची कहाणी आहे. सुबीर (अमिताभ) हा नामवंत गायक; त्याची पत्नी उमा (जया भादुरी) त्याच्याच मदतीने गायिका म्हणून पुढे येते आणि तिची कीर्ती त्याच्यापेक्षा जास्त वाढते. सुबीरच्या मनात असूया निर्माण होते. ती असूया तो ना कबूल करतो, ना सांगतो; उलट जो मित्र चंद्रू त्याला ते स्पष्टपणे सांगतो, त्यालाच तो दूर लोटतो. मग अहंकारामुळे संसार तुटतो, दोघे वेगळे होतात आणि उमाचा गर्भपात होतो. आपल्या घराघरांतल्या कितीतरी नवरा-बायकोंची ही गोष्ट आहे: न बोललेली असूया घरभर पसरते आणि संसाराचे सूरच बेसूर होऊ लागतात.
‘मिली’ (१९७५) मधला शेखर दयाल हा नैराश्याने ग्रासलेला, एकांतप्रिय माणूस आहे; मुलांच्या खेळण्याच्या आवाजानेही त्याला त्रास होतो. त्याच्या शेजारी राहणारी मिली (जया भादुरी) ही गंभीर आजाराने ग्रस्त असूनही खळाळून हसणारी, सगळ्यांशी बोलणारी मुलगी. तिच्या बडबडीसमोर शेखरचे ‘मौन’ हळूहळू वितळत जाते, आणि हे वितळणे अमिताभने मुख्यतः नजरेतून आणि देहबोलीतून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहे असे मला वाटते. एखाद्या ‘अबोल’ माणसाचे कुणाच्या प्रेमात पडणे असेच असते- त्याला स्वतःला ते कळण्याआधी बाकी सगळ्यांना ते कळालेले असते.
एकाच कलाकाराची दोन रूपे: ‘डॉन’-
‘डॉन’ (१९७८) मध्ये अमिताभची दुहेरी भूमिका आहे. डॉन हा सुसंस्कृत (दिसणारा), थंड रक्ताचा गुन्हेगार; आणि विजय हा रस्त्यावर कला सादर करणारा, भोळसट, बनारसी पान खाणारा, गाणारा-नाचणारा. एकाच चेहऱ्यावर सततच्या बडबड्यामागची उबदारता आणि संयमी माणसाचा थंडपणा दाखवताना अमिताभने शब्दांपेक्षा देहबोली आणि नजर यांचा जास्त वापर केला आहे असे मला वाटते. हा फरक संवादांनी नव्हे, तर चालण्या-बसण्याच्या ‘न बोलता’ अप्रत्यक्षपणे उभ्या केलेल्या शैलीने दिसून येतो.
सत्तेतील मौन: ‘अग्निपथ’ आणि ‘सरकार’-
‘अग्निपथ’ (१९९०) साठी अमिताभने आपला आवाज बदलला. असे म्हटले जाते की, ‘गॉडफादर’मधल्या मार्लन ब्रँडोपासून प्रेरणा घेऊन त्याने घोगऱ्या, दबलेल्या आवाजात संवाद दिले. ज्याच्याकडे खरी सत्ता असते त्याला ओरडावे लागत नाही, हा विचार त्या प्रयोगामागे असावा. पण प्रेक्षकांना त्याचा नेहमीचा खर्ज हवा होता. असे सांगितले जाते की, त्याला नंतर संपूर्ण चित्रपट आपल्या मूळ आवाजात पुन्हा डब करावा लागला. तरीही त्याच भूमिकेसाठी त्याला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पंधरा वर्षांनंतर ‘सरकार’ (२००५) मध्ये रामगोपाल वर्मांनी त्याला पुन्हा सत्ताधाऱ्याच्या भूमिकेत आणले आणि यावेळी तो अधिक गंभीर, धुमसणारा आणि संयमी होता.
बापाचे मौन: ‘मोहब्बते’ आणि ‘कभी खुशी कभी गम’-
‘मोहब्बते’ (२०००) मधला नारायण शंकर हा गुरुकुलाचा कडक शिस्तप्रिय प्राचार्य आहे, ज्याने थेट प्रेमावरच बंदी घातली आहे. त्याच्या कठोरतेमागे मुलीच्या मृत्यूचे दुःख आहे, जे तो कधीच ‘बोलून’ दाखवत नाही.
‘कभी खुशी कभी गम’ (२००१) मध्ये यशवर्धन रायचंद आपल्या दत्तक मुलाला घराबाहेर काढतो आणि त्यानंतर त्या घरात एक जड ‘शांतता’ राहते. बापाला मुलाची आठवण येत असावी आणि मुलाला बापाची... पण, पहिला शब्द कोणी बोलायचा हाच प्रश्न असतो.
या सगळ्या उदाहरणांवरून एकच गोष्ट दिसते. अमिताभने जेव्हा जेव्हा सर्वांत खोल भावना उभी केली, तेव्हा तेव्हा तिथे शब्दांपेक्षा त्याचे ‘मौन’च जास्त बोलले. पन्नासहून अधिक वर्षांच्या कारकिर्दीतले हे सातत्य हा योगायोग नाही; ते त्याच्या कलेचे मर्म आहे.
उतारवयातले मौन-
वय वाढते तसे कलाकाराचे हावभाव कमी होतात आणि जो अभिनय उरतो ते अधिक अर्थपूर्ण बनतात. पहिल्या इनिंगमध्ये अमिताभने रागाला शब्द दिले; तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने शब्दरुपी संवादांऐवजी ‘मौन’ जास्त वापरले.
























साहेब...अदभूत लिखाण.... एक नंबर... अधाशासारखा वाचून काढला... साहेब तुमच्या लिखाणाला मुजरा. कुठून एवढं सुचतं... आज माझा दिवस तुमच्या लिखाणामुळे मस्त जाणार.. धन्यवाद 🙏🙏🫶😍♥️
ReplyDeleteYou made me walk through memory lane. So many memories gathered from past life about Amithabh’s movies.
ReplyDeleteThank you so much. It’s a MASTERPIECE article.
Dr. P. G. Patil
DeleteSundar lihile aahe sir.
ReplyDeleteअसेच निरंतर लिहित रहा..... खूपच सुंदर.
खूपच अभ्यासपूर्ण आणि वेगळा दृष्टिकोन लेख. मांडणारा लेख. वाचायला सुरु केला आणि शेवटपर्यंत वाचून काढला. अमिताभ चा Angry Young Man म्हणजे एक भूकंप ... का घडतो तर म्हणजे भूकंप होण्यापूर्वी असणार्या मानसिक भूगर्भातील हालचाली .. अगदी समर्पक.
ReplyDeleteयाच सुप्त मानसिक हालचाली शब्द रुपात व्यक्त न होता, चेहर्यावरील भावात, अभिनयात व्यक्त झाल्या,अभिनयाच्या उत्तरार्धात मौनातुन. हीच .अमिताभ यांची अभिनय कारकीर्द व्यक्त केली डॉ .अमित सर यांनी आपल्या अप्रतिम लेखणीतून.
बोलण्यातून व्यक्त होणारी भावना ही शब्दातीत भावना व्यक्त करू शकत नाही शब्दातीत भावना ही मौनातुनच व्यक्त होते....शांत राहणे म्हणजे मौन नाही.
एक वेगळा दृष्टीकोन समर्थपणे मांडला . खूप खूप अभिनंदन. असाच नवीन विचार आपल्या ब्लॉग द्वारे देत राहा
अमिताभ सरांच्या मौनावर आणि एकूणच मौन आणी त्याचे महत्व, परिणाम याचं विश्लेषण करणारा अप्रतिम लेख.. 👍👍
ReplyDeleteखूपच सुंदर.... अभ्यासपूर्ण..उदाहरणे दाखले संदर्भ सारेच अद्भूत
ReplyDeleteVery well written! Covering Big B’s incredible life in a blog would be a humongous task, but you’ve done it beautifully. A wonderful tribute to a true legend!
ReplyDeleteजणू काही तू या लेखात बच्चन साहेबांच्या "मौनांची भाषांतरेच " करून सांगितलेली आहेस.
ReplyDelete" Reading between the Lines " याचा पुरेपूर प्रत्येक या लेखात आला.
पण यासाठी तुझी कुतुहलात्मक आणि अभ्यास पूर्ण विचारसरणी आणि आणि अँग्रीमॅन ... सॉरी सॉरी या लेखापुरतं का होईना "मौनीबाबा" श्री अमिताभ बच्चन यांच्यावरचे निस्सीम प्रेम दिसून येते.
Keep it Up.
डॉ रविंद्र काळे
सर तुमचा लेख वाचताना जाणवलं की, एखाद्या कलाकाराकडे पाहण्याची तुमची दृष्टी किती वेगळी आणि खोल आहे! अमिताभच्या रागामागचं मौन शोधताना तुम्ही केवळ त्याच्या अभिनयाचं नव्हे, तर स्वतःच्या संवेदनशीलतेचंही दर्शन घडवलं आहे. प्रत्येक उदाहरणातून तुमचा अभ्यास, निरीक्षणशक्ती आणि लेखनावरचं प्रेम जाणवतं. खरंच, तुमचे लेख वाचताना केवळ विषय समजत नाही, तर तो नव्याने अनुभवायला मिळतो! मनापासून अभिनंदन सर! ❤️
ReplyDeleteखरंच मौन किती बोलकं असू शकते याची प्रथमच जाणीव झाली...खूप सुंदर लेख...
ReplyDeleteखूपच उल्लेखनीय लिखाण.... अगदी सपूर्ण समर्पण अनुभवण्यास लाभले ,लेखकाचे(डॉ .अमित पाटील सर)तसेच ज्यांच्यावर लेख लिहिण्यात आलाय त्या आदरणीय,अदभुत, अद्वितीय, अलौकिक अमिताभ बच्चन यांचे......!!!
ReplyDelete